परवाच कुठेशी रा.रा. केजरूपंत यांची तुलना स्वये श्रीरामप्रभूंशी झालेली वाचली आणि धन्य धन्य झालो. भाबड्या भक्तांची इच्छा असेल तर वानराचा नर होतो याची देही याची डोळा खात्री पटली. मग भले त्या वानराची स्वत:ची इच्छा असो वा नसो. मग पुढे एकदा कपाळावर शेंदूर फासला गेला की देवपण आलेच. देवपण आले की नरत्व वा वानरत्व दोन्ही संपले. मग ते वानर ज्या काही कोलांट्या मारील, कोटिच्या कोटी उड्डाणे करील, स्वभावानुरूप माकडचेष्टा करील, त्या सर्व "लीला" होऊन जातात. भक्तगण त्या लीळा डोळ्यांमध्ये श्रद्धा आणून, कामधाम सोडून कवतिकाने पाहत बसतो. बुद्धी गहाण टाकून पैसे, नारळ, हळदकुंकू वाहू लागतो. एवढेच नव्हे तर दैवत कसे जागृत आहे याच्या कपोलकल्पित कथा विस्फारलेल्या मोठ्ठ्या डोळ्यांनी दिसेल त्याला सांगत सुटतो. इथवर सर्व ठीक म्हणायचे. कुणाची बुद्धी कशी चालावी आणि कशी चालू नये यावर काही बंधन नसते. पण हा अंधश्रध्द जमाव जेव्हा आपण म्हणू तो देवच अशा आग्रहावर येतो, तुम्ही त्याला मानले नाहीत तर तुम्हीच पापी असे म्हणू लागतो, तेव्हा त्या जमावाची उरलीसुरली विवेकबुद्धी संपून झुंडशाहीकडे वाटचाल चालू झाली असेच म्हणावे लागेल.
पूर्वी आमच्या नेहेमीच्या चहाच्या अड्ड्याशेजारी एक झाड होते. त्या झाडाखाली स्कूटर्स, मोटरसायकल्स लावल्या जात. मित्रमंडळी चहावर एक तास घालवून झाला की बाहेर येऊन पुन्हा एखाद्या मित्राच्या स्कूटरीवर रेलून पुन्हा अर्धा तास गप्पांत घालवत. झाडाला आमचा त्रास नव्हता, उलट कडक ऊन असेल तेव्हा झाडाच्या सावलीचा आम्हाला आधार होता. पुढे आमचे उमेदवारीचे दिवस संपले, मित्र चहूदिशांना पांगले. बरेच दिवस मग अड्ड्यावर जाणे झाले नाही. असेच दिवस धकाधकीत गेले. थोडेफार स्थैर्य येऊ पाहत होते. पुन्हा जुने नंबर्स काढून एकमेकांशी संपर्क झाले, अड्ड्यावर भेटायचे ठरले. ऐन वैशाखी वणव्याचे दिवस. रामराणा जन्मला ती टळटळीत वेळ. मी स्कूटरवरून पोचलो. कधी पार्किंगला जागा मिळायची नाही. दुरून मध्ये खूप मोकळी जागा दिसली म्हणून आनंदात स्कूटर घुसवली आणि थबकलो. जागा मोकळी का याचा उलगडा झाला. आता झाडाच्या बुंध्याशी कुणीतरी मोठा गुळगुळीत धोंडा आणून त्यावर छानपैकी शेंदूर माखून, हळद, कुंकू वाहून ठेवला होता. एक दोन फुले वाहिलेली. एवढेच पुरेसे होते. धोंड्याची प्रतिष्ठापना झाली. आणि या देवस्थानाला निदान सहा सायकली/स्कूटर्स बसतील एवढे अनुदान कुणी न मागता मिळाले. काहीही न करता. कुणाचाही नवस नव्हता, मागणे नव्हते, धोंड्याला काही करावेही लागले नाही. धोंड्याची इच्छासुद्धा नव्हती. अशा वेळी जे करायला हवे होते पण जे कुणीच करत नाही तेच मीही केले. त्या उपटसुंभ धोंड्याचे शेंदुरासह विसर्जन न करता दुर्लक्ष करून निघून गेलो. पुढे अशीच एकदोन वर्षे गेली आणि पुन्हा तेथे जाणे झाले. यावेळेला झाडाच्या बाजूला एकही वाहन नव्हते. दोन स्कूटरींमध्ये कौशल्याने आपली स्कूटर बसवणारा पुणेकर पूर्ण मोकळी जागा पाहिली की चपापून तारीख पाहतो. सम की विषम याला पुण्यात जेवढे महत्व आहे तेवढे गणिताच्या पेपरमध्येपण नसते. तसेच माझे झाले. एकही वाहन दिसत नव्हते. पण एक नवीन गोष्ट नजरेस आली. आता त्या शेंदूरधोंड्याला छोटेसे घर मिळाले होते! चक्क कुणीतरी त्या धोंड्यावरती छानपैकी तीन बाय तीन फुटाचे देऊळ बांधले होते! कपाळाला मारे गंधबिंध लावून एक इसम त्याची राखणही करत होता. समोर तबकात नोटा, नाणी दिसत होती. मी शेजारी स्कूटर लावायला गेल्यावर या भक्ताने लगेच स्कूटर समोरच्या बाजूला लावा असे सांगितले. त्या बाजूला वाहने लावलेली दिसतपण होती. एकूण हा धोंडा चांगलाच प्रस्थापित झाला होता. मला खात्री आहे पुढील वेळेस येऊ तेव्हा या धोंड्याचा एखादा उत्सवही चालू झालेला असेल. भक्तगण बेहोष होऊन भजन करत असतील, संख्येच्या जोरावर नास्तिकाला हाकलून दिले जाईल.
धोंडा निर्गुण निराकार, भक्त गर्जती सर्वत्र हाहाकार, असा प्रकार आहे. झुंडशाही, तर्कशून्यता आणि विवेकशून्य आक्रमकता यांच्या बळावर विरोध मोडून काढणे एवढेच या धुंद भक्तांचे कार्य असते. गळ्यात पाचदहा रुपयांच्या त्यागरूपी रुद्राक्षाच्या माळा, अंगभर फासलेले खोट्या विद्वत्तेचे भस्म, कपाळावर आपल्या स्वामिभक्तीचा मत्त टिळा अशा आवेशात हे भक्त गर्जना करून आपला धोंडा कसा श्रेष्ठ, त्याला शरण न जाणारे तुम्ही कसे पापी हे उच्चरवाने सांगत असतात. सांगोत बापडे. पण या अंधभक्तांची मजल जेव्हा धोंड्याला आता परमेश्वर मानायला भाग पाडण्यापर्यंत जाऊ लागली की मग भीक नको पण हे भक्त आवर असे वाटू लागते. जेव्हा मी धोंड्याला शेंदूर फासलेले पाहिले तेव्हाच त्यावर पाणी ओतून त्याचे दगडपण उघडकीस आणले असते तर तिथे आज दांभिकतेचे देऊळ उभे राहिले नसते. पण मला वाटते, आपणा सर्वांतच एक सुप्त आशा असते, कुणीतरी सुपरहिरो यावा, त्याने आपली सर्व दु:खे नाहीशी करावीत. न जाणो हा धोंडा परग्रहावरून आलेला एखादा सुपरमॅन असावा किंवा प्रत्यक्षात खरंच देवाचा अवतार असावा. मग केवळ एक खुळी आशा म्हणून नकळत अशा धोंड्यांना नमस्कार केला जातो, किमानपक्षी त्यांना लाथ तरी मारली जात नाही. या तुमच्या आमच्या आशेच्या जोरावर असे शेंदूरदगड उदयास येतात, त्यांची देवळे उभारली जातात. आपलेच नष्टचर्य, दुसरे काय?

No comments:
Post a Comment