Friday, May 23, 2014

पूल आणि बुरूज

पहाटे पहाटे फोनचा स्क्रीन जागा झाला. अंधारात तो उजेड डोळ्यांना जास्तच भगभगीत वाटला. महत्वाचा संदेश असणार म्हणून पाहिलं. बातमी वाईट होती. बाळूमामा गेला. गेले काही महिने तसा तो आजारीच होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. काही आठवडे, फारतर महिने असं स्पष्ट सांगितलं होतं. कल्पना होती, मनाची तयारी होती तरीही सुन्न व्हायला झालं. कळायला लागल्यापासून ते आतापर्यंतची अशी उण्यापुऱ्या चाळीस पंचेचाळीस वर्षांतील त्याची अनेक रूपं नजरेसमोरून गेली. गेल्या काही वर्षांत भक्कम किल्ल्याचे बुरूज ढासळावेत त्याप्रमाणे घरातील माणसे गेली. पूर्वी माणसे या वाईट निमित्ताने का होईना पुन: एकत्र येत, एकमेकांना धीर देत. गेलेल्या माणसाच्या चांगल्या आठवणी काढत. जमलेली माणसे कधी काळी लहान असतच. गेलेले माणूस हे बऱ्याच वेळा या सगळ्यांना जोडून ठेवणारी नाळ असायचे. मग त्या आठवणी निघाल्यावर पुन:श्च माणसे दहाबारा वर्षांची ती लहान मुले होत, तुटलेले पूल पुन्हा जोडले जात. कधी कधी अनेक पावसाळ्यांचे पाणी या पुलांखालून वाहून गेलेले असायचे. कधी काळी उन्हाळ्यातील सुटटी लागली की एकत्र जमणारी भावंडे हीच असायची. एकत्र जेवणारी, उन्हांतान्हात खेळताना घामाघूम होऊन मग थंड अंधाऱ्या माजघरातील झोपाळ्यावर बसून मोठयांच्या दुपारच्या डुलकीचा खंडोबा करणारी, संध्याकाळी वारं सुटलं की गच्चीवर जाऊन पतंग उडवणारी, जेवताना पानात काही टाकलं की रागे भरतो म्हणून मामाच्या शेजारी जेवायला बसायला टाळणारी, पण तोच मामा संध्याकाळी भेळ खायला न्यायचा तेव्हा गाडीत पुढच्या सीटवर त्याच्यापाशी बसण्याची चढाओढ करणारी, रात्री गच्चीवर गादया टाकून झोप लागेपर्यंत गप्पा किंवा लखलखणारे तारे न्याहाळणारी.

आमची ही पिढी तशी या बाबतीत भाग्यवानच म्हणावी लागेल. या पिढीनं मावशा, मामा, आत्या, काकांनी भरलेली एकत्र कुटुंबं पाहिली. सर्वांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी ही आधीची पिढी. जसा हट्ट आईवडिलांकडे करू तसाच हट्ट आम्ही यापैकी कुणाशीही करू शकत होतो आणि तेवढ्याच हक्काने फटके पण खात होतो. मामानं धपाटा दिला म्हणून कधी आईकडे रडत कुणी भावंड गेल्याचं आठवत नाही. कारण जर तसं केलं तर आईही एक ठेवून देणार याची खात्री होती. मामाचा हक्कच होता तो. जसा तो बहिणींवर प्रेम करायचा तसा त्यांच्या मुलांवरपण. धपाटे हे प्रेमापोटीच घातले गेलेले असतात. जिथे परकंपण असतं तिथे हा हक्काचा मारपण नसतो. आज जाणवतं त्यांच्याआमच्या कळत नकळत या सर्व मंडळींनी एक अदृश्य असा धागा गुंफला होता. प्रेम, प्रसंगी राग, कधी कधी मनुष्यस्वभावाने मिळालेला रुसवा अशा भावनांनी भक्कम बनलेला असा तो धागा. त्या धाग्यात आम्ही सर्व भावंडे बांधलो गेलो आहोत.

असं असलं तरी कुठं तरी पडझड होत असते. मूल्ये बदलत असतात. पूर्वी जुझांत गोळाबारीनं बुरुज फुटत, पडत, पण त्याच जोमानं त्यांची डागडुजी होऊन किल्ला अभेद्य अखंड असा उभा राहत असायचा. किल्ल्यात राहणाऱ्या वस्तीचं जगणं त्याच्या अभेद्यपणावर अवलंबून असायचं. पुढे किल्ल्यातून निघून लोक खुज्या अशा खोपटांत राहू लागली. आपापल्या खुराड्यांपुरती जगू लागली. किल्ल्याच्या बुरुजाला भेगा पडल्या तरी त्याच्या दुरुस्तीसाठी कुणाला वेळ नसायचा किंवा बुरुजाच्या बुलंदपणावर विश्वास असल्यामुळे त्याला काही होत नाही अशी खात्री असायची. कालानुरूप प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले, आयुष्ये बदलली, भौगोलिक संदर्भ बदलले, सामाजिक राजकीय विचार वेगळे झाले. कधी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटणं होऊ लागलं. पण अशा भेटण्यात जिवाभावाच्या गप्पा होत नाहीत. मिठी होते पण ती कडकडून, चिंब भिजून होत नाही. प्रत्येकाला नक्कीच आतून तसं भेटावं असं वाटत असतं, पण काळाची पुटं चढून मनात नको असला तरी प्रौढपणाचा एक वेष चढलेला असतो. समाजानं, रीतींनी तो घालायला लावलेला असतो. कधी कधी स्वत:वर खूष होऊन नकळत चढलेला असतो. त्या पुटांच्या आत, आपण तेच आहोत हे जाणवत असतं. बुंध्यावर वयाची वर्तुळं वाढली, फांद्या वाढल्या म्हणून झाडाचं झाडपण थोडंच बदलतं? मुळं आहेत तिथंच असतात. मग असेच जणू काही स्वप्नात असल्याप्रमाणे, बधिरपणे स्वत्व थोडंसं विसरून जगत असताना मुळापासून हादरवणारा असा एखादा धक्का बसतो. ज्या जमिनीत आपली मुळं रुतली आहेत ती जमीनच मुळापासून हादरते. खडबडून सर्व धाव घेतात. यावेळी कसलाही वेष नसतो, अभिनिवेश नसतो. असते ती केवळ एक वेदना. आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या अनेक या धाग्यांपैकी एक तुटला आहे त्याची वेदना. एक एक असा धागा तुटतो आहे आणि आपल्याला प्रौढत्वाकडे ढकलतो आहे याची जाणीव होत असते. मग या वेळी जी भेट होते ती कडकडून असते. आपापल्या प्रवाहात वेगळे झालेले किनारे जोडले जातात. जिवंत असतानाही ज्या पुलाने जोडण्याचं काम केलं तो मरणानंतरही तेच काम करतो आहे. हा बुरूज पडूनही भक्कम उभा आहे, त्याच्या आधाराने आम्ही सर्व एकमेकांना धरून राहणार आहोत.

No comments:

Post a Comment