Monday, May 12, 2014

दिव्याखालचा अभ्यास

परीक्षा तर झाली. घरात ठीक वीज वगैरे असताना उगाच झाडू हातात घेऊन रस्त्यावरील खांबाखाली धुरळा करून मग तोच झाडून अभ्यास करणे झाले. त्यातून डोक्यात काही शिरले जरी नसले तरी चारचौघांनी थांबून "वा! अभ्यासू वृत्ती असावी तर अशी!" असे उद्गार तर काढले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन माऊल्यांनी थांबून अरेरे, बिन आईबापाचे पोर दिसते आहे आणि मायेचे छत्र नसताना, घरचे अठराविश्वे दारिद्रय असताना कसे अभ्यास करते आहे पहा असे कळवळून म्हटले होते. मग आपणही उगाच पोट खपाटीला गेल्याचा अभिनय वगैरे करून दाखवला होता. वास्तविक गणिताच्या पुस्तकाच्या कव्हरच्या आत बाबुराव अर्नाळकरांचे 'तळघरातील रहस्य' होते, ते आपण त्या माऊलीला दिसू दिले नव्हते. उगाच तिच्या प्रेमळ हृदयाला का धक्का पोचवा? त्या माऊलीने मग तिच्या घरी जाऊन पोळीभाजीचा डबा भरून आणला होता. आणि म्हणाली होती, लेकरा, मी तुझी काही सख्खी आई नव्हे, पण एवढं खा रे, इतका अभ्यास करतो आहेस, पोटाला काही आधार हवा. वास्तविक घरी तडस लागेपर्यंत जेवण झाले होते. वालाची उसळ आणि शिकरण! आमचे आवडते पदार्थ. बोट लावून दाबले होते. मातोश्री म्हणाल्यासुद्धा होत्या, "आता पुरे! श्वास घेण्यासाठी आत जागा ठेव जरा. आणि मेल्या खातोहेस तर जरा अंगालापण लागूदे! इतका कसा रे तू फाटक्या अंगाचा?" पुढचे ऐकायला नको म्हणून इथे रस्त्यावरच्या दिव्याखाली येऊन बसलो होतो. म्हटलं निवांत 'तळघरातील रहस्य' वाचावे. तर आता ही माऊली डबा घेऊन आली. आणि आणून आणून आणलंन काय तर शेपूची भाजी आणि भाकरी! खरोखर जिवावर आले होते. पण ती माता जणू भरवायलाच बसली होती. तिच्या डोळ्यातील प्रेमळ भाव सहन होईनात. मग उगाच एक तुकडा मोडला आणि त्या मातेस सांगितले, तुम्ही जा, खाईन मी नंतर. परीक्षा आहे उद्या, एवढे प्रकरण पूर्ण करतो आणि खातोच. त्यावर पाठीवरून हात फिरवून ती होय रे बाबा, शीक, मोठ्ठा हो, जातील हे पण दिवस असे सांगून गेली. त्या नजरेने आपण अस्वस्थ झालो होतो. थोडासा तिचा रागही आला. निवांत बसूही देत नाहीत ही मोठी माणसे. आपल्याबद्दल कणव वाटणे, डबा आणणे इथवर ठीक होते. पण शीक, मोठ्ठा हो हा आगाऊपणा कशाला? झालं? आता ही सदसदविवेकबुद्धी आपल्याला आतून कुरतडत राहणार आणि तळघरातील रहस्य उलगडण्याचे तसेच राहणार.

आपल्याला समोरच्या घरातल्या त्या इरसाल कार्ट्यासारखे जमले पाहिजे. आपल्याच वर्गातले ते. आपण सर्वात पहिल्या बाकावर बसतो आणि ते शेवटच्या बाकावर बसते. तरी त्याचा पहिला नंबर आणि आपण एटीकेटीच्या कृपेवर हे गूढ अजून उलगडत नाहीये. सरांकडे आपण तक्रार पण केली होती. कॉपी करून, रट्टा मारून, दिवसरात्र घोकंपट्टी करून, परीक्षा देणाऱ्यांना तुम्ही मार्क कसे काय देता? सर म्हणाले होते, अरे दगडा, तो परीक्षेला हजर तरी राहतो. आपण कुठे होतात? आणि मग सरांनी फीचीही मागणी केली होती. त्यावर मग आपण सरांना आपल्या उत्कृष्ट अभिनयकलेचे दर्शन घडवले होते. आपल्या घरची सामान्य, नव्हे अतिसामान्य परिस्थिती, आईला चार घरचा स्वयंपाक करून आणि वडिलांना घरोघरी फिरून उदबत्त्या विकून चरितार्थ करावा लागतो, बरेच वेळेस घरात थंडा फराळ होतो, विजेचे बिल न भरल्याने अंधारात चाचपडावे लागते, मग रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो इत्यादी गोष्टी आपण इतक्या प्रभावीपणे सांगितल्या की आपण स्वत:च क्षणभर गहिवरलो होतो. भूमिकेशी समरस झालो की आमचे आम्हालाच आवरत नाही. सर दोन मिनिटे आ वासून पाहत होते. मग भानावर येऊन त्यांनी स्वत:च्या खिशात हात घालून दहा रुपये काढून दिले होते. म्हणाले, दिसतं तसं नसतं हेच खरं. माफ कर मला, तू शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जातो आहेस याची कल्पना असती तर माझ्याकडून असं संवेदनाशून्य भाषण झाले नसते. सर आपल्या गावात नवीन आहेत म्हणून बरं. त्यांना अजून आपल्या पिताश्रींचे धंदे, आपलं, व्यवसाय माहीत नाहीत. जर त्यांना संशय आलाच तर 'तो मी नव्हेच' चा प्रवेश करून दाखवावा.

चला, परीक्षा तर झाली. सर्वांना खात्री आहे, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतर, रस्त्यातील दिव्याखाली अभ्यास केलेल्याला यश मिळणारच. सर कालच चितळ्यांकडे जाऊन पेढ्यांची आगाऊ ऑर्डर देऊन आले आहेत. आपणही आपल्यापरीने भरपूर प्रयत्न केला आहे. यावेळी प्रश्न सोडून दिले नाहीत. उत्तर माहीत असो वा नसो, मनास येईल ते ठोकून दिले आहे. एका पेपरमध्ये अर्धी उत्तरपत्रिका 'वन्दे मातरम' तर उरलेली 'अस्सलाम आलेकुम' असे लिहून ठेवले आहे. एका पेपरमध्ये तर हळूच हजाराची नोट ठेवून दिली आहे तर दुसऱ्या पेपरात रस्त्यावर अभ्यास करतानाचे छायाचित्र चिकटवून ठेवले आहे. एका पेपरात अर्ध्या प्रश्नांचे उत्तर 'मुंबईसह संयुक्त गुजरात झालाच पाहिजे', तर उर्वरित पेपर 'गुजरातसह संपूर्ण भारत झालाच पाहिजे' याने भरला आहे.  सर म्हणाले आहेत, काही काही कनवाळू परीक्षक, केवळ प्रयत्न केला याबद्दल मार्क देणारे असतात. तुझा पेपर जर अशा परीक्षकाकडे गेला तर तू पास झालाच असे समज. मग तुझे दिव्याखाली अभ्यास करायचे दिवस संपले. पुढे काय करणार आहेस मग? आपण पुढे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचे आहे असे सांगितले आहे. सर म्हणाले वा! समाजाने तुला काही दिलं नाही पण त्याचा कडवटपणा न बाळगता तू डॉक्टर होऊन समाजऋण फेडणार हे कौतुकास्पद आहे. ती ऋणबिण भानगड फारशी आपल्या लक्षात आली नाही तरी आपण काही तरी मोठ्ठे करणार आहोत हे लक्षात आले. हॉस्पिटल काढून डॉक्टरलोक नोकरीला ठेव, बक्कळ पैसा मिळेल असा सल्ला पिताश्रींनी दिला आहे तेवढेच कळले आहे. ते म्हणतात बेट्या, एक लक्षात ठेव, सगळे धंदे बुडीत जातील पण हॉस्पिटलवाले, हॉटेलवाले आणि चड्ड्याबनियनवाले यांना मरण नाही हो! पण मला वाटते तो सल्ला त्यांनी आपल्या धंद्याच्या फायद्यासाठी दिला आहे. का कुणास ठाऊक त्यांच्याकडे नोकरीला असलेले लोक नेहेमी आजारी पडत असतात किंवा अपघातात तरी सापडत असतात. मला स्वत:ला अर्नाळकरांच्या कथांतील धनंजय, किमानपक्षी त्यांचा इमानदार नोकर छोटू तरी व्हावे असे वाटते. असो. तूर्तास तरी आपण  'तळघरातील रहस्य' वाचावे हेच बरे. 

No comments:

Post a Comment