इश्श! साधा बेल बॉन्ड तो काय मेला, त्यासाठी इतकं लाजायचं? आपलं लग्न झालं तेव्हासुद्धा इतकं लाजत नव्हतात. लग्नाच्या आधी तुम्हाला बेल हा शब्द कित्ती आवडायचा. तुमची पँटसुद्धा बेलबॉटम असायची. मी कधीही तुम्हाला भेटायला आले की तुम्ही घरी नसायचा. तुमची आई नेहमी म्हणायची "कुठं बेल घालत गावभर फिरत असतो कुणास ठाऊक." त्यावेळी कित्ती कित्ती क्यूट होता तुम्ही! खोकला तर सोडाच साधं सर्दीपडसं पण कधी होत नव्हतं. आता नाही म्हणायला लग्नानंतर फिरायला कुलूमनालीला गेलो होतो तेव्हा गार वारं लागून कानाचे दडे बसले होते. मी काही बोलले तरी ऐकायला येत नव्हतं तुम्हाला. मग आपण तिथल्या दुकानातून छान रेशमी स्कार्फ घेतला होता, आठवतं ना? कित्ती रोमँटिक? अन काय हो, ती स्कार्फ विकणारी सेल्सगर्ल होती तिचं बरं सगळं ऐकायला येत होतं तुम्हाला? तिचं ऐकून स्कार्फबरोबर रंगीबेरंगी मॅचिंग मोजे पण घेतलेत. असे लब्बाड आहात ना! तो स्कार्फ तुम्हाला इतका आवडला होता, संपूर्ण ट्रीपभर तो घालून होतात. रात्री झोपतानासुद्धा काढायचा नाहीत. कसला बाई हा मंत्रचळेपणा? मला तर तुमचा हा मंत्रचळेपणाच मोहक वाटायचा. पण तो माफक असायचा. त्याला उगीच तत्वाची वगैरे झालर लावायचा नाहीत. आणि उगाच मूल्यं, तत्वं असलं करत बसायचा नाहीत. तत्वाबित्वाची चर्चा करणारे कसले बोअर असतात, हो किनई? तुमचं फक्त एकच म्हणणं असायचं, तुमचं कौतुक करा. हो की नाही? अस्से चलाख आहात ना? मागं एकदा असंच काहीतरी भुणभुण करत होतात. सकाळी मला कामावर जायची घाई, पटकन काही तरी करावं म्हणून बटाट्याची भाजी केली तर तुम्ही अडून बसला होतात, मला वांग्याचं भरीतच पाहिजे म्हणून. तुमचे चोचले पुरवत बसले असते तर आठदहाची गाडी चुकली असती माझी. म्हणून मी तशीच गेले. संध्याकाळी परत आले तर तुम्ही डोक्याला टापशी गुंडाळून गळ्यापर्यंत पांघरूण ओढून पडला होतात. डोळे बंद. हाक मारली तर एक ना दोन. घाबरलेच. कपाळाला हात लावून पाहिला तर ताप नव्हता. तर एकदम बरळल्यासारखे शब्द काढायला सुरुवात केलीत. कधी "वांगं" तर कधी "भरीत" असे. पट्कन जाऊन शेजारून जोशीकाकूंना घेऊन आले. त्यांच्यात थोडं देवाचं आहे म्हणतात. त्यांनी एकूण रंग पाहिला आणि म्हणाल्या "यांना लागण झाल्यासरशी वाटते आहे. कुठं फिरायला गेले असतील, पडला असेल पाय कुठं उतरून टाकलेल्या लिंबूमिरच्यांवरून. झाडूनं फटके दिल्याशिवाय झाड सोडणार नाही हे भूत. तू जरा झाडू घेऊन ये. " हे ऐकलं आणि तुम्ही एकदम डोळे उघडलेत आणि क्षीण आवाजात म्हणालात,"कुठं आहे मी?" मी आनंदून जोशीकाकूंना म्हणाले, "देव पावला. उतरलं वाटतं भूत !" तशी काकू म्हणाल्या,"ही भुतं असंच करतात. वाटतं उतरल्यासारखं, पण पुन्हा तासाभराने ये रे माझ्या मागल्या! तू झाडू आण कशी!" मी झाडू आणायला म्हणून आत गेले. बाहेर आले तर जोशीकाकू एकट्याच बसलेल्या. विचारलं,"हे कुठं गेले?" तर म्हणाल्या,"अगो, हे नवरे म्हणजे न उतरणारी भुतं हो! फटक्यांशिवाय उतरायची नाहीत. तू जशी आत गेलीस तशी पटकन उठला तुझा नवरा आणि कसलं तरी काम आठवलं म्हणून तडक बाहेर पडला आहे. घाबरू नकोस. सध्या तरी ते भूत परत हे झाड धरणार नाही." रात्री दहा वाजता उगवलात आणि मुकाट्याने बटाट्याची भाजी आणि पोळी खाल्लीत. तेव्हापासून तुम्हाला असं काही व्हायला लागलं की नुसतं जोशीकाकूंना घेऊन येते असं म्हटलं की चट बरे होता. अस्से नाटकी तुम्ही! ते काही असलं तरी तुम्ही कध्धी कुठली गोष्ट ताणून धरत नाही. आणि तेच मला तुमचं आवडतं. तुम्ही दंगा, नाटक, गमतीजमती करता, पण परत गंभीरपण होता. कित्ती क्यूट! तुमच्या अशा या क्यूट गमतीजमती पाहिल्या नं की अगदी गालगुच्चाच घ्यावा असं वाटतं. पण माझ्या सोनसख्या, आता जरा गमती पुरे हं. काय गरज होती खालच्या मजल्यावरच्या त्या गडकऱ्यांच्या सायकलीची हवा सोडून दयायची? आधीच ती मंडळी नागपूरच्या गरम हवेतून मुंबईच्या दमट हवेत आलेली. डोक्यातून अगदी वाफ निघत असते त्यांच्या. बाकी गडकऱ्यांचा मुलगा जरा अंगाने खाऊनपिऊन सुखीच. सायकलवरून निघाला की मुंबईच्या सडपातळ जिलबीवरून सुखवस्तू नागपुरी वडाभात निघाला आहे असं वाटायचं. पण मंडळी खुनशी हो अगदी. तुमचा मिष्किल स्वभाव काही पाहिला नाही, तडक पोलिसस्टेशनात वर्दी देऊन आले. तुम्हीसुद्धा अडून बसलात, म्हणे त्या गडकऱ्याच्या स्वत:च्याच वजनाने सायकल पंक्चर झाली नसेल कशावरून? शिवाय नुसती हवा सोडली म्हणून काय झालं? बाँड भरणार नाही म्हणजे नाही! बरं चाळीतले लोकही असे, अहो राहूद्या हो त्याला काही दिवस आत, आम्हालाही जरा मोकळीक मिळेल त्याच्या नको त्या धंद्यांतून, असं म्हणू लागले. माझी काय अवस्था झाली असेल याची काही कल्पना आहे का? बरं दोन दिवस आत राहून तुम्हाला ब्रम्हांड आठवलं, आत बटाट्याची भाजी नाही किंवा भरीत नाही. मग आता जळ्ळी मेली बाँड भरायची लाज वाटते, ती का? गडकरी म्हणाले आहेत, बिनदिक्कत भरा बाँड, झाली तेवढी शोभा खूप झाली, आम्ही काय चिडवायचो नाही. तेव्हा राया, प्राणनाथा, माझ्या मिष्कील मिकी माऊशा, कृपा करून लाजू नका, बाँड भरा आणि घरी चला. घरी खेळा हं बाँड बाँड.
No comments:
Post a Comment