हुश्श! एकदाचा पार पडला बुवा शपथविधी. लगीनघाईच ती. तयारी काय कमी लागते? पत्रिका छापून आल्या पाहिजेत, निमंत्रणं गेली पाहिजेत, लग्नापूर्वी ठरलेल्या याद्यांप्रमाणे सगळ्या देवाणघेवाणीच्या वस्तू घरात येऊन कुलुपात पडल्या पाहिजेत, ब्यांडवाल्यांना आचाऱ्यांना वेळीच कंत्राटं गेली पाहिजेत, नवरी नवरदेवाच्या मुंडावळ्या, भटजींची दक्षिणा, पूजेचे साहित्य (नेमके शिंचे सुट्टे एकेक रुपये सापडत नाहीत ऐनवेळी) इत्यादी हजार गोष्टी असतात. लग्नाआधी आठवडा येऊन बसलेले नातेवाईक, काही काही अनेक वर्षांनी उगवलेले. नवरदेव आधीच थिजलेला, त्यात असे धूमकेतू छाप नातेवाईक समोर आले की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सलगीचे हसू चेहऱ्यावर आणून आणून कंटाळलेला. काही "बघा, नशीब असतं हो एकेकाचं! आमचा बाब्या काय कमी देखणा का? आता केस थोडे मागे हटले आहेत, पण मी म्हणते ते बुद्धीचं लक्षण हो! शिवाय म्युनिशिपालटीत चांगला हेड कारकून! आठशे बेसिक वर भत्ता! वरकमाई वेगळी! पण अजून योग नाही हो. आणि आम्ही नुसते इतरांना आहेर करत फिरतो आहोत." म्हणत आलेले. तर काही "नाही तरी शनिवार वाडा बघायचाच होता. चला, त्या निमित्ताने तो पाहून होईल. जमल्यास सिंहगडसुद्धा होईल. काय समजलेत?" असे सहलीवर आलेले. एकूण स्वत: नवरदेव, मुलाचे आईबाप, फारतर करवलीचा मान मिळालेली बहीण यांच्यापलीकडे लग्नाचे कवतिक फारसे कुणालाच नाही. नाही म्हणायला वधूचा भाऊ कान पिळायला मिळणार या माफक आसुरी इच्छेपुरता उत्साही. उत्तम व्यवस्थेमुळे लगीन गाजले बुवा, अशी चर्चा क्वचितच ऐकू येईल. मानापमान, अडून बसलेले व्याही, वेळेवर न आलेले पाणी, गर्दीमुळे पंगतीवर झालेला 'हर हर महादेव' हल्ला आणि त्यात बळी गेलेले मानकरी यांच्यामुळेच लगीन लक्षात जास्त राहते. त्यात उन्हाळा असावा आणि वीज जावी, पाण्यात बर्फ नसावा. मग असे लग्न पुढील सर्व लग्नांचे न्यूनतमतेचे मापदंड ठरते. ज्याचे ते लग्न असेल त्याला ते आयुष्यभर ऐकावे लागते.
शपथविधी मोठा गोमटाच झाला. आमचे नरूराया छान दाढी विंचरून, गंधपावडर करून बसले होते. आई आत्ता इथे असती तर किती छान झाले असते असे म्हणत होते. परंतु चेहऱ्यावर जरा चिंता दिसत होती. का हो असे चिंतीत? साहजिकच आहे म्हणा, आता देशाची चिंता आहे तुमच्या मागे, असे आम्ही म्हटले तर म्हणाले," देशाची चिंता करण्यास मी समर्थ आहे हो. चिंता होती ती या शपथविधीची. इनमीन चाळीसपंचेचाळीस पदे. कुणाकुणाला खूष करावे? बरं, अगदी करायचेच म्हटले तर पात्रता नाही असे सांगितले तर हे लोक तत्काळ शीर्षासन करणार. त्यातून आमचीच काही आपटलेली भांडी, पोचा आलेला दिसतोय तरी केवळ प्राचीन म्हणून प्रदर्शनात ठेवायची आहेत. लोकांना मोहेंजोदारो कालातील प्राचीन भांडी कौतुकाने पाहायला आवडतात. ठीक आहे, निदान कल्हई तरी करून घ्या असे सांगितले आहे. मरहट्ट देशातून एक सद्गृहस्थ सारखे फोन करत असायचे. म्हणायचे तुम्ही पाहिले नसेल, पण तुमच्या प्रचारसभेत पार मागे निळा झेंडा घेऊन जो हनुमान उड्या मारायचा ना तो मीच. भगव्याबरोबर निळ्याला मान हवाच. त्यांना शेवटी मी विचारले, अहो तुमचे नाव तरी सांगा. तर फुरंगटून बसले. म्हणतात आमचे नाव आठवले तरी तुम्ही कसे विसरले? मी म्हणालो अहो आठवले असते तर विचारले असते का? ते आणखीच संतापले. म्हणाले हे असंच आहे, प्रत्येक वेळी मिरवणुकीत नाचायला बोलावतात आणि बिदागी द्यायच्या वेळेला नाव काय तुमचं असं विचारतात. या वेळेस आम्हाला आईशप्पत, शपथ घ्यायला तुम्हाला बोलवू असे सांगितले गेले होते. आईशप्पत, आम्हीच तुमच्या या विधीवर बहिष्कार टाकतो. आता बोला. ज्या मनुष्याला मी कधी पाहिलंच नाही त्याला कसं पद द्यायचं? यांची ही तऱ्हा तर तिकडे आमच्या प्रात:स्मरणीय अम्मा त्यांच्या शेजाऱ्याला निमंत्रण गेलं म्हणून रुसून बसल्या आहेत. आता आमचंही जरा चुकलंच. पण त्या आळीत गेलं की सर्व लोक एकसारखेच दिसतात हो. एखाद्याला रामचंद्रन म्हणून हाक मारावी तर तो लुंगी गुंडाळत,"अय्योयो, आमी बालकृष्णन" म्हणणार. एखाद्याला अय्यर म्हणावं तर तो अय्यंगार निघायचा. मग गेलं असेल चुकून निमंत्रण हो! आणि आता या आम्हाला "पोSSSडाSSS!" म्हणताहेत. त्यांनी "आमी नाई जा" असं म्हटल्यावर मग आमचे थलैवर रजनीसुद्धा,"नाही हो, येवढं एका वेळेला माफ करा हो. आमचं जावईचं पिक्चर काडून ठेवलो, त्याचं प्रिमियरसुद्धा आत्ताच आलं की हो" असं म्हणू लागले आहेत. सध्या ते "देव" या विषयावर भाषणं देतात. आणि अम्मा, अमको आशीर्वाद देव म्हणत त्यांच्या पाया पडतात. असूद्यात तो त्यांचा देव बापडा. आम्हाला आमचे रमेश देवसुद्धा चालतील. मागे त्या काँग्रेसच्या तिकिटावर हरल्यावर कसे शहाण्यासारखे परत गेले, पिक्चरमध्ये सुद्धा दर्शन देत नाहीत. देवदुर्लभ दर्शन हा शब्द काय उगीच आला नाही. असो. तिकडे त्या झांशीच्या राणी, मेरी झांशी नही दूंगी म्हणत बसल्याच होत्या. त्यांना घेणं प्राप्तच होतं, नाही तर त्यांनी आम्हांला पाठीशी बांधून घोडयावरून रपेट काढली असती. एवढंच काय रारा केजरूस्वामी यांनाही आम्ही निमंत्रण करण्यास जाणार होतो. त्यांना त्याची कुणकुण लागली की काय कुणास ठाऊक, तडक जेलमध्येच जाऊन बसले म्हणे. बरोबरच आहे म्हणा. नापास झालेल्या मुलाला पहिल्या आलेल्या मुलानं त्याच्या बक्षीस समारंभाचं निमंत्रण करायला गेल्यासारखं झालं असतं. जेलमध्ये सुद्धा कैद्यांनी आमचा सोहळा टीव्हीवर पाहिला असं ऐकतो. त्यावेळी हे म्हणे उलट दिशेला भिंतीकडे तोंड करून बसले होते असं कळलं. नंतर 'टॉम आणि जेरी' सुरु झालं तेव्हाच तोंड वळवलं म्हणतात.
ठीकच झालं सर्व म्हणा. सर्वात मुख्य म्हणजे आमचे पितामह आयत्या वेळी सर्व अर्चा वैदिक पद्धतीनेच झाली पाहिजे, पितरांना तर्पण झालेच पाहिजे यावर अडून बसले नाहीत. आमच्या गुरूभगिनींनी त्यांची समजूत काढली असे समजले. अर्थात पद पदरात पडल्यानंतर म्हणा. हे सगळे जुळवून आणताना आमची दमछाक झाली. नमनालाच एक छोटेसे नाटक झाल्याप्रमाणे वाटते आहे. अजून मुख्य अंक चालू व्हायचे आहेत. आता (खरं तर आता तरी) ही पात्रे आपापल्या भूमिका नीट करोत अशी शपथ ईश्वरचरणी घालत आहोत.

No comments:
Post a Comment