Monday, May 19, 2014

वडयाचे तेल वांग्यावर

नेहमी वर्दळ असणारा काळाकुंज बंगला सुनासुना वाटत होता. इंद्रवदन उर्फ काळापहाड त्यांचा आवडता काळा चष्मा परिधान करून त्यांच्या आवडत्या खुर्चीत बसून आवडत्या भिंतीकडे टक लावून बसले होते. जेव्हा जेव्हा एखादी कठीण केस येई तेव्हा ते असेच विचारमग्न बसून राहत. आजही ते एक गहन केस घेऊन बसले होते. पण चिंता केस सुटण्याची नव्हती तर भलत्याच प्रकारे सुटल्याची होती. मधून मधून ते शेजारील स्टुलावर ठेवलेल्या फोनकडे नजर टाकीत आणि आशेने वाट पहात. जणू काही तो आता वाजणारच आहे. मग पुन्हा एक नि:श्वास टाकीत नजर भिंतीवर लावत. गेले काही दिवस त्यांनी दाढीही केली नव्हती. गेले काही दिवस झोप न मिळाल्याने डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येउन काळापहाड हे नाव वेगळ्याच प्रकारे सार्थ करीत होती.

दोन दिवसांपूर्वी थोरल्या वाड्यातून दूत मिठाई घेऊन आला तेव्हापासून इंद्रवदन सरकारांचे वदन कडूझार झाले होते. आपण एवढा तेलकट वड्यांचा रहस्यभेद केला आणि प्रत्यक्ष तेलाने माखलेल्या पुड्यासहित वडे पुरावा म्हणून सादर केले. पण ज्युरीतील सभ्य गृहस्थांनी निर्विकारपणे डोळे मिटून मिटक्या मारीत वडे खाऊन तेलकट कागद पुन्हा आपल्याच हातात ठेवला. शंभूराजे तर सुटलेच वरती आपण पाठवलेला कुक्कुटकाढा परस्पर पिऊन पिऊन धनाजीराव मात्र गुटगुटीत झाले. पुन्हा सरकारांच्या मुदपाकात ढवळाढवळ केली म्हणून आपले चांगलेच वांगेभरीत झाले. नकोच हा गुप्तहेरगिरीचा छंद असे त्यांना वाटू लागले. छोटू कधी शेजारी येऊन अदबीने उभा राहिला ते त्यांना कळलं नाही.

नि:श्वास सोडून राजे कडूवदन होत्साते म्हणाले,'बोल छोटू, आता काय आणि?'
'राजे, बातमी वाईट तर आहेच, आपण सकाळची आपली ब्लडप्रेशरची गोळी घेतलीत का?'
'होय रे माझ्या विश्वासू हेरा. ते पहा टेबलावर. गौरीची आरास मांडावी तशा पित्त, ब्लडप्रेशर, पोटशूळ, मस्तकशूळ, निद्रानाश यावरील गोळ्या कशा मांडून ठेवल्या आहेत राणीसरकारांनी. त्यांना ही मजाच वाटते आहे. डिप्रेशनवरील गोळ्यापण मागवून ठेवा म्हणत होत्या. आराशीला बरे पडेल म्हणे.'
'राजे, दगडांची गोदामं भरलेली आहेत. आवक आहे पण जावक अजिबात नाही. अशानं खजिना रिता व्हायला वेळ लागणार नाही. लवकरच खट्याक मोहीम काढली नाही तर शिलेदारांना दाणापाणी करायला पगार होणार नाही.'
राजे म्लानवदन होऊन म्हणाले,'छोटू, आता कसले खळ्ळ आणि कसले खट्याक. आता आम्ही त्या दगडांची रास लावून लगोरी खेळत बसणार. लगोरी! तिकडे शंभूराजे रास गरबा खेळणार, आम्ही इथे रास लगोरी!'
राजे भेसूर आवाजात गाऊ लागले,'मैं तो रंगियो हतो एनो दिलडानो संग, मारा साह्यबानी पाघडियो लाग्यो कोई दूजो रंग.'
छोटू भेदरला. त्याने राजांच्या डोळ्यात काही विचित्र झांक दिसते का ते पहायचा प्रयत्न केला. पण राजांनी काळा चष्मा परिधान केला असल्यामुळे त्याला काही अंदाज लागला नाही.
राजे अचानक क्रुद्धवदन होऊन म्हणाले,'छोटू! ते पहा! लोक बटाटेवडा खात आमच्यादिशेने पाहून हसत आहेत! त्यांची ही मजाल? कोण आहे रे तिकडे? आमचा हंटर घेऊन या. चामडीच लोळवतो एकेकाची. इंद्रवदन ठोकरे म्हणतात आम्हाला!'
'राजे शांत व्हा!'
'आं? छोटू आम्हांस भास वगैरे होऊ लागले आहेत की काय?'
'नाही राजे. ती वाईट बातमी म्हणालो ती हीच. काल कुणी वात्रटाने आपल्या वाड्यावर लावलेल्या 'ठोकरे वाडा'च्या पाटीचं 'ठोकरे वडा' केलं आहे. आणि समोर स्वत:ची बटाटावडयाची गाडीपण लावली आहे.'
राजे दीनवदन होऊन म्हणाले,'आपल्याला भास होत नाहीत याचा आनंद मानायचा की शंभूराजांच्या या थट्टेचा शोक करायचा? अरे विनोद! केवळ विनोद केला होता आम्ही!! त्याची एवढी सजा? आज आबासाहेब असते तर…'
छोटू मध्येच म्हणाला,'होय राजे, आबासाहेबांनी आपल्याला मायेनं जवळ घेऊन समजावलं असतं.'
राजे खिन्नवदन होऊन म्हणाले,'नाही छोट्या, दुसऱ्या पात्राला आपलं वाक्य पुरं न करू द्यायची तुझी मराठी रंगमंचावरील सवय अजून गेली नाही. आम्ही म्हणत होतो, आज आबासाहेब असते तर आमच्या दोन थोतरीत लावून आम्हाला समजावलं असतं. आणि तेच आम्हाला समजलं असतं.'
छोटू खाली मान घालून म्हणाला,'मग राजे आता या सेवकास काय आज्ञा आहे?'
राजे शोकवदन होत्साते म्हणाले,'गेले दोन दिवस आम्ही 'तो' फोन येईल म्हणून येथेच फोनशेजारी बसून आहोत. बहिर्दिशेलासुद्धा गेलो नाही, न जाणो सुरवार घसरायला आणि घंटी वाजायला एकच गाठ पडायची. कानास जानवे, घोट्यात पडलेली सुरवार अशा अवतारात धावत येणे जमणार नाही. तेव्हा तू येथे फोनच्या राखणीला बस, आम्ही जरा मोकळे होऊन येतो.'

No comments:

Post a Comment