Friday, May 2, 2014

दिग्विजयी दुष्यंत

जो सर्व दिशांवर विजय प्राप्त करून येतो तो दिग्विजय! राजपुतांची शूर परंपरा चालवणारा हा नरश्रेष्ठ केवळ पुरुषच नाही तर महापुरुष निघाला! दिसण्यावर जाऊ नये असे म्हणतात तेच खरे. आमचा दिगू मोठा गोमटा पण स्त्रियांनी कधी मान वर करून त्याच्याकडे पाहिल्याचे ऐकिवात नाही. नाही म्हणायला तो आला की आमची कुत्री मात्र एकदम चूप होत असे. भुंकण्यात आपला निभाव लागणार नाही हे तिलाही कळायचे. असो आमुचा वेष बावळा, परंतु असती अंतरी नाना कळा. पूर्वी आमच्याकडे एक अत्यंत गोंडस, गोजिरवाणे, चणीने लहान असे एक पाळलेले कुत्रे होते. एकदम निरागस चेहरा करून ते बसत असे. एखादा पाहुणा कौतुकाने किती क्यूट आहे असे म्हणून हात लावायला गेला की ते विलक्षण चपळाईने त्याचा डासा काढत असे. अगदी रक्त येईपर्यंत. असेच काहीसे दिगूचे झाले. आम्हाला वाटायचे की हा मनुष्य दररोज प्रात:काळी सोनियाजींच्या नावाने गुरुचरित्र आणि झोपायच्या आधी भाजप, संघाच्या नावाने गरुडपुराण वाचीत असेल. पण प्रत्यक्षात गुरुचरित्राच्या नीट बांधलेल्या लाल बासनात हळूच वात्स्यायानाचे साहित्य लपवून ठेवावे असेच काहीसे दिगूने केले. शशी थरूर आणि एन डी तिवारी यांनी मात्र दिगूच्या फेसबुक स्टेटसवर थम्सअप केल्याचे ऐकतो.

कधी आणि कुठे या दुष्यंताने त्या शकुंतलेला पाहिले बरे? कधी हा भ्रमर गुंगुं करीत वाट चुकून कमळदलात शिरला? कधी त्याने त्या मुग्ध बालिकेशी गांधर्वविवाह केला बरे? त्या जुन्या दुष्यंताचे बरे होते. राजा झाल्यावर कारभाराचे निमित्त सांगून विसरून गेला. आता या दुष्यंताला कसले आलेत कारभार? वरून आदेश येणार, उद्या जरा खळबळ उडवा. मग हे राजे खास मध्यप्रदेशात तयार होणारे अणुइंधन (पक्षी:छोले भटुरे) पोटात भरून तयार होणार. मग सकाळी ट्विटर, वृत्तपत्रे, कुठलीही पत्रकार सभा अशा ठिकाणी स्वैर गोळाबारूद करून येणार. लक्ष्य एकच - आरएसएस अथवा भाजप. असे सदैव बिघडलेल्या पोटाचे काम या दुष्यंताला. ग्यासभरल्या पोटी रोमांटिक विचार कसे काय सुचले असतील बुवा? बरं याला सुचले, त्या शकुंतलेला या दुष्यंताचा असला सह"वास" कसा काय सहन होत असावा? करून नामानिराळे होणे ही कॉंग्रेसवाल्यांची खासियत. हा निष्ठावान कार्यकर्ता दुष्यंतही त्याला अपवाद नसणार. पण आपल्या शकुन्तलेत मग्न झालेल्या या दुष्यंताला कारभाराचा विसर पडला होता. आरएसएसवालेही हवेतील दुर्गंधी अचानक कशी नाहीशी झाली या विचारात पडले होते.   शिवाय जितकी मजा आरएसएसबद्दल बडबड करताना येते त्यापेक्षा जास्त मज्जा शकुंतलेपाशी येत असावी. पण सगळ्या मज्जेवाल्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. शकुंतलेने लग्नाचे विचारल्यावर हा दुष्यंत एकदम भानावर येऊन त्याला आपल्या जबाबदारीची आठवण झाली असणार. इथे या शकुंतलेचेसुद्धा लगीन झालेले. दुष्यंताने मग फारसे लक्ष दिले नसेल. पण अचानक माशाच्या पोटातून अंगठी निघाली आणि दुष्यंताचे विस्मरण संपले. या आमच्या दुष्यंताचे शकुंतलेला आठवण म्हणून दिलेले फोटो इंटरनेटच्या पोटातून बाहेर आले आणि त्याचा नाईलाज झाला असावा. चरफडत का होईना शकुंतलेचा स्वीकार करावा लागणार. आता जर स्वीकारच करायचा तर हे फोटो बाहेर आणायचे कार्य आरएसएसचे असावे असेही दडपून द्यावे असे त्याला वाटले असणार. वास्तविक आरएसएसवाले इंटरनेटचा उपयोग केवळ वीर सावरकर, प.पू. गोळवलकर गुरुजी आणि प.पू. हेडगेवार यांचे फोटो टाकण्यासाठीच करतात. अजून त्यांना बाकीची मज्जा कळलेली नाही.

तात्पर्य, काही म्हणा, हा  गडी एवढा रंगेल असेल असे कधी आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. अर्थात दिगू आमच्या स्वप्नात आला असता तर या कल्पनेनेच कसेसे होते. दिगूचे एक सोडा, (म्हणजे त्याची गोष्ट सोडून द्या या अर्थी, तसे त्याने स्वत:च उरले सुरले सोडून दिले आहेच), या वीर बभ्रुवाहनाला पाहून कुणी कन्यका भाळेल असे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. शेवटी आमचे कट्ट्यावरचे मित्र म्हणत तेच खरे, माकड रात्रीची वस्ती चांगल्या झाडावरच करते. आणि दुर्दैवाने झाड त्याला विरोध करू शकत नाही. पण झाडाला हेही माहीत असते की माकड एकाच झाडावर रोज वस्तीला येत नाही. आजचे आपल्यावरचे हे दुर्दैव उद्या दुसऱ्या झाडावर जाईल.

No comments:

Post a Comment