Thursday, May 8, 2014

पावसाचं देणं

आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरु आहे. एरवी सळसळणारी ही झाडे आज कशी निश:ब्द ठिबकत उभी आहेत. मधूनच एखादी वाऱ्याची सर येते, हो पावसात वाऱ्याचीही सरच असते, त्या सरीने अंग शहारल्यासारखी पाने थरथरतात आणि पाय निघत नसल्यासारखे थोड्याश्या नाराजीनेच पाण्याचे थेंब प्रथम एक दोन आणि मग टपटप पडतात. मध्येच पावसाचा जोर मंदावतो, साठलेले पाणी रस्त्याच्या कडेने खळखळत वाहत राहते. काही वेळापूर्वी एखाद्या गर्भारशीसारखे दिसणारे आकाश आता निवळते, पण त्यात जन्म देऊन झाल्यानंतर आलेले क्लांतपण असते. विज्ञानानं केलेल्या व्याख्येप्रमाणे पाऊस पडण्याची प्रक्रिया एकच असली तरी प्रत्येक गावाचा पाऊस वेगळा असतो असं मला नेहेमी वाटतं. पाश्चिमात्य देशातील पाऊस जरासा कठोर, गारठून टाकणारा. तर भारतातील पावसाचं पडणं म्हणजे कधी वडीलधाऱ्यांच्या रागावण्यासारखं कडाडून, कधी मित्रांनी अचानक अवतीर्ण होऊन केलेल्या फजितीप्रमाणे तर कधी लहान मुलासारखं हट्ट करत अधूनमधून रडत राहिल्यासारखं, कधी सर्व चिंता सोडून देऊन मनसोक्त भिजायला बोलावणारं.

कडक उन्हाळ्याच्या काहिलीनंतर पहिला वळवाचा पाऊस यायचा. असा यायचा की वाटायचं आता ब्रह्मांड वाहून जाणार. तापलेल्या मातीवर पहिले टप्पोरे थेंब आदळायचे. त्या आघातानं माती आणि पाणी दोन्ही वर उडायचं. छोटासा स्फोटच जणू. काही क्षणातच धुंद करणारा मृद्गंध सर्वत्र दरवळायचा. जगातील सर्व सुगंध त्यापुढे व्यर्थ! पूर्वी कुठेसं वाचल्याचं आठवतं, बहुधा पुलं,"जगातील उत्तम सुखे अक्षरश: फुकट्यात मिळतात." हा मृद्गंध त्यातीलच एक सुखगंध. मनाच्या कुपीशिवाय कुठेही न साठवता येणारा. विकत घ्यायला गेलं तर कुठेच मिळणार नाही, पण ध्यानीमनी नसताना असं अचानक भरभरून समोर येईल. असा अचानक आलेला वळीवाचा पाऊस तसाच अचानक निघूनपण जायचा. पुन्हा मग काही दिवस तगमग सुरु. मग शाळा सुरू व्हायचे दिवस यायचे ते पाऊस घेऊनच. आणि कोकणातील तो पाऊस. एकदा सुरू झाला की निळं आकाश दिसायचं ते एकदम सप्टेंबरमध्येच. धबधब्यासारखा पडत रहायचा. मध्ये जरी थांबला तरी ढगांत खदखदत असायचा. आमचं घर डोंगराच्या पायथ्याशी. व्हरांड्यातून नजर टाकली की गर्द हिरवं ल्यालेल्या लेकुरवाळ्या माहेरवाशिणीसारखा तो डोंगर दिसायचा. त्या डोंगरानं आम्हा मुलांवर मायाही तशीच केली. पाऊस येणार हे एक दोन मिनिटं आधीच कळायचं. समुद्राची जशी गाज असते तशी धीरगंभीर गाज डोंगरातून ऐकायला यायची. डोंगराकडे पाहिलं की तो पूर्ण धुक्यात बुडून गेलेला दिसायचा. त्या धुक्यातून येणारी ती गूढ गाज मोठी मोठी होत जायची. वेंगुर्ल्याच्या बंदरातील डाकबंगल्याच्या गच्चीवर उभं राहिलं की जसा लाटांचा कडकडाट ऐकू येतो तशी ती गाज व्हायची. मग सुरु कौलांवर ताशा सुरु व्हायचा. क्षणार्धात समोरचा परिसर सरींमध्ये न्हाऊन निघायचा. पुढं एक तासभर तरी नर्तन चालू रहायचं. रात्री कौलांवर वाजणारा तडतडबाजा ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं नाही. कोकणभूमी ती. पाणी एका जागी कधी ठरायचं नाही. उंच भागातून सखल भागाकडे सारखं धावत असायचं. थेट मोठ्या व्हाळाला (ओहोळ) मिळेपर्यंत. एरवी शांतपणे झुळूझुळू वाहणाऱ्या व्हाळानं रौद्र रूप धारण केलेलं असायचं. तांबड्या मातीनं लाल झालेलं ते पाणी प्रचंड आवाज करीत अक्राळविक्राळ होऊन धावायचं. त्याची भीतीच वाटायची. हिप्नोटाईज झाल्यासारखं आम्ही त्या पाण्याकडे पाहत असू. रस्त्यातील वाहत्या पाण्यातून अनवाणी चालणे हा एक छंदच होता. दक्षिण कोकणात सर्वत्र स्वच्छ रेती. त्यामुळे कुठेही चिखल व्हायचा नाही. तळपाय अगदी लहान मुलाच्या पायासारखे नितळ व्हायचे. पहिला महिना असा धबाबा पाऊस पडून गेला की आजूबाजूचं रूप बदलायचं. झाडांच्या बुंध्यावर, पडून राहिलेल्या ओंडक्यांवर अळंबी जीव धरायची. पायाखालचा पालापाचोळा नेहेमी ओला राहून एक विशिष्ट गंध पसरायचा. पक्ष्यांचा चिवचिवाट अगदी कमी असे. बहुधा ते घाटमाथ्यावर जात असावेत. सकाळी कुक्कुटकोम्ब्याचे कुकारे मात्र ऐकू यायचे. हे असं सर्व निरखत अनुभवत डोंगरातील घनदाटीत आम्ही समवयस्क मुलं मनसोक्त हुंदडत असू, भिजत असू. पण कधी आजारी पडल्याचं आठवत नाही. पावसानं खूप काही दिलं आम्हाला. जणू तो म्हणत असावा, पडावं तर माझ्यासारखं, तुफान, झोकून दिल्यासारखं, जसं काही आजचाच दिवस जगायचा आहे. पण असंही पडावं की सर्वस्व दान केल्यासारखं. पण ते दानच असावं, त्याने फक्त भलंच व्हावं, बुरं कुणाचं आणि कधीच नको. 

No comments:

Post a Comment