Friday, May 30, 2014

निष्ठेचे फळ

निष्ठा एखाद्याला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यातल्या त्यात स्वामीनिष्ठा तर फारच कठीण तपश्चर्या. गेली तीस वर्षे आम्ही स्वामीचरणी बसून स्वामिमुखावर टक लावून पाहत आलो आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरील रेखानरेखा आमच्या मस्तिष्कात कोरली गेली आहे. सतत नामस्मरणापेक्षा योग्यवेळेला स्वामींचे पादमर्दन प्रभावी ठरते हा आमचा अनुभव. आमच्या उमेदवारीच्या काळात आम्ही आत्यंतिक भक्तीचे भाव चेहऱ्यावर घेऊन स्वामिचरणी बसून राहत होतो. स्वामी शेंगा खात खात मधूनच आमच्याकडे कृपादृष्टी टाकत, आणि एक दोन शेंगदाणे आमच्या दिशेने टाकत. स्वामींचा असा अनुग्रह झाल्यावर आणखी काय पाहिजे? तो कृपाप्रसाद ग्रहण केल्याने आम्हांस काय काय नाही प्राप्त झाले? पुरोगामी विचारसरणी (पुरोगामीच बहुधा), शाहू, फुले, आंबेडकर (ही नावे याच क्रमाने आणि अश्शीच घ्यावी लागतात नाही तर फळ मिळत नाही) यांचे विचार हे सगळे आपोआप पावले. पुढे मागे स्वामिभक्तीतून वेळ मिळाल्यास या तिन्ही पुण्यश्लोकांचे साहित्य मुळातून वाचणार आहे.  खास करून "शेतकऱ्याचा आसूड". नावच जबरी आहे. आम्ही पहिली दहा पाने वाचली. त्यातून उत्पन्न झालेली प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा "ठाणेकराचा सूड" लिहिणार आहोत.परमेश्वर कृपेने आमचे इंग्रजी, मराठी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे. विशेषत: पुरोगामी विचारसरणी वापरून आक्रमक पद्धतीने आपली बाजू लोकांस समजावून देताना त्याचा खूपच फायदा होतो. आमची समजावण्याची पद्धत काही लोकांना आवडत नाही. आम्ही या तिन्ही भाषेत भुंकतो अशी शिवराळ टीका ते करतात. पण आम्ही स्वामींचे ध्यान करून त्याकडे दुर्लक्ष करतो. एकदा खुद्द स्वामींनी गुंड प्रवृत्तीच्या विरोधकांकडून श्रीमुखात खाल्ली होती. आम्ही सर्व बंध तोडून पुरोगामी विचारसरणी आणि तिन्ही भाषांतील शेलके शब्द वापरत त्या इसमाच्या पटात शिरून त्यांस चीतपट करणार होतो. पण स्वामींनी उत्तम मन:शांती दाखवत आम्हांस रोखले म्हणून. नाहीतर नुसते त्यांनी आ केले असते तर आम्ही त्याला क्रमण जोडले असते. अशा वेळी स्वामी आमचे डोके गोंजारून आम्हाला शांत करत आहेत असे वाटते.  या एका गोष्टीचे आम्हांस नेहमी कुतूहल वाटत आले आहे. स्वामी खरोखरच कधीकधी डोके गोंजारतात, तेव्हा आम्ही उन्मनी अवस्थेत जातो. डोळे बंद होऊन कपाळाच्या मध्यभागी एकाग्रचित्त होतात. एक भक्तिभाव मनी दाटतो. कुंडलिनी ज्या ठिकाणी जागृत व्हायची तिथे एक शेपूट फुटून ते आनंदाने जोरजोरात हलते आहे असा भास होतो. स्वामींच्या स्पर्शाने अष्टसात्विकभाव जागृत झाल्याची अनेक उदाहरणे आम्ही वाचली आहेत, परंतु कुंडलिनी-पुच्छ-जागृतीयोग केवळ आम्हांस प्राप्त झाला  हे केवढे भाग्य. स्वामींच्या स्पर्शच काय, केवळ "जितेन्द्रा!" अशा प्रेमळ हाकेनेसुद्धा आमची समाधी लागते.

अशीच निष्काम निस्वार्थी वृत्तीने भक्ती करत असताना स्वामींची आज्ञा झाली, जितेन्द्रा, मुंबईच्या उत्तरेस ठाणे नामक ठिकाणी प्रजा शिवधनुष्याच्या वजनाखाली दबली जात आहे असे आम्हांस वाटते. ठिकाण बांका आहे. चहूबाजूंनी बेलाग आहे. प्रजा सुखी आहे. परंतु सुखी प्रजा म्हणजे तीस केवळ भौतिक सुखे प्राप्त झाली आहेत. त्यांस आत्मिक उन्नती म्हणजे काय हे माहीत नाही. भौतिक सुखे आत्मिक उन्नतीच्या आड येतात. भौतिक सुखे दूर झाली म्हणजे प्रजा आपोआप हरी हरी करायास लागून नामस्मरणाचे पुण्य मिळवू लागते. नामस्मरणाचे माहात्म्य तू जाणतोसच. तेव्हा तू त्या ठिकाणी जाऊन आमच्या संदेशाचे पालन कर. स्वामींची आज्ञा झाल्यावर हा शिष्य लगोलग कामास लागला. लोकांना ऐहिकतेपासून दूर राहण्याचा प्रचार सुरु केला. लोकांची आध्यात्मिक उन्नती न बघवणाऱ्या काही जंतूंनी स्वामींवर जहरी टीका केली. तुम्ही लोकांना भौतिक सुखांपासून दूर राहायला सांगता, प्रथम तुम्ही स्वत: ते आचरणात का आणत नाही असे त्यांचे अलौकिक तर्कट होते. आम्ही नेहेमीप्रमाणे आमच्या आक्रमक शैलीत (उपरनिर्दिष्ट पुरोगामी, शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणी इत्यादि) त्यांच्या तर्काचे खंडन केले. आता आमच्या शैलीत खंडन करताना झटापट होणारच. मग यातले काही समाजकंटक इस्पितळात गेले. पण आम्ही पाठपुरावा सोडला नाही. दररोज इस्पितळात जाऊन आमचा दृष्टीकोन मान्य होईपर्यंत चर्चा आणि खंडन केले. आज स्वामींच्या विचारसरणीचे फळ तेथे दिसते आहे. बहुतांशी मंडळी एक तर हरी हरी किंवा हर हर करीत काळ व्यतीत करीत आहेत. स्वामी आमच्या कामगिरीवर अत्यंत खूष झाले आणि असेच निष्काम काम करीत रहा, तो रामराया एक दिवस तुझे कल्याण करील असा आम्हांस आशीर्वाद दिला. त्यावर अत्यंत भक्तिभावाने आम्ही स्वामींचे पादप्रक्षालन करून "स्वामी! आम्हांस काही नको, आपल्या चरणी असेच पडून राहावयास मिळावे असा वर द्या!" असे वक्तव्य केले. ते ऐकताच बहुत संतोष पावून स्वामी "तथास्तु!" म्हणाले.

अनेक वर्षे एखाद्या झाडाला पाणी आणि खत घालावे, त्या झाडाने जेमतेम सावलीशिवाय काही देऊ नये आणि अचानक त्याला एक छान फणस लगडावा असे झाले. निरलस वृत्तीने केलेल्या भक्तीला आज फणसासारखे फळ लागले. आजवर आम्ही स्वामींच्या पायाशी बसत आलो. त्यांच्या सिंहासनाशेजारच्या स्टुलावर जे भक्तशिरोमणी बसत त्यांच्यावर स्वामींचा कोप झाला. एक दिवस ते नेहमीप्रमाणे स्टुलावर बसायला गेले तर स्वामींनी मिष्किलपणे स्टूल बाजूला ओढले आणि त्यांच्या पार्श्वभागाने धरणी अंमळ जोरातच गाठली. ते विव्हळत असतानाच हसतच स्वामी बोलले,"मत्प्रिय शिष्या!" ते ऐकून उभे असलेले अनेक इच्छुक शिष्य भावना अनावर होऊन स्टुलाच्या दिशेने धावले. आम्ही मात्र मस्तक लववून दृष्टी स्वामींच्या चरणावर लावली. उत्कट भावनेने उचंबळत मनोमन म्हणालो,"स्वामी! कृपा ! केवळ कृपा! आजवर मी खरोखरच आपली सेवा केली असेल तर माझे बूड त्या स्टुलावर स्थापन कराल." असे म्हणून आम्ही डोळे बंद करून स्वामींच्या चर्येस मनात ठेवून धावा करू लागलो. शिष्यगण पुढे येत होते त्यांस थांबवून स्वामी वदले,"मततिप्रिय शिष्या! जितेन्द्रा! वत्सा, ऊठ बरे. तुझ्या आसवांनी आमची पावले भिजली बरे! आम्ही संतुष्ट आहोत. ऊठ, तो चष्मा परिधान कर, आणि पहा ते स्टूल तुझी प्रतीक्षा करीत आहे! होय, आम्ही पुढील आठ महिने तुला आमच्या शेजारी स्टुलावर बसवून घेत आहोत." आम्हांस गदगदून आले, "स्वामी! अनुग्रह झाला! अनुग्रह झाला!" असे उच्चरवात शब्द काढून स्वामीचरणी स्वत:स लोटून दिले. समस्त शिष्यगण, "साधु! साधु!" असे उद्गार काढीत होता. आमच्या नेत्रांतून निष्ठेचे सार्थक झाल्याचे अश्रू अखंड घळघळा वाहत होते, त्यांत स्वामींची चरणे भिजून चमकत होती.

No comments:

Post a Comment