Saturday, May 10, 2014

आईचं ऋण

"कारट्या, थांब बघतेच आता तुझ्याकडे. जीव नकोसा करून टाकला आहेस अगदी!" पासून "आयुष्यवंत हो, लवकर मोठ्ठा हो रे बाबा" या दोन वाक्यांत शब्दांचा फरक असला तरी त्यामागील भावनेत काहीही फरक नाही. जगामध्ये कुठेही गेलं तरी थोड्याफार फरकाने अशीच वाक्ये उच्चारली जात असतील. कारण त्यामागे असलेली व्यक्तीला आणि तिच्या हृदयाला विधात्यानं एकाच प्रकारे बनवलं आहे. काही तरी उपद्व्याप केल्यावर "मेल्या!" असे प्रेमळ शब्द उच्चारून हातात जी काही पळी, उलथनं असेल ते आपल्या दिशेनं भिरकावणारी आई, तीच आई पावसांत नखशिखांत भिजून आल्यावर एक सणसणीत धपाटा घालून टॉवेलनं डोकं पण पुसणारी, आजारी पडल्यावर दररोज संध्याकाळी दृष्ट उतरणारी.

मला आठवतं, लहानपणी मनसोक्त बाहेर हुंदडणारी आम्ही मुलं, दिवसभर खेळण्याच्या नादात जेवायची-खायची पण शुद्ध नसलेली, पण घरी आलो की प्रथम आई समोर दिसायला हवी असायची. मग आंघोळ न केल्याबद्दल, जेवायला वेळेवर न आल्याबद्दल खाली मान घालून बोलणी ऐकायची. आणि हे सगळं बोलत असताना ती टेबलावर ताट वाढून ठेवायची. तिचं जेवण झालेलं नसायचंच. त्याचीही आम्हाला शुद्ध नसायची. अर्थातच मुलांनी काही म्हणावं, द्यावं अशी आईची अपेक्षा नसायचीच. त्यावेळी नव्हती आजही नाही आणि पुढेही नसेल. याला आपलं तिला गृहित धरणं म्हणावं की अतिपरिचयात अवज्ञा? जणू तिचं सर्व जगणं आमच्या साठीच होतं. आईनं स्वत:साठी कोणतेही चोचले, लाड करून घेतल्याचं मला आठवत नाही. मला माझं शाळेचं वेळापत्रक कधीच लक्षात नसायचं, पण आईच्या नक्की असायचं. आणि तिलाही ती एक जबाबदारीच वाटायची. एकदा असंच मी जीवशास्त्राचं प्रॅक्टिकल विसरलो. दुसऱ्या दिवशी सबमिशन! मी रात्री उशिरापर्यंत मग जर्नल पूर्ण करत बसलो होतो. तर ते पूर्ण होईपर्यंत कसं काय विसरले रे मी सुद्धा असं म्हणत आईनंपण जागरण केलं.

पुढं मग आम्ही मुलं आईनं जसं देवाकडे मागणं घातलं होतं तसे मोठे झालो. आईच्या पदराच्या पलीकडे क्षितीज थोडसं विस्तारलं. कॉलेज, करिअर, सबमिशन, प्रॅक्टिकल, सेमिस्टर असले शब्द तोंडात येऊ लागले. थोडासा बेफिकीरपणा उगाचच दाखवू लागलो. अगं तुला माहीत नाही आम्हाला आता किती अभ्यास असतो ते हे त्या गरज नसताना जागरण केलेल्या मातेलाच सांगू लागलो. पण त्याचे यत्किंचितही वाईट वाटून न घेता आई काळजी करतच राहिली. अजूनही परीक्षेच्या दिवशी माझ्या आधी उठून मला उठवत राहिली. माझ्या नेहेमीच्या बेफिकीर वृत्तीप्रमाणे मी बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा जवळजवळ हुकवलीच होती. कसं कुणास ठाऊक, मला उठवून म्हणाली, तू हल्ली काही तुझं वेळापत्रक सांगत नाहीस, पण मला आज असं का वाटतंय की आज तुझी महत्वाची परीक्षा आहे? आणि माझ्या छातीत धस्स झालं. खरंच परीक्षा होती! कसाबसा शाळेत पोचलो, परीक्षा सुरु होऊन पाच मिनिटं झाली होती. सुदैवाने मला प्रवेश मिळाला. मी नंतर येऊन आईला म्हणालो, रिपीटर होण्यापासून वाचवलंस! कुठल्याशा महाराजांची कृपा एवढंच ती म्हणाली. तिला म्हणावसं वाटलं महाराजांची कृपा कसली, ही तुझ्याच निरपेक्ष प्रेमाची कृपा. निरपेक्षच. मुलांनी तिच्यासाठी केलेल्या अगदी छोट्या गोष्टीचंही केवढं अप्रूप, अभिमान तिला. बोलून दाखवायची नाही, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान, कृतार्थपण ओसंडायचं. आज आठवलं की हसू येतं. नोकरी लागल्यावर पहिला पगार झाला. अर्थातच तो आईवडिलांना द्यायचा. पण मी मुंबईत. मग मी आईसाठी साडी घ्यायचं ठरवलं. माझा आतेभाऊ सुनील आणि मी समवयस्क. दोघेही साडी घ्यायला म्हणून गेलो. आठवले आणि शहाडे यांच्या दुकानात. आत पाहिलं तर समस्त महिलावर्ग. आम्ही दोघे अभिमन्यू दुकानाच्या बाहेर किमान पंधरा मिनिटे उभे राहून या चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा आणि महत्वाचे म्हणजे बाहेर कसे यायचे याची आखणी करत होतो. शेवटी हिय्या करून आत शिरलो. पहिल्या पाच मिनिटांत जी पहिली साडी आवडली ती घेऊन बाहेरसुद्धा पडलो. जीवनात पुढे अनेक समरप्रसंग आले, पण हा साडीखरेदी प्रसंग सर्वांवर मात करतो. साडी आईला दिली. तिच्या डोळ्यांत अतीव प्रेम होते, कौतुक होते, कृतार्थता होती. मलाही बरे वाटले. पुढे अनेक वर्षांनी असाच साडी खरेदीचा विषय निघाला. मला बाबा म्हणाले, अरे पाच मिनिटांत तुम्ही साडी घेऊन बाहेर पडलात, नीट पाहिलीत तरी का? मी म्हणालो का? काय झालं? बाबा हसत म्हणाले तू तुझ्या आईला एकदम "मिस इंडिया" करून टाकलंस. मला काही कळेना. शेवटी आईच म्हणाली "अरे, त्या साडीच्या कडांवर छानपैकी बारीक अक्षरात मिस इंडिया असं लिहिलं आहे!" माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा. अभिमन्यूने व्यूहभेद करावा पण विनाकटिवस्त्र व्यूहातून बाहेर यावे असे काहीसे झाले होते. तरीही इतकी वर्षं ती साडी केवळ आपल्या मुलानं पहिल्या पगाराची दिलेली म्हणून प्रेमानं नेसत होती.

लौकिकार्थानं आता प्रौढ झालो. आज पन्नाशी जवळ येताना दिसतेय पण आईसमोर तोच हट्टीपणा, हूडपणा आपोआप येतो. त्याच वेळी आपली बायकोही त्याच आईच्या जातीकुळीतील हेही दिसू लागतं. मुलं माझ्यापेक्षा त्यांच्या आईभोवतीच जास्त असतात. आईचं सोशिकपण बायकोतही आहे. मुलं आणि नवरा अशी कसरत सर्व आयांना करावी लागते तशी बायकोही करतेय. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, अखंड केवळ मुलांचाच विचार करणारी आई, तिचा विचार करण्यासाठी मदर्स डे कशाला हवा? आपला प्रत्येक क्षण तर तिनेच दिलेला आहे. त्याच्यावर तिचा हक्कच आहे. हे जे ऋण आहे ते फेडायचंच नाहीये मला. ऋणातच राहायचंय. तेव्हा आई, हे आमचं जगणं तुझंच दान आहे, एक दिवसच कशाला, सगळं आयुष्य आईसाठी, असं म्हणूयात.  

No comments:

Post a Comment