Saturday, May 24, 2014

एका नुसत्याच वादीची चिंतन बैठक

ही बैठक चिंतनाची आहे, नुसत्या वातवाढी पक्षाची नाही असे उद्गार आमचे कानपिचक्या कारागीर, कोपरखळी तज्ज्ञ, महिला धोरणाचे शिल्पकार, वार्धक्यातील पुरुषी सौंदर्याचा मूर्तिमंत पुतळा, शेतकरी अति-शेतकरी उच्च-शेतकरी आताबासच-शेतकरी यांचे स्वयंघोषित कल्याणकर्ते आणि अलीकडेच मानाने प्राप्त झालेल्या "जबडा-हाड-दंत तज्ज्ञ" या पदवीचे रिसीव्हर यांनी काढले. आमची झाडून सगळी आमदारं, खासदारं, झेडपीची टोपीकुमारं हजर होती. सायबांनी दमच दिला होता तसा. एका झेडपीवाल्याला तर बारमधून उचलून डायरेक्ट मिटिंगला आणला होता. गडयाची टाकी फुल होती. दादा म्हणले आसू देत, आपल्याला शिरगणती एकदम टॉप पायजे. सगळ्यात मागं बसवा त्याला. पायजेल तर त्या आव्हाडला बसवा त्याच्या फुडं. सायबांना नुसतं टक्कुरं दिसलं म्हंजे झालं. आणि त्या आबाला सायबांच्या एकदम पुढयात बसवा बर का. दर अर्ध्या तासाला त्याला तंबाखूची तलफ येतीया, आमाला त्याला जाग्यावर चुळबुळ करताना पाह्यचाय. आणि जर बार लावूनच आला तर सायबांच्या समोर तोंड उघडायचा नाय. ही:हीही:! दादा म्हंजे लैच विनोदी. एवढं पानिपत झालं पक्षाचं, पण विनोदी बुद्धी सोडली नाही. नेत्यानं असंच असावं. आसं दादा खुदुखुदू हसत होते, आमीपण हसत होतो तर दादा एकदम हसायचे थांबले, नाकपुडयांतून जोरजोरात श्वास सोडू लागले. आता म्हणलं खुरानं फरशीबिरशी उकरत्यात का काय. दारात आमचा कोकणचा बोंडू उभा, केसरकर! रस खाल्ला तर मधुर गोड, चीक खाल्ला तर तोंडावर फोड!  अद्याप राजीनामा स्वीकारला नसल्यानं हा वादग्रस्त बोंडू आमच्या वादींपैकीच एक म्हटलं पाहिजे. पंचाईत झाली. दादा म्हणले, काही करा सायबांच्या फुडं जाऊ नका. सोळा तारखेपासनं ब्लडप्रेशर आधीच वाढलंय. तुमी आसं करा, रूमच्या बाहेर खुर्ची टाकून बसा. मी दारात थोडी फट ठेवतो, तुमाला ऐकायला येईल. केसरकर गेल्यावर दादा आमाला म्हणले, तुमी दार हळूच बंद करून आतून कडी लावा. नंतर त्यांनी विचारलंच तर "अरेच्या! आसं झालं व्हय?" एवढंच म्हणा आन सुटा.

सायेब आले आन एकदम शांतता पसरली. आमच्या वार्डात कुणी गचकलं की आमी स्वत: सगळी पुढची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा वैकुंठभूमीत जाणं होतं. तिथल्या कर्मचाऱ्यांशी आपली एकदम खास ओळख झाली आहे. हल्ली नुसता फोन केला की सगळी व्यवस्था करून ठेवतात. तर सांगायचा मुद्दा असा की तिथली शांतता आपल्याला काय नवीन नाही. पण ही शांतता वैकुंठभूमीपेक्षा गार होती.  माणसंही तसलाच खास 'पोचवायला आलेला' चेहरा घेऊन बसलेली. फरक एवढाच की इथं जमलेल्यांपैकी कुणाच्या नाकात कापसाचे बोळे नव्हते इतकंच. सायबांच्या स्वत:च्या चेहऱ्यावर सुतकी छाया पसरलेली. सायबांनी सर्वांकडे नजर टाकली आणि मागे  ऐसपैस खुर्चीत टेकून बसले. चष्मा काढून पुसला.

"आपलं चिन्ह घडयाळ. नुसतं घडयाळ नाही तर त्यात दहा वाजले आहेत असं दाखवणारं घडयाळ. अशा घडयाळाचे बारा कसे वाजले याचा आढावा घेण्यासाठी आपण जमलो आहोत. यावेळेस जल्लोषाची खात्री नव्हती, पण शोकसभेचीही नव्हती. या तुमच्या गणपतीला तुम्ही एकवीस मोदक देणार होतात, पण मला माझ्यासमोर फक्त चारच दिसताहेत. हे असं का झालं? आमच्या महिला धोरणाचं लोकांनी मैला धोरण का केलं? याचं कारण आपण आपला भपका सोडला नाही. आम्ही जेव्हा म्हणालो होतो, भव्यतेचा विचार करा. त्याचा अर्थ उगाच काहीही भव्य करा असा नव्हता. भव्यदिव्य करायचं म्हणून शौचकूपात न जाता तडक धरणात मूत्रविसर्जन करायचं?" इथं दादा ख्याककरून हसले आणि मग जीभ चावून गप्प बसले.

"तुम्ही तुमच्या मर्सिडीझ, बीएमडब्ल्यू घेऊन प्रचाराला जाता. हातात बिसलेरीच्या बाटल्या घेता आणि सातसात मैलांवरून चालत डोक्यावरून पाणी आणणाऱ्या लोकांशी बोलता. तुम्ही मत दया अथवा देऊ नका निकाल बदलणार नाही असं उद्दामपणाने सांगता. मत दिलं नाहीत तर प्यायलाच काय धुवायलासुद्धा पाणी मिळणार नाही असा उलटा दम देता. त्यांनी अवघड मुद्दा उचलला की तुम्ही त्यांनाच उचलता." इथं सर्व एकतर जमिनीकडे किंवा आढ्याकडे नजर लावून बसले होते. "मतदारांशी सुसंवाद साधला पाहिजे हे नक्की. पण इतका? असला सुसंवाद जास्तच झाल्याने हे झालं आहे. तेव्हा आता मतदारांशी सुसंवाद जरा कमीच करा. नव्हे, त्यांच्या नजरेलासुद्धा काही काळ पडू नका. जरासं सामान्य व्हायला शिका. एस क्लास मर्सिडीझची गरज नाही, ई क्लासवर भागवा. मी तर म्हणतो एकच गाडी ठेवा. बाकीच्या विका, नातेवाईकांच्या नावाने करा, काही करा. खिशात हजाराच्या नोटा बाळगू नका, पाचशेच्या नोटांवर दिवस काढा. मतदार संघात गेलात तर मधूनमधून काय ही महागाई, कांदे शंभर रुपये किलो? माणसानं जगायचं तरी कसं? असली वाक्ये वापरत चला. काही लोकांनी पक्षधोरण पाळले नाही. आता निवडणुकीत पक्षधोरण प्रत्येक जागेवर वेगळे असू शकते. आता कोकणात आमचे धोरण जरा चुकलेच होते.  मित्रपक्षाचा उमेदवार, त्याचा प्रचार आपण केलाच पाहिजे हे आमचे धोरण होते. केवळ उमेदवार गुंड म्हणून त्याचा प्रचार करायचा नाही हे पक्षविघातक आहे. केवळ लोकहित नजरेसमोर ठेवलंत आणि आमचे धोरण पाळले नाहीत तर हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. "

"ते मळखाऊ कमळचड्डीवालेसुध्दा दर दोन वर्षांनी चड्डीबदल करत असतात. आपल्या पक्षात ते का होऊ नये? नव्या चेहऱ्यांना संधी का मिळू नये?" हे ऐकून सर्वजण एकदा सायबांच्या चेहऱ्याकडे आणि एकदा दादांच्या चेहऱ्याकडे असे पाहत राहिले. पण सायबांच्या चेहऱ्यावर आता साय खाऊन सुखावलेल्या बोक्याचे भाव पसरले होते. ते पुढं बोलू लागले. "आता बदल झाला पाहिजे. आता ज्यांचे पाय जमिनीवर आहेत त्यांनाच पक्ष संधी देईल." इथं काही जण छान खुर्चीवर मांडी घालून डुलकी देत बसले होते त्यांनी गडबडून पाय खाली सोडले. त्यात आबा आणि दादा हेही होते. आबांचे पाय तरीही जमिनीला टेकले नाहीत. मग ते अगतिकपणे खुर्चीत पुढे घसरून जमिनीला पाय टेकवण्याची धडपड करत सायबांकडे पाहत राहिले. ते पाहून दादा तोंडावर हात धरून हसू आवरत राहिले. सायबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते बोलत राहिले. बाकीची टोपीधोतरधारी जंता निर्विकारपणे कान कोरत, बैठकीनंतरच्या भोजनाचा मेन्यू आठवत ते ऐकत राहिली. खोलीच्या बाहेर ठेवलेली मंडळी दाराला कान लावून काही ऐकायला येतं का याचा मागोवा घेत राहिली. चिंतनाला रंग चढत चालला.

No comments:

Post a Comment