यंदा आमच्या रायबाचं लगीन काढलं आहे. २६ मे चा मुहूर्त निघाला आहे. चार दिवसांवर लगीन. प्रचंड धावपळ चालू आहे. म्हंजे आमची आवताण दयायला धाव पण घेणारे पळ काढताहेत, रुसून बसताहेत. काही 'आम्ही नाही जा' थाटात तर काही 'अडलंय माझं खेटर' थाटात. अहो ठरवतानासुद्धा काही कमी अडचणी आल्या नाहीत. आमचा रायबा एवढा राजबिंडा, अपेक्षा होती की यंदा कर्तव्य आहे असं नुसतं म्हणायचा अवकाश, स्थळावर उडया पडतील. त्याप्रमाणे त्या पडल्याही. पण एवढी स्थळं आली की त्यामुळे नात्यातल्याच काही जणांचा पोटशूळ तर उठला. शिवाय ज्यांचे मोरू लग्नाला उभे होते त्यांनीही रिंगण घातलंनीत. आमच्या रायबामुळे या मोरूंना स्थळं सांगून येईनात. पण ती बोलूनचालून परकी माणसं हो! ती करायचीच असे! पण लग्नाचं काढलं तेव्हा प्रथम आमच्या नानांनीच कुरकूर चालू केली. नाना म्हणजे यांचे मोठे भाऊ. आमच्या रायबाचे मोठे काका. स्वत: जन्मभर ब्रम्हचारी राहिले. देशसेवा करायची होती म्हणे. माती नि दगडं! तसे गावात रामाचं देऊळ बांधायचे होते तेव्हा दररोज जाऊन तिथे उभे राहायचे म्हणे. हा दगड अस्सा ठेवा नी तो तस्सा ठेवा. फुकटची मुकादमगिरी करायला जातंय काय? देऊळ बांधून झाल्यावर गांवकऱ्यांनी गावात मिरवणूक काढलंनीत. रथ मात्र छान केला होता हो. आमच्या अंबूवन्संच गेल्या होत्या सजावट करायास. मिरवणूक निघाली. पाहते तर कर्म माझं! रथावर सर्वात पुढे सारथ्य करायला आमचे नाना!
"अहो त्याचं वय ते काय अजून? आत्ता कुठं तिशीचा होतोय तो. अजून कशाचा पत्ता नाही, आणि गळ्यात धोंड बांधावयाची ती कशास? आधी नोकरीत स्थिरस्थावर हो म्हणावे. चांगला सिनिअर क्लार्क वगैरे हो, मग खुशाल कर हो लग्ने किती हवीत तेवढी! काय समजलेत?"
मग लगेच अंबूवन्संनी त्यांची री ओढली,"तर काय? मी म्हणते इतकी घाई कशास ती रे रायबा? उतावीळ नवऱ्यासारखं गुढघ्याला बाशिंग बांधलंयस ते अगदी? घरात अजून लग्नाची माणसं आहेत त्याचं आधी नको का व्हायला? मोठयाचं झाल्याशिवाय धाकटयानं बोहोल्यावर चढायची रीत नाही हो आपल्यात!"
रायबा बिचारा खाली मान घालून उभा होता. संस्कारच तसे हो त्याचे. कधी उलट उत्तर म्हणून दयायचा नाही. तशा आमच्या अंबूवन्सं प्रेमळ. पण कामाला वाघ हो. अंगात कामाचा भारी उरक. स्वत:चं तर करतीलच, परत दुसऱ्याचंही करून मोकळ्या होतील. शिवाय नानांच्या मर्जीतील.
मग मी म्हणाले,"अहो आता काही तो लहान नाही राहिला. स्थैर्याचं म्हणाल तर चांगली पाच वर्षे झाली हो त्यांस नोकरीस लागून. परवाच त्याच्या हापिसातले काही जण भेटले होते. रायबानं अगदी छान सांभाळलंयन ऑफिस असं सांगत होते. आता बढती मिळून त्यांचाच साहेब झालाय तो. आहेच कर्तृत्ववान तो. आता जबाबदारी वाढायला नको? सगळं ज्या त्या वेळेला झालं म्हणजे बरं असतं."
"तेच! तेच म्हणतो मी!" नाना करवादले. "सगळं ज्या त्या वेळेला आणि ज्याची वेळ त्याचंच व्हावयास हवं!"
मी स्पष्टच म्हणाले,"नाना, अहो काय म्हणावयाचे आहे तुम्हांस? काय ते स्पष्ट सांगा!"
तशी म्हणाले,"इतक्या दिवसांत नाही कळलं, आताच कसं कळेल?"
"बाई माझ्या! अहो बाईच्या वरताण हो तुमची! ती सुद्धा एवढे आढेवेढे घ्यायची नाही हो!"
तशी चटदिशी उठले आणि काहीतरी पुटपुटत बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर जाऊन बसले.
मग मी अंबूवन्संना म्हणाले,"काय हो वन्सं, तुमचं आणि नानांचं एवढं गूळपीठ, तुम्हाला तरी माहीत असेल नानांच्या मनात आहे तरी काय ते!"
तर नाकपुड्या फुगवून मलाच म्हणाल्या,"ठाऊक्काय बरं! एवढेही काही टोमणे मारायला नकोत! जसं काही मला विचारूनच नाना सगळं ठरवतात! बाई बाई बाई! काही बोलायची सोय उरली नाही या घरात!"
मग मी दादाबाबा करून त्यांचं कसं मन वळवलं ते माझं मलाच माहीत. तेव्हा कुठं त्या शंभर आढेवेढे घेत, मान लचकवत, खालच्या आवाजात म्हणाल्या,"अहो, तुम्ही लग्न लग्न करताय सगळे, पण नानांच्या लग्नाचं कुणी बोलतंय का? त्यांच्या हौसेमौजेला काही किंमत नाही का?"
मी थक्क होऊन पाहतच राहिल्ये. "कर्म माझं! असंच का मेल्यांनो!"
"पण अगो, त्यांसच करायाचे नव्हते ना लग्न? ब्रम्हचर्याचं आणि देशसेवेचं व्रत की काय ते घेतलं आहे ना?"
तशी म्हणाल्या,"ब्रम्हचर्य हे देशसेवेसाठी होतं म्हणे. आता देशसेवा थांबवली तर ब्रम्हचर्य कशास असे म्हणत होते. आता रायबासाठी बघताच आहात तर मान ठेवायचा म्हणून चार ठिकाणी यांच्यासाठीसुध्दा सांगून ठेवा म्हणते मी." मी कपाळावर हात मारून घेतला. "घ्या! कर्म नि काय!" आधी लगीन नानांचे मग रायबाचे, असली गत.
तर ही झाली घरची कथा. दुसरी चित्तरकथा आमच्या शेजारच्या मोरूची. रायबा मोरूच्याच वयाचा. थोडा मोठाही असेल. मोरू हुषार म्हणून त्यांस मुंबईस शिकायला ठेवलंन त्याच्या बापसानं. सुट्टी लागली की यायचा परत कोकणात आंबे, फणस खायला. गावातल्या मुलांसमोर मुंबईच्या गमतीजमती सांगायचा. तिकडे गेला आणि संस्कार विसरला. पूर्वी आला की पाया पडणारा तो आताशा आला की हेलो की फेलो असलं काहीतरी मातीमसणं म्हणायचा. पुढं एकदम इन्स्पेक्टर झाल्याची बातमी आली! वा! बापसाचंच काय आमच्या गावाचंही अगदी नाव काढलंनीत हो! रायबाच्याच वयाचा तो. रायबाचं लग्न काढलं असं ऐकलंन आणि स्वत:ही लग्नास उभा राहिला. म्हणे माझंही व्हायला हवं. रायबापेक्षा मी शिकलेला, इन्स्पेक्टर, मलाच चांगली स्थळं येणार. नोकरी सोडून देऊन परत गावास आला. म्हणाला इथे राहिलो तर स्थळे नक्की येतील. मी म्हणाले,"अरे, मुलींचे बाप नोकरीकडे पाहून स्थळ आणतात. मग तू नोकरी सोडण्याचे नष्टचर्य कसे केलेस? चांगला इन्स्पेक्टर ना रे होतास?"
तशी मला म्हणतो,"काकू, अगो तू चिंताच करू नकोस. नुसते माझ्याकडे पाहून स्थळे येतील हो!"
पण प्रत्यक्षात जेव्हा आमच्या रायबास स्थळं आली आणि यांस एकही नाही तेव्हा जे काही तारांगण घातलंन की यंव रे यंव. जी जी म्हणून स्थळे होती त्यांच्या घरासमोर जाऊन उपोषण काय केलेन, धरणे काय धरलेन. एका बापाने तर याच्या थोबाडीतसुद्धा मारलंन! या सर्वाचा मोरूस उपयोग काही झाला नाही पण सगळ्या गावास फुकट नाटक तेवढे पहावयास मिळाले हो! गांवात झारापकर आणि मंडळी दशावताराचा संच घेऊन आलेली, याचा हा शंकासुराचा पार्ट पाहून थक्क झाली. आमचासुध्दा शंकासूर असा नाही होत हो अशी कबुलीसुध्दा दिलंनीत. पुढे साखरपुडयात कोणीशीक म्हणालासुध्दा मला,"अगे आते, कसला इन्स्पेक्टर हा? मी मुंबईस गेलो होतो तर कळले, सॅनिटरी इन्स्पेक्टर हो हा! समस्त मुम्बयकरांच्या शौचकूपांचे इनिसपेक्शन करीत असतो."
तर सांगायचं एवढंच की सतरा विघ्ने आली पण, शेवटी साखरपुडा झाला हो! आता २६ मे ला शुभमंगल झालं की मी तीर्थाटनास जायला मोकळी! आणि सुदैवाने नानापण तयार झाले. म्हणजे त्यांच्या नव्हे, रायबाच्या लग्नाला!
(आगामी 'बिघडवली' या कादंबरीतील एक प्रकर्ण - संपादक)

No comments:
Post a Comment