Saturday, May 31, 2014

गुळणी

येक चिमूटभर तंबाखूकी किंमत तुम क्या जानो? हा डायलॉक खुद्द तासगांव सल्तनतचे झागिरदार आबांचा. जागतिक तंबाकूविरोधी दिन? हा कुनी काडला म्हनायचा? आपल्याला सिर्फ येक मे उर्फ म्हाराष्ट्र दिन म्हाईत होता. म्हाराष्ट्र दिन म्हंजे आमच्यासारक्याला म्हाराष्ट्राचा अभिमान, नुस्ता न्हाई, जाज्वल्य आभिमान दाखवण्याचा दिन. म्हाराष्ट्राचा मान आन आभिमान आपल्या सवयीत उतारला है. म्हराटी कोन? जो सक्काळच्याला जाग आल्या आल्या मशेरी लावतो, दुपारच्या ज्येवनानंतर तंबाखूची फक्की सोता हातावर चोळून आज्जात दाढंला धरतो, सांजच्याला चावडीला जमून येकमेकान्ला तंबाखूची चंची देवानघेवान करतो, रातच्याला झोपन्यापूर्वी शेकोटी करून त्यावर तंबाखू जाळून सकाळच्या मशेरीची सोय करतो तो आस्सल म्हराटी. आपली राजकारनात येण्ट्रि झाली तीबी तंबाखूमुळं. सांजच्याला पारावर बसून गडी लोक कुटाणा करत बसायचे, आपन पन बसून ऐकायचो. गुमान ऐकायचो. कदीमदी उत्तर म्हनून एक पिचकारी टाकायचो. आपला लौकिक आसा झाला की लोक म्हनू लागले, कितीबी तक्रारी सांगा आन कुटल्याबी सांगा, आबा सगळं ऐकून घेत्यात. त्याचा परिणाम आसा झाला की आनखी लोक येऊन न्हाई न्हाई त्या भांजगडी सांगू लागले. येकदा वाटलं त्येस्नी सांगावं, गडे हो, आरं मी तंबाखूची गुळणी धरलीया रं, गुमान बसू द्या की जरा मला. पन लोकांच्या नको त्या भांजगडी म्हायती होऊ लागल्या आन मग आपल्यालाबी गोडीच लागली. लोक म्हनायले आबा मुन्शिपाल्टीच्या इलेक्शनला हुबं ऱ्हा की ओ. नेतृत्वगुन लई हायेत तुमच्यात. तोंडात बार मस्त जमला होता, छान किक बसली होती. पिचकारी मारून मज्जा घालवन्यापरीस मी न्हाय न्हाय म्हनायला मान हालवत होतो. लोकान्ला वाटलं व्हय व्ह्य म्हनून मान हालवतोय गडी. मग काय परस्परच आमचा आर्ज भरून मोकळे सगळे. गावातली नव्वद टक्के जन्ता भांजगडवाली. आन त्या सगळ्या आमास्नी म्हाईत. मत जातंय कुटं मग. फुडला सगळा इतिहास आन भुगोल तुमास्नी म्हाईतच हाय.

सांगायचा मुद्धा तंबाखू आपल्या म्हाराष्ट्राची आन, बान, शान हाये. स्वातंत्र्याचं प्रतीक हाये. कुनीबी तंबाखूचा बार लावावा आन रस्त्यात, भिंतीवर, कोपऱ्यात कुटंबी पिचकारी मारावी. म्हाराष्ट्रानं ते स्वातंत्र्य जंतेला दिलं हाये. जन्मशिद्ध हक्कच हाये तो. मी तर म्हंतो तंबाखूचं शिक्षन ल्हानपनापासूनच मिळालं पायजे. आमच्या बाचा तंबाखूचा लय षौक होता. घरात पैपावण्यासाठी गठुडं तयार असायचं. जेवापासून कळाया लागलं तेवापासून मशेरीचा वास नाकात बसल्याला हाय. बा मशेरी भाजाया लागला की आमी आंथरूणं जवळ करायचो. फुडं मग मला वाटतं चौथ्या पाचव्या यत्तेत असताना बाच्या सदऱ्यातली चंची हळूच काडून तंबाकू हातावर काडून घेतली आन पार शेतात जाऊन खाल्ली. आन पहिला धडा मिळाला की तंबाकू गिळायची नसती. पुढले चार तास वकाऱ्या काढून भूसनळा झाला पार. मग कुनी जानकार पोरानं सांगिटलं गूळ खा मग बरं वाटतंय बग चटशिरी. मग त्याच्याकडनंच शिकलो तंबाकू डाव्या हातात कसा घ्यावा, तेतल्या बारीक काड्याकुड्या कशा काडाव्या, मग थोडा चुना लावून उजव्या हाताच्या तर्जनीनं कसा छान चोळावा, असा मळून झाला की त्याची सप्पय गोळी करून जिभेच्या टोकाखाली कशी ठेवावी, आन मग जरा टिंग झालं की डोळे बंद करून निवांत कसं बसावं. तेवापासून कुणालाही चुना लावायला सांगा, आबासारका चुना कोण लावत न्हाई असंच सगळी म्हणत्यात. फुडं तेचा लई उपयोग झाला आम्हाला. डिपारमेण्ट सारकं म्हत्वाचं खातं आमच्याकडे आलं आन तंबाकूचं म्हत्व आजूनच अधोरेखित झालं. (आयला, लई दिवस हा शब्द वापरायचा व्हता. मागं एकदा वापरला तर दादा हसून हसून लोळले होते. मला म्हनतात तू  आदी चार फुट, आणि वर अधोरेखीत करनार मग आमी काय जिमिनीवर झोपून वाचायचा का शब्द. सायेबतरी काय सांगतील त्यास्नी म्हनून सायबांकडे पाह्यलं तर ते नेहमीप्रमाणे छद्मी का कसलं तरी हास्य करत माज्याकडे बगत होते.) डिपारमेण्टमदे तंबाखू पगारासारखा चालतो. समदे पोलिस आपल्यावर लई खूष. आपले सायेबपन आपल्यासारके खानारे निघाले याचं त्यांना लई अप्रूप.  मिटींगा येकदम शांततेत होऊ लागल्या. सगळे गोल टेबलाभोवती बसायचे आन आपापली चंची काडून मस्त बार भरायचे. चुना आपन मी स्वत: लावायचो. मग फुडली तीस चाळीस मिण्ट 'अंम उम अम्म्म्म मम उम' या भाषेत सगळे बोलायचे. मी डोळे बंद करून माना डोलवायचो. ते खूष आपन खूष.

 तंबाकू बंद म्हंजे आमचं तोंड सताड ओपन. तोंड ओपन म्हंजे बोंबच की हो. मागं येकदा घरातून मंत्रालयात  जाताना कुटं तरी आमची चंची पडली. झालं? येकामागं येक मिटींगा लागलेल्या. आता चंची नाय तर बार नाय. बार नाय तर मिटिंगमदे बोलावं लागनार. पार भुस्काट पडलं डोक्याचं. सगळे इनिसपेक्टरं चंची शोधायच्या कामाला लावली. मन शांत करण्यासाठी सोताची समजूत घालत होतो. मोठं शेर हाये, वस्तू गहाळ व्हायच्याच आसं कायबाय सोताला सांगत होतो. तर नेमके कुटुन तरी पत्रकार आले आन कायबाय विचारू लागले. आमाला वाटलं काय आमच्या चंची हारवल्याची खबर येवढ्यात यांच्यापरेंत पोचली? मायला ही पत्रकारं म्हंजे गिधाडं हायेत नुसती. त्यांना म्हनलं, चलता हय, बडी बडी शेरोंमे अयसी चीजे होती रहती हय. आता आपल्याला काय ठाऊक अतिरेक्यांचा हल्ला पन नेमका त्याच वेळी झाल्याला? चंची हारवली आन अतिरेक्यांनापन चानस गावला आसा जोक केला आसता तर लोक आणखीनच भडकले आस्ते. दादापन टपलेलेच होते. लगेच आमाला सांगू लागले, तुमी तंबाकू सोडा. आमी आता त्येना सांगनार आहोत, तुमी धरणं भरायची सोडा आमी तंबाकू सोडतो. तंबाकू नसली म्हंजे आपलं टक्कुरं चालत नाही. आन तंबाकू सोडा?

येक अतिरेक्यांचा उगाच औषदाला म्हनून येक झालेला छोटासा हल्ला सोडला तर बाकी आसं सगळं आलबेल आसताना हे येकदम पंतपर्धानानी तंबाकू सोडा आसं म्हननं धक्कादायकच आहे. तब्येतीला धोका? त्यो कसा काय? जन्मभर तंबाकू हातावर चोळत आलो. आजवर हाताला ढकापन लागला न्हाई. हाताला धोका तंबाकूपासून न्हाय तर कमळापासून हाय हे आमी लई वर्षं सांगत आलो. आज आता गेले दोन आठवडे लोकान्ला पटाया लागलंय ते. मग आसं आसताना कमळाला दोष द्यायचा सोडून तंबाकूवर का घसरला हो?

Friday, May 30, 2014

निष्ठेचे फळ

निष्ठा एखाद्याला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यातल्या त्यात स्वामीनिष्ठा तर फारच कठीण तपश्चर्या. गेली तीस वर्षे आम्ही स्वामीचरणी बसून स्वामिमुखावर टक लावून पाहत आलो आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरील रेखानरेखा आमच्या मस्तिष्कात कोरली गेली आहे. सतत नामस्मरणापेक्षा योग्यवेळेला स्वामींचे पादमर्दन प्रभावी ठरते हा आमचा अनुभव. आमच्या उमेदवारीच्या काळात आम्ही आत्यंतिक भक्तीचे भाव चेहऱ्यावर घेऊन स्वामिचरणी बसून राहत होतो. स्वामी शेंगा खात खात मधूनच आमच्याकडे कृपादृष्टी टाकत, आणि एक दोन शेंगदाणे आमच्या दिशेने टाकत. स्वामींचा असा अनुग्रह झाल्यावर आणखी काय पाहिजे? तो कृपाप्रसाद ग्रहण केल्याने आम्हांस काय काय नाही प्राप्त झाले? पुरोगामी विचारसरणी (पुरोगामीच बहुधा), शाहू, फुले, आंबेडकर (ही नावे याच क्रमाने आणि अश्शीच घ्यावी लागतात नाही तर फळ मिळत नाही) यांचे विचार हे सगळे आपोआप पावले. पुढे मागे स्वामिभक्तीतून वेळ मिळाल्यास या तिन्ही पुण्यश्लोकांचे साहित्य मुळातून वाचणार आहे.  खास करून "शेतकऱ्याचा आसूड". नावच जबरी आहे. आम्ही पहिली दहा पाने वाचली. त्यातून उत्पन्न झालेली प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा "ठाणेकराचा सूड" लिहिणार आहोत.परमेश्वर कृपेने आमचे इंग्रजी, मराठी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे. विशेषत: पुरोगामी विचारसरणी वापरून आक्रमक पद्धतीने आपली बाजू लोकांस समजावून देताना त्याचा खूपच फायदा होतो. आमची समजावण्याची पद्धत काही लोकांना आवडत नाही. आम्ही या तिन्ही भाषेत भुंकतो अशी शिवराळ टीका ते करतात. पण आम्ही स्वामींचे ध्यान करून त्याकडे दुर्लक्ष करतो. एकदा खुद्द स्वामींनी गुंड प्रवृत्तीच्या विरोधकांकडून श्रीमुखात खाल्ली होती. आम्ही सर्व बंध तोडून पुरोगामी विचारसरणी आणि तिन्ही भाषांतील शेलके शब्द वापरत त्या इसमाच्या पटात शिरून त्यांस चीतपट करणार होतो. पण स्वामींनी उत्तम मन:शांती दाखवत आम्हांस रोखले म्हणून. नाहीतर नुसते त्यांनी आ केले असते तर आम्ही त्याला क्रमण जोडले असते. अशा वेळी स्वामी आमचे डोके गोंजारून आम्हाला शांत करत आहेत असे वाटते.  या एका गोष्टीचे आम्हांस नेहमी कुतूहल वाटत आले आहे. स्वामी खरोखरच कधीकधी डोके गोंजारतात, तेव्हा आम्ही उन्मनी अवस्थेत जातो. डोळे बंद होऊन कपाळाच्या मध्यभागी एकाग्रचित्त होतात. एक भक्तिभाव मनी दाटतो. कुंडलिनी ज्या ठिकाणी जागृत व्हायची तिथे एक शेपूट फुटून ते आनंदाने जोरजोरात हलते आहे असा भास होतो. स्वामींच्या स्पर्शाने अष्टसात्विकभाव जागृत झाल्याची अनेक उदाहरणे आम्ही वाचली आहेत, परंतु कुंडलिनी-पुच्छ-जागृतीयोग केवळ आम्हांस प्राप्त झाला  हे केवढे भाग्य. स्वामींच्या स्पर्शच काय, केवळ "जितेन्द्रा!" अशा प्रेमळ हाकेनेसुद्धा आमची समाधी लागते.

अशीच निष्काम निस्वार्थी वृत्तीने भक्ती करत असताना स्वामींची आज्ञा झाली, जितेन्द्रा, मुंबईच्या उत्तरेस ठाणे नामक ठिकाणी प्रजा शिवधनुष्याच्या वजनाखाली दबली जात आहे असे आम्हांस वाटते. ठिकाण बांका आहे. चहूबाजूंनी बेलाग आहे. प्रजा सुखी आहे. परंतु सुखी प्रजा म्हणजे तीस केवळ भौतिक सुखे प्राप्त झाली आहेत. त्यांस आत्मिक उन्नती म्हणजे काय हे माहीत नाही. भौतिक सुखे आत्मिक उन्नतीच्या आड येतात. भौतिक सुखे दूर झाली म्हणजे प्रजा आपोआप हरी हरी करायास लागून नामस्मरणाचे पुण्य मिळवू लागते. नामस्मरणाचे माहात्म्य तू जाणतोसच. तेव्हा तू त्या ठिकाणी जाऊन आमच्या संदेशाचे पालन कर. स्वामींची आज्ञा झाल्यावर हा शिष्य लगोलग कामास लागला. लोकांना ऐहिकतेपासून दूर राहण्याचा प्रचार सुरु केला. लोकांची आध्यात्मिक उन्नती न बघवणाऱ्या काही जंतूंनी स्वामींवर जहरी टीका केली. तुम्ही लोकांना भौतिक सुखांपासून दूर राहायला सांगता, प्रथम तुम्ही स्वत: ते आचरणात का आणत नाही असे त्यांचे अलौकिक तर्कट होते. आम्ही नेहेमीप्रमाणे आमच्या आक्रमक शैलीत (उपरनिर्दिष्ट पुरोगामी, शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणी इत्यादि) त्यांच्या तर्काचे खंडन केले. आता आमच्या शैलीत खंडन करताना झटापट होणारच. मग यातले काही समाजकंटक इस्पितळात गेले. पण आम्ही पाठपुरावा सोडला नाही. दररोज इस्पितळात जाऊन आमचा दृष्टीकोन मान्य होईपर्यंत चर्चा आणि खंडन केले. आज स्वामींच्या विचारसरणीचे फळ तेथे दिसते आहे. बहुतांशी मंडळी एक तर हरी हरी किंवा हर हर करीत काळ व्यतीत करीत आहेत. स्वामी आमच्या कामगिरीवर अत्यंत खूष झाले आणि असेच निष्काम काम करीत रहा, तो रामराया एक दिवस तुझे कल्याण करील असा आम्हांस आशीर्वाद दिला. त्यावर अत्यंत भक्तिभावाने आम्ही स्वामींचे पादप्रक्षालन करून "स्वामी! आम्हांस काही नको, आपल्या चरणी असेच पडून राहावयास मिळावे असा वर द्या!" असे वक्तव्य केले. ते ऐकताच बहुत संतोष पावून स्वामी "तथास्तु!" म्हणाले.

अनेक वर्षे एखाद्या झाडाला पाणी आणि खत घालावे, त्या झाडाने जेमतेम सावलीशिवाय काही देऊ नये आणि अचानक त्याला एक छान फणस लगडावा असे झाले. निरलस वृत्तीने केलेल्या भक्तीला आज फणसासारखे फळ लागले. आजवर आम्ही स्वामींच्या पायाशी बसत आलो. त्यांच्या सिंहासनाशेजारच्या स्टुलावर जे भक्तशिरोमणी बसत त्यांच्यावर स्वामींचा कोप झाला. एक दिवस ते नेहमीप्रमाणे स्टुलावर बसायला गेले तर स्वामींनी मिष्किलपणे स्टूल बाजूला ओढले आणि त्यांच्या पार्श्वभागाने धरणी अंमळ जोरातच गाठली. ते विव्हळत असतानाच हसतच स्वामी बोलले,"मत्प्रिय शिष्या!" ते ऐकून उभे असलेले अनेक इच्छुक शिष्य भावना अनावर होऊन स्टुलाच्या दिशेने धावले. आम्ही मात्र मस्तक लववून दृष्टी स्वामींच्या चरणावर लावली. उत्कट भावनेने उचंबळत मनोमन म्हणालो,"स्वामी! कृपा ! केवळ कृपा! आजवर मी खरोखरच आपली सेवा केली असेल तर माझे बूड त्या स्टुलावर स्थापन कराल." असे म्हणून आम्ही डोळे बंद करून स्वामींच्या चर्येस मनात ठेवून धावा करू लागलो. शिष्यगण पुढे येत होते त्यांस थांबवून स्वामी वदले,"मततिप्रिय शिष्या! जितेन्द्रा! वत्सा, ऊठ बरे. तुझ्या आसवांनी आमची पावले भिजली बरे! आम्ही संतुष्ट आहोत. ऊठ, तो चष्मा परिधान कर, आणि पहा ते स्टूल तुझी प्रतीक्षा करीत आहे! होय, आम्ही पुढील आठ महिने तुला आमच्या शेजारी स्टुलावर बसवून घेत आहोत." आम्हांस गदगदून आले, "स्वामी! अनुग्रह झाला! अनुग्रह झाला!" असे उच्चरवात शब्द काढून स्वामीचरणी स्वत:स लोटून दिले. समस्त शिष्यगण, "साधु! साधु!" असे उद्गार काढीत होता. आमच्या नेत्रांतून निष्ठेचे सार्थक झाल्याचे अश्रू अखंड घळघळा वाहत होते, त्यांत स्वामींची चरणे भिजून चमकत होती.

Thursday, May 29, 2014

शिक्षणाचा धडा

च्यामारी! हे शिक्षनाचं लफडं कशापाई काढावं बरं? शिक्षनानं कुनाचं भलं झालंय व्हय? मानूस आपल्या कर्मानं मोठा होत आसतो आसं आमचं सातवीतलं गुर्जी आमाला सांगायचं. तवा मी विचारलं होतं,'पर गुर्जी तुमी आसं काय कर्म केलं हुतं म्हनून गुर्जी झालाय?" आता यात आमचं काय चुकलं? पन उत्तर म्हनून एक लाफा भ्येटला शिवाय घरला निरोप, बाला घिऊन ये म्हनून. वर "ह्यो तुमचा पोरगा काय धावीच्या वर जात नाही बघा" आसा आमच्या बाला आशीर्वाद भ्येटला. बा गरीब हो आमचं, गुमान ऐकून घेऊन घरला आलं. एवढंसं तोंड करून मायला सांगताना मी त्याला ऐकलं हुतं. माय काळजीनं घिरली होती. बा म्हणत होता,"काय पोरगं फुडं जाऊन काय राजकारणात पडतंय का काय आता." गुर्जीनी मग माज्यावर डूकच धरला. सगळ्या चाचणी परीक्षेत भोपळाच भ्येटू लागला. मंग आपन एक आयडिया काडली. तडक गुर्जींचाच क्लास लावला. आपल्याला मार्क पडण्याची जबाबदारी तेंच्यावरच टाकली आन मस्त राह्यलो. वार्षिक परीक्षेत पास होऊनच दावलं. न मार्क दिऊन सांगतंय कुणाला. बा म्हनला, पोरा, उगाच टक्कूरं शाळंत वाया चाललं तुजं. मंत्री न्हाई पन किमान झेडपीत तरी जाशीलच बग. पन आमचं गुर्जीसुद्धा दूरदृष्टीचं. आपन नववीत दोन आन दहावीत तीन वर्षांचा आणभव घेऊन बाहेर पडलो. दहावीत आसताना येळ काढून आपन समाजकार्य करत होतो. गावात बाजारसमितीच्या निवडणुकीत लई कार्य करून सोडलं. समितीची मेंबरं धरून मतदानाला आणायची जबाबदारी आपली होती. विरोधी गटाचा त्याला विरोध हुता. मग त्या विरोधाला विरोध करण्याची कामगिरी आपन आशी पार पाडली, की चेरमन आबासो सोता पोलिस स्टेशनात येऊन शाबासकी देऊन ग्येले. म्हणले तुज्यासारक्या कार्यकर्त्यांची आपल्याला, पक्षाला गरज हे. मग आपन सर्व वेळ समाजसेवेला आर्पन करायचं ठरवलं. शिक्षनापरीस समाजसेवा म्हत्वाची. शिवाय आपल्याला तडीपारीबी लागली हुती. मंग शाळेत जाणंबी शक्य नव्हतं. मंग थितुन आपन मागं पाह्यलंच नाही. एकाच वर्षात पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यापासून तडक वॉर्डप्रमुख झालो. कुणीही आगदी मध्यरातीला येऊन चायनीज स्टॉल परवानगी म्हणा, भाजीची गाडी परवानगी म्हणा कसलंही काम घेऊन या, आपण अगदी ष्ट्यांडर्ड रेटमदी करून देनार. सगळ्यात जास्त पक्षनिधी (म्हंजे लोकांनी पक्षकामासाठी दिलेला निधी) आपल्या वॉर्डातून पक्षाला जात होता. आपलं काम बगून आपल्याला आबासाहेबांनी झेडपीवर जानार का आसं विचारलं. म्हंजे आपलं प्रमोशनच झालं म्हनायचं. पन आपन आपले पाय काय जिमिनीवरून सोडले नाहीत. परवाच्याला सोता गुर्जीच समोर आले. मला पघून चाट पडले. म्हनतात, तू इकडं कसा काय. तेंना बोललो तुमच्याच आशीर्वादानं. पेन्शनचं काम हुतं. म्हणलो तुमी काळजीच करू नका गुर्जी. मीच सही करनार हाये. तुमच्या कृपेनं सही तेव्हडी नीट शिकलोय.

आमच्या पक्षात सर्वे मंडळी आशीच. जास्तीत जास्त धावी झाल्याली पन समाज्कार्नात एकदमच उच्च म्हणजे पार पंधरावी गाठलेली. तशी हायेत एक दोन पार तिकडं कुटं इंग्लंड अमेरिकेला शिकल्याली. पन कसलं शिक्शान हो ते? तोंड उघडून चार शब्द बोलायची मारामार. आमच्या म्याडम बोलत आसल्या की देवळात भजनकीर्तन ऐकत आसल्यावानी डोळे बंद करून ष्टेजवर बसनार. येकदा पक्षाच्या बैठकीत मी आमच्या बाब्याला म्हटलं पन, ते बग बाबाजी झोपलाय कसा, आता म्याडमनी बगायला आन हे डबदिशी फुडं पडायला एकच गाठ पडायला पाह्यजे.  आमी धावीवाल्यांनी सगळं म्यानेज करायचं, समाजकारन करायचं, कशीबी मतं आणायची, आन उच्च शिक्षित हे ष्टेजवर बसनार आन झोपा काडणार. कसलं उच्च शिक्षित  रं हे, हुच्च शिक्षितच म्हनायला पाह्यजे.  आन त्यो बिनपगारी फुल अधिकारी आयआयटी की आयटीआय शिक्षित कलेक्टर, त्याची आणखीच तरा. पेन वापरायची संधी सोडून दिली आणि झाडू घेऊन फिरतोय.  या विलेक्शनमदी पक्ष नापास झाला. आता या परीक्षेनं आमचं शिक्शान बगून आमाला नापास नाय केलं. तसं जालं आसतं तर सगळेच नापास झाले नसते. एक दोन पासपण झाले आसते आन कमळाबाईचेपन काही नापास जाले आसते. म्हनून आता कमळाबाईचं शिक्शान काडायला लागले हायेत. आसो. आता पुन्ना पहिलेपासून सुरुवात करावी लागनार. म्हंजे पुन्ना बाजारसमितीच्या इलेक्शनची वाट पाहणं आलं.  पन ते परवडलं. आमचे जे अंगठाछाप पास झाले ते आता इरोधी पक्षाच्या बाकावर बसून शुद्दलेखण करनार. सवय सुटली आता. सत्ताधारी असताना बाकावर बसून झोपा काडणं सोपं होतं. बाकीचे इतर ज्यांना लोकसभेत अॅडमिशनपन भेटली नाही त्यांना म्याडमनी प्रौढ साक्षरता वर्ग जॉइन करा आसा आदेश दिला आहे. ते ऐकून काही जन "खास प्रौढांसाठी" वर्ग म्हनून लैच खुश झाले आहेत. 

Wednesday, May 28, 2014

झाले अवजड ओझे

काळापहाड सरकार आज बहुत खुषीत होते. त्यांनी आज त्यांचा आवडता काळा चष्मा कपाळावर सरकवला होता. वास्तविक गेल्या एक महिनाभरात वाड्याची वाताहत झाली होती. भिंतींचे पोपडे निघाले होते. एके काळी संगमरवरी असलेल्या फरशीला जागोजागी तडे जाऊन ती भकास झाली होती. बिल थकल्याने वीज मंडळाने वीज तोडली होती. मग छोटू आणि सरकारांनी स्वत: खांबावर चढून तारेचा कात्रज करून मंडळालाच चकवले होते. यंदा छपराची शाकारणी न झाल्याने ते ठिकठिकाणी गळत होते. जिथे गळत होते तिथे खाली वेगवेगळी भांडी ठेवल्याने दिवाणखान्याला राजा केळकर म्युझिअमचे रूप आले होते. या सर्वाचा उबग येऊन राणीसाहेब माहेरी निघून गेल्या होत्या. मुदपाकाची रसद अशा प्रकारे तुटल्याने काळापहाड सरकारांनी शेवटी समोरच्या बटाटेवडेवाल्यालाच  घाऊक कंत्राट दिले होते. पूर्वी कुठलीही गाडी उभी करायची असल्यास सरकारांना नजराणा गेल्याशिवाय परवानगी मिळत नसे. आता काळ उलटला होता. सरकारांनीच वडेवाल्याकडे "वही" ठेवायची वेळ आली होती.

आज वडे बांधून आलेल्या कागदात सरकारांना त्यांची खुषी सापडली होती. आजकाल सरकारांना बातम्या अशाच कागदातून मिळत. पेपरवाल्याचे बिल थकल्यावर त्याने पेपर टाकणे कधीच बंद केले होते. सरकारांनीसुद्धा, मरूदे, नाही तरी स्वत:चे पैसे घालून आमचीच तडफड, जळजळ वाढवणाऱ्याच बातम्या वाचायच्या ना? शिवाय तेवढ्या पैशात एक बटाटेवडा आणि बोनस म्हणून त्याबरोबर कागदपण येतो. आज बटाटेवडा खाऊन झाल्यावर सरकारांनी तो तेलकट कागद हाताने सपाट करून तो वाचता येण्यापुरता सरळ केला. "हं:! हॅ:! गेले दोन आठवडे सगळीकडे नुसत्या त्याच बातम्या. नमोंनी अस्से केले नि तस्से केले. काय वाचायचं त्यात? आं? हे काय?". ते खुर्चीत पसरले होते ते एकदम उठून सरळ बसले. त्यांनी नीट निरखून ती बातमी वाचली आणि त्यांच्या चेहऱ्यावर मिष्कील खुशीचे हसू पसरले. "छोटू! ही बातमी वाच. वा! आमचा दिल एकदम खूष करून टाकला नमोंनी. आम्ही नागवे झालो म्हणून काय झालं, शंभूराजेंची बोळवण लंगोटीवरच झाली शेवटी! आत्तापर्यंत अवघड उद्योग करत आलात, आता घ्या म्हणावं अवजड उद्योग उरावर." आणि अतिखुषीत ते चक्क गाऊ लागले, "पाऊल थकले, माथ्यावरती, जड झाले ओझे… शंभूराजेsss!!"

"१६ मे पासून आम्ही त्यांना दिसतसुद्धा नव्हतो. फोन करतील म्हणून दोन दिवस इथे अस्सा बसून राहिलो होतो. पण विजयनृत्य आणि विजयवल्गना करण्यात भावाची आठवण कशी येणार? नमोलाटेत वास्तविक आम्ही दोघांनीही गटांगळ्या खायच्या. पण यांच्या हातात फळकूट लागले आणि हे तरले. आम्ही मर्द म्हणून छाती पुढे काढून लाटेला सामोरे गेलो. आता वाटतं उगाच गेलो. छोट्या, लाट जबरी होती रे, आम्ही कधी आज्जात उचलेले गेलो आणि दाणकन किनाऱ्याला येऊन आपटलो कळलंच नाही. पार्श्वभाग सडकून निघाला अगदी. त्यावेळी हे नौकानयन करीत असलेल्या कसबी कप्तानाच्या थाटात फळकुटावर उभे राहून किनाऱ्याच्या दिशेने कूच करण्याचा आदेश देत होते. आपण उभे असलेले फळकूट ही नौका नसून, साधी फळी आहे अन ती पाण्यात तरंगणे सोडाच, पण आयएनएस कमळाबाई या अवाढव्य अशा पाणबुडीवर ती टेकली आहे याची जाणीव त्यांना झाली नव्हती. आता ती पाणबुडी हळूहळू वरती आली आणि तिच्या भव्यतेचा साक्षात्कार झाला असेल."

"शंभूराजे, अभिनंदन!"
"हं. कोण?"
"अस्सं! कोण काय? मी काळापहाड!"
"बरं. मग?"
"कळलं आम्हाला. जरा जडच आहे प्रकरण."
"तुम्हाला जड असेल, आम्हाला अवघड नाही."
"अवघड नाही पण अवजड आहे. खी:खी:खी:!"
"असेल. तुम्हांला त्याचं काय? निदान आम्हाला काम आहे. तुम्ही चालू ठेवा तुमची हेरगिरी."
"शंभूराजे! कळतात आम्हाला हे टोमणे. आम्हाला हौस का होती? संपली आता आमची हेरगिरी. आपण फोन कराल असं वाटलं होतं. शेवटी बिल न भरल्यानं फोनही कट झाला. पब्लिक बूथवरून बोलतो आहोत. शंभूराजे, आमचं चुकलंच. खूप हाल चालले आहेत. आम्हाला बघा ना अवजड उद्योगात लावता का कुठं. तसे फार अवजड उचलायचा अनुभव नाही, पण रस्त्यावरचे दगड उचलायचा नक्की आहे. एवढं करा आमचं काम."
"तुम्ही आमचे बंधू. माफी मागता आहात तर आम्हीही उदार मनानं माफ केलं तुम्हाला. उद्या सदरेवर या."
"खी:खी:खी:! अहो शुंभराजे! आम्ही आणि माफी मागणार? इतका वेळ बोलत होता तो छोटू! आम्ही नाही काही! बुद्धीही अवजड झालेली दिसते! खी:खी:खी:!"
"खी:खी:खी:! आम्हीही काही शंभूराजे नाही! मी धनाजी बोलतोय! खी:खी:खी:!"


Tuesday, May 27, 2014

माय नेम इज बाँड, बेल बाँड!

इश्श! साधा बेल बॉन्ड तो काय मेला, त्यासाठी इतकं लाजायचं? आपलं लग्न झालं तेव्हासुद्धा इतकं लाजत नव्हतात. लग्नाच्या आधी तुम्हाला बेल हा शब्द कित्ती आवडायचा. तुमची पँटसुद्धा बेलबॉटम असायची. मी कधीही तुम्हाला भेटायला आले की तुम्ही घरी नसायचा. तुमची आई नेहमी म्हणायची "कुठं बेल घालत गावभर फिरत असतो कुणास ठाऊक." त्यावेळी कित्ती कित्ती क्यूट होता तुम्ही! खोकला तर सोडाच साधं सर्दीपडसं पण कधी होत नव्हतं. आता नाही म्हणायला लग्नानंतर फिरायला कुलूमनालीला गेलो होतो तेव्हा गार वारं लागून कानाचे दडे बसले होते. मी काही बोलले तरी ऐकायला येत नव्हतं तुम्हाला. मग आपण तिथल्या दुकानातून छान रेशमी स्कार्फ घेतला होता, आठवतं ना? कित्ती रोमँटिक? अन काय हो, ती स्कार्फ विकणारी सेल्सगर्ल होती तिचं बरं सगळं ऐकायला येत होतं तुम्हाला? तिचं ऐकून स्कार्फबरोबर रंगीबेरंगी मॅचिंग मोजे पण घेतलेत. असे लब्बाड आहात ना! तो स्कार्फ तुम्हाला इतका आवडला होता, संपूर्ण ट्रीपभर तो घालून होतात. रात्री झोपतानासुद्धा काढायचा नाहीत. कसला बाई हा मंत्रचळेपणा? मला तर तुमचा हा मंत्रचळेपणाच मोहक वाटायचा. पण तो माफक असायचा. त्याला उगीच तत्वाची वगैरे झालर लावायचा नाहीत. आणि उगाच मूल्यं, तत्वं असलं करत बसायचा नाहीत. तत्वाबित्वाची चर्चा करणारे कसले बोअर असतात, हो किनई? तुमचं फक्त एकच म्हणणं असायचं, तुमचं कौतुक करा. हो की नाही? अस्से चलाख आहात ना? मागं एकदा असंच काहीतरी भुणभुण करत होतात. सकाळी मला कामावर जायची घाई, पटकन काही तरी करावं म्हणून बटाट्याची भाजी केली तर तुम्ही अडून बसला होतात, मला वांग्याचं भरीतच पाहिजे म्हणून. तुमचे चोचले पुरवत बसले असते तर आठदहाची गाडी चुकली असती माझी. म्हणून मी तशीच गेले. संध्याकाळी परत आले तर तुम्ही डोक्याला टापशी गुंडाळून गळ्यापर्यंत पांघरूण ओढून पडला होतात. डोळे बंद. हाक मारली तर एक ना दोन. घाबरलेच. कपाळाला हात लावून पाहिला तर ताप नव्हता. तर एकदम बरळल्यासारखे शब्द काढायला सुरुवात केलीत. कधी "वांगं" तर कधी "भरीत" असे. पट्कन जाऊन शेजारून जोशीकाकूंना घेऊन आले. त्यांच्यात थोडं देवाचं आहे म्हणतात. त्यांनी एकूण रंग पाहिला आणि म्हणाल्या "यांना लागण झाल्यासरशी वाटते आहे. कुठं फिरायला गेले असतील, पडला असेल पाय कुठं उतरून टाकलेल्या लिंबूमिरच्यांवरून. झाडूनं फटके दिल्याशिवाय झाड सोडणार नाही हे भूत. तू जरा झाडू घेऊन ये. " हे ऐकलं आणि तुम्ही एकदम डोळे उघडलेत आणि क्षीण आवाजात म्हणालात,"कुठं आहे मी?" मी आनंदून जोशीकाकूंना म्हणाले, "देव पावला. उतरलं वाटतं भूत !" तशी काकू म्हणाल्या,"ही भुतं असंच करतात. वाटतं उतरल्यासारखं, पण पुन्हा तासाभराने ये रे माझ्या मागल्या! तू झाडू आण कशी!" मी झाडू आणायला म्हणून आत गेले. बाहेर आले तर जोशीकाकू एकट्याच बसलेल्या. विचारलं,"हे कुठं गेले?" तर म्हणाल्या,"अगो, हे नवरे म्हणजे न उतरणारी भुतं हो! फटक्यांशिवाय उतरायची नाहीत. तू जशी आत गेलीस तशी पटकन उठला तुझा नवरा आणि कसलं तरी काम आठवलं म्हणून तडक बाहेर पडला आहे. घाबरू नकोस. सध्या तरी ते भूत परत हे झाड धरणार नाही." रात्री दहा वाजता उगवलात आणि मुकाट्याने बटाट्याची भाजी आणि पोळी खाल्लीत. तेव्हापासून तुम्हाला असं काही व्हायला लागलं की नुसतं जोशीकाकूंना घेऊन येते असं म्हटलं की चट बरे होता. अस्से नाटकी तुम्ही! ते काही असलं तरी तुम्ही कध्धी कुठली गोष्ट ताणून धरत नाही. आणि तेच मला तुमचं आवडतं. तुम्ही दंगा, नाटक, गमतीजमती करता, पण परत गंभीरपण होता. कित्ती क्यूट! तुमच्या अशा या क्यूट गमतीजमती पाहिल्या नं की अगदी गालगुच्चाच घ्यावा असं वाटतं. पण माझ्या सोनसख्या, आता जरा गमती पुरे हं. काय गरज होती खालच्या मजल्यावरच्या त्या गडकऱ्यांच्या सायकलीची हवा सोडून दयायची? आधीच ती मंडळी नागपूरच्या गरम हवेतून मुंबईच्या दमट हवेत आलेली. डोक्यातून अगदी वाफ निघत असते त्यांच्या. बाकी गडकऱ्यांचा मुलगा जरा अंगाने खाऊनपिऊन सुखीच. सायकलवरून निघाला की मुंबईच्या सडपातळ जिलबीवरून सुखवस्तू नागपुरी वडाभात निघाला आहे असं वाटायचं. पण मंडळी खुनशी हो अगदी. तुमचा मिष्किल स्वभाव काही पाहिला नाही, तडक पोलिसस्टेशनात वर्दी देऊन आले. तुम्हीसुद्धा अडून बसलात, म्हणे त्या गडकऱ्याच्या स्वत:च्याच वजनाने सायकल पंक्चर झाली नसेल कशावरून? शिवाय नुसती हवा सोडली म्हणून काय झालं? बाँड भरणार नाही म्हणजे नाही! बरं चाळीतले लोकही असे, अहो राहूद्या हो त्याला काही दिवस आत, आम्हालाही जरा मोकळीक मिळेल त्याच्या नको त्या धंद्यांतून, असं म्हणू लागले. माझी काय अवस्था झाली असेल याची काही कल्पना आहे का? बरं दोन दिवस आत राहून तुम्हाला ब्रम्हांड आठवलं, आत बटाट्याची भाजी नाही किंवा भरीत नाही. मग आता जळ्ळी मेली बाँड भरायची लाज वाटते, ती का? गडकरी म्हणाले आहेत, बिनदिक्कत भरा बाँड, झाली तेवढी शोभा खूप झाली, आम्ही काय चिडवायचो नाही. तेव्हा राया, प्राणनाथा, माझ्या मिष्कील मिकी माऊशा, कृपा करून लाजू नका, बाँड भरा आणि घरी चला. घरी खेळा हं बाँड बाँड. 

Monday, May 26, 2014

शपथविधी

हुश्श! एकदाचा पार पडला बुवा शपथविधी. लगीनघाईच ती. तयारी काय कमी लागते? पत्रिका छापून आल्या पाहिजेत, निमंत्रणं गेली पाहिजेत, लग्नापूर्वी ठरलेल्या याद्यांप्रमाणे सगळ्या देवाणघेवाणीच्या वस्तू घरात येऊन कुलुपात पडल्या पाहिजेत, ब्यांडवाल्यांना आचाऱ्यांना वेळीच कंत्राटं गेली पाहिजेत, नवरी नवरदेवाच्या मुंडावळ्या, भटजींची दक्षिणा, पूजेचे साहित्य (नेमके शिंचे सुट्टे एकेक रुपये सापडत नाहीत ऐनवेळी) इत्यादी हजार गोष्टी असतात. लग्नाआधी आठवडा येऊन बसलेले नातेवाईक, काही काही अनेक वर्षांनी उगवलेले. नवरदेव आधीच थिजलेला, त्यात असे धूमकेतू छाप नातेवाईक समोर आले की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सलगीचे हसू चेहऱ्यावर आणून आणून कंटाळलेला. काही "बघा, नशीब असतं हो एकेकाचं! आमचा बाब्या काय कमी देखणा का? आता केस थोडे मागे हटले आहेत, पण मी म्हणते ते बुद्धीचं लक्षण हो! शिवाय म्युनिशिपालटीत चांगला हेड कारकून! आठशे बेसिक वर भत्ता! वरकमाई वेगळी! पण अजून योग नाही हो. आणि आम्ही नुसते इतरांना आहेर करत फिरतो आहोत." म्हणत आलेले. तर काही "नाही तरी शनिवार वाडा बघायचाच होता. चला, त्या निमित्ताने तो पाहून होईल. जमल्यास सिंहगडसुद्धा होईल. काय समजलेत?" असे सहलीवर आलेले. एकूण स्वत: नवरदेव, मुलाचे आईबाप, फारतर करवलीचा मान मिळालेली बहीण यांच्यापलीकडे लग्नाचे कवतिक फारसे कुणालाच नाही. नाही म्हणायला वधूचा भाऊ कान पिळायला मिळणार या माफक आसुरी इच्छेपुरता उत्साही. उत्तम व्यवस्थेमुळे लगीन गाजले बुवा, अशी चर्चा क्वचितच ऐकू येईल. मानापमान, अडून बसलेले व्याही, वेळेवर न आलेले पाणी, गर्दीमुळे पंगतीवर झालेला 'हर हर महादेव' हल्ला आणि त्यात बळी गेलेले मानकरी यांच्यामुळेच लगीन लक्षात जास्त राहते. त्यात उन्हाळा असावा आणि वीज जावी, पाण्यात बर्फ नसावा. मग असे लग्न पुढील सर्व लग्नांचे न्यूनतमतेचे मापदंड ठरते. ज्याचे ते लग्न असेल त्याला ते आयुष्यभर ऐकावे लागते.

शपथविधी मोठा गोमटाच झाला. आमचे नरूराया छान दाढी विंचरून, गंधपावडर करून बसले होते. आई आत्ता इथे असती तर किती छान झाले असते असे म्हणत होते. परंतु चेहऱ्यावर जरा चिंता दिसत होती. का हो असे चिंतीत? साहजिकच आहे म्हणा, आता देशाची चिंता आहे तुमच्या मागे, असे आम्ही म्हटले तर म्हणाले," देशाची चिंता करण्यास मी समर्थ आहे हो. चिंता होती ती या शपथविधीची. इनमीन चाळीसपंचेचाळीस पदे. कुणाकुणाला खूष करावे? बरं, अगदी करायचेच म्हटले तर पात्रता नाही असे सांगितले तर हे लोक तत्काळ शीर्षासन करणार. त्यातून आमचीच काही आपटलेली भांडी, पोचा आलेला दिसतोय तरी केवळ प्राचीन म्हणून प्रदर्शनात ठेवायची आहेत. लोकांना मोहेंजोदारो कालातील प्राचीन भांडी कौतुकाने पाहायला आवडतात. ठीक आहे, निदान कल्हई तरी करून घ्या असे सांगितले आहे. मरहट्ट देशातून एक सद्गृहस्थ सारखे फोन करत असायचे. म्हणायचे तुम्ही पाहिले नसेल, पण तुमच्या प्रचारसभेत पार मागे निळा झेंडा घेऊन जो हनुमान उड्या मारायचा ना तो मीच. भगव्याबरोबर निळ्याला मान हवाच. त्यांना शेवटी मी विचारले, अहो तुमचे नाव तरी सांगा. तर फुरंगटून बसले. म्हणतात आमचे नाव आठवले तरी तुम्ही कसे विसरले? मी म्हणालो अहो आठवले असते तर विचारले असते का? ते आणखीच संतापले. म्हणाले हे असंच आहे, प्रत्येक वेळी मिरवणुकीत नाचायला बोलावतात आणि बिदागी द्यायच्या वेळेला नाव काय तुमचं असं विचारतात. या वेळेस आम्हाला आईशप्पत, शपथ घ्यायला तुम्हाला बोलवू असे सांगितले गेले होते. आईशप्पत, आम्हीच तुमच्या या विधीवर बहिष्कार टाकतो. आता बोला. ज्या मनुष्याला मी कधी पाहिलंच नाही त्याला कसं पद द्यायचं? यांची ही तऱ्हा तर तिकडे आमच्या प्रात:स्मरणीय अम्मा त्यांच्या शेजाऱ्याला निमंत्रण गेलं म्हणून रुसून बसल्या आहेत. आता आमचंही जरा चुकलंच. पण त्या आळीत गेलं की सर्व लोक एकसारखेच दिसतात हो.  एखाद्याला रामचंद्रन म्हणून हाक मारावी तर तो लुंगी गुंडाळत,"अय्योयो, आमी बालकृष्णन" म्हणणार.  एखाद्याला अय्यर म्हणावं तर तो अय्यंगार निघायचा. मग गेलं असेल चुकून निमंत्रण हो! आणि आता या आम्हाला "पोSSSडाSSS!" म्हणताहेत. त्यांनी "आमी नाई जा" असं म्हटल्यावर मग आमचे थलैवर रजनीसुद्धा,"नाही हो, येवढं एका वेळेला माफ करा हो. आमचं जावईचं पिक्चर काडून ठेवलो, त्याचं प्रिमियरसुद्धा आत्ताच आलं की हो" असं म्हणू लागले आहेत. सध्या ते "देव" या विषयावर भाषणं देतात. आणि अम्मा, अमको आशीर्वाद देव म्हणत त्यांच्या पाया पडतात. असूद्यात तो त्यांचा देव बापडा. आम्हाला आमचे रमेश देवसुद्धा चालतील. मागे त्या काँग्रेसच्या तिकिटावर हरल्यावर कसे शहाण्यासारखे परत गेले, पिक्चरमध्ये सुद्धा दर्शन देत नाहीत. देवदुर्लभ दर्शन हा शब्द काय उगीच आला नाही. असो. तिकडे त्या झांशीच्या राणी, मेरी झांशी नही दूंगी म्हणत बसल्याच होत्या. त्यांना घेणं प्राप्तच होतं, नाही तर त्यांनी आम्हांला पाठीशी बांधून घोडयावरून रपेट काढली असती. एवढंच काय रारा केजरूस्वामी यांनाही आम्ही निमंत्रण करण्यास जाणार होतो. त्यांना त्याची  कुणकुण लागली की काय कुणास ठाऊक, तडक जेलमध्येच जाऊन बसले म्हणे. बरोबरच आहे म्हणा. नापास झालेल्या मुलाला पहिल्या आलेल्या मुलानं त्याच्या बक्षीस समारंभाचं निमंत्रण करायला गेल्यासारखं झालं असतं. जेलमध्ये सुद्धा कैद्यांनी आमचा सोहळा टीव्हीवर पाहिला असं ऐकतो. त्यावेळी हे म्हणे उलट दिशेला भिंतीकडे तोंड करून बसले होते असं कळलं. नंतर 'टॉम आणि जेरी' सुरु झालं तेव्हाच तोंड वळवलं म्हणतात.

ठीकच झालं सर्व म्हणा. सर्वात मुख्य म्हणजे आमचे पितामह आयत्या वेळी सर्व अर्चा वैदिक पद्धतीनेच झाली पाहिजे, पितरांना तर्पण झालेच पाहिजे यावर अडून बसले नाहीत. आमच्या गुरूभगिनींनी त्यांची समजूत काढली असे समजले. अर्थात पद पदरात पडल्यानंतर म्हणा. हे सगळे जुळवून आणताना आमची दमछाक झाली. नमनालाच एक छोटेसे नाटक झाल्याप्रमाणे वाटते आहे. अजून मुख्य अंक चालू व्हायचे आहेत. आता (खरं तर आता तरी) ही पात्रे आपापल्या भूमिका नीट करोत अशी शपथ ईश्वरचरणी घालत आहोत.

Sunday, May 25, 2014

फुट्टमफाट

आमच्या फाइव्ह-डाऊन प्लेयर खाजिया फिल्मी यांनी आम्ही कटाप जा असे म्हणत आपली ब्याट घेऊन घरी प्रयाण केल्याचे वृत्त कानी आले आणि वाटले बोहारणीला चांगली दोन लुगडी देऊन घेतलेला डबा सहाच महिन्यांत पिचकावा? कॅप्टन चिकीखाऊ निघाला, सगळी टीम आपल्या विरोधात होती असे फिल्मी म्हणत होत्या. वास्तविक टीम जॉईन करतानाच आपल्याला बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग काही येत नाही हे आपण सांगितले होते, यांना केवळ माझ्याकडे असलेली बॅट पाहिजे होती असे त्या म्हणाल्या. कट करून मलाच बॅटिंग, फिल्डिंग करायला लावायचे हे लोक. खास करून दुसऱ्या टीमचा बॉलर खतरनाक असेल तर हे सर्व मला ओपनिंग बॅटिंगला पाठवत होते. त्या धरण होऊ नये म्हणून धरणं धरणाऱ्या त्या फाटकर, त्यांना का नाही पाठवत ओपनिंगला? त्यांना मात्र चीअरगर्ल केलं आहे. पण त्यांनाच व्हायचं होतं म्हणे. काय पण चीअरगर्ल. तोंड बघा चिअरिंग करणाऱ्याचं. साडीला साधी मॅचिंग पर्सपण नसायची. नाचणं सोडा, उभं राहण्यापेक्षा जमिनीवर बसकण मारण्याची आयुष्यभर सवय, यांना काय नाचता येणार आहे? बरं नाचल्या अगदी ओढून ताणून, तर चीअरपेक्षा फीअरच जास्त निर्माण होणार. त्यात आमच्या टीमकडे पॅडस नाहीत, ग्लोव्हज नाहीत. नको तिथे बॉल लागून कायम सगळे जखमी. मेलं टीमचं नाव तरी काय तर दिल्ली बेअरडेव्हिल्स अर्थात उघडेबंब इलेव्हन. यांची मॅच जिंकायची स्ट्रॅटेजीच वेगळी. स्टंपवरच का बॉल टाकता म्हणून हटून बसायचे, बॉल टाकलाच तर एकदम बाजूला होऊन सोडून द्यायचा. बोल्ड झालं तर मी तो बॉल खेळलोच नव्हतो असं म्हणून बॉंल डेड करा म्हणून आग्रह धरायचा. तोच सोडलेला बॉल चुकून बॅटच्या कडेला लागून फोर गेली तर मला तसाच मारायचा होता म्हणायचं आणि विजयनृत्य करायचं. आऊट दिलं की अंपायर चिकीखाऊ म्हणत बॅटसकट पीचवर बसून  राहायचं. कैच्याकैच. पूर्वी घरी बसून चांगली टीव्हीवर मॅच बघत होते तर काय अवदसा आठवली आणि ही टीम जॉइन केली कुणास ठाऊक.

नुकत्याच झालेल्या टुर्नामेंटमध्ये उघडेबंब इलेव्हन साफ उघडी झाली. लज्जेपुरता लंगोटसुद्धा टिकला नाही. आम्ही स्वर्गीय नाथनंगेमहाराज यांच्या पंथातले, आम्हांस कपड्याचे भय कसले दाखवता असे कॅप्टन स्वामी बं भोले केजरूनाथ (पतियाळावाले) यांचे स्वच्छ मत पडले. स्वत: बं भोले शून्यावर आऊट झाले. तळातील एकदोन प्लेयर्सनी दोनचार धावा काढल्या. ते प्लेयर्स कोण हेसुद्धा बंभोलेना आठवत नव्हते. प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले तेव्हा स्वामी शीर्षासन करत होते. त्याच अवस्थेत त्यांनी उत्तरे दिली. पत्रकार गुडघ्याकडे पाहून प्रश्न विचारीत व उत्तर ऐकण्यासाठी खाली पायाशी नजर लावत. बं भोले म्हणाले, आम्ही शून्यावर आऊट झालो हे सत्य आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर नाही हे आमचे यशच आहे. आम्ही पूर्ण एक षटक खेळून काढले. उलट एकदाही चेंडूचा स्पर्श आमच्या ब्याटीस होऊ दिला नाही, हे गोलंदाजाचेच अपयश नाही काय? तुम्ही आमचे यश पाहण्यापेक्षा गोलंदाजाचे अपयश का पाहत नाही? शिवाय अंपायर, प्रेक्षक हे सगळे आमच्या विरोधात होते. आम्हाला तर आता आमच्या स्वत:च्या प्लेयर्सचापण संशय येतो आहे. स्वत: आम्ही जगातील कोणत्याही गोलंदाजास घाबरत नाही. आमचे जाहीर आव्हान आहे, कोणीही आम्हास गोलंदाजी करून आमच्या ब्याटीस चेंडू लावून दाखवावा. अशा नियमावर मॅच खेळली जावी अशी मी मागणी करतो. त्यावर पत्रकारांनी अहो तुम्हांलासुद्धा गोलंदाजी करावी लागणार तेव्हा कसे होईल असा प्रश्न केला असता बं भोले यांनी शीर्षासन थांबवून पवनमुक्तासन करण्यास सुरुवात केली. वार्ताहरांनी ताबडतोब परिसर रिकामा केला. आता तुम्हीच सांगा काय भविष्य आहे आमच्या संघाचे? श्रीमती फिल्मी खूपच निराश दिसत होत्या.

संघाच्या (पक्षी : टीमच्या) या अपयशाचे कारण काय असे विचारले असता श्रीमती फिल्मी व्यथित झालेल्या दिसल्या. आमचे कॅप्टन हे नक्को त्या प्लेयर्समध्ये घेरले गेले आहेत. टीमची स्ट्रॅटेजी हे प्लेयर्स ठरवतात. आत्ताची हरलेली ही स्पर्धा ओव्हरआर्म आहे हे माहीत असूनही आम्ही अंडरआर्मची प्रॅक्टिस करत होतो. बॉडीलाईन खेळायची सवय नसलेले आमचे बं भोले, त्यांना पुढं करून नाकावर बॉल आदळून घ्यायला लावले.  बं भोलेना सुद्धा स्वत:च्या जखमांचं कौतुक करून घ्यायचं असतं, मग तेही चेवाचेवाने थोबाडून घेतात. आम्ही बायका सुद्धा असली नाटकं करत नाही हो! तुम्ही आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये येऊन पहा एकदा, क्रिकेट टीमची ड्रेसिंग रूम की बिग बॉसची असं वाटेल तुम्हाला. बाई बाई बाई! कंटाळा आला अगदी! आमच्या टीव्हीक्षेत्रातही नाहीत हो असली पात्रे! हे पुरुषच इतकी नाटकं करत असतात इथं तर आम्हां बायकांना कसला वाव मिळणार? ठरवलं मग, इथं राहायचंच नाही. मग आता काय करणार आहात असे विचारले असता त्या म्हणाल्या, ही टीम सोडली म्हणजे दुसऱ्या टीमकडे जाणार असे नाही. पण कुणी ऑफर दिलीच तर नाकारणार नाही हं. जिंकलेल्या टीमच्या कॅप्टनबद्दल आपले काय मत आहे असे विचारले असता त्या झकास लाजल्या. इश्श! माझं काय मत असणार? त्यांनी बोलावलं तर कित्ती कित्ती छान. शिवाय सिंगलसुद्धा आहेत ते. त्यांचे इल्मी डोळे लाजिया लाजिया झाले. पण भानावर येऊन त्या म्हणाल्या, तोवर "उघडेबंब इलेव्हन - 'आप'ला आक्रस्ताळेपणा 'आम'च्यात " - अशा विषयावर एखादी डॉक्युमेंटरी करावी असं मनात आहे. मग हसत म्हणाल्या,"तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेताहात असं तुम्हाला वाटतंय ना तो माझ्या डॉक्युमेंटरीचाच भाग आहे. तो पहा त्या पडद्यामागे आमचा कॅमेरामन! हो त्या स्टिंगनंतर मी खूप शिकले. आपलं स्टिंग व्हायच्या आधी दुसऱ्याचंच केलं की आपलं होत नाही."

Saturday, May 24, 2014

एका नुसत्याच वादीची चिंतन बैठक

ही बैठक चिंतनाची आहे, नुसत्या वातवाढी पक्षाची नाही असे उद्गार आमचे कानपिचक्या कारागीर, कोपरखळी तज्ज्ञ, महिला धोरणाचे शिल्पकार, वार्धक्यातील पुरुषी सौंदर्याचा मूर्तिमंत पुतळा, शेतकरी अति-शेतकरी उच्च-शेतकरी आताबासच-शेतकरी यांचे स्वयंघोषित कल्याणकर्ते आणि अलीकडेच मानाने प्राप्त झालेल्या "जबडा-हाड-दंत तज्ज्ञ" या पदवीचे रिसीव्हर यांनी काढले. आमची झाडून सगळी आमदारं, खासदारं, झेडपीची टोपीकुमारं हजर होती. सायबांनी दमच दिला होता तसा. एका झेडपीवाल्याला तर बारमधून उचलून डायरेक्ट मिटिंगला आणला होता. गडयाची टाकी फुल होती. दादा म्हणले आसू देत, आपल्याला शिरगणती एकदम टॉप पायजे. सगळ्यात मागं बसवा त्याला. पायजेल तर त्या आव्हाडला बसवा त्याच्या फुडं. सायबांना नुसतं टक्कुरं दिसलं म्हंजे झालं. आणि त्या आबाला सायबांच्या एकदम पुढयात बसवा बर का. दर अर्ध्या तासाला त्याला तंबाखूची तलफ येतीया, आमाला त्याला जाग्यावर चुळबुळ करताना पाह्यचाय. आणि जर बार लावूनच आला तर सायबांच्या समोर तोंड उघडायचा नाय. ही:हीही:! दादा म्हंजे लैच विनोदी. एवढं पानिपत झालं पक्षाचं, पण विनोदी बुद्धी सोडली नाही. नेत्यानं असंच असावं. आसं दादा खुदुखुदू हसत होते, आमीपण हसत होतो तर दादा एकदम हसायचे थांबले, नाकपुडयांतून जोरजोरात श्वास सोडू लागले. आता म्हणलं खुरानं फरशीबिरशी उकरत्यात का काय. दारात आमचा कोकणचा बोंडू उभा, केसरकर! रस खाल्ला तर मधुर गोड, चीक खाल्ला तर तोंडावर फोड!  अद्याप राजीनामा स्वीकारला नसल्यानं हा वादग्रस्त बोंडू आमच्या वादींपैकीच एक म्हटलं पाहिजे. पंचाईत झाली. दादा म्हणले, काही करा सायबांच्या फुडं जाऊ नका. सोळा तारखेपासनं ब्लडप्रेशर आधीच वाढलंय. तुमी आसं करा, रूमच्या बाहेर खुर्ची टाकून बसा. मी दारात थोडी फट ठेवतो, तुमाला ऐकायला येईल. केसरकर गेल्यावर दादा आमाला म्हणले, तुमी दार हळूच बंद करून आतून कडी लावा. नंतर त्यांनी विचारलंच तर "अरेच्या! आसं झालं व्हय?" एवढंच म्हणा आन सुटा.

सायेब आले आन एकदम शांतता पसरली. आमच्या वार्डात कुणी गचकलं की आमी स्वत: सगळी पुढची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा वैकुंठभूमीत जाणं होतं. तिथल्या कर्मचाऱ्यांशी आपली एकदम खास ओळख झाली आहे. हल्ली नुसता फोन केला की सगळी व्यवस्था करून ठेवतात. तर सांगायचा मुद्दा असा की तिथली शांतता आपल्याला काय नवीन नाही. पण ही शांतता वैकुंठभूमीपेक्षा गार होती.  माणसंही तसलाच खास 'पोचवायला आलेला' चेहरा घेऊन बसलेली. फरक एवढाच की इथं जमलेल्यांपैकी कुणाच्या नाकात कापसाचे बोळे नव्हते इतकंच. सायबांच्या स्वत:च्या चेहऱ्यावर सुतकी छाया पसरलेली. सायबांनी सर्वांकडे नजर टाकली आणि मागे  ऐसपैस खुर्चीत टेकून बसले. चष्मा काढून पुसला.

"आपलं चिन्ह घडयाळ. नुसतं घडयाळ नाही तर त्यात दहा वाजले आहेत असं दाखवणारं घडयाळ. अशा घडयाळाचे बारा कसे वाजले याचा आढावा घेण्यासाठी आपण जमलो आहोत. यावेळेस जल्लोषाची खात्री नव्हती, पण शोकसभेचीही नव्हती. या तुमच्या गणपतीला तुम्ही एकवीस मोदक देणार होतात, पण मला माझ्यासमोर फक्त चारच दिसताहेत. हे असं का झालं? आमच्या महिला धोरणाचं लोकांनी मैला धोरण का केलं? याचं कारण आपण आपला भपका सोडला नाही. आम्ही जेव्हा म्हणालो होतो, भव्यतेचा विचार करा. त्याचा अर्थ उगाच काहीही भव्य करा असा नव्हता. भव्यदिव्य करायचं म्हणून शौचकूपात न जाता तडक धरणात मूत्रविसर्जन करायचं?" इथं दादा ख्याककरून हसले आणि मग जीभ चावून गप्प बसले.

"तुम्ही तुमच्या मर्सिडीझ, बीएमडब्ल्यू घेऊन प्रचाराला जाता. हातात बिसलेरीच्या बाटल्या घेता आणि सातसात मैलांवरून चालत डोक्यावरून पाणी आणणाऱ्या लोकांशी बोलता. तुम्ही मत दया अथवा देऊ नका निकाल बदलणार नाही असं उद्दामपणाने सांगता. मत दिलं नाहीत तर प्यायलाच काय धुवायलासुद्धा पाणी मिळणार नाही असा उलटा दम देता. त्यांनी अवघड मुद्दा उचलला की तुम्ही त्यांनाच उचलता." इथं सर्व एकतर जमिनीकडे किंवा आढ्याकडे नजर लावून बसले होते. "मतदारांशी सुसंवाद साधला पाहिजे हे नक्की. पण इतका? असला सुसंवाद जास्तच झाल्याने हे झालं आहे. तेव्हा आता मतदारांशी सुसंवाद जरा कमीच करा. नव्हे, त्यांच्या नजरेलासुद्धा काही काळ पडू नका. जरासं सामान्य व्हायला शिका. एस क्लास मर्सिडीझची गरज नाही, ई क्लासवर भागवा. मी तर म्हणतो एकच गाडी ठेवा. बाकीच्या विका, नातेवाईकांच्या नावाने करा, काही करा. खिशात हजाराच्या नोटा बाळगू नका, पाचशेच्या नोटांवर दिवस काढा. मतदार संघात गेलात तर मधूनमधून काय ही महागाई, कांदे शंभर रुपये किलो? माणसानं जगायचं तरी कसं? असली वाक्ये वापरत चला. काही लोकांनी पक्षधोरण पाळले नाही. आता निवडणुकीत पक्षधोरण प्रत्येक जागेवर वेगळे असू शकते. आता कोकणात आमचे धोरण जरा चुकलेच होते.  मित्रपक्षाचा उमेदवार, त्याचा प्रचार आपण केलाच पाहिजे हे आमचे धोरण होते. केवळ उमेदवार गुंड म्हणून त्याचा प्रचार करायचा नाही हे पक्षविघातक आहे. केवळ लोकहित नजरेसमोर ठेवलंत आणि आमचे धोरण पाळले नाहीत तर हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. "

"ते मळखाऊ कमळचड्डीवालेसुध्दा दर दोन वर्षांनी चड्डीबदल करत असतात. आपल्या पक्षात ते का होऊ नये? नव्या चेहऱ्यांना संधी का मिळू नये?" हे ऐकून सर्वजण एकदा सायबांच्या चेहऱ्याकडे आणि एकदा दादांच्या चेहऱ्याकडे असे पाहत राहिले. पण सायबांच्या चेहऱ्यावर आता साय खाऊन सुखावलेल्या बोक्याचे भाव पसरले होते. ते पुढं बोलू लागले. "आता बदल झाला पाहिजे. आता ज्यांचे पाय जमिनीवर आहेत त्यांनाच पक्ष संधी देईल." इथं काही जण छान खुर्चीवर मांडी घालून डुलकी देत बसले होते त्यांनी गडबडून पाय खाली सोडले. त्यात आबा आणि दादा हेही होते. आबांचे पाय तरीही जमिनीला टेकले नाहीत. मग ते अगतिकपणे खुर्चीत पुढे घसरून जमिनीला पाय टेकवण्याची धडपड करत सायबांकडे पाहत राहिले. ते पाहून दादा तोंडावर हात धरून हसू आवरत राहिले. सायबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते बोलत राहिले. बाकीची टोपीधोतरधारी जंता निर्विकारपणे कान कोरत, बैठकीनंतरच्या भोजनाचा मेन्यू आठवत ते ऐकत राहिली. खोलीच्या बाहेर ठेवलेली मंडळी दाराला कान लावून काही ऐकायला येतं का याचा मागोवा घेत राहिली. चिंतनाला रंग चढत चालला.

Friday, May 23, 2014

पूल आणि बुरूज

पहाटे पहाटे फोनचा स्क्रीन जागा झाला. अंधारात तो उजेड डोळ्यांना जास्तच भगभगीत वाटला. महत्वाचा संदेश असणार म्हणून पाहिलं. बातमी वाईट होती. बाळूमामा गेला. गेले काही महिने तसा तो आजारीच होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. काही आठवडे, फारतर महिने असं स्पष्ट सांगितलं होतं. कल्पना होती, मनाची तयारी होती तरीही सुन्न व्हायला झालं. कळायला लागल्यापासून ते आतापर्यंतची अशी उण्यापुऱ्या चाळीस पंचेचाळीस वर्षांतील त्याची अनेक रूपं नजरेसमोरून गेली. गेल्या काही वर्षांत भक्कम किल्ल्याचे बुरूज ढासळावेत त्याप्रमाणे घरातील माणसे गेली. पूर्वी माणसे या वाईट निमित्ताने का होईना पुन: एकत्र येत, एकमेकांना धीर देत. गेलेल्या माणसाच्या चांगल्या आठवणी काढत. जमलेली माणसे कधी काळी लहान असतच. गेलेले माणूस हे बऱ्याच वेळा या सगळ्यांना जोडून ठेवणारी नाळ असायचे. मग त्या आठवणी निघाल्यावर पुन:श्च माणसे दहाबारा वर्षांची ती लहान मुले होत, तुटलेले पूल पुन्हा जोडले जात. कधी कधी अनेक पावसाळ्यांचे पाणी या पुलांखालून वाहून गेलेले असायचे. कधी काळी उन्हाळ्यातील सुटटी लागली की एकत्र जमणारी भावंडे हीच असायची. एकत्र जेवणारी, उन्हांतान्हात खेळताना घामाघूम होऊन मग थंड अंधाऱ्या माजघरातील झोपाळ्यावर बसून मोठयांच्या दुपारच्या डुलकीचा खंडोबा करणारी, संध्याकाळी वारं सुटलं की गच्चीवर जाऊन पतंग उडवणारी, जेवताना पानात काही टाकलं की रागे भरतो म्हणून मामाच्या शेजारी जेवायला बसायला टाळणारी, पण तोच मामा संध्याकाळी भेळ खायला न्यायचा तेव्हा गाडीत पुढच्या सीटवर त्याच्यापाशी बसण्याची चढाओढ करणारी, रात्री गच्चीवर गादया टाकून झोप लागेपर्यंत गप्पा किंवा लखलखणारे तारे न्याहाळणारी.

आमची ही पिढी तशी या बाबतीत भाग्यवानच म्हणावी लागेल. या पिढीनं मावशा, मामा, आत्या, काकांनी भरलेली एकत्र कुटुंबं पाहिली. सर्वांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी ही आधीची पिढी. जसा हट्ट आईवडिलांकडे करू तसाच हट्ट आम्ही यापैकी कुणाशीही करू शकत होतो आणि तेवढ्याच हक्काने फटके पण खात होतो. मामानं धपाटा दिला म्हणून कधी आईकडे रडत कुणी भावंड गेल्याचं आठवत नाही. कारण जर तसं केलं तर आईही एक ठेवून देणार याची खात्री होती. मामाचा हक्कच होता तो. जसा तो बहिणींवर प्रेम करायचा तसा त्यांच्या मुलांवरपण. धपाटे हे प्रेमापोटीच घातले गेलेले असतात. जिथे परकंपण असतं तिथे हा हक्काचा मारपण नसतो. आज जाणवतं त्यांच्याआमच्या कळत नकळत या सर्व मंडळींनी एक अदृश्य असा धागा गुंफला होता. प्रेम, प्रसंगी राग, कधी कधी मनुष्यस्वभावाने मिळालेला रुसवा अशा भावनांनी भक्कम बनलेला असा तो धागा. त्या धाग्यात आम्ही सर्व भावंडे बांधलो गेलो आहोत.

असं असलं तरी कुठं तरी पडझड होत असते. मूल्ये बदलत असतात. पूर्वी जुझांत गोळाबारीनं बुरुज फुटत, पडत, पण त्याच जोमानं त्यांची डागडुजी होऊन किल्ला अभेद्य अखंड असा उभा राहत असायचा. किल्ल्यात राहणाऱ्या वस्तीचं जगणं त्याच्या अभेद्यपणावर अवलंबून असायचं. पुढे किल्ल्यातून निघून लोक खुज्या अशा खोपटांत राहू लागली. आपापल्या खुराड्यांपुरती जगू लागली. किल्ल्याच्या बुरुजाला भेगा पडल्या तरी त्याच्या दुरुस्तीसाठी कुणाला वेळ नसायचा किंवा बुरुजाच्या बुलंदपणावर विश्वास असल्यामुळे त्याला काही होत नाही अशी खात्री असायची. कालानुरूप प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले, आयुष्ये बदलली, भौगोलिक संदर्भ बदलले, सामाजिक राजकीय विचार वेगळे झाले. कधी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटणं होऊ लागलं. पण अशा भेटण्यात जिवाभावाच्या गप्पा होत नाहीत. मिठी होते पण ती कडकडून, चिंब भिजून होत नाही. प्रत्येकाला नक्कीच आतून तसं भेटावं असं वाटत असतं, पण काळाची पुटं चढून मनात नको असला तरी प्रौढपणाचा एक वेष चढलेला असतो. समाजानं, रीतींनी तो घालायला लावलेला असतो. कधी कधी स्वत:वर खूष होऊन नकळत चढलेला असतो. त्या पुटांच्या आत, आपण तेच आहोत हे जाणवत असतं. बुंध्यावर वयाची वर्तुळं वाढली, फांद्या वाढल्या म्हणून झाडाचं झाडपण थोडंच बदलतं? मुळं आहेत तिथंच असतात. मग असेच जणू काही स्वप्नात असल्याप्रमाणे, बधिरपणे स्वत्व थोडंसं विसरून जगत असताना मुळापासून हादरवणारा असा एखादा धक्का बसतो. ज्या जमिनीत आपली मुळं रुतली आहेत ती जमीनच मुळापासून हादरते. खडबडून सर्व धाव घेतात. यावेळी कसलाही वेष नसतो, अभिनिवेश नसतो. असते ती केवळ एक वेदना. आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या अनेक या धाग्यांपैकी एक तुटला आहे त्याची वेदना. एक एक असा धागा तुटतो आहे आणि आपल्याला प्रौढत्वाकडे ढकलतो आहे याची जाणीव होत असते. मग या वेळी जी भेट होते ती कडकडून असते. आपापल्या प्रवाहात वेगळे झालेले किनारे जोडले जातात. जिवंत असतानाही ज्या पुलाने जोडण्याचं काम केलं तो मरणानंतरही तेच काम करतो आहे. हा बुरूज पडूनही भक्कम उभा आहे, त्याच्या आधाराने आम्ही सर्व एकमेकांना धरून राहणार आहोत.

Thursday, May 22, 2014

रायबाच्या लग्नाची चित्तरकथा

यंदा आमच्या रायबाचं लगीन काढलं आहे. २६ मे चा मुहूर्त निघाला आहे. चार दिवसांवर लगीन. प्रचंड धावपळ चालू आहे. म्हंजे आमची आवताण दयायला धाव पण घेणारे पळ काढताहेत, रुसून बसताहेत. काही 'आम्ही नाही जा' थाटात तर काही 'अडलंय माझं खेटर' थाटात. अहो ठरवतानासुद्धा काही कमी अडचणी आल्या नाहीत. आमचा रायबा एवढा राजबिंडा,  अपेक्षा होती की यंदा कर्तव्य आहे असं नुसतं म्हणायचा अवकाश, स्थळावर उडया पडतील. त्याप्रमाणे त्या पडल्याही. पण एवढी स्थळं आली की त्यामुळे नात्यातल्याच काही जणांचा पोटशूळ तर उठला. शिवाय ज्यांचे मोरू लग्नाला उभे होते त्यांनीही रिंगण घातलंनीत. आमच्या रायबामुळे या मोरूंना स्थळं सांगून येईनात. पण ती बोलूनचालून परकी माणसं हो! ती करायचीच असे! पण लग्नाचं काढलं तेव्हा प्रथम आमच्या नानांनीच कुरकूर चालू केली. नाना म्हणजे यांचे मोठे भाऊ. आमच्या रायबाचे मोठे काका. स्वत: जन्मभर ब्रम्हचारी राहिले. देशसेवा करायची होती म्हणे. माती नि दगडं! तसे गावात रामाचं देऊळ बांधायचे होते तेव्हा दररोज जाऊन तिथे उभे राहायचे म्हणे. हा दगड अस्सा ठेवा नी तो तस्सा ठेवा. फुकटची मुकादमगिरी करायला जातंय काय? देऊळ बांधून झाल्यावर गांवकऱ्यांनी गावात मिरवणूक काढलंनीत. रथ मात्र छान केला होता हो. आमच्या अंबूवन्संच गेल्या होत्या सजावट करायास. मिरवणूक निघाली. पाहते तर कर्म माझं! रथावर सर्वात पुढे सारथ्य करायला आमचे नाना!

"अहो त्याचं वय ते काय अजून? आत्ता कुठं तिशीचा होतोय तो. अजून कशाचा पत्ता नाही, आणि गळ्यात धोंड बांधावयाची ती कशास? आधी नोकरीत स्थिरस्थावर हो म्हणावे. चांगला सिनिअर क्लार्क वगैरे हो, मग खुशाल कर हो लग्ने किती हवीत तेवढी! काय समजलेत?"
मग लगेच अंबूवन्संनी त्यांची री ओढली,"तर काय? मी म्हणते इतकी घाई कशास ती रे रायबा? उतावीळ नवऱ्यासारखं  गुढघ्याला बाशिंग बांधलंयस ते अगदी? घरात अजून लग्नाची माणसं आहेत त्याचं आधी नको का व्हायला? मोठयाचं झाल्याशिवाय धाकटयानं बोहोल्यावर चढायची रीत नाही हो आपल्यात!"
रायबा बिचारा खाली मान घालून उभा होता. संस्कारच तसे हो त्याचे. कधी उलट उत्तर म्हणून दयायचा नाही. तशा आमच्या अंबूवन्सं प्रेमळ. पण कामाला वाघ हो. अंगात कामाचा भारी उरक. स्वत:चं तर करतीलच, परत दुसऱ्याचंही करून मोकळ्या होतील. शिवाय नानांच्या मर्जीतील.
मग मी म्हणाले,"अहो आता काही तो लहान नाही राहिला. स्थैर्याचं म्हणाल तर चांगली पाच वर्षे झाली हो त्यांस नोकरीस लागून. परवाच त्याच्या हापिसातले काही जण भेटले होते. रायबानं अगदी छान सांभाळलंयन ऑफिस असं सांगत होते. आता बढती मिळून त्यांचाच साहेब झालाय तो. आहेच कर्तृत्ववान तो. आता जबाबदारी वाढायला नको? सगळं ज्या त्या वेळेला झालं म्हणजे बरं असतं."
"तेच! तेच म्हणतो मी!" नाना करवादले. "सगळं ज्या त्या वेळेला आणि ज्याची वेळ त्याचंच व्हावयास हवं!"
मी स्पष्टच म्हणाले,"नाना, अहो काय म्हणावयाचे आहे तुम्हांस? काय ते स्पष्ट सांगा!"
तशी म्हणाले,"इतक्या दिवसांत नाही कळलं, आताच कसं कळेल?"
"बाई माझ्या! अहो बाईच्या वरताण हो तुमची! ती सुद्धा एवढे आढेवेढे घ्यायची नाही हो!"
तशी चटदिशी उठले आणि काहीतरी पुटपुटत बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर जाऊन बसले.
मग मी अंबूवन्संना म्हणाले,"काय हो वन्सं, तुमचं आणि नानांचं एवढं गूळपीठ, तुम्हाला तरी माहीत असेल नानांच्या मनात आहे तरी काय ते!"
तर नाकपुड्या फुगवून मलाच म्हणाल्या,"ठाऊक्काय बरं! एवढेही काही टोमणे मारायला नकोत! जसं काही मला विचारूनच नाना सगळं ठरवतात! बाई बाई बाई! काही बोलायची सोय उरली नाही या घरात!"
मग मी दादाबाबा करून त्यांचं कसं मन वळवलं ते माझं मलाच माहीत. तेव्हा कुठं त्या शंभर आढेवेढे घेत, मान लचकवत, खालच्या आवाजात म्हणाल्या,"अहो, तुम्ही लग्न लग्न करताय सगळे, पण नानांच्या लग्नाचं कुणी बोलतंय का? त्यांच्या हौसेमौजेला काही किंमत नाही का?"
मी थक्क होऊन पाहतच राहिल्ये. "कर्म माझं! असंच का मेल्यांनो!"
"पण अगो, त्यांसच करायाचे नव्हते ना लग्न? ब्रम्हचर्याचं आणि देशसेवेचं व्रत की काय ते घेतलं आहे ना?"
तशी म्हणाल्या,"ब्रम्हचर्य हे देशसेवेसाठी होतं म्हणे. आता देशसेवा थांबवली तर ब्रम्हचर्य कशास असे म्हणत होते. आता रायबासाठी बघताच आहात तर मान ठेवायचा म्हणून चार ठिकाणी यांच्यासाठीसुध्दा सांगून ठेवा म्हणते मी." मी कपाळावर हात मारून घेतला. "घ्या! कर्म नि काय!" आधी लगीन नानांचे मग रायबाचे, असली गत.

तर ही झाली घरची कथा. दुसरी चित्तरकथा आमच्या शेजारच्या मोरूची. रायबा मोरूच्याच वयाचा. थोडा मोठाही असेल. मोरू हुषार म्हणून त्यांस मुंबईस शिकायला ठेवलंन त्याच्या बापसानं. सुट्टी लागली की यायचा परत कोकणात आंबे, फणस खायला. गावातल्या मुलांसमोर मुंबईच्या गमतीजमती सांगायचा. तिकडे गेला आणि संस्कार विसरला. पूर्वी आला की पाया पडणारा तो आताशा आला की हेलो की फेलो असलं काहीतरी मातीमसणं म्हणायचा. पुढं एकदम इन्स्पेक्टर झाल्याची बातमी आली! वा! बापसाचंच काय आमच्या गावाचंही अगदी नाव काढलंनीत हो! रायबाच्याच वयाचा तो. रायबाचं लग्न काढलं असं ऐकलंन आणि स्वत:ही लग्नास उभा राहिला. म्हणे माझंही व्हायला हवं. रायबापेक्षा मी शिकलेला, इन्स्पेक्टर, मलाच चांगली स्थळं येणार. नोकरी सोडून देऊन परत गावास आला. म्हणाला इथे राहिलो तर स्थळे नक्की येतील. मी म्हणाले,"अरे, मुलींचे बाप नोकरीकडे पाहून स्थळ आणतात. मग तू नोकरी सोडण्याचे नष्टचर्य कसे केलेस? चांगला इन्स्पेक्टर ना रे होतास?"
तशी मला म्हणतो,"काकू, अगो तू चिंताच करू नकोस. नुसते माझ्याकडे पाहून स्थळे येतील हो!"
पण प्रत्यक्षात जेव्हा आमच्या रायबास स्थळं आली आणि यांस एकही नाही तेव्हा जे काही तारांगण घातलंन की यंव रे यंव. जी जी म्हणून स्थळे होती त्यांच्या घरासमोर जाऊन उपोषण काय केलेन, धरणे काय धरलेन. एका बापाने तर याच्या थोबाडीतसुद्धा मारलंन! या सर्वाचा मोरूस उपयोग काही झाला नाही पण सगळ्या गावास फुकट नाटक तेवढे पहावयास मिळाले हो! गांवात झारापकर आणि मंडळी दशावताराचा संच घेऊन आलेली, याचा हा शंकासुराचा पार्ट पाहून थक्क झाली. आमचासुध्दा शंकासूर असा नाही होत हो अशी कबुलीसुध्दा दिलंनीत. पुढे साखरपुडयात कोणीशीक म्हणालासुध्दा मला,"अगे आते, कसला इन्स्पेक्टर हा? मी मुंबईस गेलो होतो तर कळले, सॅनिटरी इन्स्पेक्टर हो हा! समस्त मुम्बयकरांच्या शौचकूपांचे इनिसपेक्शन करीत असतो."

तर सांगायचं एवढंच की सतरा विघ्ने आली पण, शेवटी साखरपुडा झाला हो! आता २६ मे ला शुभमंगल झालं की मी तीर्थाटनास जायला मोकळी! आणि सुदैवाने नानापण तयार झाले. म्हणजे त्यांच्या नव्हे, रायबाच्या लग्नाला!

(आगामी  'बिघडवली' या कादंबरीतील एक प्रकर्ण - संपादक)

Wednesday, May 21, 2014

आजोबांचा संताप

गेले काही दिवस आजोबांची मन:स्थिती ठीक नाही. जरा घुश्यातच आहे स्वारी. आज सकाळी पूजा करतानासुद्धा देवालाच दम दिल्यासारखे मंत्र म्हणत होते. मी बागेतून फुलं तोडली आणि परडी नेऊन दिली तर माझ्यावरच भडकले. 'हे काय? एकपण लाल फूल नाही? गजाननाला लाल फूल लागते असे किती वेळा सांगायचे? तुम्ही सगळे एक नंबरचे कामचुकार झाला आहात. आणि ह्या दूर्वा आहेत की काँग्रेस गवत उपटून आणलंयस? जरा निवडून आणायला काय होतं? आणि लगेच उंडारायला जाऊ नका. इथे बसा आणि गंध उगाळून द्या.' नाईलाजाने बसलो. मला गंध उगाळायला लागलं की झोप येते. उकिडवं बसून सहाणेवर चंदनाचं खोड गोल गोल फिरवताना, शेजारी आजोबांच्या खर्जातील आवाजात मंत्र ऐकताना एक प्रकारची गुंगी यायची. मागे एकदा असंच गंध उगाळताना डुलकी लागली आणि खोड सहाणेवरून निसटलं आणि मी पुढे पडलो ते थेट फुलांच्या परडीवर. आजोबा असे भडकले. केवळ मंत्र म्हणत होते म्हणून त्यांच्या तोंडून 'भ'काराची बाराखडी निघाली नाही. पण जे शब्दात व्यक्त करता आले नाही ते हावभाव आणि हातवारे यांनी पुरेपूर व्यक्त केले. तोंडात मंत्र आणि हातवाऱ्यांत व्यक्त झालेले तंत्र या सर्वांमुळे आजोबा फारच विनोदी दिसत होते. मी ख्याक करून हसलो. मग मात्र त्यांच्या संतापाला पारावार उरला नाही. त्यांनी मला फेकून मारण्यासाठी हाती काय येते ते पाहिले. संतापात मनुष्य नीट विचार करू शकत नाही असे ते नेहेमी सांगायचे. त्याचे प्रात्यक्षिक आता त्यांनीच करून दाखवले. त्यांच्या हाताला प्रथम फुलाची परडी लागली. मग त्यातील एक फूल घेऊन त्यांनी माझ्या दिशेने फेकले. आता खरं तर मी गप्प बसायला हवं होतं. पण मीही त्यांचाच नातू. अंगात खेळ फार. मी ते फूल उचलले आणि कोकणातले जुने बाले लोक लावतात तसे कानावर ठेवले आणि श्रीविष्णूप्रमाणे एक हात वर करून आशीर्वादाची पोझ घेतली.

हल्ली आजोबा असे का चिडतात गं? असे मी आईला विचारले पण होते. पूर्वी कसे छान होते. हापिसातून आले की माझ्या हातावर बदाम किंवा काजू ठेवायचे. परसात जाऊन हात पाय धुवून येईतोवर आजीने चांदीच्या पेल्यात उष्ण दूध काढून ठेवलेले असायचे. मग झोपाळ्यावर बसून ते संथपणे त्याचे घुटके घेत राहायचे. मला झोपाळ्यावर शेजारी बसवून घेत आणि अधून मधून शाळेतलं वगैरे काहीबाही विचारत राहत. आजोबा, आजी, काका, काकू, आत्या, आई, बाबा, भावंडं असं भरलेलं घर होतं ते. आजोबांचा दरारा होता, त्यांना मान होता. ते आले की सुना एकदम सावरून बसत. मोठ्या आवाजात बोलत असल्यातर एकदम शांतता पसरे. फक्त आजी त्यांच्याशी बोले, काही हवंनको बघे. असं असलं तरी आजोबांचं सगळीकडे लक्ष असे. कुणाला काही हवं असल्यास त्याची मागणी पुरवली जाई. जेवायला पानं वाढली की आजोबा येऊन बसल्याशिवाय पंगत सुरु होत नसे. स्वत:हून काही बोलत नसत. मग सणासुदीला आजीच विचारे,'ठिक्क झालंय का सगळं?' मग आजोबा माझ्याकडे मिष्कीलपणे पहायचे आणि म्हणायचे,'श्रीरामा! उत्तम झालंय रे सगळं!' मग एकदम सर्व बोलायला लागायचे, पदार्थ कसे झाले आहेत त्यावर चर्चा व्हायची.  सणासुदीला सर्वांना नवीन कपडे शिवले जात. आजीला, आत्याला, सुनांना नवीन लुगडी व्हायची, क्वचित प्रसंगोपात एखादा दागिनाही व्हायचा. काका आणि बाबा आजोबांच्या शब्दाबाहेर नसत. पगार झाला की तो आजोबांच्या स्वाधीन होई. घरचा संपूर्ण खर्च आजोबा करत. तुमचे पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत अशी आजोबांची त्यांना सूचना होती. ते पैसे ते काका आणि बाबांच्या नावाने गुंतवत. एकदा काकाने हळूच काकूसाठी काहीतरी हवे होते म्हणून त्याच्या पगारातील पैसे वापरू का असे विचारले होते. त्यावर आजोबांनी तिला काय हवंय ते आजीला सांगून आणवण्यास सांगितले होते. असे सर्व असले तरी आजोबा हा एक प्रचंड वृक्ष होता. त्याच्या छायेत सर्व निश्चिंतपणे राहात होते. मी तो काळ घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करायचो.

पुढे आजोबा रिटायर झाले. त्यांच्या ऑफिसमध्ये छानसा निरोपाचा कार्यक्रम झाला. बाबांनी मला नेलं होतं त्या कार्यक्रमाला. आजोबांनी छोटेसे भाषणही केले होते. आता वानप्रस्थाश्रमाची सुरुवात झाली, जरी मी नेहमी इथे येणार नसलो तरी मनानं मी तुम्हां सर्वांचा आहे. कधीही कुणीही कसलीही चिंता घेऊन माझ्याकडे या, मी माझ्या परीने तिचं निवारण करायचा प्रयत्न करीन, आता नवीन पिढीनं त्यांचा जोम घेऊन पुढे यावं वगैरे असं काहीसं प्रसंगाला साजेसं बोलले होते. त्यांनी अनेक उद्योगांत स्वत:ला गुंतवलं. ते उत्तम लेखन करीत. दासबोध, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. घरातील दिनचर्या तशीच राहिली. सर्व निर्णय ते स्वत:च घेत. यथावकाश बाबा, काका त्यांच्या त्यांच्या नोकरीव्यवसायात चांगलेच गुंतले. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. बाबांचा व्यवसाय प्रचंड वाढला होता. भरभराट होत होती. मीही आता कॉलेजात जाऊ लागलो होतो. हाताखाली ठेवलेली माणसं घरी कामं घेऊन येत. बाबांना भेटायला आलेली माणसं वडीलधारी माणूस म्हणून आजोबांशी आदरानं बोलत. पण त्यांचं काम बाबांकडेच असे. आजोबांना त्याचं वैषम्य वाटतं असं मला उगीच वाटे. मी तसं आईला बोलून दाखवलं तर उगाच काहीतरी सांगू नकोस म्हणून तिनं मलाच झापलं होतं. पण फरक पडला होता नक्की. पैशाचे व्यवहार आता बाबा पाहत होते. घरातलं सर्व हवं नको बघत होते. पण कुठलाही महत्वाचा व्यवहार आजोबांना सांगितल्याशिवाय करत नव्हते. त्यांचा योग्य तो मान ते अगदी कटाक्षानं ठेवत होते.  पण आजोबा मनातून समाधानी नव्हते असं वाटायचं. बाबांना त्यांच्या धावपळीतून लक्षात आलं नसावं. पुढे बाबांच्या मेहनतीला यश आलं. शंभर एकर जमिनीवर प्रचंड कारखाना उभा राहणार होता. नुसताच नफेखोरीचा कारखाना नव्हता तो. त्यातून एक सामाजिक जाणीवपण दिसत होती. परिसरातील कच्चा माल आता इथेच खपणार होता, शेतकऱ्यांचा त्यात फायदाच होता. नवीन रोजगार उपलब्ध होणार होते. सर्व क्षेत्रांतून बाबांचं कौतुक होत होतं.

बाबांनी घरातील सर्वांना आजोबांच्या खोलीत बोलावून घेतलं. प्रथम आजोबांच्या पायाला स्पर्श केला आणि आपला नवीन कारखाना सुरु होतोय, तुमचा आशीर्वाद हवा असं सांगितलं. त्यावर आजोबांनी जरा तिरसटपणे,'तुम्ही आता मोठे झालात, स्वत:च्या कर्तृत्वावर कारखाना काढता आहात, आमच्या आशीर्वादाची काय गरज? माळावर बोंबलायला पाटलाच्या परवानगीची गरज नसते.' असे उद्गार काढले. सर्वजण एकदम स्तब्ध झाले. बाबा तर सर्दच झाले. ते कसेबसे म्हणाले,'अण्णा, काय बोलताय तुम्ही? हे माझं एकटयाचं कर्तृत्व नाही! या कारखान्याची पायाभरणी अनेक वर्षांपूर्वीच झाली होती, ज्यावेळी तुम्ही या कुटुंबाचा पाया रचलात. जिथे सर्वत्र उजाड जमीन होती, कसलंही पीक घेता येत नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही एक स्वप्न पाहिलंत. अंगचा घाम गाळून तिथवर जाण्यासाठी रस्ता तयार केलात. आम्ही लहान होतो, पण त्या स्वप्नाची रोपणी आमच्या मनात तुम्हीच केलीत. मुरमाड जमिनीतून काही निघू शकतं याचा विश्वास तुम्हीच दिलात अण्णा! त्या विश्वासाच्या आधारावर मी इथवर येऊन पोचलो. हा रथ तुम्ही इथवर ओढत आणलात, तो पुढे नेणं हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य नाही काय? मी जर तसं केलं नाही तर तुमचं आजवरचं कार्य वाया जाणार नाही काय? कार्य वाया जाईलच पण मलासुद्धा माझं आयुष्य वाया गेलं असंच वाटेल. प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीच्या एक पाऊल पुढे जाणे हे आधीच्या पिढीचे सार्थक, त्या पिढीचे कर्तव्य आणि नंतरच्या पिढीचा पाया नाही काय? दीपस्तंभाकडे एक नजर लावूनच एखादा आपले जहाज समोरील अंधारात टाकू शकतो. चुकल्यास परत येताना तो दीपस्तंभ मार्ग दाखवील असा विश्वास असणे किती गरजेचे आहे. अण्णा, तुमचं केवळ असणं हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे! तेव्हा अण्णा, कृपया असं जिव्हारी लागेल असं बोलू नका. या कार्याला पुढे तर जावंच लागेल, अनेकांची आयुष्यं त्यावर अवलंबून आहेत. पण त्या कार्याला त्याचे जनक म्हणून जर आशीर्वाद दिलात तर आम्हाला हजार हत्तींचं बळ येईल.' एवढं बोलून बाबा थांबले. त्यांचे डोळे भरून बनून आले होते. सर्वांचेच डोळे भरून आले. आजोबांचा चेहरा बदलला होता. तो मृदू झाला होता, डोळे भरून आले होते. ते म्हणाले,'बाळा, खरंच मोठा झालास रे तू. पुरुषाला त्याचं काम हे पुरुषार्थाचं असतं. पण ते काम त्याचा अहंकार होऊन जातं. त्यावर आपला मालकीहक्क वाटू लागतो. त्याला दुसऱ्या कुणी हात लावला की आपली मालकी आता संपली, आपण अडगळीत पडलेली एखादी वस्तू झालो असं वाटायला लागतं. मग ज्या उद्देशानं ते काम आपण सुरु केलं होतं तो उद्देश बाजूला पडून केवळ अहंकार जपणं चालू होतं. पण बरोबर बोललास. डोळ्यांत कुणीतरी अंजन घालायलाच हवं होतं. पूर्वजांनी उगीच नाही आश्रमव्यवस्था ठरवून ठेवली. योग्य वेळी तरुण पिढीकडे वसा देऊन आपण आशीर्वाद देणे हाच तर वानप्रस्थाश्रम. मी नुसतंच भाषणात बोलायचो. पण आता अर्थ कळतोय. यशस्वी भव!'  आजोबांनी बाबांना जवळ घेतलं आणि मस्तकावर हात ठेवला. मी ते दृश्य मनात साठवून ठेवलंय.



Tuesday, May 20, 2014

कककककक कमल!

कहने की हो दिल में कोई बात, मुझसे कहो
कोई मुश्किल कोई परेशानी आये
तुम्हे लगे कुछ ठीक नही हालात, मुझसे कहो
कोई हो तम्मना कोई हो आरजू
रहना कभी ना बेकरार, मैं हूँ ना…

ओहहह… आहह… क क क क्क क्कमल… बंद करो ये गाना. आज मैं बेवडादास के रोल में हूँ. बहुत पीनी हैं. आज तक हमेशा कुछ ना कुछ छोडने के गम में पीता आया हूँ. बाबूजीने कहा गांव छोड दो. सबने कहा पारो को छोड दो. पारोने कहा शराब छोड दो. बीवीने कहा ये हवेली छोड दो. आज पूरा देश कह रहा है देश छोड दो. एक दिन आयेगा वो कहेंगे दुनियाही छोड दो. आय डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन.

मैं चिल्ला चिल्लाकर दुनिया को बता दूंगा, वो ट्विट मेरा नही था! हां माना कि बाकी सब ६-७हजार मेरे हैं, लेकिन ये! ये एक ट्विट मेरा नही था पारो! मेरा नही था! हाथ में डीएसपी है, झूठ नही कहुंगा. कमसे कम मुझे तो याद नही है. ये याददाश्त भी कितनी अजीब चीज होती है. किसी चीज को जिंदगीभर भूलनेकी कोशिश करो, भूलती नही. और किसी चीज को याद करने की लाख कोशिश करो, तो याद आती नही. आय लव यू ककककक क कमल!

जब से वानखेडे स्टेडिअम पर मेरा सेक्युरिटी के साथ पंगा हुआ तब ये देश मुझे बेगाना कर गया पारो. क्या नही दिया इस देश को मैने. बरसो पेहले ये राजू जंटलमन बनने बंबई आया. जंटलमन बनने की लाख कोशिश की लेकिन हाय, कम्बख्त लोगोंने बनने नही दिया. मैने ना बोलने के बावजूद इतना पैसा दे दिया मुझे. सिर्फ पैसा होता तो ठीक, लेकिन सुपरस्टारभी बना दिया. मेरा हकलाना, मेरा वो हाथ फैलाकर गाने गाना ये लेडीज लोगोंको बहुत रोमांटिक लगा. लेकिन पैसे के उपर भी कुछ होता है. कुछ काम ऐसे होते है जिनमें फायदा या नुकसान नही देखा जाता, बस उन्हे करना जरुरी होता है. क्या मेरी इतनीही गलती थी के मुझे पाकिस्तानसे लगाव है? मेरा मेरे भाईयोंसे लगाव क्या गलत है? मैं आजभी उनसे उतनीही मोहोब्बत करता हूँ , इसलिये नही की हिंदुस्थानमें भाई नही मिलते, बल्कि इसलिये की उन भाईयोंके मोहोब्बतमेंसे फुरसतही नही मिलती.

तेवा माजा भाय लोग, मी एकदम मराटीमदे बोलतो, अरे आपण असा कायपण बोलला नाय रे! अरे मी एकदम हिंदुस्तानी हाय, माज्या बायडीचा नावपन गौरी ठेवला आपण. इथून घालवला तर मी कुटे जाईल? अरे थिते वाट लागून राहिली, दाऊदभायपण सटकला असा काल कळला. म्हंजे आपला तसा काय काँटॅक्ट नाय, पन असाच इकडून तिकडून बातमी येतो ना.  तेवा मायबाप मापी करा मी असला कायच बोलला नाय. आपण अजून शेण्टपर्शेण्ट हिंदुस्तानी हाय. आपन हिते जलमला, आपला जनाजापन हितेच निघेल. एक शिक्रेट गोष्ट बोलतो म्हंजे तुमाला विश्वास राहील. अरे आपन आपला वोट पन मोदीभाईला देला! हे बग, अजून बोटाचा शाईपण वाळला नाय.  जै महाराष्ट्र! जै शिवाजी! जै हिंदुस्तान! जै कमळ! जै गुलाब! अरे माज्या भावा, नाय नाय, शेवटला मी असाच बोलला, गुलाबचा फूल आपल्याला लई आवडते ना, म्हणून.

पारो… हां चले गये सब. आपला अॅक्टिंगच हायक्लास. मेरे चुटकीभर शरम की कीमत ये लोग क्या जाने. कभी कभी जीतने के लिये कुछ हारना भी पडता है. और हारकर जीतनेवालेको बाजीगर कहते है.

Monday, May 19, 2014

वडयाचे तेल वांग्यावर

नेहमी वर्दळ असणारा काळाकुंज बंगला सुनासुना वाटत होता. इंद्रवदन उर्फ काळापहाड त्यांचा आवडता काळा चष्मा परिधान करून त्यांच्या आवडत्या खुर्चीत बसून आवडत्या भिंतीकडे टक लावून बसले होते. जेव्हा जेव्हा एखादी कठीण केस येई तेव्हा ते असेच विचारमग्न बसून राहत. आजही ते एक गहन केस घेऊन बसले होते. पण चिंता केस सुटण्याची नव्हती तर भलत्याच प्रकारे सुटल्याची होती. मधून मधून ते शेजारील स्टुलावर ठेवलेल्या फोनकडे नजर टाकीत आणि आशेने वाट पहात. जणू काही तो आता वाजणारच आहे. मग पुन्हा एक नि:श्वास टाकीत नजर भिंतीवर लावत. गेले काही दिवस त्यांनी दाढीही केली नव्हती. गेले काही दिवस झोप न मिळाल्याने डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येउन काळापहाड हे नाव वेगळ्याच प्रकारे सार्थ करीत होती.

दोन दिवसांपूर्वी थोरल्या वाड्यातून दूत मिठाई घेऊन आला तेव्हापासून इंद्रवदन सरकारांचे वदन कडूझार झाले होते. आपण एवढा तेलकट वड्यांचा रहस्यभेद केला आणि प्रत्यक्ष तेलाने माखलेल्या पुड्यासहित वडे पुरावा म्हणून सादर केले. पण ज्युरीतील सभ्य गृहस्थांनी निर्विकारपणे डोळे मिटून मिटक्या मारीत वडे खाऊन तेलकट कागद पुन्हा आपल्याच हातात ठेवला. शंभूराजे तर सुटलेच वरती आपण पाठवलेला कुक्कुटकाढा परस्पर पिऊन पिऊन धनाजीराव मात्र गुटगुटीत झाले. पुन्हा सरकारांच्या मुदपाकात ढवळाढवळ केली म्हणून आपले चांगलेच वांगेभरीत झाले. नकोच हा गुप्तहेरगिरीचा छंद असे त्यांना वाटू लागले. छोटू कधी शेजारी येऊन अदबीने उभा राहिला ते त्यांना कळलं नाही.

नि:श्वास सोडून राजे कडूवदन होत्साते म्हणाले,'बोल छोटू, आता काय आणि?'
'राजे, बातमी वाईट तर आहेच, आपण सकाळची आपली ब्लडप्रेशरची गोळी घेतलीत का?'
'होय रे माझ्या विश्वासू हेरा. ते पहा टेबलावर. गौरीची आरास मांडावी तशा पित्त, ब्लडप्रेशर, पोटशूळ, मस्तकशूळ, निद्रानाश यावरील गोळ्या कशा मांडून ठेवल्या आहेत राणीसरकारांनी. त्यांना ही मजाच वाटते आहे. डिप्रेशनवरील गोळ्यापण मागवून ठेवा म्हणत होत्या. आराशीला बरे पडेल म्हणे.'
'राजे, दगडांची गोदामं भरलेली आहेत. आवक आहे पण जावक अजिबात नाही. अशानं खजिना रिता व्हायला वेळ लागणार नाही. लवकरच खट्याक मोहीम काढली नाही तर शिलेदारांना दाणापाणी करायला पगार होणार नाही.'
राजे म्लानवदन होऊन म्हणाले,'छोटू, आता कसले खळ्ळ आणि कसले खट्याक. आता आम्ही त्या दगडांची रास लावून लगोरी खेळत बसणार. लगोरी! तिकडे शंभूराजे रास गरबा खेळणार, आम्ही इथे रास लगोरी!'
राजे भेसूर आवाजात गाऊ लागले,'मैं तो रंगियो हतो एनो दिलडानो संग, मारा साह्यबानी पाघडियो लाग्यो कोई दूजो रंग.'
छोटू भेदरला. त्याने राजांच्या डोळ्यात काही विचित्र झांक दिसते का ते पहायचा प्रयत्न केला. पण राजांनी काळा चष्मा परिधान केला असल्यामुळे त्याला काही अंदाज लागला नाही.
राजे अचानक क्रुद्धवदन होऊन म्हणाले,'छोटू! ते पहा! लोक बटाटेवडा खात आमच्यादिशेने पाहून हसत आहेत! त्यांची ही मजाल? कोण आहे रे तिकडे? आमचा हंटर घेऊन या. चामडीच लोळवतो एकेकाची. इंद्रवदन ठोकरे म्हणतात आम्हाला!'
'राजे शांत व्हा!'
'आं? छोटू आम्हांस भास वगैरे होऊ लागले आहेत की काय?'
'नाही राजे. ती वाईट बातमी म्हणालो ती हीच. काल कुणी वात्रटाने आपल्या वाड्यावर लावलेल्या 'ठोकरे वाडा'च्या पाटीचं 'ठोकरे वडा' केलं आहे. आणि समोर स्वत:ची बटाटावडयाची गाडीपण लावली आहे.'
राजे दीनवदन होऊन म्हणाले,'आपल्याला भास होत नाहीत याचा आनंद मानायचा की शंभूराजांच्या या थट्टेचा शोक करायचा? अरे विनोद! केवळ विनोद केला होता आम्ही!! त्याची एवढी सजा? आज आबासाहेब असते तर…'
छोटू मध्येच म्हणाला,'होय राजे, आबासाहेबांनी आपल्याला मायेनं जवळ घेऊन समजावलं असतं.'
राजे खिन्नवदन होऊन म्हणाले,'नाही छोट्या, दुसऱ्या पात्राला आपलं वाक्य पुरं न करू द्यायची तुझी मराठी रंगमंचावरील सवय अजून गेली नाही. आम्ही म्हणत होतो, आज आबासाहेब असते तर आमच्या दोन थोतरीत लावून आम्हाला समजावलं असतं. आणि तेच आम्हाला समजलं असतं.'
छोटू खाली मान घालून म्हणाला,'मग राजे आता या सेवकास काय आज्ञा आहे?'
राजे शोकवदन होत्साते म्हणाले,'गेले दोन दिवस आम्ही 'तो' फोन येईल म्हणून येथेच फोनशेजारी बसून आहोत. बहिर्दिशेलासुद्धा गेलो नाही, न जाणो सुरवार घसरायला आणि घंटी वाजायला एकच गाठ पडायची. कानास जानवे, घोट्यात पडलेली सुरवार अशा अवतारात धावत येणे जमणार नाही. तेव्हा तू येथे फोनच्या राखणीला बस, आम्ही जरा मोकळे होऊन येतो.'

Sunday, May 18, 2014

औषधे, मॉडेल्स आणि जिंगल्स

श्रीश्री अरविंदोस्वामी - व्हिक्स, आयोडेक्स,झंडू बाम, अमृतांजन
निघता कानशिलावर बार, मस्तकी झणी शूळभार
लावा आयोडेक्स, क्षणात पुढील थपडीस तयार

अण्णा हजारे - वैद्य पाटणकर काढा
नको लिंबू नको सोडा
जळजळ थांबवी वैद्य पाटणकर काढा

एन डी तिवारी - अश्वगंधा
एकच जादू, सपाटून काम. होय, काम!

नमो - च्यवनप्राश
एकच जादू, झपाटून काम. होय, खरेखुरे काम!

म्याडम - झोल्पीडेम (अँबियन)
शांती, जो आपको आजतक नसीब नही थी

पप्पू - किट्टी छाप बँडएड
लपवा आपले ऊह! आह!! आणि आऊच!!!

सिब्बल - जमालगोटा
अपचन हारल्याचे भारी असह्य
करी जमालगोटा जरा सुसह्य

दिग्गुराजे - थर्टी प्लस
असेल जरी साठी आणि बुद्धीही नाठी,
तारेल नौका तुमची, ही डबल प्लस थर्टी

अब्दुल्ला - टम्स
अजीर्ण देतो हा काश्मिरी पुलाव,
लगाव टम्स और गॅसको भगाव

मायावती - हाथी छाप गजकर्ण मलम
नकोस खाजवू खरखरा,
हाथी छाप मलम हाच एक उतारा

उद्धटस्वामी - डिसप्रिन
भंगला सूर भंगली हृदये, रक्तदाब राज करी 
पाण्यापेक्षा रक्त दाट, डिसप्रिन त्यास मुक्त करी

उद्धवस्वामी - हवाबाण हरडे
खुशाल खा भजी वा तेलकट वडे,
नका सोडू हवेत बाण, जिभेवर नित्य हवाबाण हरडे

पवार 'धोरणवाले' - लक्स सौंदर्याचा साबण
इकडे धोरण तिकडे धरण
झाली धावपळ मुखचंद्र करुण
अशात सौंदर्य माझे टिकवितो
केवळ लक्सचा साबण

पवार 'धरणवाले' - हगीज्  (आता ८० किलोंवरच्या बालकांसाठीही उपलब्ध)
लागता नभास जोरदार कळ
तेथ न लज्जा न संक्षेप
कमरेस हगी तर होऊद्या खुशाल
धीमे धीमे वा टिप टिप.

(आम्ही सर्व प्रकारच्या उत्पादनांवर  जाहिराती, जिंगल्स बनवून देतो . संपर्क -'माल'विका आर्ट्स, पुणे, ३०)


Saturday, May 17, 2014

महानिर्वाण!

स्थळ - भूतपूर्व काँग्रेस कचेरी
वेळ - अर्थातच शोकाची
(पडदा उघडतो तेव्हा काही शुभ्र वसनांकित टोपीधारी, एक शुभ्र वस्त्रे धारण केलेला खुरटी दाढीधारी युवक, आणि दु:खाची पोझ घेऊन बसलेल्या मायलेकी, अर्थातच शुभ्र साडीधारी, असे खाली सतरंजीवर बसले आहेत. मायच्या चेहऱ्यावर दु:ख तर लेकीच्या चेहऱ्यावर भीती आहे. दाढीधारी युवकाच्या चेहऱ्यावर बालकाचे निर्व्याज खेळकर हास्य विलसते आहे. मधोमध सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने हाताचे चित्र काढले आहे त्यावर एक कणकेचा दिवा तेवतो आहे. भिंतीवर बाबा, पणजोबा, आजी यांचे हार घातलेले फोटो लावले आहेत. एक भारताचा नकाशाही लावला आहे. दाढीधारी युवक हातातील सेलफोनवर क्यांडीक्रश खेळतो आहे. आणखी एक वृद्ध दिग्विजयी युवक आयफोनवर कुणा बालिकेशी चोरून फेसटाईमवर दबक्या आवाजात बोलतो आहे. एक पगडीधारी सरदार निर्विकार चेहऱ्याने शून्यात पाहत आहे.)

दाढीधारी युवक (मूठ वळून हवेत फेकतो)-येस्स्स! ममा, ममा! बघ ना आय गेव्ह अ लाईफ! क्यान आय शेअर माय अचिव्हमेंट ऑन फेसबुक?
शुभ्र साडी (खिन्न मुद्रेने) - बाळा, तूच काय, आम्ही सर्वांनीच गमावलीत आमची आयुष्यं तुला पुढे आणण्याच्या हट्टापायी. आणि त्याचे झेंडे आम्हाला न विचारताच लागले फेसबुकवर. कर बाबा काय हवं ते शेअर.
लेक (चेहऱ्यावर भीतीयुक्त काळजी) - ममा, रॉबर्ट सारखा टेक्स्ट करतोय, किती दिवस लपून राहावं लागेल ते विचारतोय. काय सांगू ममा त्याला?
शुभ्र साडी - अगं, इथं माझंच तिकिट कधी निघेल याचा भरंवसा नाही, मी त्याचं कसं सांगू? सांग, म्हणावं पाचदहा वर्षं तोंड काळं कर.
लेक(हबकून) - काय? पाचदहा वर्षं?  आधीच महिना महिना घरी येत नाही तो.  कुठं मसणात जात असतो कुणास ठाऊक. आता मीच पाच दहा वर्षं जा म्हटलं तर त्याला काय गं, बरंच आहे. उड्या मारीत जाईल तो. स्वत:चं 'विल' पण करतो करतो म्हणत केलं नाहीये. उलट माझं मात्र त्याच्या नावावर करून घेतलंयन.
दाढीधारी युवक - दीदी, केजरीअंकलनी कसं खेरअंकलना ट्विटरवर ब्लॉक केलं तसं तू त्याला ब्लॉक कर ना. मग कसा टेक्स्ट करेल?
दिग्विजयी युवक - हां हां, जानू, बस एक दो घंटे में आ जाऊंगा. बस, अब इसमें रोनेवाली कौनसी बात हो गई? मैं बोल रहा हुं ना. बस चल अब बंद करता हुं, म्याडमजी देख रही है. (लाचार हसून) ही: ही: ही:! कुछ नही म्याडम, घरवाले ऐसेही परेशान कर रहे थे. फोन सायलेंट पर रखा है अब.
मिश्रा (तुपाळ चेहऱ्याने) - म्याडमजी, आप शोक ना करें. ये हाथ फिरसे उठेगा. (गडबडून) मेरा मतलब, गिरनेवाला फिरसे नयी ताकतसे उठ जाता है. अपने देश में लोग हाथ का उपयोग दो चीजोके लिये करते है. खाने के लिये या तो धोने के लिये. कमसे कम अपना हाथ दाया हाथ है, लोगोंने धोने के लिये तो इस्तेमाल नही किया ये बहुत पॉझिटिव्ह बात हुई ना?
शुभ्र साडी (किंचित हसून) - मिश्राजी, आप भूल गये. लोग हाथ का उपयोग एक और चीज के लिये भी करते हैं, थप्पड लगाने के लिये. केजरीवाल तो सस्ते में छूट गये, एक दो बारही पडी उन्हे. हम सब को ऐसी पडी है की हम गाल महसूस भी नही कर रहे हैं.

(इतक्यात एक साधारण नव्वदीचे गृहस्थ शक्य तेवढ्या लगबगीने प्रवेश करतात. हातात पुष्पगुच्छ आणि गुढघ्याला बाशिंग आहे. सर्व जण आ वासून बाशिंग पाहतात. शरमून ते गृहस्थ गडबडीने ते काढून टाकतात. पुष्पगुच्छ म्याडमना देऊ लागतात. सर्व जण पुन्हा अविश्वासाने आणि म्याडम लालबुंद होऊन त्यांच्याकडे पाहतात. पुन्हा भानावर येऊन ते गृहस्थ शरमतात आणि गुच्छ कोपऱ्यात ठेवून देतात.)

तिवारी - म्याडमजी, जैसेही पता चला हम दौडते चले आये. हमरी सादी बहुतही अचानक तय हो गई. आपको न्यौताभी नही भेज सके. बच्चोने बहुत जिद ली थी. अब बच्चे चालीस साल के हो गये फिर भी बच्चे ही है ना. हम ठहरे उनके बापू. उनकी जिद तो हमेही पूरी करनी है. लेकिन म्याडम आपके होते हुए और 'आप' के होते हुए ये सब कैसन हुआ? जैसनही पता चला, हम हनीमून जा रहे थे, वहीसे गाडी घुमाईके सीधा इहा पहुंच गये. हनीमून तो होता रही. अगर हम चले जाते और बाद में पता चलता तो पूरा हनीमूनमें, म्याडम, हम आपही को तनमनमें रख देते.
शुभ्र साडी (दुर्लक्ष करीत) - ठीक है तिवारीजी. आप सांस ले लिजिये. तंदुरुस्ती रखें. ऐसे और भी कई हनीमून आपको निभाने हैं.
पगडीधारी सरदार (एकदम खोल आवाजात) - लोकांना असं कां करावसं वाटलं याची जरा चर्चा करूया का?
दाढीधारी युवक (आश्चर्याने किंचाळत) - ममा!! अंकल बोलले! तू काय सांगितलं होतंस मग मला की ते लहानपणापासून मुके आहेत म्हणून? खोटं खोटं सगळं ना? आता मी तुझं कध्धीच ऐकणार नाही. तू नेहमी अस्संच करतेस. दीदीला काय करायचं सांगतेस, ते अंकल मुके म्हणून त्यांच्याऐवजी तूच भाषण करतेस, मला रात्री आठनंतर टीव्ही बघू देत नाहीस, जीजूंनी मात्र काही केलेलं चालतं. मागे एकदा त्यांना मारायला काही लोक आले होते तर मी खरंखरं सांगितलं, जीजू आत पलंगाखाली लपले आहेत म्हणून, तर तू मलाच रागावलीस. नेहमी खरं बोला असं मला शाळेत शिकवतात आणि घरी तू उलटं शिकवतेस. मी आता फक्त क्यांडी क्रश खेळणार जा!
शुभ्र साडी - तू चूप बस! आधीच डोकं उठलंय.
(एकदम गलका सुरु होतो)
सरदार - पण आपण चर्चा…
लेक - ममा सांग ना, रॉबर्टचं…
तिवारी -खामखां हनीमून…
दिग्विजयी युवक - हां हां, निकलही रहा हुं… म्याडम, जरा एक जरुरी कामसे…
मिश्रा - म्याडम, आरएसएस पे डाल दे इसकी जिम्मेदारी?
शुभ्र साडी - पगला गये क्या? ये आरएसएस की जीत है. काहे की जिम्मेदारी डाल रहे… राहुल! मेल्या उठ आधी आणि प्रथम अभ्यासाला लाग! आता निदान कॉलेज तरी पुरं करा!
(सरदार खिन्नपणे भारताच्या नकाशाकडे पाहत असताना पडदा पडतो)

Friday, May 16, 2014

प्रतिक्रिया, प्रतिक्रिया!

छगन - प्रतिक्रिया कसली घेता? आं? इथे काय कुणी नागवं नाचतं आहे का? निघा इथून!
नारू राणे - आवशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
निळू राणे - बापाशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
नितु राणे - भैनीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
विश्वजित कदम - हा आमच्या सॉफ्टवेअर टीमचा पराभव आहे. व्होटिंग मशिन्स फॉंल्टी निघाली, आमचा प्रोग्राम चाललाच नाही. जेव्हा माझ्या नावासमोरचं बटण दाबलं गेलं तेव्हा दोन मतं शिरोळेंना मिळत होती.
जाणता राजा - हे भाकीत आम्ही केव्हाच केले होते. तेव्हापासून आम्ही कॉंग्रेसची कास सोडून मोदीचा कासोटा धरला होता तो काय उगाच? शिवाय आमचं सुप्रिया, आपलं, महिला धोरण..
दादा(गिरी) पवार - मग? आमी काय करायचं त्याला? तुम्ही कुणाला 'उचलू' देणार नाही, आमाला धरणाच्या दिशेनं जाऊ देणार नाही, मग आता आमचा करंगळी कार्यक्रम आमी काय व्होटिंग बूथवर जाऊन करायचा का?
दिगू - आं? काय म्हणता? कधी? असं? च्यायला! अरेरे! ओ! येस, कमिंग अमृता डीअर! सॉरी हं, मी जरा घाईत आहे. अहो म्हणजे बाहेर जायच्या घाईत! तुम्ही पत्रकार म्हणजे…
केजरू - हो हो, ते सर्व ठीक आहे. पण अरे मला शून्यापेक्षा जास्त मतं मिळाली रे, ते तरी म्हणा.
एन डी तिवारी - मरुदे! सध्या मी दुसऱ्याच चिंतेत आहे. बायकोनं हनीमूनला जायचा बूट काढला आहे. मी म्हणतो मी काय करणार जाऊन? तिला म्हणालो आहे केसरी ट्रॅव्हल्सच्या टूरबरोबर तूच जाऊन ये.
पप्पू - इट्स ओके! रीपीटर तर रीपीटर. मी नेहेमीच ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा देत आलो आहे. त्यावेळी सगळे गणंगच असतात.
प्रियांका - सॉरी अंकल! तुम्ही खरंच मला वडिलांच्या ठिकाणी आहात. रॉबर्ट तर कित्ती कित्ती मानतो तुम्हाला! आज सकाळपासून तुमच्या फोटोसमोर हात जोडून उभा आहे. जावई ना तुमचा तो? प्लीज प्लीज ही प्रतिक्रिया टीव्हीवर दाखवा हो.
ममता - अहो, आत घेणार नाही असं कुठे म्हटलं होतं मी? मी म्हटलं होतं यायच्या आधी जरा सांगा, म्हणजे जरा झाडलोट करून ठेवता येईल. बरं ते काही माछबिछ खात नाहीत, निदान चमचम बनवायला दूध नासवण्या-आपलं-फाडण्यासाठी तरी वेळ मिळायला हवा ना?
मौनमोहन - म्याडम नाहीयेत म्हणून सांगतो, सतरा ठिकाणी ठिगळं लावलेली प्यांट घालायची म्हणजे कठीण असतं हो. चालण्यापेक्षा नको तिथे फाटत तर नाही ना हे बघण्यातच जास्त वेळ जातो. शुभेच्छा!
म्याडम - राहुल! घर चलो! कितनी बार कहा है पढाई पे ध्यान दिया करो. नाऊ यू आर गोइंग टू गेट अ टाईमआऊट. टीव्ही नही, एक्स बॉक्स नही कुछ नही. हां भई. क्या रिएक्शन? हमने एक्शन किया लोगोंने हमे रिएक्शन दिया.
लालकृष्ण - हुशार आहे हो तो! वादच नाही. पण आम्ही म्हणतो वडिलधाऱ्या माणसांना निदान नमस्कार तरी करा! केव्हापासून बूट काढून बसलो आहे. पावले थंड पडतात आमची.
सुषमा - हं! रात्र रात्र बसून आम्ही सबमिशन्स करायची यांची आणि वर हे पहिले आले की अभिनंदनाला पण जायचे. आमचंच नशीब! बरं, अभिनंदन आणि काय…
उद्धवस्वामी - येस्स! आता आमची इच्छा पूर्ण होणार. मोठ्या हौसेने आम्ही पूर्ण भगवा ड्रेस शिवून घेतला होता, चड्डी बनियन पण भगवी. आता आम्हाला तो घालायला मिळणार.  आणि बरं का, 'तो' फोन आम्ही स्वत: लावणार आहोत आता.
उद्धटस्वामी - प्रतिक्रिया घ्यायला आलात हे खरंच तुमचं धाडस आहे. आं? क्यामेरा दगडप्रूफ आहे? अस्सं काय? ठीक आहे मग. आता अभिनंदन. पुढील काही दिवस दगडप्रूफ प्यांटशर्टपण घालून फिरा.
अम्मा - अमने पैलेही बोला ता, अमारा भाई जितेगा. हां, तब मनमें बोला ता, लेकीन अब खुला बोलती हुं, अब की बार मोदी सरकार. अमारा सपोर्ट नई लिया तो क्या, दोसाई काने को कबीबी आ जाव!
मोदी - धन्यवाद! सरकार चालवायचं नाही, तर राष्ट्र चालवायचं आहे! तुम्ही इथे उभे का? आता कुणी कामचुकारपणा करताना दिसला तर फटके देऊ! चला निघा इथून!
जनता - नमो! नमो!
आम्ही - गड आला पण 'आम'चा शिंव्ह गेला. केजरूस्वामी पडले याचे दु:ख होते आहे. विनोदाचा मोठाच स्त्रोत आटला.

तख्त दिल्लीचे!

दिल्लीपरेंत धडक मारोन अहमदशहा अब्दालीचे तख्त फोडण्यासाठी येवढी खास तैयारी करोन बैसलो होतो.  आमचा विजय निश्चित होता. अठरापगड जातीचे बाजारबुणगे, दहा हजाराचे पायदळ, बैल, खेचर, तोपखाना, त्यावरील गोलंदाज, खास आम्ही तयार करवून घेतलेली तीरकमठाधारी पथके, आमच्या सेनापतींसाठी पंचलक्षणी अश्व, आमच्यासाठी अंबारी धारण केलेला हत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुसज्ज आणि संपूर्ण असा मुदपाकखाना, आचारी, पाणके. आम्हांस दोनप्रहरीच्या भोजनानंतर गुजरदेशीचे पेय लागते. सध्याचे टारगट टवाळखोर त्यास गुज्जू बीयर म्हणतात. आम्हांस ते फारसे कळत नाही, पण आमच्या मते गुजरलस्सी हे समग्र पृथ्वीतलावरील पाचक, मेंदू थंड ठेवणारे आणि आम्लपित्त शमवणारे एक अप्रतिम पेय आहे. कोणत्याही मोहिमेवर गेलो तरी आम्ही या पेयाचे कुंभच्या कुंभ खेचरावर लादून नेतो. नुसत्या त्याच्या वाहनाने खेचरसुद्धा थंड होते तर आमची काय अवस्था वर्णावी. तर अशी जय्यत तयारी करोन शीघ्रगतीने मार्गक्रमण करून दिल्लीस निघालो होतो. गंगामैयाचे दर्शन घ्यावे या हेतु वाराणशीस मुक्काम पडला.

स्नान, दर्शन इत्यादी घेऊन झाल्यावर फारसे काही करण्यासारखे नव्हते. कंटाळोन गुजरी बियरचा गिलास हातात घेऊन झाडाखाली बसलो होतो. माहूत नवीन अंकुश आणायला गेला असावा. तेवढ्यात दुरून गाण्यासारखे 'बापू बोलता है' असे शब्द ऐकू आले. पाहतो तर दिगंबर जैनांची एक टोळी 'मुक्त'पणे भ्रमण करीत दिल्लीच्या दिशेने चालली होती. आमची नजर मोठ्या प्रयासाने उत्तमांगावर ठेवून आम्ही त्यांचे नाव पुसले. प्रमुख स्वामींचे नाम केजरीबापू असे कळले.दिल्लीत मोठे अराजक माजले असून त्यावर हल्ला बोलण्यासाठी आम्ही जात आहोत असे मी त्यांस सांगितले आणि जोवर परिस्थिती ठीक होत नाही तोवर स्वामींनी जाऊ नये अशी नम्र सूचना केली. त्यावर स्वामी हसले. मोरपिसाचा पंखा आमच्या मुखासमोर चवरी ढाळल्याप्रमाणे हलवून म्हणाले,'वत्सा, आम्ही दिगंबर! सर्वत्वाचा त्याग केलेले! अब्दाली आमचे काय आणखी फेडणार? नंगे से खुदा भी डरता है! उलट आम्हांस पाहून त्यालाच (म्हंजे अब्दालीला) दोन दिवस जेवणे कठीण होईल.'  आम्ही श्वास रोखून धरून आमच्या प्राणाचे रक्षण केले. सुदैवाने स्वामींनी चवरी ढाळणे थांबवले आणि पंखा पुन:श्च लज्जारक्षणार्थ समोर धरला. तेव्हा आमचीच लज्जा राखली गेली असे आम्हांस वाटले. स्वामी पूर्वी मोरपिसाच्या पंख्याऐवजी खराटा वापरीत असत. खराटा अवघड जागी टोचतो, त्यापेक्षा मोरपीस बरे पडते असे शिष्यांचे म्हणणे पडले आणि स्वामींनीही मग त्यास परवानगी दिली असे समजले. स्वामी सर्वसंगपरित्याग करून मुक्त, त्यांस कसलेही दडपण वा लज्जा असत नाही. आम्ही स्वामींस फलाहार करून जाण्याची गळ घातली. प्रन्तु स्वामींनी त्यास नकार दिला. आम्ही पुन: त्यांस वंदन केले आणि स्वामी जावयास निघाले. जाता जाता त्यांच्या शिष्यांनी मात्र तबकातील सर्व फळे स्वामींच्या नकळत हळूच झोळीत भरली. एकाने तर हसत आम्हांस डोळा मारला आणि आमची गुजरी बियरही कमंडलूत भरून घेतली. आम्हांस म्हणतो स्वामी सर्वांसमोर संकोचतात. पण नंतर हे सर्व घेतील, चिंता नसावी. आमच्या हत्तीकडे एक करुण-प्रेमळ कटाक्ष टाकून स्वामी झपाट्याने चालू लागले.

दिल्लीस पोहोचलो आणि पाहतो तो किल्याचा दरवाजा सताड उघडा दिसोन आला! किल्याच्या आत अजिबात वर्दळ नजरेस येईना. अब्दाली सैन्यासह परागंदा झाला असावा की काय अशी शंका उत्पन्न झाली. आमचे सैन्याचा थोडा विरसच जाहला. वीररस प्राप्त करोन उच्चरवात युद्धघोषणा करीत दिल्लीत प्रवेश केला खरे प्रन्तु विरुद्ध सैन्याने स्वागत करोन जेवण्याखाण्याची व्यवस्था झाल्याची वर्दी द्यावी असे झाले. प्रासादात प्रवेश केला तो समोरच दिल्लीचे तख्त! पूर्ण मोकळे. जवळ जाऊन पाहतो तो त्यावर पुष्पगुच्छ आणि येक खलिता ठेवलेला. खलिता उघडोन पाहिला. आत वंदन करोन सिंहासन आपलेच असल्याचा मजकूर आणि खाली अब्दालीची मोहोर! सिंहासनावर विराजमान झालो. समोरील द्वारातून सूर्यकिरणे थेट आमच्या पायाशी येत होती. सैन्याने जयजयकार सुरु केला होता. कोणी तरी कमलपुष्पांचा वर्षाव केला. आता फक्त सुराज्य आणि स्वराज्य!

Thursday, May 15, 2014

उच्छाव आला

आता उच्छाव जवळ आला. लय कामं पडली हायेत. उच्छावमूर्ती तर पयलेपासून तयार हाये. पन नुसती मूर्ती आसून काय उपेग? बाकीची लडतरं काय कमी हायेत का? गेला एक दोन म्हैना मंडळाचे कार्यकर्ते वर्गनी गोळा करत हिंडत होते. वर्गनीचं काय येवढं नाय म्हणा. भाऊंनी पाठवलं हाये म्हणल्यावर कोन नाय म्हणत नाय. आपन रक्कम आदीच लिहून ठिवतो. पावती निस्ती समोर फाडून हातात देयाची. त्या कोपऱ्यावरच्या मारवाड्याला तर अजाबात सोडत नाय. न्हेमी कुजके नारळ ठेवतो आन परत पन घेत नाय. त्याला बोललो, जेवढे कुजक्या नारळाचे कमावले त्यच्या निम्म्याची पावती फाड नाय तर हायच खळ्ळ खट्याक. लोक पैशे देयाला लय कचकच करतात. त्यातून आमच्या एरियातच तीन मंडळं. सर्वेजन पावत्या फाडनार. आमी भाऊंचं नाव सांगनार तर ते दादा, तात्या आन बापूंचं नाव सांगनार. आपन तर सांगून ठेवतो, तुमाला तेंना काय देयाचं त्या द्या, आपली पावती फाडली गेली पायजे. पन येक गोष्ट नक्की, विसर्जनाला आपल्या मंडळाचा गनपती तेंच्या फुडं असनार. तेची बी कामं पडली हायेत. गुलाल सांगायचा हाये. भूगाव ढोल, ताशे मंडळ बलावलं हाये. खड्डे खणून तयार हायेत. निसते बांबू रोवायचे आता. किती येळा सांगिटलं हाये, निसते खड्डे खणून सोडून देऊ नका, रातच्याला दिसत नाय पब्लिकला. पब्लीकचं सोडा, मागच्या वर्षाला आमचे कार्यकर्तेच दोनदा पाय मुरगाळून बसले व्हते.

काल बबन सांगत आला, पलीकडले मंडळवाले आफर देत हायेत. त्यांचे मा. ना. खा. ऊद्घाटन करायला येनार न्हाईत म्हने. पायजेल तेवढी वर्गनी जमली नाय म्हनून. गावी जाऊन कालव्याच्या पान्यात पाय सोडूण बसलेत. दादांना सोडलं हाये जुळवणी कराया. मंग दादा बोलले गनपतीनंतर पार्टी आपन सोता देतो, दोनी मंडळाचं येकच ऊद्घाटन करुण सायबांना भाष्णाला बोलावता येतं का पहा. दादांची पार्टी म्हंजे पयल्या धारेचा इंग्लिश माल भेटनार. आफर वाईट नाय. आयला हे मा. ना. खा. लय बेरकी. मागच्या वर्षी तात्याचं धोतार धरुण ष्टेजवर बसलं होतं. या वर्शी तात्यांचा गनपतीच बसला नाय, मग हे आमचा पायजमा धरणार. कुटून तरी ऊद्घाटनाला ष्टेजवर बसायला मिळायला पायजे.

या वर्शी आनखी येक डोकेदुखी हाये. आनखी येक मंडळ गनपती बसवत हाये. विदाउट वर्गनी म्हने. काय तर, आपलं काय तरी वेगळं. मांडवपन घालनार नाय. गनपतीची मुर्ति पन नाय, नुस्ती येक छोटी उंदराची मुर्ति ठेवनार हायेत. पन हलता देखावा हाये. उंदिर मदे मदे तुरुतुरु सोताभोतीच फिरतो. सोतावरतीच खुश होऊन मिशा चाटतो. लायटींग नाय, डॉंल्बी नाय काय नाय. पन म्हने येक जरूर - बुकं शिकलेले, चश्मावाले, बेंबीपर्येंत प्यांट घालून शर्ट आत खोचलेले कार्यकर्ते लय हायेत, आनि ते चोवीस तास आलटून पालटून नाचनार हायेत. 'बापू बोलता है' गान्यावर. कैच्या कायच गानं. पब्लीक जमवायचं तर आयटम सॉन्ग तरी घ्याचं. तेंचा असला हा नाच पघायला लय लोक येतील असा तेंचा अंदाज हाये. लोकान्ला सांगत फिरतात आमी म्हने वर्गनी घ्येतो त्याचा हिशोब देत नाय, गनपतीनंतर पार्टी करतो. पन आपल्याला ठाऊक हाय, यातले सगळे तात्यांकडे पार्टीला असतात. फुकट प्याला मिळाल्यावर कोन सोडनार. आमाला असं पन कळलं हाये की त्यातले काही लोक आमच्या मांडवासमोर उभे ऱ्हाऊन लोकान्ला तेंच्या मंडळाकडे जायला सांगनार हायेत. मंग आपन पन फिल्डिंग लावली हाये. चष्मेवाला दिसला की तेला उचलून मांडवाच्या मागे आनून नुस्ता प्यान्टचा बेल्ट काडून घेऊन सोडून द्या असं सांगिटलं हाये.  प्यांट सावरून धरू की उंदराच्या जैजैकाराला हात वर करू आसं होयाला पायजे. काय पन म्हना आपन जाऊन तेंची उच्छावमुर्ति पाहून आलो. उंदिर लयच देखना बनवला हाये. जरा हाडकुळा हाये पन ध्यान छान हाये.

आनखी येक सांगायचा मुद्धा, उद्या उच्छावानिमित्त आमचे येथे सट्टेनारावेणाची जंगि महापुजा होनार आहे. तरि सर्व्यांनी सहकूटूंब प्रसाद आनि मूर्तीच्या दर्शेनाचा लाभ घ्यावा. येक नम्र सुचना - उच्छ्वमुर्तिचे दर्शेन जरा दुरुण घ्यावे. ध्यान कडक हाये.

Monday, May 12, 2014

दिव्याखालचा अभ्यास

परीक्षा तर झाली. घरात ठीक वीज वगैरे असताना उगाच झाडू हातात घेऊन रस्त्यावरील खांबाखाली धुरळा करून मग तोच झाडून अभ्यास करणे झाले. त्यातून डोक्यात काही शिरले जरी नसले तरी चारचौघांनी थांबून "वा! अभ्यासू वृत्ती असावी तर अशी!" असे उद्गार तर काढले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन माऊल्यांनी थांबून अरेरे, बिन आईबापाचे पोर दिसते आहे आणि मायेचे छत्र नसताना, घरचे अठराविश्वे दारिद्रय असताना कसे अभ्यास करते आहे पहा असे कळवळून म्हटले होते. मग आपणही उगाच पोट खपाटीला गेल्याचा अभिनय वगैरे करून दाखवला होता. वास्तविक गणिताच्या पुस्तकाच्या कव्हरच्या आत बाबुराव अर्नाळकरांचे 'तळघरातील रहस्य' होते, ते आपण त्या माऊलीला दिसू दिले नव्हते. उगाच तिच्या प्रेमळ हृदयाला का धक्का पोचवा? त्या माऊलीने मग तिच्या घरी जाऊन पोळीभाजीचा डबा भरून आणला होता. आणि म्हणाली होती, लेकरा, मी तुझी काही सख्खी आई नव्हे, पण एवढं खा रे, इतका अभ्यास करतो आहेस, पोटाला काही आधार हवा. वास्तविक घरी तडस लागेपर्यंत जेवण झाले होते. वालाची उसळ आणि शिकरण! आमचे आवडते पदार्थ. बोट लावून दाबले होते. मातोश्री म्हणाल्यासुद्धा होत्या, "आता पुरे! श्वास घेण्यासाठी आत जागा ठेव जरा. आणि मेल्या खातोहेस तर जरा अंगालापण लागूदे! इतका कसा रे तू फाटक्या अंगाचा?" पुढचे ऐकायला नको म्हणून इथे रस्त्यावरच्या दिव्याखाली येऊन बसलो होतो. म्हटलं निवांत 'तळघरातील रहस्य' वाचावे. तर आता ही माऊली डबा घेऊन आली. आणि आणून आणून आणलंन काय तर शेपूची भाजी आणि भाकरी! खरोखर जिवावर आले होते. पण ती माता जणू भरवायलाच बसली होती. तिच्या डोळ्यातील प्रेमळ भाव सहन होईनात. मग उगाच एक तुकडा मोडला आणि त्या मातेस सांगितले, तुम्ही जा, खाईन मी नंतर. परीक्षा आहे उद्या, एवढे प्रकरण पूर्ण करतो आणि खातोच. त्यावर पाठीवरून हात फिरवून ती होय रे बाबा, शीक, मोठ्ठा हो, जातील हे पण दिवस असे सांगून गेली. त्या नजरेने आपण अस्वस्थ झालो होतो. थोडासा तिचा रागही आला. निवांत बसूही देत नाहीत ही मोठी माणसे. आपल्याबद्दल कणव वाटणे, डबा आणणे इथवर ठीक होते. पण शीक, मोठ्ठा हो हा आगाऊपणा कशाला? झालं? आता ही सदसदविवेकबुद्धी आपल्याला आतून कुरतडत राहणार आणि तळघरातील रहस्य उलगडण्याचे तसेच राहणार.

आपल्याला समोरच्या घरातल्या त्या इरसाल कार्ट्यासारखे जमले पाहिजे. आपल्याच वर्गातले ते. आपण सर्वात पहिल्या बाकावर बसतो आणि ते शेवटच्या बाकावर बसते. तरी त्याचा पहिला नंबर आणि आपण एटीकेटीच्या कृपेवर हे गूढ अजून उलगडत नाहीये. सरांकडे आपण तक्रार पण केली होती. कॉपी करून, रट्टा मारून, दिवसरात्र घोकंपट्टी करून, परीक्षा देणाऱ्यांना तुम्ही मार्क कसे काय देता? सर म्हणाले होते, अरे दगडा, तो परीक्षेला हजर तरी राहतो. आपण कुठे होतात? आणि मग सरांनी फीचीही मागणी केली होती. त्यावर मग आपण सरांना आपल्या उत्कृष्ट अभिनयकलेचे दर्शन घडवले होते. आपल्या घरची सामान्य, नव्हे अतिसामान्य परिस्थिती, आईला चार घरचा स्वयंपाक करून आणि वडिलांना घरोघरी फिरून उदबत्त्या विकून चरितार्थ करावा लागतो, बरेच वेळेस घरात थंडा फराळ होतो, विजेचे बिल न भरल्याने अंधारात चाचपडावे लागते, मग रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो इत्यादी गोष्टी आपण इतक्या प्रभावीपणे सांगितल्या की आपण स्वत:च क्षणभर गहिवरलो होतो. भूमिकेशी समरस झालो की आमचे आम्हालाच आवरत नाही. सर दोन मिनिटे आ वासून पाहत होते. मग भानावर येऊन त्यांनी स्वत:च्या खिशात हात घालून दहा रुपये काढून दिले होते. म्हणाले, दिसतं तसं नसतं हेच खरं. माफ कर मला, तू शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जातो आहेस याची कल्पना असती तर माझ्याकडून असं संवेदनाशून्य भाषण झाले नसते. सर आपल्या गावात नवीन आहेत म्हणून बरं. त्यांना अजून आपल्या पिताश्रींचे धंदे, आपलं, व्यवसाय माहीत नाहीत. जर त्यांना संशय आलाच तर 'तो मी नव्हेच' चा प्रवेश करून दाखवावा.

चला, परीक्षा तर झाली. सर्वांना खात्री आहे, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतर, रस्त्यातील दिव्याखाली अभ्यास केलेल्याला यश मिळणारच. सर कालच चितळ्यांकडे जाऊन पेढ्यांची आगाऊ ऑर्डर देऊन आले आहेत. आपणही आपल्यापरीने भरपूर प्रयत्न केला आहे. यावेळी प्रश्न सोडून दिले नाहीत. उत्तर माहीत असो वा नसो, मनास येईल ते ठोकून दिले आहे. एका पेपरमध्ये अर्धी उत्तरपत्रिका 'वन्दे मातरम' तर उरलेली 'अस्सलाम आलेकुम' असे लिहून ठेवले आहे. एका पेपरमध्ये तर हळूच हजाराची नोट ठेवून दिली आहे तर दुसऱ्या पेपरात रस्त्यावर अभ्यास करतानाचे छायाचित्र चिकटवून ठेवले आहे. एका पेपरात अर्ध्या प्रश्नांचे उत्तर 'मुंबईसह संयुक्त गुजरात झालाच पाहिजे', तर उर्वरित पेपर 'गुजरातसह संपूर्ण भारत झालाच पाहिजे' याने भरला आहे.  सर म्हणाले आहेत, काही काही कनवाळू परीक्षक, केवळ प्रयत्न केला याबद्दल मार्क देणारे असतात. तुझा पेपर जर अशा परीक्षकाकडे गेला तर तू पास झालाच असे समज. मग तुझे दिव्याखाली अभ्यास करायचे दिवस संपले. पुढे काय करणार आहेस मग? आपण पुढे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचे आहे असे सांगितले आहे. सर म्हणाले वा! समाजाने तुला काही दिलं नाही पण त्याचा कडवटपणा न बाळगता तू डॉक्टर होऊन समाजऋण फेडणार हे कौतुकास्पद आहे. ती ऋणबिण भानगड फारशी आपल्या लक्षात आली नाही तरी आपण काही तरी मोठ्ठे करणार आहोत हे लक्षात आले. हॉस्पिटल काढून डॉक्टरलोक नोकरीला ठेव, बक्कळ पैसा मिळेल असा सल्ला पिताश्रींनी दिला आहे तेवढेच कळले आहे. ते म्हणतात बेट्या, एक लक्षात ठेव, सगळे धंदे बुडीत जातील पण हॉस्पिटलवाले, हॉटेलवाले आणि चड्ड्याबनियनवाले यांना मरण नाही हो! पण मला वाटते तो सल्ला त्यांनी आपल्या धंद्याच्या फायद्यासाठी दिला आहे. का कुणास ठाऊक त्यांच्याकडे नोकरीला असलेले लोक नेहेमी आजारी पडत असतात किंवा अपघातात तरी सापडत असतात. मला स्वत:ला अर्नाळकरांच्या कथांतील धनंजय, किमानपक्षी त्यांचा इमानदार नोकर छोटू तरी व्हावे असे वाटते. असो. तूर्तास तरी आपण  'तळघरातील रहस्य' वाचावे हेच बरे. 

Saturday, May 10, 2014

आईचं ऋण

"कारट्या, थांब बघतेच आता तुझ्याकडे. जीव नकोसा करून टाकला आहेस अगदी!" पासून "आयुष्यवंत हो, लवकर मोठ्ठा हो रे बाबा" या दोन वाक्यांत शब्दांचा फरक असला तरी त्यामागील भावनेत काहीही फरक नाही. जगामध्ये कुठेही गेलं तरी थोड्याफार फरकाने अशीच वाक्ये उच्चारली जात असतील. कारण त्यामागे असलेली व्यक्तीला आणि तिच्या हृदयाला विधात्यानं एकाच प्रकारे बनवलं आहे. काही तरी उपद्व्याप केल्यावर "मेल्या!" असे प्रेमळ शब्द उच्चारून हातात जी काही पळी, उलथनं असेल ते आपल्या दिशेनं भिरकावणारी आई, तीच आई पावसांत नखशिखांत भिजून आल्यावर एक सणसणीत धपाटा घालून टॉवेलनं डोकं पण पुसणारी, आजारी पडल्यावर दररोज संध्याकाळी दृष्ट उतरणारी.

मला आठवतं, लहानपणी मनसोक्त बाहेर हुंदडणारी आम्ही मुलं, दिवसभर खेळण्याच्या नादात जेवायची-खायची पण शुद्ध नसलेली, पण घरी आलो की प्रथम आई समोर दिसायला हवी असायची. मग आंघोळ न केल्याबद्दल, जेवायला वेळेवर न आल्याबद्दल खाली मान घालून बोलणी ऐकायची. आणि हे सगळं बोलत असताना ती टेबलावर ताट वाढून ठेवायची. तिचं जेवण झालेलं नसायचंच. त्याचीही आम्हाला शुद्ध नसायची. अर्थातच मुलांनी काही म्हणावं, द्यावं अशी आईची अपेक्षा नसायचीच. त्यावेळी नव्हती आजही नाही आणि पुढेही नसेल. याला आपलं तिला गृहित धरणं म्हणावं की अतिपरिचयात अवज्ञा? जणू तिचं सर्व जगणं आमच्या साठीच होतं. आईनं स्वत:साठी कोणतेही चोचले, लाड करून घेतल्याचं मला आठवत नाही. मला माझं शाळेचं वेळापत्रक कधीच लक्षात नसायचं, पण आईच्या नक्की असायचं. आणि तिलाही ती एक जबाबदारीच वाटायची. एकदा असंच मी जीवशास्त्राचं प्रॅक्टिकल विसरलो. दुसऱ्या दिवशी सबमिशन! मी रात्री उशिरापर्यंत मग जर्नल पूर्ण करत बसलो होतो. तर ते पूर्ण होईपर्यंत कसं काय विसरले रे मी सुद्धा असं म्हणत आईनंपण जागरण केलं.

पुढं मग आम्ही मुलं आईनं जसं देवाकडे मागणं घातलं होतं तसे मोठे झालो. आईच्या पदराच्या पलीकडे क्षितीज थोडसं विस्तारलं. कॉलेज, करिअर, सबमिशन, प्रॅक्टिकल, सेमिस्टर असले शब्द तोंडात येऊ लागले. थोडासा बेफिकीरपणा उगाचच दाखवू लागलो. अगं तुला माहीत नाही आम्हाला आता किती अभ्यास असतो ते हे त्या गरज नसताना जागरण केलेल्या मातेलाच सांगू लागलो. पण त्याचे यत्किंचितही वाईट वाटून न घेता आई काळजी करतच राहिली. अजूनही परीक्षेच्या दिवशी माझ्या आधी उठून मला उठवत राहिली. माझ्या नेहेमीच्या बेफिकीर वृत्तीप्रमाणे मी बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा जवळजवळ हुकवलीच होती. कसं कुणास ठाऊक, मला उठवून म्हणाली, तू हल्ली काही तुझं वेळापत्रक सांगत नाहीस, पण मला आज असं का वाटतंय की आज तुझी महत्वाची परीक्षा आहे? आणि माझ्या छातीत धस्स झालं. खरंच परीक्षा होती! कसाबसा शाळेत पोचलो, परीक्षा सुरु होऊन पाच मिनिटं झाली होती. सुदैवाने मला प्रवेश मिळाला. मी नंतर येऊन आईला म्हणालो, रिपीटर होण्यापासून वाचवलंस! कुठल्याशा महाराजांची कृपा एवढंच ती म्हणाली. तिला म्हणावसं वाटलं महाराजांची कृपा कसली, ही तुझ्याच निरपेक्ष प्रेमाची कृपा. निरपेक्षच. मुलांनी तिच्यासाठी केलेल्या अगदी छोट्या गोष्टीचंही केवढं अप्रूप, अभिमान तिला. बोलून दाखवायची नाही, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान, कृतार्थपण ओसंडायचं. आज आठवलं की हसू येतं. नोकरी लागल्यावर पहिला पगार झाला. अर्थातच तो आईवडिलांना द्यायचा. पण मी मुंबईत. मग मी आईसाठी साडी घ्यायचं ठरवलं. माझा आतेभाऊ सुनील आणि मी समवयस्क. दोघेही साडी घ्यायला म्हणून गेलो. आठवले आणि शहाडे यांच्या दुकानात. आत पाहिलं तर समस्त महिलावर्ग. आम्ही दोघे अभिमन्यू दुकानाच्या बाहेर किमान पंधरा मिनिटे उभे राहून या चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा आणि महत्वाचे म्हणजे बाहेर कसे यायचे याची आखणी करत होतो. शेवटी हिय्या करून आत शिरलो. पहिल्या पाच मिनिटांत जी पहिली साडी आवडली ती घेऊन बाहेरसुद्धा पडलो. जीवनात पुढे अनेक समरप्रसंग आले, पण हा साडीखरेदी प्रसंग सर्वांवर मात करतो. साडी आईला दिली. तिच्या डोळ्यांत अतीव प्रेम होते, कौतुक होते, कृतार्थता होती. मलाही बरे वाटले. पुढे अनेक वर्षांनी असाच साडी खरेदीचा विषय निघाला. मला बाबा म्हणाले, अरे पाच मिनिटांत तुम्ही साडी घेऊन बाहेर पडलात, नीट पाहिलीत तरी का? मी म्हणालो का? काय झालं? बाबा हसत म्हणाले तू तुझ्या आईला एकदम "मिस इंडिया" करून टाकलंस. मला काही कळेना. शेवटी आईच म्हणाली "अरे, त्या साडीच्या कडांवर छानपैकी बारीक अक्षरात मिस इंडिया असं लिहिलं आहे!" माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा. अभिमन्यूने व्यूहभेद करावा पण विनाकटिवस्त्र व्यूहातून बाहेर यावे असे काहीसे झाले होते. तरीही इतकी वर्षं ती साडी केवळ आपल्या मुलानं पहिल्या पगाराची दिलेली म्हणून प्रेमानं नेसत होती.

लौकिकार्थानं आता प्रौढ झालो. आज पन्नाशी जवळ येताना दिसतेय पण आईसमोर तोच हट्टीपणा, हूडपणा आपोआप येतो. त्याच वेळी आपली बायकोही त्याच आईच्या जातीकुळीतील हेही दिसू लागतं. मुलं माझ्यापेक्षा त्यांच्या आईभोवतीच जास्त असतात. आईचं सोशिकपण बायकोतही आहे. मुलं आणि नवरा अशी कसरत सर्व आयांना करावी लागते तशी बायकोही करतेय. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, अखंड केवळ मुलांचाच विचार करणारी आई, तिचा विचार करण्यासाठी मदर्स डे कशाला हवा? आपला प्रत्येक क्षण तर तिनेच दिलेला आहे. त्याच्यावर तिचा हक्कच आहे. हे जे ऋण आहे ते फेडायचंच नाहीये मला. ऋणातच राहायचंय. तेव्हा आई, हे आमचं जगणं तुझंच दान आहे, एक दिवसच कशाला, सगळं आयुष्य आईसाठी, असं म्हणूयात.  

Friday, May 9, 2014

सिंदुर लाल चढायो

परवाच कुठेशी रा.रा. केजरूपंत यांची तुलना स्वये श्रीरामप्रभूंशी झालेली वाचली आणि धन्य धन्य झालो. भाबड्या भक्तांची इच्छा असेल तर वानराचा नर होतो याची देही याची डोळा खात्री पटली. मग भले त्या वानराची स्वत:ची इच्छा असो वा नसो. मग पुढे एकदा कपाळावर शेंदूर फासला गेला की देवपण आलेच. देवपण आले की नरत्व वा वानरत्व दोन्ही संपले. मग ते वानर ज्या काही कोलांट्या मारील, कोटिच्या कोटी उड्डाणे करील, स्वभावानुरूप माकडचेष्टा करील, त्या सर्व "लीला" होऊन जातात. भक्तगण त्या लीळा डोळ्यांमध्ये श्रद्धा आणून, कामधाम सोडून कवतिकाने पाहत बसतो. बुद्धी गहाण टाकून पैसे, नारळ, हळदकुंकू वाहू लागतो. एवढेच नव्हे तर दैवत कसे जागृत आहे याच्या कपोलकल्पित कथा विस्फारलेल्या मोठ्ठ्या डोळ्यांनी दिसेल त्याला सांगत सुटतो. इथवर सर्व ठीक म्हणायचे. कुणाची बुद्धी कशी चालावी आणि कशी चालू नये यावर काही बंधन नसते. पण हा अंधश्रध्द जमाव जेव्हा आपण म्हणू तो देवच अशा आग्रहावर येतो, तुम्ही त्याला मानले नाहीत तर तुम्हीच पापी असे म्हणू लागतो, तेव्हा त्या जमावाची उरलीसुरली विवेकबुद्धी संपून झुंडशाहीकडे वाटचाल चालू झाली असेच म्हणावे लागेल.

पूर्वी आमच्या नेहेमीच्या चहाच्या अड्ड्याशेजारी एक झाड होते. त्या झाडाखाली स्कूटर्स, मोटरसायकल्स लावल्या जात. मित्रमंडळी चहावर एक तास घालवून झाला की बाहेर येऊन पुन्हा एखाद्या मित्राच्या स्कूटरीवर रेलून पुन्हा अर्धा तास गप्पांत घालवत. झाडाला आमचा त्रास नव्हता, उलट कडक ऊन असेल तेव्हा झाडाच्या सावलीचा आम्हाला आधार होता. पुढे आमचे उमेदवारीचे दिवस संपले, मित्र चहूदिशांना पांगले. बरेच दिवस मग अड्ड्यावर जाणे झाले नाही. असेच दिवस धकाधकीत गेले. थोडेफार स्थैर्य येऊ पाहत होते. पुन्हा जुने नंबर्स काढून एकमेकांशी संपर्क झाले, अड्ड्यावर भेटायचे ठरले. ऐन वैशाखी वणव्याचे दिवस. रामराणा जन्मला ती टळटळीत वेळ. मी स्कूटरवरून पोचलो. कधी पार्किंगला जागा मिळायची नाही. दुरून मध्ये खूप मोकळी जागा दिसली म्हणून आनंदात स्कूटर घुसवली आणि थबकलो. जागा मोकळी का याचा उलगडा झाला. आता झाडाच्या बुंध्याशी कुणीतरी मोठा गुळगुळीत धोंडा आणून त्यावर छानपैकी शेंदूर माखून, हळद, कुंकू वाहून ठेवला होता. एक दोन फुले वाहिलेली. एवढेच पुरेसे होते. धोंड्याची प्रतिष्ठापना झाली. आणि या देवस्थानाला निदान सहा सायकली/स्कूटर्स बसतील एवढे अनुदान कुणी न मागता मिळाले. काहीही न करता. कुणाचाही नवस नव्हता, मागणे नव्हते, धोंड्याला काही करावेही लागले नाही. धोंड्याची इच्छासुद्धा नव्हती. अशा वेळी जे करायला हवे होते पण जे कुणीच करत नाही तेच मीही केले. त्या उपटसुंभ धोंड्याचे शेंदुरासह विसर्जन न करता दुर्लक्ष करून निघून गेलो. पुढे अशीच एकदोन वर्षे गेली आणि पुन्हा तेथे जाणे झाले. यावेळेला झाडाच्या बाजूला एकही वाहन नव्हते. दोन स्कूटरींमध्ये कौशल्याने आपली स्कूटर बसवणारा पुणेकर पूर्ण मोकळी जागा पाहिली की चपापून तारीख पाहतो. सम की विषम याला पुण्यात जेवढे महत्व आहे तेवढे गणिताच्या पेपरमध्येपण नसते. तसेच माझे झाले. एकही वाहन दिसत नव्हते. पण एक नवीन गोष्ट नजरेस आली. आता त्या शेंदूरधोंड्याला छोटेसे घर मिळाले होते! चक्क कुणीतरी त्या धोंड्यावरती छानपैकी तीन बाय तीन फुटाचे देऊळ बांधले होते! कपाळाला मारे गंधबिंध लावून एक इसम त्याची राखणही करत होता. समोर तबकात नोटा, नाणी दिसत होती. मी शेजारी स्कूटर लावायला गेल्यावर या भक्ताने लगेच स्कूटर समोरच्या बाजूला लावा असे सांगितले. त्या बाजूला वाहने लावलेली दिसतपण होती. एकूण हा धोंडा चांगलाच प्रस्थापित झाला होता. मला खात्री आहे पुढील वेळेस येऊ तेव्हा या धोंड्याचा एखादा उत्सवही चालू झालेला असेल. भक्तगण बेहोष होऊन भजन करत असतील, संख्येच्या जोरावर नास्तिकाला हाकलून दिले जाईल.

धोंडा निर्गुण निराकार, भक्त गर्जती सर्वत्र हाहाकार, असा प्रकार आहे. झुंडशाही, तर्कशून्यता आणि विवेकशून्य आक्रमकता यांच्या बळावर विरोध मोडून काढणे एवढेच या धुंद भक्तांचे कार्य असते. गळ्यात पाचदहा रुपयांच्या त्यागरूपी रुद्राक्षाच्या माळा, अंगभर फासलेले खोट्या विद्वत्तेचे भस्म, कपाळावर आपल्या स्वामिभक्तीचा मत्त टिळा अशा आवेशात हे भक्त गर्जना करून आपला धोंडा कसा श्रेष्ठ, त्याला शरण न जाणारे तुम्ही कसे पापी हे उच्चरवाने सांगत असतात. सांगोत बापडे. पण या अंधभक्तांची मजल जेव्हा धोंड्याला आता परमेश्वर मानायला भाग पाडण्यापर्यंत जाऊ लागली की मग भीक नको पण हे भक्त आवर असे वाटू लागते. जेव्हा मी धोंड्याला शेंदूर फासलेले पाहिले तेव्हाच त्यावर पाणी ओतून त्याचे दगडपण उघडकीस आणले असते तर तिथे आज दांभिकतेचे देऊळ उभे राहिले नसते. पण मला वाटते, आपणा सर्वांतच एक सुप्त आशा असते, कुणीतरी सुपरहिरो यावा, त्याने आपली सर्व दु:खे नाहीशी करावीत. न जाणो हा धोंडा परग्रहावरून आलेला एखादा सुपरमॅन असावा किंवा प्रत्यक्षात खरंच देवाचा अवतार असावा. मग केवळ एक खुळी आशा म्हणून नकळत अशा धोंड्यांना नमस्कार केला जातो, किमानपक्षी त्यांना लाथ तरी मारली जात नाही. या तुमच्या आमच्या आशेच्या जोरावर असे शेंदूरदगड उदयास येतात, त्यांची देवळे उभारली जातात. आपलेच नष्टचर्य, दुसरे काय?

Thursday, May 8, 2014

पावसाचं देणं

आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरु आहे. एरवी सळसळणारी ही झाडे आज कशी निश:ब्द ठिबकत उभी आहेत. मधूनच एखादी वाऱ्याची सर येते, हो पावसात वाऱ्याचीही सरच असते, त्या सरीने अंग शहारल्यासारखी पाने थरथरतात आणि पाय निघत नसल्यासारखे थोड्याश्या नाराजीनेच पाण्याचे थेंब प्रथम एक दोन आणि मग टपटप पडतात. मध्येच पावसाचा जोर मंदावतो, साठलेले पाणी रस्त्याच्या कडेने खळखळत वाहत राहते. काही वेळापूर्वी एखाद्या गर्भारशीसारखे दिसणारे आकाश आता निवळते, पण त्यात जन्म देऊन झाल्यानंतर आलेले क्लांतपण असते. विज्ञानानं केलेल्या व्याख्येप्रमाणे पाऊस पडण्याची प्रक्रिया एकच असली तरी प्रत्येक गावाचा पाऊस वेगळा असतो असं मला नेहेमी वाटतं. पाश्चिमात्य देशातील पाऊस जरासा कठोर, गारठून टाकणारा. तर भारतातील पावसाचं पडणं म्हणजे कधी वडीलधाऱ्यांच्या रागावण्यासारखं कडाडून, कधी मित्रांनी अचानक अवतीर्ण होऊन केलेल्या फजितीप्रमाणे तर कधी लहान मुलासारखं हट्ट करत अधूनमधून रडत राहिल्यासारखं, कधी सर्व चिंता सोडून देऊन मनसोक्त भिजायला बोलावणारं.

कडक उन्हाळ्याच्या काहिलीनंतर पहिला वळवाचा पाऊस यायचा. असा यायचा की वाटायचं आता ब्रह्मांड वाहून जाणार. तापलेल्या मातीवर पहिले टप्पोरे थेंब आदळायचे. त्या आघातानं माती आणि पाणी दोन्ही वर उडायचं. छोटासा स्फोटच जणू. काही क्षणातच धुंद करणारा मृद्गंध सर्वत्र दरवळायचा. जगातील सर्व सुगंध त्यापुढे व्यर्थ! पूर्वी कुठेसं वाचल्याचं आठवतं, बहुधा पुलं,"जगातील उत्तम सुखे अक्षरश: फुकट्यात मिळतात." हा मृद्गंध त्यातीलच एक सुखगंध. मनाच्या कुपीशिवाय कुठेही न साठवता येणारा. विकत घ्यायला गेलं तर कुठेच मिळणार नाही, पण ध्यानीमनी नसताना असं अचानक भरभरून समोर येईल. असा अचानक आलेला वळीवाचा पाऊस तसाच अचानक निघूनपण जायचा. पुन्हा मग काही दिवस तगमग सुरु. मग शाळा सुरू व्हायचे दिवस यायचे ते पाऊस घेऊनच. आणि कोकणातील तो पाऊस. एकदा सुरू झाला की निळं आकाश दिसायचं ते एकदम सप्टेंबरमध्येच. धबधब्यासारखा पडत रहायचा. मध्ये जरी थांबला तरी ढगांत खदखदत असायचा. आमचं घर डोंगराच्या पायथ्याशी. व्हरांड्यातून नजर टाकली की गर्द हिरवं ल्यालेल्या लेकुरवाळ्या माहेरवाशिणीसारखा तो डोंगर दिसायचा. त्या डोंगरानं आम्हा मुलांवर मायाही तशीच केली. पाऊस येणार हे एक दोन मिनिटं आधीच कळायचं. समुद्राची जशी गाज असते तशी धीरगंभीर गाज डोंगरातून ऐकायला यायची. डोंगराकडे पाहिलं की तो पूर्ण धुक्यात बुडून गेलेला दिसायचा. त्या धुक्यातून येणारी ती गूढ गाज मोठी मोठी होत जायची. वेंगुर्ल्याच्या बंदरातील डाकबंगल्याच्या गच्चीवर उभं राहिलं की जसा लाटांचा कडकडाट ऐकू येतो तशी ती गाज व्हायची. मग सुरु कौलांवर ताशा सुरु व्हायचा. क्षणार्धात समोरचा परिसर सरींमध्ये न्हाऊन निघायचा. पुढं एक तासभर तरी नर्तन चालू रहायचं. रात्री कौलांवर वाजणारा तडतडबाजा ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं नाही. कोकणभूमी ती. पाणी एका जागी कधी ठरायचं नाही. उंच भागातून सखल भागाकडे सारखं धावत असायचं. थेट मोठ्या व्हाळाला (ओहोळ) मिळेपर्यंत. एरवी शांतपणे झुळूझुळू वाहणाऱ्या व्हाळानं रौद्र रूप धारण केलेलं असायचं. तांबड्या मातीनं लाल झालेलं ते पाणी प्रचंड आवाज करीत अक्राळविक्राळ होऊन धावायचं. त्याची भीतीच वाटायची. हिप्नोटाईज झाल्यासारखं आम्ही त्या पाण्याकडे पाहत असू. रस्त्यातील वाहत्या पाण्यातून अनवाणी चालणे हा एक छंदच होता. दक्षिण कोकणात सर्वत्र स्वच्छ रेती. त्यामुळे कुठेही चिखल व्हायचा नाही. तळपाय अगदी लहान मुलाच्या पायासारखे नितळ व्हायचे. पहिला महिना असा धबाबा पाऊस पडून गेला की आजूबाजूचं रूप बदलायचं. झाडांच्या बुंध्यावर, पडून राहिलेल्या ओंडक्यांवर अळंबी जीव धरायची. पायाखालचा पालापाचोळा नेहेमी ओला राहून एक विशिष्ट गंध पसरायचा. पक्ष्यांचा चिवचिवाट अगदी कमी असे. बहुधा ते घाटमाथ्यावर जात असावेत. सकाळी कुक्कुटकोम्ब्याचे कुकारे मात्र ऐकू यायचे. हे असं सर्व निरखत अनुभवत डोंगरातील घनदाटीत आम्ही समवयस्क मुलं मनसोक्त हुंदडत असू, भिजत असू. पण कधी आजारी पडल्याचं आठवत नाही. पावसानं खूप काही दिलं आम्हाला. जणू तो म्हणत असावा, पडावं तर माझ्यासारखं, तुफान, झोकून दिल्यासारखं, जसं काही आजचाच दिवस जगायचा आहे. पण असंही पडावं की सर्वस्व दान केल्यासारखं. पण ते दानच असावं, त्याने फक्त भलंच व्हावं, बुरं कुणाचं आणि कधीच नको. 

गंगेची तपश्चर्या अपुरीच

हे आम्ही काय ऐकले? कानावर विश्वास बसत नाही! अपरिमित त्यागाने प्राप्त झालेली ती प्रभावळ , सूर्याप्रमाणे दाहक असे ते तेज कुकरखालील ग्यास बंद केल्याप्रमाणे येकदम विझले? कुकरची शिट्टीपण झाली नव्हती. सकाळी पाच वाजता उठून नळाला पाणी येण्याची प्रतीक्षा करावी आणि प्रत्यक्षात शेवटी त्या नळातून दोन तीन थेंब थबकून त्याने राम म्हणावा? जो महापुरुष आपल्या नुसत्या दाढीयुक्त दर्शनाने समस्त जगाचे डोळे दिपवून टाकतो असे त्यांच्या भक्तगणाचे म्हणणे होते त्याने स्वत: उन्हाचा त्रास होतो म्हणून अंगभर सनब्लॉक चोपडून वर गॉगल लावून घरात बसण्यासारखे झाले हे.

स्वामीजींना प्रत्यक्ष गंगामैयाने पोष्टकार्ड धाडून तू लौकर ये रे बाबा म्हणून बलावून घेतले होते. त्यावर स्वामीजींनी बालके भगीरथ उर्फ गंगासुत याचा मातेचरणी शीर साष्टांग नमस्कार वि वि अशा मायन्याने उत्तर पण धाडले होते. त्यात त्यांनी नेसल्या धोतरासरशी येतो असे कळवले होते. यष्टीचे रिझर्वेशनपण केले होते. बंधू अपरिमितस्वामी यांना आम्ही एक दोन दिवस जाऊन येतो तोवर मठाचा कारभार सांभाळा असेही सांगून झाले होते. तेव्हा अपरिमितस्वामी आम्ही पूर्वीपासूनच कारभार करत आहोत, सॉरी सांगायचं राहून गेलं असे म्हणाले होते. पण मातेच्या ओढीने भगीरथ स्वामींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ते टॉवेल, धोतर, टूथपेस्ट, कमंडलू. त्यांचे आवडते फूल कमळ इत्यादी गोष्टी होल्डऑल मध्ये कशा ठेवाव्यात या विचारात होते. कमळ होल्डऑल मध्ये ठेवले तर वाराणशी येईपर्यंत त्याचा गुलकंद होईल या चिंतेत ते होते. शिवाय मातेसाठी काय घेऊन जावे बरे? खूप विचार केल्यावर त्यांनी स्वत:ला समजावले होते, तसे आपल्यापाशी मातेला आवडेल असे काहीच नाही, उलट आपल्यालाच माता देईल. तेव्हा "अरेच्या, माते! अरेरे! खास तुमच्यासाठी करवून घेतलेला हिऱ्यांचा हार गडबडीत शेवटी तिकडेच राहिला!!" असे म्हणावे झाले. आणि आपण हे कमळ नेतोच आहोत, तेच मातेचरणी अर्पण करावे. हां, हेच बरे. फक्त जाईपर्यंत हे कमळ चुरगाळू नये. नाहीतर फुलाच्या ऐवजी निर्माल्य वाहिल्यासारखे होईल.

अशी सर्व तयारी झाली असताना स्वामींनी जाणेच क्यान्सल करावे? मातेचे आपणच येकटे लेकरू नव्हे, अन्य लेकरेपण आहेत आणि ती मातेपाशी आपल्या आधीच दाखल झाली याचे स्वामींना जरा वाईटच वाटले होते. पण आपणच तिचे लाडके असे त्यांनी आपले समाधान करून घेतले होते. माता सर्वांना भले कुरवाळील, पण डब्यातील लाडू हळूच काढून आपल्याला देईल अशी त्यांना खात्री होती. मग आपण डोळे मिटून लाडू खाता खाता, माता हळूच, काय रे बाबा, एवढ्या दूर मठात शिकायला धाडला तुला. इतके दिवस कधी चिठी नाही चपाटी नाही. मी बोलावल्यावर तुला आठवण झाली आईची. बरं, निदान काय प्रगती केलीस ते तरी सांग असे म्हणेल. तिला काय सांगायचे? अगे माते, शिक्षणाचे ते काय? त्याशिवायच मी मठाधिपती झालो आहे! शेवटी शिकूनतरी काय मोठे करतात माणसे? आधीचे अधिपती? त्यांना म्हणालो रिटायर व्हा, किती दिवस कष्ट करणार? ते नाही म्हणत होते पण प्रेमाने त्यांना व्हीआरएस दिली. तेव्हापासून प्रचंड प्रगती झाली आहे. आपल्या भगिनी नर्मदामाता याला साक्ष आहेत. यावर माता कदाचित विचारेल, बाळा, कोणाची प्रगती? ती पेप्रात छापून आलेली नव्हे, खरीखुरी सांग! मग खरे सांगावेच लागेल. मग माता वरून क्रुद्ध पण आतून अतिशय दु:खी होईल. जाऊदे, त्यापेक्षा न गेलेलेच बरे. माता समजून घेईल, आईचे प्रेम सगळ्यावर पुरून उरते. माते! इथूनच तुला वंदन! काहीतरी बहाणा करावा. हां! वाराणशीच्या दुष्ट जकातवाल्यांनी कमळ आणायला सध्या बंदी घातली आहे, जबर जकात भरावी लागेल आणि वर परत दंड असे आम्हाला सांगितले आहे. अस्सेच सांगावे. बरं झालं उलट बंदी घातली ते. तसे नुकसान काहीच नाही. फार फार तर काय, रिझर्वेशन वाया जाईल. जाऊदे, पन्नास पैशाचेच तर होते. आणि इथे कोण तिकीट काढते म्हणा!