"कवा आलायसा? ऱ्हानाराय न्हवं?" या शब्द ज्या मातीतले, त्या मातीतील माझा जन्म. कोल्हापूर हे नाव लौकिकार्थानं. पण ते खरं आमचं कोल्लापुरच. अंबाबाईचं, ज्योतिबाचं कोल्लापूर. झणझणीत रश्शाचं, चमचमीत मिसळीचं कोल्लापूर. अंगावर लाल माती उडवून आखाड्यात पहुडलेल्या पैलवानांचं, आणि विद्यापीठात नाव काढलेल्याचंपण कोल्लापूर. प्रेमळपणा आणि रांगडेपणा याचं हवंहवंसं वाटणारं दुर्मिळ मिश्रण असलेलं हे गाव.
सुट्टी लागली की कोल्लापुरचे वेध लागायचे. सगळी मामेभावंडं, मामा, माम्या भेटणार याचा आनंद डोक्यात मावत नसायचा. पाच सहा तासांचा येष्टीबसचा प्रवास म्हणजे त्यावेळी खूप वाटायचा. कोकणातील लाल माती, गर्द झाडी बसच्या खिडकीतून दिसत राहायची. मग अचानक ती लाल माती धूसर होऊ लागे. झाडी विरळ होऊन माळरानं सुरु होत. मधूनच डेरेदार आंब्याचं झाड, पण बहुतांशी बाभळीची झाडे, काळीभोर जमीन, उसाची शिवारे असं चित्र, एखाद्या चलतचित्रपटासारखं खिडकीतून सरकायला लागलं की ओळखायचं, घाट ओलांडून देशावर आलो. कोकणात त्यावेळी रिक्षा वगैरे प्रकार सुरु झाला नव्हता. पण कोल्हापूरच्या बसस्थानकावर उतरलं की समोर दोन रांगा दिसायच्या. एक रांग टांग्यांची, दुसरी रिक्षांची. मला टांग्यात बसायचं असे, तर भावाला रिक्षात. शेवटी लवकर पोचू म्हणून रिक्षेनं जायचं ठरायचं. स्थानकाबाहेर कितीही गजबज दिसली तरी एक प्रकारचा निवांतपणा वाटायचा. इथं कुणाला कसलीही घाई नाही असे वाटायचे. रिक्षेने घरी पोचलं की भावंडं गळ्यात पडायची, हातातल्या पिशव्या, सूटकेसेस घरात घेऊन जायची. पाया पडायला दबकत मामाच्या समोर जायचं. मग मामा खास कोल्हापुरी थाटात "केव्हा आलात रे **विच्यानों?" अशी प्रेमळ विचारणा करत पोटाशी धरायचा. मग सुरु व्हायचा अखंड धिंगाणा, खेळणं. घरात शिरल्यावर प्रथम दर्शन व्हायचं ते ज्योतिबाच्या फोटोचं. भरघोस शुभ्र आकडी मिशा, भला मोठा कोल्हापुरी फेटा, कपाळावर गुलाबी भंडारा. आणि ते डोळे! डोळ्यात धाक आणि प्रेम दोन्ही. अगदी मामासारखं. मामा लोक पण कपाळाला तसेच उभे भंडाऱ्याचे बोट लावत. त्यामुळं त्या वयात ज्योतिबा म्हणजे आमच्या मामांपैकीच एक वाटायचा. किंचित कठोर दृष्टी, पण ती दृष्टी अनिष्टापासून संरक्षण करण्यासाठी कठोर केलेली. दृष्टी कठोर असली तरी, हृदयात असलेली कृतीतून जाणवणारी अशी ती अबोल अपार माया. आपल्याला दैवतं अनेक आहेत, पण असं घरातलंच एखादं जवळचं माणूस असावं असं वाटणारं दैवत एकच.
मग एके दिवशी ज्योतिबाचा डोंगर आणि मग पुढे पन्हाळा अशा सहलीची टूम निघायची. गावातील अरुंद रस्ते गल्ल्या मागे पडून एकदम शिवारं सुरु व्हायची. गुऱ्हाळांचे दिवस असायचे. कधी कधी दुरून खमंग गुळाचा वास येई. बैलगाड्यांचे जथे ऊस लादून कारखान्याकडे चाललेले. मागे ऊस ओढून पळवणारी वात्रट पोरे, त्यांना "च्या बायली!" असं म्हणत हाकलणारा गाडीवान अशी दृश्ये दिसत. थोड्याच वेळात दूर डोंगरावर कळस दिसायचा. केवळ पश्चिम महाराष्ट्रात सापडणाऱ्या काळ्याकुळकुळीत दगडातील बांधकाम. हेमाडपंथी शिखरं. वरती फडफडती ध्वजपताका. भल्या मोठ्या दिंडीतून प्रवेश करायचा. प्रवेशाची दिंडी सुद्धा ऐसपैस. दोहो बाजूला पैस ओसऱ्या. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वारच. पूर्वी पहारा देणारे वेसकरी ओसरीवर कांबळ्याची चुंबळ टाकून बसलेले आहेत. पेटलेली चूड खांबाला रोवली आहे. हवेत गारवा आहे. वेसकरी स्वत: भरगच्च मिशा, मुंडासं, पायात धनगरी कडं, गळयात आणि दंडावर ताईत, बिनहाताची पैरण आणि गुडघ्यापर्यंत मळकट धोतर अशा वेशात जरबेनं पाहतो आहे असं मला वाटायचं. भोवतीच्या काळ्या पत्थरासारखीच शरीरयष्टी. जसा देव तशीच त्याची लेकरं दिसायची. आजकाल दिसत नाहीत पण त्याकाळात दर्शनाला आलेले भाविकही थोड्याफार फरकाने असेच दिसायचे. दिंडीतून आत आलं की भव्य आवार. मधोमध मुख्य देऊळ. समोर दीपमाळ. अप्रतिम शिल्पकाम असलेले दगडी खांब. नजर टाकली की प्रथम नजरेत भरायची ती एक गोष्ट. सर्व परिसर गुलाबी भंडाऱ्यात माखलेला असायचा. संपूर्ण देऊळ ज्योतिबाच्या रंगात रंगलेलं वाटायचं. भाविकही भंडाऱ्यात न्हालेले. या भंडाऱ्याच्या कल्लोळातून प्रगट व्हायचा स्वत: ज्योतिबा. सदैव जागृत. युगानुयुगे उलटून गेली असणार. अनेक उलथापालथी झालेल्या पाहिलेल्या असणार. अनेक वादळं येऊन गेली, सुग्या पाहिल्या, दुष्काळ पाहिले. घरं मुलाबाळांनी भरून गेलेली पाहिली, रिती झालेलीही पाहिली. वाडे उभे राहिले, भग्नही पावले. परचक्रं येऊन गेली, आता स्वकीयांनी आणलेली दुष्टचक्रंही पाहतोय. त्या उंच डोंगरावरून ज्योतिबानं स्थिर नजरेनं हे सगळं पाहिलं असणार. निर्विकल्प, निराकार. तरीही "मी इथे उभा आहे, तुमच्यावर नजर ठेवतो आहे. धडपडलात तर हात द्यायला, उतलात मातलात तर जरबही द्यायला मी आहे." असा तो उभा आहे. माणसाला तरी काय हवं असतं? औंदा काय पावसकाळ खरा नाही बाबा, जित्राप चाऱ्यावाचून कसं जगंल, पोरीचं लगीन काडलया, ते कसं व्हावं, असल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी माणसानं कुठं करायच्या? ज्योतिबा असल्या सगळ्या चित्तरकथा ऐकून घेतो. म्हणत काहीच नाही. पण ज्योतिबाला त्या सांगितल्या आणि त्यानं त्या ऐकल्या या समाधानात मग माणूस परततो. श्रद्धा म्हणजे तरी आणखी काय असते? आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कुणीतरी आपल्याला बळ देईल ही खात्री हीच श्रद्धा ना? आणि असं बळ देणारा, तुमच्याआमच्यासारखा दिसणारा असला तर मग तो देव उरत नाही, जिवाभावाचा होतो. जसा मला तो माझ्या मामासारखा दिसतो तसा. त्याला आदरानं नमस्कार केला तरी उठवून पोटाशी धरणारा. चांगभलं! ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

किती सुंदर वर्णन करावं ते!मला जोतीबाची मामांशी केलेली तुलना फार फार आवडली! जोतिबाला पहिल्यांदा गेले तेव्हा तो मुखवटा ठसला होता डोळ्यात! माणसातलाच एकजण देव बनलाय की काय अस वाटलं.पंढरीच्या विठूला तुळशी, व्यंकटेश्वराला कमळ आणि काय काय तसं या रानावणातल्या दैवताला दवणा वाहताना त्याला हे वेड बागड प्रेम आवडेलच असा उगाचच विश्वास वाटलेला.
ReplyDeleteमाझे कोल्हापूर चे दिवस डोळ्या समोर आले बघ! तुझ्या लेखणीची (की पॅड ची😁) कमाल!👌👌👌👌👌