Thursday, April 3, 2014

कुश लव रामायण गाती

स्थळ : कुणी न पाहावे अशा जागी
काळ : चालून आलेला
वेळ : सांगून न आलेली
पात्रे : लव आणि कुश
सूत्रधार :तर मंडळी, प्रसंग थोर आहे. प्रजाजनांच्या जिवाला घोर आहे. कुणाच्याही ह्रदयास पीळ पाडणारा आहे. इये मरहट्ट देशीचे हे राजकुमार प्रत्यक्ष जनताजनार्दनासमोर वग सादर करताहेत. प्रारंभीच ईशस्तवन झाले आहे. धूप फिरवला गेला आहे.
लव : हे भ्राता कुश, आपल्या कलहामुळे तर तात आपल्याला लवकर असे सोडून गेले नसतील ना?
कुश : हे वंदनीय लवा, तू माझ्यापरीस काही क्षणांनी का होईना, जास्त जग पाहिले आहेस. तुझे बरोबरही असेल.
लव : माझे सिंहासनारोहण व्हायच्याआधीच तातांनी असे निघून जायला नको होते.
कुश (चमकून): आं? तुझे रे कसले सिंहासनारोहण ? सिंहासनारोहण खरं तर माझे व्हायचे होते. तात मला घेऊन मृगयेला जायचे तेव्हा तू  पृष्ठभागी गळू झाल्याचं कारण सांगून घोड्यावर बसायचा नाहीस.
लव ( आठ्या पाडून ) : काही खोटं नसायचं ते.  मला अवघड ठिकाणी गळवं होतात त्याला मी काय करू? आत्तासुद्धा झालं आहे. सुरवारसुद्धा घालायची पंचाईत झाली आहे. दाखवू?
कुश : काही नको. आत्ताच भोजन झालं आहे. जरा व्यायाम करत जा. नुसता बसून खातोस, तातांनी तुला बसवून गोडधोड भरवलं आजवर. गळवं होतील नाही तर काय?
लव (कपाळावर आठ्या पाडून): तू नको मला शिकवू. तातांसारखी चित्रकला आली म्हणजे तात नाही झालास तू, मला बोलायला. मृगया तात करायचे, तू त्यानंतर सावजाशेजारी उभा राहून तसबीर काढून घ्यायचास. सगळ्यांना माहीत आहे.
कुश (भडकून) : कोण म्हणतं असं?
लव (शांतपणे) : सर्व नगरजन.
कुश : अरे एकदा! फक्त एकदाच मी ती तसवीर बनवून घेतली होती. आणि त्यावेळीही त्या रानमांजराची मृगया आम्ही एकट्याने केली होती! तातांनी केवळ त्याला आधी जायबंदी करून दिलं होतं इतकंच. तेसुद्धा ते माझ्याच अंगावर आलं तर मी घाबरू नये म्हणून. परंतु शेवटचा तीर मीच मारला होता.
लव (तुच्छतेने): हं:! रानमांजर ते काय!
कुश (आणखी भडकून): तू कधी मूषकाची तरी मृगया केली आहेस का रे? आपण राजे, क्षत्रियधर्माची ओळख व्हावी म्हणून बळेच एकदा तुला तातांनी अश्वावर बसवलं आणि या आपल्या नगरीतल्या नगरीत फेरफटका मारायला लावलं. मी नेहमीप्रमाणे रपेटीला गेलो होतो. तर मध्येच तातांचा दूत दौडत निरोप घेऊन हजर , लव सरकारांना रुग्णालयात नेलं आहे, आपण आलात तर बरं होईल. मी विचारलं , गळू का? तेव्हा दूत म्हणाला, होय, पण यावेळी जरा गंभीर स्थिती आहे. दोन्ही बाजूला झाली आहेत, पालथे पडून आहेत.
लव (संतापून): मी बोलावलं नव्हतं तुला! आणि हृदयाचे ठोके खूप वाढले होते म्हणून नेलं होतं मला! मला मुळीच घोड्यावर बसायचं नव्हतं. तातांनी बळेच बसवलं.
कुश (दूर नजर लावत): आणि जो अश्व मला हवा होता तो तुला दिला. मग मी शनिवारच्या बैलबाजारात जाऊन खटं पडलेला हा अश्व घेऊन आलों. लंगडतो, पण परवा नाशकापर्यंत जाऊन आलो. पुढे महिनाभर पागेत ठेवून पायी हिंडावं लागलं. पण तुला रुग्णालयातून परत प्रासादात याच लंगड्या घोड्यावरून मी घेऊन आलो हे विसरू नकोस.
लव:ठाऊक आहे! आता मी माझा अश्व वापरणार नाही आणि तात तो तुला देतील अशा आशेवर आला होतास ना?
कुश(जाम संतापून): अरे किती कृतघ्नता ही! मीही नाही एवढा कृतघ्न! पुढच्या वेळी गळू होईल तेव्हा मला बोलावलंस तरी येणार नाही.
लव: तू नेहमी माझ्या वाईटावरच असतोस.
कुश: तुझी कर्मंच तशी आहेत.
लव(महा भडकून):कुशड्या! तू आहेसच नीच आणि पाताळयंत्री!
कुश (अपशब्द वापरण्याचा मोह आवरत):हे दुर्दैवी नामाच्या भ्राता, तसेच अपशब्द मी तुला केले तर दुर्धर प्रसंग प्राप्त होईल.

विजांचा कडकडाट होतो आणि धीर गंभीर आकाशवाणी: अरे अरे अरे! अरे काय चालवलंय हे? इथे प्रजानन गांजले आहेत, रंजले आहेत, , मराठी जनांना वाली उरला नाही, वाणीजन नगरीला ग्रासले होतेच, आता भारतवर्षाला ग्रासू पाहत आहेत आणि इथे तुम्ही गळू, अश्व आणि सिंहासनावरून कलह माजवत आहात. जागे व्हा आणि प्रजेकडे पाहा, त्यांची दु:खे जाणा, त्यांचे निवारण करा. नाही तर सिंहासन आणि अश्व दोन्ही जातील आणि फक्त गळू राहील!

लव आणि कुश एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असताना पडदा पडतो.


 

No comments:

Post a Comment