नर्मदेच्या पात्रात कमरेएवढ्या पाण्यात भगीरथमहाराज प्रात:समयीचे पुरश्चरण करीत उभे होते. अजून तसे उजाडले नव्हते, पूर्वेकडे झुंजूमुंजू व्हायला लागले होते. दक्षिणेकडून खळ्ळखट्याकचे आवाज येत होते. उत्तरेकडून शिंकणे आणि खोकणे ऐकू येत होते. पश्चिमेकडे मात्र सर्व शांत, समृद्ध दिसत होते. फक्त किनाऱ्यावर सेवक कषायपेय उकळत होते त्याचा उथळ खळखळाट ऐकू येत होता. महाराजांचे कषायप्रेम सर्वज्ञात होते. पुरश्चरण झाल्या झाल्या त्यांना ते लागे. मग पुढील आन्हिके सुरु होत.
पूर्वजांची राख करणारा कपिलमुनींचा श्राप अद्याप धगधगत होता. तो श्राप फक्त गंगेच्या पाण्यानेच धुऊन निघणार होता. त्याला कित्येक वर्षे झाली. पिढ्या लोटल्या. पूर्वजांच्या पापाचा परिणाम राज्यावर दिसत होता, भूकंप, दंगलींसारखे दैवी कोप वाढले होते. ती पापे कशी धुवून काढायची हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला प्रश्न होता. आज्यापणजांनी खूप तपें केली, गंगामैया काही प्रसन्न झाली नव्हती. एखाद्या युवतिसाठी तन आणि धनच काय मनही अर्पण करावे, पण तिने ढुंकूनही पाहू नये अशी काहीशी अवस्था होती. भगीरथमहाराज स्वत: श्रेष्ठ तपस्वी तर होतेच, पण एक उत्तम शासकही होते. ध्यानधारणा, जपजाप्य यात प्रजेकडे दुर्लक्ष होऊ देत नसत. एक वेळ प्रजेला अन्न मिळाले नाही तरी चालेल, पण प्रत्येकाने "ओम नमो शिवाय" या सप्ताक्षरी मंत्राचा जप केल्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही असा दंडक त्यांनी घालून दिला होता. शिवाय औद्योगिक क्रांतीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या साधनेमुळे गंगामैया जरी प्रसन्न झाली नसली तरी गेलाबाजार नर्मदामाई आणि तिच्या काठावरचे कारखानदार तरी पाच वर्षातच प्रसन्न झाले होते. विस्तीर्ण रस्ते, भव्य प्रासाद, उत्तुंग मनोरे, भवताली सर्वत्र दिसत होते. झालेल्या उन्नतीवर रोजगारी भाट दररोज नवीनवी काव्ये करीत. त्यांना भरपूर अनुदाने मिळत. त्यांचा चरितार्थ उत्तम चालला होता. कधीकधी शेजारच्या राज्यातील कुडमुडे राजेही भगीरथाच्या राज्यात प्रगती पहायला येत असत आणि वैषम्याने परत जात.भगीरथमहाराज स्वत: प्रजेला विचारत,"काय झाली आहे की नाही प्रगती?" विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणा किंवा घाबरलेल्या छातीने म्हणा, प्रजा मान डोलवत असे. महाराजांचे रूप जरब बसवणारे असले तरी हृदयात कणव आहे असे सर्व म्हणत.
असे सर्व असले तरी नर्मदेच्या पाण्याने पापे धुऊन निघणार नव्हती. आणि कारखानदारांचा नीती-पुण्याशी कधी संबंधच येत नसे. ते निस्संग असत. नर्मदेचे पाणी काय किंवा गंगेचे काय हात धुऊन घेता आले म्हणजे झाले. पण भगीरथमहाराजांना गंगेचे पाणी अगदी आवश्यकच होते. तिच्या पाण्याने सर्व पापे एकदम धुऊन निघून सर्वांग सोन्याचे होणार होते, पितरांची नरकातून स्वर्गात बदली होणार होती, कारखानदारांच्या गुंतवणुकीची परतफेड होणार होती. महाराजांच्या ऐहिक प्रगतीची परमावधी कधीच झाली होती, आता गरज होती परमार्थाची, पितरांच्या आत्म्याच्या मुक्तीची. परमार्थाची आस वगैरे ठेवणे हे त्यांच्या स्वभावाला धरून झाले नसते. फारच सामान्य झाले असते. भगीरथमहाराजांच्या शब्दकोषात विनंती, आस, करुणा कधीच नव्हते. ते कृती करून मोकळे होत.
पण पूर्वीसारखी स्थिती राहिली नव्हती. आता भगीरथमहाराजच नव्हे तर इतरही अनेकजण गंगामाईच्या मागे हात धुवून लागले होते. त्यात वर्षानुवर्षे राज्य केलेले राजे होते, औट घटकेचे राज्य केलेले राजेही होते. हौशे, नवशे, गवशे सर्व होते. सर्वांनाच झटपट पापमुक्ती हवी होती. गंगामैय्यासुद्धा किती जणांची पापे धुणार? भगीरथमहाराज काही कमी नव्हते. पूर्वीचे भाबडे लोक स्वत: तपश्चर्या करायचे आणि वर्षानुवर्षे घालवायचे. भगीरथमहाराजांनी प्रजेलाच तपश्चर्येच्या कामी लावले. गंगामाईला आणलेत तर रामराज्य येईल, कसलीही ददात उरणार नाही, परकीय आक्रमणे थांबतील, आपल्या आयाबहिणींवर होणारे अत्याचार थांबतील, एकही माणूस रिकामा बसणार नाही, सर्वांना काम आणि त्याचे योग्य दाम, आणि तुम्ही जर गंगामाईचे मन वळवले नाहीत तर…(महाराजांनी असे वाक्य अर्धवट सोडले की प्रजेच्या अंगावर शहारा येई) इत्यादि घोषणा ऐकून प्रजा कामालाच लागली. भगीरथमहाराज एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तडक गंगामाईलाच जरब दिली, आमच्यावर प्रसन्न झालात तर तुमचा विकास होईल, नाही झालात तर तुमचाच किनारा भकास होईल. तेव्हा तुम्ही आता आढेवेढे न घेता आमच्यावर प्रसन्न होण्याबाबत विचार करा.
महाराजांचे पुरश्चरण संपले. धूतवस्त्र परिधान करून महाराज कषायपेयाचा आस्वाद घेत असतानाच दूत हजर झाला. "महाराज, खबर अशी आली आहे की, वाराणसीनगरी गंगामैय्याने स्वत:च तपश्चर्या सुरु केली आहे! म्हणे भगीरथमहाराज प्रसन्न झाल्याशिवाय मी वाहायची नाही. त्यांनी स्वत: येथे येऊन आपल्या चरणकमळाने मला पावन करावं!" महाराज गूढ हसले. दूताला म्हणाले,"उत्तम खबर. आम्ही भाग्यवानच. स्वत: मातेने आम्हाला बोलावलं. आम्ही त्या आमंत्रणाचा अव्हेर कसा करू? म्हणावं निघालोच आम्ही. एवढं आमचं कषायपेय संपवतो."

No comments:
Post a Comment