Tuesday, April 15, 2014

हिरवा राघू

आमच्या गावी दर शनिवारी बाजार भरत असे. आजूबाजूंच्या खेड्यातून शेतकरी भाज्या, कणसे, ज्वारी, केळी, कलिंगडे असं काय काय विकायला घेऊन येत. पोरांसाठीपण अनेक गोष्टी असत. विजेवर चालणारा चक्री पाळणा, छर्रे उडवायच्या बंदुकीतून फुगे फोडण्याचा तंबू, असलं बरंच काही असायचं. कुडमुडे ज्योतिषीही असायचे. मांडी घालून बसलेले. शेजारी छोटासा लाल रंगाचा चौकोनी लाकडी पिंजरा. त्यात एक पोपट. दुसरा एखादा मागे ठेवलेला. हा ज्योतिषी नुसते भविष्य सांगायचा असे नाही, मध्येच पोपटांकडून खेळ पण करून घ्यायचा. ते पोपट बोलायचे, तारेवर चालून दाखवायचे. मग त्यानंतर त्यांना एक पेरूची फोड मिळत असे. मग ते परत आपापल्या पिंजऱ्यात जाऊन बसायचे. मला कधीच ते पोपट काय बोलताहेत ते कळले नव्हते. पण लोक टाळ्या वाजवायचे याचा अर्थ ते काही तरी समजेल असे बोलले असणार असे मी गृहीत धरायचो. बरेच लोक काही न देताच निघून जायचे. काही लोक चवलीपावली टाकायचे. काही लोक मग थांबून उकिडवे बसून हात दाखवत. एक रुपयात आपले लाखमोलाचे भविष्य ऐकत. भविष्यात आनंद आहे की आनंदीआनंद हे त्या पोपटाच्या हातात, आपलं, चोचीत असायचं. जो स्वत: पिंजऱ्यात आहे, पुढे मिळणाऱ्या पेरूच्या फोडीवर अथवा मिरचीच्या तुकड्यावर ज्याचे आयुष्य चालले आहे, ज्याला स्वत:च्याच भविष्याचा पत्ता नाही अशा त्या दुर्दैवी पक्ष्याकडून आपण आपल्या भविष्याचे पाकीट काढून घेत आहोत हे अशा लोकांच्या गावीही नसायचे. ज्योतिष्याच्या बेरकी चेहऱ्यावरचे भाव वाचता येत नसत. पोपटाच्या चेहऱ्यावर गंभीर ऋषीचा भाव असायचा. ऐकणारा मात्र आशेने नजर लावून बसलेला असायचा.

पण चूक पोपटाची नाही. गांधी टोपी घालून पांढरे कपडे परिधान करून, कपाळावर उभी गुलालाची रेघ काढून बसलेला करता करविता असा तो कुडमुड्या ज्योतिषी, तो जसे शिकवेल तसेच हा पोपट करणार आणि बोलणार. गंध लावून आलेल्या गिऱ्हाईकासमोर "राम राम!" आणि मुल्लासारखी टोपी घातलेल्यासमोर "वालेकुम अस्सलाम!" शेवटी दोघांकडून चवलीची अपेक्षा आहे. मुल्लासमोर राम राम घातला तर ती चवली कशी मिळणार? वास्तविक, आमच्या गावात गंधशेंडीवालेही हजरत अलींच्या दर्ग्याला जाऊन ऊद जाळतात, गुलाल टाकतात, चादर चढवतात, नवस बोलतात. आमच्या घरी नेहमी येणारा शिकलगार, गणपतीच्या देवळात नियमित जातो. त्याच्या अब्बूंनी त्याचे नावही गणेश रहिमान शिकलगार असे ठेवले आहे. धर्म आणि श्रद्धा ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. पण जेव्हा जमावाच्या धर्माची गोष्ट होते तेव्हा तिचे रूप बदलते. हे आमच्या त्या कुडमुड्या ज्योतिषालाही कळते आणि त्याचा तो उपयोग आपली वीतभर खळगी भरण्यास करतो. आणि पोपट तर बोलून चालून बोलका राघू. कुठे वन्दे मातरम म्हणायचे आणि कुठे दातखीळ बसवावी हे त्याच्या धन्याने शिकवावे आणि त्याने ते निमूटपणे करावे. अशा राघूंची चोच जरी भगवी असली तरी अंग हिरवे असते. आणि त्यांना फक्त बोलायचेच असते. करायचे कुठे काय असते? भविष्य ऐकून गेलेला मनुष्य कधी परत येऊन ते खोटे ठरले म्हणून मुंडी धरणार नाही याची खात्री असते. शिवाय आलाच जर असा कोणी संतापून परत, तर, "काय गरिबाला झोडता साहेब? पोट भरतोय साहेब." अशी केविलवाणी आळवणी करायची. चवलीच्या किमतीच्या भविष्याची ग्यारंटीही चवलीकिमतीची.

दुर्दैवाने अशा पोपटपंचीला आकाशवाणी समजून बसलेल्यांची संख्या वाढली आहे. ही पोपटपंची ऐकून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक, ती खरी व्हायच्या आधीच अशा पोपटांचे गुणगान करीत आहेत. संख्या अथवा पाठीराखे हेच गुणांचे प्रतीक अशी लौकिक व्याख्या असल्याने उन्माद वाढतो आहे. अर्थात हेच मुंगेरीलाल, स्वप्नभंग झाल्यावर पोपटाची पिसे काढणार आहेत. तूर्तास हे राघू काहीही बोलले अथवा लाचारीने चूप राहिले तरी ते गोड लागणार. स्वप्ने विकणे हा पूर्वापारपासून चालत आलेला धंदा आहे. असे राघू बोलत राहणार, दुर्दैवी लोक निर्बुद्ध श्रद्धेने डोळे मिटून त्यांच्यामागे जाणार. सुजाण लोक चवली टाकून ऐकत राहणार. गम्मत बघणार. पण आपले जवळचे कुणी आजारी असेल तर या पोपटांकडे जाऊन भविष्य बघण्यापेक्षा, डॉक्टरकडेच जाणार.

शेवटी शनिवारच्या बाजारात सर्व प्रकारचे लोक भेटणार. भाजीवाले, भविष्यवाले, अगदी खिसेकापूसुद्धा. आपण आपला पैसा भाजीभाकरीवर खर्च करायचा की पोट रिकामे ठेवून भविष्य ऐकून ते भरेल या आशेने कुडमुड्या पोपटाची धन करायची हे आपण ठरवायचे. शिवाय पोटापलीकडेही जगणे असते. त्याला स्वाभिमान, देशप्रेम, मातृभूमीप्रेम म्हणतात. स्वत:च्या आईला आई म्हणण्यास आणि तिला वंदन करण्यास आम्हास तरी लाज वाटत नाही. वन्दे मातरम!

No comments:

Post a Comment