Friday, April 11, 2014

टवाळां आवडे विनोद

नुसत्या टिवल्याबावल्या करायला हव्यात, टवाळी हवी, जरा काहीतरी गंभीरपणे करायला शीक असे मातोश्रींकडून नेहमी सांगणे होई. त्यानंतर साधारणपणे अर्धा तास गांभीर्यात व्यतीत होई. हा अर्धा तास "तो अमुक तमुक बघ, किती अभ्यास करतो, किती केंद्रित आहे, पुढे काय करायचे आहे त्याचे पूर्ण भान ठेवून आहे, त्याच्याकडून शीक काहीतरी शहाणपण" इत्यादि वात्सल्यापोटी उद्भवलेली मातृवचने ऐकण्यात जात असे. थोडक्यात, जीवन ही शर्यत आहे, टवाळी करत वेळ काढला तर तुम्ही हरणार असे काहीसे बाळकडू लहानपणीच मिळते. मग अशी शर्यतीत उतरलेली बाळे फक्त अभ्यासच करतात, मोठी होतात, लौकिकार्थाने यशस्वीही होतात, पण आनंदाचा मोठा ठेवा लहानपणीच घालवून बसतात. कुतूहल हरवून बसतात. कुतूहलाने निरीक्षण करणे हा विसंगती ओळखण्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे. विसंगती ओळखता येणे हेच शिक्षण असते. जी मुले लहानपणी टिंगलटवाळी करतात त्यांना विसंगती जाणवत असते. परंतु मोठी माणसे हा त्यांचा गुण दाबून टाकतात. अर्थात बालबुद्धीला अनुसरून त्यांच्याकडून (मुलांकडून!) वर्तन होते आणि बोलणी खाल्ली जातात हेही खरे.

ज्या समर्थांनी "टवाळां आवडे विनोद" असे म्हटले त्यांनीच मूर्खलक्षणेही लिहिली. दररोज हजार बैठका आणि हजार जोर यांच्या जोरावर ते ती मूर्खांसमोरच वाचूनही दाखवत. समर्थांसारख्या गंभीर प्रकृतीच्या संताने ही लक्षणे का लिहिली असतील असा मला प्रश्न पडतो. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी कुणा टवाळस्वामीने, समर्थ ध्यानाला बसायच्या आधी हळूच जाऊन कुबडीवर खाजकुयली टाकली असण्याची शक्यता आहे. मग समर्थांनी दो बाहू, पर्यायाने काखा उंचावून "बुडाला औरंग्या पापी, म्लेञ्छसंहार जाहला" अशी आरोळी ठोकल्याचा उल्लेख आहे. शिष्यांपैकी कुणी गुन्हा कबूल न केल्याने हताश होऊन मग समर्थांनी मूर्खलक्षणे लिहून आपला क्षोभ शांत केला असावा. अर्थात येथे "औरंग्याला" का शिव्या असा प्रश्न कुणालाही पडेल. त्याचे उत्तर असे की, आकस्मित क्षोभ प्राप्त झाल्यास जे त्वरित गालिप्रदान केले जाते त्यात ज्याचा (किंवा जिचा) उल्लेख होतो त्याचा मूळ रागाच्या कारणाशी काहीही संबंध नसतो. गरजूंनी विचार करून आठवून पाहावे. जगातील सर्व प्रात:स्मरणीय मातांना (त्यांचे चरणी माझे वंदन) नेहमी निष्कारण उचक्या लागत असतात.

परंतु सर्वच विनोद टवाळी करणारा असतो? तसे असते तर पुलं , शंकर पाटील, दमा मिरासदार हे अस्सल देशी आणि पी. जी. वुडहाऊस सारथे विदेशी साहित्यिक झाले नसते, चार्ली चाप्लीनसारखा नटही झाला नसता. बोचरा विनोद फक्त तो करणाऱ्याला आनंद देऊन जातो. फक्त टवाळी करणारा हा विनोद करणाऱ्याला आनंद आणि ज्याच्यावर केला आहे त्याला चीड, दु:ख देऊन जातो. टवाळीत हीन दर्जाचे शब्द, विचित्र हावभाव वा अंगविक्षेप वापरले जातात. शिवाय या दोन्ही प्रकारातून काही निष्पन्न होत नाही, फक्त माणसे आणि मने दुरावतात. प्रहसन आणि उपहास मात्र वेगळ्या जातकुळीतील विनोद असतात. दोन्हीतून काहीतरी सांगायचे असते. प्रहसन आणि उपहास यातही फरक आहे. उपहास फारसा हसवत नाही, पण अनिष्ट गोष्टींबद्दल प्रक्षोभित जरूर करतो. शि. म. परांजपे यांचे लेखन त्या कुळीतील होते. पण त्याने कुणी दुखावल्याचे दिसत नाही. प्रहसन हे थोडेसे चिमटे काढत नर्म विनोदाबरोबर प्रक्षोभित न करता काहीतरी विचार देऊन जाते. काही वेळा थोडेसे खिन्न पण करून जाते. प्रहसनातून एखाद्या चांगल्या कार्याची हेटाळणी कधीच होत नाही. विसंगतीतून, वैशिष्ट्यपूर्ण मानवी आचारातून विनोद घडत असतो. सर्व लोक ते पाहत असतात, त्यांना ते उमगते पण. म्हणूनच जेव्हा प्रहसनातून विसंगतीचा पुन:प्रत्यय येतो तेव्हा त्याचा राग यायचे कारण नसते. अर्थात गुन्हेगारी वर्तन वा गुन्हा यांचे प्रहसन करता येत नाही, अथवा करूही नये. ज्या घटनांचे गांभीर्य टिकवायला हवे त्यावर विनोद करणे उचित नसते.  प्रहसनात वैयक्तिक टीकाही असू नये. कृती-कर्म, आचार-विचार यांच्यातील विसंगतीवर असावी. तर मंडळी, प्रहसनामागील विचार पाहा, त्याचबरोबर हसून आपले आयुष्यही वाढवा. काडेचिराईती चेहऱ्याने वावरू नका. कधीकधी स्मितहास्यपण करा.

No comments:

Post a Comment