Saturday, April 19, 2014

इतिहासाचे नागरिकशास्त्र

इभूना- एक असा शब्द जो शाळेत असताना चेहऱ्यावर "कुणी मला अभ्यासाला घेता का? अभ्यासाला?" अशी श्रीराम लागूंची अजीजी घेऊन वावरत असायचा. गरजूंनी लागूंचा चेहरा डोळ्यासमोर आणावा. गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र असल्या प्रभृतींच्या वाड्याबाहेर वळचणीला उभा असल्यासारखा. मग लोकही दानधर्माचे पुण्य पदरी पडत असल्याप्रमाणे परीक्षेच्या आधी एक दिवस अभ्यासाची भिक्षा घालत. "थे भुते नाचतात" असे त्याचे वात्रट नामकरणसुद्धा झाले होते. सद्य परिस्थितीत लोकशाहीच्या पाईकांचे जे काही नर्तन चालू आहे ते पाहिल्यास इभुना, हा शब्द योग्यच वाटतो. इतिहास आणि नागरिकशास्त्र यांच्या अभद्र युतीमध्ये मध्ये भीषण भुते नाचत आहेत. आणि आपला बिघडलेला भूगोल मात्र केविलवाणा असा कोपऱ्यात बसला आहे.

इतिहासाशी माझे वाकडे नव्हते, आजही नाही, फक्त मार्कांपुरती तडजोड होती. गुरुजनही या विषयाला धरून कधी आमच्या मागे लागल्याचे आठवत नाही. मला वाटते त्यांनाही त्यांच्या शालेय जीवनातील इतिहासातील लढाया, सन, कोण कुणाला कधी काय म्हणाले वगैरे प्रकार आठवून आमची दया येत असावी. पण हल्ली मात्र इतिहासाला चांगले दिवस आलेत. जो तो उठतो तो आईमाई काढल्यासारखा दुसऱ्याचा इतिहास काढतो. निवडणुका जवळ आल्या की मग कसा एक एक जण जणू काही इतिहासाचार्य वि. का. राजवाडेच. ज्याच्या इतिहासाचे ज्ञान शिवाजीमहाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला इथपासून सुरु होऊन पहिल्या बाजीरावाने मराठी झेंडा अटकेपार (म्हणजे नेमका कुठे हे माहीत नाही. गावाचे नाव की केवळ विशेषण?) नेला इथे संपते, तो आज निवडणूकज्वराने फणफणून इतरांच्या इतिहासाच्या ज्ञानाचे वाभाडे काढत आहे. दुसऱ्याला "फेकू" म्हणत आहे.  शाळेत शिकवलेला इतिहास आणि निवडणुकीत जिंकायला लागणारा इतिहास यात फरक असावा. पण राजकारणात स्मरण ठेवणे आणि विसरणे दोन्ही आवश्यक आहे असे दिसून आले आहे. मग आपण कोणती वचने दिली होती, काय काय फुकट देणार म्हणालो होतो हे विसरता येते. पण त्याच वेळा विरोधी उमेदवार कुठे, किती वाजता आणि काय म्हणाला याचे सूक्ष्म स्मरण ठेवता येते. असा इतिहास जर शाळेत शिकवला तर विद्यार्थी या बाबतीत कच्चे राहणार नाहीत. अभ्यासक्रमात अशा इतिहासाचा अंतर्भाव व्हायला हवा.

नवीन इतिहासाच्या भावी विद्यार्थ्यांसाठी काही भावी नमुना प्रश्न -
कोण कुणाला कधी म्हणाले ते लिहा  (कोणतेही ५)-
१. बडे बडे शहरो में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है.  (२ गुण)
२. आपल्या गावात मतदान करून झाल्यावर ती शाई पुसा आणि मुंबईला मतदान करा (२ गुण)
३. आता धरणात पाणी नाही तर आमी काय करायचं? xxयचं का त्यात? (२ गुण)
४. उचला रे त्याला! (२ गुण)
५. क्या? थप्पड मारा? एकही मारा?  (२ गुण)
६. अगर सरपे बंदूक रख दी जाये, तो नमोको सपोर्ट करेंगे. (२ गुण)
७. अरे तेलकट बटाटेवडा त्यांना खायला देता? कुठं फेडाल हे पाप? (२ गुण)

पर्याय - प्रश्न क्र. ४ अथवा ७ ची नाट्यछटा साभिनय सादर करा आणि तसे काही म्हणाले नसल्याचे सिद्ध करा (१० गुण)

इतिहास, भूगोल परवडला, पण नागरिकशास्त्र नावाचा जो रटाळरस प्यावा लागे त्याने इंन्स्टंट समाधी लागत असे. ज्यांना निद्रानाशाचा विकार जडला आहे अशा गरजूंनी जरूर प्रयोग करून पहावा. आमच्या पुस्तकात तर लोकसभा, राज्यसभा सदस्य संख्या दाखवणारे चित्रसुद्धा होते. त्यात बिनचेहऱ्याची झोपाळू दिसणारी टोपीरत्ने दाखवण्यात आली होती. संमोहनतज्ञ जसे एखादी वस्तू वापरून संमोहननिद्रेत टाकतात तसा या चित्राचा परिणाम माझ्यावर होत असे. पुढे लोकसभेत गाढ व शांत (इथे गाढ आणि व असे दोन वेगळे शब्द आहेत याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद!) झोपलेले खरेखुरे सदस्य पाहून शिकवलेले सगळेच काही निरर्थक नसते असे वाटले. नागरिकशास्त्र दहावीपर्यंतच झाले. पण ते सत्याशी इतके जवळचे आहे हे पाहून वाटले पुढे नागरिकशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले असते तर लोकशाहीचे बारकावे शिकता आले असते. बेरजेचे राजकारण म्हणजे काय, जाहीरनाम्याचा पंचनामा, विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या चारित्र्याचे रसग्रहण, सभा आणि गर्दीचे समीकरण, आणि ते कसे सोडवावे हेसुद्धा, एकगठ्ठा मते आणि अल्पसंख्यांक,  मतदानकेंद्रे कशी चालवावीत, मतपेट्या हाताळणी, निकालानंतरच्या वाटाघाटी असे अनेक विषय लहानपणीच्या नागरिकशास्त्रात नव्हते. ते शिकता आले असते. नवीन नागरिकशास्त्रात याचा अभ्यास शाळेपासूनच लावला पाहिजे.

नवीन नागरिकशास्त्राच्या भावी विद्यार्थ्यासाठी भावी नमुना प्रश्न -
कोणतेही तीन प्रश्न सोडवा (१० गुण)
१. पक्ष १ कडे २८ जागा, पक्ष दोन कडे ३२, पक्ष ३ कडे ८ आणि फुटकळ पक्ष २. योग्य समीकरणे जुळवून सरकार बनवून दाखवा.
२. प्रश्न क्र १ मधील सरकार किती दिवसांत पडेल याचे समीकरण आकड्यात लिहून सिद्ध करा.
३. प्रश्न क्र १ मधील फुटकळ पक्षांचा समीकरणातील प्रभाव किती प्रतिशत असेल? (गृहित - एका सीट साठी २० खोका)
४. आपल्या राज्यात अभूतपूर्व प्रगती झाली आहे हे केवळ आकडे देऊन सिद्ध करा. (गृहित - प्रगती झाली आहे)
५. लोकशाही आणि गुन्हेगार उमेदवार यांच्यातील संबंध सोदाहरण स्पष्ट करा आणि दोन्ही एकमेकाला कसे पूरक आहेत ते सिद्ध करा. (स्थानिक उदाहरणे टाळा.)
६. प्रभाग क्र २ मधील मतदार मुख्यत्वे विरोधी पक्षाला मत करणार असे दिसून आले आहे. मतदाराला न दुखवता अथवा कळू देता मते कशी मिळवाल ते पर्याय स्पष्ट करा (गृहित - मतदार सुशिक्षित आहेत. आमिषाचा वापर चालणार नाही)

पर्याय - प्रश्न क्र १ आणि २ साठी १५ मिनिटांची एकांकिका लिहा. (३० गुण)

चालू शिक्षण (चालू हे विशेषण नाही ) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असा नवीन अभ्यासक्रम आणणे आम्हांस आवश्यक वाटते. आमच्या या विचारसरणीवर शिक्षणमंडळ विचार करील काय? अभ्यासक्रम काहीही येवो. नमो, पप्पू, केजरीसर आदि महानुभाव भावी इतिहासाच्या पुस्तकात नक्की असणार आणि भावी विद्यार्थी त्यांच्या चित्रांना दाढीमिशाही नक्की काढणार. नमोंना त्याची सोय आधीच करून ठेवली आहे. चिंता पप्पू आणि केजरीसरांनी करावी.

No comments:

Post a Comment