२८ डिसेंबर २०१३ - आज महत्वाचा दिन. पण उठवत नव्हते. नेहमी पाचच्या ठोक्याला जाग येणारा मी आज सहापर्यंत लोळत होतो. शेवटी सौभाग्यवतींनी,"उठा आता, पुरे झाले लोळणे. शपथविधीला जायचं नाहीये का? तरी मी बजावत होते, जळ्ळ्या मेल्या लष्करच्या भाकऱ्या त्या!" असा गजर करून जाग आणली. सकाळी पाच वाजता नळाला पाणी येते त्यामुळे तिला उठावेच लागते. आज नाकधौती, कपालभातिला सुट्टी. आंघोळ करून तयार झालो. कपाटातून नवीन मफलर आणि इस्त्री केलेली आमटोपी काढली. ती परिधान करून आरशात स्वत:ला निरखत होतो तेवढ्यात परत सौ म्हणाली,"पुरे झालं आता स्वत:लाच बघणं. ट्रेनमधून जाणार आहात, पोचेपर्यंत टोपीची इस्त्री टिकली म्हणजे मिळवली. आणि तो पास विसरू नका. आपलं नशीब एवढं थोर की, पास घरी विसरायला आणि नेमका त्यादिवशी समोर टीसी यायला एकच गाठ पडायची. विदाऊटतिकीटच्या दंडानं कारकीर्दीची सुरवात नको व्हायला. मेलं आमचं काय.." पुढचं न ऐकता बाहेर पडलो. आम आदमीचं आयुष्य असंच का असावं? ट्रेनला नेहेमीप्रमाणे प्रचंड गर्दी. आत घुसायला देत नव्हते. अहो माझा शपथविधी आहे आज असे सांगून पाहिले तर एक उद्धट इसम,"हमकू क्या अलिबागसे आयेला समझा है क्या? हमारा तो ऑफिसमें रोज शपथविधी होता है बॉस के सामने" असे म्हणाला. शेवटी एकाला दया येऊन ट्रेन सुटता सुटता त्याने हात देऊन आत ओढले. ज्या हाताशी दोन हात करायचे त्याच्याच मदतीने दिवसाची सुरुवात व्हावी याचे वैषम्य वाटले. सुदैवाने डोक्यावर पंखा आला होता आणि तो चालूही होता. रामलीला मैदानावर पोचलो आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून भरते आले. तिथेही पोलिस आधी आत सोडत नव्हते. शेवटी कॉंग्रेसच्या एकाने येऊन ,"ए चुलबुल पांडे! चल छोड उसे अंदर! उसकाही शपथविधी है" असे त्याला झापले. एक गोष्ट मात्र खरी , या कॉंग्रेसवाल्यांना पोलिसांना कसे हाताळायचे हे चांगले कळते. तो पोलिस लेकाचा मला सॉरी पण म्हणाला नाही. बरोबर आहे, मी काही त्याची बदली करू शकणार नाही त्याला माहीत आहे. खरं तर आत सोडत नाहीत या बहाण्याने शपथविधी टाळता आला असता. पण हे कॉंग्रेसवाले चालू आहेत. म्हणून तर तिथे येऊन मला आत सोडायला लावले. यांना नुसती मजा पाहायची आहे असा संशय आहे मला. उगाच नाही विनाअट पाठिंबा दिला. जरा थांबा, हे लोकपाल आणतोच आता, मग पाहतो कोण मजा पाहते. पण शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. जे विधेयक ज्या चोरांना चाप लावणार तेच चोर हे मंजूर करतील?
जवळजवळ लाख लोक शपथविधीला उपस्थित होते. कमीत कमी इतक्या लोकांना फुकट वीज द्यावी लागणार? हे आधी कोणी कसं बोललं नाही? फुकटेपणा हा आपल्याला मिळालेला शाप आहे असे मला मनापासून वाटते, पण खरं ते सांगून निवडणूक जिंकता येत नाही असे कार्यकर्त्यांचे मत पडले. काही काही वेळा आमचे कार्यकर्ते मला घोड्यावर बसवून स्वत: नामानिराळे राहतात असे वाटते. असो. पाहू. रामलीला मैदानावरून गाडीने ऑफिसमध्ये आलो. गाडी खूपच छोटी होती. चपळाई करून पुढे बसायला गेलो तर हा लेकाचा सोमनाथ आधीच जाऊन मख्ख चेहरा करून बसलेला. मेहरा आणि वालिया यांना हरवल्यापासून त्याला वाटतं आपणच पक्षाचा अर्ध्वयू. शेवटी मागच्या सीटवर मनीष आणि राखी बिर्ला यांच्यात अंग चोरून बसलो. काय भयानक अत्तरं लावतात हे लोक.
आज सलग सहा तास काम केले! प्रथम या नऊ चोरांच्या बदल्या करून टाकल्या. टेबलावर उभे राहून टारझनप्रमाणे छातीवर हात बडवून आरोळी ठोकावी असे मनात आले होते, पण बरे दिसले नसते. शिवाय मुख्यमंत्र्याला गंभीर दिसले पाहिजे. पण एंग्री यंग कॉमन म्यान लुकही हवा. मग कालापत्थर मधल्या अमिताभ बच्चन सारखा चेहरा करून काम केले. थकावट जाणवत आहे. आता उद्या काही ट्रेनने जाणार नाही. इतकेही काही आम नाही राहिलो आता.
३० डिसेंबर २०१३ - परवा ज्यांच्या बदल्या केल्या होत्या त्यातले दोघे तिघे सकाळी नऊ वाजल्यापासून पासून येऊन बसले होते. गर्भित धमकी देत होते. म्हणाले "सरजी, आप तो सिर्फ तबादला किये है. निकाल तो नही दिये. अगर फिरसे बुलाते है तो आपके काम आयेंगे, नही तो आपकोभी प्रोब्लम हो सकती है." मी म्हणालो,"भई हम तो आम आदमी है. आम आदमी नंगा होता है. और नंगे से खुदा भी डरता है." असे म्हणून आळस द्यायला उभा राहिलो आणि हात वर ताणले तर त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, सगळे धडपडत उठले आणि त्वरेने दालनातून बाहेर पडले. जाता जाता "पता नही, उतार भी सकता था.." असे एकाचे काहीसे शब्द कानावर पडले. मग त्यावरून आठवले. लगेच जाऊन टंकलेखकाकडून राजीनामापत्र टाईप करून घेतले. खिशात ठेवून दिले. राजकुमारसारखे. बाथरूम मध्ये जाऊन आरशात पाहून "कलेक्ट्री तो हम शौक से करते है, रोजी रोटी के लिये नही. दिल्ली तक बात मशहूर है के राजपाल चौहान के हात में तंबाकू का पाईप रहता है और जेब में इस्तिफा!" असे म्हणूनपण पाहिले. पण टोपीमुळे तेवढे प्रभावी दिसले नाही. मग ओमप्रकाश स्टाईलने डुगडुगत्या मानेने म्हणून पाहिले "वाह वाह वाह.. अम..अमममहंहं.. बर्खुरदार, हम इस्तिफा.." ते जास्त बरे वाटले. पण आता राजकुमारचे डायलॉग पाठ करून ठेवले पाहिजेत. शिंचे नेमक्या वेळेला शब्द आठवत नाहीत. मग सगळा प्रभाव निघून जातो. नंतर आंघोळ करताना मात्र सगळे आठवतात.
विजेचे काहीतरी करायला हवे आता. ऑडिट करण्यासाठी लेटर्स ड्राफ्ट करायला हवीत. मायना काय असावा? "प्रिय" ने सुरुवात करावी की "महोदय" ने? प्रिय म्हणावे तर लाडात येऊन "जाऊ द्या ना गडे" म्हणतील, महोदय म्हणावे तर "उद्या या, बघू, आत्ता वेळ नाही" म्हणतील. आमची ही मोलकरीण लवकर उगवली की "नंतर ये गं बाई, अजून भांडी पडली नाहीत" म्हणते तसेच. प्रश्नच आहे. सोमनाथ म्हणतो पत्रे कसली पाठवता, तडक धाडच घालू. हा मनुष्य कालाजामुन खातो आणि उगाच हायपर होतो. आज सकाळी सुद्धा मीटिंगला दांडी मारून स्टेशनच्या बाहेर जलेबी आणि खडीचम्मच दूध चापत उभा होता. त्याला आवरले पाहिजे.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment