Monday, April 14, 2014

माईंड इटटट!


पेप्रात बातमी दिसली. नमो गेले साऊथ(थ पूर्ण उच्चार) इंडियात (त पूर्ण उच्चार). सूssपरस्टार रजनीला भेटायला. छान इडली(ड पूर्ण उच्चार) चटणीसांबार खात होतो, चमच्यातील इडलीचा तुकडा एकदम खाली सांबाराच्या वाटीत पडला. आं? हा गृहस्थ कसा आणि कुठे उगवेल काही सांगता येत नाही. कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नमोंच्या हालचालीवर लक्ष ठेवायला हवे अशी चर्चा झाली होती. जबाबदारी कोण घेणार असे केजरीसरांनी विचारले. बाकीच्यांनी चपळाईने काहीतरी करण्यास सुरुवात केली. बरेच जणांनी आपापल्या लॅपटॉपमध्ये डोके घातले, काही जण काही तरी लिहिण्याच्या बहाण्याने उगाच कागदावर गिरगटू लागले. नेमका मी गाफीलपणे शून्यात नजर लावून सरांच्या मागील भिंतीवर एक पाल किडा पकडत होती ते पाहत होतो आणि आयता सापडलो. सरांना वाटलं मी त्यांच्याकडेच पाहतोय. खूष होऊन मला म्हणाले, "छान! मग तूच घे ही जबाबदारी".  मी मान डोलावली आणि शेजारी आमचा मोरू बसला होता त्याला विचारलं,"कसली चर्चा चालली होती रे? आणि कसली जबाबदारी मला देताहेत?" मोरूने कागदावर झाडूचे चित्र काढले होते, त्यावर केजरीसर हॅरी पॉटरसारखे बसले होते. त्यांच्या गळ्यातील मफलर एखाद्या विजयपताकेप्रमाणे फडफडत होता. मला म्हणाला, आपण निवडणूक जिंकलो ना की हे चित्र मी सरांना भेट म्हणून देणार आहे. मोरू आमचा तसा सरळबुद्धी आहे पण लेकाचा चित्रे छान काढतो.  म्हणाला, सरांनी मला त्यांच्या आगामी "भ्रष्टाचारमुक्तीचे अठरा सोपान - अर्थात सुलभ मोक्षप्राप्ती" या पुस्तकाची स्वाक्षरीसहित प्रत द्यायचे वचन दिले आहे. मग फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे चित्र त्यांना देणार आहे. फक्त त्यांना आता प्रकाशक मिळायला हवा. जो कुणी प्रकाशक येतो त्यालाच सर अटी घालत सुटतात. अशाने कसे काय पुस्तक होणार? मी म्हणालो,"मोऱ्या, ते मरूदे. मला जबाबदारी कसली दिली आहे ते सांग. मी मान डोलावून बसलो आहे." तर मला म्हणतो,"कुणावर तरी कुणी तरी नजर ठेवायला हवी असे काहीसे म्हणत होते. मला वाटलं या सोमनाथबद्दल बोलताहेत. चहा सामोसे आणायला म्हणून जातो तो तासतास येत नाही. मागच्या वेळी बैठक चहाविना खोळंबली होती. शेवटी त्या मनीषला पाठवलं शोधायला. त्याला सामोसे आवडत नाहीत. लगेच पकडून घेऊन आला त्याला. पोरींच्या होस्टेलबाहेर सापडला म्हणे. दुर्बीण घेऊन उभा होता. सरांनी मग त्याला व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून भारतीय घटनेचे रसग्रहण कमीत कमी ५०० शब्दात लिहायला लावले. नंतरच्या दोन बैठकांना गैरहजर होता मग. गुरुनाथ नाईकांच्या 'गरुड' कथा वाचत असतो नेहमी."

या मोरूचा लेकाचा काही उपयोग नाही. नाईलाज होऊन मग सरांनाच विचारले. सरांनी ३० सेकंद माझ्याकडे रोखून पाहिले. त्या भेदक नजरेला कुणीच नजर देऊ शकत नाही. त्या नजरेत स्वच्छतेचे, पावित्र्याचे प्रखर तेज असते. मोरू म्हणतो तुला उगाच तसं वाटतं. त्याने म्हणे एकदा सरांना चष्मा काढून डोळे पुसताना पाहिले होते. आपल्यासारखेच दिसतात त्यांचे डोळे. चष्म्याने एवढा फरक पडेल? मला नाही वाटत तसं. भेदकच आहे नजर त्यांची. उगाच नाही भ्रष्टाचार दिसत सगळीकडे. पूर्वी आम्हाला दिसत नसायचा. सरांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने आमचे डोळे उघडले. पूर्वी एकदा बैठकीत मी एक प्रश्न अज्ञानापोटी विचारला होता,"सर, भ्रष्टाचार आपला शत्रू ना? मग तुम्ही गुजरातची सहल का काढता आहात? जिथे भ्रष्टाचार हे टूरिस्ट आकर्षण आहे अशा बिहारला का नाही?" सरांनी एकदम पद्मासन घातले आणि दीर्घ श्वास घेऊन ध्यान लावले. त्यांनी असे केले की आम्ही हवालदिल होतो. ते असे काही करू लागले की समजावे, आता सत्याग्रह होणार, आत्मक्लेश करून घेऊन आत्मशुद्धी होणार. त्यांचीच नाही तर आमची सुद्धा होणार. आत्मशुद्धी म्हटली की माझे धाबे दणाणते. मागील आत्मशुद्धी ७ किलो वजन कमी करून गेली होती. कमरेच्या पट्ट्याचे सगळ्यात शेवटचे भोक वापरले तरी त्याने माझ्या लज्जेचा पाठिंबा काढून घेतला होता. महिनाभर लुंगी गुंडाळून होतो. असाच लुंगी नेसून नेहमीच्या मद्राशाच्या हॉटेलात गेलो तर,"सार, स्पेशल आप के लिये सार" असे म्हणून आदराने फिल्टर कॉफी समोर आली. कॉफीने मला बद्धकोष्ठ होते. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, सरांनी साधारणपणे १० मिनिटे ध्यान केले. मग आपले चक्षु उघडून संथपणे म्हणाले,"दत्ता, तू आमच्याबरोबर बरेच दिवस आहेस. आपले कार्य मोठे आहे, कठीण आहे. आपल्या भारताचा इतिहास जवळजवळ पाच हजार वर्षांचा आहे. आसेतुहिमाचल असा आपला हा खंडप्राय देश. त्याची आपण लेकरे. आपल्या देशाला थोर साधूसंतांचा इतिहास लाभला आहे. आपल्या देशातून एके काळी सोन्याचा धूर निघत होता. सर्वत्र आबादीआबाद होते. आज आपली परिस्थिती काय आहे? आपली मातृभूमी आज आपल्या लेकरांकडून काही तरी मागते आहे. आपण आपल्या मातृभूमीचे ऋण फेडलेच पाहिजेत. आज ही मातृभूमी आपल्याकडे रुधिराभिषेक मागते आहे, तळहातावर शिर घेऊन लढण्याचा वसा मागते आहे, सर्वस्व अर्पण करण्याचा ध्यास मागते आहे. वेगात दौडले ते वीर मराठे सात या गाण्यातला आवेश मागते आहे. तर मंडळी काळरात्रीचा प्रहर संपत आला आहे, आता होणार तो "आम" चा उष:काल! मित्रहो, आप्तजनांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या त्या अर्जुनाचे स्मरण करा आणि युद्धाला तयार व्हा." ते असे काही बोलू लागले की आमची तंद्री लागते. मोरू तर "अजि म्या ब्रम्ह पाहिले" अशा थाटात सरांकडे पाहत असतो. अशा वेळी आम्हाला सरांच्या मस्तकामागे (त्याला डोके कसे म्हणणार?) तेजाची प्रभावळ दिसते, सर्व प्रश्न संपून जातात, उरते ती फक्त निरपेक्ष भक्ती. मग आमच्या या विठू सावळ्याला डोळे भरून पाहणे आणि "कसे ते रूप साजिरे, चित्त माझे बावरे, विठ्ठला तुझियाचरणी" याचा अनुभव घेणे एवढेच उरते. सर मग असे अर्धा तास बोलत राहिले, आम्ही कान तृप्त करून घेत राहिलो. एक आवेश अंगी दाटला. लढणार, आम्ही लढणार! जो कुणी आडवा येईल त्याला आणखी आडवा करणार. आवेशात येऊन मोरूकडे पाहिले तर तो आता आमटोपीचे चित्र काढत होता. त्यावर त्याने देवकीनंदन गोपाळासारखे मोरपीसपण काढले होते. थोडक्यात मोरूने सगळे चिंतन देवळात गवारीच्या शेंगा मोडत कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या आजीसारखे ऐकले होते.

का कुणास ठाऊक, मोरूने काढलेली मोरपीसवाली टोपी घातली तर मी शुक्रवारी नाचत येणाऱ्या वासुदेवासारखा दिसेन असे वाटले. आमचे रुपडेच तसे गोजिरे आहे. सरांना एक वेळ नाचरा वासुदेव चालेल पण गोवर्धन गिरिधारी "जै श्रीक्रिष्ण" चालणार नाही.

"रें?! पण बिहारचां काय? हो काय बोलतासां? आणि मित्रांविरुद्धच लढूचां? तेंका सांगूया नको?" रेग्या माझ्या कानाला लागून अस्सल सानुनासिक मालवणी तिरकेपणाने म्हणाला. या रेग्याला पोच म्हणून नाही, कुणाबद्दल आदर नाही. आणि स्वतःवर अजिबात ताबापण नाही. मागे एकदा रॅलीत आला आमच्याबरोबर. पोर्तुगीज चौकात धरणे धरायला रस्त्यात बसलो तर हा गायब. तासाभराने परत येऊन म्हणतो सॉरी हां, हयसर माजो एक गाववालो रवता. माका सारको म्हणां होतो, धरणां धरूक येयशीत तेव्हा वांयच येवन् जा. म्हणान गेललंय. आवशीन् तेच्या तिरफळां घालून बांगड्याचां कालवण केलल्यान्. माका म्हणा होतो थांबशीत तर रात्रीक वांयच नवटाक नवटाक मारूया. मी त्याका सांगान् इलंय, आज जमूचां नाय, पुढच्या येळेक बगूयां. सरांनी पांह्यलां तर वांदे होतले. आता तू माका सांग हो माजो मित्र मरे शाळेतलो. कमळाक मत दिल्यान म्हणून तो भ्रष्टाकारी झालो? माजो मित्र रवाक नाय? आमच्याबरोबर आयलो तरच मगे त्याची पापां माफ जातली? मगे जांवचा बंद करूचां की काय त्याच्याकडे? मी जातंलंयच. असं काय काय बडबडत राहतो. त्याला म्हणालो सर आज ना उद्या नक्की सांगतील. बरं, मला सांग, इथून मद्रासला जायचं तर व्हीटीवरून जावं लागेल की चर्चगेटावरून?

नमोनी बाशाला ढोकळा अर्पण केला असे ऐकण्यात आले. बाशाने "अय्योयो, येन्ना स्वामी, ये मिसाईल हम नही काता. कालीपिली केमिकल वॉरफेअर." असेही म्हटल्याचे ऐकले. मग नमोभाईंनी,"असा काय करते, आपण सोताच्या हाताने बनवला ये ढोकला. खाऊन तर बग ने" अशी विनवणी केल्यावर बाशाने "इसी लिये तो नै काने का. ना ऊर दडवे सुन्ना, नूरू दडवे सुन्ना माधीरी" असे म्हटल्याचेही ऐकतो. "अम एक(पुन्हा क पूर्ण) बार बोला तो वो सौ के बराबर ओता ऐ!".  मग मद्रासचे तिकीट क्यान्सल केले. तेवढेच पैसे वाचले. ढोकळा आणि इडली दोन्ही मुंबईत छान मिळतात.


(तळटीप - "कसे ते रूप साजिरे, चित्त माझे बावरे, विठ्ठला तुझियाचरणी" हा अभंग संतकवि छदामदास, मु. पो. कवठे बुद्रुक, यांच्या आमस्तुती या संग्रहातून साभार. - संपादक)

No comments:

Post a Comment