Wednesday, December 30, 2015

अरे भन्साळ्या!

आयला बाजीरावानं मस्तानीशी लग्न करून त्यावेळी लोकांचा रोष पत्करला पण आज मात्र त्यासाठी वाहवा कमवतोय. लोक असूया, अभिमान तर काही विरोधातून का होईना चर्चा करताहेत. पण दोन दोन लग्नं करणारा बाजीराव शूरच होता यावर आज कुणातही दुमत नाही. नाही तर आम्ही. दूर भविष्यात आम्ही केलेल्या लग्नाबद्दल (एकच असलं तरी काय झालं) चर्चा घडलीच तर ती फार तर "बरं झालं, चांगली अद्दल घडली मूर्खाला." एवढीच असेल. आम्ही आता इज्जत, वाहवा मिळवण्यासाठी काय करावं मग? बरं, हल्ली घोडीही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे भीमथडी घोड्यावर मांड ठोकून शेतातून रपेट मारावी अन् थोडी तिथे इज्जत मिळवावी तर तेही शक्य नाही. कणसांचं हातावर चुरून खाणं म्हणावं तर आता कणसाचं कॉर्न झालंय. मॉडेल कॉलनीत छान कागदाच्या द्रोणात मिळणारी कॉर्न भेळ आणि प्याटीस यापलीकडे जाता येत नाही. फार फार तर खंडाळ्याच्या घाटात शेजारी आशाळभूतपणे पाहणारी दोन चार माकडं एका हाताने हुसकावत खाल्लेले भाजलेले कणीस एवढाच संबंध. मग निदान अटकेपार झेंडा फडकवावा म्हटलं तर फाळणीनं फाळ लावलेला. अटक तर गेलं पापस्तानात. आणि व्हिसाशिवाय घुसायला आणि सहीसलामत सुटायला आम्ही काय बजरंगी भाईजान नव्हे. झेंड्याचाही प्रश्नच. भारताचा लावायचा तर अखंड भारतवाले बल्ले बल्ले करणार, पापस्तानाचा लावावा तर पाखंड भारतवाले अल्ला हू अकबर करणार. थोडक्यात आम्ही बाजीरावाचा कुठलाच पराक्रम गाठणे शक्य नाही. तेव्हा,आम्ही आपला भन्साळीचा पिक्चर पाहू. या नरपुंगवाचे चित्रपट पाहणे हेच कुठल्याही पराक्रमापेक्षा कमी नाही. संस्कृतीचे भले भले रक्षक सिनेमाला प्रचंड विरोध करत करत शेवटी हळूच मॅटिनीचा शो पाहून आले असे कळले आहे. त्यांचा भन्साळीचा विरोध "भन्साळीने पेशव्यांचा पर्यायाने समस्त महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्याने इतिहासाची आयमाय एक केली आहे" इथवरून थेट "प्रचंsssssssड भारावून गेलो, मराठेशाहीच्या अभिमानानं छाती बावीस नंबरच्या बनियनमध्ये मावेना. सिनेमाच्या प्रेमातच पडलो. अगदी मोरीत पाय घसरून पडल्यासारखा!" इथवर आला. एवढे मतपरिवर्तन!  आम्ही आ वासून पाहतच राहिलो. यापूर्वी असे संपूर्ण परिवर्तन आम्ही जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या घोषणेत आणि संघाच्या शिबिरातील बौद्धिकात नुसते ऐकले होते. संघाने परिवर्तन करण्याचा कितीही प्रयत्न करो, मराठी बाण्याने तो यशस्वी होऊ दिला नव्हता. ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रात:स्मरणीय भन्साळीना स्वत: यावे लागले. आमच्या या संस्कृतीरक्षकाच्या या "अर्धवृत!"मागे बाजीरावाच्या पराक्रमापेक्षा प्रियांका चोप्राचा गोड चेहरा जास्त कारणीभूत असल्याचे गोड गुपित त्यानेच आम्हाला आम्ही आमच्या नेहमीच्या हाॅटेल किनारात (धी बार ॲंड रेस्टॉरंट) सांगितले. व्हिस्कीचे केवळ दोन पेग माणसाला किती सत्यप्रिय करून सोडतात. आता संस्कृतीरक्षकांमध्येच प्रियांका गट आणि दीपिका गट पडले आहेत आणि त्यावरून हाणामाऱ्या चालू आहेत. मायला, भन्साळ्या, आधीच एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसावर दातओठ खाऊन असतो, त्यात त्यांच्या मध्ये प्रियांका आणि दीपिकाला घालून चांगला पिंगा घालायला लावतो आहेस. बिचारा बाजीराव आपला इतिहासाची कणसं हातावर चुरून खात बसला आहे. असो. तात्पर्य, आम्ही बाजीरावाच्या पासंगालाही पुरत नाही, पुरणारही नाही. इत्यलम.

Friday, November 27, 2015

भजीपाव-चटणी

लीलाबाईंनी हाती घेतलेला नवीन प्रोजेक्ट - भजीपाव-चटणी. यात लसूण चटणी आणि खोबऱ्याची चटणी यांच्यात द्वंद्वगीत रंगवले असून शेवटी दोन्ही चटण्या हातमिळवणी करून पावाचे भजे करतात असे दाखवले आहे. मराठी अस्मिता म्हटले की ओघाने द्वंद्व आलेच. लीलाताईंनी आधीच्या प्रोजेक्टमधून मिळालेल्या धड्याला स्मरून यावेळी मात्र "बटाटा आणि कांदा भजी" याविषयात अधिकारी असणारे "महाराष्ट्र भजी केंद्र" (बाजीराव रस्ता, नाना फडणीस वाड्यासमोर. पूर्वेला. पश्चिमेला नव्हे, तिथे मयताचे पास मिळतात) यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्याचे प्रत्यंतर सिनेमात वारंवार येते. भजीपावाचे पात्र भावे यांनी रंगवले आहे. त्यांच्या केसातून गळत असलेले मुबलक तेल पाहून हे भजे अस्सल मराठीच यात शंका राहत नाही आणि येथेच लीलाबाईंच्या दिग्दर्शनाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लसणाच्या चटणीचे पात्र बर्वीण बाईंनी (हो तीच ती, येरे घना येरे घना असं म्हणून आपण मात्र भाव खा रे माझ्या मना म्हणणारी) छान रंगवले आहे. हातवारेफेम सचिन यांनी शेवटी सगळ्याचे (इथेही) खोबरे केले आहे. चांगल्या अर्थाने. नारळ चांगला वाजला तर खोबरे चांगले, बद्द वाजला तर खऊट. सिनेमाचे तसेच असते. कट्यार काळजातून केव्हाच बाहेर आली पण खांसाहेबांचे हातवारे अद्याप आतच अडकले आहेत. कट्यार पाहताना हातवारे पाहावे की खांसाहेबांच्या आठ्या पहाव्यात अशा गोड संभ्रमात प्रेक्षक पडला होता. दिग्दर्शक भावेंनी ते हातवारे इतके जिवंत केले होते की थेटरमधील पहिल्या दोन रांगा रिकाम्या राहू लागल्या होत्या. न जाणो हात आणखी पुढे आला तर कानफटीत बसायची. भजीपाव-चटणीतही तेच हातवारे सचिनने आणले आणि चटणीचे खोबरे केले.

या चित्रपटनिर्मितीमागे प्रचंड अभ्यास केला गेलेला दिसला. महाराष्ट्रात भज्यांचे महत्व प्राचीन कालापासून चालत आलेले आहे. प्राकृतात "बट्टभज्ज कृती" दिलेले किती तरी शिलालेख आज महाराष्ट्रात जागोजागी आढळतात असा शासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे प्रमुख एस एस दांगट यांचा दावा आहे. विक्रमोर्वशीयात एके ठिकाणी "ही ही भो णिमन्तणोवाअणेण बह्मणो विअ राअरहस्सेण फ़ुट्टमाणो ण सक्कुणोमि आइण्णे अत्तणो जीहं रख्खिदुं । ता जाव तत्तभवं वअस्सो बट्टभज्जासणादो ।" असा उल्लेखही आहे. यावरून अगदी पुरातन काळापासून गृहिणी भज्यांच्या पाककृतीत प्रवीण होत्या आणि ते एक सणावाराचे पारंपारिक पक्वान्न होते हे सिद्ध होते. नेमके हेच सूत्र लीलाबाईंना भावले. ओढा ओलांडताना धोतराचा सोगा उचलून जसा घट्ट धरून ठेवतात तसे त्यांनी ते सूत्र पूर्ण चित्रपटभर धरून ठेवले आहे. न जाणो सोगा सुटला तर काय घ्या. मराठी अस्मिता तलवार घेऊन मागे लागायची. त्यामुळे संवादासंवादात प्राचीन दाखले दिले गेले आहेत. बटाट्याचे भजी करण्यासाठी काप करत असतानाचे दृश्य हे प्रातिनिधिक आहे. बटाट्यावर क्यामेरा झूम होतो, मग धूसर होतो आणि मग जेव्हा पडदा स्पष्ट होतो तेव्हा दिसतो एक शिलालेख. खास अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात "महाराष्ट्र की परंपरा बहुत पुरानी है. आज से पाचहजार साल पहले, मुघलोंके घुडसवार धरतीका बलात्कार करने अभी आये नही थे, ये धरती सुजलाम सुफलाम थी, तब यहां की संस्कृती सोनेसेभी कीमती मानी जाती थी. अभ्यागत का स्वागत बडेही प्रेमभावसे किया जाता था. बटाटा या कांदा भजी ये उस संस्कृती का अविभाज्य घटक माना जाता था. यही लिखा है इस शिलालेख में… " असे शब्द ऐकू येतात. नंतर प्राकृत, अर्धमागधीवर गेली तीस वर्षे अभ्यास करणारे प्रा. घनघोर यांच्याशी थोडी चर्चा. एक पाच-दहा मिनिटे प्रेक्षकाला असं इतिहासात सचैल बुचकळून काढलं की पुन्हा फेडअवे आणि मूळ दृश्यात परत. एका दृश्यात तर सलग पाच मिनिटे (आंद्रे तारकोव्स्की, घे लेका सलग शॉटचा नमुना!) पंगतीचे दृश्य दाखवले आहे. पुरुष शुचिर्भूत होऊन पंगतीत बसले आहेत. समोर रांगोळी काढलेली, चौरंग, चांदीची तांब्या भांडी, बोटे बुडवण्यासाठी केशराच्या पाण्याची वाटी, बटाट्यात लावलेल्या उदबत्त्या असा थाट. सोवळ्यातील आचारी, वाढपी. आणि शिगोशीग भरलेली भजांची ताटे. वा! असे ब्राम्हण जेवूनी तृप्त झाले! लीलाबाईंनी यावेळी मात्र इतिहासाला सोडले नाही हं असे उद्गार काढतच प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडणार हे नक्की.

तेव्हा अगदी आवर्जून पहा. जेव्हा येईल तेव्हा. आम्ही लीलाबाईंच्या जवळचे असल्यामुळे हा प्रकल्प आकारास येत असताना पाहायला मिळाला. मागील वाईट अनुभवामुळे चित्रपटाच्या सुरुवातीलाच "या चित्रपटातील सर्व पदार्थ काल्पनिक असून, कोणत्याही कुटुंबावर अथवा कादंबरीवर बेतलेले नाहीत. बटाटे, कांदे, चटणी, खोबरे,  मोहन, तेलकट,झारे, उलथने या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तरी काही चूक राहून गेली असल्यास आमच्याकडे थेट तक्रार करावी. सोशल मिडियावर आमचे वाभाडे काढू नयेत." अशी पाटी दाखवण्यात येणार असल्याचे लीलाबाई म्हणाल्या. "अइअ अइ आअअं ओ!" आम्हाला काही कळेना. प्राकृताचा अभ्यास करत करत आता प्राकृतमध्येच बोलतात की काय अशी शंका आली. "काय म्हणालात ?" आम्ही विचारलं. त्यांनी हातानेच जरा थांबा अशी खूण केली आणि त्यांनी वळून खुर्चीच्या मागेच कोपऱ्यात एक भारदस्त पिंक टाकली. आणि मग मोकळ्या तोंडाने म्हणाल्या,"म्हटलं, पब्लिक लई मारतं हो!" बाईंचा चित्रपट चांगला की सफाईने मारलेली ती पिंक चांगली याचा विचार करत आम्ही त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो. 

Thursday, November 26, 2015

सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?

पुलंनी वाऱ्यावरची वरातमध्ये लिहिलेला हा प्रवेश , दारूबद्दल असूनही संबद्ध असलेलं हे लिखाण. आजही त्याची संबद्धता टिकून आहे. तसाच हा मनोरंजक आणि बोधप्रद संवाद. ज्यांना बोध होणार नाही त्यांनी मनोरंजन म्हणून वाचावा ही नम्र विनंती. ज्यांचे मनोरंजन होणार नाही त्यांनी बोध घ्यावा ही कळकळीची विनंती.

छोटे बंधुराज : सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?

मोठे बंधुराज : अरे, सहिष्णुता हे एक प्रकारचे पीक असते. जे घेतले असता, बरे का, जे घेतले असता मनुष्य वाट्टेलते, म्हणजे वाट्टेल ते सहन करू शकतो.

छोटे बंधुराज : हं हं! म्हणजे आपले बाबा का रे भाऊ? हफिसात आणि घरी कित्ती शिव्या खात असतात!

मोठे बंधुराज :अरे नव्हे! सहिष्णुता म्हणजे, अता कसे सांगावे बरे.. अरे सहिष्णुता म्हणजे एकरी शंभर टन घेतलेल्या उसासारखे पीक आहे. जे घेतले असतां, बरे का, आधीच उचल मागता येते.

छोटे बंधुराज :हं हं हं! म्हणजे एटीकेटी का रे भाऊ? नापास व्हायची लायकी असूनही दयाळूपणे वरच्या वर्गात ढकलणारी?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! श्या:! आता कसे बरे तुला सांगावे बुवा? अरे सहिष्णुता म्हणजे कॅश क्राॅप आहे. जे घेतले असताना, बरे का, जे घेतले असताना आपले क्राॅप जाते पण दुसऱ्याला कॅश मिळते.

छोटे बंधुराज :हं हं हं! म्हणजे आपल्या देवळातल्या दानपेट्या का रे भाऊ? आपल्या बाबांनी परवा पाचशे रुपये पेटीत टाकले होते ते घेऊन इद्रुसमियां हाजच्या यात्रेला गेले आहेत.

मोठे बंधुराज :अरे नव्हे! छ्या! मी तर आता तुझ्यापुढे हतच टेकले बुवा! अरे सहिष्णुता म्हणजे एक प्रकारची सुबत्ता आहे, जी आली म्हणजे सगळ्यांची पोटे भरतात.

छोटे बंधुराज :हंहंहं म्हणजे आपली धान्याची गोदामे का रे भाऊ? आपल्याकडून पैसे घेऊन धान्य देतात पण उंदीर मात्र फुकट खाऊन गलेलठ्ठ होतात ती?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! तू कॉंग्रेसच्या आॅफिसात खूप वेळ बसत जाऊ नकोस बरे. तिथे गलेलठ्ठ उंदीर खूप झाले आहेत. अरे सहिष्णुता म्हणजे ज्वारीच्या शेताच्या बांधावर लावलेला भाजीपाला. जो लावला असताना, बरे का, जो लावला असताना भाकरीबरोबर तोंडी लावायला विविधता मिळते.

छोटे बंधुराज :हंहंहं म्हणजे आपल्या शाळेतील आहार योजना का रे भाऊ? खिचडीतून कधी झुरळ तर कधी माशी येते तशी? काल मला लॉटरीच लागली होती. मी झुरळ घेऊन हेडमास्तरांकडे गेलो तर मला म्हणाले, थोडी सहिष्णुता अंगी बाण, खिचडीवर तुझ्याइतकाच त्या झुरळाचाही अधिकार आहे. पण मग त्यांनी माझ्याकडून शंभर रुपयांची गप्प राहण्याची सहिष्णुता विकतही घेतली. मास्तरांकडे आता खूप सहिष्णुता साठली असेल ना? दिवसांतून किमान दहावीस मुलांना खिचडीत झुरळं येतातच.

मोठे बंधुराज : अरे नव्हे! अता काय बुवा करावे? अरे, सहिष्णुता हे असं पीक आहे की एकदा घेतले की वर्षानुवर्षं येत राहते.

छोटे बंधुराज :हंहंहं , म्हणजे ते बांधावरचं कॉंग्रेस गवत का रे? ज्याच्या संपर्कात आले असतां अंगाला खाज सुटते, शिंका येऊ लागतात. आणि एका ठिकाणी उपटून जरी टाकले तरी लगेच दुसरीकडे उगवते ते?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! अरे सहिष्णुता म्हणजे गुण्यगोविंदाने एकत्र डोलणारे शेत. ऊस, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, दुधी भोपळा, मुळा, शेपू सगळं एकत्र वाढते आहे. जरी उंदीर लागला, कीड पडली, अळ्या कुरतडत असल्या तरी त्यांना उदार मनाने खाऊ द्यावे. कृष्णार्पणमस्तु म्हणावे. त्यांनी खाऊन जे उरेल ते आपण भक्तिभावाने ग्रहण करावे, ते दिल्याबद्दल उंदीर, कीड,अळ्या यांचे आभार मानावेत, त्यांचाही शेतावर तेवढाच अधिकार आहे हा दिलासा अधूनमधून देत रहावा. नाही तर ते आपले शेत सोडून दुसऱ्या शेतात जातील. तसे होऊ न देणे.

छोटे बंधुराज (खवळून) :येssss भावड्या! खड्ड्यात घाल तुझी ती सहिष्णुता! उंदीर, अळ्या सगळं शेत फस्त करायला लागल्यावर मी तर औषधाचा फवारा मारणारच! तू बस वैष्णव जन ते जपत!

मोठे बंधुराज (चेहऱ्यावर युधिष्ठिराचे भाव) :अरेरे! सावधान! तुझ्यातील असहिष्णुता वाढत चालली आहे बरे! तूच काही दिवस हे शेत सोडून जा बरे!

(दोघे जातात. त्यांच्या मागून उंदीर, झुरळं नाचत जातात)

Tuesday, November 24, 2015

राव गेले रंक राहिले

हात्त्याच्या, इतके दिवस किरण राव हा कुणी बाप्या माणूस आहे अशीच माझी समजूत होती. अमीर खाननं एका बाप्याशी लग्न केलं याचं आश्चर्य वाटलं होतं. पण म्हटलं होतं जाऊद्या, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. नट हा नेहमी प्रयोगशील असावा असं आमचे स्थानिक नटसम्राट शंकरअण्णा (प्रोप्रा - धी न्यू बाॅम्बे हेअर कटिंग सलून) नेहमी म्हणत असत. त्याप्रमाणे त्यांनी स्वत:चेही शील सतत प्रयोगात ठेवले होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. गावातील बऱ्याच आळ्या त्यांना वर्ज्य झाल्या तरी त्यांची प्रयोगशीलता थांबली नव्हती. अमीर खान आमच्या शंकरअण्णांसारखाच पर्रर्रफेक्शनिस्ट असल्यामुळे त्याने प्रयोगासाठी हे लग्न केले असावे अशा समजुतीत आम्ही होतो. "तसले"ही काही लोक असतात असे आम्ही ऐकले होते. त्यांच्या सुरस आणि रम्य कथाही आमच्या कंपूत कधीतरी कुणी सांगत असे. आम्ही ऐकावं ते नवलच असा चेहरा करून सर्व ते ऐकत असू. किती झालं तरी तीही माणसंच हो हेही मत व्यक्त होत असे. पण अशा लोकांना लाजिरवाणे होऊन, लपून छपून वावरावे लागते याचे वाईट वाटत असे. म्हणून मग अमीरने या लोकांना पाठिंबा म्हणून केले असेल लग्न असेच आम्हाला वाटले होते. एरवी सिनेमातील कुणाचे लग्न झाले की त्या जोडप्याचे फोटो आम्ही चवीने पाहतो पण अमीर खानच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवला नव्हता. दोन मिशीवाले बाप्ये एकाच कोकाकोलाच्या बाटलीत दोन स्ट्राॅ सोडून एकमेकांची नाके भिडवून ते चोखत असतील (पक्षी स्ट्राॅ, गैरसमज नसावा) हे दृश्य आमचा अपुरोगामी मेंदू ढवळून काढत असल्याने आम्ही "हा राव दिसतो कसा आननी" हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. पण त्याला विरोध करण्याइतकेही आम्ही असहिष्णु नव्हतो. पुढे यथावकाश संसाराच्या वेलीवर एक फूल उमलंलं. (खरंच यथावकाश, खरं तर लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजे व्यथावकाशच म्हणायचं. पण म्हटलं बाईस नऊ महिने तर बाप्यास लागत असतील थोडे जास्त असे त्रैराशिक मांडले. प्रयत्नांती परमेश्वर हो. पावायचा राहणार नाही.) म्हटलं रावसाहेब मुलाच्या संगोपनात गुंतले आता. अमीरही आपल्या इतर प्रयोगांत गुंतला. कुठे इडियट बनून तीन तासांत तीस कोटी लोकांना स्फूर्ती देण्याचा प्रयोग असो, कुठे दत्त दिगंबर दैवत माझे म्हणत दिगंबरावस्थेत गावभर हिंडण्याचा प्रयोग असो त्यात तो रमून गेला. आम्हीही आमच्या कर्मभूमीत कार्यरत होऊन गेलो. (बायको त्याला बॅंकेत पाट्या टाकणं म्हणते याबद्दल आमच्या भावना अंमळ तीव्र आहेत. एरवी जरी त्या भावनांना आवर घालत असलो तरी शनिवारी बायको रमीच्या क्लबला गेली की त्या आम्ही मुक्तपणे व्यक्त करतो. सोड्याच्या बाटलीपेक्षा त्या फेसाळून वर येतात आणि स्काॅचची धुंदी अधिक गडद होते असा आमचा अनुभव आहे.) आमची कार्यभूमी गेली वीस वर्षं तीच राहिली तरी अमीर अनेक प्रयोग करत राहिला. मध्येच त्यानं सत्यमेव जयते काढलं. आम्ही कौतुकानं ते पाहत असू. एपिसोडनिशी लाखो रूपये घेऊन ते देणाऱ्या समाजाला सज्जड दम कसा भरायचा हे मनोरंजन मनोहारी होतं. आमचे फॅमिली डाॅक्टर दाते रग्गड फी घ्यायचे आणि मागे रेलून बसत डोळे मिटून सिगारेटचा दमदार झुरका मारत "तुम्ही स्मोकिंग सोडा, फुफ्फुसाची पार मच्छरदाणी झालीय" असं आम्हाला सांगायचे. आम्ही खाली मान घालून ते ऐकायचो.

असो, तर या सगळ्या गडबडीत अमीर खानच्या जनानखान्यात उलथापालथ (शब्दाचा जास्त अर्थ काढायला जाऊ नका, ते अभिप्रेतही नाही) होतेय हे लक्षातच आलं नाही. बेगम रावसाहेब स्वकष्टाने प्रसवलेल्या बाळाच्या संगोपनात गुंतलेले आहेत, त्यांना दाढी करायलाही वेळ मिळत नसावा, एकच लेंगा चार चार दिवस घालायला लागत असावा अशाच समजुतीत होतो. अमीर बाहेर एवढे सर्जनशील प्रयोग करतो आहे, हिंदू धर्मातील विसंगतींची टिंगलटवाळी करत समाजप्रबोधन करतो आहे, या सेटवरून त्या सेटवर अशा हनुमान उड्या मारतो आहे पण त्याला समाजातील हळूहळू होणाऱ्या बदलाची चाहूल लागली नसावी. तिकडे रावसाहेबांना मात्र रोज समाजात वावरून ते जाणवत असेल. रेशनच्या रांगेत उभे असताना, पाण्याचा टॅंकर आला की त्या हाणामारीत आपली कळशी भरून घेताना, बसची गाडीची वाट पाहताना, वडापच्या रिक्षेत अंग चोरून बसताना, दळण आणायला गिरणीत जाताना अशा अनेक प्रसंगी समाजात वावरताना सूक्ष्म बदलांची जाणीव त्यांच्या अत्यंत तरल आणि मृदू मनाला होत असेल. अशा दैनंदिन रगाड्यात केवळ रावसाहेब रगडले गेले असतील, अमीरला पत्ताही नसेल.

आणि आता पाहतो तर किरण राव हा बाप्या नाही? वाईट आणि हायसं वाटणं दोन्ही एकदम झालं तर कसं वाटेल तसं वाटलं. वाईट अशासाठी की एका विशिष्ट समूहाला पाठिंबा म्हणून हे लग्न एका मैलाचा दगड वाटत होतं तो साधा दगड ठरला. आणि हायसं अशासाठी की  अमीरच्या मुलाला आई मिळाली. तीही त्याची काळजी करणारी. खूप काळजी करणारी. रोज घरातून बाहेर पडताना बाहेर ऊन, थंडी तर पहायचीच पण किती डिग्री असहिष्णुता आहे, भीतीची तीव्रता किती आहे हेही पहायचं हे सगळं करायला आईच हवी. या माऊलीला भोवतालचे बदल लक्षात आले. वर्षानुवर्षं मुकाट्यानं खाली मान घालून चालणारे हिंदू शेजारी आपल्या धर्माची चेष्टा पाहिल्यावर नाराजी व्यक्त करू लागले हे पाहिल्यावर त्या माऊलीच्या डोक्यात धोक्याची घंटा ठणाणा वाजू लागली असणार. नेहमी ईदला शीरखुर्मा हक्काने मागणारे पीके सिनेमा आल्यानंतर ईद होऊन गेला तरी मागेनात हे पाहिल्यावर त्या मातेच्या डोक्यात संशयाचे भूत उभे राहिले असेल. नक्कीच ते आपल्या खुनाचा घाट घालत असणार ही तिची शंका केवळ वाजवीच होती. कुठल्याही आईच्या हृदयात याच भावना येतील. याखेरीजही अनेक गोष्टी तिला भेव घालीत होत्या. संजय दत्तला तुरूंगवास, दस्तुरखुद्द सलमानभाईला शिक्षा! केवळ मुसलमान म्हणूनच त्या शिक्षा झाल्या हे नक्की. गुन्हा काय तर बेकायदेशीरपणे शस्त्रे घरात ठेवली, ती दुबईतील मित्रांना वापरायला दिली, तर दुसऱ्याने काय दोन पाच फुटपाथवरची माणसे उडवली. काय मोगलाई लागून गेली आहे काय? ही असहिष्णुता असह्य झालेल्या त्या मातेला आपल्या बाळाच्या भवितव्याविषयी चिंता वाटणे साहजिक आहे. तो उद्या मोठा होऊन काय करायचे? त्याने काय सतत कायद्याची भीती बाळगत जगायचे? छे! छे! ते काही नाही, येऊदेत हे आज घरी, आता इथे राहणे नाही. सीताहट्टापुढे जिथे रामाचेही काही चालले नाही तिथे अमीरचा काय पाड?

पण भारतीयांनो, ही रत्ने देशातून बाहेर जाऊन देऊ नका. आधीच आपण आपला कोहिनूर गमावून बसलो आहोत. आता ही अल्लाघरची नूर बाहेर जाऊ देऊ नका. ही नुसती किरण नाही तर संपूर्ण देशाच्या सहिष्णुतेच्या आशेची किरण आहे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का, तेथे असेल रावा असे गाणे ही म्हणते आहे, तिच्या मनातला तो पोपट इथेच बांद्र्यात (पश्चिम बरं का, पूर्वेला घाटी राहतात) आहे हा दिलासा तिला द्या. या रावावाचून हा देश रंक आहे हे ध्यानात ठेवा.

Tuesday, November 17, 2015

पिंगा ग पोरी

अगो, थोरल्या बाजीरावांच्या धर्मपत्नी राजमान्य राजश्री सौभाग्यकांक्षिणी श्रीमंत काशीबाईसाहेब यांनी टाॅवेल-सावरूया-हम बिल दे चुके सनम-बेवडादास फेम भन्साळीच्या स्वप्नात येऊन घातलेला पिंगा पाहिला हो! पिंगा घातलंन तो सुद्धा कुणाशी बरं? स्वत:च्याच इकडून ठेवलेल्या नाटकशाळेशी हो! जळ्ळं मेल्याचं लक्षण ते! आता त्यावेळच्या घरंदाज बायका तोंडाला रंग फासून नाचायला बोर्डावर उभ्या राहत होत्या असं वाटलं की काय तुझ्या या लीलावतीला? बाईनं कसा घट्ट अंगभर पदर घ्यावा हो! या कवटाळणी बघत्ये तर कोपऱ्यावरच्या त्या मारवाड्याच्या दुकानासारख्या! नेहमी उघड्या! हा मेल्यांनो! तोंडाला काळं फासलनीत हो अगदी! त्यातून ती सटवी मस्तानी की फस्तानी! सवत ना गो ती काशीबाईची? पोटच्या मुलाला, लाखांच्या पोशिंद्याला कुठून ही अवदसा आठवली असं राधाबाईसाहेबांना, त्या माऊलीला वाटत असेल गो! सोन्यासारखी सून घरात आणली पण म्हणतात ना कर्म! त्यातलीच गत हो ही! मुलानं अटकेपार झेंडा नेलान पण हा कोथरूडपार लावलेला झेंडा रोज कित्ती सलत असेल सासूसुनेला. राऊ कोथरूडला आहेत म्हटलं की इकडे वाड्यावर गणपती पाण्यात. मेली ती हडळ! काय जादू केल्येन त्या गजाननासच ठाऊक. म्हणे सौंदर्यवती आहे. अस्सा राग येतो! पण आपलाच दाम खोटा हो! समोर आली ना तर झिंज्या उपटून हातात दीन. माझी काशी गरीब गायच म्हणून सगळं सहन करत्ये. असं सगळं कल्प कल्प त्या माऊलीच्या मनात येत असेल. आणि खात्रीन सांगत्ये काशीबाई घरंदाज म्हणून काही बोलायच्या नाहीत पण मुदपकात चाललेलं पाटा वरवंटा, मुसळ कांडणं पाहून ती मेली सवत त्या मुसळाखाली चेचली जात्ये असंच स्वप्न पहात असतील अगदी! पण बाईचा जल्मच सोसण्यासाठी हो! पण हे त्या जळ्ळ्या भन्साळ्याला कळलं तर ना? इतिहासात नापास झाला आणि सिन्मात घुसला. वर सरकारनं पद्मश्रीची भिक्षावळ घातल्ये हो झोळीत. उजेड फाकला आहे तिचा! मरा! मी तर म्हणत्ये जर या दोघीं समोरासमोर आल्या तर एकच गाणं होईल हो! पिंगा ग पोरी पिंगाच्या ऐवजी झिंज्या ग पोरी झिंज्या, उपटीन तुझ्या मी झिंज्या! पुढल्या सिनेमात रमाबाईसाहेब करवा चौथचं व्रत ठेवतायत आणि खुद्द श्रीमंत माधवराव पेशवे  सदरेवर मागे शेदोनशे हशमांची फौज घेऊन "लेने तुझे गोरी, आयेंगे तेरे सजना" असं म्हणत पंजाबी भांगडा घालतायत हे दृश्य बघण्याची तयारी ठेवल्ये. वाचव रे गजानना!

-अंबूवन्सं (मु.पो. पडघवली)

Sunday, November 8, 2015

गयी भैंस पानी में

गयी भैंस पानी में. इथे महाराष्ट्रात काही लोक "भ्रष्टाचारी लालू चालेल पण भाजप नको असा स्वच्छ निकाल आहे हा! कसे?" असं म्हणून अत्यानंदाचे चीत्कार काढीत आहेत. हे म्हणजे गोठ्यातील गाईला पाडा झाला म्हणून रेड्याने हंबरून आनंद व्यक्त करण्यासारखे आहे. वास्तविक या सर्व वसुबारस प्रकरणात या रेड्याचा "सहभाग" केवळ माफीचा साक्षीदार असण्यापुरताच.

भारतातील लोकशाही म्हणजे टीव्हीवरील रटाळ मालिकांसारखी होऊ लागली आहे. नवीन सून घरात आली की घरात बांडगुळांसारख्या मूळ धरून बसलेल्या साळकाया माळकाया तिला घराबाहेर काढण्यासाठी कारवाया सुरू करणार. ती एकदाची हाकलली गेली की तिच्या बदल्यात आणलेली साधारणपणे दोन तीन एपिसोड टिकते. मग तिला हाकलून पुन्हा जुनीच ब्याद बरी असं म्हणून परत आणण्याचं कारस्थान सुरू. कॉंग्रेस ही या घरातील बुआ. नव्वदीला पोचूनही ठणठणीत. सून कुठलीही येवो अथवा जावो, ही लाल आलवणातील बया घराच्या पाचवीला पुजलेली. हिला कुणाबद्दलही प्रेम अथवा माया नाही. हे सगळं करण्यात काय मिळतं या प्रश्नाला उत्तर फक्त एकच. ते नानाच्या "माफीचा साक्षीदार" मधल्या त्या उत्तरासारखं - "आनंद!". घरातले लोकही "बुआ, अगर आप न होती तो इस खानदान का पता नही क्या हो जाता. " असं म्हणून तिच्या पाया पडतात. त्यांना आशीर्वाद देताना या बुआच्या डोक्यात मात्र नवीन सुनेकडून "घरकी चाबियां" आपल्याकडे कशा येतील हा विचार. आणि हे सगळं चालवणारे आपण प्रेक्षक. शिव्या देतो, पण नकळत टीआरपी वाढवत बसतो.

एक नक्की आहे, समस्या राजकीय पक्ष नाही. जनता स्वत:च आहे. आपण सुधारायचं नाही, आपण भ्रष्टाचार सोडायचा नाही. स्थानिक पातळीवर जो कुणी तुमचं अवैध काम करायला आशीर्वाद देणार, रांगेत उभं न राहता आतल्या बाजूने काम करून देणार, गुन्हा केल्यावर फोन केल्यावर चौकीत येऊन इन्स्पेक्टरला दम देऊन तुम्हाला किंवा तुमच्या माजलेल्या पोराला सोडवणार त्याला तुम्ही मत देणार. कारण तुम्हाला स्वत:लाच शॉर्टकट मारायची सवय झाली आहे. माझं काम झालं की झालं, बाकीचे मरेनात का तिकडे ही पराकोटीची स्वार्थी वृत्ती आपल्यात आहे. मग असे हे लोक सत्तेत आले की तुमची ही कामं करत स्वत:च्या तुंबड्या भरणार. तो पैसा तुमच्याच खिशातून नकळत जाणार. कॉंग्रेसने आजवर हेच करत सत्ता टिकवली. लोकांना कॉंग्रेसबद्दल प्रेम त्यांनी लोकोपयोगी कामं केली म्हणून नाही तर ही वर सांगितलेली तुमची स्वत:ची कामं केली म्हणून आहे, हे सत्य आहे. कॉंग्रेसने खरोखर लोकोपयोगी कामे करून दाखवावीत, प्रथम गुंडांचा, हातभट्टीवाल्यांचा, सट्टेबाजांचा, गुन्हेगारांचा पाठिंबा, पर्यायाने पैसा निघून जाईल. जे लोक गुन्हेगार आहेत, केवळ तेच याला याला जबाबदार आहेत असं नाही. बाकीचे पांढरपेशे लोकही तितकेच जबाबदार आहेत. कारण हे लोक मसीहा शोधत बसतात. कुणी तरी कनवाळू येईल, आपली सगळी दु:खे (म्हणजे काय ते त्यांनाही माहीत नसते) दूर करील, भ्रष्टाचार नष्ट करील, झुमरी तलैय्याचं एकदम न्यूयॉर्क करून टाकेल, चकचकीत रस्ते, वातानुकूलित घरे कार्यालये, एकदम कसा भारताचा इंडिया करून टाकेल, सामाजिक समस्याच नव्हे तर आमच्या सर्व आर्थिक समस्यांची सर्व जबाबदारी सरकार घेईल या असल्या अवास्तव अवाजवी अपेक्षा घेऊन बसलेले असतात. यातूनच केजरीवालचा जन्म झाला. भाबड्या आशेतून असा कुणीतरी सत्तेत येतो. साहजिकच असा कुणी मसीहा नसतो. जो असतो तोही याच मातीत जन्माला आलेला असतो. मग सत्तेत आलेला काही वेगळे करत नाही हे लक्षात आले की मग सुरू, दुसरा आणण्याचे प्रयत्न. नवीन कुणी नसल्यामुळे मग ट्रंकेतून जुनाच एखादा टीशर्ट पुन्हा बाहेर निघतो. पुन्हा तेच चक्र. जोवर तळागाळापर्यंत शिस्त, आत्मसन्मान रुजत नाही तोवर हे चक्र असंच चालू राहणार. आज भाजप, उद्या कॉंग्रेस, परवा आप , पुन्हा कॉंग्रेस, पुन्हा भाजप. 

त्यामुळे आज भाजपला बिहारने नाकारले याचा अर्थ कुणी नवीन मसीहा आला आहे आणि तो सगळं काही आलबेल करणार आहे असं नव्हे. भाजप आले असते तरी तेच. कॉंग्रेसने हुरळून जायचेही कारण नाही. एक वर्षापूर्वीच फाटली म्हणून फेकून दिलेली ती चड्डी आहे. भाजपचा घट्ट लंगोट सहन झाला नाही म्हणून ही न धुतलेली दळभद्री चड्डी कदाचित परत येईलही, पण त्यात लोकांची असहायता आहे हे कॉंग्रेसच्या बेभान झालेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. लोकांनीही ही आपली असहायता आहे असं म्हणून आनंद मानण्याचे कारण नाही. हा तुमच्याच विवेकबुद्धीचा तुमच्या स्वत:च्याच आळशी आणि ऐतखाऊपणामुळे झालेला पराभव आहे. हे बदलण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वत:मध्ये आत्मसन्मान आणावा लागेल, स्वच्छ व्हावे लागेल. पक्षांनीही जातीपातीचे राजकारण न करता केवळ अजेंडा दाखवून त्यावर मते मागावीत. असे करणारा पक्ष जरी कॉंग्रेस असला तरी माझा त्याला पाठिंबा राहील. सध्या तरी तशी शक्यता दिसत नाही. निवडणूक जिंकणे म्हणजे गुलाल उधळून वातावरण लाल करण्याची वृत्ती जोवर आहे तोवर लोकोपयोगी काम करणारे सरकार येण्याची शक्यता नाही. जेव्हा जेव्हा हा गुलाल उधळतांना दिसतो तेव्हा ते उधळणारे लोक हे नेमके कोण असतात? कसले कार्यकर्ते असतात? त्यांना नेमका कसला आनंद झालेला असतो? त्यांना काय मिळणार असते? निवडणूक जिंकल्यानंतर हा असला जल्लोष बंद झालेला जेव्हा दिसेल तेव्हा आपण लोकशाही म्हणून परिपक्व झालो आहोत असे मी म्हणेन. तोवर, प्रत्येक निवडणुकीनंतर गयी भैंस पानी में एवढंच म्हणत बसू.

Thursday, November 5, 2015

गज़ल पेताडांची

(गुलजार साहेबांची मनोमन क्षमा मागून)

सुबह सुबह याद आया 
उस दिन हम दोस्त पीने बैठे थे
आंखोसे मानूस सारे चेहरे थे सुनेसुनाये
हर एक के बीवीने थे प्यारके शब्द जो सुनवाये
सोडा लाये, डीएसपी मंगवाये
और चार बूँद दोस्तों के नाम छिडकवाये
जो नही धीरज जुटा पाये
तंगडी कबाब, चिकन लॉलिपॉप के ऑर्डर दिये
पोटलीमें मेरे मैंने चणे और खारे शेंगदाणे लाये थे

आँख खुली तो बारमें कोई नही था
हाथ लगाकर देखा सर बहुत दर्द कर रहा था
करवट बदलके देखा, गल्ले पे शेट्टी फूट फूटके रो रहा था
और होठोंपर वो डीएसपी का ज़ायक़ा ज़ोरोंसे बास मार रहा था

दोस्त सब भाग गये शायद, बिना बिल भरे ही भागे शायद..

सुना है कल रात आयी थी पुलिस की टोली
सुना है कल रात किसीने बहोत राडा किया है

Thursday, October 29, 2015

फि.टे. इन्स्टिट्यूटचे चाळे

फिटेइइं असलं काही तरी नाव असलेली संस्था म्हणजेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया आणि ती खुद्द आमच्याच थेट बुडाखालीच वसलेली आहे याचा आम्हाला पत्ताच नव्हता. अर्थात आमचे बूड पूर्ण डेक्कन जिमखाना व्यापेल एवढे मोठे नाही आणि फिटेइइंसुद्धा एवढी छोटी संस्था नाही हे आम्ही खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. "साहेब, जरा मोठ्या पन्ह्याचे कापड पहा" ही आमचे टेलर निळूभाऊ (प्रोप्रा. डीलक्स टेलर्स, आम्ही चक्क शिवाशिव पाळतो) यांची नम्र सूचना हे आमच्या प्रशस्त बुडाचे द्योतक नसून, निळूभौंच्या दूरगामी दृष्टीचे उदाहरण आहे. वर्षाकाठी आमचा घेरा एक इंच वाढतो असे त्यांचे म्हणणे आहे. हे असेच चालू राहिले तर वयाच्या पन्नाशीपर्यंत घेर मोजण्यासाठी इंच संपून फूट चालू होतील असा प्रेमळ इशाराही अधूनमधून ते देत असतात. असो. आम्ही हनुमान टेकडीवर अनेक वेळा फिरायला जात असतो. टेकडीवरून फिटेइइंचा बोर्ड पण कदाचित पाहिला असेल, पण तिथे फिल्म वगैरे बनवण्याचे शिक्षण मिळत असते असे काही कानावर आले नव्हते. नाही म्हणायला अधून मधून काही दाढी वाढवलेली, कळकट कपडे परिधान केलेली तरुण पोरे दिसायची. ती एक तर सिगारेटी फुंकत असायची किंवा रात्रीची उतरण्याची वाट पाहत शून्यात नजर लावून बसलेली असायची. अचानक एक दिवस ही मंडळी आंदोलन वगैरे करताहेत वगैरे कानावर येऊ लागले. आम्ही कॉलेजात असताना एक दोन दिवसांच्या कॉमन ऑफच्या पलीकडे आमचे आंदोलन जात नसे. ही मंडळी तर नेहमीच कॉलेजच्या बाहेर असायची, मग आंदोलन कशासाठी? तर म्हणे संस्थेचे चेअरमन म्हणून गजेंद्रसिंह हे नको होते. गजेंद्र सिंह! हाच तो इसम ज्याने यक्षाच्या "पृथ्वीपेक्षा जड काय आहे?" या प्रश्नाला "माता" असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्याची खरी आई "मेल्या! माझे वजन काढतोस?" असे म्हणून लाटणे घेऊन त्याच्या मागे लागली होती असे ऐकले होते. बाकीच्या आयांनीही मोर्चे बिर्चे काढले असतील तर माहीत नाही. थोडक्यात खरे बोलण्याच्या हव्यासामुळेच हा इसम वादग्रस्त ठरला आहे. खरे बोलण्यामुळे कुणाचे भले झाले आहे? आताही असंच काही तरी केलं असणार आणि ही फिटेइइंची पोरे खवळली असणार. विद्यार्थ्यांना कॉलेजबद्दल एवढी आपुलकी काय अशीच निर्माण होते? मास्तर म्हणतील त्याच्या विरुद्ध करायचे हे नैसर्गिकच आहे. तास चुकवू नका , वेळच्या वेळी अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरानंहो ही फिल्म इन्स्टिट्यूट आहे काही तरी ओरिजिनल करा जीटी मारू नका, असं काही तरी हे युधिष्ठिरमहाराज म्हणाले असणार. तिथंच ही कौरवांची सेना घायाळ झाली असणार. भ्राता युधिष्ठिर, हवं तर हवं तर आपण भिकार सावकार खेळू पण नियम बियम नका हो पाळायला लावू.

इथे विद्यार्थ्यांचे खरे दु:ख काय होते?  संस्थेच्या अध्यक्षांची निवड हा एवढा संवेदनशील मुद्दा का झाला असेल? आणि तो आताच का? ही स्वत:ला सर्जनशील वगैरे समजणारी मुले (मुले कसली तीस तीस वर्षांचे बाप्येही आहेत त्यांत) कुठले तरी अगम्य विदेशी समांतर चित्रपट पाहण्याचे होमवर्क सोडून घरचा ड्रामा करण्यात का रंगली असतील बरे? गजेंद्रसिंह यांचे कर्तृत्व युधिष्ठिराची ती भूमिका यापलीकडे नाही म्हणून? कॉलेजच्या चेअरमनच्या बौद्धिक कर्तृत्वावर विद्यार्थ्यांचे कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता तयार होत असतील तर अनेक शिक्षणसम्राटांच्या पावसाळी अळंबीसारख्या निघालेल्या कॉलेजमधून केवळ दरोडेखोर, चोर, पाकीटमार, चारित्र्यहीन असेच विद्यार्थी बाहेर पडायला हवेत. आम्हाला तर कॉलेजचे पहिले वर्ष संपेपर्यंत प्रिन्सिपॉल कोण आहेत तेच कळले नव्हते. बरेच दिवस एक इसम कॉरिडॉर मधून रोज सकाळी राउंड मारत असल्याच्या थाटात जाताना आम्ही पाहत असू. त्याच्या रुबाबावरून हेच ते प्रिन्सिपॉल असे आम्ही ठरवले होते. मग त्यांना आम्ही अदबीने "गुड मॉर्निंग सर" घालत असू. तेही न हसता "गुड मॉर्निंग" म्हणून पुढे जात. एकदा तर आमचा फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते मागे येऊन बसले. सरांनीही मान तुकवून त्यांची दखल घेतली. पूर्ण वर्गात शांतता. ती पंचेचाळीस मिनिटे जणू पंचेचाळीस तास वाटले होते. पुढे मग प्रत्येक फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते येऊन बसू लागले. मग मात्र त्यांची अडचण होऊ लागली. प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने सटकणारे आम्ही. नेमके मागच्या दारापाशीच हे बसू लागले होते. मग आम्ही झक मारत पूर्ण तास बसू लागलो होतो. आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर असा थेट हल्ला झाल्याने आमची गोची झाली होती. मग आम्ही आंदोलन करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप काय असावे यावर चर्चा झाली. कुठल्याच तासाला न बसण्याचा ठराव मी मांडला आणि तो तात्काळ पारित झाला. प्रचंड उत्साहाने आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. आसपासच्या गावातून शिकायला आलेले, होस्टेलवर राहणारे लगेच आपापल्या गावाला पळाले. आम्ही स्थानिक विद्यार्थी रोज घरी बोंब नको म्हणून कॉलेजला येत असू पण समोर विलिंग्डन कॉलेजच्या परिसरात आमच्या कॉलेजात नावालाही न आढळणारी हिरवळ पाहत हिंडत असू. आम्ही कुणीच वर्गात हजर राहत नाही हे पाहून प्रिन्सिपॉल अस्वस्थ झाले असतील याची आम्हाला खात्री होती. असेच तीनचार दिवस झाल्यावर काय परिस्थिती आहे ते पाहायला आम्ही काही जण कॉलेजात गेलो. मुळीच कुणी अस्वस्थ वगैरे नव्हते. सर्वत्र इतर तास नीट चालू होते. आमच्या वर्गाकडे जाऊन पाहिले तर आमच्या वर्गात तास सुरू होता आणि प्रिन्सिपॉल तसेच मागच्या बाकावर बसले होते. मग मात्र आम्ही सरांनाच थेट गाठले. आणि त्यांना स्वच्छ सांगितले. "सर, तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, गेली चार दिवस आमचा संप चालू आहे." सर म्हणाले," हो का? अरे वा! आधी तरी सांगायचं मीही तास घ्यायला आलो नसतो. सकाळी या तासानंतर एकदम दुपारी दोन वाजता तास असतो मला. बरं, ठीक चाललाय ना तुमचा संप?" असं म्हणून ते चालू लागले. आम्ही गडबडून त्यांच्या मागे धावलो,"सर! अहो थांबा! आमच्या मागण्या काय आहेत हे कुणीच विचारलं नाही!" त्यावर ते म्हणाले,"अरे संप करताहात हे कुणाला माहीत असलं तर विचारणार ना? बरं काय मागण्या आहेत? प्रेझेंटी ऑप्शनल होणार नाही. तुमच्या आधीच्या कित्येक ब्याचेसनी ती मागणी करून झालेली आहे." आम्ही व्यथित झालो. मुळात तेच दु:ख होते. पण ते दु:ख तसेच दाबून सरांना म्हणालो," सर, ते ठीक आहे. पण हे प्रिन्सिपॉलसर नेहमी तासाला येऊन बसू लागले आहेत. आमची वैयक्तिक गळचेपी होते आहे. वर्गात आम्हाला आमच्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाहीत. हे कधी थांबणार?" सर थोडेसे चमकले. म्हणाले,"प्रिन्सिपॉल आणि वर्गात? कधी आले होते? आणि मला कसे दिसले नाहीत?" "सर, बास का? आमचीच चेष्टा करता? सगळ्यात मागच्या बाकावर दाराजवळ बसतात ते कोण मग?" सर खो खो हसू लागले. आम्ही जरा संतापलोच. एकतर गळचेपी, त्यावर हास्य? हा लोकशाहीचा अपमान आहे. वगैरे वगैरे विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात सर म्हणाले,"वत्सांनो, ते प्रिन्सिपॉल नव्हेत. ते आहेत आपल्या कॉलेजचे सीनीयरमोस्ट विद्यार्थी, ऑनरेबल श्रीयुत बाळासाहेब कोरे उर्फ बाळ्या. गेली सात वर्षे फी भरताहेत. फ्लुईड मेक्यानिक्सवर त्यांचा जीव आहे म्हणून तो विषय त्यांना सोडवत नाही. एटीकेटीवर जगताहेत." असं म्हणून तो हसून हसून डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निघून गेले.  आमचं आंदोलन तिथेच विसर्जित झालं. पुढे बुडलेले तास घेण्यासाठी प्रिन्सिपॉलसाहेबांच्या केबिनबाहेर आठवडाभर धरणे धरून बसलो होतो.

तेव्हा कॉलेजचे चेअरमन कोण, प्रिन्सिपॉल कोण, शिपाई कोण यावर शिक्षण ठरत नाही. घोड्याला पाण्यापाशी नेणे हे कॉलेजचे काम. ते पाणी पिणे हे घोड्याचे काम. उगाच नाही आई आमची "एवढा मोठा घोडा झालायस" अशा शब्दांत संभावना करीत असे. विद्यार्थी ज्या शिक्षकांच्या थेट संपर्कात असतात त्या शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर नक्की पडतो. अशा शिक्षकांचा आग्रह धरला असता तरी ते एक वेळ समजू शकले असते. पण तेही तसे फारसे बरोबर झाले नसते. कारण इथे गजेंद्रसिंहांच्या कर्तृत्वाचा मुद्दा करत आंदोलन केले गेले. पूर्वीच्या दिग्गजांची नावे घेऊन त्यांच्या तुलनेत गजेंद्रसिंह म्हणजे कोणीच नाहीत असे दाखवले गेले. अनुपम खेर सारख्या नटाने भर टीव्हीवर त्यांचा अपमान केला. अनुपम खेर यांनी तो अपमान करावा याचे हसू आले. हा नट सुरुवातीला "सारांश" सारख्या चित्रपटात गंभीर व्यक्तिरेखा करून पुढे बहुतेक सगळ्या चित्रपटांत अक्षरश: मर्कटलीला करीत जगला. "लम्हें" या चित्रपटात या इसमाने जे काही चाळे केले आहेत ते अभिनय या सदरात मोडत असतील, तसला अभिनय शिकवू नये म्हणून आंदोलन करायला हवे. तेव्हा, अभिनयाविषयी प्रेम बाळगून जर पोटतिडिकेने जर हा इसम या वादात पडला असेल तर त्याने आधी आपण पोट भरण्यासाठी किती तडजोडी केल्या हे पाहावे आणि जरा थंड घ्यावे. आधीच्या चेअरमनमध्ये  श्याम बेनेगल, सईद अख्तर मिर्झा वगैरे लोकांची नावे घेतली जातात, गजेंद्रसिंहांची त्यांच्याशी तुलना केली जाते. आता बेनेगल मोठे नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या कितपत मोठे झाले ते? अनुपम खेरनेही  त्यांच्या सिनेमापेक्षा इतर व्यावसायिक सिनेमे जास्त केले की नाही? चेअरमनचे काम आहे प्रशासनाचे. केंद्र सरकारच्या अनुदानाने ही संस्था चालते. त्यांची नेमणूक मान्य व्हायला हवी. श्याम बेनेगल चेअरमन होते म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांतून बेनेगल निर्माण झाले नाहीत किंवा यू. आर. अनंतमूर्ती होते म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली नाही.

हे आंदोलन असो, किंवा सध्या चाललेला पुरस्कार-परत करण्याचा फार्स असो, यात एक प्रकारची एकसूत्रता जाणवते. अशी आंदोलने आधी झाली नाहीत. मुद्दे तसेच होते, पण लेखकांना पुरस्कार परत करावेसे वाटले नाहीत. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुणी घाले घालत नव्हते. शिखांचे शिरकाण झाले तेव्हा त्यांची संवेदनशीलता बधीर  होती, पण व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित असल्यामुळे पुरस्कार कपाटात चमकत होते आणि पुरस्काराची रक्कम ब्यांकेत व्याज मिळवत होती. तेवढ्यात मोदी सरकार आले आणि या व्यंकटांची खळी सांडली. आता सर्वत्र व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी दिसू लागली, सरकार उद्दाम वाटू लागले, मनमानी करणारे वाटू लागले, लोकशाही तिरडीवर बांधली गेली. थोडक्यात कॉंग्रेस लोकांना जे लोकशाहीचे फसवे वातावरण देऊन त्या पांघरुणाखाली जे काही "सरकाय लो खटिया जाडा लगे" करत होती ते या लोकांना बरे वाटत होते. आता स्वच्छ प्रशासन, शिस्त, गंभीरपणा, आचरटपणा करण्याला प्रोत्साहन नाही या गोष्टी मग लोकशाहीवर घाला वाटू लागल्या आहेत. कॉलेजमध्ये ड्रग्ज नको, सिगारेटी नकोत, दारू नको या गोष्टी आल्या की व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी वाटू लागली. सर्व स्तरावर, सर्व आघाड्यांवर मोदीविरोध हेच सूत्र यातून दिसून येते, मग यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे ओळखायला वेळ लागत नाही. जेव्हा विद्यार्थी आम्हाला चांगले प्रिन्सिपॉल पाहिजेत म्हणून आंदोलन करताना दिसतात तेव्हा ते खरे विद्यार्थी नाहीत हे कुणीही खरा विद्यार्थी (आजी किंवा माजी) ओळखेल.

खरं तर या विद्यार्थ्यांना फिल्म बनवण्याचा अप्रतिम धडा मिळाला. उगाच कुठला तरी "खंडहर" टाईप चित्रपट काढून निर्मात्याचे दिवाळे वाजवण्यापेक्षा, एकता कपूरसारखं कच्या बाराखडीचे कौटुंबिक ड्रामे करून टीआरपी वाढवणे खिशाला बरे पडते. फिटेइईंच्या विद्यार्थ्यांच्या या चाळ्याला ड्रामा एवढेच नाव देता येईल. मोदींनी या ड्राम्याला भीक घातली नाही हेच बरे झाले. ते घालणार नव्हतेच. लोकशाहीचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांना हेच उत्तर बरे. 

Tuesday, October 20, 2015

क्रांतीचे ओघळ

आयली रे आयली! राजापुरात गंगा आयली. आणि देशात समाजवादी क्रांतीची. इकडे आमच्या वाडीत जास्त नाय पण तीन ओघळ तरी आयले. वाडीत प्रगती आसा बाकी. नाय तर पिक्चर सगळ्या जगान पाव्हन दोन तीन वर्षां झाली की मगे आमच्या गोविंद चित्रमंदिरात येतलो. तसां आता तरी काय होवक नाय. क्रांतीची पैली नसली तरी दुसरी बोंब तरी वाडीतसून पडली ह्यां काय कमी नाय. अाणि एक नाय, तीन तीन बोंबा. फोन आयलो रे आयलो की इकडे पत्रक तयार, परत दिऊचो चेक तयार! (अरे तो चेक भरूच्या आधी माका सांगात रे! बाऊन्स झाल्यार बोंबटी मारत माझ्या खळ्यात नका उभे ऱ्हांव. ज्या बॅंकेचो आसा ती बॅंक तरी आसा की नाय ते त्या रवळनाथाकच म्हायत.) त्या निमित्तान पेपरात वाडीचा नाव तरी येयत. नाय तर वाडी म्हटल्यार लोक म्हणतंत ती लाकडी खेळणी मिळतंत तीच मां? काय काय असतंत तेंका वाडीचे बटर म्हायती. अगदीच कोणी येवन् गेलेलो असलो तर मोती तलावाचां नाव काढतलो. बाकी काय वाडीचां? आता काय तसां नाय. आता देशात म्हायती पडलां की हंयसर पुरोगामी समाजवादी लेखक रंवतत म्हणान. आमच्या खेळण्यांपेक्षा गुळगुळीत आणि तेच्यापेक्षा रंगीत! काय समाजल्यात! वाडी आमची तशी एकदम देखणी. सुंदरवाडी नाव काय असांच पडाक नाय. पण गावाक एक पनवती लागलेली. ती म्हणजे आर एस एस वाल्यांची. रें, आयले खंयसून हे? शाखा भरंवतंत, दसऱ्याक संचलन का काय तां करतंत, होयां कशांक तां संचलन? आमचां धुळवडीचां रोंबाट काय कमी पडलां? रोंबाटाक जावक काय सक्काळी उठूक लागना नाय, खळ घालून चड्डी धुवूक लागना नाय. रोंबाट असतां एक तर संध्याकाळी, तां पण नवटांक नवटांक मारून इल्यावर. तेका गणवेष खंयचो, कपडे पण आॅप्शनल! समाजाच्या इतकी जवळची मिरवणूक खंय आणि खंय तां संचलन. मगे वाडीत समाजवादाची गरज भासूक लागली. माज करून वाद घालूक येतां तो समाजवाद असली सोपी व्याख्या बघितल्यार कोणी पण सामील होतलो. मगे आमका आमचो सूर्य गावलो. कोकणातलो नाय, डायरेक्ट भायरसून हाडलेलो. आमच्या वाडीत सगळीकडे सूर्य गांवतले. माठेवाड्यात एक, सालईवाड्यात एक, राजवाड्याकडे जांवन पाह्यल्यात तर किमान तीनचार सूर्य राजवाड्याच्या कमानीपाशीच गांवतले. सगळे स्वत:च्या प्रकाशात स्वत:चेच डोळे झापडवणारे. पण आमका गावंलो एक सूर्य. सूर्य पण असो की डोक्यार चंद्र असलेलो. कोणी आंबो म्हटल्यान तर हो चिंच म्हणा. कोणी सोयरा केल्यान की हेच्या घरी हो म्हाळ घालतलो. कोणी आरएसएस वाल्यान संचलन काढल्यान की हो सोरो घेवन त्यात धुमशान घालतलो. आमका असोच सूर्य होयो होतो. या सूर्यान आमका दोन शब्द शिकवल्यान - अभिव्यक्ति स्वातंत्र्य. पहिल्यान आमका उच्चार करूक कठीण जाय. मगे आम्ही गुरुजींच्या घरी जावन बसू. माका गुरुजी,"काय रे सांगवीकर, कशाक आयलंय?" असा प्रेमान विचारी. मी आपलो तेंच्या प्रकाशात दिपून जाय. गुर्जीसारख्या मिशा आपल्याकडे कोकणात गावूच्या नायत. तसो चश्मो पण नाय. खास पुण्याक बनवून घेतलंय म्हणान सांगा होते. मी तशे मिशा ठेवचो प्रयत्न केलंय पण बांधावरच्या वाली येयत तशा येवक लागल्यार नाद सोडून दिलंय. 

मगे गुर्जीनी समाजवाद म्हंजे काय ता आमका उलगडून सांगीतल्यानी. आपल्या लेखनाचा, वाचनाचा आणि भाषणाचा स्वातंत्र्य म्हत्वाचा. समाजवाद हो असो वाद आसा की जो संपणारो नाय. समाजार सतत अन्याय होत असता. तो अन्याय करणारे असतंत हे हिंदुत्ववादी. म्हंजे तसा काय ते करीत नायत पण आपण म्हणूचा तसां. नाय तर वाद कसो घालूक मिळतलो? आरएसएस म्हणजे हिंदुत्ववाद, हिंदुत्ववाद म्हणजे आरएसएस. आमी म्हटलां, ओ आमी तर हिंदूच मां? तर बोलले, हां! आता कसो बोललंय? हिंदू असून हिंदुत्वाक विरोध ह्यां समाजवादी माणसाचां काम. मगे सांगूक गांवता, तुमी माझ्या हेतूविषयी संशय घेताच कसो? मी धर्माच्या पलीकडे पोचलंय. माका माणूस हो धर्म म्हत्वाचो वाटतां. म्हणान तर हिंदू असानसुद्धा मी हिंदू विचारांक विरोध करतंय. लक्षात ठेय, तुका लेखक होवचा आसा तर मानवधर्म, मनुवाद, आरएसएसचो डाव, अल्पसंख्यांकांची गळचेपी, अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे असले शब्द बोलूक आणि लिहूक येवक होये. तुमचा लेखन काय तां करा, पण समाजवादी नसल्यात तर तुमचा लेखन सकस नाय. तुम्ही संवेदनशील लेखक नाय. तेका पुरस्कार काय भेटूचो नाय. तां ऐकून आमची ट्यूब काय ती पेटली. सगळा बिढार कांय तां एकदम समाजला.

मगे एक आमका संधी गावली. आमच्या गावात आरएसएसचो प्रादुर्भाव जोरात होतो. गावात आमच्या लेखक खूप. आमच्यासारखे सकस नाय, दिवसां कॉलेजात दोन तास शिकवूचां आणि मगे अक्खो दिवस उरलेलो तेंका. लेखक होवक लागतां काय? भरपूर फुकटचो वेळ, नाय? "आरती" मासिकात लिहिणारे असे रिकामे लेखक खूप. मी बरेच दिवस म्हणा होतंय या आरतीची एकदा आरती काढूक होयी. मी जे जे म्हणान पाठंयतंय सगळा साभार परत करतंत. सामाजिक आशयाचा तुमकां काय्येक नको आणि हिंदुत्ववादी लेखन मात्र पहिल्या पानार? मी एकदा सावतांक बोललंय तर माका म्हणतां,"तू काय लिहितंय ता तुका तरी समाजतां काय रें?" मी बोललंय तेका, रें सावतां, मराठीचो शिक्षक झालंय म्हणान तू लगेच समीक्षक झालंय काय रें? माझा लेखन तुका समाजना नाय कारण ता पुरोगामी आसा. प्रस्थापित समाजाविरोधी लेखन म्हणजे पुरोगामी. तर जळ्ळो माका म्हणता, "प्रस्थापित समाजविरोधी नको, नको असलेल्या प्रस्थापित रूढीविरोधी लिहा. समाज एकजिनसी कसा होईल त्यावर लिहा. नुसता हिंदूविरोध म्हणजे पुरोगामी नव्हे." आवशीक खांव! हेका काय कळता? हो सातवीच्या मुलांक मराठी शिकवतां. मी धावीच्या मुलांका शिकयतंय. हो माका शिकवतलो? गुर्जींक फोन लावलंय. गुर्जी बोलले,"बरां केलंय. असोच पुरोगामी रंव. हिंदुत्ववाल्यांका विरोध करूकच होयो. कशाक म्हणून कोणी इचारलां तर त्याका माझ्याकडे धाडून दे. बगतंय त्याका मी. नुकतांच लिहिलेलां पुस्तक आसां, बरां पाच किलोचा झालाहा, मारतंय डोक्यात तेच्या!" मी म्हटलां, "गुर्जी, खंयचां हो नवीन पुस्तक ह्यां?" माका बोलले,"या हिंदुत्वाची अडगळ खूप झालीहा. म्हणान लिहून टाकलंय. काय पुरस्कार बिरस्कार दिल्यानी तर दिल्यानी, पण चांगला जड झालाहा बाकी. प्रकाशकाक नाय अक्कल. इतके प्रती काढतात? सह्या करून देऊन थकलंय. उरलेल्या प्रती अडगळीत पडल्या मरे. त्याच हेंच्या डोक्यात मारूक उपयोगी पडतले." गुर्जींनीच प्रोत्साहन दिल्यार बरां वाटलां. मगे पांदीत दडून रंवलंय. कोण तरी येतलो हिंदुत्व डोक्यावर घेवंन, मगे बगतंय. 

तसो एक चान्स आयलोच. आरती मासिकानच चान्स दिल्यान. पु.भा. भावेवर लेख! म्हटलां बरो गांवलो हो लेखक. चौकशी केलंय तर समाजला लेखक संघाचो. मगे तर फुलटॉसच घावलो. फोन केलंय आरतीच्या संपादकाक. माझो फोन म्हटल्यार पहिलो म्हणता कसो,"काय हो आमचा टपाल मिळूक नाय की काय? रजिस्टर्ड पोष्टान पाठंयलेला आसा." असो राग आयलो. मी म्हटलंय,"शिरां पडली तुमच्या मासिकार ती. होया कोणाक तां? मी फोन केलंय तो तुमका इशारो देण्यासाठी!" माका म्हणता,"आता या वयात तुम्ही माका कसले इशारे करतात?" मी सरळ सांगितलंय,"तुम्ही ज्यां काय छापून हाडतासात मां, ता पुरोगामी चळवळीक काय पसंत नाय. काय समाजल्यात? हो जो कोण संघाचो लेखक तुम्ही हाडल्यात, आणि तो जो काय हिंदुत्ववादी लिवता, तां बंद होऊक होया. नाय तर परिणाम बरो होवचो नाय." तर माका म्हणता,"पुरोगामी चळवळवाले तुमी, तुमी लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य यासाठी लढता ना? मग हेका विरोध कशाक? त्यांचोपण हक्क नाय लिवायचो?" मी म्हटलंय,"तां माका काय सांगू नुकात. एक सांगतंय, ह्यां लेखन बंद झाला नाय, तर आमी पुरोगामी तुमच्या अंकाची होळी करतलो. मगे माका सांगू नकात." तर नालायक माका म्हणतां कसो,"ज्यां काय करायचा तां अंक इकत घेवन करां म्हणजे झालां. आत्ताच वर्षाची वर्गणी विकत घेवन ठेयल्यात तर सस्त्यात पडतलां." मी भडकान म्हटलंय,"पर्वा नाय हो, माझो सगळो पगार घालीन. अशी किती असतली तुमची वर्गणी?" बोलतां,"एक अंक पंधरा रुपये, वार्षिक वर्गणी दीडशे रुपये. आता तुमी होळीच करण्याचा मनावर घेतलां तर, जरा बरीशी होळी करा. दहा अंक तरी पायजेत नाय? वाचन मंदिरासमोर होळी केल्यात तर निदान कॉलेजच्या किनाऱ्यावरून तरी लोकांक दिसाक होयी नाय?" मी फोन खाली ठेवन दिलंय. गुर्जींचां बरां आसा. त्यांच्या खिशातून काय जाणां नाय. पंधरा रुपयांत कोळंबीचो चांगलो एवढो वाटो येतां. विचार करत होतंय. एक गोष्ट गुरुजींक विचारूक होयी. आपणाक जसा लिहिण्याचा स्वातंत्र्य होया, तसांच हिंदुत्ववाद्यांनी म्हटलां तर? दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलंय तसां. तर माका बोलले,"प्रश्न बरो आसा. अरे हां, तुका एक सांगूचा रंवला. तुझ्या पुस्तकाक पुरस्काराची शिफारस केलंय. मुंबयक गेल्लंय काल. फिल्डिंग लावून इलंय. फुडल्या म्हैन्यात डिक्लेअर करतले. " मी तर भारावंन गेलंय. काय बोलूक सुचाक नाय. "गुर्जी! तुमची कृपा!" इतक्याच बोललंय. मगे माका म्हणाले,"तुझ्या प्रश्नाचा उत्तर गांवलां मां?" मी म्हटलंय,"खंयचो प्रश्न हो?"

Thursday, October 15, 2015

कथा एका विद्रोहाची

समाजातील बदलाची चाहूल प्रथम साहित्यिकांना लागते असे ऐकले होते. कुठे खुट्ट झाले तरी एक तरी लेखन कामाठी येरू त्यावर हजार शब्द खरडतो. आता सोशल मीडियाने तर माकडाच्या हाती कोलीत दिल्याप्रमाणे जो तो लेखक बनला आहे तो भाग वेगळा. आम्ही कॉपी पेस्ट वाल्यांना लेखकांच्या गणतीत धरत नाही. लेखक म्हणजे "दिसामाजि काही तरी खरडावे, ओरडावे अन्यथा रडावे, पण ते स्वत:चे असावे" या समर्थांच्या आदेशाचे (मूळ आदेशात थोडासा कालानुरूप बदल आम्ही आमच्या अखत्यारीत केला आहे) पालन करणारे. विद्रोही साहित्यिकांना हे लागू नाही. ते त्यांच्या कंपूप्रमुखाकडून जसे आदेश येईल त्याप्रमाणे लेखन करतात. तिथे द्रोह चालत नाही. केला तर पुरस्काराला, सत्काराला मुकावे लागते. पुन्हा विद्रोही म्हणवून घ्यायला भटाब्राम्हणांविरोधी किमान तीन हजार शब्दांचा लेख अथवा तीस ओळींची कविता यापैकी एक लिहून भालचंद्रचरणी अर्पण करावे लागते आणि नंदीप्रमाणे खूर दुमडून त्या शंकरापुढे बसावे लागते. तिथे विद्रोह चालत नाही.

असेच आमचे एक मित्र विद्रोही साहित्यिक आहेत. कोकणातले आहेत. त्यामुळे मुंबईला जाऊन चाकरमानीपणा करत विद्रोहीपणाचीही धुरा सांभाळत आहेत. एकदा असेच ते त्यांची विद्रोही कविता वाचून दाखवत असताना त्यांच्या शरीरातील विद्रोही रक्त तापले होते आणि त्यामुळे आवाज उंचावत चिरकत होता. तो चिरकलेला आवाज शिगेला पोचला असताना त्यांच्या ऑफिसातून साहेबाचा फोन आला होता. साहित्यिकांनी खर्डेघाशी करताना कुठल्या तरी ब्यालंस शीट मध्ये बराच विद्रोह दाखवला होता म्हणून साहेबांनी त्यांच्या पगारात क्रांती होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी तत्काळ "हो साहेब, लगेच येतो" असे अ-विद्रोही विधान करीत कवितेचे भेंडोळे गुंडाळले होते. ते अधूनमधून आम्हाला अशा विद्रोही कविता वाचायला देत असतात. परवाच घेऊन आले होते संध्याकाळी संध्याकाळी. म्हणजे, त्यांची कविता. मी आणि मोरू सुखदु:खाच्या गोष्टी करत बसलो होतो. दिवाळीच्या बोनसची चर्चा करीत होतो. बोनस मिळाला की अष्टविनायक यात्रा करण्याचे योजत होतो. त्यात हे आले. आमची चर्चा ऐकून त्यांनी "हं:! अष्टविनायक!" असा उद्गार काढला. "अहो, जग कुठं चाललं आहे, आणि तुम्ही कुठं!" इति विद्रोही. मी आणि मोरूने एकमेकाकडे पाहिले. आता जग आम्हाला सोडून आणि आम्हाला नकळत कुठे चालले होते बरे? नाही म्हणायला पहिल्या मजल्यावरच्या जोगांचे वडील मागच्या महिन्यात जग सोडून गेले होते, पण ते एकटेच गेले होते, जग आहे तसेच राहिले होते. मी तसे म्हणाल्यावर विद्रोही उखडले,"करा, नेहमी चेष्टा करा. एकदा क्रांती सुरू झाली म्हणजे मग कुठं जाल?" आम्हाला काही कळेना. मग मीच म्हटलं, "नवी कविता केली आहे वाटतं?" तसे ते खूष झाले. पण आनंद दाखवणे हे विद्रोहात बसत नसल्यामुळे मख्ख चेहऱ्याने ते म्हणाले,"कविता केली जात नाही. ती होत असते. वेदना ती प्रसवते. निर्मितीची आदिवेदना काय आहे हे तुला कळणार नाही. प्रथम सूक्ष्म जाणीव, मग अस्वस्थपणा, मग तो विस्फोटक कोंडमारा, ते अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य नसल्याने वेदना तशीच सहन करणे, आणि मग शेवटी असह्य होऊन कुणाची पर्वा न करता शब्द भळभळा वाहत बाहेर येणे…" इथे विद्रोहींची नजर शून्यात लागली. मोरू म्हणाला,"हे मला नेहमी सकाळी होते. आमच्या मजल्यावर पाच बिऱ्हाडांत मिळून एक शौचकूप आहे. या सगळ्या अवस्थांतून मी रोज जातो." विद्रोही खिन्नपणे म्हणाले,"जाऊद्या मोरोपंत, पांढरपेशी समाजात वावरणारे तुम्ही. तुम्ही बसा पाडगावकरांच्या कविता वाचत." मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, ऐका माझी नवीन कविता. लंच टाईममध्ये झाली. कवितेचे नाव आहे मढे!"

सरणावर ते जळते
मढे प्रथा परंपरांचे
इथे उभा मी निस्संग
मनात लाडू दहाव्याचे

वाटते आता मोडावेच
हे बंध पावित्र्याचे
फेकावे दूर साखळदंड
पायातील नात्यागोत्यांचे

धुमसत्या या राखेतून
फुटतील कोवळे कोंब
विद्रोहाचे खत त्याला
अन पाणी असंतोषाचे

आणि ते अपेक्षेने आमच्याकडे पाहू लागले. तशी मोरू म्हणाला,"अरे तुला लाडूच पाहिजेत तर दहाव्याच्या लाडवाची अभद्र आशा कशाला? वहिनी चांगले तुपावर परतलेल्या रव्याचे करून नाही का देणार?" त्यावर विद्रोही भडकून म्हणाले,"हेच! हेच ते साखळदंड! हेच ते पांढरपेशी मुळमुळीत जगणे. कसली मूल्ये आणि कसली नीती? कसल्या भद्राभद्रतेच्या तुमच्या भटी संकल्पना! सगळं मोडून तोडून टाकलं पाहिजे. सध्याच्या श्रद्धा मोडीत काढल्या पाहिजेत, आदर वगैरे वाटत असलेल्या गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत!" त्यावर मोरूने निरागसतेने विचारले,"आणि त्यानंतर?" मग विद्रोही आणखी भडकून म्हणाले,"त्यानंतर? म्हणजे काय? हे काय विचारणं झालं? त्यानंतर नवीन व्यवस्था, नवीन आदराची स्थाने! अभिव्यक्ती स्वातंत्र्य! माणूस माणसाला माणूस म्हणून भेटणार! त्यासाठी सर्व प्रस्थापित मूल्ये फेकून देणे आवश्यक आहे!" पूर्वीच्याच त्या निरागसतेने मोरू म्हणाला,"सगळी म्हणजे सगळी मूल्ये?" चेव चढून विद्रोही गरजले,"होय! सग्ग्ळी! संपूर्ण क्रांतीच आता मानवतेला तारू शकेल. इन्किलाब झिंदाबाद!" तेवढ्यात आमच्या हिने चहा आणला. चहा पाहून विद्रोहींनी इन्किलाब स्थगित केला आणि "वा! अगदी वेळेवर चहा!" असं म्हणत डोळे बंद करून चहाचे फुरके मारू लागले. मोरूने विचारले,"काय रे बुवा, या तुझ्या विद्रोही कल्पना वहिनींना ठाऊक आहेत काय?" त्यावर सटपटून विद्रोही कवी म्हणाले,"बाबा रे मला अजून जगायचंय. माणसानं घरात प्रवेश करताना आपल्या जाहीर भूमिका भिजलेली छत्री दाराबाहेर बादलीत उलटी करून ठेवतो तशा बाहेर ठेवाव्यात. बरं केलंस आठवण केलीस. तुझ्या वहिनीनं ऑफिसातून येताना नारळ आणायला सांगितले होते. नवरात्र बसतंय उद्या. बराय, चलतो. वहिनी, ही विचारत होती हळदीकुंकवाचा कार्यक्रम कधी ठेवता आहात?" असे म्हणून ती विद्रोही चळवळ स्वत:च्या घरी गेली. दोन मिनिटांत ते परत येताना दिसले. म्हटलं पुन्हा कवितेची "कळ" आलेली दिसते. घरी पोहोचेपर्यंत दम धरवला नसता म्हणून माझ्याकडे कागद मागायला आले असावेत. लहानपणापासून कागदावर "करायची" त्यांची सवय गेलेली नव्हती. असा विचार करतो तो ते जवळ आले. मुद्रेवर खुदाई खिन्नता होती. ते मोरोबांना म्हणाले,"मोऱ्या, आम्ही विद्रोही तर आहोतच, पण पुरोगामी जास्त आहोत. तेव्हा आमच्या कलत्रासमोर आमचा उल्लेख पुरोगामी साहित्यिक असा केलास तर बरे होईल. विद्रोह वगैरे शब्द तिला कळत नाहीत. उगाच मी तिच्याशी द्रोह वगैरे करतो आहे अशी कल्पना होईल तिची. बराय चलतो. आठच्या आत घरी पोचलं नाही तर कारणे दाखवा नोटीस मिळते."

तस्मात त्या चाहुलीबिहुलीचे म्हणाल तर आम्हाला त्याचे फारसे कवतिक नाही. गाढवदेखील पाऊस पडायचा असला की आडोसा शोधून उभे राहते. पण पावसामुळे आपले जगणे अशक्य झाले आहे, जीव खुरात धरून जगतो आहोत अशा खिंकाळ्या ते मारीत नाही. थोडक्यात पुरोगामी साहित्यिकांमुळे आमचा गाढवाप्रति असलेला आदर दुणावला आहे. वाईटातून चांगले निघते ते असे.

Monday, October 12, 2015

बेगडी धर्मनिरपेक्षता

हल्ली घडणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टींना मोदी जबाबदार आहेत असे मानून "हेच का ते अच्छे दिन?" असे उपहासाने विचारले जात आहे. त्या लोकांनी एवढे तरी मान्य करावे की असे विचारण्यासाठी अडुसष्ट  वर्षांत वाजपेयींचा अपवाद वगळता एकही पंतप्रधान तुम्हाला मिळाला नव्हता. कॉंग्रेसच्या राजवटीत आला दिन गेला एवढेच समाधान होते. भविष्याची चिंता करायचा प्रश्नच नव्हता. काही बदलेल असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. मोदी प्रत्येकाची मानसिकता बदलू शकणार नाहीत. ते तुम्हाला संधी देऊ शकतात आणि देतही आहेत. तरीही हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे माजलेले काही तथाकथित बुद्धिवंत राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मोदींवर चिखलफेक करीत आहेत. 

बटाट्याची भाजी खाऊन तुंदिलतनूवर हात फिरवत सोफ्यावर पहुडलेल्या तथाकथित बुद्धिवंतांनो, तुम्हाला सर्वधर्मसमावेशकता या शब्दाचा अर्थ तरी कळतो आहे का? समावेश कशात करून घ्यायचा? राष्ट्रीय प्रवाहात? राष्ट्रीय प्रवाह तरी काय आहे तुमचा? भारताच्या घटनेत सामावून घेणे, त्यांना मतदानाचा अधिकार असणे, सरकारी संस्थांवर खटला दाखल करण्याचा अधिकार असणे, हवा तो कायदेशीर व्यवसाय करणे, स्वत:ला पटेल त्या धर्माचे पालन करणे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य असणे हेच ना? यातले कुणाला काय मिळाले नाही आहे? तुम्ही मारे त्यांना हे सगळे द्याल. पण ते तुमचा राष्ट्रवाद मानत आहेत काय? धर्माने सांगितले तसे लग्न, धर्माने सांगितले तसा एकतर्फी घटस्फोट आणि धर्माने सांगितले तसा "काफिर" लोकांचा वध हेच शेवटी त्यांना जास्त प्रिय आहे ना? समान नागरी कायदा आणि धर्मनिरपेक्षता त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करा. तुमच्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेला त्यांनी तुमच्या योग्य त्या ठिकाणी घातले आहे. एक दोन फुटकळ उदाहरणे देऊन आमच्या तोंडाला पाने पुसू नका. काही राजकारणीच तसे करीत आहेत वगैरे मूर्ख विधानेही करू नका. ठीक आहे एक वेळा मानू की काही राजकारणीच फक्त तसे करीत आहेत. पण मग त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची क्षमताही त्यांच्या मागे उभे असलेल्या निष्कलंक, पापभीरु, गरीब अशा त्या लोकांमध्ये आहे. त्यांनी केले आहे का तसे? बरं, त्यांनी न करो, धर्मनिरपेक्षतेचा झेंडा तुम्ही घेतला आहे, मग तुमची तरी थोबाडे त्यांच्या विरोधात उचकटत आहेत का?  तो अधमोत्तम ओवेसी आणि आझम खान जी काही वक्तव्ये करताहेत ती देशद्रोहापेक्षा काही कमी नाहीत. त्यांना जोवर तुम्ही विरोध करीत नाही तोवर तुमच्या सर्वधर्मसमभावाची किंमत शून्य आहे. तुम्हाला राष्ट्र प्रथम वाटत नाही तर धर्म वाटतो आहे. असे जर असेल तर हे सूर्याजी पिसाळाच्या अवलादीचे सर्वधर्मसमभावीसुद्धा देशद्रोही ठरतात. सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता ही मंदिरांत, हिंदू लोकांच्या घरात जाऊन त्यांना शिकवण्याची गरज नाही. ती तिथे गेली हजारो वर्षे आहे. किंबहुना ती अस्तित्वात आहे म्हणून तर अस्तनीतले निखारे, पायातले साप, दुतोंडी किरडू आणि या सर्वांवर कडी करणारे हे खोटे धर्मनिरपेक्षतावादी सुखाने जगत आहेत. माझे या बेगडी बुद्धिवंतांना आव्हान आहे, एकदा हा तुमचा सर्वधर्मसमभाव महंमद अली रोडवर जाऊन शिकवा. तुमच्या भेजाचा फ्राय त्याच दिवशी तिथल्या हॉटेलात विकायला ठेवलेला असेल याची खात्री आहे.

आता अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून कित्येक वर्षे उपभोगलेले पुरस्कार परत करणे असेल, तर खुशाल करा. त्या परत करण्याला काहीही अर्थ नाही. शिखांच्या कतली झाल्या, काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या त्यांना देशोधडीला लावले, केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तेव्हा हेच लोक बाप मेल्याप्रमाणे निपचीत पडले होते. जणू त्या हत्या म्हणजे धर्मनिरपेक्षतेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या अखत्यारीत झाल्या होत्या.  स्वच्छ जिहाद पुकारून दहशतवादी हल्ले झाले की म्हणायचं दहशतवादाला धर्म नसतो. अरे मग दीड दमडीच्या लेखनकामाठ्यांनो, खोट्या आरोपाखाली हिंदूना अडकवून त्याला मात्र भगवा दहशतवाद म्हणायचं? असली बेगडी धर्मनिरपेक्षता काय कामाची? सत्तर टक्के जनतेच्या भावनांची किंमत जर होत नसेल तर ती लोकशाही नाही हे या टिनपाट साहित्यिकांनी ध्यानात घ्यावे. आजवर लोकशाहीचा अर्थ वाटेल ते भकणे, तोंडाला येतील ते आरोप करणे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून काही वाट्टेल ते लिहिणे अथवा चितारणे असा लावला गेला आहे. असल्या अमर्याद स्वातंत्र्याचा फायदा कुणी करून घेतला? युरोपमध्ये आज आपण त्याची फळे पाहत आहोत. असल्याच सर्वधर्मसमभावाची आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याची किंमत चार्ली हेब्दोवरील हल्ल्याच्या रूपात द्यावी लागली. काही वाट चुकलेल्या लोकांच्या कर्माची फळे त्यांच्या समधर्मीयांनी का भोगायची असा विचार सर्वांनी केला. पण हे लक्षात घ्या की काही मोजक्या समधर्मीयांनी त्या घटनेचा निषेध केला. मग ज्यांनी निषेध केला नाही त्यांचा हल्ल्याला छुपा पाठिंबाच होता असे म्हणायचे का? जिथे जिथे हे अतिसहिष्णू वातावरण आहे तिथे आज ही समस्या आहे. भारत तर त्याचे नंदनवन आहे. शेजारी केवळ आपल्या द्वेषावर निर्मिती झालेला देश आहे, तो सतत दहशतवादी हल्ले घडवून आणतो आहे, तरीही आपण निर्लज्जपणे दहशतवादाला धर्म नसतो म्हणतो, त्या देशाच्या कलाकारांना आलिंगन देतो. कलेला सीमारेषा नसतात अशी षंढ विधाने करून त्याचे समर्थन करतो. त्याचेही राजकारण करतो. ती फशिवसेना तर अगदी आव आणून त्याला विरोध करते आणि मागील गल्लीतून हळूच जाऊन तो राहत फतेह अली खान की आणि कुणी मसण्याच्या मैफिलीला जाऊन बसते. फशिवसेनेला केवळ विरोधाला विरोध म्हणून भाजप त्या कसुरीच्या पुस्तकाचे उद्घाटन घडवून आणते. सगळेच नालायक.

तेव्हा खुशाल परत करा तुमचे पुरस्कार. पुरस्कार तुमच्या लिखाणाला होता. लेखनाचा आणि वैयक्तिक शुचितेचा फारसा संबंध नसतो हेच यावरून सिद्ध होते. आपण खूप बुद्धिवादी आहोत, बुद्धिजीवी आहोत, अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे आपला श्वास आहे, मी हिंदू असलो वा नसलो तरी मला सर्व धर्म सारखे, हे असं वाटण्याचीही एक झिंग असते. ती नशा दारू, गांजा, अफू यांच्यापेक्षा प्रभावी असते. त्या नशेत केलेले हे कृत्य आहे असे मी समजतो. पण मी म्हणतो नुसता पुरस्कारच परत करून का थांबता? भावना जर एवढ्याच तीव्र असतील तर प्राणत्याग वगैरेही करायला काय हरकत आहे? सर्वधर्मसमभाव दाखवण्याची ती एक संधी किंवा अंतिम किंमत असे समजा हवं तर. एरवी नारळ नासका निघाला म्हणून दुकानदाराला परत करतो एवढेच त्याचे स्वरूप.

Wednesday, October 7, 2015

ते उनाड वाचनाचे दिवस

पुस्तकांचं वेड म्हणा व्यसन म्हणा लहानपणी ज्याला लागलं ते आयुष्यभर राहिलं. जे समोर आलं ते कसलाही विचार न करता वाचून काढलं. विचार करण्याचं वय तरी कुठं होतं म्हणा. अक्षरश: "डोळ्यांचे रोग" ते सावरकरांची "सोनेरी पाने" अशी सगळी पुस्तकं समोर होती. ती एकाच निर्विकारतेने वाचली. निर्विकारतेने अशा अर्थाने की पाटी कोरी होती. कुठल्याही पुस्तकाने अजून संस्कार वा कुसंस्कार दिलेले नव्हते. कुठलेही विकार न जडता केली कृती म्हणजे निर्विकारपणे म्हणायला हवी. घरी भरपूर पुस्तके, गावातील श्रीराम वाचनमंदिरातून घरी आलेली पुस्तके असं सगळं वातावरण होतं. टीव्ही ही संकल्पनाच माहीत नसल्यामुळे अज्ञानात सुख होतं. टीव्हीचा शोध जगात लागला असला तरी आमच्या गावात यायला अजून बक्कळ वर्षं होती. साधा महाराष्ट्र टाईम्स दोन दिवस उशिरा येई तिथे तंत्रज्ञान वगैरे लांबचीच गोष्ट. रामायण चित्रपटही आमच्या गावात लागेपर्यंत सीताहरण, रावणदहन होऊन लवकुश चांगले गायला वगैरे लागले होते. रेडिओ फक्त सकाळी सातच्या बातम्या ऐकण्यापुरता. रोज सकाळी "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम, प्रवाचक: बलदेवानंद सागर:" झाल्यानंतर तो बलदेवानंद दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत बातम्यांचे खिळे जुळवत "राम रामौ रामा:" करत बसतो असं मला वाटायचं. इंटरनेट नव्हतं, स्मार्ट फोन्स नव्हते. दिवसभर उनाडून केवळ नाईलाजाने घरी आल्यावर मग जेवायचं आणि तडक झोपायचं अशी साधी सरळ दिनचर्या असे. पुस्तक वाचायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण जेवतानाही पुस्तक शेजारी यायला लागलं. आई वैतागून म्हणायची,"ठेव ते बाजूला! जेवताना घास नाकात गेला तरी कळायचं नाही!" तरीही मी हट्टानं पुस्तक घेऊनच बसायचो. त्यावेळेला वाटायचं, आयला या देवांचं बरं आहे चारचार आठआठ हात, पुस्तक एका हातात धरायचं, दुसऱ्या हातानं पानं उलटायची, तिसऱ्या हातानं जेवायचं, चौथ्यानं पाण्याचं भांडं तोंडाशी लावायचं. रावणबिवण  तर त्या काळात मल्टीप्रोसेसर, मल्टी थ्रेडिंग, पॅरलल प्रोसेसिंग असलेला. एकाच वेळेला धा पुस्तकं वाचू शकला असता. असो. मुद्दा असा की पुस्तकं वाचायची गोडी लागली.

सगळ्यात प्रथम जर काही चांगलं, अर्थात त्या वयानुसार चांगलं, वाचलेलं आठवतं ते किशोर मासिक. अत्यंत सहज, सरळ कथा, त्याला जोड अप्रतिम चित्रांची. गोष्टी तर सुंदर असतच, पण कविताही अप्रतिम असत. एक कविता अजूनही आठवते. कवितेचं नाव "समंध"! संपूर्ण कविता आठवत नाही पण पहिल्या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत. "कोण आले कोण आले, दार आपोआप हाले." शेजारी नागोबाचा टाय गळ्यात असलेल्या समंधाचं विनोदी चित्र होतं. किशोरच्या जोडीला नाव घेतलंच पाहिजे ते चांदोबाचं. चांदोबाच्या आठवणी मात्र आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सांगलीच्या घराचे वेध लागायचे. आज्जी आजोबा तर असायचेच. त्याहीपेक्षा ओढ असायची ती आत्तेभावंडांची. एकत्र कुटुंब ते. आत्याचेही बिऱ्हाड आमच्याच वाड्यात होते. आत्त्याचे यजमान, दादा, हे कडक शिस्तीचे होते. सर्व कुटुंब त्यांच्या दराऱ्यात वावरायचे. सकाळी दहा वाजता जेवण करून साडेदहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी ते बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की जणू कर्फ्यू उठायचा. आत्त्या मोकळेपणे बोलायची, तिची मुले दंगा करू लागायची. थोडक्यात आम्हाला रान मोकळे मिळायचे. या कडक दादांचे काही पैलू मात्र काहीसे स्वभावाला साजेसे नव्हते. एक म्हणजे त्यांना पत्ते खेळायला आवडत, तेही आम्हां मुलांबरोबर. दुसरा पैलू म्हणजे त्यांना "चांदोबा" चे व्यसन होते. होय व्यसनच. त्यामुळे चांदोबाचा रतीब घरात होता. पण एक आम्हा मुलांना काही चांदोबा लगेच मिळत नसे. कारण जसे दादांना चांदोबाचे व्यसन होते तसेच माझ्या आजोबांनाही होते. त्यामुळे नवीन अंक आला की मानाच्या गणपतीप्रमाणे पहिला मान आमच्या आजोबांचा.ते दोन तीन दिवस लावत. मग तो जायचा दादांच्या ताब्यात. ते चांगले तीनचार दिवस आमचा अंत पाहत. मग तो अंक ते आमच्या आत्त्याकडे "रीलीज" करत. मग काय, आम्ही सगळी भावंडे तुटून पडत असू. सगळ्यांनाच तो हवा असे. मग त्यातल्या त्यात दोन ग्रुप होत. पहिला ग्रुप सामूहिक वाचन करे. मग दुसरा ग्रुप वाचे. दुसरा ग्रुप अर्थातच प्रत्येकाच्या त्याच्याहून लहान भाऊ बहिणींचा असे. मग पुढे मी एक माझ्यापुरता तोडगा काढला होता. मी नवीन अंकाच्या मागे लागतच नसे. जुन्या अंकांची पेटी काढून त्यातील जुने अंक वाचत बसे. नवा अंक सगळ्यांनी वाचून झाला की तो अक्षरश: कुठे तरी बेवारशासारखा मिळे. मग तो मी सावकाश वाचत बसे.

त्या काळात काय अशक्य साहित्य वाचलं गेलं, आज आठवलं की हसायला येतं. अर्थात, हसणं साहित्याला नाही, पण माझ्या रुचिला किंवा त्याकाळी कसलीच रुचि नसण्याला. आई वाचनालयातून कुमुदिनी रांगणेकर, बाबा कदम यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्या आणायची. बाबा कदमांच्या कादंबऱ्या म्हणजे कमीत कमी तीनशे पानाचा ठोकळा असे. त्यात संग्राम, दीनानाथ असल्या भरभक्कम नावाची मंडळी असत. बारा बोअरची बंदूक तर हवीच. सुरुवातीला मी उत्साहाने त्यांच्या कादंबऱ्या वाचत असे. नंतर असे लक्षात आहे की पहिली दोन पाने, नंतर साधारण शंभर ते एकशेदहा पाने आणि शेवटची दोन तीन पाने वाचली तरी चालतात. त्या साक्षात्कारानंतर कदमांची पुस्तके मी केवळ मटणाचा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी बाज यांच्यासाठी वाचली. तिकडे कुमुदिनी रांगणेकरांची एक खास शैली होती. एखादी कॉलेजमध्ये जाणारी अल्लड, अवखळ, जराशी फाजील लाडिक मुलगी जसा संवाद साधेल तशा त्या वाचकांशी संवाद साधत. इतक्या बायकी शैलीचं लिखाण मी पुन्हा पाहिलं नाही. सगळ्या कादंबऱ्या नायिकाप्रधान पण नायकाभोवती फिरणाऱ्या. नायकाच्या उगाच फुरंगटून बोलण्याला उद्देशून "तो वतवतला", "तो फुतफुतला" वगैरे शब्द वाचले की मी हसून गडबडा लोळायचो. आईला "आई कस्सली अशक्य पुस्तकं वाचतेस तू!" असं म्हणून चिडवायचो. या बाईंनी "स्कार्लेट पिम्पर्नेल" नावाची एक इंग्लिश कथेची अनुवाद असणारी कादंबरी लिहिली आहे. आमच्या मातोश्री एकदा ते अदभुत रसायन वाचनालयातून घेऊन आल्या. म्हटलं अनुवाद आहे, फार काही लाजायला मुरकायला फुतफुतायला वाव मिळणार नाही. म्हणून हातात घेतलं. पण नाही! राजा विक्रमादित्यानं जसा आपला हट्ट सोडला नाही तसा कुमुदिनी बाईंनीही सोडला नव्हता. त्यांनी सर पर्सी या शूर नायकाचा उल्लेख लडिवाळपणे  "असा कसा बाई अचपळ मेला, प्रिय माझा स्कार्लेट पिम्पर्नेल्या" असल्या देहांतशासनाच्या लायकीच्या काव्यओळीने केला आणि मी ते पुस्तक मिटले. झोरो, बॅटमॅन यांच्या पंक्तीत बसू शकणारा तो मर्दानी पुरुष, त्याचा "स्कार्लेट पिम्पर्नेल्या" अशा  सलगीच्या उल्लेखाने कुमुदिनी बाईंनी त्याचा एका क्षणात "टेकाडे भाऊजी" (होय तेच ते, मीनावहिनींच्या "प्रपंचा"त लुडबूड करणारे ते आगाऊ भाऊजी)  करून टाकला होता. पुढे हा स्कार्लेट पिम्पर्नेल्या नायिकेला वाचवण्याऐवजी राजवाड्यात प्रवेश करून,"वैनी, चहा टाका बुवा पहिला!" असं म्हणत असेल असं उगाच वाटत राहिलं.

पुढे वय वाढलं मग वाचनात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप आले. झुंजार कथा, गरुड कथा आल्या. त्या कथांचे प्लॉटस अत्यंत सुमार असत. पण त्यावेळी वाटायचं आयला ह्या झुंजार आणि तो बाकदार नाकवाला गरुड यांना अशक्य असं काहीच नाही. हळूहळू वाचनाचे विषय बदलले. वडिलांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपति आणून दिलं. आज कुणी काही म्हणो, शिवाजी महाराज हे शब्द ऐकल्यावर छाती दोन इंच फुगते, आपल्या कणखर राकट दगडांच्या देशाचा अभिमान वाटतो, त्याची छोटीशी ठिणगी या पुस्तकाने पाडली. मग पुढे मुंजीत प्रथेप्रमाणे "श्यामची आई" मिळालं. हे पुस्तक मला तेव्हाही भावलं नाही आजही भावत नाही. मुळूमुळू रडणारा श्याम मात्र आठवतो. पुढे सिनेमातला श्याम पाहिल्यावर तर शंकाच राहिली नाही. नाही, लहान मुलांना हे साहित्य देऊ नये. आईवडिलांवर प्रेम करा, खोटे बोलू नका हे शिकवायला आणखी अनेक उपाय आहेत. पुढे दर्जेदार साहित्य खूप वाचलं. पण ते दर्जेदार आहे कळण्यासाठी जी काही पहिली जडणघडण किंवा मोडतोड म्हणा, व्हायला आधीच्या या उनाड वाचनाचा हातभार आहे असं म्हणावं लागेल. साहित्य हे साहित्य असतं, बरं किंवा वाईट हे वाचणाऱ्यावर असतं. पुस्तकं ही वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून जग, समाज कसा दिसतो हे दाखवतात. बरेच लोक अमुक एखादं पुस्तक आपला दीपस्तंभ आहे वगैरे म्हणतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. एखाद्याचं स्वत:चे अनुभव, स्वत:चं तत्वज्ञान हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. त्या दृष्टिकोनाचा आपल्याला उपयोग "असाही दृष्टीकोन असतो" असं ज्ञान होण्यापुरताच. आपण आपली स्वत:ची वाट चोखाळावी. भलेही मग ती न पडलेली पायवाट असो. ज्ञान हे आतूनच व्हावं लागतं. पुस्तकं आपल्याला शहरच्या वेशीपर्यंतच नेऊन पोचवतील. पुढील जंगलातील वाटचाल आपण एकट्यानेच चालायची आहे. टागोर उगाच नाही म्हणाले, एकला चालो रे!

Tuesday, October 6, 2015

काव्यदिंडी ते काव्यतिरडी - एक प्रवास

पहुडलो होतो माझ्याच मनाच्या पलंगावर
बंद डोळे मंद श्वास शांती अलवार
येईल केव्हाही स्फूर्ती, होतो तयार
होते पेन उशाशी त्यावर मस्तकभार
पसरली होती यमके सभोवार
जुळवून ठेवलेली स्वहस्ते हळुवार 

अप्रिय न कोणताही मज विषय
कापूस भुईमुग अभंग ते प्रेमभंग
शब्द ते केवळ जणू यमकाची सोय
कठीण वृत्त मात्रा आर्या अन विक्रीडित
सोपा मुक्तछंद तेवढा आपला होय 

अव्यक्ताचे व्यक्त यासाठी बनली भाषा
व्यक्ताचे अव्यक्त ही कविची अभिलाषा
मला दिसे कसे सगळे संदिग्ध अन धूसर
न दिसे रवि ते दिसे मज हा दंभ मनावर
पण हाय ती भार्या! आणी क्षणात भूतलावर
म्हणे लावा तो चष्मा जो चमके टकलावर

खिन्नवदनी नि:श्वास निपचीत प्रतिभा
कशाची स्फूर्ती अन काय नुसतीच शोभा
तरल अंतरंग माझे कसे कळावे माझ्या प्रियेला
अंतरंगीचा फाटका बनियन तेवढा तीक्ष्ण नजरेला
न आवडे तरी ती आवडी नशिबी तुकारामाला
कळला न सॉक्रेटिस कुणा, देत हाती विषप्याला

गळली स्फूर्ती झाली उपरती
कशाची पालखी अन कशाची दिंडी
पसरली यमके तडकला अनुप्रास
तरल संवेदनांची लक्तरे कडीपाटास
मोजून चार रसिक जमले वेदना ऐकावया 
ऐकण्या कसले आले खांदा द्यावया 

Thursday, October 1, 2015

इंडियाविरोधाचे छुपे प्रोफाईल

सध्या काही बुद्धिवंत मंडळी डिजिटल इंडिया बद्दल प्रश्न विचारू लागली आहेत. इतके दिवस ही मंडळी निवांत स्वत:च्या कुरणात चरत होती, स्वत:शी हळूच हंबरत, कुणी बघत नसल्याची चाहूल घेऊन शेपटीने आपल्याच पार्श्वभागावरील माश्या हाकलीत होती. आत्ममग्न होती. भारतामध्ये बदल घडत आहेत याची क्वचित दखल घेत होती, बरेचसे दुर्लक्ष करीत होती. अचानक या मंडळींच्या शेपटाला कुणी तरी फटाक्यांची माळ लावून पेटवल्याप्रमाणे झाले आहे. दुगाण्या झाडत ही मंडळी आता शिवारात धावत आहेत. दिसेल त्याला पुढे असेल तर शिंगावर घेत आहेत, मागे असेल तर लाथा झाडत आहेत. त्यांचा प्रश्न एकच - अरे माठ्यांनो, डिजिटल इंडिया म्हणजे काय हे माहीत नसताना उगाच प्रोफाईल पिक्चर बदलून काय होणार? सगळी मेंढरे लेकाची. एकाने बदलले, झाले, लागले सगळे बदलायला. असो. काही असतीलही मेंढरे. पण जनजागरण झालेच की नाही? झोपी गेलेले हे बुद्धिवंत लोक जागे झाले. "डिजिटल इंडिया" असे गूगल करू लागले की नाही? ई-गव्हर्नन्स म्हणजे काय, मोदींनी त्यावर भर का दिला आहे हे तरी त्यांना कळले असेल की नाही? सरकारी सोयी जर ऑनलाईन उपलब्ध झाल्या तर भ्रष्ट बाबूंना जरा आळा बसेल. रोगाच्या निर्मूलनाबरोबर तो मुळातच होणार नाही याची सोय केली तर ते जास्त परिणामकारक नव्हे काय? आणि ही फक्त एक बाजू. इतरही फायदे आहेत.

दुसरा एक समज असा की डिजिटल इंडिया म्हणजे फास्ट इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्यांची चंगळ, इकडे बळिराजाची हेळसांड, गरिबाच्या तोंडची भाकरी गायब. हा गैरसमज आहे. जलयुक्त शिवार योजना दिसली नाही, प्रत्येक नागरिकासाठी उघडलेले बचत खाते दिसत नाही, पण मोदींनी गुंतवणूक आणण्याची गोष्ट केली की लगेच बळिराजा मृत्यूपंथाला लागतो, गरिबाची लक्तरे दिसू लागतात. डिजिटलायझेशन कशाला हवं? त्याने नोकऱ्या जातात. बदल अटळ असतो. काही पिढ्यांपूर्वी आपण धान्य दळायला घरी जाते वापरत होतो. चटणी वाटायला पाटा वरवंटा वापरत होतो. जाते, पाटे वरवंटे बनवणारी वेगळी जमात होती. बेलदार म्हणायचे त्यांना. पुढे पिठे तयार मिळू लागली, मिक्सर आले. हे बेलदार लोक कुठे गेले कळले पण नाही. त्यांच्या नावाने कुणी रडले नाही, मिक्सर का आणले म्हणून कॉंग्रेसच्या नावाने कुणी खडे फोडले नाहीत, आंदोलने झाली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल कुणी मोर्चे काढले नाहीत. स्वत: बेलदार लोक सुद्धा प्रथम बेरोजगार झाले, गरिबीची झळ लागून कदाचित हलाखीत मरणही पावले असतील. पण लवचिकता हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. पुढली पिढी शहाणी झाली, इतर उद्योगधंद्यांकडे वळली. थोडक्यात मिक्सर आले म्हणून जगणं थांबलं नाही किंवा मिक्सर वापरू नका असा प्रचार झाला नाही. सध्या तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग डिजिटल होत आहे. ते कुठं चाललं आहे हे ओळखून आपण बदललो नाही तर नुकसान आपलंच आहे. अमेरिका एके काळी शेतीप्रधानच देश होता. कापूस, गहू, मका, तंबाखू यावर दक्षिणेतील आणि उत्तरेतील राज्ये अवलंबून होती. पुढे अमेरिका प्रगतशील झाली, यंत्रयुग आले, त्यानंतर संगणकयुग आले. त्यानुसार शेतकरी बदलला. रडत बसण्यापेक्षा नवीन तंत्रांचा वापर करून घेऊन जास्त पीक मिळवायला शिकला. सुदैवाने नागरिकही भारतातील नागरिकांप्रमाणे वैचारिक मैथुनवाले नसल्यामुळे त्यांनी गळे वगैरे न काढता प्रगतीस वाव दिला. हे भारतात का होऊ शकत नाही? प्रत्यके चांगल्या गोष्टीला "हा हिंदुत्ववाद्यांचा कावा आहे", "हा समाजवाद्यांचा डाव आहे" असलं बोललंच पाहिजे का? बरं हे बोलणं नुसतंच बरं. प्रत्यक्ष काही करण्याची वेळ आली की "अरे नाही रे, एकही सिक लीव्ह शिल्लक नाहीये" ही कारणं देणारे हे महात्मे.

काही काही वेळा असं वाटतं की याच लोकांना भारताची प्रगती नको आहे की काय? गरिबी राहिली नाही तर गळे काढून कशावर लिहायचे आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी कुठले मुद्दे आणायचे? एकीकडे एक तो संत टोपीवाल आहे जो सत्तेवर बसून घंटा हलवतो आहे, दुसरीकडे हे मोदीविरोधक आहेत हे घंटा हलवत केवळ ठणाणा करीत आहेत. नकर्त्याचे कर्तृत्व हे. त्याला उत्तर देण्याचीही गरज नाही, पण दिले पाहिजे. कारण चूक असेल तर चूक म्हटले नाही तर ती मोठी चूक. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.

थोडक्यात, आमचे प्रोफाईल बदलून काय होणार असा प्रश्न ज्या थोर बुद्धिवंतांनी केला आहे, त्यांच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. झोपी गेलेला जागा झाला आहे. आता फक्त तो फक्त दुगाण्या झाडून पुन्हा झोपी जातो की काही दिवस शेताला निदान खत तरी पुरवतो ते पहायचे. असो. बाकी ही मंडळी आमच्या प्रोफाईलकडे अशा बारीक नजरेने पाहत असतात ही जाणीव सुखद की काळजी वाढवणारी हा विचार सध्या आम्ही करत आहोत.

Tuesday, September 29, 2015

न जाईल ते बलिदान वृथा

मरावे परि फेसबूकरूपी उरावे
भिकार पोस्ट तरी लाईक मारावे
आपणही उलट टुकार पोस्ट करावे
घटिका पळे दिन मास झणी सरावे
सदोदित वॉलवर पडीक राहावे
जीना यहां मरना यहां घोकत असावे ।।

व्याकरणाची चिंता करणे सोडोन द्यावे
शुद्धलेखनाला तुज्या आयचो घो म्हणावे 
"खुप छान, खुप छान" कॉमेंट वाचून रडावे
मनी "खू दीर्घ रे सोट्या!' असे ओरडावे
चडफडून ओठांवर दात रुतवावे
खुनातला खू र्हस्व की दीर्घ ते आठवावे।।

वाया गेलास तू असे थोरांनी ऐकवावे
बाबा तू यूसलेस असे पोरांनी म्हणावे
फोन अथवा मी असे बायकोने चॅलेंजावे
इथले वायफाय प्रिय असे बॉसने हिणवावे
हाच तो सर्वसंगपरित्याग असे स्वत:स समजवावे
साधूस जशी चिलीम तसे हे फेसबूक बरवे।।

परि वृथा न हा त्याग असे ऐकण्यात यावे
थेट यूएस मधून सनई चौघडे वाजावे
वाजावे कसले खरे तर कानी बोंबलावे
पाहून ती भरतभेट आनंदाश्रू ओघळावे
मारा पासे सवा कोट यूजर छे नमोंनी वदावे
चोक्कस असे फेसबूकस्वामींनी चीत्कारावे
अन सवासो कोट डोलर नमोचरणी अर्पावे।।

सवा कोटीतील म्यां एक म्हणोन हरखावे
भरास येऊन स्टेटस अपडेटावे
झालाच आता भारत महासत्ता म्हणावे
पाहोन ते ट्रेंडिंग ते दोन बनिये सुखवावे
बीजनेस आणि राजकारण भरून पावावे
आपण तेवढे आपले ब्रीद सांभाळावे
मरावे परि फेसबूकरूपे उरावे ।।

Monday, September 21, 2015

निर्गुणी संवाद

खूप वर्षांपूर्वी असंच एक वेड लागलं. ते वेड अद्याप तसंच आहे. त्यावर काही उपचार वगैरेही करावेसे वाटत नाहीत. ते वेड होतं निर्गुणी भजनांचं. मला वाटतं वडील कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांची कॅसेट रेकॉर्ड करून घेऊन आले असावेत. त्यातील "सुनता है गुरु ग्यानी"ने झपाटला गेलो होतो. समाधिअवस्था कशी असते मला माहीत नाही आणि त्यावर बोलण्याची माझी योग्यताही नाही. पण समाधि कशी असेल यावर उगाच विचार मात्र करण्यात खूप वेळ घालवला आहे. कुमारांचं ते "ओहम सोहं बाजा बाजे" ऐकलं आणि तो बाजा आपल्यात सुरु झाला असं वाटलं होतं हे मात्र नक्की. अलंकारिक आणि शब्दबंबाळ लिहिण्याचा माझा पिंड नाही पण, हे वाक्य आतून आल्यामुळे जसं आलं तसं लिहिल्याशिवाय तरणोपाय नाही. ते भजनच बाजासारखं डोक्यात वाजत राहिलं. अनेक वर्षं. कधीही ते सुरू व्हायचं मग पुढे दोन दिवस अखंड चालू. या भजनांच्या निर्मितीची कथा कळली होती. कुठे वाचली स्मरत नाही. पण आजाराने अंथरुणाला खिळलेले कुमार गंधर्व, माळवा प्रांतातील ते एक छोटे गाव, डॉक्टरांनी गाण्याला केलेला मज्जाव, संध्याकाळी दुरून तरळत येणारे ते लोकगीतांचे, भजनांचे सूर असं सगळं कळलं. त्या सुरातील ते आर्त, थेट त्या परमात्म्याशी चाललेला तो संवाद कुमारांच्या प्रतिभेला न कळला तरच नवल. दैवी सूर असे असतात की डोळे आपोआप मिटतात. एक प्रतिभाशाली कलावंत आणि ते अंतराळातून तरंगत आलेले सूर यांतून निर्गुणी भजने घडली. सगुण अशा शब्दांच्या चौकटीत निर्गुण निराकाराचे दर्शन देणारे असे ते सूर कसे बसले असावेत? पण बसले आहेत खरे. अध्यात्म या शब्दाला धर्माशी निगडित करणारे करंटे आपण. या सुरांना भजन असं म्हणून टाकतो. ते भजन आहेच पण लौकिकार्थाने नाही. देवाची उगाच आळवणी नाही. नवस सायास नाहीत. "पोराला नोकरी लागूदे रे बाबा" छाप भक्ती नाही ही. त्या चिरंतन सत्याचा मागोवा घेणारे हे सूर आहेत. देव या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन त्याचे अमूर्त असे स्वरूप पाहण्याचा तो प्रयत्न आहे. देवाची सगुण मूर्ती आपण तयार केली ती केवळ निर्गुणाचे ध्यान करता येत नाही, सगुण मूर्ती नसेल तर मन इकडे तिकडे धावते, त्याला एका ठिकाणी बसवून विचार करवून घेता येत नाही म्हणून. पण होतं असं की सगुण मूर्ती हे साधन आहे आहे हे विसरून आपण तिलाच साध्य ठरवून बसतो. एकदा त्या अंतिम सत्याला आपल्या मर्यादित आकलनशक्तीच्या सगुण चौकटीत बसवले की मग पुढे जायची शक्यता नाहीच. मला वाटतं सुरांचा प्रत्येक भक्त हा शेवटी साधक बनतो. तो या सगुण चौकटीतून बाहेर पाहत असतो. त्याला पलीकडले दिसत असते जाणवत असते. पण त्या सगुण चौकटीतून कसे सुटायचे हे कळत नसते. कुमार गंधर्वांसारखा एखादाच त्या शृंखलेतून मुक्त होतो आणि सुरातून त्या अंतिम सत्याशी तादात्म्य पावतो.

हे असं असताना सहा सात वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी पुन्हा "सुनता है " कानावर पडलं. राहुल देशपांडे या नवोदित गायकानं गायलेलं. त्यापूर्वी मी कधी राहुलचं गाणं ऐकलं नव्हतं. आणि मला माहीतही नव्हतं. असाच कुठलासा कार्यक्रम असावा. त्याचं छायामुद्रण होतं. अंगावर रोमांच उभे राहिले. आवाजाचा पोत वेगळा, धीरगंभीर, खर्जातला. ऐकत राहिलो. निर्गुण निराकार असं अंगावर सायीसारखं पसरत गेलं. अनादि अशा त्या ओंकाराशी संवाद ऐकू येऊ लागला. संवाद माझा नव्हता. पण त्या गायकाचा होता. मी फक्त त्याला साक्ष होत होतो. पण अशी साक्ष अनुभवायला मिळणे आणि हे काही तरी दिव्य घडते आहे याचे भान राहणे हेच माझ्या दृष्टीने पुरेसे होते. राहुल देशपांडेंचं वेगळेपण जाणवलं होतं. नादब्रम्हाची उपासना दिसत होती, त्या उपासनेपलीकडे जाण्याची आस जाणवत होती. पुढे कित्येक दिवस मी त्या रेकॉर्डिंगची पारायणं केली. कुवतीनुसार ते सूर स्वत: अनुभवण्याचा प्रयत्न केला. स्वत: गातानाही त्या सुरांचं वजन, त्यातील आर्त जाणवायचं. कधी कधी डोळ्यात अश्रू यायचे. माझ्या येतात. एखादं भव्यदिव्य दृश्य, अप्रतिम लागलेला एखादा सूर, एखादं अत्यंत प्रेमानं किंवा नि:स्वार्थी बुद्धीनं केलेलं कृत्य (मीच असं नव्हे, दुसऱ्या कुणीही), या गोष्टींनी माझ्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वी मी ते लपवत असे. पण पुढे गोनीदांनी स्वत:च्या बद्दल असं होतं असं लिहिल्यानंतर मला संकोच वाटेनासा झाला. अश्रू हे दुबळेपणाचं लक्षण आहे अशा खोट्या भ्रामक कल्पनांतून आपण अत्यंत नैसर्गिक अशी ही भावना दडवत असतो. कुमार गंधर्वांच्या त्या "ओहम सोहं बाजा"ने तसे अश्रू माझ्या डोळ्यात आणले होते त्यानंतर राहुल देशपांडेंच्या त्याच भजनाने आणले हा योगायोग म्हणावा की या गायकांची ताकद, की त्या सुरांची आतवर पोचण्याची क्षमता? मला या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही, अथवा नकोच आहे. गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेर बसून आतील मूर्तीकडे डोळे लावून बसण्याची तपश्चर्या करायला मिळणं हेही तेवढंच भाग्याचं. त्यातूनही आत्मा तृप्त होतो.

काल पुन्हा तो पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. जवळून, प्रत्यक्ष. नादब्रम्ह अवतरलं होतं. माझ्यासारख्या श्रोत्याला जर इतका अनुभव येत असेल तर प्रत्यक्ष गाणाऱ्याची अवस्था उन्मनी अशीच होत असेल असं मला नेहमी वाटायचं. आता मला संधी मिळाल्यावर हा प्रश्न राहुलना विचारलाही. त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्या स्वत:च्या "विरहिणी बोले" कार्यक्रमाच्या अनुभवाबद्दल बोलून दिलं. संवाद घडतोच आणि तो असा निर्गुण असतो की त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. मला हे उत्तर आधीच कळलं होतं, त्यांच्या गाण्यातून. यालाच समाधि म्हणत असावेत. अध्यात्म जे काय असेल ते असो, समाधि काय असते त्याचं उत्तर मला मिळालंय. 

Friday, September 11, 2015

उ:शाप

आपण रोज उठून इवळत असतो - पुराणकाळी मपला देश लैच प्रगत हुता भौ. येक म्हणून टेक्नाॅलाॅजी आपुन सोडल्याली न्हवती. उड्ढाण घ्या, अग्निबाण घ्या, पर्जन्यबाण घ्या, बूड आजाबात न हालवता जाग्यावर विश्वरूपदर्शन (प्रोप्रा. श्रीकृष्ण यादव) घ्या, अंतर्ज्ञान घ्या, सग्गळीकडे निसतं ज्ञानच ज्ञान. न्हान पोरगं बी बोलाया लागलं तर "मित्रजन हो, तात आत्ताच सूक्ष्मदेह धारण करून पृथ्वीवरून बाहेर पडले आहेत. गुरूपर्यंत चक्कर मारून येतो असं मातोश्रींना ते सांगत असताना आम्ही ऐकले आहे. तस्मात, दोन तीन घटिका कल्लोळ करावयास काहीच हरकत नाही." आसं कायबाय बोलत असावं. दुर्दैवानं पिताश्रींनी ते अंतर्ज्ञानानं ताडावं आणि अंतरिक्षातूनच फोकयान (हे यान उत्तम अशा चिंचेच्या फोकापासून बनवलेलं असायचं) सिद्ध करून चिरंजीवांना फोकडान्स करायला लावावा. हेला म्हणतात तंत्रज्ञान. 
या घरगुती तंत्रज्ञानाचं काय नाय हो, पण ते शाप देण्याचं तंत्रज्ञान मात्र लै भारी व्हतं बर का. मायला, कुनीबी चिढला तर डायरेक शापच देयाचा. दगडच काय व्हशील, फुडल्या जल्मी गाडावच काय व्हशील. आन ते तंत्रज्ञानबी आसं भारी की मानूस व्हायाचा बी दगड आन गाडाव. मग मांडवली झाल्यावर रीतसर उ:शापबी देयाचा. पण ऋषीबिशी होते तेनला आनखी भारी शाप अव्हेलेबल व्हते. जटादाढीवालं ऋषी चिडलं तर आत्ताच्या आत्ता ईज पडून मरशील आसला काय तरी शाप देयाचं. हे कुटंबी जाऊन बसायचं ध्यान लावायला. गुमान आपल्या आश्रमात किंवा जी काय कुटीबिटी आसंला तिथं बसावं क न्हाय, ते ऱ्हायलं. आन मग कुनी गायगुरू चाराया आलं तर झालं, हेंचा तपोभंगच! जसा काय इतक्या येळ देवाचा फोन आऊट ऑफ रीच व्हता, निक्ता लागला व्हता आन हेच्यामुळं कॉल ड्रॉप झाला. इतर शापान्ला उ:शाप तरी व्हते हो, पन ईजच पाडल्यावर कसला उ:शाप आन काय. भौतेक ऋषी शाप देऊन झाल्यावर जीभ चावायचे. कारन टक्कुरं शांत झाल्यावर लक्षात यायचं मायला उगाच शाप देऊन बसलो राव. मग गुपचूप ध्यानाची जागाच बदलायचे. लोकान्ला वाटायचं काय म्हाराज हैत, सर्वसंगपरित्याग म्हंजे आसा आसावा, एका ठिकाणी माया लावून घेयाची न्हाई. आन काय चालतेत झपाझपा या वयात! म्हाराज फुडल्या गावाला गेल्यावर लोकान्ला ईज का पडली आणि गुरं राखायला गेलेला शिरपा का मिसिंग हाये ते कळायचं. तंवर म्हाराज ज्युरिसडिक्शनच्या भाईर गेलेले असत.

पण कायपन म्हना, आज ती टेक्नाॅलाॅजी ऱ्हायली न्हाई ते बरंच. ती ऱ्हायली आसती तर सगळ्यात जास्त वापरात आसलेलं तंत्रज्ञान आसतं ते शाप देण्याचं. कावळ्याच्या शापानं गाय मेली आसती. हुतं ते बऱ्यासाठीच. आपल्याला शापाच्या आदीच उ:शाप भेटला. उगाच पुराणकाळाच्या नावानं इवळू नगा.

Monday, August 17, 2015

स्वातंत्र्याची ऐशीतैशी

स्वातंत्र्यदिन होऊन गेला. लेखनकामाठ्यांनी बरंच त्यावर लिहिलं. ती आपली पद्धतच झाली आहे. बरंचसं लिखाण उपरोधी, लोकांच्या "हॅपी इन्डिपेंडन्स डे" टाईप शुभेच्छांची टर उडवणारं, तर काही नेहेमीप्रमाणे इतकी वर्षं झाली पण आपल्यात काय पण फरक नाय पडला ब्वॉ, सगळे राजकारणी चोर, सरकार झोपलं आहे, नोकरशाही खाबू आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत, सामान्य जनता तेवढी अश्राप, कष्टकरी आहे, यात बळी जाणारी आहे असं काही तरी व्यक्त करणारं. स्वातंत्र्य म्हणजे सरकारने सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात, कुठून तरी पैसे आणावेत (म्हणजे कृपया माझ्याकडे कर मागू नका), रस्ते चकाचक करावेत, पेट्रोल फुकट करावे, कुठेही लाच द्यायला लागू नये इत्यादि गोड आशा. सरकारच्या जबाबदाऱ्या इथवर संपत नाहीत. आम्ही कर्जे घेऊ, ती माफ व्हायला हवीत, नाही तर आम्ही आत्महत्या करणार, आमची बायका पोरं रस्त्यावर आणणार, मग काही थोर समाजसेवक त्यांना बारा पंधरा हजार वाटणार, आम्ही फेसबुकवर, ट्वीटरवर या समाजसेवकांचे गोडवे गाणार आणि सरकार कसं हरामी आहे त्यावर लिहिणार. आणि हो, हे सगळं करायला फुकट वायफायचीही मागणी करणार. पण हे सगळं असं लिहिलं म्हणजे मी सर्वांपेक्षा वेगळा, संवेदनशील, विचारवंत. असं सगळं अस्वस्थ करणारं, भयंकर क्रांतिकारी लिहिल्यानंतर समाधानानं माझ्या एसी लावलेल्या घरात मी झोपणार, झोपता झोपता दुसऱ्या दिवशी लिखाणाच्या काय पाट्या टाकायच्या याचा विचार करणार. समस्या वगैरे मरूद्यात, मला विषय हवा. अरेच्या! समस्या मरूद्यात कसं? समस्या हव्यातच! नाही तर मी लिहिणार कशावर नी बोंब कशावर मारणार? स्वातंत्र्य या शब्दाचा स्वत:ला हवा तसा अर्थ कसा लावायचा हे भारतीयांकडून शिकावे. त्यातल्या त्यात मरहट्ट देशाचे सर्वात पुढे. इथे सगळेच चाणक्य, सगळेच ॲरिस्टाॅटल आणि सगळेच कान्ट. स्वत:च्या तंत्राप्रमाणे चालता आले तर ते स्वातंत्र्य नाही तर ते पारतंत्र्य. सामर्थ्य आहे गर्दीचे, स्वामी आणि त्यांच्या पिलावळीचे असे काहीसे भारतीय लोकशाहीचे स्वरूप झाले आहे. भाषणस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व स्वत:चे तंत्र नीट लावल्याशिवाय काही अर्थाचे नसते हे सोयीस्करपणे विसरले गेले आहे. गेल्या अडुसष्ट वर्षांत, बोंबलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच असे बाणेदारपणे लिहिणारे (केवळ लिहिणारेच) लोकलमान्य तेवढे गल्लोगल्ली झाले आहेत. दिसामाजि काही तरी लिहावे असं समर्थ सांगून गेले खरे, लोकांनी स्वत:ला पाहिजे तो अर्थ लावून दिसामाजि कायच्या काही तरी लिहावे असा सपाटा लावला. त्याला हातभार प्रात:स्मरणीय झुकेरबर्ग यांनी लावला. प्रात:स्मरणीय हा शब्द खऱ्या अर्थाने घ्यायचा. पूर्वी भल्या सकाळी लोटा पाहणारे आता प्रथम फेसबुक पाहतात.  लोकांकडे प्रचंड रिकामा वेळ आहे असं वाटायला लावणारं हे सगळं आहे.

भारतीय लोकशाही ही अशी सर्वस्वी सरकारवर अवलंबून राहणारी का झाली असावी? लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था अशी व्याख्या केल्यावर "सरकार" म्हणजे कुणी तरी अगम्य निराकार संस्था आहे, आणि तिच्याकडून सगळा न्याय अपेक्षित आहे, त्या संस्थेने जीडीपीची चिंता करायची, पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेला तोडीस तोड अशी आपली अर्थव्यवस्था बनवायची, या शिवाय सामाजिक आरोग्याचीही जबाबदारी घ्यायची. आपण मात्र संध्याकाळी कट्ट्यावर बसून "ये सिस्टमही खराब है, मेरा बस चलता तो मैं ये पूरे सिस्टमको उखाड फेक देता" वगैरे जग्गूदादा (तोच तो अंगारमधला जग्गू, दातावर मारायला पैसा नाही, पण मोटरसायकलची ऐपत असणारा) स्टाईल डायलॉग्ज मारायचे. हा जग्गू शर्ट टाय लावून क्लार्कच्या पदासाठी मुलाखतीला जातो आणि तिथे आपले क्रांतिकारी विचार मांडतो. समोर त्याच्यासारखाच शर्ट टाय लावून बसलेला क्रांति बिंती करणं हे आपलं काम नाही, असं सांगून त्याला नारळ देतो. मग जग्गू पुन्हा शर्ट काढून बनियनवर मोटरसायकल उडवायला मोकळा.  तसाच पुढे जाऊन तो बँड स्टँडच्या त्या स्पेशल खडकांत बसून ही 'सिस्टम' कशी आपल्याला अँग्री यंग मॅन बनवते आहे याबद्दल त्वेषाने भाषण करतो. त्याची त्यावेळची एखादी प्रेयसी ते भाषण डोळ्यांत साहिल, किनारा, तूफां यांपैकी एक काही तरी आणून ऐकते. मग हा आणखीच शेफारतो. श्रीमंत मनुष्य हा भांडवलशाही विचारसरणीचा असतो, मध्यमवर्गीय समाजवादी असतो तर कफल्लक मनुष्य हा कम्युनिस्ट असतो. जग्गू कफल्लक असल्याने साहजिकच त्याची क्रांतिच्या कल्पना आहे त्याच चाळीत राहणे, फक्त समोर एक हॉस्पिटल, एक सातवीपर्यंतची शाळा आणि सातवी संपल्यानंतर पुढे करायला काहीच नसल्यामुळे व्हॉलीबॉल खेळण्यापुरते एक मैदान यापलीकडे जात नाही. आपण अँग्री आहोत, आपल्यावर कसलातरी सतत अन्याय होऊन राहिला आहे या धुंदीत राहायला जग्गूला आवडतं. मग जग्गू स्वत:च्या नकळत ती परिस्थिती आवडून घेऊ लागतो, नव्हे, ती तशीच राहील याची काळजी घेतो. टोकाची कृती केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही असं तो स्वत:ला समजावतो आणि इतरांना बजावतो. क्रांति म्हणजे नक्की काय असा विचार कधी तरी त्याच्या मनात येत असेलही. पण अन्याय सहन करून राहिलो आहोत, संधी मिळाली असती तर कुठल्या कुठे गेलो असतो वगैरेची धुंदी एवढी जबर असते की खरा बदल जर झाला तर काय घ्या असा विचार करून गप्प बसायला होत असेल. या जग्गूला त्याचे क्रांतिकारक विचार ऐकून घेऊनही खरोखरच ती क्लार्कची नोकरी मिळायला हवी होती. कुठलेही काम हे कमीपणाचे नसते ही पहिली खरीखुरी वैचारिक क्रांती त्याला करता आली असती. सामाजिक क्रांती घडवून आणायला आधी त्या समाजाचा अधिकृत असा भाग तरी बनता आले असते.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, आपण काय मिळवले असा प्रश्न केला जातो. पर्यायाने प्रगती किती झाली असा तो रोख असतो. गुळगुळीत सहा पदरी रस्ते, चकचकीत इमारती, इम्पोर्टेड गाड्या विकत घेण्याची ऐपत ही प्रगतीची व्याख्या असायला हरकत नाही, पण त्याचबरोबर त्या रस्त्यांवरून नियम पाळून त्या इम्पोर्टेड गाड्या चालवणे, शहराच्या पुढील पंचवीस वर्षांच्या गरजांचा आढावा घेऊन इमारती बांधणे, मुजोरपणे बांधकाम करून नंतर लाच देऊन ते नियमित करून न घेणे हे सुद्धा प्रगती या सदराखाली बसते हे लक्षात यायला हवे. शासनाने माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालू नये, पण मी सोशल मीडियावर कसलाही पुरावा नसताना वाटेल ते आरोप करून इतर लोकांचे चारित्र्यहनन करेन हे प्रगतीच्या सदरात मोडेल असं वाटत नाही. शासनाने आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात, पण माझ्याकडे कर मागू नये. सामाजिक समरसता निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी पण मी माझ्या जातीचा जाज्वल्य अभिमान बाळगेन. संभाजी ब्रिगेडसारखी निखालस द्वेषाचे राजकारण करणारी जातीयवादी टोळी या देशात निर्माण होणे हे आपलेच अपयश आहे. पर्यायाने लोकशाहीचे अपयश आहे. अर्थात लोकशाहीचे स्वातंत्र्य काही चांगल्या माणसांपुरते नसते, ते असल्या नतद्रष्ट मंडळींनाही मिळते. तेव्हा इतक्या वर्षांत आपण काय मिळवले याचा विचार करताना हे अपयशसुद्धा लक्षात घ्यावे. आपण काय मिळवले याचा शोध स्वत:मध्ये प्रथम करावा लागेल. कॉंग्रेसने देशाला बुडवले अथवा नाडले नाही. ठपका ठेवून नामानिराळे होणे केव्हाही सोपे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या या व्यवस्थेने लोकांनीच घालून दिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे पालन केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? लोकशाहीत शासन हा लोकांचा आरसा असतो. तुम्ही सुंदर व्हा, आरशात चित्र सुंदरच दिसेल. नाही तर ऑस्कर वाईल्डने "पिक्चर ऑफ डोरायन ग्रे" मध्ये दाखवले आहे तसेच व्हायचे. वरून सुंदर, तरुण दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात आतून कशी आहे ते पहायचे असेल तर तिचा आत्मा पाहावा. भारतीय लोकशाहीचा डोरायन ग्रे होऊ नये ही सदिच्छा!

Thursday, July 23, 2015

वैश्विक भाषा

चराचराची एक समान भाषा जर असेल तर ती गणितच असावी. ग्रह तारे यांच्या भ्रमणकक्षा, धूमकेतूंचे क्लिष्ट भ्रमणमार्ग, गुरुत्वाकर्षण आणि त्याचे परिणाम हे मूलभूत असे भौतिक नियम संपूर्ण विश्वात सारखेच लागू होतात, मग ते नियम व्यक्त कोणत्या भाषेत करणार? आणि कसे? संतांनी सांगितले,"चराचरात 'मी' वसतो". येथे संतांनी 'मी' हा शब्द वापरला असावा तो केवळ सर्वसामान्य जनतेला रुचेल, भावेल आणि कळेल म्हणून. येथे 'मी' म्हणजे हे ब्रम्हांड चालवणारा असा तो अध्याहृत आहे. त्याचे स्वरूप सामान्य मानवी मेंदूच्या आकलनापलीकडे असल्यामुळे त्याचा उल्लेख प्रथमवचनी करायचा. वास्तविक हा "मी", 'तो' नाही, 'ती' नाही किंवा 'ते'ही नाही. म्हणजे नसावा. कुणास ठाऊक. तो, ती किंवा ते मुळात आहे की नाही तेही माहीत नाही. पहा, नुसत्या शब्दांत व्यक्त करायचं झालं की कसा गोंधळ उडतो ते. मला काय म्हणायचं आहे ते मलाच कळतं आहे, पण तुम्हाला मी नीट या "मी"चे दर्शन करू शकतो का? मला तरी कुठे कळलंय म्हणा. तत्ववेत्त्यांना, संतांना, ऋषींना कळलं असेल. त्याच्या रूपाचे आकलन झाले असेल. मग त्यांनीही प्रयत्न केला. सॉक्रेटिसचे संवाद झाले, सांख्य दर्शन झाले.,गीता झाली, ते कळले नाही मग ज्ञानेश्वरी आली, तीही कळली नाही. अजून सोपे करून सांगायला तुकारामाची गाथा आली. पण झाले भलतेच. लोक उगाच भक्तीमार्गाला लागले. चराचराचे मूळ कळले की नाही, आपल्या अस्तित्वाचे कारण कळले की नाही ते ठाऊक नाही. असो. मुद्दा असा की चराचरात मी वसतो हे अनेक शब्दांत सांगून झाले. मग संतांनीच कशाला, पुढे हळूहळू विज्ञान आणि गणितही त्याला दुजोरा देऊ लागले. आईनस्टाईनने जड विश्व आणि ऊर्जा हे एकाच पदार्थाच्या दोन अवस्था असल्याचे सांगितले. नुसते सांगितले नाही तर त्याचा कार्यकारण भाव आणि ज्या समीकरणाने ते दोघे जुळले आहेत ते समीकरणही सांगितले. दृष्टांत देऊन फार तर साम्य सांगता येते पण "का" याचे उत्तर देता येत नाही. गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. रसाळ दृष्टांत वाचायला मिळतात, पण चिकित्सक वृत्तीच्या एखाद्याला "का"चे उत्तर मिळत नाही. अहं ब्रम्हास्मि! बरं बाबा तू ब्रम्ह! पण का आणि कसा काय? गणिताने हे थोडेसे सोपे केले. तर्कज्ञानाने पूर्वी ताडलेले सत्य हे गणिताने सत्य केले. गणिताला भावना नाहीत. गणित एखाद्याला उगाच भक्तीचा गहिंवर आणून "पांडुरंग! पांडुरंग!" करायला लावत नाही. गणित तटस्थ असते. ते बाजू घेत नाही. शब्दबंबाळ होत नाही. ते पूर्ण सत्य सांगते आणि समर्पकपणे सांगते. म्हणूनच उद्या जर एखाद्या परग्रहावरील उत्क्रांत पावलेल्या आपल्याइतक्या किंवा जास्त प्रगत जीवसृष्टीशी आपला संपर्क आला तर त्यांना ज्ञानेश्वरी ऐकवण्याऐवजी गणिती भाषेत संवाद नक्की साधता येईल. 

हे असं असलं तरी मनुष्य हा भावूक, लहरी, मनाचे क्लिष्ट कंगोरे असलेला प्राणी आहे. त्याची जडणघडण, उत्क्रांती भावनाशील म्हणून अधिक होत गेली आहे. भावनाशील याला दुसरा शब्द रोमाण्टिक असाही वापरता येईल. एक अधिक एक याचे उत्तर चार असे असले तर त्याला अधिक आवडते. अशा भावनिक उत्क्रांतीमुळे गणिती रुक्षपणा, काटेकोरपणा, अचूकपणा याला कमी महत्व आले. भाषा ही अचूकतेवरून अलंकारिकतेकडे वळली. असं असलं तरी तो गूढ प्रश्न "मी कोण, हे सर्व काय आहे" याचे आकर्षण संपले नाही. गणितापासून लांब गेल्याने "हे सर्व काय" आहे हे उकलून सांगणाऱ्या शास्त्रापासून लांब जाणे झाले. मग आपल्या मनाच्या त्याच संवेदनशीलतेचा वापर करून आपण भंवतालच्या चराचराशी एकत्व अनुभवू शकतो का याचाही काही जणांनी मागोवा घेतला. रेड इंडियन, मायन संकृतीचे लोक, मूळ आफ्रिकन लोक हे त्या बाबतीत बरेच विकसित होते असे दिसते. इन हार्मनी विथ नेचर, म्हणजेच चराचराशी एकरूप होऊन जगण्याची कला त्यांनी साधली होती. शेवटी विश्वातील सर्व कण हे ऊर्जेचे जड रूप आहे, आपण सर्व त्यांनीच बनलो आहोत हे त्यांना आईनस्टाईनचा सिद्धांत माहीत नसतानाही कळले होते. गणिती भाषा तर सर्व विश्वात चालेल, पण ही "नेणिवेची"अबोल भाषा त्याहूनही बोलकी असावी.

Tuesday, June 23, 2015

नमन नटवरा

दादा मडकईकरांसोबत
कारभारी - म्हाराज! म्हाराज! आपला कोतवाल म्येला की हो!
म्हाराज - आं!? आन त्यो कसा रं?
कारभारी - पालथा पडून!
म्हाराज - आरं तसं न्हवं! म्हंजे तेला काय झालं हुतं?
कारभारी - आता गतसाली येक कारटं जालं हुतं. दोन वर्साखाली येक आनखी पोरगं जाल्यालं हुतं. औंदा काय ऐकण्यात न्हवतं!
म्हाराज - आरं तुज्या! आरं तसं न्हवं! म्हंजे तेला रोग काय जाला हुता म्हंतो मी!

असा संवाद स्टेजवर चालू होता. प्रेक्षकांत हंशा पिकत होता. प्रेक्षकांत मी आईबरोबर बसलो असेन. वय साधारण ९-१० वर्षे. संवादातील विनोद फारसा कळत नसला तरी मीही जोरजोरात हसत होतो. पण मला आठवतं, त्या वयातही एक दडपण आलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. हा जो नाट्यप्रयोग चालला होता त्यात कारभाऱ्याचं काम करत होते ते माझे बाबा. सावंतवाडी हे गाव छोटं असलं तरी परंतु नाटक, संगीत, चित्रकला, साहित्य या बाबतीत अत्यंत जागृत. या ठिकाणी "जागृत" हाच शब्द डोक्यात उस्फूर्तपणे आला आणि लक्षात आलं खरंच, एखादं देवस्थान जसं जागृत असतं तसंच या गावाचं आहे. दुसरा शब्द समर्पक ठरलाच नसता. नाट्यदर्शन ही संस्था आमचे सर दिनकर धारणकर यांनी समानव्यसनी नादिष्टांना घेऊन सुरू केली तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण नाटकांच्या तालमी सुरू झाल्या आणि बाबांबरोबर तालमींना जायला मिळायला लागलं. आमच्या वि. स. खांडेकर विद्यालयातच त्या तालमी होत. शाळेचं नाट्यगृहही या संस्थेला मिळायचं. त्यामुळे जागा ओळखीचीच असायची. आबा नेवगी, दादा मडकईकर, स्वत: दिनकर सर, चिटणीस सर, पी.डी. नाईक, नाटककार ल. मो. बांदेकर असे अनेक जण त्या निमित्ताने मी जवळून पहिले, त्यांचं काम त्या वयात जेवढं कळायचं तेवढं पाहिलं. आबा नेवगी आणि दादा मडकईकर हे भयंकर मिष्किल, खरं तर व्रात्यच म्हणायचं. चेष्टा, मस्करी अतोनात. पण ती कधी लागट, जिव्हारी लागणारी नसे. ज्याची मस्करी असे तोही दिलखुलास हसत असे. अशा मस्कऱ्या स्वभावाचे दादा मडकईकर मला माहीत असल्यामुळे ते कवी आहेत याचा शोध मला खूप नंतर लागला. परवाच कुणीतरी दादांची "मी पाव्स तू पाव्स" कविता उद्धृत केली होती. एवढं तरल आणि हळुवार मन असणारा हा कवी. अनेक क्षेत्रांतील लोक नाटकाच्या ओढीमुळे तिथे एकत्र आलेले दिसायचे. तालमी चालायच्या, भरपूर गप्पा व्हायच्या. मी फक्त त्या गप्प राहून पाहायचो. नाटक का करायचं, आणि लोकांना ते पाहायला का आवडतं असे प्रश्नही मला पडायचे. अनेक शब्द कानावर पडायचे. संहिता, अंक, प्रॉम्प्टर, कपडेपट, पिट, विंग, पहिली घंटा, कॅरेक्टर. सगळ्यात मला आश्चर्य वाटायचं ते म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर "भाषण" न अडखळता म्हणून दाखवायचं, म्हणजे पाठांतर जबरदस्त हवं. मध्येच बाबा विसरले तर? नाटक किंवा कंटाळवाणे भाषण पाडायला लोक टाळ्या वाजवतात ही मला तिथंच समजलेली गोष्ट. आयत्यावेळी कशा चुका होतात याचे किस्सेही बाबा सांगायचे. त्यामुळे लोकांनी खरोखर टाळ्या वाजवल्या तरी मी नर्व्हस होऊन स्टेजवरच्या नटमंडळींचं काय चुकलं असेल ह्याचा विचार करायचो. त्यामुळे आताही हे वगनाट्य चालू असताना मला दडपण त्याचं होतं. पण तसा काही अनवस्था प्रसंग आला नाही. राजा, परधान दोघेही टाळ्या आणि हशे वसूल करत होते. वग गाजला. नाट्यदर्शन जोमाने वाटचाल करू लागलं. पुढे मग नाटकं बघायला मिळू लागली. पुढे मग "साक्षीदार" बसले. त्यात प्रा. चिटणीस हे सरकारी वकील, प्रा. आर. एस. कुलकर्णी हे आरोपी, धारणकर सर आरोपीचे वकील, प्राचार्य घ.न.आरणके हे जज्, अशी पात्ररचना असलेली आठवते. बाबांनी त्यात "मामा"चे काम केले होते. धारणकर सर हे दिग्दर्शक आणि नाट्यदर्शनचे सर्वेसर्वा व्यक्तिमत्व. अनेकदा घरी येत. नाटकांवर चर्चा होत असे. नवीन नाटक बसवायला घेतलेलं असायचं. मला फारसं काही कळत नसे, पण कानावर पडत असे. नाट्यदर्शनमुळे १९७८ मध्ये एकोणसाठावे नाट्यसंमेलन हे सावंतवाडीत झाले. भालबा केळकर त्याचे अध्यक्ष होते. प्रिन्सिपॉल कोपरकरांबरोबर भालबा आमच्या घरी आलेले आठवते. नाट्यसंमेलनानिमित्त स्मरणिकेचे काम बाबांकडे आले होते. कित्येक महिने स्मरणिका हाच विषय घरात. एखाद्या विषयाला हात घातला की अक्षरश: तहानभूक विसरून त्यात समरस व्हायची वृत्ती. अजूनही ती तशीच आहे. एक गमतीची गोष्ट आठवते, या सगळ्या चर्चांमध्ये आमचे धाकटे बंधुराज, वय साधारण सात ते आठ पण अगदी हिरीरीने भाग घेत असत. अर्थात, नाटकच कशाला, समोर आलेल्या सर्व विषयांवर आपल्याहून वयाने साधारण तीस पस्तीस वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसांशी बरोबरीने साधकबाधक चर्चा करणे, मत व्यक्त करणे हे त्याच्या रक्तातच होते. मला वाटतं आज तो नाटकं दिग्दर्शित करतो, त्यांत कामं करतो, हा काही योगायोग नाही. त्याची समजच मोठी असावी. माझं स्वत:चं नाटकात काम करणं फारसं पुढे गेलं नाही. एकदा एका नाटकात दूधवाल्या भय्याचं काम - तेही दाराबाहेरूनच "बाई, दोsssध!" असं ओरडण्याचं. प्रवेशालाच टाळी पडायची पण ती माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठ्या अशा भरघोस मिशांना असायची. आणखी एका नाटकात राजाचं. त्यातही राजा कमी आणि राजकन्येचा बाप जास्त अशी भूमिका होती. दोन तास हा नृपती  सिंहासनावर बसून राजकन्येच्या हट्टापुढे शरण आल्याच्या वेगवेगळ्या पोझेस घ्यायचा. एकदा मध्येच कधीतरी "कोण आहे रे तिकडे?" म्हणायचा. अभिनयाची कारकीर्द इथेच संपली.

बाबांना सिनेमाला जाण्याचा नाद नव्हता, किंबहुना तो आवडतच नसावा असं वाटे. सिनेमाला चला असं कधी त्यांच्याकडून म्हटलं गेल्याचं मला आठवत नाही. पण नाटक पाहायला जायला ते नाही म्हणायचे नाहीत. गोविंद चित्रमंदिर हे "सीझनल" नाट्यगृह. स्टेज नावाचा चौथरा, त्याभोवती झावळ्या लावून केलेलं प्रशस्त प्रेक्षागार. कोकणातील पाऊस असा की या झावळ्या कुजून जात आणि दरवर्षी मग सीझन आला की नवीन झावळ्या लावायला लागायच्या. नाटकाच्या आधीचं ते उत्साहाने भरलेलं वातावरण मला अजून आठवतं. बाहेर झावळ्या लावून, बाकडी ठेवून केलेलं जुजबी दुकान असे. तिथं सोडावॉटरच्या बाटल्या ठेवलेल्या असत. काचेच्या त्या बाटल्या, त्यांच्या गळ्यात असलेली ती निळी गोटी. उघडून देताना कुकरच्या शिट्टीसारखा आवाज होई आणि तो फसफसणारा सोडा पाहूनच तहान भागल्यासारखी वाटे. त्या सोड्याचेही दोन प्रकार. एक साधा, दुसरा लेमन. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही. मागितला तर बाबा देणार नाहीत हेही माहीत होतं. बाहेरचं काही खाऊपिऊ नये, हे संस्कार असण्याचा काळ होता तो. त्या फसफसणाऱ्या सोड्यासारखीच माणसांची लगबग चालू असे. आत फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या असायच्या. धूप फिरवलेला असायचा त्याचा वास दरवळत असे. आपल्या खुर्चीवर बसलं की मग पहिल्या घंटेची प्रतीक्षा सुरू व्हायची. पण आधी सुरू व्हायच्या कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या नावाच्या अनाउन्समेंटस. मग एकदा ती पहिली घंटा डावीकडून उजवीकडे, आणि उजवीकडून परत डावीकडे असं कुणीतरी वाजवत जायचं. मला आत जी गडबड चाललेली असायची त्याचं भयंकर उत्सुकतावजा आकर्षण होतं. घंटा वाजवून नाटक चालू करायला परवानगी देणारा इसम तर मला अत्यंत पॉवरफुल वाटायचा. पुढे कधीतरी आपणही हे काम करायचं असं मी मनाशी ठरवून ठेवलं होतं. मग पुढे एकदोन तास कसे जायचे कळायचं नाही. बाबांमुळेच दशावतार ही एक कोकणातील खास लोककला पाहायची संधी अनेकवेळा मिळायची. गणेशस्तवन, वेद पळवून नेणारा शंकासुर आणि मग विष्णूचे त्याचे ते युद्ध, मग विष्णूचे अवतार असा तो ठरलेला बंध. वालावलकर, मोचेमाडकर अशी गाजलेली दशावतार मंडळी गावात येत असत.तासनतास ते प्रयोग चालत.

एकूण नाटक हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण मला वाटतं एखाद्याला डीफाईन करणारी व्यक्तिरेखा म्हणतात ती बाबांच्या बाबतीतली व्यक्तिरेखा म्हणजे "भाऊबंदकी" नाटकातील रामशास्त्री प्रभुण्यांची. बाबांच्या बाबतीत ती व्यक्तिरेखा केवळ त्या नाटकापुरती राहिली नाही, किंबहुना ती तेवढ्यापुरती सीमित कधी नसावीच.  त्यांचा मूळ स्वभावही त्याला साजेसाच होता. खोटं न बोलणं ही गोष्ट बरेचजण प्रयत्नपूर्वक साधू शकतात. पण त्याही पुढे जाऊन असत्याला आणि अन्यायाला विरोध करणारी मंडळी फार कमी असतात. वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता अन्यायाला विरोध करणे काय असते हे मी पाहिले आहे. माझ्या विद्यार्थी दशेत तशी फक्त दोन माणसे त्यावेळी माझ्यासमोर होती. ती म्हणजे प्राध्यापक रमेश चिटणीस आणि दुसरे बाबा. आणिबाणीच्या काळात, काही अप्रिय स्थानिक संघर्षात या दोघांनीही दाखवलेला कणखरपणा, मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती सहजासहजी येणारी नाही. सारासार विचार करता येणारी, विद्वान म्हणता येईल एवढ्या बुद्धिमत्तेची भलीभली माणसे जेव्हा सत्तेपुढे शरण जात होती तेव्हा केवळ या दोन व्यक्ती एखाद्या पहाडाप्रमाणे उभ्या होत्या. भाऊबंदकी नाटकातील ते रामशास्त्री प्रभुण्यांचं पात्र असो किंवा साक्षीदार नाटकातील तडफदार सरकारी वकिलाचं पात्र असो, ते नाटकापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष जगण्यातही तेच पात्र वठलं गेलं. नाटक हे एकदोन घटकांचं, पण रामशास्त्री बाणा कायमचा.

Wednesday, June 17, 2015

नमो अॅप

तुम्ही गाडी चालवत असाल, ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, कुठे असाल, एक गोष्ट तुम्हाला सारखी चिंतित करत असेल, माझे नमो आत्ता काय करीत असतील? कुठल्या देशात वणवण फिरत असतील? शुद्ध शाकाहारी माणूस तो, जपानसारख्या देशात जेवणाचे काय करीत असेल? मेक अप, सॉरी, मेक इन इंडिया कुठवर आलंय? ते स्विस ब्यांकवाले अजून अडून बसले आहेत का? साधं कोपऱ्यावरच्या स्टेट ब्यांकेत पेन्शन घ्यायला गेलं तर जिवंत असल्याचा दाखला मागतात, एक नवा पैसा देत नाहीत, ही तर स्विस ब्यांक आहे. फ़ॉरेनच्या सगळ्याच गोष्टी भारी असतात. पण नमोनी त्यांनासुद्धा झापलं. बऱ्या बोलाने कुणाची कुणाची खाती आहेत ते सांगा असं नुसतं म्हटलं, स्विस ब्यांकांनी घाबरून सगळ्यांची फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिली म्हणे. मग पुढे नमोंनी त्यांचं काय केलं? एकेकाला उभा आडवा झोडपून सगळा काळा पैसा वसूल केला असणार याची खात्री आहे. होय ना नमो? अरेच्या? उत्तर द्यायचं सोडून विमानात बसून कुठे गेले एकदम? विमानात नीट सीट मिळाली की नाही, ब्यागा वजनात बसल्या की नाही, स्पेशल रिक्वेस्ट म्हणून शाकाहारी जेवण सांगितले होते ते मिळाले की नाही या प्रवासातल्या चिंता आपल्याला तशा नमोंनाही असणार. नेहमी शेजारी असणारे अमितभाई साईझचे लोक विमानातसुद्धा शेजारी आले तर आपला चेंगरून दहीवडा होणार त्याबद्दल चिंता नमोंनाही असणार. या सगळ्याबद्दल चिंता (काही जणांना कुतूहल) आपल्याला वाटत असते. आपण या माहितीसाठी धडपडत असतो आणि इथे मीडिया नमोंबद्दल काहीच छापत नाही, टीव्हीवर दाखवत नाहीत. नमो तर पडले प्रसिद्धीपरांग्मुख. आपणहून काही सांगायचे नाहीत आपल्याबद्दल छापायला. लोकसभेत एवढा प्रचार करावा लागला, पण प्रसिद्धीमाध्यमांकडे काही गेले नाहीत. असं सगळं असल्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नव्हती. लोकांची काळजी, आत्मीयता, कळकळ दिवसेंदिवस वाढत चालली होती.  सर्व स्तरातून विविध अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

"वी कान्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - सर्वसामान्य जनता
"वी मस्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - राष्ट्रवादी
"मस्ट वी गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी?" - शिवसेना
"गेट ऑफ वी, मिस्टर मोदी!" - गांधी परिवार
"इनफ! वी मस्ट गेट मिस्टर मोदी!" - कॉंग्रेस
"आय डोंट गेट मिस्टर मोदी…:-(" - पप्पू

अशा मागण्या वाढत चालल्या होत्या. म्हणून मग नमो अॅप बाजारात आले आहे. आता हे अॅप डाऊनलोड करा आणि नुसत्या आपल्या टिचकीसरशी नमो तुमच्या मोबाईलमध्ये अवतरतील. नव्हे, ते नेहमी तुमच्या मोबाईलमध्येच असतील, आणि "केम छो भाय" असं म्हणत स्क्रीनवर येतील आणि स्वत: आपल्याबद्दल माहिती सांगतील. आम्ही त्याचे बेटा व्हर्शन डाऊनलोड करून पहायचे ठरवले. नमनालाच ठेच लागली. अॅप फ्री नव्हते. पाचशे रुपये लागणार होते. मरू द्या म्हणून अॅपस्टोअर क्लोज करायला गेलो तर "वेट! बाय नाऊ अॅण्ड गेट फ्री गेम!" अशी जाहिरात आली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून क्लोज करायला गेलो तर क्लोजच होत नव्हते. आणि फोनचे दुसरे कुठलेही अॅप ओपन होत नव्हते. मग चडफडत शेवटी विकत घेतले. फ्री गेम काय मिळतो आहे बघूया तरी असे म्हणून पाहिले तर "क्लिक हिअर फ़ॉर युअर फ्री गेम" असे बटन आले. तिथे क्लिक केलं तर थेट "आप"ची वेबसाईट ओपन होत होती. तिथे "पंच युअर लेफ्टनंट गवर्नर" असा गेम सुरू होता. फ्रीमध्ये वाटेल तेवढे पंच करा. नंतर निवांत खेळू म्हणून तो बंद करून परत नमो अॅपमध्ये आलो. होमस्क्रीनवर साहजिकच नमोंची साजिरी गोजिरी छबी होती. पण तीच तीच बघून कंटाळा येणार हे ओळखून वेगवेगळ्या छब्या निवडायची सोय होती. चेहरा तोच, फक्त डोक्यावर पगडी वेगळी. पुणेरी, पंजाबी, एक गुजराती "श्रीनाथजी" स्टाईलची, राजस्थानी,  काठियावाडी, एक छान मोत्याचा तुरा असलेली राजेशाही, मेक्सिकन सोम्ब्रेरो असे अनेक चॉइसेस होते. संघाची काळी टोपीपण होती. पण ती क्लिक केली तर ती अॅडव्हान्स्ड लेव्हल यूजरसाठी आहे असे कळले. किमान सहा महिने अॅप वापरल्याशिवाय ती लेव्हल अनलॉक होणार नाही असा मेसेज आला. मग मी आसामी किंवा नागालॅंडची दिसणारी टोपी निवडली. तिला हॉर्नबिल, मराठीत ज्याला धनेश म्हणतात त्या पक्षाची अख्खी चोचच होती. हा पक्षी ओरडू लागला म्हणजे जंगलातील सर्व प्राणी स्वत:चे ओरडणे थांबवून स्वस्थ बसतात. नमोंच्या डोक्यावर ही चोच शोभून दिसत होती. छबी अॅनिमेटेड होती! सेट केल्यावर ती चोच उघडून धनेश पक्ष्याची गगनभेदी आरोळी ऐकू आली, पाठोपाठ नमोंच्या छबीने,"मैं प्रधान मंत्री नही हुं, प्रधान सेवक हुं" हे वाक्य तर्जनी माझ्याकडे रोखत एक डोळा मारत म्हटलेले दिसले.


टोपी सिलेक्ट करण्यात जवळजवळ अर्धा तास गेला. तीनशेच्या वर टोप्या असलेली लायब्ररी होती ती! प्रत्येक स्वदेश, परदेश दौऱ्यानंतर लायब्ररी अपडेट होऊन त्यात आणखी टोप्या येतील असे कळले. शिवाय आपला फोटो अपलोड करून आपल्याला हव्या त्या टोपीतील नमोंच्या छबीबरोबर आपला फोटो फोटोशॉप करून देण्याचीही सोय होती. माझ्या दृष्टीने हे अॅप इथेच यशस्वी झाले होते. पाचशे रुपये देताना आपण एवढे काचकूच का करत होतो असे वाटले. मग इतर काय सोयी आहेत ते पाहू लागलो. "इंटरअॅक्ट विथ पीएम" ! वाह! स्वत: नमोंशी बातचीत? घाई घाईने "नमस्कार माननीय प्रधानमंत्री!" असे टाइप केले. लगेच उत्तर आले! "नमश्कार! ये प्रधान सेवक आपकी क्या सेवा कर सकता है?" उगाच एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा वेळ का घालवा, मुद्द्यालाच हात घातला. "सरजी, वो स्विस ब्यांकवाले मान तो गये, आगेका क्रियाकर्म कब होगा?". तर "महोदय, क्रिप्या प्रतीक्षा करें, आप कतार में हैं. प्रतीक्षा का समय लगभग चार घंटे और पैन्तालीस मिनट." असा मेसेज आला. बरोबर आहे. एकटा माणूस तरी किती जणांशी एकाच वेळी बोलेल? सगळेच लेकाचे हाच प्रश्न विचारत असतील. "प्रतीक्षा करते करते प्रधानमंत्रीजीके चुने हुए भाषण सुने" असा मेसेज मिळाला. आणि हो नाहीची वाट न पाहताच तडक नमोंचे एक भाषण लागले. ही म्हणजे पर्वणीच! खजिनाच सापडला म्हणायचा! काय ते अप्रतिम वक्तृत्व, ती ओघवती शैली! विरोधकांच्या मर्मावर वार करून त्यांना भुईसपाट करण्याची ती हातोटी हे तर त्यातून दिसून येत होतेच, पण त्याचबरोबर सर्वसमावेशक राजकारण करण्याचे वचन देऊन, कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचे आरोप सहन करून करून थकल्या भागलेल्यांना सामावून घेण्याची त्यांची दिलदार वृत्तीही दिसून येत होती. एकापेक्षा एक सरस अशी ती भाषणे ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळले नाही. जाग आली तेव्हा फोनची बॅटरी मृत्यूपंथाला लागली होती. तरी चटकन आपल्या त्या विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं ते पाहावं म्हणून परत "इंटरअॅक्ट" मध्ये घुसलो तर स्क्रीन ब्ल्यांक झाला होता. नो इंटरनेट कनेक्शन म्हणे. पाच सहा तासात या अॅपने माझा ५ गिगाबाईटचा डेटा फस्त केला होता. पण पर्वा नाही. पुन्हा विकत घेतला डेटा पॅक. आपण भाषणं काय चुकवणार नाही बुवा.