 |
दादा मडकईकरांसोबत |
कारभारी - म्हाराज! म्हाराज! आपला कोतवाल म्येला की हो!
म्हाराज - आं!? आन त्यो कसा रं?
कारभारी - पालथा पडून!
म्हाराज - आरं तसं न्हवं! म्हंजे तेला काय झालं हुतं?
कारभारी - आता गतसाली येक कारटं जालं हुतं. दोन वर्साखाली येक आनखी पोरगं जाल्यालं हुतं. औंदा काय ऐकण्यात न्हवतं!
म्हाराज - आरं तुज्या! आरं तसं न्हवं! म्हंजे तेला रोग काय जाला हुता म्हंतो मी!
असा
संवाद स्टेजवर चालू होता. प्रेक्षकांत हंशा पिकत होता. प्रेक्षकांत मी
आईबरोबर बसलो असेन. वय साधारण ९-१० वर्षे. संवादातील विनोद फारसा कळत नसला
तरी मीही जोरजोरात हसत होतो. पण मला आठवतं, त्या वयातही एक दडपण आलं होतं.
त्याला कारणही तसंच होतं. हा जो नाट्यप्रयोग चालला होता त्यात कारभाऱ्याचं
काम करत होते ते माझे बाबा. सावंतवाडी हे गाव छोटं असलं तरी परंतु नाटक,
संगीत, चित्रकला, साहित्य या बाबतीत अत्यंत जागृत. या ठिकाणी "जागृत" हाच
शब्द डोक्यात उस्फूर्तपणे आला आणि लक्षात आलं खरंच, एखादं देवस्थान जसं
जागृत असतं तसंच या गावाचं आहे. दुसरा शब्द समर्पक ठरलाच नसता. नाट्यदर्शन
ही संस्था आमचे सर दिनकर धारणकर यांनी समानव्यसनी नादिष्टांना घेऊन सुरू केली
तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण नाटकांच्या तालमी सुरू झाल्या आणि
बाबांबरोबर तालमींना जायला मिळायला लागलं. आमच्या वि. स. खांडेकर
विद्यालयातच त्या तालमी होत. शाळेचं नाट्यगृहही या संस्थेला मिळायचं.
त्यामुळे जागा ओळखीचीच असायची. आबा नेवगी, दादा मडकईकर, स्वत: दिनकर सर,
चिटणीस सर, पी.डी. नाईक, नाटककार ल. मो. बांदेकर असे अनेक जण त्या
निमित्ताने मी जवळून पहिले, त्यांचं काम त्या वयात जेवढं कळायचं तेवढं
पाहिलं. आबा नेवगी आणि दादा मडकईकर हे भयंकर मिष्किल, खरं तर व्रात्यच
म्हणायचं. चेष्टा, मस्करी अतोनात. पण ती कधी लागट, जिव्हारी लागणारी नसे.
ज्याची मस्करी असे तोही दिलखुलास हसत असे. अशा मस्कऱ्या स्वभावाचे दादा
मडकईकर मला माहीत असल्यामुळे ते कवी आहेत याचा शोध मला खूप नंतर लागला.
परवाच कुणीतरी दादांची "मी पाव्स तू पाव्स" कविता उद्धृत केली होती. एवढं
तरल आणि हळुवार मन असणारा हा कवी. अनेक क्षेत्रांतील लोक नाटकाच्या ओढीमुळे
तिथे एकत्र आलेले दिसायचे. तालमी चालायच्या, भरपूर गप्पा व्हायच्या. मी
फक्त त्या गप्प राहून पाहायचो. नाटक का करायचं, आणि लोकांना ते पाहायला का
आवडतं असे प्रश्नही मला पडायचे. अनेक शब्द कानावर पडायचे. संहिता, अंक,
प्रॉम्प्टर, कपडेपट, पिट, विंग, पहिली घंटा, कॅरेक्टर. सगळ्यात मला आश्चर्य
वाटायचं ते म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर "भाषण" न अडखळता म्हणून
दाखवायचं, म्हणजे पाठांतर जबरदस्त हवं. मध्येच बाबा विसरले तर? नाटक किंवा
कंटाळवाणे भाषण पाडायला लोक टाळ्या वाजवतात ही मला तिथंच समजलेली गोष्ट.
आयत्यावेळी कशा चुका होतात याचे किस्सेही बाबा सांगायचे. त्यामुळे लोकांनी
खरोखर टाळ्या वाजवल्या तरी मी नर्व्हस होऊन स्टेजवरच्या नटमंडळींचं काय
चुकलं असेल ह्याचा विचार करायचो. त्यामुळे आताही हे वगनाट्य चालू असताना
मला दडपण त्याचं होतं. पण तसा काही अनवस्था प्रसंग आला नाही. राजा, परधान
दोघेही टाळ्या आणि हशे वसूल करत होते. वग गाजला. नाट्यदर्शन जोमाने वाटचाल
करू लागलं. पुढे मग नाटकं बघायला मिळू लागली. पुढे मग "साक्षीदार" बसले. त्यात प्रा. चिटणीस हे सरकारी वकील, प्रा. आर. एस. कुलकर्णी हे आरोपी, धारणकर सर आरोपीचे वकील, प्राचार्य घ.न.आरणके हे जज्, अशी पात्ररचना असलेली आठवते. बाबांनी त्यात "मामा"चे काम केले होते. धारणकर सर हे दिग्दर्शक आणि नाट्यदर्शनचे सर्वेसर्वा व्यक्तिमत्व. अनेकदा घरी येत. नाटकांवर चर्चा होत असे. नवीन नाटक बसवायला घेतलेलं असायचं. मला फारसं काही कळत नसे, पण कानावर पडत असे. नाट्यदर्शनमुळे १९७८ मध्ये एकोणसाठावे नाट्यसंमेलन हे सावंतवाडीत झाले. भालबा केळकर त्याचे अध्यक्ष होते. प्रिन्सिपॉल कोपरकरांबरोबर भालबा आमच्या घरी आलेले आठवते. नाट्यसंमेलनानिमित्त स्मरणिकेचे काम बाबांकडे आले होते. कित्येक महिने स्मरणिका हाच विषय घरात. एखाद्या विषयाला हात घातला की अक्षरश: तहानभूक विसरून त्यात समरस व्हायची वृत्ती. अजूनही ती तशीच आहे. एक गमतीची गोष्ट आठवते, या सगळ्या चर्चांमध्ये आमचे धाकटे बंधुराज, वय
साधारण सात ते आठ पण अगदी हिरीरीने भाग घेत असत. अर्थात, नाटकच
कशाला, समोर आलेल्या सर्व विषयांवर आपल्याहून वयाने साधारण तीस पस्तीस
वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसांशी बरोबरीने साधकबाधक चर्चा करणे, मत व्यक्त करणे
हे त्याच्या रक्तातच होते. मला वाटतं आज तो नाटकं दिग्दर्शित करतो, त्यांत कामं करतो, हा काही योगायोग नाही. त्याची समजच मोठी असावी. माझं स्वत:चं नाटकात काम करणं फारसं पुढे गेलं नाही. एकदा एका नाटकात दूधवाल्या भय्याचं काम - तेही दाराबाहेरूनच "बाई, दोsssध!" असं ओरडण्याचं. प्रवेशालाच टाळी पडायची पण ती माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठ्या अशा भरघोस मिशांना असायची. आणखी एका नाटकात राजाचं. त्यातही राजा कमी आणि राजकन्येचा बाप जास्त अशी भूमिका होती. दोन तास हा नृपती सिंहासनावर बसून राजकन्येच्या हट्टापुढे शरण आल्याच्या वेगवेगळ्या पोझेस घ्यायचा. एकदा मध्येच कधीतरी "कोण आहे रे तिकडे?" म्हणायचा. अभिनयाची कारकीर्द इथेच संपली.
बाबांना सिनेमाला जाण्याचा
नाद नव्हता, किंबहुना तो आवडतच नसावा असं वाटे. सिनेमाला चला असं कधी
त्यांच्याकडून म्हटलं गेल्याचं मला आठवत नाही. पण नाटक पाहायला जायला ते
नाही म्हणायचे नाहीत. गोविंद चित्रमंदिर हे "सीझनल" नाट्यगृह. स्टेज नावाचा
चौथरा, त्याभोवती झावळ्या लावून केलेलं प्रशस्त प्रेक्षागार. कोकणातील
पाऊस असा की या झावळ्या कुजून जात आणि दरवर्षी मग सीझन आला की नवीन झावळ्या
लावायला लागायच्या. नाटकाच्या आधीचं ते उत्साहाने भरलेलं वातावरण मला अजून
आठवतं. बाहेर झावळ्या लावून, बाकडी ठेवून केलेलं जुजबी दुकान असे. तिथं
सोडावॉटरच्या बाटल्या ठेवलेल्या असत. काचेच्या त्या बाटल्या, त्यांच्या
गळ्यात असलेली ती निळी गोटी. उघडून देताना कुकरच्या शिट्टीसारखा आवाज होई
आणि तो फसफसणारा सोडा पाहूनच तहान भागल्यासारखी वाटे. त्या सोड्याचेही दोन
प्रकार. एक साधा, दुसरा लेमन. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही. मागितला तर
बाबा देणार नाहीत हेही माहीत होतं. बाहेरचं काही खाऊपिऊ नये, हे संस्कार
असण्याचा काळ होता तो. त्या फसफसणाऱ्या सोड्यासारखीच माणसांची लगबग चालू
असे. आत फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या असायच्या. धूप फिरवलेला असायचा त्याचा
वास दरवळत असे. आपल्या खुर्चीवर बसलं की मग पहिल्या घंटेची प्रतीक्षा सुरू
व्हायची. पण आधी सुरू व्हायच्या कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या नावाच्या
अनाउन्समेंटस. मग एकदा ती पहिली घंटा डावीकडून उजवीकडे, आणि उजवीकडून परत
डावीकडे असं कुणीतरी वाजवत जायचं. मला आत जी गडबड चाललेली असायची त्याचं
भयंकर उत्सुकतावजा आकर्षण होतं. घंटा वाजवून नाटक चालू करायला परवानगी
देणारा इसम तर मला अत्यंत पॉवरफुल वाटायचा. पुढे कधीतरी आपणही हे काम
करायचं असं मी मनाशी ठरवून ठेवलं होतं. मग पुढे एकदोन तास कसे जायचे कळायचं
नाही. बाबांमुळेच दशावतार ही एक कोकणातील खास लोककला पाहायची संधी
अनेकवेळा मिळायची. गणेशस्तवन, वेद पळवून नेणारा शंकासुर आणि मग विष्णूचे
त्याचे ते युद्ध, मग विष्णूचे अवतार असा तो ठरलेला बंध. वालावलकर,
मोचेमाडकर अशी गाजलेली दशावतार मंडळी गावात येत असत.तासनतास ते प्रयोग चालत.
एकूण नाटक हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण मला
वाटतं एखाद्याला डीफाईन करणारी व्यक्तिरेखा म्हणतात ती बाबांच्या बाबतीतली
व्यक्तिरेखा म्हणजे "भाऊबंदकी" नाटकातील रामशास्त्री प्रभुण्यांची.
बाबांच्या बाबतीत ती व्यक्तिरेखा केवळ त्या नाटकापुरती राहिली नाही,
किंबहुना ती तेवढ्यापुरती सीमित कधी नसावीच. त्यांचा मूळ स्वभावही त्याला
साजेसाच होता. खोटं न बोलणं ही गोष्ट बरेचजण प्रयत्नपूर्वक साधू शकतात. पण
त्याही पुढे जाऊन असत्याला आणि अन्यायाला विरोध करणारी मंडळी फार कमी
असतात. वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता अन्यायाला
विरोध करणे काय असते हे मी पाहिले आहे. माझ्या विद्यार्थी दशेत तशी फक्त
दोन माणसे त्यावेळी माझ्यासमोर होती. ती म्हणजे प्राध्यापक रमेश चिटणीस आणि
दुसरे बाबा. आणिबाणीच्या काळात, काही अप्रिय स्थानिक संघर्षात या दोघांनीही दाखवलेला कणखरपणा, मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती सहजासहजी येणारी नाही. सारासार विचार करता येणारी, विद्वान म्हणता येईल एवढ्या बुद्धिमत्तेची भलीभली माणसे जेव्हा सत्तेपुढे शरण जात होती तेव्हा केवळ या दोन व्यक्ती एखाद्या पहाडाप्रमाणे उभ्या होत्या. भाऊबंदकी नाटकातील ते रामशास्त्री प्रभुण्यांचं पात्र असो किंवा साक्षीदार नाटकातील तडफदार सरकारी वकिलाचं पात्र असो, ते नाटकापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष जगण्यातही तेच पात्र वठलं गेलं. नाटक हे एकदोन घटकांचं, पण रामशास्त्री बाणा कायमचा.
No comments:
Post a Comment