अगो, थोरल्या बाजीरावांच्या धर्मपत्नी राजमान्य राजश्री सौभाग्यकांक्षिणी श्रीमंत काशीबाईसाहेब यांनी टाॅवेल-सावरूया-हम बिल दे चुके सनम-बेवडादास फेम भन्साळीच्या स्वप्नात येऊन घातलेला पिंगा पाहिला हो! पिंगा घातलंन तो सुद्धा कुणाशी बरं? स्वत:च्याच इकडून ठेवलेल्या नाटकशाळेशी हो! जळ्ळं मेल्याचं लक्षण ते! आता त्यावेळच्या घरंदाज बायका तोंडाला रंग फासून नाचायला बोर्डावर उभ्या राहत होत्या असं वाटलं की काय तुझ्या या लीलावतीला? बाईनं कसा घट्ट अंगभर पदर घ्यावा हो! या कवटाळणी बघत्ये तर कोपऱ्यावरच्या त्या मारवाड्याच्या दुकानासारख्या! नेहमी उघड्या! हा मेल्यांनो! तोंडाला काळं फासलनीत हो अगदी! त्यातून ती सटवी मस्तानी की फस्तानी! सवत ना गो ती काशीबाईची? पोटच्या मुलाला, लाखांच्या पोशिंद्याला कुठून ही अवदसा आठवली असं राधाबाईसाहेबांना, त्या माऊलीला वाटत असेल गो! सोन्यासारखी सून घरात आणली पण म्हणतात ना कर्म! त्यातलीच गत हो ही! मुलानं अटकेपार झेंडा नेलान पण हा कोथरूडपार लावलेला झेंडा रोज कित्ती सलत असेल सासूसुनेला. राऊ कोथरूडला आहेत म्हटलं की इकडे वाड्यावर गणपती पाण्यात. मेली ती हडळ! काय जादू केल्येन त्या गजाननासच ठाऊक. म्हणे सौंदर्यवती आहे. अस्सा राग येतो! पण आपलाच दाम खोटा हो! समोर आली ना तर झिंज्या उपटून हातात दीन. माझी काशी गरीब गायच म्हणून सगळं सहन करत्ये. असं सगळं कल्प कल्प त्या माऊलीच्या मनात येत असेल. आणि खात्रीन सांगत्ये काशीबाई घरंदाज म्हणून काही बोलायच्या नाहीत पण मुदपकात चाललेलं पाटा वरवंटा, मुसळ कांडणं पाहून ती मेली सवत त्या मुसळाखाली चेचली जात्ये असंच स्वप्न पहात असतील अगदी! पण बाईचा जल्मच सोसण्यासाठी हो! पण हे त्या जळ्ळ्या भन्साळ्याला कळलं तर ना? इतिहासात नापास झाला आणि सिन्मात घुसला. वर सरकारनं पद्मश्रीची भिक्षावळ घातल्ये हो झोळीत. उजेड फाकला आहे तिचा! मरा! मी तर म्हणत्ये जर या दोघीं समोरासमोर आल्या तर एकच गाणं होईल हो! पिंगा ग पोरी पिंगाच्या ऐवजी झिंज्या ग पोरी झिंज्या, उपटीन तुझ्या मी झिंज्या! पुढल्या सिनेमात रमाबाईसाहेब करवा चौथचं व्रत ठेवतायत आणि खुद्द श्रीमंत माधवराव पेशवे सदरेवर मागे शेदोनशे हशमांची फौज घेऊन "लेने तुझे गोरी, आयेंगे तेरे सजना" असं म्हणत पंजाबी भांगडा घालतायत हे दृश्य बघण्याची तयारी ठेवल्ये. वाचव रे गजानना!
-अंबूवन्सं (मु.पो. पडघवली)
-अंबूवन्सं (मु.पो. पडघवली)
No comments:
Post a Comment