आयला बाजीरावानं मस्तानीशी लग्न करून त्यावेळी लोकांचा रोष पत्करला पण आज मात्र त्यासाठी वाहवा कमवतोय. लोक असूया, अभिमान तर काही विरोधातून का होईना चर्चा करताहेत. पण दोन दोन लग्नं करणारा बाजीराव शूरच होता यावर आज कुणातही दुमत नाही. नाही तर आम्ही. दूर भविष्यात आम्ही केलेल्या लग्नाबद्दल (एकच असलं तरी काय झालं) चर्चा घडलीच तर ती फार तर "बरं झालं, चांगली अद्दल घडली मूर्खाला." एवढीच असेल. आम्ही आता इज्जत, वाहवा मिळवण्यासाठी काय करावं मग? बरं, हल्ली घोडीही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे भीमथडी घोड्यावर मांड ठोकून शेतातून रपेट मारावी अन् थोडी तिथे इज्जत मिळवावी तर तेही शक्य नाही. कणसांचं हातावर चुरून खाणं म्हणावं तर आता कणसाचं कॉर्न झालंय. मॉडेल कॉलनीत छान कागदाच्या द्रोणात मिळणारी कॉर्न भेळ आणि प्याटीस यापलीकडे जाता येत नाही. फार फार तर खंडाळ्याच्या घाटात शेजारी आशाळभूतपणे पाहणारी दोन चार माकडं एका हाताने हुसकावत खाल्लेले भाजलेले कणीस एवढाच संबंध. मग निदान अटकेपार झेंडा फडकवावा म्हटलं तर फाळणीनं फाळ लावलेला. अटक तर गेलं पापस्तानात. आणि व्हिसाशिवाय घुसायला आणि सहीसलामत सुटायला आम्ही काय बजरंगी भाईजान नव्हे. झेंड्याचाही प्रश्नच. भारताचा लावायचा तर अखंड भारतवाले बल्ले बल्ले करणार, पापस्तानाचा लावावा तर पाखंड भारतवाले अल्ला हू अकबर करणार. थोडक्यात आम्ही बाजीरावाचा कुठलाच पराक्रम गाठणे शक्य नाही. तेव्हा,आम्ही आपला भन्साळीचा पिक्चर पाहू. या नरपुंगवाचे चित्रपट पाहणे हेच कुठल्याही पराक्रमापेक्षा कमी नाही. संस्कृतीचे भले भले रक्षक सिनेमाला प्रचंड विरोध करत करत शेवटी हळूच मॅटिनीचा शो पाहून आले असे कळले आहे. त्यांचा भन्साळीचा विरोध "भन्साळीने पेशव्यांचा पर्यायाने समस्त महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्याने इतिहासाची आयमाय एक केली आहे" इथवरून थेट "प्रचंsssssssड भारावून गेलो, मराठेशाहीच्या अभिमानानं छाती बावीस नंबरच्या बनियनमध्ये मावेना. सिनेमाच्या प्रेमातच पडलो. अगदी मोरीत पाय घसरून पडल्यासारखा!" इथवर आला. एवढे मतपरिवर्तन! आम्ही आ वासून पाहतच राहिलो. यापूर्वी असे संपूर्ण परिवर्तन आम्ही जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या घोषणेत आणि संघाच्या शिबिरातील बौद्धिकात नुसते ऐकले होते. संघाने परिवर्तन करण्याचा कितीही प्रयत्न करो, मराठी बाण्याने तो यशस्वी होऊ दिला नव्हता. ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रात:स्मरणीय भन्साळीना स्वत: यावे लागले. आमच्या या संस्कृतीरक्षकाच्या या "अर्धवृत!"मागे बाजीरावाच्या पराक्रमापेक्षा प्रियांका चोप्राचा गोड चेहरा जास्त कारणीभूत असल्याचे गोड गुपित त्यानेच आम्हाला आम्ही आमच्या नेहमीच्या हाॅटेल किनारात (धी बार ॲंड रेस्टॉरंट) सांगितले. व्हिस्कीचे केवळ दोन पेग माणसाला किती सत्यप्रिय करून सोडतात. आता संस्कृतीरक्षकांमध्येच प्रियांका गट आणि दीपिका गट पडले आहेत आणि त्यावरून हाणामाऱ्या चालू आहेत. मायला, भन्साळ्या, आधीच एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसावर दातओठ खाऊन असतो, त्यात त्यांच्या मध्ये प्रियांका आणि दीपिकाला घालून चांगला पिंगा घालायला लावतो आहेस. बिचारा बाजीराव आपला इतिहासाची कणसं हातावर चुरून खात बसला आहे. असो. तात्पर्य, आम्ही बाजीरावाच्या पासंगालाही पुरत नाही, पुरणारही नाही. इत्यलम.
No comments:
Post a Comment