Monday, August 17, 2015

स्वातंत्र्याची ऐशीतैशी

स्वातंत्र्यदिन होऊन गेला. लेखनकामाठ्यांनी बरंच त्यावर लिहिलं. ती आपली पद्धतच झाली आहे. बरंचसं लिखाण उपरोधी, लोकांच्या "हॅपी इन्डिपेंडन्स डे" टाईप शुभेच्छांची टर उडवणारं, तर काही नेहेमीप्रमाणे इतकी वर्षं झाली पण आपल्यात काय पण फरक नाय पडला ब्वॉ, सगळे राजकारणी चोर, सरकार झोपलं आहे, नोकरशाही खाबू आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत, सामान्य जनता तेवढी अश्राप, कष्टकरी आहे, यात बळी जाणारी आहे असं काही तरी व्यक्त करणारं. स्वातंत्र्य म्हणजे सरकारने सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात, कुठून तरी पैसे आणावेत (म्हणजे कृपया माझ्याकडे कर मागू नका), रस्ते चकाचक करावेत, पेट्रोल फुकट करावे, कुठेही लाच द्यायला लागू नये इत्यादि गोड आशा. सरकारच्या जबाबदाऱ्या इथवर संपत नाहीत. आम्ही कर्जे घेऊ, ती माफ व्हायला हवीत, नाही तर आम्ही आत्महत्या करणार, आमची बायका पोरं रस्त्यावर आणणार, मग काही थोर समाजसेवक त्यांना बारा पंधरा हजार वाटणार, आम्ही फेसबुकवर, ट्वीटरवर या समाजसेवकांचे गोडवे गाणार आणि सरकार कसं हरामी आहे त्यावर लिहिणार. आणि हो, हे सगळं करायला फुकट वायफायचीही मागणी करणार. पण हे सगळं असं लिहिलं म्हणजे मी सर्वांपेक्षा वेगळा, संवेदनशील, विचारवंत. असं सगळं अस्वस्थ करणारं, भयंकर क्रांतिकारी लिहिल्यानंतर समाधानानं माझ्या एसी लावलेल्या घरात मी झोपणार, झोपता झोपता दुसऱ्या दिवशी लिखाणाच्या काय पाट्या टाकायच्या याचा विचार करणार. समस्या वगैरे मरूद्यात, मला विषय हवा. अरेच्या! समस्या मरूद्यात कसं? समस्या हव्यातच! नाही तर मी लिहिणार कशावर नी बोंब कशावर मारणार? स्वातंत्र्य या शब्दाचा स्वत:ला हवा तसा अर्थ कसा लावायचा हे भारतीयांकडून शिकावे. त्यातल्या त्यात मरहट्ट देशाचे सर्वात पुढे. इथे सगळेच चाणक्य, सगळेच ॲरिस्टाॅटल आणि सगळेच कान्ट. स्वत:च्या तंत्राप्रमाणे चालता आले तर ते स्वातंत्र्य नाही तर ते पारतंत्र्य. सामर्थ्य आहे गर्दीचे, स्वामी आणि त्यांच्या पिलावळीचे असे काहीसे भारतीय लोकशाहीचे स्वरूप झाले आहे. भाषणस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व स्वत:चे तंत्र नीट लावल्याशिवाय काही अर्थाचे नसते हे सोयीस्करपणे विसरले गेले आहे. गेल्या अडुसष्ट वर्षांत, बोंबलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच असे बाणेदारपणे लिहिणारे (केवळ लिहिणारेच) लोकलमान्य तेवढे गल्लोगल्ली झाले आहेत. दिसामाजि काही तरी लिहावे असं समर्थ सांगून गेले खरे, लोकांनी स्वत:ला पाहिजे तो अर्थ लावून दिसामाजि कायच्या काही तरी लिहावे असा सपाटा लावला. त्याला हातभार प्रात:स्मरणीय झुकेरबर्ग यांनी लावला. प्रात:स्मरणीय हा शब्द खऱ्या अर्थाने घ्यायचा. पूर्वी भल्या सकाळी लोटा पाहणारे आता प्रथम फेसबुक पाहतात.  लोकांकडे प्रचंड रिकामा वेळ आहे असं वाटायला लावणारं हे सगळं आहे.

भारतीय लोकशाही ही अशी सर्वस्वी सरकारवर अवलंबून राहणारी का झाली असावी? लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था अशी व्याख्या केल्यावर "सरकार" म्हणजे कुणी तरी अगम्य निराकार संस्था आहे, आणि तिच्याकडून सगळा न्याय अपेक्षित आहे, त्या संस्थेने जीडीपीची चिंता करायची, पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेला तोडीस तोड अशी आपली अर्थव्यवस्था बनवायची, या शिवाय सामाजिक आरोग्याचीही जबाबदारी घ्यायची. आपण मात्र संध्याकाळी कट्ट्यावर बसून "ये सिस्टमही खराब है, मेरा बस चलता तो मैं ये पूरे सिस्टमको उखाड फेक देता" वगैरे जग्गूदादा (तोच तो अंगारमधला जग्गू, दातावर मारायला पैसा नाही, पण मोटरसायकलची ऐपत असणारा) स्टाईल डायलॉग्ज मारायचे. हा जग्गू शर्ट टाय लावून क्लार्कच्या पदासाठी मुलाखतीला जातो आणि तिथे आपले क्रांतिकारी विचार मांडतो. समोर त्याच्यासारखाच शर्ट टाय लावून बसलेला क्रांति बिंती करणं हे आपलं काम नाही, असं सांगून त्याला नारळ देतो. मग जग्गू पुन्हा शर्ट काढून बनियनवर मोटरसायकल उडवायला मोकळा.  तसाच पुढे जाऊन तो बँड स्टँडच्या त्या स्पेशल खडकांत बसून ही 'सिस्टम' कशी आपल्याला अँग्री यंग मॅन बनवते आहे याबद्दल त्वेषाने भाषण करतो. त्याची त्यावेळची एखादी प्रेयसी ते भाषण डोळ्यांत साहिल, किनारा, तूफां यांपैकी एक काही तरी आणून ऐकते. मग हा आणखीच शेफारतो. श्रीमंत मनुष्य हा भांडवलशाही विचारसरणीचा असतो, मध्यमवर्गीय समाजवादी असतो तर कफल्लक मनुष्य हा कम्युनिस्ट असतो. जग्गू कफल्लक असल्याने साहजिकच त्याची क्रांतिच्या कल्पना आहे त्याच चाळीत राहणे, फक्त समोर एक हॉस्पिटल, एक सातवीपर्यंतची शाळा आणि सातवी संपल्यानंतर पुढे करायला काहीच नसल्यामुळे व्हॉलीबॉल खेळण्यापुरते एक मैदान यापलीकडे जात नाही. आपण अँग्री आहोत, आपल्यावर कसलातरी सतत अन्याय होऊन राहिला आहे या धुंदीत राहायला जग्गूला आवडतं. मग जग्गू स्वत:च्या नकळत ती परिस्थिती आवडून घेऊ लागतो, नव्हे, ती तशीच राहील याची काळजी घेतो. टोकाची कृती केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही असं तो स्वत:ला समजावतो आणि इतरांना बजावतो. क्रांति म्हणजे नक्की काय असा विचार कधी तरी त्याच्या मनात येत असेलही. पण अन्याय सहन करून राहिलो आहोत, संधी मिळाली असती तर कुठल्या कुठे गेलो असतो वगैरेची धुंदी एवढी जबर असते की खरा बदल जर झाला तर काय घ्या असा विचार करून गप्प बसायला होत असेल. या जग्गूला त्याचे क्रांतिकारक विचार ऐकून घेऊनही खरोखरच ती क्लार्कची नोकरी मिळायला हवी होती. कुठलेही काम हे कमीपणाचे नसते ही पहिली खरीखुरी वैचारिक क्रांती त्याला करता आली असती. सामाजिक क्रांती घडवून आणायला आधी त्या समाजाचा अधिकृत असा भाग तरी बनता आले असते.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, आपण काय मिळवले असा प्रश्न केला जातो. पर्यायाने प्रगती किती झाली असा तो रोख असतो. गुळगुळीत सहा पदरी रस्ते, चकचकीत इमारती, इम्पोर्टेड गाड्या विकत घेण्याची ऐपत ही प्रगतीची व्याख्या असायला हरकत नाही, पण त्याचबरोबर त्या रस्त्यांवरून नियम पाळून त्या इम्पोर्टेड गाड्या चालवणे, शहराच्या पुढील पंचवीस वर्षांच्या गरजांचा आढावा घेऊन इमारती बांधणे, मुजोरपणे बांधकाम करून नंतर लाच देऊन ते नियमित करून न घेणे हे सुद्धा प्रगती या सदराखाली बसते हे लक्षात यायला हवे. शासनाने माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालू नये, पण मी सोशल मीडियावर कसलाही पुरावा नसताना वाटेल ते आरोप करून इतर लोकांचे चारित्र्यहनन करेन हे प्रगतीच्या सदरात मोडेल असं वाटत नाही. शासनाने आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात, पण माझ्याकडे कर मागू नये. सामाजिक समरसता निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी पण मी माझ्या जातीचा जाज्वल्य अभिमान बाळगेन. संभाजी ब्रिगेडसारखी निखालस द्वेषाचे राजकारण करणारी जातीयवादी टोळी या देशात निर्माण होणे हे आपलेच अपयश आहे. पर्यायाने लोकशाहीचे अपयश आहे. अर्थात लोकशाहीचे स्वातंत्र्य काही चांगल्या माणसांपुरते नसते, ते असल्या नतद्रष्ट मंडळींनाही मिळते. तेव्हा इतक्या वर्षांत आपण काय मिळवले याचा विचार करताना हे अपयशसुद्धा लक्षात घ्यावे. आपण काय मिळवले याचा शोध स्वत:मध्ये प्रथम करावा लागेल. कॉंग्रेसने देशाला बुडवले अथवा नाडले नाही. ठपका ठेवून नामानिराळे होणे केव्हाही सोपे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या या व्यवस्थेने लोकांनीच घालून दिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे पालन केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? लोकशाहीत शासन हा लोकांचा आरसा असतो. तुम्ही सुंदर व्हा, आरशात चित्र सुंदरच दिसेल. नाही तर ऑस्कर वाईल्डने "पिक्चर ऑफ डोरायन ग्रे" मध्ये दाखवले आहे तसेच व्हायचे. वरून सुंदर, तरुण दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात आतून कशी आहे ते पहायचे असेल तर तिचा आत्मा पाहावा. भारतीय लोकशाहीचा डोरायन ग्रे होऊ नये ही सदिच्छा!

No comments:

Post a Comment