गयी भैंस पानी में. इथे महाराष्ट्रात काही लोक "भ्रष्टाचारी लालू
चालेल पण भाजप नको असा स्वच्छ निकाल आहे हा! कसे?" असं म्हणून अत्यानंदाचे
चीत्कार काढीत आहेत. हे म्हणजे गोठ्यातील गाईला पाडा झाला म्हणून रेड्याने
हंबरून आनंद व्यक्त करण्यासारखे आहे. वास्तविक या सर्व वसुबारस प्रकरणात
या रेड्याचा "सहभाग" केवळ माफीचा साक्षीदार असण्यापुरताच.
भारतातील लोकशाही म्हणजे टीव्हीवरील रटाळ मालिकांसारखी होऊ लागली आहे. नवीन सून घरात आली की घरात बांडगुळांसारख्या मूळ धरून बसलेल्या साळकाया माळकाया तिला घराबाहेर काढण्यासाठी कारवाया सुरू करणार. ती एकदाची हाकलली गेली की तिच्या बदल्यात आणलेली साधारणपणे दोन तीन एपिसोड टिकते. मग तिला हाकलून पुन्हा जुनीच ब्याद बरी असं म्हणून परत आणण्याचं कारस्थान सुरू. कॉंग्रेस ही या घरातील बुआ. नव्वदीला पोचूनही ठणठणीत. सून कुठलीही येवो अथवा जावो, ही लाल आलवणातील बया घराच्या पाचवीला पुजलेली. हिला कुणाबद्दलही प्रेम अथवा माया नाही. हे सगळं करण्यात काय मिळतं या प्रश्नाला उत्तर फक्त एकच. ते नानाच्या "माफीचा साक्षीदार" मधल्या त्या उत्तरासारखं - "आनंद!". घरातले लोकही "बुआ, अगर आप न होती तो इस खानदान का पता नही क्या हो जाता. " असं म्हणून तिच्या पाया पडतात. त्यांना आशीर्वाद देताना या बुआच्या डोक्यात मात्र नवीन सुनेकडून "घरकी चाबियां" आपल्याकडे कशा येतील हा विचार. आणि हे सगळं चालवणारे आपण प्रेक्षक. शिव्या देतो, पण नकळत टीआरपी वाढवत बसतो.
एक नक्की आहे, समस्या राजकीय पक्ष नाही. जनता स्वत:च आहे. आपण सुधारायचं नाही, आपण भ्रष्टाचार सोडायचा नाही. स्थानिक पातळीवर जो कुणी तुमचं अवैध काम करायला आशीर्वाद देणार, रांगेत उभं न राहता आतल्या बाजूने काम करून देणार, गुन्हा केल्यावर फोन केल्यावर चौकीत येऊन इन्स्पेक्टरला दम देऊन तुम्हाला किंवा तुमच्या माजलेल्या पोराला सोडवणार त्याला तुम्ही मत देणार. कारण तुम्हाला स्वत:लाच शॉर्टकट मारायची सवय झाली आहे. माझं काम झालं की झालं, बाकीचे मरेनात का तिकडे ही पराकोटीची स्वार्थी वृत्ती आपल्यात आहे. मग असे हे लोक सत्तेत आले की तुमची ही कामं करत स्वत:च्या तुंबड्या भरणार. तो पैसा तुमच्याच खिशातून नकळत जाणार. कॉंग्रेसने आजवर हेच करत सत्ता टिकवली. लोकांना कॉंग्रेसबद्दल प्रेम त्यांनी लोकोपयोगी कामं केली म्हणून नाही तर ही वर सांगितलेली तुमची स्वत:ची कामं केली म्हणून आहे, हे सत्य आहे. कॉंग्रेसने खरोखर लोकोपयोगी कामे करून दाखवावीत, प्रथम गुंडांचा, हातभट्टीवाल्यांचा, सट्टेबाजांचा, गुन्हेगारांचा पाठिंबा, पर्यायाने पैसा निघून जाईल. जे लोक गुन्हेगार आहेत, केवळ तेच याला याला जबाबदार आहेत असं नाही. बाकीचे पांढरपेशे लोकही तितकेच जबाबदार आहेत. कारण हे लोक मसीहा शोधत बसतात. कुणी तरी कनवाळू येईल, आपली सगळी दु:खे (म्हणजे काय ते त्यांनाही माहीत नसते) दूर करील, भ्रष्टाचार नष्ट करील, झुमरी तलैय्याचं एकदम न्यूयॉर्क करून टाकेल, चकचकीत रस्ते, वातानुकूलित घरे कार्यालये, एकदम कसा भारताचा इंडिया करून टाकेल, सामाजिक समस्याच नव्हे तर आमच्या सर्व आर्थिक समस्यांची सर्व जबाबदारी सरकार घेईल या असल्या अवास्तव अवाजवी अपेक्षा घेऊन बसलेले असतात. यातूनच केजरीवालचा जन्म झाला. भाबड्या आशेतून असा कुणीतरी सत्तेत येतो. साहजिकच असा कुणी मसीहा नसतो. जो असतो तोही याच मातीत जन्माला आलेला असतो. मग सत्तेत आलेला काही वेगळे करत नाही हे लक्षात आले की मग सुरू, दुसरा आणण्याचे प्रयत्न. नवीन कुणी नसल्यामुळे मग ट्रंकेतून जुनाच एखादा टीशर्ट पुन्हा बाहेर निघतो. पुन्हा तेच चक्र. जोवर तळागाळापर्यंत शिस्त, आत्मसन्मान रुजत नाही तोवर हे चक्र असंच चालू राहणार. आज भाजप, उद्या कॉंग्रेस, परवा आप , पुन्हा कॉंग्रेस, पुन्हा भाजप.
No comments:
Post a Comment