
"वी कान्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - सर्वसामान्य जनता
"वी मस्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - राष्ट्रवादी
"मस्ट वी गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी?" - शिवसेना
"गेट ऑफ वी, मिस्टर मोदी!" - गांधी परिवार
"इनफ! वी मस्ट गेट मिस्टर मोदी!" - कॉंग्रेस
"आय डोंट गेट मिस्टर मोदी…:-(" - पप्पू
अशा मागण्या वाढत चालल्या होत्या. म्हणून मग नमो अॅप बाजारात आले आहे. आता हे अॅप डाऊनलोड करा आणि नुसत्या आपल्या टिचकीसरशी नमो तुमच्या मोबाईलमध्ये अवतरतील. नव्हे, ते नेहमी तुमच्या मोबाईलमध्येच असतील, आणि "केम छो भाय" असं म्हणत स्क्रीनवर येतील आणि स्वत: आपल्याबद्दल माहिती सांगतील. आम्ही त्याचे बेटा व्हर्शन डाऊनलोड करून पहायचे ठरवले. नमनालाच ठेच लागली. अॅप फ्री नव्हते. पाचशे रुपये लागणार होते. मरू द्या म्हणून अॅपस्टोअर क्लोज करायला गेलो तर "वेट! बाय नाऊ अॅण्ड गेट फ्री गेम!" अशी जाहिरात आली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून क्लोज करायला गेलो तर क्लोजच होत नव्हते. आणि फोनचे दुसरे कुठलेही अॅप ओपन होत नव्हते. मग चडफडत शेवटी विकत घेतले. फ्री गेम काय मिळतो आहे बघूया तरी असे म्हणून पाहिले तर "क्लिक हिअर फ़ॉर युअर फ्री गेम" असे बटन आले. तिथे क्लिक केलं तर थेट "आप"ची वेबसाईट ओपन होत होती. तिथे "पंच युअर लेफ्टनंट गवर्नर" असा गेम सुरू होता. फ्रीमध्ये वाटेल तेवढे पंच करा. नंतर निवांत खेळू म्हणून तो बंद करून परत नमो अॅपमध्ये आलो. होमस्क्रीनवर साहजिकच नमोंची साजिरी गोजिरी छबी होती. पण तीच तीच बघून कंटाळा येणार हे ओळखून वेगवेगळ्या छब्या निवडायची सोय होती. चेहरा तोच, फक्त डोक्यावर पगडी वेगळी. पुणेरी, पंजाबी, एक गुजराती "श्रीनाथजी" स्टाईलची, राजस्थानी, काठियावाडी, एक छान मोत्याचा तुरा असलेली राजेशाही, मेक्सिकन सोम्ब्रेरो असे अनेक चॉइसेस होते. संघाची काळी टोपीपण होती. पण ती क्लिक केली तर ती अॅडव्हान्स्ड लेव्हल यूजरसाठी आहे असे कळले. किमान सहा महिने अॅप वापरल्याशिवाय ती लेव्हल अनलॉक होणार नाही असा मेसेज आला. मग मी आसामी किंवा नागालॅंडची दिसणारी टोपी निवडली. तिला हॉर्नबिल, मराठीत ज्याला धनेश म्हणतात त्या पक्षाची अख्खी चोचच होती. हा पक्षी ओरडू लागला म्हणजे जंगलातील सर्व प्राणी स्वत:चे ओरडणे थांबवून स्वस्थ बसतात. नमोंच्या डोक्यावर ही चोच शोभून दिसत होती. छबी अॅनिमेटेड होती! सेट केल्यावर ती चोच उघडून धनेश पक्ष्याची गगनभेदी आरोळी ऐकू आली, पाठोपाठ नमोंच्या छबीने,"मैं प्रधान मंत्री नही हुं, प्रधान सेवक हुं" हे वाक्य तर्जनी माझ्याकडे रोखत एक डोळा मारत म्हटलेले दिसले.
टोपी सिलेक्ट करण्यात जवळजवळ अर्धा तास गेला. तीनशेच्या वर टोप्या असलेली लायब्ररी होती ती! प्रत्येक स्वदेश, परदेश दौऱ्यानंतर लायब्ररी अपडेट होऊन त्यात आणखी टोप्या येतील असे कळले. शिवाय आपला फोटो अपलोड करून आपल्याला हव्या त्या टोपीतील नमोंच्या छबीबरोबर आपला फोटो फोटोशॉप करून देण्याचीही सोय होती. माझ्या दृष्टीने हे अॅप इथेच यशस्वी झाले होते. पाचशे रुपये देताना आपण एवढे काचकूच का करत होतो असे वाटले. मग इतर काय सोयी आहेत ते पाहू लागलो. "इंटरअॅक्ट विथ पीएम" ! वाह! स्वत: नमोंशी बातचीत? घाई घाईने "नमस्कार माननीय प्रधानमंत्री!" असे टाइप केले. लगेच उत्तर आले! "नमश्कार! ये प्रधान सेवक आपकी क्या सेवा कर सकता है?" उगाच एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा वेळ का घालवा, मुद्द्यालाच हात घातला. "सरजी, वो स्विस ब्यांकवाले मान तो गये, आगेका क्रियाकर्म कब होगा?". तर "महोदय, क्रिप्या प्रतीक्षा करें, आप कतार में हैं. प्रतीक्षा का समय लगभग चार घंटे और पैन्तालीस मिनट." असा मेसेज आला. बरोबर आहे. एकटा माणूस तरी किती जणांशी एकाच वेळी बोलेल? सगळेच लेकाचे हाच प्रश्न विचारत असतील. "प्रतीक्षा करते करते प्रधानमंत्रीजीके चुने हुए भाषण सुने" असा मेसेज मिळाला. आणि हो नाहीची वाट न पाहताच तडक नमोंचे एक भाषण लागले. ही म्हणजे पर्वणीच! खजिनाच सापडला म्हणायचा! काय ते अप्रतिम वक्तृत्व, ती ओघवती शैली! विरोधकांच्या मर्मावर वार करून त्यांना भुईसपाट करण्याची ती हातोटी हे तर त्यातून दिसून येत होतेच, पण त्याचबरोबर सर्वसमावेशक राजकारण करण्याचे वचन देऊन, कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचे आरोप सहन करून करून थकल्या भागलेल्यांना सामावून घेण्याची त्यांची दिलदार वृत्तीही दिसून येत होती. एकापेक्षा एक सरस अशी ती भाषणे ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळले नाही. जाग आली तेव्हा फोनची बॅटरी मृत्यूपंथाला लागली होती. तरी चटकन आपल्या त्या विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं ते पाहावं म्हणून परत "इंटरअॅक्ट" मध्ये घुसलो तर स्क्रीन ब्ल्यांक झाला होता. नो इंटरनेट कनेक्शन म्हणे. पाच सहा तासात या अॅपने माझा ५ गिगाबाईटचा डेटा फस्त केला होता. पण पर्वा नाही. पुन्हा विकत घेतला डेटा पॅक. आपण भाषणं काय चुकवणार नाही बुवा.
No comments:
Post a Comment