Monday, June 9, 2014

कारागृह वासरी - मेकओव्हर एडिशन

पूर्वी अधूनमधून वासरी लिहायला वेळ मिळत होता. आता वेळ असूनही वेळ मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती झाली आहे. भल्या सकाळी गजांवर काठी आपटल्याच्या आवाजाने दचकून जाग येते. पूर्वी झोप लागत नसे. माझा पार्श्वभाग हा जणू काही त्यांना आंदणच दिला आहे अशा थाटात ढेकूण त्यावर रात्रभर राज्य करतात. आता इतक्या वेळा चावून चावून तो बधिर झाला आहे. निवडणुका, प्रचार वगैरे नको त्या उचापती आता संपल्या त्यामुळे तोही मनस्ताप नाही. त्यामुळे आता बिनदिक्कत झोपतो. नाही म्हणायला हे यादव, मनीष वगैरे उगाच पत्रं पाठवून माझ्या मागे नसता भुंगा लावतात. तुरुंगातील हे बदमाष अधिकारी सुरक्षेच्या नावाखाली ती पत्रे फोडतात आणि त्यांचे सार्वजनिक वाचन करतात. मी तक्रार केली तर म्हणतात, आम्ही तुरुंगातील अधिकारी असलो म्हणून काय झालो, माणसंच ना शेवटी? आम्हालाही जर खळखळून हसावंसं वाटलं तर त्यात काय चुकलं? बाकी तिहारमध्ये आलो ते बरंच झालं. सकाळी १० ला जेवण झालं की वेळच वेळ. मागे वळून पाहिलं तर आता असं वाटतं की चारशेतीस उमेदवारांतील चार विजयी होणे हे केवळ एकोणीस महिने वयाच्या पक्षाचे लक्षणीय यश आहे. तुका म्हणे त्यातल्या त्यात!

तुका म्हणे त्यातल्या त्यात
राहीन समाधानात।
जालिया डिपॉझिट जप्त
फिटतसे सर्व चिंता ।।

जनहो असो दयावे ध्यानी
जर येता 'आप' अग्रस्थानी ।
काय वर्णावे मग सभास्थान
जैसे मर्कट नाचती।।

यांपरी जे झाले ते उत्तम
कमलदल फुलले नष्ट हा तम ।
नाहीतरी निवडिता आमचे येरू 
अचाट उजेड पाडिती।।

आता बैसोनि एकाग्रचित्ती
ध्यान लाविती शीघ्रगती ।
जन म्हणती निद्रा करिती
बोलती वृथा धरणी भार ।।

अशाच काही अभंग लिखाणात उत्तम वेळ जातो. त्याने स्फूर्तीपण मिळते आहे. नव्या जोमाने काम करण्यास बळ मिळण्यासाठी तुरुंगासारखी जागा नाही हे स्वानुभवाने सांगतो. बायकोची भुणभुण नाही, पत्रकारांची खरखर नाही, सगळ्यात मुख्य म्हणजे आमच्याच येरुंची कटकट नाही. तसे भेटायला येतात, मग त्यांना डोकं दुखतं आहे असं सांगून परस्परच त्यांची बोळवण करतो. माझा ब्लॅकबेरी 'आत' येतानाच बाहेर 'जमा' करावा लागला, त्यामुळे ईमेलचीसुध्दा कटकट नाही. शांतपणे पुढील मुद्दे लिहून त्यावर नोट्स काढल्या आहेत.

  • पक्षाला मेकओव्हर देणे - आयला! आधी कसं सुचलं नाही हे? मागे एकदा आमचं कलत्र मेकओव्हर करून आलं होतं तेव्हा अख्खी चाळ ग्यालरीत येऊन त्या ध्यानाचे दर्शन घेऊन गेली. मी सुध्दा हॅ:हॅ: करत तिच्या समोर गेलो होतो आणि मग अचानक ओळखून पुन्हा पेपरमध्ये डोकं घातलं होतं. काही म्हणा गर्दी गोळा करतो हा मेकओव्हर. शंका-एकोणीस महिन्याच्या बाळाला मेकओव्हरची गरज पडावी हे बरे लक्षण आहे? काही झालं तरी मी लिपस्टिक लावणार नाही. यावेळी आता दुसऱ्या कुणीतरी व्हा बकरा. मागे स्वत:हून तयार झालो आणि आयत्या वेळी मुस्काटात खायची आहे असे सांगण्यात आले. नाही म्हणायलाही वेळ मिळाला नव्हता.
  • पक्षाचा पाया विस्तारणे - कुणी तरी एकदा हे बैठकीत म्हणाले होते. मी कुणालातरी हे लिहून घ्या असे म्हणालोसुध्दा होतो. त्यावरी आणखी कुणीतरी सत्ता मिळाल्यावर हे सावकाश करता येईल असे म्हणाले होते. नेमका तेव्हा माझ्यावर टीव्ही क्यामेरा. क्यामेरा दिसला की माझे देहभान हरपते. कसला देखणा दिसतो मी. उजवीकडून क्यामेरा असेल तर फारच उत्तम. डाव्या बाजूने घेऊ नका असे पुढील वेळी सांगायला हवे. स्कार्फ आता वापरू नये का? फेसबुकवर विचारले पाहिजे. पाहा! हे अस्से होते. तेव्हा पाया विस्तारणे महत्वाचे. हे कोण म्हणाले होते याचा शोध घेऊन अर्थ विचारला पाहिजे. किती शिमिट, लोखंड लागेल काय माहीत. हे कंस्ट्रक्शन वाले काय तोंडाला येईल तो रेट सांगतात. 
  • वीज दरवाढ प्रकरणी सरकारला घेरणे - घेराव, धरणे इत्यादि आपली कोअर स्ट्रेंग्थ आहे. फक्त एक अडचण आहे - दोनशे ब्याऐशी लोकांना चार जणांनी घेरणे जरा कठीण जाईल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? दोरखंड वापरावा काय? आपला इतिहास पाहता आयत्या वेळी चारातील एकाने दोर सोडून देण्याची शक्यता जास्त वाटते. तसे झाल्यास इतर तिघे पाय वर करून मागे पडतील. पडण्याची सवय आहे, पण पडलेले लोक लगेच पक्ष सोडून जाण्याच्या धमक्या देतात.
  • पक्षाची ध्येयधोरणे, आदर्शवाद जनतेला पटवून देणे - जरा धाडसी विचार आहे. आम्ही वाटलेली ध्येयधोरणाची पत्रकं लोकांनी कुठे कुठे टाकलीत म्हणून सांगू. चारशेतीसपैकी चारशेसव्वीस ठिकाणी एकाच महिन्यात पुन्हा जाऊन हे सांगणे म्हणजे…जो कुणी पत्रापत्री करून कटकट करतो आहे त्यालाच ही जबाबदारी द्यावी. सुंठीवाचून खोकला गेला…
  • एम्प्लॉयी सॅटिसफॅक्शन - उमेदवारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सहलींचे (शक्यतो जवळपास) आयोजन करणे. जे अजून सावरलेले नाहीत त्यांच्यासाठी खास मानसोपचार  समुपदेशन आयोजित करणे. शुक्रवार "आम टोपी फ्री दिवस" जाहीर करणे. महिन्याच्या दर तिसऱ्या शुक्रवारी बटाटेवडे (सोमनाथपासून हे लपवले पाहिजे) जाहीर करणे.
    TBD - बोनसचे आश्वासन देणे. (नक्की काय परिस्थिती आहे हे मनीषला विचारले पाहिजे. माझा बेल भरायच्या वेळी पैसे नाहीत असे सांगत होता.)
मुद्दे तर लिहून झाले. आता फक्त हे कुणाला पाठवावेत ते कळत नाही. याला पाठवले तर तो नाराज, त्याला पाठवले तर हा नाराज. उरलेले सर्व डब्याच्या दारात उभे. एक पाय आत एक बाहेर. शिवाय हे जेलवाले पत्र फोडून  वाचणार आणि हसत गडाबडा लोळणार. काल कैदी नंबर ११३० शी बोलता बोलता तो म्हणाला होता "साब, कूच अपने लिये काम हो तो बताओ. खाने का पीने का आरामसे रेहने का. आपुन का कनेक्शन है. मंगता है तो इदर टीव्ही लाकेभी देगा." लय पावरबाज दिसतो. कुणाला तरी काल सांगत होता,"अभी आम का सीझन खतम हो गया." मी दचकून त्याला विचारले,"तुमको कैसा मालूम?" तर म्हणाला,"बस क्या साब, जून म्हैना चालू हो गया. अब आम किधर मिलेगा?" हात्तीच्या, आंबे होय? मी नि:श्वास सोडला. त्यालाच विचारतो पत्र पाठवायचा काही जुगाड होतो का बघ म्हणून.

No comments:

Post a Comment