Monday, June 23, 2014

बहुजन हिताय बहुजन सुखाय

आम्ही कित्येक दिवस कानीकपाळी ओरडून सांगत होतो ते आता प्रत्यक्षात येणार! एअर इंडियाचा स्वत:वर खूष असणारा म्हाराजा जाऊन आता आपला अस्सल कॉमन मॅन विमानात कांबळं टाकून बसलेला दिसणार. है शाब्बास! आपला जन्म येष्टीच्या लाल पिवळ्या डब्यातून प्रवास करण्यात गेला. येष्टीतून प्रवास करण्याची जी मज्जा आहे ती कशातच नाही. ष्ट्यांडावर गेल्यावर कसं घरच्यासारखं वाटतं. ऊन रणरणत असते. माशा घोंगावत असतात. कधी चाळीस पन्नास साली लावलेले पंखे स्वत:भोवती फिरून इकडची गरम हवा तिकडे करत असतात. घामाच्या धारा लागलेल्या असतात. कुठल्या तरी गावाकडं जाणारी बस कुठल्या तरी फलाटावर लागलेली आहे याची घोषणा अगम्य ठिकाणी लावलेल्या कर्ण्यातून चालू असते. वास्तविक त्या घोषणेने कुठल्याही बहुजनाचे हित होत नाही आणि सुख तर मुळीच होत नाही. पण बहुजन हिताय बहुजन सुखाय ठणाणा चालू असतो. गावकल्डं आलेली मान्सं शिमिटाच्या किंवा लाकडाच्या बाकावर मंडळी कशी छान पसरून ऐसपैस पसरलेली असतात. कुणाची कानकोरणीनं समाधी लागलेली असते, कुणी निस्ताच शून्यात नजर लावून बसलेला असतो. बायामान्सं डुईवरनं पदर घ्येऊन बसल्याली आसतात. ओळखीतली गडीमानसं चंच्या सोडून बसलेली असतात. च्या बायली, येष्टी कुठं पळून जाती का मर्दा, बस जरा निवांत. आन तंबाखू काड वाईच. आरं हिरीचा पंप बंद पडल्याला हाय. ह्ये आत्ता मोटर वांयंडिंग करून घ्येऊन चाललोय मर्दा, सांजच्याला पाणी सुटलं पाह्यजे शिवारात. म्हातारं लय कावलंय. आसं कायबाय बोलत असतात. आणि मग बस आली की मग जे काही हर हर महादेव होते त्याची तुलना हातघाईच्या लढाईशीच होऊ शकते. जे काही हातात मिळेल ते शस्त्र घेऊन मंडळी गाडीवर तुटून पडतात. रुमाल, वर्तमानपत्र, टोपी, छत्री, पिशवी (रिकामी अथवा भरलेली) ही ती मान्यताप्राप्त शस्त्रे. ही शस्त्रे बसच्या खिडकीतून आत टाकली की त्या शीटचा सातबाराचा उतारा मग आपल्याच नावे झाला असे समजायचे. एकदा तर एका भाद्दराने आपल्या पोराला "संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून" आत टाकलेले मी पाहिले होते. नंतर त्या कार्ट्याच्या करामती पाहून संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून संकट आतपण येते याची खात्री पटली होती. मग आत गेल्यावर किरकोळ हमरीतुमरी करून जागा ताब्यात घ्यायची आणि आजूबाजूच्या शिटावरपण पिशव्या ब्यागा टाकून चतु:सीमा सुरक्षित करायच्या. मग कंडक्टर बोटीच्या क्याप्टनच्या रुबाबात येणार, बस कुठे जाते ते सांगण्याऐवजी कुठे जात नाही ते सांगणार. ते सांगितल्यावर एक दोन जण धडपडत उतरणारे असतातच. बस थांबणार नाही हे ऐकूनही मुर्दाडपणे बसून राहणारेही एकदोघे असतात. मग? दोन मिन्टं थांबत न्हाय व्हय? हे आशी थांबतीय न थांबतीय तोवर आम्ही उतरतोय बघा, हे वर कंडक्टरला सांगणार. हे सांगणारे कंडक्टरच्याच राखीव सीटवर बसलेले असणार. तिथून हाकललं की निवांत ड्रायवरच्या केबिनमध्ये जाऊन बसणार. एकूण छान सगळी लोकशाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकउपक्रम म्हणजे यष्टी म्हामंडळ. सर्वांना समानतेने वागवणारी संस्था. यष्टीच्या डब्यात फर्स्ट किलास नाही आणि थर्ड किलास नाही. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अडाणी, सुशिक्षित सगळे एकाच अधिकाराने "यष्टी काय तुझ्या बापाची व्हय रं" असे एकमेकाला म्हणू शकतात. अशी राष्ट्रीय एकात्मता आणि समानता जोपासणारा हा उपक्रम जरा उपेक्षितच राहिला आहे याची आम्हाला खंत वाटते.

म्हणूनच आम्ही सांगत आलो, उपक्रमांचे राष्ट्रीयीकरण करू नका, त्यांचे यष्टीकरण करा. विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण झाले, त्यावर म्हाराजा आला आणि तिथे घोडे अडले. आता विमानावरच महाराजा म्हटल्यावर गरिबांनी कुटं जायाचं हो? सोता म्हाराज विमानात तर पर्जा जिमिनीवर आलीच. म्हाराजांच्या समोर आन गाढवाच्या मागं हुबं ऱ्हायचं नाही हे जन्तेला ठाऊक आहे. सगळ्या सोई म्हाराजांच्या सवयीपरमाणं. कशी काय परजा प्रवास करणार? जन्तेच्या सवयींप्रमाणं सोयी नकोत? जरा विमानाला उशीर हाय, वाईच तंबाखू खावी म्हटलं तर पिंक कुठं मारायची? विमान कुठल्या फलाटाला लागलं तेबी दिसत न्हाई. टीव्हीच्या श्क्रीनवर आमचा दोन यत्ता शिकलेला म्हादबा वाचणार काय आन कसा? यासफ्यास करत घोषणा दिलेल्या काय उपेगाच्या? म्हणून आमचा आग्रह होता, विमान कंपन्यांना समाजाभिमुख करा. त्यांना वास्तवतेच्या जवळ आणा. अच्छे दिन येतील तेव्हा येवोत, पण सच्चे दिन तरी आणा. आन आमची मागणी येकदम मान्यच झाली. आता येकदम राष्ट्रीय एकात्मताच एकात्मता. आजीर्ण होईपर्यंत. कुणीपण पन्नास पैशाचं रिझर्वेशन करावं आन विमानात शिट पकडावी. आम्ही तर म्हणतो एअर इंडिया यष्टी म्हामंडळाच्या ताब्यात चालवायला दयावी. मंडळानं पुढील सुधारणा आणि नियम केले की मग भार्ताचं नं  द  न  व  न!
  • गाव तेथे विमानतळ 
  • वस्ती तेथे थांबा  (वाट पाहीन, पण म्हामंडळाच्या विमानानंच जाईन)
  • विनाथांबा सेवा (हात दाखवा विमान थांबवा योजनेवर विचार चालू आहे. काही अपरिहार्य तांत्रिक अडचणींमुळे अद्याप ही सेवा सुरू करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व)
  • १२ वर्षांखाली मुलांस अर्धे तिकीट (शाळेचा दाखला अनिवार्य)
  • विनातिकीट प्रवाशास दंड आणि/अथवा लगेच खाली उतरवण्यात येईल (यावर तांत्रिक अभ्यास चालू आहे)
  • महिना पास योजना 
  • क्षमता - ५० बसलेले प्रवासी, १२ उभे प्रवासी
  • विमान चालू असताना खिडकी उघडून थुंकू नये, हात बाहेर काढू नये
  • विमान चालू असताना पायलटशी बोलू नये
  • ३० किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान टपावर अथवा विमानाखाली टाकावे
  • विमानात धूम्रपानास सक्त मनाई आहे
  • दुरुस्तीसाठी विमान आगारात गेल्यास प्रवाशांनी विमानतळावर थांबणेचे आहे
  • क्रू चेन असल्यास बदली पायलट येईपर्यंत विमान सुटणार नाही. वारंवार चौकशी करू नये. 
आता भारतातल्या सगळ्या म्हाराजांनी कुटं जावं या चिंतेत आम्ही आहोत. कॉंमन मॅन विमानातनं फिरायला लागल्यावर यष्टी आमची मोकळीच फिरणार की हो. सगळ्या म्हाराज लोकांनी यष्टीचा पास काढावा हे बरं!

No comments:

Post a Comment