Wednesday, June 25, 2014

डोहाळे

गेले एक महिनाभर अस्वस्थ आहोत. कशाने असे होत आहे हे समजत नव्हते. कधी हसावेसे वाटायचे, कधी अशक्य चिडचिड व्हायची, कधी नुसतेच सौधात बसून आकाशात नजर लावून बसायचे. काही दिवसांपूर्वी धनाजी मुजऱ्याला आला तर त्याच्यावर विनाकारण खेकसलो. अचानक आयुष्यात कधी खाव्याशा न वाटलेल्या गोष्टी खाव्याशा वाटू लागल्या आहेत. आंबटचिंबट वस्तूंपासून आम्ही नेहेमीच दूर राहत आलो आहोत. नाही म्हणायला हिंग लावलेले ताक आम्हांस आवडते, परंतु ते पाचक म्हणून. आम्लपित्ताचा त्रास होऊ नये म्हणून आणि पोटात थंडोसा राहावा म्हणून. मातोश्री आम्हांस नेहमी सांगत, शंभूराजे, आपला स्वभाव कोपिष्ट, रागीष्ट आणि प्रकृती तोळामासा. तुम्ही मेंदू आणि पोट दोन्ही शांत ठेवावयास हवे. मेंदूवर औषध नाही, पण पोटावर आहे हो. एवढे ताक पीत जा दररोज. तर मुद्दा हा की ताक सोडले तर आम्हांस आंबट काही आवडत नाही. पण अचानक दात शिवशिवू लागले. गाभुळलेली चिंच पाहून तोंडात पाणी सुटले अन कानशिलात कळा येऊ लागल्या. पूर्वी कधी चिंच खावीशी वाटली नव्हती. नाही म्हणायला लहानपणी वात्रटपणा करायला ती वापरली होती. लग्नात सनईचौघडा सुरू झाला की आम्ही सनईवाल्यासमोर छान गाभूळलेली चिंच चोखत उभे राहायचो. सनईतून फुर्रफुर्र सुरू झाले की धूम ठोकायची. त्यावरून मातोश्रींनी एकदा आम्हांला बदडलेपण होते. कुणी डोक्यावरून कैऱ्यांची पाटी घेऊन आला तर छानपैकी तिखटमीठ लावून कैरी खावीशी वाटू लागली. तडक मुदपाकात वर्दी देऊन आलो, आजच्या भोजनात करमठलं हवं. कधीकधी उगाचच रडू येऊ लागले. तू असाच रड्या असे इंद्रवदन राजे आम्हाला हिणवत असतातच, ते आठवून आणखीच खिन्न वाटू लागले. आमच्या दालनात आम्ही महाराष्ट्राचा गोंडस फोटो लावला आहे. म्हाराष्ट्राचा चेहरा म्हटलं म्हंजे आमच्या डोळ्यासमोर येकदम बाळबोध छबी उभी राहते. निरागस मूलच जणू. आईने छान आंघोळ घालून, भांग पाडून, पावडर लावून शाळेसाठी तयार केलं आहे. अर्धी चड्डी, त्यात खोचलेला धुवट स्वच्छ सदरा. दृष्ट लागेल हो, असं म्हणून आज्जीने गालावर काजळाचा एक ठिपका लावायला सांगितला आहे. या बाळाची नजर खटयाळ आणि चौकसपणे सर्वत्र भिरभिरत आहे. या चिमुकल्या मेंदूत किती ज्ञान सामावून घ्यावं आणि किती नको असं त्याला झालं आहे. हे असं छान चित्र असताना त्यावर एकदम फराटा ओढल्यासारखं त्या गोंडस बाळाचा चेहरा बदलूनच टाकायला हवा असे वाटू लागले. त्या गोंडस चेहऱ्यावर दाढीमिशा काढाव्यात असे वाटू लागले. प्रयत्न करून तो विचार आम्ही दाबून ठेवला आहे. महिन्याभरापूर्वी उत्तम मार्कांनी परीक्षा पास झालो. त्याबद्दल छान नाचूनही झाले. पण अचानक कॉपी करून पास झाल्याची भावना झाली. आम्ही मुळीच कॉपी केली नसताना हे असं का वाटावं बरं? कॉलेज जीवनातही आमचं असंच व्हायचं. परीक्षेत कठीण प्रश्नांना विषयाला साधारण स्पर्श करेल पण ठोस असे काही नाही या प्रकारची उत्तरे आम्ही देत असू आणि रिझल्ट लागेपर्यंत रोज मारुतीच्या देवळात हजेरी लावत असू. मातोश्री विचारायच्या, काय राजे, पेपर कसे गेले? त्यावर खालच्या आवाजात ज्या दारातून आले त्याच दारातून परत गेले असे वास्तवपूर्ण उत्तर देण्याऐवजी "चांगले गेले" असे दिले जायचे. त्या माऊलीचा आमच्यापेक्षा देवादिकांवर जास्त विश्वास असल्यामुळे मान हलवत ती आमच्या नावाने आणखी एखादे व्रतवैकल्य, नवस बोलायला निघून जात असे. एकदा तर एका पेपरमध्ये जितक्या मार्कांचे प्रश्न सोडवले होते त्यापेक्षा पाच मार्क जास्तच पडले! पंचांगात घबाडयोग वगैरे योग असतात ते हेच असावेत काय? तसंच आत्ताच्या परीक्षेतही झालं असावं असं वाटू लागलं आणि जास्तच नैराश्य आलं. रात्रीअपरात्री छातीवर कुणीतरी "अवजड" ओझं टाकलं आहे आणि आम्ही ते आरामात पेलतो आहोत असं वाटत असतानाच अचानक ते अंगावर पडून आम्ही चेंगरलो गेलो आहोत असं वाटून अचानक जाग येते. घाम सुटलेला असतो. पण मग एकदम काहीतरी खावेसे वाटू लागते. काल हळू पावलांनी मुदपाकात गेलो तर आमच्याच रक्षकाने "कोण आहे रे तिकडे!" असे जरबेने आम्हालाच दरडावले. मग मुकाट्याने परत येऊन मंचकावर पडलो. धनाजी डॉंक्टरांना दाखवा म्हणू लागला आहे.

काल सदरेवर बसून चिंतन करत होतो. आमच्यापुढील वाढलेल्या जबाबदाऱ्या, समस्या इत्यादि गोष्टींवर विचार करत असताना डुलकी लागली असावी. महाराष्ट्राचा चेहरा दिसू लागला. नुकतेच जावळ काढले आहे. पण काळ्याभोर केसांचा पट्टा जाऊन तिथे मुंबईनगरीत आडवेतिडवे उड्डाणपूल बांधावेत तसे डिझाईन राहिले आहे. काही पट्टे तर अर्धवटच सोडले होते. च्यायला हे काय जावळ आहे? असे संतापाने आम्ही म्हणणार एवढयात आमचा जयजयकार कानी पडला. आमच्या जयजयकाराने आम्ही नेहमीच सुखावतो. महाराष्ट्राचा चेहराबिहिरा गायब होऊन एकदम आमचे सैनिक दिसू लागले. "शंभूराजेंचा विजय असो! तुम्हीच आमचे राजे! महाराष्ट्राचे राजे!" असा उद्घोष ऐकून मन सुखावले. कसचे कसचे असे म्हणत त्यांस म्हणालो,"महाराष्ट्राचे राजे व्हायचे नंतर बघू. त्यासाठी प्रथम राज्य जिंकणे आवश्यक आहे. किल्ल्यावर झेंडा फडकावण्याआधीच त्यातील महालांची वाटणी नको. शत्रूपक्षाचे लोक आमची थट्टा करतात. त्यांना आमचे असे सांगणे आहे की दिल्लीच्या लढाईत तुमची सुरवार पृष्ठभागी उसवली आहे ती आधी शिवून घ्या. आमच्या सुरवारीची चिंता करू नका. आम्ही आमची सुरवार इलॅस्टिकची बनवून घेतली आहे. माझे स्वप्न आहे - माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र! सैनिकहो, नीट लक्ष देऊन ऐका, मी भ ग वा असे म्हणालो आहे. तुम्ही तुमच्या नेहेमीच्या बोलीभाषेतील सवयीचा शब्द वापराल आणि माझी पंचाईत कराल." सैनिकांनी जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. आमच्या चेहऱ्यावर सुखावून मंद हास्य पसरले.

तेवढ्यात कुणीतरी आमचा खांदा हलवून या गोड स्वप्नातून बाहेर आणले. तर समोर धनाजी! संतापून त्यांस म्हणालो,"छान स्वप्न पाहत होतो तर आलास त्याचा भंग करावयास! काय आणले आहेस आता?"
धनाजी म्हणाला,"राजे, आपण झोपेत रडता, हसता, ओरडता. आत्तासुद्धा स्मित हास्य करत काही तरी असंबद्ध बोलत होता. मला चिंता वाटली म्हणून जागे केले. क्षमा असावी. शिवाय डॉक्टरांचा रिपोर्ट आला आहे."
"असं? काय म्हणताहेत?" - आम्ही.
धनाजी हसून म्हणाला,"चिंतेचे कारण नाही असं म्हणतायत. या अवस्थेत असं होतंच म्हणे. आता माझ्यापण लक्षात आलं. आमची कारभारीण पोटुशी होती तेव्हा असंच करायची. एकदा तर मध्यरात्रीला भेळ आणायला हाकललं होतं मला."
आम्ही म्हणालो,"अरे काय फालतू बडबडतो आहेस धनाजी? कसली अवस्था?"
तर धनाजी म्हणाला,"राजे, गोड बातमी आहे! हे डोहाळे आहेत राजे! आपण नक्की महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजे होणार…असं…"
आम्ही गळ्यातील हार काढून त्याच्या दिशेने फेकला! "धनाजी! दिल खूष करून टाकलंस!"
धनाजी खाली मान घालून हार परत करत म्हणाला,"राजे, थांबा. मी म्हणत होतो, आपण नक्की महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजे होणार…असं आपल्याला वाटतं, त्याचे हे डोहाळे लागताहेत. झालात तर थांबतीलच, न झालात तरी थांबतील, औषधाची गरज नाही असं डॉंक्टरांचं म्हणणं आहे…"

No comments:

Post a Comment