Monday, June 2, 2014

राजगडाला जेव्हा जाग येते

काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही।।

इंद्रवदन सरकार तल्लीन होऊन गात होते. त्यांचा स्वामिनिष्ठ रसिक श्रोता छोटू कसनुसा चेहरा करत श्रवणभक्ती करीत होता. गेल्या काही आठवड्यातील घडामोडींनंतर जड अंत:करणाने काळापहाडने काही काळ भूमीगत व्हावे असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांचे आवडते कातडी काळे जाकीट, विजार आणि काळा चष्मा त्यांनी तळघरातील गुप्त फडताळात ठेवून दिले होते. प्रजेला कळवळून हाक दिल्याशिवाय तिला आपला कळवळा कसा कळणार असे कळकळीचे उद्गार नकळत त्यांच्या तोंडून निघून गेले. छोटूने चमकून त्यांच्याकडे पाहिले. होय, छोटू, आता गुप्तहेरगिरी बंद. काळा चष्मा लावल्याने आपण अदृश्य होतो असे केवळ वाटते पण प्रजेला आपण लख्ख दिसत असतो. गुप्तहेरगिरी करण्यासाठी काळ्या चष्म्याची गरज नाही, तर फक्त पांढऱ्या कपड्यांची आहे. हे ब्रह्मज्ञान सरकार आपल्यास का सांगत आहेत असे छोटूला वाटून गेले. गेले सहा महिने आपण हेच तर ओरडून सांगत आलो. प्रथम फोनची वाट बघणे झाले. मग खोटंच आपल्याला काळापहाड म्हणून फोन करायला लावणे झाले, मग पुढे रात्री हळूच जाऊन भिंतीला कान लावून काही ऐकू येते का पाहणे झाले. शंभूराजे रोज प्रात:काळी उठून प्रथम सौधात येतात म्हणून त्या सौधाच्या अगदी समोर मोठ्ठ्या बोर्डावर ,"मला आपल्याशी काही बोलायचंय" असे लिहून झाले. त्या बोर्डाला स्पॉन्सर मिळवताना आपले नाकीनऊ आले. शेवटी शंभूराजांनीच त्याचे पैसे दिले होते असं जर मी त्यांना सांगितलं तर सरकार त्याच बोर्डावर मला लटकावतील.

"आम्ही गेले काही दिवस खूप विचार करीत होतो." सरकार पुढे बोलू लागले. ते ऐकून छोटू जरासा चरकला आणि सावरून बसला. सरकारांनी फार विचार करणे हे गंभीर प्रकरण होते. "पूर्ण विचारांती आम्ही असे ठरवले आहे की, ते काही नाही, एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती स्वत:च करावी, दुसऱ्यावर विसंबू नये. प्रजेच्या हितासाठी आम्हांला मोहिमेचे नेतृत्व स्वत:च करावे लागेल. आम्हांला खात्री आहे की प्रजेला आमच्या नेतृत्वाची गरज आहे. चाणाक्ष बुद्धी, अमोघ वक्तृत्व, एखाद्या नटाला लाजवेल अशी छबी, संवादफेक आणि खरोखर लाजवेल अशी अभिनयकला हे सर्व आमच्यात ठासून भरले आहे. राजा, सेनापती, प्रधान, शिलेदार, पायदळ, घोडदळ या सर्व भूमिका आम्हीच करणार! गाफील शत्रुच्या गोटात आम्ही मुसंडी मारून जय भवानी करणार! आजपासून कामाला लागा. सर्वात प्रथम आपल्या सैन्यात चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हा छोटू, तू ताबडतोब आपल्या सैन्याला पाचारण कर."

छोटू चुळबुळत म्हणाला,"सरकार, त्या दुष्ट महानगर टेलिफोन निगमने आपला फोन कट केल्यापासून सैन्याशी संपर्क तुटला आहे. बरेचसे सैनिक शंभूराजांच्या आश्रयाला गेले आहेत. त्यात देणेकरी चुकवण्यासाठी 'इंद्रवदन सरकार आता येथे वास्तव्य करीत नाहीत' असा बोर्ड आपणच खाली लावल्यामुळे उरलेले निष्ठावंत सैनिक भेटायला येऊन खालच्याखाली परत जातात. आणि सरकार, आपण चैतन्य निर्माण करण्याचे म्हणालात, ते जरा खर्चिक होईल. आपण खास निवडून घेतलेले हे शेलके सैनिक आहेत सरकार. किमान दोन क्वाटरी पोटात गेल्याशिवाय त्यांच्यात पाहिजे तेवढे चैतन्य येत नाही. रिकाम्या पोटी सैन्य चालत नाही. असे उपाशीपोटी सैनिक नीट घोषणा देत नाहीत. 'इंद्रवदन सरकारांचा!' अशी आरोळी दिली तर काही जय म्हणतात, काही विजय असो म्हणतात. बरं दिसत नाही ते. ट्रक भरून आणलेले सैन्य वाटते. मग बारामती संस्थान आणि आपल्यात काय फरक? " इंद्रवदन सरकार विचारमग्न झाले. "छोटू, तू म्हणतोस ते खरे आहे. एक काळ असा होता की आमचे शिलेदार चैतन्याने भारून आम्ही ज्या दिशेला बोट करू त्या दिशेने दौडत असत. आज आपला सैनिक एका क्वार्टरला महाग झाला आहे. हे आम्ही आमचे अपयश समजतो. परंतु, हे सर्व आम्ही बदलू. चांगले दिवस नक्की येणार आहेत. आम्ही आमचे राज्य विस्तारणार आहोत. आमच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळणार आहे." छोटू हळूच म्हणाला,"राजे, अश्वमेध यज्ञ चराचर जिंकल्यानंतर करतात बहुधा." इंद्रवदन सरकार खवळून म्हणाले,"छोट्या! असा आमचा तेजोभंग करू नकोस! भावनेच्या भरात आणि टाळीच्या ओघात मराठी नट हा अशी एखादी अॅडिशन घेत असतो. हां, तर काही करून आपले सैन्य माघारी आण. क्वाटरचं जुगाड आपण करू काही तरी. असं कर, तो जो आम्ही बोर्ड लिहून घेतला शंभूमहाराजांसाठी, तोच उचलून आण आणि इथे आपल्या वाडयासमोर लाव. मघाशी आम्ही जे गाणे गात होतो ते गाणे आम्ही सैन्याला आवाहन म्हणून गाणार आहोत." छोटू ठीक आहे असे म्हणून निघाला. तेवढयात पुन्हा सरकार म्हणाले,"थांब छोटू, मला असं वाटतं, नुसतं 'मला आपल्याशी काही बोलायचं आहे' एवढं चालणार नाही. तेव्हा त्या वाक्याआधी ,"जरा थांबा हो!' असे भावनिक आवाहनाचे शब्द टाक. शिवाय खाली तळटीप टाक. म्हणावं, ता.क. - चकण्यासहित रिफ्रेशमेंटची सोय आहे."

No comments:

Post a Comment