Sunday, June 8, 2014

स्वामिभक्तिचा आहेर

सताठ महिन्यांपुरते का होईना, सद्गुरुकृपेने मखमली खुर्चीवर बूड टेकायला मिळाले आणि असे काही सुख मिळाले म्हणून सांगू, आहाहा! क्षणभर डोळे मिटून घेतले आणि उत्तमांगातील मज्जातंतूकडून मेंदूकडे वाहणाऱ्या सुखद संदेशांचा अनुभव घेतला. गुरुचरणी कठीण धरणीवर बसून घट्टे पडलेले ते बूड, त्याला असले सूख सहजासहजी पचनी पडत नव्हते. एकदा दोनदा चिमटा काढून पाहिला. मग बायकोकडून काढवून घेतला. हातावर. बूड स्थिर होते आणि मऊशार आसनही जागेवर होते. मग खात्री पटली. आनंदाचा असा हा उमाळा भोगीत आठवडा कसा गेला कळले नाही. निर्विकल्प समाधी (सामान्य लोकांच्या पक्षी: गाढ झोप) लागली होती तेवढ्यात बगलेत काहीतरी ढोसले गेल्यासारखे वाटले.  आनंदात कोण व्यत्यय आणते आहे असा त्रासिक चेहरा करून आम्ही डोळे उघडून पाहिले तो समोर साक्षात सद्गुरु. त्यांनी कुबडी घेऊन तिचे टोक आमच्या बगलेत खुपसले होते. आम्ही मोठ्या चतुराईने क्षणार्धात आमची चर्या त्रासिकवरून बापुडीवर आणली. हे कौशल्य आम्ही पुणेरी रिक्षावाल्यांकडून शिकून घेतले आहे. क्षणार्धात शून्यावरून चाळीस प्रतिकिमी किंवा चाळीसवरून शून्य असा वेग केवळ पुणेरी रिक्षेवालेच गाठू शकतात. "सद्गुरू!" असे हंबरून गाईचे वासरू जसे तिला बिलगून लुचू लागते त्याप्रमाणे आम्ही स्वामींच्या चरणावर मिठी घालून त्यांचे (म्हणजे पावलांचे) चुंबन घेतले. स्वामी नर्मदेची प्रदक्षिणा करून आले असावेत. नर्मदातीरावरील चमकती वाळू त्यांच्या पावलांवर चिकटलेली होती. पण स्वामी इच्छाभ्रमणी असल्यामुळे ती वाळू लवासानगरी ते दिल्ली येवढ्या अंतरातील कोणत्याही स्थळाची असू शकते याची कल्पना होती. स्वामी इच्छाभ्रमणी तर खरेच, परंतु त्यांची इच्छा सुध्दा भ्रमणी. कोप झाला तर प्रथम पत्रकारांसमोर कान टोचतात आणि पत्रकार गेल्यावर अशा ठिकाणी टोचतात की… कल्पनेनेच आम्ही शहारलो. स्वामींच्या मनात काय आहे ते कित्येकवेळा त्यांस स्वत:सही माहीत नसते असे एकदा ते स्वत:च म्हणाले होते. परमेश्वरावर गाढ विश्वास असल्याशिवाय हे शक्य नाही असे आम्हांस वाटते.

"जितेन्द्रा! तू बुद्धिमतां वरिष्ठं असे वाटले होते." सद्गुरु वदले. बुद्धिमतां वरिष्ठं हे शब्द उच्चारताना त्यांच्या मुखातील ते लोभस दोन दात उडया मारत आहेत असा उगीच भास झाला. ते दोन दात माझ्याप्रमाणेच त्यांच्या सद्गुरूंवरील निष्ठेमुळे टिकून आहेत असे मला वाटत आले आहे. परंतु माझी निष्ठा त्यांच्यापेक्षा अढळ आहे हे निश्चित. ते दात काय आज आहेत, पण जरा कठीण शब्द उच्चारले की निदर्शने केल्यासारखे हलतात, त्यांची निष्ठा फार काळ टिकणे कठीण आहे. सद्गुरूंना तुम्ही कवळी बनवून घ्या असे अनेक वेळा सुचवून झाले. परंतु त्यांनी भाडोत्री अनुयायी काय कामाचे असे काहीसे खिन्न उद्गार काढले. त्यावर आम्ही,"का बरे? आपल्या मठाच्या उत्सवात आपण आपली भीमथडीची भाडोत्री तट्टे रिंगण घालायला आणतोच की." असे सहानुभूतीपूर्वक सुचवले. सद्गुरूंची चर्या काहीशी रुष्ट दिसली. "जितेन्द्रा, ती भाडोत्री तट्टे नव्हेत रे! वर्षानुवर्षे आम्ही त्यांस कधी हिरवा चारा तर कधी हरभऱ्याचा तोबरा देत आलो. त्यांचे ठायी आमच्याबद्दल बहुत प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ती आमच्याभोवती रिंगण घालीत असतात. आम्हीही अधूनमधून त्यांची आयाळ गोंजारतो. त्यांनाही बरे वाटते. तुझेच उदाहरण घे. आमच्यापाशी आलास तेव्हा चतुष्पाद होतास, गोंजारून घेणे तुला माहीत नव्हते. हिंस्त्र वागणे, ओरबाडणे, चावणे, पुच्छ उंचावून येरझाऱ्या घालणे इत्यादि चेष्टांमुळे जनांत धास्ती निर्माण करत होतास. परंतु आमच्या जवळ आल्यावर एकदम शांत झालास. म्हणजे या उपर्निर्दिष्ट चेष्टा कमी केल्या नाहीस पण, आम्हांला शरण गेलास, कधी चावला नाहीस. निष्ठावंत हनुमंत झालास. आम्ही तुला ठाण्याचा द्रोणागिरी उचलून आणण्याची आज्ञा केली. उचलताना तुझी शेपूट त्याखाली सापडून जायबंदी झाली, पण शेपूट तुटो वा मुगुट फुटो या निश्चयाने तो पर्वत तू जरा का होईना हलवून दाखवलास. म्हणून आम्ही तुला हे आसन दिले. त्याच्याबद्दल तुझ्या ठायी आमचेविषयी केवळ कृतज्ञताच असेल याची आम्हांस शंका वाटत नाही. होय ना?" येणेप्रमाणे सद्गुरूंचे मधुर भाषण ऐकून आमचे डोळे भरून आले. साष्टांग नमस्कार घालून काही क्षण पडून राहिलो. मुखी "सद्गुरु, सद्गुरु" असे नामस्मरण आपोआप चालू झाले. परत समाधी लागणार इतक्यात पुन:श्च बगलेत कुबडीचे टोक जाणवले. आज स्वामी आपल्यावर वारंवार कुबडीप्रयोग का करीत आहेत याचा विचार करीत असतानाच शब्द कानी पडले.

"ऊठ वत्सा. मृदू शय्या कोणास नको असते? त्यावर बसले की उठावे असे वाटत नाही. होय ना? आपण साधक. सुखासीनता, विलास ही सामान्यजनांच्या स्वप्नातील रंजने. आपल्यास ही काही विशेष न करता साध्य होतात म्हणून आपण साधक. आणि म्हणूनच त्याचे आपणास काही विशेष वाटता कामा नये. या मखमली आसनावर बसून तू दिवास्वप्ने पाहत होतास. तुझ्या मुखावर अनन्य सूख विलसत होते. अशा वेळी मग कर्तव्याचा विसर पडतो. ज्या नामस्मरणाने हा भवसागर तरून जायचे त्या नामस्मरणाचा विसर पडतो.  येरवी आमच्या खडावांचा नुसता ध्वनी कानी पडला तर तू भु:भुकार करीत मठ जागवायचास. आमच्या खांद्यावरून डोक्यावर, डोक्यावरून खांद्यावर अशी क्रीडा करायचास. परंतु आज आम्ही येथे आलो आहोत याची चाहूलसुध्दा तुला लागली नाही. हा सुखासीनतेचा परिणाम. म्हणून आम्ही या कुबडीने तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली." सद्गुरूंचे कठोर शब्दसुध्दा आम्हांस अमृत. आम्ही पूर्वाश्रमी, तहान लागली की सार्वजनिक नळाला तोंड लावून कुणीतरी येऊन हाकलेपर्यंत मनसोक्त पाणी पीत असू. तसेच झाले. आम्ही सुखाचे आकंठ प्राशन करीत असताना सद्गुरूंचे कठोर शब्द कानावर आणि कुबडी पाठीवर पडून हाकलले गेलो. पण आमची निष्ठा जागृत होती. "सद्गुरु! वाट चुकलेल्या या अनुयायास आपण दिवा दाखवलात! या मायामोहाच्या जाळ्यात काही क्षण आम्हाला आपल्या प्रति असलेल्या कर्तव्याचे विस्मरण झाले होते. स्वामिभक्ति याखेरीज आमच्या आयुष्याचे दुसरे प्रयोजन नाही. आता उर्वरित काळ आम्ही केवळ आपली भक्ति आणि आरती यांमध्ये व्यतीत करणार. हे पाहा, आम्ही आपल्यावर आरती रचली आहे! स्वीकार व्हावा."

हुं: हुं: भू: भू: !
सत्राणे उड्डाणे भुंकार वदनी
करी डळमळ कृषीमंडळ कन्दकभाव गगनी।
कडाडता हस्त मुखी, होतसे भीषण ध्वनि
परि संयम धरि, भावही गडगडे झणी।।

वरवरी शांत परि अन्तरि ज्वाळामुखी
त्वरित घेतसे बैठक देण्या कर्णपिचकी
तीक्ष्ण बोल ऐकुनि अनुयायी गर्भ गाळिती
आश्वस्त करुनी स्वामि आशिर्वचने देती।।

जय देव जय देव जय मा. ना. खा. आरती
रचिली जितेंद्रे येथामति चरणी बारामती
स्वीकार व्हावा स्वामि ही बालके विनंती
आपणच अमुचे स्वामी असावे निश्चिंती।।
हुं: हुं: भू: भू: !

No comments:

Post a Comment