अलीकडे जो तो उठतो तो दारूबंदी दारूबंदी म्हणून ठणाणा करतो. ही एक फ्याशनच झाली आहे. दारू कशाशी पितात हेसुध्दा माहीत नसलेले लोक न पिता बरळू लागले आहेत. आपली दारू बंद म्हणजे शासनाचीही दारू बंद हे आपल्या लक्षात येत नाही. वास्तविक शासनाला दारूची महती कळते. एरवी बिलावर सह्या करायला अळमटळम करणारे रावसाहेब किंवा अण्णासाहेब, एकदोन पेग घशाखाली उतरले की बिलावरच काय, समोरच्या ग्लासखालच्या पेपर नॅपकिनवरही सही करतील. सैन्य जसे अन्नावर चालते तसे शासन दारूवर चालते असे म्हटले तर वावगे ठरू नये. थांबा, उगाच आक्षेप घ्यायला आ वासू नका, शासन दारूवर चालते याचा पुरावा खाली मुद्दा क्र ४ मध्ये दिला आहे. शासनाची दारू बंद करणे म्हणजे आपल्या अज्ञानाबद्दल शासनाला शासन केल्यासारखे आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही या विषयावर बारकाईने (कृपया या शब्दावर कोटी करण्याचा मोह टाळा, विषय गंभीर आहे) अभ्यास करून आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की दारूचे तोटे कमी आणि फायदे अधिक आहेत. आमच्या या अभ्यासाचा गाळीव (पुन्हा, कोटी टाळा!) परिपाक आपल्यासमोर ठेवत आहोत.
दारू पिणेपासूनचे फायदे -
१. रोजगार निर्माण - दारू डिस्टिलरी कामगार, बारबाला, बारटेंडर, बाटल्या गोळा करून चरितार्थ चालवणारे भंगारवाले, दारू वाहतूक करणारे चालक यांना रोजगारीची हमी.
१. रोजगार निर्माण - दारू डिस्टिलरी कामगार, बारबाला, बारटेंडर, बाटल्या गोळा करून चरितार्थ चालवणारे भंगारवाले, दारू वाहतूक करणारे चालक यांना रोजगारीची हमी.
२. पाणी समस्येवर उपाय - आपल्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. बऱ्याच गावांत उन्हातान्हात पाच पाच मैलांवरून पाणी आणावे
लागते. दारू नुसती पिऊन पाण्याची बचत होते. शिवाय दारू पिऊन चालल्यास पाच काय दहा मैलावरून जरी पाणी आणावे लागले तरी कळत नाही.
३. आरोग्य आणि शेतीसाठी फायदेशीर - दारूच्या सेवनाने वारंवार लघुशंका होऊन मूत्रमार्ग साफ राहतो आणि मुतखडे इत्यादी विकारांचा धोका टळतो.
मूत्रविसर्जनातून अमोनिया, युरिया, पोटॅशिअम इत्यादि संयुगे निर्माण होऊन त्याचे रूपांतर नैसर्गिक खतांमध्ये होते. या खतांवर वाढलेले ऊस, मका यांपासून
पुन्हा दारू निर्माण करता येते. अशा प्रकारे ही एक आत्मनिर्भर (सेल्फसस्टेनिंग) प्रक्रिया आहे.
३ अ. देशात योग्यप्रकारे दारूविषयी लोकजागृती (कृपया मुद्दा नं ३ पहा) केल्यास त्याद्वारे हरितक्रांती होऊन शेतीउत्पादन वाढून निर्यात वाढेल. त्यातून परकीय चलनाची गंगाजळी वाढेल.
४. देशसेवा - रोजगार
निर्माणातून देशसेवा तर होतेच, परंतु दारूविक्रीतून सरकारला अफाट कर मिळतो
जो सरकार गोरगरिबांना सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी खर्च करते. तात्पर्य -
तुमच्या गावात चांगले रस्ते पाहिजेत तर दारूसेवन वाढवा. दारूडे चांगले
रस्ते आणि वाईट रस्ते दोन्हींवरून एकाच प्रकारे लीलया चालतात. तसे दारू न पिणाऱ्यांचे नसते, त्यांना चांगले रस्ते लागतात.
५. कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य -
बहुसंख्य पिणारे दारू पिऊन घरी येऊन चीप पडून राहतात. नशेमुळे बायकोच्या
बोलण्याचा त्रास होत नाही, शब्दाला शब्द वाढून भांडणे होत नाहीत.
बायको कशीही असली तरी रूपसुंदरी वाटते. घटस्फोटांचे प्रमाण कमी होऊन एक आदर्श कुटुंब निर्माण होते.
६. मुलांवर योग्य संस्कार - आपले वडील दारू पिऊन ज्या काही करामती आणि गावाची
करमणूक करतात ते पाहून कसे वागू नये याचे संस्कार मुलांवर होऊन ती आदर्श
नागरिक होऊ शकतात.
७. आत्मिक उन्नती - संतानी "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा म्हणावा तसा अर्थबोध घेतला गेला नाही. आज संतांच्या या शिकवणुकीची अत्यंत गरज आहे. आपण मर्त्य मानव संत होऊ शकत नाही, परंतु त्यांची शिकवणूक आचरणात तरी आणू शकतो. दारू प्या, जसे अडखळत बोलता, तसेच अडखळत चाला आणि संतपदी पोहोचा. याशिवाय दारू प्यालेल्याला अचानक खरे बोलण्याची शक्ती प्राप्त होते. न घाबरता एखाद्याविषयी (यात बरेच वेळेला पत्नीचा अंतर्भाव असतो) आपले खरे काय भाव आहेत हे तो व्यक्त करतो. याउलट ज्यांचा तो नेहमी द्वेष करतो त्यांच्याविषयी त्याच्या मनात प्रेमभाव उत्पन्न होऊन त्यांना,"तूही मेरा एक सच्चा यार है" असे बोलण्यापर्यंत त्याची आत्मिक उन्नती होते. शत्रूवर असे प्रेम करणारा संतांशिवाय कोण आहे बरे? निदान काही काळ तरी (साधारणपणे सकाळपर्यंत) हे त्याचे संतपण टिकते.
No comments:
Post a Comment