Wednesday, June 18, 2014

महाराष्ट्राचे वाकडे सूत

"अरे, एकदा हा महाराष्ट्र माझ्या हातात द्या, मग पहा कसा सुतासारखा सरळ करतो!" पायजम्याची नाडी हातात घेऊन इंद्रवदन सरकार गरजले. समोर खुर्चीवर त्यांचा पायजमा लोळागोळा होऊन पडला होता. त्या पायजम्यात नाडी ओवायचा त्यांचा विचार होता. त्यांनी राणीसरकारांना विनंती करून पाहिली होती, पण त्यांनी तुमचं हे पायजम्याचं आणि नाडीचं नेहमीचंच आहे, तुम्हीच ओवत बसा असं सांगून झटकून टाकलं होतं. त्या चिंतेत असतानाच छोटूचे आगमन झाले होते. इकडच्या तिकडच्या बित्तंबातम्या सांगून झाल्यावर छोटूने महाराष्ट्राची परिस्थिती ठीकठाक असल्याचे अनुमान सांगितले. ते ऐकून सरकार उखडले,"कसली बोडक्याची ठीक परिस्थिती? माजलेत सगळे!" "मला आपल्याशी काही बोलायचंय"च्या बोर्डाने वादळी हवा निर्माण होऊन महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार अशी हवा निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात शनिवारवाड्यासमोरील पटांगणात कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण होऊन त्याचे संगमावर विसर्जन झाले. वास्तविक त्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देऊन पुण्यातील लोक प्रचंड संख्येने जमा झालेले पाहून इंद्रवदन सरकार उत्साहित झाले होते. पुण्यातील लोक "कापसाला भाव का मिळत नाही?" अशा विषयापासून "मी पाहिलेला जपान" अशा विषयापर्यंत सर्व भाषणांना तितक्याच उत्साहाने हजर राहून टाळ्या वाजवतात हे त्यांच्या ध्यानात नव्हते. सरकारांच्याही भाषणाला हशा आणि टाळ्या यांचा पाऊस पडला. हा टाळ्यांचा पाऊस असाच पडत राहायला हवा असे त्यांना वाटू लागले. त्या उत्साहाच्या भरात जिथे टाळ्या हव्यात तिथे हशा आणि जिथे हशा हवा तिथे टाळ्या पडत होत्या हे त्यांच्या ध्यानात आले नाही. मराठी चतुर रसिक, नाटक आणि भाषण पाडण्यासाठीसुद्धा टाळ्या वाजवतात याचे भान त्यांना राहिले नाही. आपल्या भाषणाने सैनिकांत आणि प्रजेत प्रचंड वीररस उत्पन्न होऊन त्याचे रूपांतर आपल्या विजयातच होणार असे वाटत असतानाच प्रजेची पावले बटाटेवडे आणि भेळेच्या स्टोंल्सकडे वळलेली पाहून ते अवाक झाले. "अरे मी काय इथे सर्कशीचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ लावला होता काय रे? खेळ पाहून झाला, आता चालले मजा करायला." त्यांचा संताप अनावर झाला. "लेकाचे माजले आहेत. एकेकाच्या ढुंगणावर हंटर पाहिजे हंटर! एवढा महत्वाचा संदेश मी जीव तोडून देतोय. अरे मी स्वत: राज्यग्रहण करायला तयार आहे! नव्हे ती राज्याची गरजच आहे. आज राज्यापुढे अनेक समस्या आहेत. प्रश्न आहेत. त्या समस्या सुटल्या पाहिजेत, प्रश्नांची उकल झाली पाहिजे. नुसता वेळकाढूपणा उपयोगाचा नाही. गुद्द्यांची लढाई नको मुद्द्यांची हवी. आणि हे अमृतमंथन ऐकून यांच्यावर काय परिणाम झाला? चालले नाटकसिनेमा सुटल्यासारखे भेळ, वडे खायला! हे पूर्वीपासून अस्सेच चालू आहे. सगळ्यांना नुसती फुकट्यात मज्जा बघायला हवी. कामधाम सोडून डोंबाऱ्याचा खेळ पाहायला गर्दी करतील. तोही जादू किंवा कसलीतरी अफलातून करामत दाखवतो असे सांगत उगाच अर्धा पाऊण तास बडबड करील. प्रत्यक्षात तो काही करणार नाही हे सर्वांना माहीत असते, तरी पण टाईमपास म्हणून चकाट्या पिटत उभे राहतील. बडबड करून दमल्यावर डोंबाऱ्याने पैशासाठी कटोरा पुढे केला की मग मात्र एकेकजण फुटेल. डोंबारी काय बडबडत होता हे एकाच्याही लक्षात असेल तर शपथ. अर्थात तसे ते डोंबाऱ्याच्या तरी लक्षात कुठे असते म्हणा. पण मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या या उडाणटप्पू वृत्तीचा. कशाचे गांभीर्य म्हणून नाही. सगळ्याचेच हसे करायचे. आम्ही आंदोलन करायला रस्त्यावर उतरू अशी गर्जना केली की "इंद्रवदन राजे, तुम आगे बढो" म्हणून आरोळ्या ठोकणार. आम्ही खरोखर रस्त्यात उतरलो की हे "तुम्ही व्हा पुढे, मी आलोच दोन मिनिटात" म्हणून घरी जाऊन जेवणाचे ताट समोर घेऊन पुढला तमाशा टीव्हीवर बघणार.

आम्हीही उत्साहाच्या भरात काहीतरी बोलून जात असतो. महाराष्ट्रासाठी आम्ही आमचे सर्वस्व अर्पण करू अशी आम्ही उक्ती केली होती. तर महाराष्ट्राने ते मात्र लगेच उचलून धरले. अरे, अलंकारिक भाषा म्हणून काही प्रकार असतो की नाही? आम्ही बोललो त्याचा शब्दश: अर्थ लावायचा? शब्दश:च अर्थ लावायचा ठरवला तर आपल्या मराठी रंगभूमीचं काय होईल? बरं, आम्ही एक सर्वस्व अर्पण करू, आमच्या नावावर एकही प्रॉपर्टी नाही, पण तुम्ही थोडी तरी मदत कराल की नाही? सगळे लेकाचे चोर. असे रस्त्यात उतरून उतरून आम्ही आज खरोखरचे रस्त्यावर आलो आहोत. थोरल्या वाड्यातून निघताना ही पळवलेली तलवार आणि परळच्या बाजारातून आणलेली ही ढाल एवढेच आता उरले आहे. एकदा! फक्त एकदा हा महाराष्ट्र माझ्या हातात द्या रे! मग बघा कसे सुतासारखे सरळ करतो सर्वांना. छोट्या, तूर्तास जरा एवढी नाडी सरळ करून दे रे, किती वेळ प्रयत्न करतो आहे लेकाची पायजम्यात ओवताच येत नाहीये."

No comments:

Post a Comment