Sunday, June 15, 2014

धूसर पाऊलवाटा

संस्कृतीचं काय करायचं हा एक प्रश्नच आहे. पूर्वी हा एक जाज्वल्य विषय होता. आता तो ज्वलंत झाला आहे. वास्तविक संस्कृतीसारखा सोज्वळ शब्द, कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, कुणी जोपासा किंवा नापासा, कुणी द्वेषाने उच्चारा किंवा त्वेषाने त्याला तलवारीसारखे उपसा, कश्शाला म्हणून विरोध नाही. पण प्रत्येक पिढीने आपण संस्कृती कशी विसरत चाललो आहोत याची खंत करायची, आणि पुढच्या पिढीने जुने जाऊद्या मरणालागुनि म्हणायचे. संस्कृती म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? सणवार, देवदेवस्की, व्रतवैकल्यं एवढ्यातच ती सामावलेली नाही. मोठ्या माणसांच्या पाया पडणं, चुकून पाय लागला तर आपोआप पाय शिवून नमस्कार करणं, घरी आलेल्याचं अनोळखी असला तरी आपुलकीने आदरातिथ्य करणं, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश न करणं, दृष्ट लागू नये म्हणून ओवाळणं, सणाला दारावर तोरण बांधणं अशा किती तरी गोष्टी आपली संस्कृती ठरवत असतात. अलिखित नियम म्हणून पाळल्या जाणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपली संस्कृती ठरवून जातात. पुण्यात जन्मला असाल तर सायकल अथवा स्कूटरवरून जाता जाता देवळाकडे नुसतं पाहून कपाळ आणि छातीला स्पर्श करणं, अथवा दुपारी दाराची बेल वाजवली तर ते न उघडणं, अगदी उघडलंच तर कमालीच्या त्रासिक चेहऱ्यानं बोलणं, या गोष्टीसुद्धा संस्कृतीतच मोडतात. कालानुसार आपण बदलत गेलो, पण संस्कृती टिकत नाही याची खंत करत. संस्कृती टिकावी असं का वाटतं आपल्याला? आणि सोयीनुसार चालीरीतीत, धार्मिक कर्मात शॉर्टकट मारणारे आपण, नक्की कसली संस्कृती टिकवतो आहोत? स्नान करून शुचिर्भूत होऊन श्लोक, मंत्र आणि तंत्र पाळून घरच्या देवाची पूजा होत असे. ती आता सकाळी उठून नोकरीवर जायच्या गडबडीत आंघोळ उरकून कशीबशी देवासमोर उदबत्ती फिरवून दंडवत टाकून होऊ लागली. सत्यनारायणाची पूजा चक्क कॅसेट लावून होऊ लागली. या झाल्या देवाधर्माच्या गोष्टी. नुसता देवधर्म म्हणजे संस्कृती नाही. वडीलधारे पाहुणे आले की अगदी पायावर डोके ठेवले जायचे ते नंतर नुसते वाकून पावलांना स्पर्श करण्यापर्यंत आले, आताची हाय हेलो पिढी तेवढेसुद्धा करताना दिसत नाही. अर्थात त्याचा अर्थ तरुण पिढी उद्धट आहे असा अजिबात नाही, संस्कृतीच्या नावाने गळे काढणारी त्यांची आईबापे, आपल्या पुढच्या पिढीला वाकून नमस्कार करायची संस्कृती देताहेत का? वयाच्या तिशीपर्यंत अंगात तरुणपणाचा जोष असेपर्यंत संस्कृती टिकवायची वगैरे आहे याचे मुळीच भान नसते. चाळीशी ओलांडली की अचानक संस्कृतीचा उद्घोष चालू होतो. मग मुलांना संस्कृतीचे अपचन घडवणाऱ्या कुठल्या तरी रटाळ कार्यक्रमात भाग घ्यायला भाग पाडले जाते.  इतक्या वर्षांत कधी असल्या कार्यक्रमांचे नाव न काढणारे आपले आईबाप आता संस्कृतीबद्दल एवढे आग्रही का होऊ लागले आहेत याचा मुलांना प्रश्न पडतो. याच आईबापांना छान सुटाबुटात पार्ट्यांना जाताना त्यांच्या मुलांनी पाहिलेले असते. जाताना डेझिग्नेटेड ड्रायव्हर कोण याची चर्चासुद्धा ऐकलेली असते. तीच आईबापे छान भारतीय संस्कृतीचा वेष करून देवळात जातात, पुजाऱ्याने तळहातावर टाकलेले तीर्थ अत्यंत भक्तिभावाने प्राशन करून तो ओला तळहात डोळ्यांवर लावून टाळूवरून फिरवतात. यांच्या आधीच्या पिढीचे हे धाडस नव्हते. आधीच्या संस्कृतीत हे बसलेही नसते. मग ती संस्कृती कुठे गेली?

कालानुरूप बदलते ती संस्कृती. किंबहुना बदल हीच आपली संस्कृती असावी. मग टिकवायचे काय आणि कसे? प्रत्येक पिढीची सुरुवात बंडखोरीने होऊन आधीच्या संस्कृतीपासून दूर जाण्यात होत असते. त्याच पिढीला उताराला लागले की मग आठवणी येऊ लागतात. कसे आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून तेल उटणे लावून स्नान करीत होतो, पायाखाली कारीट फोडत होतो, थंडीचे दिवस असायचे, परसात छान शेकोटी पेटवून त्याभोवती शेकत उभे राहायचो. पायाखाली कारीट का फोडायचं, मुळात कारीट म्हणजे काय असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटू नये. संस्कृतीचा आणखी एक छोटासा भाग लय पावला असे समजूया. एकत्र कुटुंबपध्दती हाही एक संस्कृतीचाच भाग होता. भरलेल्या घराला आजही गोकुळ असा शब्द वापरला जातो. गोकुळ या नावातच समृद्धी, समाधान, रेलचेल असे सर्व येते. नुसती संपत्तीची समृद्धी नव्हे तर, नात्यांचीही. घरातील कर्ते माणूस म्हणजे बऱ्याच वेळा आजोबा असायचे. काका, वडील, आत्या ही तरुण पिढी नुकतीच उमेदवारी करायला लागलेली असायची. लग्ने, मुलेबाळे लवकर होत. मुले काका, आत्या, चुलत भावंडे, आजोबा, आजी, शिक्षणासाठी राहिलेले मावस, मामेभाऊ, अशा गोतावळ्यात वाढत. घरेही मोठी असत. घरे कसली, वाडेच असत. पुढे हे वाडे पडले, नुसते पडले नाहीत तर एकत्र कुटुंबपद्धतीही घेऊन गेले. प्रगतीची व्याख्या काय आहे ते माहीत नाही, पण प्रगतीच्या नावाखाली आपण सोयीस्कररीत्या गोकुळाला तिलांजली दिली. त्याबद्दल कुणी अश्रू गाळल्याचे दिसले नाही. बहुतेक भावजयांनी सुटकेचे नि:श्वास टाकले असावेत. "बरंच झालं, कसला दगडी वाडा तो, काही सुधारणा करायची म्हणून सोय नाही. शिवाय दार सदैव ते उघडे. आता ब्लॉक घेतला ते बरं झालं बाई.  जरातरी प्रायव्हसी मिळेल." असे उद्गार काढले गेले आणि ती संस्कृती संपली. अशा ब्लॉकवाल्या संस्कृतीत वाढलेली मुले फक्त आईबाप एवढेच कुटुंब असे समजून वाढलेली. आते, मावस, मामे भावंडं कझिन्स झाली. ही मुले करियरिस्ट झाली. पुढे उच्च शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी दूर निघून गेली. त्यांचे ब्लॉकवाले आईबाप आता एकटे उरले, पूर्वी एकत्र असताना कसे एकमेकांना धरून असायचो, एकटेपण वाटायचे नाही याच्या आठवणी काढत बसायचे. मुलांना आपल्या संस्कृतीची आठवण करून द्यायचे. यात दोष कुणाचाच नाही. वेळेप्रमाणे सोयीनुसार आपण बदलत आलो, बदलताना जाणवले नाही, पण आपणच आपल्या संस्कृतीचा एकेक धागा सोडवत आलो. अनेक वेळेला येजा करून पडलेल्या या पाऊलवाटा, पुढे जाताना मागे वळून पाहिले की धूसर होत जातात. पुढील प्रकाश खुणावत असतो, नवीन पाऊलवाट चोखाळल्याशिवाय तो गाठता येणार नसतो. धूसर होणारी पाऊलवाट तिच्याशी निगडित आठवणींमुळे सोडवत नाही पण पुढे नवीन वाट तर हवी आहे अशा अवस्थेत आपण असतो. आपल्या पुढची पिढी नवीन वाटेवर केव्हाच गेली. त्या पिढीने आपण अनुभवलेल्या धूसर वाटेचा अनुभव घ्यावा अशी आपली अपेक्षा असते.

No comments:

Post a Comment