Sunday, June 29, 2014

राखीबंधन

स्टेशनवरून घरी येताना भाजी घ्यावी म्हणून मंडईत थांबलो. मेथीच्या जुडीवर घासाघीस करत होतो तेवढयात काही अंतरावर गर्दी दिसली. जोरात कुठलेतरी गाणेपण चालू होते. कट्टर भारतीय बाण्याप्रमाणे गर्दी दिसली की उभे राहून पाहण्याचे कुतूहल वाटणे आलेच. थोडं पुढे गेलो तर गाणे ऐकू येऊ लागले. "आयी हुं मैं तुझ में ऐश भरने, रग रग में मस्ती की प्यास भरने…". छान डॉल्बीवर दणका लावला होता. निळे झेंडे फडकत होते. स्टेज लावले होते. म्हटलं नेहमीप्रमाणे कसली तरी सभा लावली आहे. स्टेजच्या पुढे आमच्या एरियातली सगळी अन्या-बाळ्या-पक्या-दिल्या टाईप मंडळी बेभान होऊन नाचत होती. मी नेहेमी पाहतो, ही मंडळी गणपती असू द्या, लग्नाची मिरवणूक असू द्या, राजकीय सभा असू द्यात कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदात न्हाऊन नाचत असतात. मी बारकाईने निरीक्षण करत आलो आहे. बहुतेक वेळेला त्यांचे प्रेरणास्थान स्टेजमागे दडलेले असते अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. नाचता नाचता अचानक दोघे तिघे फुटून स्टेजच्या मागे जातात आणि पाचदहा मिनिटांत बाहेर येऊन दुप्पट उत्साहात नाचतात हे माझ्या लक्षात आले होते. माझे कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून एकदा मी हळूच स्टेजमागे जाऊन पाहिले आणि उलगडा झाला. त्यांच्या उत्साहाचा आणि आनंदाचा परिपाक आठ इंचाच्या छोट्याशा बाटलीत साठवलेला होता. मी गेलो तेव्हा दोनतीनजण तिघांत मिळून एका बाटलीतून तो आनंद लुटत होते. त्यांना मी पण त्यांच्यापैकीच वाटलो आणि एकाने मग बाटली माझ्यासमोर धरून ,"हां, चल लाव पटकन" असेही म्हटले. मीपण कसला झंपड, बावळटासारखं "अहो, सोडा तरी आहे का?" असे विचारून बसलो. त्यावर तिघांनीही चमकून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून गवा रेड्यांच्या कळपात उभा राहिल्यासारखे भाव माझ्या मनात येऊ लागले. मग कुणाच्या तरी मातृसत्ताकाचा सौम्य शब्दात सत्कार झाला आणि ती बाटली माझ्या हातातून हिसकावून घेतली गेली. मी घाईघाईने स्टेजमागून बाहेर आलो. जाता जाता "आयला ही बामणं…काही तरी सोडा की रे आमच्या साठी…" असे काहीसे शब्द कानी पडलेच. नाहीतरी ते पेय ओपन कॅटेगरीत येत नाही अशी फालतू कोटी करणार होतो, पण त्यांचे तांबारलेले डोळे पाहून विचार आवरला. न जाणो हातापाईत कपडे फाटून आपण नको त्या ओपन कॅटेगरीत येऊ.

गलका एकदम वाढला आणि पोरं जरा जास्तच उत्साहात नाचू लागलेली पाहून म्हटलं आज जरा कायतरी वेगळं आहे. निरखून पाहिलं तर साक्षात बुद्धस्मरणीय रामदासजी त्या घोळक्यात पोरांच्या वरताण नाचत होते. त्याचं हे रूप नवीन होतं. म्हणजे तसं नाचणं त्यांना नवीन नाही. आज राष्ट्रवादी संतांच्या टोळक्यात मागं झांज धरून, उद्या शिवफौजेत पुढं धनुष्यबाण घेतलेले सैनिक आणि हे मागं बाणांचा भाता घेऊन असं, तर परवा अर्धीचड्डी काळीटोपी संचलनात घोषात ट्र्यँगल वाजवत, असं ते नाचत असतातच. लोक नुसतं नाचून घेतात, पण बिदागी द्यायच्या वेळेला ब्यांडवाल्यांसारखी वागणूक देतात अशी तक्रार ते करत. पण आज ते स्वत:च्याच तालावर नाचत होते. त्यांच्या दाढीधारी मर्दानी देखण्या चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकत होते. नीट पाह्यलं तर ते गाण्याच्या ओळी स्वत:ही जोरजोरात म्हणत होते. "आयी हुं मैं तुझ में ऐश भरने, रग रग में मस्ती की प्यास भरने…सैंया जवानी की बँक लूट ले…". बँक लुटणे वगैरे शब्द ऐकून मी दचकून इकडे तिकडे पाहिले. वास्तविक राष्ट्रवादी संतांच्या टोळक्याचे किंवा कोकणातील स्वयंघोषित राजांचे हे ब्रीदवाक्य असायचे ते इथे कसे काय आले बुवा? पक्षाचा काही नवीन कार्यक्रम वगैरे जाहीर झाला आहे की काय? "व्होटबँक" या शब्दाखेरीज "बँक" या शब्दाशी रामदासजींच्या पक्षाचा कधी फारसा संबंध आला नाही. म्हणून हा उपाय काढला असावा असे उगाच वाटून गेले. पण काही म्हणा, रामदासजी छानच नाचतात. डीआयडी वर गेले तर नक्कीच क्या बात, क्या बात, क्या बात!" घेतील. पण ते लोक तिथंही यांच्याकडून नुसतं नाचून घेतील. सोनेरी टोपी लांबच, नुसतीच टोपी घातली जाईल. काय एकेक माणसाचे नशीबच असते ना?  टीव्हीवरच्या शोजमध्येसुद्धा आरक्षण आणले पाहिजे असा एक क्रांतिकारी विचार मनात आला.असं विचारात गढलो असतानाच पुन्हा गलका वाढला. पाहिलं तर, एक रिक्षा येऊन थांबली. आणि अहो आश्चर्यम! त्यातून साक्षात राखी सावंत (आंतरराष्ट्रीय आयटम नृत्य कलाकार, रिटायर्ड) यांची सौम्य सात्विक मूर्ती अवतरली. उतरल्या उतरल्या बाईंनी गाणे ऐकले आणि रामदासजींच्या जवळ जाऊन अत्यंत शास्त्रशुद्ध पध्दतीने पदलालित्य दाखवायला सुरुवात केली. योग्य ठिकाणी चेहऱ्यावर मुरके, अतियोग्य ठिकाणी कमरेचे लचके तर होतेच, पण संशयाला काही जागा नको असे हातवारेसुध्दा त्या करून दाखवत होत्या. ते पाहून रामदासजींसकट सगळे आपले नृत्य विसरून श्रीमती सावंत यांचे एकूणच कौशल्य पाहण्यात मग्न झाले. ते पाहून श्रीमती सावंत कडाडल्या,"बघता काय मेल्यांनो, इथं काय आयटम डान्स चाललाय का?" काय पण म्हणा, एरवी कुणाला न ऐकणारी पोरं, बाईंचं मात्र निमूटपणे ऐकून घेत होती.

मग रामदासजी आणि श्रीमती सावंत स्टेजवर जाऊन बसले. रामदासजींनी बाईं आणि आपल्याबद्दल गोड बातमी देणार असल्याचे सांगितले. ते झकासपैकी लाजलेले पाहून माझ्या शेजारी उभे राहिलेल्यांपैकी एक जण म्हणाला, "आयला, लगीन झाल्यालंबी म्हाईत न्हाई आन लगेच गोड बातमी?" रामदासजी कसेबसे एवढेच म्हणाले,"श्रीमती सावंतांमुळे तरुण, युवावर्ग पक्षाकडे आकर्षित होईल. वास्तविक हे मी सांगायची गरज नाही. आज इथं जमलेले तरुण, हे सभेच्या सुरवातीला पार मागे उभे होते ते आता इथं स्टेजजवळ उभे आहेत यातच सगळं आलं."
रामदासजी एवढे बोलून उगाच "लाजते, पुढे सरते" करत उभे होते. श्रीमती सावंत मुळीच लाजल्या नव्हत्या. त्यांनी माईक स्वत:कडे ओढला आणि खणखणीत आवाजात म्हणाल्या,"अहो तुम्ही कशाला लाजताय हनीमूनला आल्यासारखं? आणि तुम्ही लोक, टाळ्या कशाला वाजवताय? गोड बातमीसाठी काय लग्नच व्हायला पाहिजे?"
"हां, हे मात्र खरं हां." पुन्हा तोच माझ्या शेजारचा.
श्रीमती सावंत पुढे बोलू लागल्या,"सग्गळे अनुभव घेऊन झाले." इथं टाळ्यांचा कडकडाट!
"मेल्यांनो, पुरतं ऐका तरी! आंबटशौकीन कुठचे! हां, तर सगळे अनुभव घेऊन झाले. राष्ट्रीय आम पक्ष काढून झाला, त्या नुसत्याच आम पक्षालापण ऑफर देऊन झाली. मेल्यांना नुसतंच माझ्याकडे बघायला हवं असायचं. जसं काही मी एखादी वस्तूच आहे. मीही देशाचं काही देणं लागते. मलाही फेडावंसं वाटतं…" बाईंनी गळ्यातील शबनम पिशवी काढून बाजूला ठेवली.
इथे सर्वत्र शांतता पसरली. माईक, स्पीकरवालेसुद्धा आतुरतेने स्टेजपाशी येऊन उभे राहिले.
"मलाही फेडावंसं वाटतं समाजाचं ऋण." इथे सभेतून अपेक्षाभंगाचा एक पुसटसा नि:श्वास ऐकू आला.
"म्हणून मी ठरवलं आहे. मी रामदासजींच्या हातात हात घालून माझं सर्वस्व अर्पण करणार आहे."
इथे सभेतून एकदम घोषणा झाली,"राखीजी तुम आगे बढो, हम तुम्हारे पीछे है!"
श्रीमती सावंत म्हणाल्या,"हां, मेल्यानो, तुम्हाला मी काय आजच ओळखत नाही. तुम्ही नेहमीच माझ्या पीछे उभे असणार. पण रामदासजींचा हा पक्ष अन्यायाविरुद्ध लढणारा आहे, पक्षात पारदर्शकता आहे. पारदर्शकता आणि मी हे समीकरणच झाले आहे. मला कसलीही लपवालपवी आवडत नाही. जे काय आहे ते स्वच्छपणे जनतेसमोर मांडायला मला आवडते. आणि जे काही मांडले आहे ते जनतेने निरखून, पारखून, सूक्ष्मदर्शकाखाली धरून निरीक्षण करावे. आजच्या तरुणांपुढे अनेक समस्या उभ्या आहेत. म्हणून आज मी इथे उभी आहे. अगदी मध्यरात्री माझ्याकडे आलात तरी आपल्या समस्यांचे समाधान करण्याची मी हमी देते." या वाक्यावर सर्वांनी जल्लोष केला. माझ्या शेजारचा तो म्हणाला,"आता एकपण सभा चुकवणार नाही आपण तरी!"

Friday, June 27, 2014

राष्ट्रसंतांचे टोळके

सायबांनीच सांगून टाकलं ह्ये बरं झालं. आपन काय संतांची टोळी आहोत? जब्बरी डायलॉक मारला सायबांनी. पन संतांची टोळी आसते? आपल्याला फक्त गुन्हेगार टोळी किंवा सोनेरी टोळी आसते आसंच वाटायचं. आयला आपन आता छाती फुडं काढून फिरणार. सभेत साधूगिरी आनि वॉर्डात भाईगिरी करून करून डोकं कामातून गेलं होतं. माणसानं कसं जसं आसल तसं वागावं, उगाच ज्ये न्हाई त्याचं सोंग आणू नये आसं आमचे ठाण्याचे संत टोळभैरवमहाराज उर्फ जितेन्द्रानंदानंद सांगत आसतात. म्हाराज स्वत: सोभावाने कोपिष्ट आसून, न्हाई त्या वेळेला  (संध्याकाळी सातनंतर) भ्येटायला गेलं तर आयमायवरनं शिव्या देतात. पन भक्तिभावानं शिव्या ऐकत टिकून राह्यलं तर तीर्थप्रसादाला थांबवून घेतात. कालच गेलो हुतो. तीर्थप्रसादाला. आपल्याला नाक्यावरच्या मोसंबी नारिंगीची सवय, आसल्या विलायती तीर्थानं काय हुतंय. म्हाराजांनी चारपाच वेळा तीर्थ दिलं तरी माझी गाडी आपली फर्ष्ट गियरमदीच. म्हाराज सोता डुलत होते. आपनच मग तेनला काय तरी खावन घ्या म्हाराज आसा आग्रह करूण मुर्गीची येक तंगडी खायला लावली. मग म्हाराजांनी सत्संग सुरू केला. किशोरकुमारची सगळी दुखभरी गाणी गाऊन झाली. सारकं छगनबाप्पांच्या मिशीला हात लावून,"मूछे हो तो नत्थूलाल जैसी" म्हणत होते. छगनबाप्पा "आयला, ह्यांडल होत नाय तर पिता कशाला रे साल्यो!" आसं म्हाराजांवरच डाफरत व्हते. हितं आसं सगळं. आन सभेला दुसरीच तऱ्हा. बगळ्यासारकी शुभ्र कोटजाकिटं घालून ष्टेजवर बसनार. चेहऱ्यावर भाव आसे की लोकांच्या कल्याणाची चिंता तेंच्यापेक्षा हेन्लाच पडली आहे. लोकान्ला ते वाटतं खरंच वाटतं, आन मग आपल्याला वॉर्डात भाईगिरी करायची पंचाईत. लई तरास होतो त्याचा. हितं पक्षनिधी पाह्यजे तर वॉर्डात वट पाह्यजे. भाईगिरीशिवाय पक्षनिधी भेटत नाही. शिवाय हे सारखं येका कॅरॅक्टरमधून दुसऱ्या कॅरॅक्टरमध्ये घुसणं फार कठीण आसतं. येकदा आसंच न्हेमीच्या ड्रेसमदी फिरत होतो. येकदम सायबांचा फोन आला. म्हनले आत्ताच्या आत्ता सभा लावा, गाड्या सोडा, गावाकडनं न्हेमीची आपली गर्दी आणून बसवा. गर्दी आनायचा वांधा नाय, पन आपलीच पोरं या टायमाला साली आपापल्या सामानाबरोबर कुटं कुटं उधळलेली. लई कुटाणा. बरं सभा तरी लावून दावली. ऐन टायमाला सायबांनी सोता मला ष्टेजवर बोलावलं. म्हनले शंकर, तू आज हितं ष्टेजवर पायजेस. आपण ष्टेजवर गेलो आन सायबांचे पाय शिवायला खाली वाकलो तर मायला शर्टाच्या बाहीतून आपली "वस्तू" एकदम बाहेर पडली. आयला थेट बिहारमधून मागवलेला आठ इंची रामपुरी तो. बघून सायेबच धडपडत मागे सराकले. छगनबाप्पा तर ष्टेजवरून थेट खाली उडी मारून तेंच्या गाडीपर्यंत धावत गेले होते. दादा तेव्हडे निर्विकार बसून होते. तेनला रामपुरी काय शितापुरी काय सगळीच हत्यारं म्हाईत. त्यात हजाराची सभा समोर. आपला पार अरुण गवळी झाला राव. सॉरी म्हणून कसाबसा उचालला रामपुरी आन खाली मान घालून सायबांच्या मागच्या खुर्चीवर बसलो. हे आशी डबल कॅरॅक्टरची फिल्म सगळी. आपल्याला माहीत हे की आपन काय साधू नाय, कशाला साधूच्या कॅरॅक्टरमदे घुसायचं नाटक पायजे?

तेव्हा सायबांनीच आता खुल्लमखुल्ला सांगून टाकलं ते फर्ष्टक्लास काम झालं. मी येकदा तसं दादांना बोलून पाह्यलं होतं, आपन हे निवडणुका असल्या भांजगडी का करतो? तुमी निस्तं सांगा, आशी येवस्था करतो की, येक मानूस घराभायेर पडनार न्हाई. तुमी डायरेक्ट राज्यच करा. तवा म्हनले, आरे ही लोकशाही आहे. हितं लोकांनी मत द्यावं लागतं, कुनीच न्हाई भायेर पडलं तर कसं व्हईल? पन काम सोपं आहे. जे आपल्याला मत देणार न्हाईत हे म्हाईत आहे फक्त तेंनाच भायेर पडू दिऊ नको म्हंजे झालं. दादाचं टक्कुरंपण भारीच चालतं. सायेब सोतापन काय कमी न्हाईत. येकदा साताऱ्यात मतदान, थितुन परत मुंबईत येऊन डब्बल मतदान ही आसली आयडियेची कल्पणा सुचणं हे काय सामान्यपणाचं लक्षण न्हाई. तेला मुळातच भेजा तसा लागतो. आसा तर्राट भेजा फार कमी लोकान्ला आसतो. आसले भेजावाले आपल्याला एकदाच भेटले होते. आपन दोन वर्षं सजा काटली येरवड्याला. तिथं आसे एकापेक्षा येक हुते. पन तेनला भुरट्या गुन्ह्यांची आवड. तेनला मी बोलायचो, साल्यो, मोटा विचार आसू द्या. किती दिवस हे आसं दरोडे घालणार, सुपाऱ्या घेनार? पैशे भेटून भेटून किती भेटनार? शिवाय पोलिस कायम मागं लागलेले. हा भेजा आसा वाया घालवू नका, आमच्या पक्षात या, मोठ्ठी कामं करा. सायबांना तुमच्या गुणांची कदर हाये. वाया जाऊ देणार न्हाईत. आज पोलिस मागं घिऊन फिरताय, पक्षात या, हेच पोलिस तुमच्या फुडं फिरतील. तर ते लोक बोलायचे आपल्याला लोकांच्या तोंडावर हासून, गोड बोलून, त्यांच्या मागं मर्डर, दरोडे, चोऱ्या करायला आवडत न्हाई. गुन्हेगारला पन एक उसूल आसतो. ते आयकून आपन चीप बसलो होतो. खूप टॅलेंट वाया जानार याचं दु:ख झालं होतं. मंग फुडं "भायेर" आल्यावर येकदा सायबांना बोलून पन दावलं होतं. तेव्हा न्हेमीप्रमाणे सायेब गूढ हासून म्हणाले होते, शंकर, येईल, तो दिवस लवकरच येईल. आन आज तो दीस खरंच आला राव. कमळाबाईनं धोतरं फेडली सर्वांची, आन सगळ्यांना आपले मूळ धंदे आठवले. पन बरंच झालं, मानसाने आपला सोभाव कशाला बदलावा? आता मोकळेपनाने कार्य करू. येकदा आता येरवड्याला जाऊन येतो. भाईलोकांनला सांगतो, जसे आसाल तसे या, आन जसे आत्ता काम करता तसंच करा. तुमच्या उसूलाला आता ढका लागनार न्हाई. पक्षाचंबी काम हुईल. 

Thursday, June 26, 2014

दारूबंदी? विचार करा!

अलीकडे जो तो उठतो तो दारूबंदी दारूबंदी म्हणून ठणाणा करतो. ही एक फ्याशनच झाली आहे. दारू कशाशी पितात हेसुध्दा माहीत नसलेले लोक न पिता बरळू लागले आहेत. आपली दारू बंद म्हणजे शासनाचीही दारू बंद हे आपल्या लक्षात येत नाही. वास्तविक शासनाला दारूची महती कळते. एरवी बिलावर सह्या करायला अळमटळम करणारे रावसाहेब किंवा अण्णासाहेब, एकदोन पेग घशाखाली उतरले की बिलावरच काय, समोरच्या ग्लासखालच्या पेपर नॅपकिनवरही सही करतील. सैन्य जसे अन्नावर चालते तसे शासन दारूवर चालते असे म्हटले तर वावगे ठरू नये. थांबा, उगाच आक्षेप घ्यायला आ वासू नका, शासन दारूवर चालते याचा पुरावा खाली मुद्दा क्र ४ मध्ये दिला आहे. शासनाची दारू बंद करणे म्हणजे आपल्या अज्ञानाबद्दल शासनाला शासन केल्यासारखे आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही या विषयावर बारकाईने (कृपया या शब्दावर कोटी करण्याचा मोह टाळा, विषय गंभीर आहे) अभ्यास करून आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की दारूचे तोटे कमी आणि फायदे अधिक आहेत. आमच्या या अभ्यासाचा गाळीव (पुन्हा, कोटी टाळा!) परिपाक आपल्यासमोर ठेवत आहोत.
 
दारू पिणेपासूनचे फायदे -
१. रोजगार निर्माण - दारू डिस्टिलरी कामगार, बारबाला, बारटेंडर, बाटल्या गोळा करून चरितार्थ चालवणारे भंगारवाले, दारू वाहतूक करणारे चालक यांना रोजगारीची हमी. 
२. पाणी समस्येवर उपाय - आपल्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. बऱ्याच गावांत उन्हातान्हात पाच पाच मैलांवरून पाणी आणावे लागते. दारू नुसती पिऊन पाण्याची बचत होते. शिवाय दारू पिऊन चालल्यास पाच काय दहा मैलावरून जरी पाणी आणावे लागले तरी कळत नाही.
३. आरोग्य आणि शेतीसाठी फायदेशीर - दारूच्या सेवनाने वारंवार लघुशंका होऊन मूत्रमार्ग साफ राहतो आणि मुतखडे इत्यादी विकारांचा धोका टळतो. मूत्रविसर्जनातून अमोनिया, युरिया, पोटॅशिअम इत्यादि संयुगे निर्माण होऊन त्याचे रूपांतर नैसर्गिक खतांमध्ये होते. या खतांवर वाढलेले ऊस, मका यांपासून पुन्हा दारू निर्माण करता येते. अशा प्रकारे ही एक आत्मनिर्भर (सेल्फसस्टेनिंग) प्रक्रिया आहे.
३ अ. देशात योग्यप्रकारे दारूविषयी लोकजागृती (कृपया मुद्दा नं ३ पहा) केल्यास त्याद्वारे हरितक्रांती होऊन शेतीउत्पादन वाढून निर्यात वाढेल. त्यातून परकीय चलनाची गंगाजळी वाढेल.
४. देशसेवा - रोजगार निर्माणातून देशसेवा तर होतेच, परंतु दारूविक्रीतून सरकारला अफाट कर मिळतो जो सरकार गोरगरिबांना सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी खर्च करते. तात्पर्य - तुमच्या गावात चांगले रस्ते पाहिजेत तर दारूसेवन वाढवा. दारूडे चांगले रस्ते आणि वाईट रस्ते दोन्हींवरून एकाच प्रकारे लीलया चालतात. तसे दारू न पिणाऱ्यांचे नसते, त्यांना चांगले रस्ते लागतात. 
५. कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य - बहुसंख्य पिणारे दारू पिऊन घरी येऊन चीप पडून राहतात. नशेमुळे बायकोच्या बोलण्याचा त्रास होत नाही, शब्दाला शब्द वाढून भांडणे होत नाहीत. बायको कशीही असली तरी रूपसुंदरी वाटते. घटस्फोटांचे प्रमाण कमी होऊन एक आदर्श कुटुंब निर्माण होते. 
६. मुलांवर योग्य संस्कार - आपले वडील दारू पिऊन ज्या काही करामती आणि गावाची करमणूक करतात ते पाहून कसे वागू नये याचे संस्कार मुलांवर होऊन ती आदर्श नागरिक होऊ शकतात. 
७. आत्मिक उन्नती - संतानी "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा म्हणावा तसा अर्थबोध घेतला गेला नाही. आज संतांच्या या शिकवणुकीची अत्यंत गरज आहे. आपण मर्त्य मानव संत होऊ शकत नाही, परंतु त्यांची शिकवणूक आचरणात तरी आणू शकतो. दारू प्या, जसे अडखळत बोलता, तसेच अडखळत चाला आणि संतपदी पोहोचा. याशिवाय दारू प्यालेल्याला अचानक खरे बोलण्याची शक्ती प्राप्त होते. न घाबरता एखाद्याविषयी (यात बरेच वेळेला पत्नीचा अंतर्भाव असतो) आपले खरे काय भाव आहेत हे तो व्यक्त करतो. याउलट ज्यांचा तो नेहमी द्वेष करतो त्यांच्याविषयी त्याच्या मनात प्रेमभाव उत्पन्न होऊन त्यांना,"तूही मेरा एक सच्चा यार है" असे बोलण्यापर्यंत त्याची आत्मिक उन्नती होते. शत्रूवर असे प्रेम करणारा संतांशिवाय कोण आहे बरे? निदान काही काळ तरी (साधारणपणे सकाळपर्यंत) हे त्याचे संतपण टिकते.

म्हणूनच "दारू सोडा" ही घोषणा प्रत्यक्षात "दारू आणि सोडा" अशी आहे हे लक्षात घ्या. दारूची कास धरा अन राष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक आणि आत्मिक उन्नतीचे सोपान चढा. अजिबात दम लागणार नाही याची ग्यारंटी.

Wednesday, June 25, 2014

डोहाळे

गेले एक महिनाभर अस्वस्थ आहोत. कशाने असे होत आहे हे समजत नव्हते. कधी हसावेसे वाटायचे, कधी अशक्य चिडचिड व्हायची, कधी नुसतेच सौधात बसून आकाशात नजर लावून बसायचे. काही दिवसांपूर्वी धनाजी मुजऱ्याला आला तर त्याच्यावर विनाकारण खेकसलो. अचानक आयुष्यात कधी खाव्याशा न वाटलेल्या गोष्टी खाव्याशा वाटू लागल्या आहेत. आंबटचिंबट वस्तूंपासून आम्ही नेहेमीच दूर राहत आलो आहोत. नाही म्हणायला हिंग लावलेले ताक आम्हांस आवडते, परंतु ते पाचक म्हणून. आम्लपित्ताचा त्रास होऊ नये म्हणून आणि पोटात थंडोसा राहावा म्हणून. मातोश्री आम्हांस नेहमी सांगत, शंभूराजे, आपला स्वभाव कोपिष्ट, रागीष्ट आणि प्रकृती तोळामासा. तुम्ही मेंदू आणि पोट दोन्ही शांत ठेवावयास हवे. मेंदूवर औषध नाही, पण पोटावर आहे हो. एवढे ताक पीत जा दररोज. तर मुद्दा हा की ताक सोडले तर आम्हांस आंबट काही आवडत नाही. पण अचानक दात शिवशिवू लागले. गाभुळलेली चिंच पाहून तोंडात पाणी सुटले अन कानशिलात कळा येऊ लागल्या. पूर्वी कधी चिंच खावीशी वाटली नव्हती. नाही म्हणायला लहानपणी वात्रटपणा करायला ती वापरली होती. लग्नात सनईचौघडा सुरू झाला की आम्ही सनईवाल्यासमोर छान गाभूळलेली चिंच चोखत उभे राहायचो. सनईतून फुर्रफुर्र सुरू झाले की धूम ठोकायची. त्यावरून मातोश्रींनी एकदा आम्हांला बदडलेपण होते. कुणी डोक्यावरून कैऱ्यांची पाटी घेऊन आला तर छानपैकी तिखटमीठ लावून कैरी खावीशी वाटू लागली. तडक मुदपाकात वर्दी देऊन आलो, आजच्या भोजनात करमठलं हवं. कधीकधी उगाचच रडू येऊ लागले. तू असाच रड्या असे इंद्रवदन राजे आम्हाला हिणवत असतातच, ते आठवून आणखीच खिन्न वाटू लागले. आमच्या दालनात आम्ही महाराष्ट्राचा गोंडस फोटो लावला आहे. म्हाराष्ट्राचा चेहरा म्हटलं म्हंजे आमच्या डोळ्यासमोर येकदम बाळबोध छबी उभी राहते. निरागस मूलच जणू. आईने छान आंघोळ घालून, भांग पाडून, पावडर लावून शाळेसाठी तयार केलं आहे. अर्धी चड्डी, त्यात खोचलेला धुवट स्वच्छ सदरा. दृष्ट लागेल हो, असं म्हणून आज्जीने गालावर काजळाचा एक ठिपका लावायला सांगितला आहे. या बाळाची नजर खटयाळ आणि चौकसपणे सर्वत्र भिरभिरत आहे. या चिमुकल्या मेंदूत किती ज्ञान सामावून घ्यावं आणि किती नको असं त्याला झालं आहे. हे असं छान चित्र असताना त्यावर एकदम फराटा ओढल्यासारखं त्या गोंडस बाळाचा चेहरा बदलूनच टाकायला हवा असे वाटू लागले. त्या गोंडस चेहऱ्यावर दाढीमिशा काढाव्यात असे वाटू लागले. प्रयत्न करून तो विचार आम्ही दाबून ठेवला आहे. महिन्याभरापूर्वी उत्तम मार्कांनी परीक्षा पास झालो. त्याबद्दल छान नाचूनही झाले. पण अचानक कॉपी करून पास झाल्याची भावना झाली. आम्ही मुळीच कॉपी केली नसताना हे असं का वाटावं बरं? कॉलेज जीवनातही आमचं असंच व्हायचं. परीक्षेत कठीण प्रश्नांना विषयाला साधारण स्पर्श करेल पण ठोस असे काही नाही या प्रकारची उत्तरे आम्ही देत असू आणि रिझल्ट लागेपर्यंत रोज मारुतीच्या देवळात हजेरी लावत असू. मातोश्री विचारायच्या, काय राजे, पेपर कसे गेले? त्यावर खालच्या आवाजात ज्या दारातून आले त्याच दारातून परत गेले असे वास्तवपूर्ण उत्तर देण्याऐवजी "चांगले गेले" असे दिले जायचे. त्या माऊलीचा आमच्यापेक्षा देवादिकांवर जास्त विश्वास असल्यामुळे मान हलवत ती आमच्या नावाने आणखी एखादे व्रतवैकल्य, नवस बोलायला निघून जात असे. एकदा तर एका पेपरमध्ये जितक्या मार्कांचे प्रश्न सोडवले होते त्यापेक्षा पाच मार्क जास्तच पडले! पंचांगात घबाडयोग वगैरे योग असतात ते हेच असावेत काय? तसंच आत्ताच्या परीक्षेतही झालं असावं असं वाटू लागलं आणि जास्तच नैराश्य आलं. रात्रीअपरात्री छातीवर कुणीतरी "अवजड" ओझं टाकलं आहे आणि आम्ही ते आरामात पेलतो आहोत असं वाटत असतानाच अचानक ते अंगावर पडून आम्ही चेंगरलो गेलो आहोत असं वाटून अचानक जाग येते. घाम सुटलेला असतो. पण मग एकदम काहीतरी खावेसे वाटू लागते. काल हळू पावलांनी मुदपाकात गेलो तर आमच्याच रक्षकाने "कोण आहे रे तिकडे!" असे जरबेने आम्हालाच दरडावले. मग मुकाट्याने परत येऊन मंचकावर पडलो. धनाजी डॉंक्टरांना दाखवा म्हणू लागला आहे.

काल सदरेवर बसून चिंतन करत होतो. आमच्यापुढील वाढलेल्या जबाबदाऱ्या, समस्या इत्यादि गोष्टींवर विचार करत असताना डुलकी लागली असावी. महाराष्ट्राचा चेहरा दिसू लागला. नुकतेच जावळ काढले आहे. पण काळ्याभोर केसांचा पट्टा जाऊन तिथे मुंबईनगरीत आडवेतिडवे उड्डाणपूल बांधावेत तसे डिझाईन राहिले आहे. काही पट्टे तर अर्धवटच सोडले होते. च्यायला हे काय जावळ आहे? असे संतापाने आम्ही म्हणणार एवढयात आमचा जयजयकार कानी पडला. आमच्या जयजयकाराने आम्ही नेहमीच सुखावतो. महाराष्ट्राचा चेहराबिहिरा गायब होऊन एकदम आमचे सैनिक दिसू लागले. "शंभूराजेंचा विजय असो! तुम्हीच आमचे राजे! महाराष्ट्राचे राजे!" असा उद्घोष ऐकून मन सुखावले. कसचे कसचे असे म्हणत त्यांस म्हणालो,"महाराष्ट्राचे राजे व्हायचे नंतर बघू. त्यासाठी प्रथम राज्य जिंकणे आवश्यक आहे. किल्ल्यावर झेंडा फडकावण्याआधीच त्यातील महालांची वाटणी नको. शत्रूपक्षाचे लोक आमची थट्टा करतात. त्यांना आमचे असे सांगणे आहे की दिल्लीच्या लढाईत तुमची सुरवार पृष्ठभागी उसवली आहे ती आधी शिवून घ्या. आमच्या सुरवारीची चिंता करू नका. आम्ही आमची सुरवार इलॅस्टिकची बनवून घेतली आहे. माझे स्वप्न आहे - माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र! सैनिकहो, नीट लक्ष देऊन ऐका, मी भ ग वा असे म्हणालो आहे. तुम्ही तुमच्या नेहेमीच्या बोलीभाषेतील सवयीचा शब्द वापराल आणि माझी पंचाईत कराल." सैनिकांनी जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. आमच्या चेहऱ्यावर सुखावून मंद हास्य पसरले.

तेवढ्यात कुणीतरी आमचा खांदा हलवून या गोड स्वप्नातून बाहेर आणले. तर समोर धनाजी! संतापून त्यांस म्हणालो,"छान स्वप्न पाहत होतो तर आलास त्याचा भंग करावयास! काय आणले आहेस आता?"
धनाजी म्हणाला,"राजे, आपण झोपेत रडता, हसता, ओरडता. आत्तासुद्धा स्मित हास्य करत काही तरी असंबद्ध बोलत होता. मला चिंता वाटली म्हणून जागे केले. क्षमा असावी. शिवाय डॉक्टरांचा रिपोर्ट आला आहे."
"असं? काय म्हणताहेत?" - आम्ही.
धनाजी हसून म्हणाला,"चिंतेचे कारण नाही असं म्हणतायत. या अवस्थेत असं होतंच म्हणे. आता माझ्यापण लक्षात आलं. आमची कारभारीण पोटुशी होती तेव्हा असंच करायची. एकदा तर मध्यरात्रीला भेळ आणायला हाकललं होतं मला."
आम्ही म्हणालो,"अरे काय फालतू बडबडतो आहेस धनाजी? कसली अवस्था?"
तर धनाजी म्हणाला,"राजे, गोड बातमी आहे! हे डोहाळे आहेत राजे! आपण नक्की महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजे होणार…असं…"
आम्ही गळ्यातील हार काढून त्याच्या दिशेने फेकला! "धनाजी! दिल खूष करून टाकलंस!"
धनाजी खाली मान घालून हार परत करत म्हणाला,"राजे, थांबा. मी म्हणत होतो, आपण नक्की महाराष्ट्राचे अनभिषिक्त राजे होणार…असं आपल्याला वाटतं, त्याचे हे डोहाळे लागताहेत. झालात तर थांबतीलच, न झालात तरी थांबतील, औषधाची गरज नाही असं डॉंक्टरांचं म्हणणं आहे…"

Monday, June 23, 2014

बहुजन हिताय बहुजन सुखाय

आम्ही कित्येक दिवस कानीकपाळी ओरडून सांगत होतो ते आता प्रत्यक्षात येणार! एअर इंडियाचा स्वत:वर खूष असणारा म्हाराजा जाऊन आता आपला अस्सल कॉमन मॅन विमानात कांबळं टाकून बसलेला दिसणार. है शाब्बास! आपला जन्म येष्टीच्या लाल पिवळ्या डब्यातून प्रवास करण्यात गेला. येष्टीतून प्रवास करण्याची जी मज्जा आहे ती कशातच नाही. ष्ट्यांडावर गेल्यावर कसं घरच्यासारखं वाटतं. ऊन रणरणत असते. माशा घोंगावत असतात. कधी चाळीस पन्नास साली लावलेले पंखे स्वत:भोवती फिरून इकडची गरम हवा तिकडे करत असतात. घामाच्या धारा लागलेल्या असतात. कुठल्या तरी गावाकडं जाणारी बस कुठल्या तरी फलाटावर लागलेली आहे याची घोषणा अगम्य ठिकाणी लावलेल्या कर्ण्यातून चालू असते. वास्तविक त्या घोषणेने कुठल्याही बहुजनाचे हित होत नाही आणि सुख तर मुळीच होत नाही. पण बहुजन हिताय बहुजन सुखाय ठणाणा चालू असतो. गावकल्डं आलेली मान्सं शिमिटाच्या किंवा लाकडाच्या बाकावर मंडळी कशी छान पसरून ऐसपैस पसरलेली असतात. कुणाची कानकोरणीनं समाधी लागलेली असते, कुणी निस्ताच शून्यात नजर लावून बसलेला असतो. बायामान्सं डुईवरनं पदर घ्येऊन बसल्याली आसतात. ओळखीतली गडीमानसं चंच्या सोडून बसलेली असतात. च्या बायली, येष्टी कुठं पळून जाती का मर्दा, बस जरा निवांत. आन तंबाखू काड वाईच. आरं हिरीचा पंप बंद पडल्याला हाय. ह्ये आत्ता मोटर वांयंडिंग करून घ्येऊन चाललोय मर्दा, सांजच्याला पाणी सुटलं पाह्यजे शिवारात. म्हातारं लय कावलंय. आसं कायबाय बोलत असतात. आणि मग बस आली की मग जे काही हर हर महादेव होते त्याची तुलना हातघाईच्या लढाईशीच होऊ शकते. जे काही हातात मिळेल ते शस्त्र घेऊन मंडळी गाडीवर तुटून पडतात. रुमाल, वर्तमानपत्र, टोपी, छत्री, पिशवी (रिकामी अथवा भरलेली) ही ती मान्यताप्राप्त शस्त्रे. ही शस्त्रे बसच्या खिडकीतून आत टाकली की त्या शीटचा सातबाराचा उतारा मग आपल्याच नावे झाला असे समजायचे. एकदा तर एका भाद्दराने आपल्या पोराला "संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून" आत टाकलेले मी पाहिले होते. नंतर त्या कार्ट्याच्या करामती पाहून संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून संकट आतपण येते याची खात्री पटली होती. मग आत गेल्यावर किरकोळ हमरीतुमरी करून जागा ताब्यात घ्यायची आणि आजूबाजूच्या शिटावरपण पिशव्या ब्यागा टाकून चतु:सीमा सुरक्षित करायच्या. मग कंडक्टर बोटीच्या क्याप्टनच्या रुबाबात येणार, बस कुठे जाते ते सांगण्याऐवजी कुठे जात नाही ते सांगणार. ते सांगितल्यावर एक दोन जण धडपडत उतरणारे असतातच. बस थांबणार नाही हे ऐकूनही मुर्दाडपणे बसून राहणारेही एकदोघे असतात. मग? दोन मिन्टं थांबत न्हाय व्हय? हे आशी थांबतीय न थांबतीय तोवर आम्ही उतरतोय बघा, हे वर कंडक्टरला सांगणार. हे सांगणारे कंडक्टरच्याच राखीव सीटवर बसलेले असणार. तिथून हाकललं की निवांत ड्रायवरच्या केबिनमध्ये जाऊन बसणार. एकूण छान सगळी लोकशाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकउपक्रम म्हणजे यष्टी म्हामंडळ. सर्वांना समानतेने वागवणारी संस्था. यष्टीच्या डब्यात फर्स्ट किलास नाही आणि थर्ड किलास नाही. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अडाणी, सुशिक्षित सगळे एकाच अधिकाराने "यष्टी काय तुझ्या बापाची व्हय रं" असे एकमेकाला म्हणू शकतात. अशी राष्ट्रीय एकात्मता आणि समानता जोपासणारा हा उपक्रम जरा उपेक्षितच राहिला आहे याची आम्हाला खंत वाटते.

म्हणूनच आम्ही सांगत आलो, उपक्रमांचे राष्ट्रीयीकरण करू नका, त्यांचे यष्टीकरण करा. विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण झाले, त्यावर म्हाराजा आला आणि तिथे घोडे अडले. आता विमानावरच महाराजा म्हटल्यावर गरिबांनी कुटं जायाचं हो? सोता म्हाराज विमानात तर पर्जा जिमिनीवर आलीच. म्हाराजांच्या समोर आन गाढवाच्या मागं हुबं ऱ्हायचं नाही हे जन्तेला ठाऊक आहे. सगळ्या सोई म्हाराजांच्या सवयीपरमाणं. कशी काय परजा प्रवास करणार? जन्तेच्या सवयींप्रमाणं सोयी नकोत? जरा विमानाला उशीर हाय, वाईच तंबाखू खावी म्हटलं तर पिंक कुठं मारायची? विमान कुठल्या फलाटाला लागलं तेबी दिसत न्हाई. टीव्हीच्या श्क्रीनवर आमचा दोन यत्ता शिकलेला म्हादबा वाचणार काय आन कसा? यासफ्यास करत घोषणा दिलेल्या काय उपेगाच्या? म्हणून आमचा आग्रह होता, विमान कंपन्यांना समाजाभिमुख करा. त्यांना वास्तवतेच्या जवळ आणा. अच्छे दिन येतील तेव्हा येवोत, पण सच्चे दिन तरी आणा. आन आमची मागणी येकदम मान्यच झाली. आता येकदम राष्ट्रीय एकात्मताच एकात्मता. आजीर्ण होईपर्यंत. कुणीपण पन्नास पैशाचं रिझर्वेशन करावं आन विमानात शिट पकडावी. आम्ही तर म्हणतो एअर इंडिया यष्टी म्हामंडळाच्या ताब्यात चालवायला दयावी. मंडळानं पुढील सुधारणा आणि नियम केले की मग भार्ताचं नं  द  न  व  न!
  • गाव तेथे विमानतळ 
  • वस्ती तेथे थांबा  (वाट पाहीन, पण म्हामंडळाच्या विमानानंच जाईन)
  • विनाथांबा सेवा (हात दाखवा विमान थांबवा योजनेवर विचार चालू आहे. काही अपरिहार्य तांत्रिक अडचणींमुळे अद्याप ही सेवा सुरू करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व)
  • १२ वर्षांखाली मुलांस अर्धे तिकीट (शाळेचा दाखला अनिवार्य)
  • विनातिकीट प्रवाशास दंड आणि/अथवा लगेच खाली उतरवण्यात येईल (यावर तांत्रिक अभ्यास चालू आहे)
  • महिना पास योजना 
  • क्षमता - ५० बसलेले प्रवासी, १२ उभे प्रवासी
  • विमान चालू असताना खिडकी उघडून थुंकू नये, हात बाहेर काढू नये
  • विमान चालू असताना पायलटशी बोलू नये
  • ३० किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान टपावर अथवा विमानाखाली टाकावे
  • विमानात धूम्रपानास सक्त मनाई आहे
  • दुरुस्तीसाठी विमान आगारात गेल्यास प्रवाशांनी विमानतळावर थांबणेचे आहे
  • क्रू चेन असल्यास बदली पायलट येईपर्यंत विमान सुटणार नाही. वारंवार चौकशी करू नये. 
आता भारतातल्या सगळ्या म्हाराजांनी कुटं जावं या चिंतेत आम्ही आहोत. कॉंमन मॅन विमानातनं फिरायला लागल्यावर यष्टी आमची मोकळीच फिरणार की हो. सगळ्या म्हाराज लोकांनी यष्टीचा पास काढावा हे बरं!

Wednesday, June 18, 2014

चार बच गये, पार्टी अबभी बाकी है


फिल्म - आपटू
Plot - The story revolves around a group of friends AK, Bhushan, Yadav and Shajiya. All have received extremely bad marks in anything they have done in their life, except Anna. Anna has passed with top marks and has received accolades for his work. In order to make their parents happy these four created a fake university titled Arwind Adeltattu Padeltattu (AAPTU). AK becomes a fake principal. They are immediately joined by other zealots. People indeed start sending their kids to this university and they had to make this university an official one. As expected, AAPTU could not deliver, people are not happy. Things have gone too far, soon people find out about this fake university and take their kids out. AK has to go to jail. Already bankrupt, they do not even have money to bail him out. As AK and his friends are the only one remain in the university, they now must figure out a way to keep AAPTU alive.

कलाकार - प्रिन्सिपॉलच्या भूमिकेत स्वत: एके, रूपगर्विता पी मेधा, खास भूमिकेत - सौंदर्याचा अॅटम बाँब, सोमनाथ  आणि इतर नेहेमीचेच यशस्वी 

आज है फ्रायडे नाईट मैं चलू जेलदोस्तोंके साथ
बार बार याद आये मेरी वॅगन आर
लेके अपना झाडू मैं झाडू भ्रष्टाचार
एव्हरीबडी वॉण्टस के मेरे दे कान फाड , से व्हॉट
हेलो मिस्टर एके, मेरा गाना प्लीज प्ले
आज नो व्हाईन, आज नो डाईंग, हो गया ठंडा कँपेन
बा बा बा भूषण, शाजिया अँड मी लूझिंग
व्होटर पंगा लेता है तो, गॉट्टा कीप इट मूव्हिंग
चार बच गये, लेकिन पार्टी अबभी बाकी है
बा बा बा बा बा बा बा बा
सारे गिर गये लेकिन पार्टी अबभी बाकी है
बा बा बा जस्ट लूझ देअर, जस्ट लूझ इट
सोनिया मॅडम है नाराज, पार्टी अबभी बाकी है
बा बा बा व्हॉट अ शेम एह?
दिल्ली में गई बिजली, पार्टी अभी बाकी है

आ आ आ आगे क्या करेंगे मित्रो
सारी इज्जत खो दिये इन द फियास्को
अरे बेल लगी है पैसा दो
अरे जेल हुई है पैसा दो
बांबू लगी है कॉंग्रेसका था ट्रॅप
विलैती पैसा खा गये बा देसी अबभी बाकी है
हेलो मिस्टर एके, मेरा गाना प्लीज प्ले
आज नो व्हाईन, आज नो डाईंग, हो गया ठंडा कँपेन
बा बा बा भूषण, शाजिया अँड मी लूझिंग
व्होटर पंगा लेता है तो, गॉट्टा कीप इट मूव्हिंग
चार बच गये, लेकिन पार्टी अबभी बाकी है
बा बा बा बा बा बा बा बा
सारे गिर गये लेकिन पार्टी अबभी बाकी है
वी लॉस्ट ऑल अवर मनी लेकिन पार्टी अबभी बाकी है
आय एम द ओन्ली वन इन द पार्टी, मेरी चड्डी बाकी है
बा बा बा
कॅन आय गेट टू गो?

(फिल्म - आपटू से साभार)

महाराष्ट्राचे वाकडे सूत

"अरे, एकदा हा महाराष्ट्र माझ्या हातात द्या, मग पहा कसा सुतासारखा सरळ करतो!" पायजम्याची नाडी हातात घेऊन इंद्रवदन सरकार गरजले. समोर खुर्चीवर त्यांचा पायजमा लोळागोळा होऊन पडला होता. त्या पायजम्यात नाडी ओवायचा त्यांचा विचार होता. त्यांनी राणीसरकारांना विनंती करून पाहिली होती, पण त्यांनी तुमचं हे पायजम्याचं आणि नाडीचं नेहमीचंच आहे, तुम्हीच ओवत बसा असं सांगून झटकून टाकलं होतं. त्या चिंतेत असतानाच छोटूचे आगमन झाले होते. इकडच्या तिकडच्या बित्तंबातम्या सांगून झाल्यावर छोटूने महाराष्ट्राची परिस्थिती ठीकठाक असल्याचे अनुमान सांगितले. ते ऐकून सरकार उखडले,"कसली बोडक्याची ठीक परिस्थिती? माजलेत सगळे!" "मला आपल्याशी काही बोलायचंय"च्या बोर्डाने वादळी हवा निर्माण होऊन महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार अशी हवा निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात शनिवारवाड्यासमोरील पटांगणात कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण होऊन त्याचे संगमावर विसर्जन झाले. वास्तविक त्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देऊन पुण्यातील लोक प्रचंड संख्येने जमा झालेले पाहून इंद्रवदन सरकार उत्साहित झाले होते. पुण्यातील लोक "कापसाला भाव का मिळत नाही?" अशा विषयापासून "मी पाहिलेला जपान" अशा विषयापर्यंत सर्व भाषणांना तितक्याच उत्साहाने हजर राहून टाळ्या वाजवतात हे त्यांच्या ध्यानात नव्हते. सरकारांच्याही भाषणाला हशा आणि टाळ्या यांचा पाऊस पडला. हा टाळ्यांचा पाऊस असाच पडत राहायला हवा असे त्यांना वाटू लागले. त्या उत्साहाच्या भरात जिथे टाळ्या हव्यात तिथे हशा आणि जिथे हशा हवा तिथे टाळ्या पडत होत्या हे त्यांच्या ध्यानात आले नाही. मराठी चतुर रसिक, नाटक आणि भाषण पाडण्यासाठीसुद्धा टाळ्या वाजवतात याचे भान त्यांना राहिले नाही. आपल्या भाषणाने सैनिकांत आणि प्रजेत प्रचंड वीररस उत्पन्न होऊन त्याचे रूपांतर आपल्या विजयातच होणार असे वाटत असतानाच प्रजेची पावले बटाटेवडे आणि भेळेच्या स्टोंल्सकडे वळलेली पाहून ते अवाक झाले. "अरे मी काय इथे सर्कशीचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ लावला होता काय रे? खेळ पाहून झाला, आता चालले मजा करायला." त्यांचा संताप अनावर झाला. "लेकाचे माजले आहेत. एकेकाच्या ढुंगणावर हंटर पाहिजे हंटर! एवढा महत्वाचा संदेश मी जीव तोडून देतोय. अरे मी स्वत: राज्यग्रहण करायला तयार आहे! नव्हे ती राज्याची गरजच आहे. आज राज्यापुढे अनेक समस्या आहेत. प्रश्न आहेत. त्या समस्या सुटल्या पाहिजेत, प्रश्नांची उकल झाली पाहिजे. नुसता वेळकाढूपणा उपयोगाचा नाही. गुद्द्यांची लढाई नको मुद्द्यांची हवी. आणि हे अमृतमंथन ऐकून यांच्यावर काय परिणाम झाला? चालले नाटकसिनेमा सुटल्यासारखे भेळ, वडे खायला! हे पूर्वीपासून अस्सेच चालू आहे. सगळ्यांना नुसती फुकट्यात मज्जा बघायला हवी. कामधाम सोडून डोंबाऱ्याचा खेळ पाहायला गर्दी करतील. तोही जादू किंवा कसलीतरी अफलातून करामत दाखवतो असे सांगत उगाच अर्धा पाऊण तास बडबड करील. प्रत्यक्षात तो काही करणार नाही हे सर्वांना माहीत असते, तरी पण टाईमपास म्हणून चकाट्या पिटत उभे राहतील. बडबड करून दमल्यावर डोंबाऱ्याने पैशासाठी कटोरा पुढे केला की मग मात्र एकेकजण फुटेल. डोंबारी काय बडबडत होता हे एकाच्याही लक्षात असेल तर शपथ. अर्थात तसे ते डोंबाऱ्याच्या तरी लक्षात कुठे असते म्हणा. पण मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या या उडाणटप्पू वृत्तीचा. कशाचे गांभीर्य म्हणून नाही. सगळ्याचेच हसे करायचे. आम्ही आंदोलन करायला रस्त्यावर उतरू अशी गर्जना केली की "इंद्रवदन राजे, तुम आगे बढो" म्हणून आरोळ्या ठोकणार. आम्ही खरोखर रस्त्यात उतरलो की हे "तुम्ही व्हा पुढे, मी आलोच दोन मिनिटात" म्हणून घरी जाऊन जेवणाचे ताट समोर घेऊन पुढला तमाशा टीव्हीवर बघणार.

आम्हीही उत्साहाच्या भरात काहीतरी बोलून जात असतो. महाराष्ट्रासाठी आम्ही आमचे सर्वस्व अर्पण करू अशी आम्ही उक्ती केली होती. तर महाराष्ट्राने ते मात्र लगेच उचलून धरले. अरे, अलंकारिक भाषा म्हणून काही प्रकार असतो की नाही? आम्ही बोललो त्याचा शब्दश: अर्थ लावायचा? शब्दश:च अर्थ लावायचा ठरवला तर आपल्या मराठी रंगभूमीचं काय होईल? बरं, आम्ही एक सर्वस्व अर्पण करू, आमच्या नावावर एकही प्रॉपर्टी नाही, पण तुम्ही थोडी तरी मदत कराल की नाही? सगळे लेकाचे चोर. असे रस्त्यात उतरून उतरून आम्ही आज खरोखरचे रस्त्यावर आलो आहोत. थोरल्या वाड्यातून निघताना ही पळवलेली तलवार आणि परळच्या बाजारातून आणलेली ही ढाल एवढेच आता उरले आहे. एकदा! फक्त एकदा हा महाराष्ट्र माझ्या हातात द्या रे! मग बघा कसे सुतासारखे सरळ करतो सर्वांना. छोट्या, तूर्तास जरा एवढी नाडी सरळ करून दे रे, किती वेळ प्रयत्न करतो आहे लेकाची पायजम्यात ओवताच येत नाहीये."

Sunday, June 15, 2014

धूसर पाऊलवाटा

संस्कृतीचं काय करायचं हा एक प्रश्नच आहे. पूर्वी हा एक जाज्वल्य विषय होता. आता तो ज्वलंत झाला आहे. वास्तविक संस्कृतीसारखा सोज्वळ शब्द, कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, कुणी जोपासा किंवा नापासा, कुणी द्वेषाने उच्चारा किंवा त्वेषाने त्याला तलवारीसारखे उपसा, कश्शाला म्हणून विरोध नाही. पण प्रत्येक पिढीने आपण संस्कृती कशी विसरत चाललो आहोत याची खंत करायची, आणि पुढच्या पिढीने जुने जाऊद्या मरणालागुनि म्हणायचे. संस्कृती म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? सणवार, देवदेवस्की, व्रतवैकल्यं एवढ्यातच ती सामावलेली नाही. मोठ्या माणसांच्या पाया पडणं, चुकून पाय लागला तर आपोआप पाय शिवून नमस्कार करणं, घरी आलेल्याचं अनोळखी असला तरी आपुलकीने आदरातिथ्य करणं, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश न करणं, दृष्ट लागू नये म्हणून ओवाळणं, सणाला दारावर तोरण बांधणं अशा किती तरी गोष्टी आपली संस्कृती ठरवत असतात. अलिखित नियम म्हणून पाळल्या जाणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपली संस्कृती ठरवून जातात. पुण्यात जन्मला असाल तर सायकल अथवा स्कूटरवरून जाता जाता देवळाकडे नुसतं पाहून कपाळ आणि छातीला स्पर्श करणं, अथवा दुपारी दाराची बेल वाजवली तर ते न उघडणं, अगदी उघडलंच तर कमालीच्या त्रासिक चेहऱ्यानं बोलणं, या गोष्टीसुद्धा संस्कृतीतच मोडतात. कालानुसार आपण बदलत गेलो, पण संस्कृती टिकत नाही याची खंत करत. संस्कृती टिकावी असं का वाटतं आपल्याला? आणि सोयीनुसार चालीरीतीत, धार्मिक कर्मात शॉर्टकट मारणारे आपण, नक्की कसली संस्कृती टिकवतो आहोत? स्नान करून शुचिर्भूत होऊन श्लोक, मंत्र आणि तंत्र पाळून घरच्या देवाची पूजा होत असे. ती आता सकाळी उठून नोकरीवर जायच्या गडबडीत आंघोळ उरकून कशीबशी देवासमोर उदबत्ती फिरवून दंडवत टाकून होऊ लागली. सत्यनारायणाची पूजा चक्क कॅसेट लावून होऊ लागली. या झाल्या देवाधर्माच्या गोष्टी. नुसता देवधर्म म्हणजे संस्कृती नाही. वडीलधारे पाहुणे आले की अगदी पायावर डोके ठेवले जायचे ते नंतर नुसते वाकून पावलांना स्पर्श करण्यापर्यंत आले, आताची हाय हेलो पिढी तेवढेसुद्धा करताना दिसत नाही. अर्थात त्याचा अर्थ तरुण पिढी उद्धट आहे असा अजिबात नाही, संस्कृतीच्या नावाने गळे काढणारी त्यांची आईबापे, आपल्या पुढच्या पिढीला वाकून नमस्कार करायची संस्कृती देताहेत का? वयाच्या तिशीपर्यंत अंगात तरुणपणाचा जोष असेपर्यंत संस्कृती टिकवायची वगैरे आहे याचे मुळीच भान नसते. चाळीशी ओलांडली की अचानक संस्कृतीचा उद्घोष चालू होतो. मग मुलांना संस्कृतीचे अपचन घडवणाऱ्या कुठल्या तरी रटाळ कार्यक्रमात भाग घ्यायला भाग पाडले जाते.  इतक्या वर्षांत कधी असल्या कार्यक्रमांचे नाव न काढणारे आपले आईबाप आता संस्कृतीबद्दल एवढे आग्रही का होऊ लागले आहेत याचा मुलांना प्रश्न पडतो. याच आईबापांना छान सुटाबुटात पार्ट्यांना जाताना त्यांच्या मुलांनी पाहिलेले असते. जाताना डेझिग्नेटेड ड्रायव्हर कोण याची चर्चासुद्धा ऐकलेली असते. तीच आईबापे छान भारतीय संस्कृतीचा वेष करून देवळात जातात, पुजाऱ्याने तळहातावर टाकलेले तीर्थ अत्यंत भक्तिभावाने प्राशन करून तो ओला तळहात डोळ्यांवर लावून टाळूवरून फिरवतात. यांच्या आधीच्या पिढीचे हे धाडस नव्हते. आधीच्या संस्कृतीत हे बसलेही नसते. मग ती संस्कृती कुठे गेली?

कालानुरूप बदलते ती संस्कृती. किंबहुना बदल हीच आपली संस्कृती असावी. मग टिकवायचे काय आणि कसे? प्रत्येक पिढीची सुरुवात बंडखोरीने होऊन आधीच्या संस्कृतीपासून दूर जाण्यात होत असते. त्याच पिढीला उताराला लागले की मग आठवणी येऊ लागतात. कसे आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून तेल उटणे लावून स्नान करीत होतो, पायाखाली कारीट फोडत होतो, थंडीचे दिवस असायचे, परसात छान शेकोटी पेटवून त्याभोवती शेकत उभे राहायचो. पायाखाली कारीट का फोडायचं, मुळात कारीट म्हणजे काय असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटू नये. संस्कृतीचा आणखी एक छोटासा भाग लय पावला असे समजूया. एकत्र कुटुंबपध्दती हाही एक संस्कृतीचाच भाग होता. भरलेल्या घराला आजही गोकुळ असा शब्द वापरला जातो. गोकुळ या नावातच समृद्धी, समाधान, रेलचेल असे सर्व येते. नुसती संपत्तीची समृद्धी नव्हे तर, नात्यांचीही. घरातील कर्ते माणूस म्हणजे बऱ्याच वेळा आजोबा असायचे. काका, वडील, आत्या ही तरुण पिढी नुकतीच उमेदवारी करायला लागलेली असायची. लग्ने, मुलेबाळे लवकर होत. मुले काका, आत्या, चुलत भावंडे, आजोबा, आजी, शिक्षणासाठी राहिलेले मावस, मामेभाऊ, अशा गोतावळ्यात वाढत. घरेही मोठी असत. घरे कसली, वाडेच असत. पुढे हे वाडे पडले, नुसते पडले नाहीत तर एकत्र कुटुंबपद्धतीही घेऊन गेले. प्रगतीची व्याख्या काय आहे ते माहीत नाही, पण प्रगतीच्या नावाखाली आपण सोयीस्कररीत्या गोकुळाला तिलांजली दिली. त्याबद्दल कुणी अश्रू गाळल्याचे दिसले नाही. बहुतेक भावजयांनी सुटकेचे नि:श्वास टाकले असावेत. "बरंच झालं, कसला दगडी वाडा तो, काही सुधारणा करायची म्हणून सोय नाही. शिवाय दार सदैव ते उघडे. आता ब्लॉक घेतला ते बरं झालं बाई.  जरातरी प्रायव्हसी मिळेल." असे उद्गार काढले गेले आणि ती संस्कृती संपली. अशा ब्लॉकवाल्या संस्कृतीत वाढलेली मुले फक्त आईबाप एवढेच कुटुंब असे समजून वाढलेली. आते, मावस, मामे भावंडं कझिन्स झाली. ही मुले करियरिस्ट झाली. पुढे उच्च शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी दूर निघून गेली. त्यांचे ब्लॉकवाले आईबाप आता एकटे उरले, पूर्वी एकत्र असताना कसे एकमेकांना धरून असायचो, एकटेपण वाटायचे नाही याच्या आठवणी काढत बसायचे. मुलांना आपल्या संस्कृतीची आठवण करून द्यायचे. यात दोष कुणाचाच नाही. वेळेप्रमाणे सोयीनुसार आपण बदलत आलो, बदलताना जाणवले नाही, पण आपणच आपल्या संस्कृतीचा एकेक धागा सोडवत आलो. अनेक वेळेला येजा करून पडलेल्या या पाऊलवाटा, पुढे जाताना मागे वळून पाहिले की धूसर होत जातात. पुढील प्रकाश खुणावत असतो, नवीन पाऊलवाट चोखाळल्याशिवाय तो गाठता येणार नसतो. धूसर होणारी पाऊलवाट तिच्याशी निगडित आठवणींमुळे सोडवत नाही पण पुढे नवीन वाट तर हवी आहे अशा अवस्थेत आपण असतो. आपल्या पुढची पिढी नवीन वाटेवर केव्हाच गेली. त्या पिढीने आपण अनुभवलेल्या धूसर वाटेचा अनुभव घ्यावा अशी आपली अपेक्षा असते.

Monday, June 9, 2014

कारागृह वासरी - मेकओव्हर एडिशन

पूर्वी अधूनमधून वासरी लिहायला वेळ मिळत होता. आता वेळ असूनही वेळ मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती झाली आहे. भल्या सकाळी गजांवर काठी आपटल्याच्या आवाजाने दचकून जाग येते. पूर्वी झोप लागत नसे. माझा पार्श्वभाग हा जणू काही त्यांना आंदणच दिला आहे अशा थाटात ढेकूण त्यावर रात्रभर राज्य करतात. आता इतक्या वेळा चावून चावून तो बधिर झाला आहे. निवडणुका, प्रचार वगैरे नको त्या उचापती आता संपल्या त्यामुळे तोही मनस्ताप नाही. त्यामुळे आता बिनदिक्कत झोपतो. नाही म्हणायला हे यादव, मनीष वगैरे उगाच पत्रं पाठवून माझ्या मागे नसता भुंगा लावतात. तुरुंगातील हे बदमाष अधिकारी सुरक्षेच्या नावाखाली ती पत्रे फोडतात आणि त्यांचे सार्वजनिक वाचन करतात. मी तक्रार केली तर म्हणतात, आम्ही तुरुंगातील अधिकारी असलो म्हणून काय झालो, माणसंच ना शेवटी? आम्हालाही जर खळखळून हसावंसं वाटलं तर त्यात काय चुकलं? बाकी तिहारमध्ये आलो ते बरंच झालं. सकाळी १० ला जेवण झालं की वेळच वेळ. मागे वळून पाहिलं तर आता असं वाटतं की चारशेतीस उमेदवारांतील चार विजयी होणे हे केवळ एकोणीस महिने वयाच्या पक्षाचे लक्षणीय यश आहे. तुका म्हणे त्यातल्या त्यात!

तुका म्हणे त्यातल्या त्यात
राहीन समाधानात।
जालिया डिपॉझिट जप्त
फिटतसे सर्व चिंता ।।

जनहो असो दयावे ध्यानी
जर येता 'आप' अग्रस्थानी ।
काय वर्णावे मग सभास्थान
जैसे मर्कट नाचती।।

यांपरी जे झाले ते उत्तम
कमलदल फुलले नष्ट हा तम ।
नाहीतरी निवडिता आमचे येरू 
अचाट उजेड पाडिती।।

आता बैसोनि एकाग्रचित्ती
ध्यान लाविती शीघ्रगती ।
जन म्हणती निद्रा करिती
बोलती वृथा धरणी भार ।।

अशाच काही अभंग लिखाणात उत्तम वेळ जातो. त्याने स्फूर्तीपण मिळते आहे. नव्या जोमाने काम करण्यास बळ मिळण्यासाठी तुरुंगासारखी जागा नाही हे स्वानुभवाने सांगतो. बायकोची भुणभुण नाही, पत्रकारांची खरखर नाही, सगळ्यात मुख्य म्हणजे आमच्याच येरुंची कटकट नाही. तसे भेटायला येतात, मग त्यांना डोकं दुखतं आहे असं सांगून परस्परच त्यांची बोळवण करतो. माझा ब्लॅकबेरी 'आत' येतानाच बाहेर 'जमा' करावा लागला, त्यामुळे ईमेलचीसुध्दा कटकट नाही. शांतपणे पुढील मुद्दे लिहून त्यावर नोट्स काढल्या आहेत.

  • पक्षाला मेकओव्हर देणे - आयला! आधी कसं सुचलं नाही हे? मागे एकदा आमचं कलत्र मेकओव्हर करून आलं होतं तेव्हा अख्खी चाळ ग्यालरीत येऊन त्या ध्यानाचे दर्शन घेऊन गेली. मी सुध्दा हॅ:हॅ: करत तिच्या समोर गेलो होतो आणि मग अचानक ओळखून पुन्हा पेपरमध्ये डोकं घातलं होतं. काही म्हणा गर्दी गोळा करतो हा मेकओव्हर. शंका-एकोणीस महिन्याच्या बाळाला मेकओव्हरची गरज पडावी हे बरे लक्षण आहे? काही झालं तरी मी लिपस्टिक लावणार नाही. यावेळी आता दुसऱ्या कुणीतरी व्हा बकरा. मागे स्वत:हून तयार झालो आणि आयत्या वेळी मुस्काटात खायची आहे असे सांगण्यात आले. नाही म्हणायलाही वेळ मिळाला नव्हता.
  • पक्षाचा पाया विस्तारणे - कुणी तरी एकदा हे बैठकीत म्हणाले होते. मी कुणालातरी हे लिहून घ्या असे म्हणालोसुध्दा होतो. त्यावरी आणखी कुणीतरी सत्ता मिळाल्यावर हे सावकाश करता येईल असे म्हणाले होते. नेमका तेव्हा माझ्यावर टीव्ही क्यामेरा. क्यामेरा दिसला की माझे देहभान हरपते. कसला देखणा दिसतो मी. उजवीकडून क्यामेरा असेल तर फारच उत्तम. डाव्या बाजूने घेऊ नका असे पुढील वेळी सांगायला हवे. स्कार्फ आता वापरू नये का? फेसबुकवर विचारले पाहिजे. पाहा! हे अस्से होते. तेव्हा पाया विस्तारणे महत्वाचे. हे कोण म्हणाले होते याचा शोध घेऊन अर्थ विचारला पाहिजे. किती शिमिट, लोखंड लागेल काय माहीत. हे कंस्ट्रक्शन वाले काय तोंडाला येईल तो रेट सांगतात. 
  • वीज दरवाढ प्रकरणी सरकारला घेरणे - घेराव, धरणे इत्यादि आपली कोअर स्ट्रेंग्थ आहे. फक्त एक अडचण आहे - दोनशे ब्याऐशी लोकांना चार जणांनी घेरणे जरा कठीण जाईल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? दोरखंड वापरावा काय? आपला इतिहास पाहता आयत्या वेळी चारातील एकाने दोर सोडून देण्याची शक्यता जास्त वाटते. तसे झाल्यास इतर तिघे पाय वर करून मागे पडतील. पडण्याची सवय आहे, पण पडलेले लोक लगेच पक्ष सोडून जाण्याच्या धमक्या देतात.
  • पक्षाची ध्येयधोरणे, आदर्शवाद जनतेला पटवून देणे - जरा धाडसी विचार आहे. आम्ही वाटलेली ध्येयधोरणाची पत्रकं लोकांनी कुठे कुठे टाकलीत म्हणून सांगू. चारशेतीसपैकी चारशेसव्वीस ठिकाणी एकाच महिन्यात पुन्हा जाऊन हे सांगणे म्हणजे…जो कुणी पत्रापत्री करून कटकट करतो आहे त्यालाच ही जबाबदारी द्यावी. सुंठीवाचून खोकला गेला…
  • एम्प्लॉयी सॅटिसफॅक्शन - उमेदवारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सहलींचे (शक्यतो जवळपास) आयोजन करणे. जे अजून सावरलेले नाहीत त्यांच्यासाठी खास मानसोपचार  समुपदेशन आयोजित करणे. शुक्रवार "आम टोपी फ्री दिवस" जाहीर करणे. महिन्याच्या दर तिसऱ्या शुक्रवारी बटाटेवडे (सोमनाथपासून हे लपवले पाहिजे) जाहीर करणे.
    TBD - बोनसचे आश्वासन देणे. (नक्की काय परिस्थिती आहे हे मनीषला विचारले पाहिजे. माझा बेल भरायच्या वेळी पैसे नाहीत असे सांगत होता.)
मुद्दे तर लिहून झाले. आता फक्त हे कुणाला पाठवावेत ते कळत नाही. याला पाठवले तर तो नाराज, त्याला पाठवले तर हा नाराज. उरलेले सर्व डब्याच्या दारात उभे. एक पाय आत एक बाहेर. शिवाय हे जेलवाले पत्र फोडून  वाचणार आणि हसत गडाबडा लोळणार. काल कैदी नंबर ११३० शी बोलता बोलता तो म्हणाला होता "साब, कूच अपने लिये काम हो तो बताओ. खाने का पीने का आरामसे रेहने का. आपुन का कनेक्शन है. मंगता है तो इदर टीव्ही लाकेभी देगा." लय पावरबाज दिसतो. कुणाला तरी काल सांगत होता,"अभी आम का सीझन खतम हो गया." मी दचकून त्याला विचारले,"तुमको कैसा मालूम?" तर म्हणाला,"बस क्या साब, जून म्हैना चालू हो गया. अब आम किधर मिलेगा?" हात्तीच्या, आंबे होय? मी नि:श्वास सोडला. त्यालाच विचारतो पत्र पाठवायचा काही जुगाड होतो का बघ म्हणून.

Sunday, June 8, 2014

स्वामिभक्तिचा आहेर

सताठ महिन्यांपुरते का होईना, सद्गुरुकृपेने मखमली खुर्चीवर बूड टेकायला मिळाले आणि असे काही सुख मिळाले म्हणून सांगू, आहाहा! क्षणभर डोळे मिटून घेतले आणि उत्तमांगातील मज्जातंतूकडून मेंदूकडे वाहणाऱ्या सुखद संदेशांचा अनुभव घेतला. गुरुचरणी कठीण धरणीवर बसून घट्टे पडलेले ते बूड, त्याला असले सूख सहजासहजी पचनी पडत नव्हते. एकदा दोनदा चिमटा काढून पाहिला. मग बायकोकडून काढवून घेतला. हातावर. बूड स्थिर होते आणि मऊशार आसनही जागेवर होते. मग खात्री पटली. आनंदाचा असा हा उमाळा भोगीत आठवडा कसा गेला कळले नाही. निर्विकल्प समाधी (सामान्य लोकांच्या पक्षी: गाढ झोप) लागली होती तेवढ्यात बगलेत काहीतरी ढोसले गेल्यासारखे वाटले.  आनंदात कोण व्यत्यय आणते आहे असा त्रासिक चेहरा करून आम्ही डोळे उघडून पाहिले तो समोर साक्षात सद्गुरु. त्यांनी कुबडी घेऊन तिचे टोक आमच्या बगलेत खुपसले होते. आम्ही मोठ्या चतुराईने क्षणार्धात आमची चर्या त्रासिकवरून बापुडीवर आणली. हे कौशल्य आम्ही पुणेरी रिक्षावाल्यांकडून शिकून घेतले आहे. क्षणार्धात शून्यावरून चाळीस प्रतिकिमी किंवा चाळीसवरून शून्य असा वेग केवळ पुणेरी रिक्षेवालेच गाठू शकतात. "सद्गुरू!" असे हंबरून गाईचे वासरू जसे तिला बिलगून लुचू लागते त्याप्रमाणे आम्ही स्वामींच्या चरणावर मिठी घालून त्यांचे (म्हणजे पावलांचे) चुंबन घेतले. स्वामी नर्मदेची प्रदक्षिणा करून आले असावेत. नर्मदातीरावरील चमकती वाळू त्यांच्या पावलांवर चिकटलेली होती. पण स्वामी इच्छाभ्रमणी असल्यामुळे ती वाळू लवासानगरी ते दिल्ली येवढ्या अंतरातील कोणत्याही स्थळाची असू शकते याची कल्पना होती. स्वामी इच्छाभ्रमणी तर खरेच, परंतु त्यांची इच्छा सुध्दा भ्रमणी. कोप झाला तर प्रथम पत्रकारांसमोर कान टोचतात आणि पत्रकार गेल्यावर अशा ठिकाणी टोचतात की… कल्पनेनेच आम्ही शहारलो. स्वामींच्या मनात काय आहे ते कित्येकवेळा त्यांस स्वत:सही माहीत नसते असे एकदा ते स्वत:च म्हणाले होते. परमेश्वरावर गाढ विश्वास असल्याशिवाय हे शक्य नाही असे आम्हांस वाटते.

"जितेन्द्रा! तू बुद्धिमतां वरिष्ठं असे वाटले होते." सद्गुरु वदले. बुद्धिमतां वरिष्ठं हे शब्द उच्चारताना त्यांच्या मुखातील ते लोभस दोन दात उडया मारत आहेत असा उगीच भास झाला. ते दोन दात माझ्याप्रमाणेच त्यांच्या सद्गुरूंवरील निष्ठेमुळे टिकून आहेत असे मला वाटत आले आहे. परंतु माझी निष्ठा त्यांच्यापेक्षा अढळ आहे हे निश्चित. ते दात काय आज आहेत, पण जरा कठीण शब्द उच्चारले की निदर्शने केल्यासारखे हलतात, त्यांची निष्ठा फार काळ टिकणे कठीण आहे. सद्गुरूंना तुम्ही कवळी बनवून घ्या असे अनेक वेळा सुचवून झाले. परंतु त्यांनी भाडोत्री अनुयायी काय कामाचे असे काहीसे खिन्न उद्गार काढले. त्यावर आम्ही,"का बरे? आपल्या मठाच्या उत्सवात आपण आपली भीमथडीची भाडोत्री तट्टे रिंगण घालायला आणतोच की." असे सहानुभूतीपूर्वक सुचवले. सद्गुरूंची चर्या काहीशी रुष्ट दिसली. "जितेन्द्रा, ती भाडोत्री तट्टे नव्हेत रे! वर्षानुवर्षे आम्ही त्यांस कधी हिरवा चारा तर कधी हरभऱ्याचा तोबरा देत आलो. त्यांचे ठायी आमच्याबद्दल बहुत प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ती आमच्याभोवती रिंगण घालीत असतात. आम्हीही अधूनमधून त्यांची आयाळ गोंजारतो. त्यांनाही बरे वाटते. तुझेच उदाहरण घे. आमच्यापाशी आलास तेव्हा चतुष्पाद होतास, गोंजारून घेणे तुला माहीत नव्हते. हिंस्त्र वागणे, ओरबाडणे, चावणे, पुच्छ उंचावून येरझाऱ्या घालणे इत्यादि चेष्टांमुळे जनांत धास्ती निर्माण करत होतास. परंतु आमच्या जवळ आल्यावर एकदम शांत झालास. म्हणजे या उपर्निर्दिष्ट चेष्टा कमी केल्या नाहीस पण, आम्हांला शरण गेलास, कधी चावला नाहीस. निष्ठावंत हनुमंत झालास. आम्ही तुला ठाण्याचा द्रोणागिरी उचलून आणण्याची आज्ञा केली. उचलताना तुझी शेपूट त्याखाली सापडून जायबंदी झाली, पण शेपूट तुटो वा मुगुट फुटो या निश्चयाने तो पर्वत तू जरा का होईना हलवून दाखवलास. म्हणून आम्ही तुला हे आसन दिले. त्याच्याबद्दल तुझ्या ठायी आमचेविषयी केवळ कृतज्ञताच असेल याची आम्हांस शंका वाटत नाही. होय ना?" येणेप्रमाणे सद्गुरूंचे मधुर भाषण ऐकून आमचे डोळे भरून आले. साष्टांग नमस्कार घालून काही क्षण पडून राहिलो. मुखी "सद्गुरु, सद्गुरु" असे नामस्मरण आपोआप चालू झाले. परत समाधी लागणार इतक्यात पुन:श्च बगलेत कुबडीचे टोक जाणवले. आज स्वामी आपल्यावर वारंवार कुबडीप्रयोग का करीत आहेत याचा विचार करीत असतानाच शब्द कानी पडले.

"ऊठ वत्सा. मृदू शय्या कोणास नको असते? त्यावर बसले की उठावे असे वाटत नाही. होय ना? आपण साधक. सुखासीनता, विलास ही सामान्यजनांच्या स्वप्नातील रंजने. आपल्यास ही काही विशेष न करता साध्य होतात म्हणून आपण साधक. आणि म्हणूनच त्याचे आपणास काही विशेष वाटता कामा नये. या मखमली आसनावर बसून तू दिवास्वप्ने पाहत होतास. तुझ्या मुखावर अनन्य सूख विलसत होते. अशा वेळी मग कर्तव्याचा विसर पडतो. ज्या नामस्मरणाने हा भवसागर तरून जायचे त्या नामस्मरणाचा विसर पडतो.  येरवी आमच्या खडावांचा नुसता ध्वनी कानी पडला तर तू भु:भुकार करीत मठ जागवायचास. आमच्या खांद्यावरून डोक्यावर, डोक्यावरून खांद्यावर अशी क्रीडा करायचास. परंतु आज आम्ही येथे आलो आहोत याची चाहूलसुध्दा तुला लागली नाही. हा सुखासीनतेचा परिणाम. म्हणून आम्ही या कुबडीने तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली." सद्गुरूंचे कठोर शब्दसुध्दा आम्हांस अमृत. आम्ही पूर्वाश्रमी, तहान लागली की सार्वजनिक नळाला तोंड लावून कुणीतरी येऊन हाकलेपर्यंत मनसोक्त पाणी पीत असू. तसेच झाले. आम्ही सुखाचे आकंठ प्राशन करीत असताना सद्गुरूंचे कठोर शब्द कानावर आणि कुबडी पाठीवर पडून हाकलले गेलो. पण आमची निष्ठा जागृत होती. "सद्गुरु! वाट चुकलेल्या या अनुयायास आपण दिवा दाखवलात! या मायामोहाच्या जाळ्यात काही क्षण आम्हाला आपल्या प्रति असलेल्या कर्तव्याचे विस्मरण झाले होते. स्वामिभक्ति याखेरीज आमच्या आयुष्याचे दुसरे प्रयोजन नाही. आता उर्वरित काळ आम्ही केवळ आपली भक्ति आणि आरती यांमध्ये व्यतीत करणार. हे पाहा, आम्ही आपल्यावर आरती रचली आहे! स्वीकार व्हावा."

हुं: हुं: भू: भू: !
सत्राणे उड्डाणे भुंकार वदनी
करी डळमळ कृषीमंडळ कन्दकभाव गगनी।
कडाडता हस्त मुखी, होतसे भीषण ध्वनि
परि संयम धरि, भावही गडगडे झणी।।

वरवरी शांत परि अन्तरि ज्वाळामुखी
त्वरित घेतसे बैठक देण्या कर्णपिचकी
तीक्ष्ण बोल ऐकुनि अनुयायी गर्भ गाळिती
आश्वस्त करुनी स्वामि आशिर्वचने देती।।

जय देव जय देव जय मा. ना. खा. आरती
रचिली जितेंद्रे येथामति चरणी बारामती
स्वीकार व्हावा स्वामि ही बालके विनंती
आपणच अमुचे स्वामी असावे निश्चिंती।।
हुं: हुं: भू: भू: !

Thursday, June 5, 2014

शबय!

आयन्याच्या बायना, घेतल्याशिवाय जायना…
धुळवड सपली. आता खरो शिमगो. कोकण आता काय पूर्वीसारका रवाक नाय. पूर्वी काय्येक वांधो नाय होतो. सरळ जांवचा, इलेक्शनचो फॉंर्म भरुचो आणि मगे सुशेगात रावचा. बिनविरोध निवडून येवंचा. माज्या विरोधात कोण उबो रवतंलो? फक्त लोकांका सांगूक लागता, गांववाल्यानू, सध्या मी वांयच कॉंग्रेसात इलय हां. मागच्या इलेक्शनीत तुम्ही धनुष्यावर शिक्को मारलो. शिरां पडली त्या धनुष्यार. मोडलेलां धनुष्य तां. बाण लावूचो पण वांधो. आमच्या सोनुर्लीच्या जत्रेतपण चांगला धनुष्य मिळतां. ज्याचे स्वत:चेच वांधे तो दुसऱ्याची प्रगती काय करतलो? दुसऱ्याची म्हणजे माझी. माजी प्रगती झाली तरच तुमची होतली. खरां मां? म्हणान मी कॉंग्रेसात इलय. तसो काय्येक फरक पडाक नाय. तिकडे धुमशान घालूचा ता आता हंयसर घालतंय. कणकवलीचो देवचार म्हणतत माका. वाडीपासून खाडीपर्यंत माझो संचार. खंय खनिजखाण आसा, खंय प्रगतीक वाव आसा, खंय बिल्डरचो भाव आसा, अशी सर्वत्र माझी नजर आसा. सिंधुदुर्गाचो विकास माज्यासारको कोण्येक करूक नाय. काय काय लोक आसंत, तेंका विकास दिसणा नाय. माझां आश्वासन होता, ओरोशीक आयटीआय पार्क करून देतंय म्हणान. हेंका कोणी सांगितलां आयटी पार्क म्हणान? सगळीकडे बोंब मारीत सुटले, आयटी पार्क काय होऊक नाय. अरे तुमका ह्यां सांगितला कोणी आधी? सगळ्यांनी मिळून माजो पाडाव केल्यानी. आता मीपण बगतंय पुढचां. तेंका सांगून बघलंय एकदोन वेळेक. आता नीट सांगूची वेळ आलेली आसा. तां मी बघतंय काय तां. चिंता करू नकात. हंयसर हॉस्पिटलपण काढूक लागतला. ह्यां एनसीपीवाल्यांकडेपण बगूची आता गरज आसा. मिटिंगमध्ये रीतसर ठरला होता, जे काय तुमचे मतभेद आसत ते बाजूला ठेवन आमचो प्रचार करा असो साहेबांनी सगळ्याक दम देवन ठेवलेलो. ह्येनी काय ऐकाक नाय. राजकारणात मतभेद असतलेच. आता एनसीपी मुळात तयार कशाक झाली? म्याडम पंतप्रधान नकोत या एकच मुद्द्यावर हे भायेर पडले आणि स्वताचो पक्ष स्थापन केलो. तो मुद्दो काय सहा म्हैने पण रवाक नाय. सत्ता कोणाक नको असता? परत कॉंग्रेसची काष्टी धरून उभे रवले. कोण विकासासाठी राजकारण करता? त्येंका तुम्ही काय्येक बोलूचे नाय आणि माका मात्र धारेवर धरतल्यात?

कोंकणचे स्वयंघोषित राजे फारच व्यथित दिसत होते. नुकत्याच झालेल्या घनघोर युद्धा त राजे  त्यांच्या युवराजांसकट धराशाय झाले होते. युवराजांच्या कर्तृत्वाने प्रजा गांजली होती. आधी सैन्य पाठवून शिकार जखमी करायची आणि मग हे युवराज मृगया करणार असा पायंडा पडला होता. हाका मारून जनावरे उठवायची तसेच प्रजेला सळो की पळो करून सोडायचे, नेम धरून हाकत हाकत तिला असे कोंडीत पकडायचे  की एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यात रक्त चढून बेभान झालेले युवराजांचे सैन्य. अशी मृगया झाली की काठीला पाय बांधून उलटे लटकवलेले ते लोकशाहीचे मढे वाजतगाजत नगरीत आणायचे. मग सुरु व्हायचा तो उन्मत्त जल्लोष. या कानापासून त्या कानापर्यंत असे फाटलेले निर्लज्ज हास्य घेऊन राजे आणि युवराज वारुणीचे चषकावर चषक रिते करीत बसायचे. राजवाड्यात असा लखलखाट, उन्मादाचे फवारे असायचे तर बाहेर नगरीत फक्त अंधार आणि कानठळ्या बसवणारी शांतता पसरलेली असे. प्रजा सहन करते आणि गप्प बसते याचा अर्थ ती आंधळी आहे असा समज राजे आणि युवराज या दोघांनी करून घेतला होता. त्यात पदरी ठेवलेले लाचार भाट नित्य नवी काव्ये रचून या युवराजांचा मोरपिसारा कसा तेजस्वी आणि मनमोहक आहे याचे वर्णन करीत. प्रजा हा मोरपिसारा फुलवून केलेले नृत्य पाहून वाहवा वाहवा म्हणत आहे याचे सालंकृत रसभरीत वर्णन त्या काव्यांत असे. मोराने पिसारा फुलवला की त्याचे बूड उघडे पडते याचे भान युवराजांना नव्हते आणि राजांनाही नव्हते. मुळात ते मोरही नव्हते. चोरावर मोर जरूर होते. प्रजेने काबाडकष्ट करावे आणि राजाने त्याचे फळ लुबाडावे, नंतर त्याची जमीनही काबीज करावी या प्रकाराचा कळस होऊन त्याचा परिणाम अखेर दिसला. जनतेच्या हातातील मशाली, कुदळी फावडी पाहून नेसत्या कपड्यानिशी राजे आणि युवराज राजवाड्यातून पळत सुटले. या वेळी धमक्या चालणार नव्हत्या, शिवीगाळ चालणार नव्हती, अचानक अपघात घडवून आणता येणार नव्हते. स्वत:चा जीव वाचवणे एवढेच हातात होते.

माका काय समाजल्यात तुम्ही? चार कोंबड्यें  आणि धा कवटां घेवन इतको धन्दो उभो केलंय, पुन्हा करुक नाय येवचो? कोंबडी-कवटांचो धंदो आणि राजकारण यात काय्येक फरक नाय. एका कोंबडीन अंडी नाय देऊक तर दुसरी देतली. मी धंद्यात इलंय तो पट्टेरी कोंबडी घेवन. त्या कोंबडीन माका सगळां दिल्यान. मी फक्त बसून खाल्लंय. पण वांधो असो झालो, माका इतक्या वेळ बसून खाल्लेलां बघून या कोंबडीनच माका अंडी घालूक बसयल्यान. मगे मी म्हटलां आवशीक xx! होया कोणांक ही कोंबडी? तसोच जावन ब्रॉयलर कोंबी आणलंय. तसो धंदो बरो होतो असां वाटलेलां. पण कोंबेच जास्त आणि अंडी कमी.  खाऊक काय कमी नाय, अंडी देवच्या वेळेक लक्षात येवचां, अरे माज्या कर्मा, हो तर कोंबो आसा. सगळो धंदो बुडीत निघालो. सगळां विकून बसलंय. आता बगतंय उधार म्हणून खंय कवटां मिळतंत काय ती. सध्या गुजरात ब्रांड एकदम तेजीत आसां. बगतंय तेंका विचारून. वैश्य वाणी ते, धंद्याक नाय म्हणूचे नायत. पन माकापूर्वीसारकी शानपट्टी पण करूक येवची नाय. माका काय, मी थोडां तोंड रंगवन घेतंय आणि जावन उभो रवतंय, "शबय!" म्हणान. काय एक दोन रुपये दिल्यानी तर दिल्यानी. 

Monday, June 2, 2014

राजगडाला जेव्हा जाग येते

काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही।।

इंद्रवदन सरकार तल्लीन होऊन गात होते. त्यांचा स्वामिनिष्ठ रसिक श्रोता छोटू कसनुसा चेहरा करत श्रवणभक्ती करीत होता. गेल्या काही आठवड्यातील घडामोडींनंतर जड अंत:करणाने काळापहाडने काही काळ भूमीगत व्हावे असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांचे आवडते कातडी काळे जाकीट, विजार आणि काळा चष्मा त्यांनी तळघरातील गुप्त फडताळात ठेवून दिले होते. प्रजेला कळवळून हाक दिल्याशिवाय तिला आपला कळवळा कसा कळणार असे कळकळीचे उद्गार नकळत त्यांच्या तोंडून निघून गेले. छोटूने चमकून त्यांच्याकडे पाहिले. होय, छोटू, आता गुप्तहेरगिरी बंद. काळा चष्मा लावल्याने आपण अदृश्य होतो असे केवळ वाटते पण प्रजेला आपण लख्ख दिसत असतो. गुप्तहेरगिरी करण्यासाठी काळ्या चष्म्याची गरज नाही, तर फक्त पांढऱ्या कपड्यांची आहे. हे ब्रह्मज्ञान सरकार आपल्यास का सांगत आहेत असे छोटूला वाटून गेले. गेले सहा महिने आपण हेच तर ओरडून सांगत आलो. प्रथम फोनची वाट बघणे झाले. मग खोटंच आपल्याला काळापहाड म्हणून फोन करायला लावणे झाले, मग पुढे रात्री हळूच जाऊन भिंतीला कान लावून काही ऐकू येते का पाहणे झाले. शंभूराजे रोज प्रात:काळी उठून प्रथम सौधात येतात म्हणून त्या सौधाच्या अगदी समोर मोठ्ठ्या बोर्डावर ,"मला आपल्याशी काही बोलायचंय" असे लिहून झाले. त्या बोर्डाला स्पॉन्सर मिळवताना आपले नाकीनऊ आले. शेवटी शंभूराजांनीच त्याचे पैसे दिले होते असं जर मी त्यांना सांगितलं तर सरकार त्याच बोर्डावर मला लटकावतील.

"आम्ही गेले काही दिवस खूप विचार करीत होतो." सरकार पुढे बोलू लागले. ते ऐकून छोटू जरासा चरकला आणि सावरून बसला. सरकारांनी फार विचार करणे हे गंभीर प्रकरण होते. "पूर्ण विचारांती आम्ही असे ठरवले आहे की, ते काही नाही, एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती स्वत:च करावी, दुसऱ्यावर विसंबू नये. प्रजेच्या हितासाठी आम्हांला मोहिमेचे नेतृत्व स्वत:च करावे लागेल. आम्हांला खात्री आहे की प्रजेला आमच्या नेतृत्वाची गरज आहे. चाणाक्ष बुद्धी, अमोघ वक्तृत्व, एखाद्या नटाला लाजवेल अशी छबी, संवादफेक आणि खरोखर लाजवेल अशी अभिनयकला हे सर्व आमच्यात ठासून भरले आहे. राजा, सेनापती, प्रधान, शिलेदार, पायदळ, घोडदळ या सर्व भूमिका आम्हीच करणार! गाफील शत्रुच्या गोटात आम्ही मुसंडी मारून जय भवानी करणार! आजपासून कामाला लागा. सर्वात प्रथम आपल्या सैन्यात चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हा छोटू, तू ताबडतोब आपल्या सैन्याला पाचारण कर."

छोटू चुळबुळत म्हणाला,"सरकार, त्या दुष्ट महानगर टेलिफोन निगमने आपला फोन कट केल्यापासून सैन्याशी संपर्क तुटला आहे. बरेचसे सैनिक शंभूराजांच्या आश्रयाला गेले आहेत. त्यात देणेकरी चुकवण्यासाठी 'इंद्रवदन सरकार आता येथे वास्तव्य करीत नाहीत' असा बोर्ड आपणच खाली लावल्यामुळे उरलेले निष्ठावंत सैनिक भेटायला येऊन खालच्याखाली परत जातात. आणि सरकार, आपण चैतन्य निर्माण करण्याचे म्हणालात, ते जरा खर्चिक होईल. आपण खास निवडून घेतलेले हे शेलके सैनिक आहेत सरकार. किमान दोन क्वाटरी पोटात गेल्याशिवाय त्यांच्यात पाहिजे तेवढे चैतन्य येत नाही. रिकाम्या पोटी सैन्य चालत नाही. असे उपाशीपोटी सैनिक नीट घोषणा देत नाहीत. 'इंद्रवदन सरकारांचा!' अशी आरोळी दिली तर काही जय म्हणतात, काही विजय असो म्हणतात. बरं दिसत नाही ते. ट्रक भरून आणलेले सैन्य वाटते. मग बारामती संस्थान आणि आपल्यात काय फरक? " इंद्रवदन सरकार विचारमग्न झाले. "छोटू, तू म्हणतोस ते खरे आहे. एक काळ असा होता की आमचे शिलेदार चैतन्याने भारून आम्ही ज्या दिशेला बोट करू त्या दिशेने दौडत असत. आज आपला सैनिक एका क्वार्टरला महाग झाला आहे. हे आम्ही आमचे अपयश समजतो. परंतु, हे सर्व आम्ही बदलू. चांगले दिवस नक्की येणार आहेत. आम्ही आमचे राज्य विस्तारणार आहोत. आमच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळणार आहे." छोटू हळूच म्हणाला,"राजे, अश्वमेध यज्ञ चराचर जिंकल्यानंतर करतात बहुधा." इंद्रवदन सरकार खवळून म्हणाले,"छोट्या! असा आमचा तेजोभंग करू नकोस! भावनेच्या भरात आणि टाळीच्या ओघात मराठी नट हा अशी एखादी अॅडिशन घेत असतो. हां, तर काही करून आपले सैन्य माघारी आण. क्वाटरचं जुगाड आपण करू काही तरी. असं कर, तो जो आम्ही बोर्ड लिहून घेतला शंभूमहाराजांसाठी, तोच उचलून आण आणि इथे आपल्या वाडयासमोर लाव. मघाशी आम्ही जे गाणे गात होतो ते गाणे आम्ही सैन्याला आवाहन म्हणून गाणार आहोत." छोटू ठीक आहे असे म्हणून निघाला. तेवढयात पुन्हा सरकार म्हणाले,"थांब छोटू, मला असं वाटतं, नुसतं 'मला आपल्याशी काही बोलायचं आहे' एवढं चालणार नाही. तेव्हा त्या वाक्याआधी ,"जरा थांबा हो!' असे भावनिक आवाहनाचे शब्द टाक. शिवाय खाली तळटीप टाक. म्हणावं, ता.क. - चकण्यासहित रिफ्रेशमेंटची सोय आहे."

एक उपेक्षित संशोधक

म्हाराष्ट्राची औध्योगिक प्रम्प्रा पार जुनी आहे. किर्लुस्करवाडीला पैला पंप बनवला गेला आणि क्रांती झाली. जसं पंपातून पाणी बदाबदा ओतू लागलं, तशा तैलबुद्धीच्या म्हराटी लोकांच्या डोक्यातून अनेक गोष्टी येऊ लागल्या. पुढं सहकाराच्या योजना आल्या मग उध्योगच उध्योग सुरु झाले. प्रगतीच्या उच्चपथावर येकदा गेल्यावर मागे वळून बघता येत नाही. अशाच काळात पुण्याच्या पूर्व दिशेला येक क्रांतिसूर्य उगीवला. या सूर्यानं म्हाराष्ट्रात आसे काही शोध लावले की त्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर आजून पाहिजे तशी घेतली गेली नाही याची खंत वाटते. न्यूटनबाबानं प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका लिहिला, संवेग आणि बल यांची प्रमेये मांडली खरी पण म्हाराष्ट्राच्या पक्षीय संवेग, बलाबल यांचे जे क्लिष्ट समीकरण होते ते काही त्यात बसत नव्हते. आमच्या क्रांतीसूर्याने जो बेरजेच्या राजकारणाचा जो सिद्धांत मांडला तो अभूतपूर्व होता. बहुतांशी सर्व मनुष्यप्राण्यात असलेला निर्लज्जपणा हा अंगभूत गुण हा आजवर सर्व राजकीय शास्त्रज्ञांना आकर्षित करत आला आहे. परंतु प्रासंगिक राजकीय समीकरणात तो एक अढळ राशि याखेरीज कोणत्याही उपयोगाचा नाही अशी त्याची फक्त नोंद करून ठेवली गेली होती. अशा दुर्लक्षित गुणाकडे केवळ आमच्या या गुणी गणितज्ञाचे लक्ष गेले आणि त्याने ही एक अढळ राशि नसून प्रसंगोपात तीमध्ये बदलही घडून येतो असे गृहीतक मांडून त्याचा प्रत्यक्ष वापर समीकरणात करून दाखवला. म्हाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण त्यानंतर बदलून गेले. या थोर शास्त्रज्ञाला स्वत:च्या नावावर फारशी जमीन नसतानासुद्धा लोक शेतकरी म्हणून हिणवत असत. पण पैलू न पाडलेला हिरा हा बऱ्याच वेळा दगड म्हणून दुर्लक्षिला जातो. आपल्या सुदैवाने त्या काळात रत्नांची पारख असलेला एक जवाहिऱ्या आपल्याला गृहमंत्री म्हणून लाभला होता. त्याने या शास्त्रज्ञाला आपल्या पंखाखाली घेतले. या हिऱ्याने ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यांचा त्याच्या संशोधनावर खोलवर परिणाम झाला. विशेषत: कृष्णेचे कऱ्हाडचे पाणी आणि सांगलीचे पाणी एकत्र आणण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाचा (याला प्रीतीसंगम असे सांकेतिक नाव दिले गेले होते) त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार झाला. त्यातूनच बेरजेच्या सिद्धांताचे बीज पेरले गेले असावे असा आमचा अंदाज आहे. पुढे त्याने कालव्याच्या आधारे हरितक्रांती हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत इतका यशस्वी झाला की या सिद्धांताच्या आधारे एक थेंबही न सांडता मूळ स्त्रोतापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जमिनीचा विकास करता येतो. आजही सभोवती अनेक गावात पाण्याचा टिपूस नसला तरी आमच्या या शास्त्रज्ञ शेतकऱ्याच्या गावात हिरवीगार शिवारं डोलत आहेत. इस्त्रायल या देशानंही याची नोंद घेतली म्हणतात. त्यांच्या देशातही पाण्याची गरज नसलेले असे अनेक भाग आहेत, त्यात पाणी वाया न घालवता कसे आणता येईल हे अनेक वर्षे त्यांना कोडे होते. पाईपमधून पाणी गळत गळत मुक्कामापर्यंत अगदीच थोडे पोहोचत असे. मग उगाच त्याला ठिबकसिंचन असे गोंडस नाव देऊन त्या कोड्याला शास्त्रीय शोध ठरवायचा प्रयत्न चालू होता. आमच्या एका शेतकऱ्याच्या मुलाने ते कोडे सहज सोडवले. जै म्हाराष्ट्र!

पुढं मग हाती घेतलेला प्रश्न जमिनीचा. लहानपणी शे दोनशे एकरपलीकडे स्वत:ची जमीन नाही याचे आत्यंतिक दु:ख वाटायचे. इतके दिवस ते दु:ख ठसठसत होते. पण त्याने खचून न जाता ही समस्या सोडवण्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यात अनेक विघ्ने आली, खोळंबे झाले. स्वार्थी लोक उगीच स्वत:च्या अन्न, वस्त्र, निवारा असल्या किरकोळ समस्या घेऊन येत आणि वेळ खात. पण मूळचा मृदू स्वभाव असल्यामुळे त्यांनी कुणाला दुखावले नाही. लोक माघारी जाताच वळून आपल्या कामात मग्न होत. अथक परिश्रमानंतर, स्वत:ची नसलेली जमीन विकासकाम करण्यासाठी कशी प्राप्त करून घ्यावी याचा सिद्धांत त्यांनी शोधून काढला. अशी बुद्धी असायला शारदेचीच प्रतिभा लागते. सर्वसामान्य प्रतिभेचे प्रतीक म्हणजे मोरावर हाती तंबोरा घेऊन बसलेली शारदा. यांची प्रतिभा एवढी असामान्य की ती शारदा हातात इलेक्ट्रिक गिटार घेऊन मोरावर उभी राहून हार्ड मेटल संगीत वाजवते आहे असा भास होतो.

त्या काळी वृत्तपत्रे हा एक ज्वलंत प्रश्न होता. कुणाचाही धाक नसल्याने ही वृत्तपत्रे कोणत्याही बातम्या बिनदिक्कत देत. मग त्यातून राजकीय, सामाजिक प्रश्न निर्माण होत. खरं तर राजकीय जास्त होत, मग वाईट वाटू नये म्हणून त्याला सामाजिकपण म्हटले जाई. शिवाय ही वृत्तपत्रे पद्धतशीर व्यावसायिक पध्दतीने चालवली जात नसत. जशा घटना घडतील तसे त्यांचे रिपोर्टिंग, संपादकीय लिहिले जाई. कसलाच धरबंद नव्हता. मग एक वृत्तपत्र ताब्यात घेऊन व्यावसायिक पध्दतीने चालवून कसे यशस्वी करून दाखवावे याचा एक प्रयोग किंवा उपक्रम हाती घेतला. आणि तो प्रचंड यशस्वी झाला आहे. या प्रयोगात छोटेछोटे लहान प्रयोगपण सामावले आहेत. त्या प्रयोगांद्वारा सध्या एक नवीन यंत्र बाजारात आणले आहे. सीएम मीटर असे त्याचे नाव आहे. हे यंत्र जनमानसाची चाचपणी अचूकपणे करते आणि राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असेल याचे भाकीत करते. आर्टीफिशियल इंटेलिजन्स प्रणालीवर आधारित हे यंत्र यंत्रमानवाचे नियम पाळते. यंत्रमानवाप्रमाणेच हे यंत्र मालकाला इजा पोचू न देता काम करते. प्रसंगी इजा होणार असेल तर मुख्य कामच बंद करते. यंत्र अद्यापि प्राथमिक अवस्थेत असल्याने ते फक्त चाचपणी अचूक करते असे सांगण्यात आले. मुद्दा अचूकतेचा नसून संशोधकाच्या दूरदृष्टीचा आहे. हे यंत्र पूर्ण विकसित झाल्यावर निवडणुका घेण्याची गरज भासणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो. वृत्तपत्रातून समाजप्रबोधन कसे करावे याचे उत्तम शिक्षण आता या यंत्राद्वारे मिळेल. आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या गेलेल्या अशा या संशोधकाला विज्ञानातील या उपेक्षित शाखेतील योगदानाबद्दल अजून नोबेल पारितोषिक मिळालेले नाही याची आम्हांस खंत आहे.