Thursday, December 29, 2016

दंगल इफेक्ट

नमो - मित्रोंsssss! क्या कुछ नही हो सकता इस देस में! बाप अगर चाहें, अगर बाप में हिम्मत हों तो पूरा परिवार देस के प्रगती में योगदान दे सकता है। कठिनाई होगी! जरूर होगी। बाल कटेंगे! लेकिन दोस्तोंsss! ये कटे हुए बालssssss! तिरुपती जायेंगे, भगवान के चरणोंमें अर्पित होंगे! क्या एक नागरिक का ये कर्तव्य नही?? मैं पूरे देस में एक क्रांति देखना चाहता हूं। आज पूरे देस में एक अलगाव सा माहौल है। कुछ लोग काले बाल जमा कर के बैठे है। देस के ९५ प्रतिशत जनता के बाल बचभी नही सकते तो ५ प्रतिशत लोग सिर्फ काले बाल ले के बैठे है। लोकतंत्र और समाजवाद हमें इसकी इजाजत नही देता। तो मित्रों!!! आज रात बारा बजे के बाद आधा इंच से जादा काले बाल अवैध माने जायेंगे। तिरुपती, हेअर कटिंग सलून में आप बिना सवाल बाल जमा करा सकते है। ३१ दिसंबर के बाद पूरा देस केशलेस हो जाएगा।

मोमोता - उडी बाबा! गोरीब के सर पे जो बाॅल बचा है उस को भी खोतोम करना चाहते हो क्या? हम ओमारा एक भी बाॅल नही देंगे!

लालू - इ बाल तुम्हारे बाप के है का? हमारे कान पर भी बाल है हम वो भी उखाडे का? 

मौनमोहन - ये लोकतंत्र के विरोधी है, ये कानूनी डकैती है, संघटित लूटमार है। काॅंग्रेस को गंजा बनाने की ये कूटनीती है। काले बाल खतम नही होंगे, सर पर से ले लो, लोग कही और बढा देंगे। लेकिन दस सालमें पहली बार मुँह खोल के बहुत अच्छा लग रहा है।

दिग्गी - ये कानून किसी विशिष्ट समाज के दाढीको टार्गेट करने के लिए किया जा रहा है। 

जाणता राजा - या ठिकाणी हा जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो नियोजनपूर्वक घेतलेला दिसत नाही. वैयक्तिकरीत्या आम्हाला या निर्णयाचा काही त्रास नाही. आमच्या डोक्यावरचे केस आम्ही केव्हाच देशाला अर्पण केले आहेत.

केजरू - कितना गिरोगे मोदीजी? पहले अपने दाढ़ीके बाल का हिसाब दे दे। बिहारमें बीजेपीने इतने सारे हेअर कटिंग सलून क्यूं खरीदे इसका जवाब दे दे। हम लोकबाल बिल लायेंगे। हर एक को एक एक बाल का हिसाब देना होगा।

हजामतीचा त्रास झुलपं राखलेल्यांना होणारच. बापाच्या शिस्तीला मान द्या, मग मेडल आपलंच. नाही तर ३१ नंतर आहेत ढुंगणावर फटके! उतरायची गोष्ट लांबच, चढायचीही नाही थट्टी फस्सला.

Thursday, December 22, 2016

स्थित्यंतर

अखंड भारत, राष्ट्रीय पुनर्निर्माण, समग्र हिंदुराष्ट्राची व्यापक संकल्पना, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टी शके १९३८ (भारतात राहणाऱ्या अभारतीय निवासींसाठी - २०१५) मध्येच संपूर्णपणे साकार झाल्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य आले होते. मी आणि मोरूने शाखेत रोज जाणेही थांबवले होते. पूर्वीही आम्ही जात होतो त्याचे कारण उपर्निर्दिष्ट ध्येयांनी भारलेले काही स्वयंसेवक आम्हाला पुढे घालून हाकलत संघस्थानावर नेत असत. गोट्या, विटीदांडू, क्रिकेट किंवा ऋतूनुसार ठरलेले काही मान्यता पावलेले खेळ ऐन रंगात आलेले असताना हे स्वयंसेवक अल्लाउद्दीन खिलजी प्रमाणे घुसत, आमची रसद (घरून आणलेले भाजलेले शेंगदाणे, चुरमुरे इत्यादि) फस्त करत, पाहऱ्यावर ठेवलेले बुणगे हुसकावून लावत आणि आम्हाला जणू कैद करून शाखेवर नेत. याला घरच्या मंडळींची फूस लाभे आणि तेही,"बरं केलंस! नेच त्याला. दिवसभर उनाडक्या करण्यापलीकडे काही करत नाही. जरा शिस्त लागेल." मग हे देशभक्तीने भारलेले स्वयंसेवक आम्हाला हाकत संघस्थानाकडे नेत असत. मग शिशू आणि तरुण अशी वर्गवारी होऊन वयोमानास उचित असे खेळ निवडले जात. खेळ छान असत. खो खो, कबड्डी असे मर्दानी खेळ खेळताना मजा येई. मग कधी कधी वेतचर्म, खड़ग, दंड (याला तलवार, काठी अथवा लाठी म्हणणे हा दखलपात्र गुन्हा होता) यांचेही कधी तरी हात होत. आमचे वय शिशू नाही पण तरुणही नाही असे असल्याने तरुण ही शस्त्रे घेऊन मोहरे घेत तेव्हा आम्ही केवळ पाहत असू. शत्रूला कसे नामोहरम करून सोडायचे याचे शिक्षण समोर चाललेले असायचे. शत्रू कोण हे काही कळायचे नाही. त्या वयात आमची शत्रूमंडळी फक्त शाळेत आढळायची. आणि ती खडू, डस्टर, पट्टी अशा शस्त्रांचा वापर करणारी असायची. पण ही तरुण स्वयंसेवक मंडळी भयानक आवेशात दंड, खड़ग फिरवत असायची. त्यांचीही मास्तर मंडळी खडूस असावीत. मला वाटायचे आता उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर मास्तरांचं काही खरं नाही. पण "संघ विकीर" झाल्यावर तीस सेकंदात संघस्थान रिकामे झालेले असे. काही क्षणांपूर्वी खड्गावर हात मारणारी जनता घरी पाटावर बसून खोबरे घालून केलेली चिंचगुळाची आमटी, पोह्याचा पापड, गुरगुट्या भात, त्यावर मऊसूत वरण, साजूक तूप यावर आडवा हात मारत बसलेली दिसायची. भोजन कसे चुकवायचे महाराजा? अन्न हें पूर्ण ब्रम्ह असे म्हटलेच आहे.

फार मोठा खेळ आहे राजा! चाणक्यनीती काय अशीच कळते काय कुणाला? खुद्द चाणक्यालाही ती कळायला काही वर्षे जावी लागली. थांब पन्नासएक वर्षं, हे हिंदुराष्ट्र भरभराटीला येतं की नाही पहाच. अशी वाक्यं कानावर पडायची. काही कळायचं वय नव्हतं. कुणाशी लढाई आहे आणि कोण कुणावर मुत्सद्देगिरी करतो आहे कुणास ठाऊक. पण हिंदुराष्ट्र, उन्नती, भरभराट असे शब्द ऐकले की बरं वाटायचं. स्वातंत्र्य मिळून दोन तपं लोटली होती. क्रांतिकारक वगैरे जमात काळाआड जाऊन काही वर्षं लोटली होती. नाही म्हणायला अंतुलेंनी सिमेंटची टंचाई असूनही स्मारकं वगैरे उभारली होती. बहुधा सागोळ वापरलं असावं. स्मारकं सागोळएवढीच टिकाऊ निघाली. एवढं उपेक्षेत गेलेलं स्मारक दुसरं नाही. उदघाटनानंतर गावातील एकही नेता तिथं पुन्हा फिरकलेला दिसला नाही. "सरकारी" हा शब्द इतका हीन दर्जाचा झाला की "हीन दर्जा" हाच शब्दप्रयोग नाहीसा होऊन त्याची जागा सरकारी या शब्दाने घेतली. पण राष्ट्रीय पुनर्निर्माणात पार झोकून दिलेल्या स्वयंसेवकांना सरकारी या शब्दाचे वावडे होते. आपण सत्तेत न राहता काम करू. "आपण" हा एक फार मोठा शब्द होता. एकचालकानुवर्तित्व अंगी बाणलेल्या यंत्रणेत आपण हा साम्यवादी शब्द मला पुढे जरा विनोदीच वाटायचा. "आदेश आला आहे, आपण सर्व जण झडझडून कामाला लागणार आहोत." अशी वाक्ये मला पुढे ऍस्टरिक्स कार्टूनमध्ये सापडली. त्यात रोमन सैनिकांच्या एका टोळीला दरोडेखोरांनी बुजबुजलेल्या जंगलातून जायची पाळी आली आहे. प्लॅटून लीडर विचारतो आहे,"पुढे जाऊन टेहळणी करायला कोण तयार आहे?" काही सैनिक आकाशात नजर लावून आहेत , काही पायाची बोटे न्याहाळत आहेत अशी परिस्थिती. शेवटी लीडर एका सैनिकाकडे बोट दाखवून म्हणतो,"यू! आय ऑर्डर यू टू व्हॉलंटियर!" हिंदू समाजाची अवस्था काहीअधिक प्रमाणात या सैनिकांसारखीच. मग लीडरला कुणालातरी स्वयंसेवक करावंच लागतं. सगळेच काही लीडर होऊ शकत नाहीत. सगळेच लीडर झाले तर काम कोण करणार? पण स्वयंसेवक होण्याचीही झिंग असते. आपण समाजकार्य करून राहिलो आहोत, निस्वार्थीपण अंगात भिनलं आहे, हीनदीन मला दुवा देताहेत, मला कुठल्याही पुरस्काराची गरज वाटत नाही असं सगळं पहिला पेग, दुसरा पेग मग तिसरा अशा थाटात चढत राहतं. एकदा होलियर दॅन दाऊ वाटायला लागलं की वेगळा विचार ऐकायची, मग तो चुकीचा का असेना निदान ऐकावा असं वाटायचीही गरज वाटेनाशी होते. राजकारणात आम्हाला शिरायची गरज वाटत नाही. त्या बजबजपुरीत शिरण्यापेक्षा आम्ही आमचं कार्य करत राहू हा विचार चांगला दिसत असला तरी त्याने नुकसानच जास्त झालं. पण होलियर दॅन दाऊ असले तरी स्वयंसेवक स्वच्छ होते, स्वार्थी नव्हते. म्हणजे ज्या लोकांनी राजकारणात खरं तर जायला हवं ते संचलनं करत राहिले, दुर्घटना घडली की सरकारी यंत्रणेच्या आधी तोंडाला फडकी बांधून पोचू लागले. जणू समांतर सरकारच स्थापन झाल्यासारखं झालं. पण जनाधार होता. ठराविक आर्थिक स्तरांतील लोकांचा. म्हणजे मध्यमवर्गाचा. त्या आधारामागे मोठा हातभार होता तो पूर्णवेळ कार्यकर्ते या खरोखरच निरलसपणे काम करणाऱ्या लोकांचा. होलियर दॅन दाउ लोक ते हे नव्हेत. यांच्या कामाच्या जोरावर व्यासपीठावर मागे लोडाला टेकून बसत ते होलियर दॅन दाउ असायचे. तेही तसे भ्रष्ट नसायचे, पण त्यांना खरोखरच आपण संघटन करून राहिलो आहोत असंच वाटायचं. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ आपल्याला उमजून राहिला आहे असं त्यांना खरंच वाटायचं आणि त्यांची छाती अभिमानाने भरून यायची. त्यांनी शहाणे करून सोडावे सकळ जन असा निर्धार केलेला असायचा. पण या भारतवर्षात प्रत्येक जण स्वयंभू आणि शहाणा. त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटायचं की दुसऱ्याला शहाणं करून सोडावं. त्यातून काँग्रेसच्या लोकांची गोष्टच वेगळी. काँग्रेसचे लोक कामात अतिशय व्यग्र असणारे होते. त्यांची एक सिस्टीम लागलेली होती. एकदा रुमाल बांधून नेहरू घराण्याची सरदारकी पत्करली की एक बरं असायचं, देशासाठी अथवा समाजासाठी डोकं वापरून विचार करायची गरज राहायची नाही. मग ते डोकं साठेबाजी, स्मगलिंग असले मान्यताप्राप्त अवैध धंदे किंवा मग गाव स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती, झेडपी, सहकार क्षेत्र असल्या मान्यताप्राप्त वैध धंद्यात लागायचं. राष्ट्रप्रेम वगैरे शब्द कुणी उच्चारले की ही मंडळी "तर तर! राष्ट्रप्रेम पायजेलच की." असं म्हणून मिशीत हसायची. ही जानवी काय झेडपी ला हुबी ऱ्हात न्हाईत, कृषी उत्पन्नच्या वाऱ्याला हुबी ऱ्हात न्हाईत, मग कशाला विरोध करायचा? लावा तुमच्या शाखा आणि तासाभरानं विकीर करून घरला संध्येच्या टायमाला पोचा. शाखेत फक्त जानवी येत नाहीत, तिथे जात पात मानली जात नाही हे खाजगीत कबूल करणारे हे लोक निवडणुका आल्या की मात्र संघाचा जातीयवादी वापर करत असत.

फास्ट फॉरवर्ड तीस वर्षे. त्यावेळचे तरुण वर्गातील स्वयंसेवक आता प्रौढ वर्गात जाऊ लागले. हिंदुराष्ट्रवादी भूमिका पूर्वी तशीच होती. फक्त आता त्यात कालानुरूप बदल घडले. पूर्वी स्वयंसेवक "पूर्णवेळ" झाला नाही तर तो टेल्को अथवा गोदरेज किंवा तत्सम कंपनीत चिकटायचा, अथवा स्टेट बँक, किमान पक्षी गावच्या शाळा कॉलेजमध्ये नोकरीला लागायचा. आता त्यात संगणक व्यावसायिक मिळाले. म्हणजे पाच दिवस वरण भात तूप पण वीकएंडला पिझ्झा वाले. गूगलच्या आशीर्वादाने बसल्या बसल्या "आपले पूर्वज, आपली संस्कृती कस्सले पुढारलेले  होते नै मित्रांनो?" करणारे. महत्वाचा बदल म्हणजे सत्तेत न राहता समाजकार्य करत रहायचं हा दृष्टिकोन बदलला. पूर्वी सत्ता नसल्यामुळे सत्तेचा मोह काय असतो हे माहीत नव्हतं. त्याचा एक वेगळाच अभिमानवजा गर्व असायचा. "आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना" अशी पद्ये म्हणायला बरं वाटायचं. सत्ता हातात घेऊन त्याचा मोह न बाळगता लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करण्याचा अनुभव कुणालाच नव्हता. थोडक्यात दरिद्री माणसाने उगाचच "सोने माणिक आम्हां मृत्तिकेसमान" म्हटल्याप्रमाणे होतं. तुकाराम वगैरे प्रभृतींचं ठीक होतं, त्यांना गाथा, अभंग वगैरे लिहून अनुभव होता. एवढं भरघोस लिखाण करून कुणी त्याची दाद घेत नव्हतं, उलट ते लिखाण इंद्रायणीच्या डोहात बुडवायला वगैरे सांगितल्यावर वैराग्य यायचंच. इथे गावात शिबिर भरतं आहे, त्यासाठी घरून पोळ्या पाठवल्या आहेत, इतक्या भरघोस त्यागाच्या जोरावर "आम्ही बिघडलो" हे पद्य म्हटलं जायचं. पण निर्णय झाला. आता सत्तेत येऊन समाज बदलायचा. राष्ट्रप्रेम कसं ओसंडून वाहिलं पाहिजे सगळ्यांतून. तळागाळात काम होतंच. पण काँग्रेसनं लोकांची नस बरोबर ओळखली होती. मध्यमवर्गाची त्यांना फिकीर नव्हतीच. गुंड, दरोडेखोर, सट्टेबाज,साठेबाज,दलाल यांना त्यांचे धंदे करायला दिलं की तेच लोक आपले धंदे सुखरूप ठेवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत ठेवायला धडपडणार हे काँग्रेसचं गणित गेली कित्येक वर्षं चाललं होतं. मग काँग्रेसचा पाडाव करायला काँग्रेससारखीच समीकरणं मांडली. ती यशस्वीही झाली. पण सत्तेत आल्यानंतर खरी मज्जा कळली. काँग्रेसवाले उगाच समाजोपयोगी कामं वगैरेच्या भिकार भानगडीत न पडता सत्तेचा अनुनय का करत राहिले होते ते समजू लागलं. एक प्रकारचा युरेका क्षण सापडला. उड्डाणपूल, महामार्ग, जलसिंचन योजना इत्यादि कुणाच्या उद्धारासाठी आणि प्रगतीसाठी आहेत याचा उलगडा झाला. शिवाय सत्तेत राहूनच पुढील सत्तेची जुळणी करता येते हे लक्षात आलं. काहींना हे पचलं नाही. त्यांना लगेच सुधारणा करायच्या होत्या. पण विचार असा होता, की प्रथम पक्ष बलवान झाला पाहिजे. बलवान झाल्यानंतर राष्ट्रउभारणी आहेच.यश मिळालं पण मध्यमवर्गाची आता पंचाईत झाली. वर्षानुवर्षं माध्यम वर्ग संघाला पाठिंबा देत आला. पण संघाच्या विचारसरणीला कुठं तरी भाजपने फारकत दिली आणि काँग्रेसच्या भ्रष्ट गेंड्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आता हे जे कुणी सत्तेत बसले आहेत त्यांच्यात व काँग्रेसच्या निबर कातडीच्या गबर, मुजोर लोकांच्यात काही फरक कळेनासा झाला.

असं असलं तरी, कितीही हिताची बाब असली तरी केवळ मोदी म्हणतायत म्हणून त्याला विरोध हा काय प्रकार आहे हेच कळत नाही. नियम वर्षानुवर्षं अस्तित्वात असलेले असताना अचानक त्याचा जाच होतो म्हणून बोंब ठोकायची आणि अच्छे दिन हेच का म्हणून विचारायचं. निश्चलनीकरण तर यशस्वी होऊच द्यायचं नाही असा काँग्रेसचा उघड उघड डाव आहे. मग त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरलं. काँग्रेसचेच गबर दलाल, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्याच ताब्यात. कॅशलेस व्यवहार करणं त्यांना अवघड नव्हतं. आयओयू लिहून देता आले असते. पण मग मोदी यशस्वी झाले असते. मग शेतकऱ्यांचा माल विकतच घ्यायचा नाही, रक्कम हातात नाही म्हणून व्यवहार नाही असं सांगणं सुरू झालं. आणि मग शेतकऱ्यांबद्दल उमाळे फुटले, त्यांच्या "वास्तव" कथा सर्वत्र फिरू लागल्या. सडलेले टोमॅटो, बटाटे कांदे यांचे फोटो मीडियावर फिरू लागले. काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न समितीने वेळेत विकत घेतला नाही म्हणून टनावारी कांदा सडल्याचे फोटो आले होते. त्यावेळी हे उमाळावाले कुठे लुप्त झाले होते कुणास ठाऊक. आपल्याकडे बँकेने कर्ज दिलं नाही किंवा दिलं, पाऊस पडला नाही किंवा खूप पडला, खूप उत्पन्न झालं किंवा दुष्काळाने काहीच झालं नाही तर शेतकरी थेट देशोधडीलाच लागतो. अधेमधे कुठे थांबत नाही. एकदा उमाळे सुरू झाले की मग कुणी लॉजिकल काही सुचवलं तर त्याला लगेच "तुम्हाला शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार?" असे प्रश्न सुरू होतात. हातावरचं पोट असणाऱ्यांचे मात्र हाल झाले हे कबूल करावं लागेल. मग हिंदुराष्ट्राची उभारणी करता करता लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत याचा थोडासा विसर पडला असं वाटू लागलं. सर्वात महत्व कशाला? राष्ट्र आधी हे तर खरंच. पण मी म्हणेन तोच राष्ट्रवाद हा हट्ट लोकशाहीशी जुळणारा नाही. सर्वांना मत आहे, अगदी मूर्खपणाचं वाटलं तरी ते आहे. हे लोकशाहीचं मूलतत्व आहे. सध्या भाजप किंवा संघ विचारसरणीला जो विरोध होतो आहे तो यासाठी. म्हणून एकावन्न टक्के लोकांनी देश खड्ड्यात घालण्यासाठी आंदोलन केलं तर लोकशाहीच्या तत्वाला मान देऊन मोठ्या इतमामाने देश खड्ड्यात जाऊ द्यावा. काँग्रेसवाले, बजाव ताली!

Wednesday, December 14, 2016

काही बोलायाचे आहे पण....

सायबांच्या केबिनचं दार उघडलं आणि फणकाऱ्याने मिस रोज बाहेर आली आणि पाय आपटत आपल्या टेबलकडे गेली. तिने हातातली फाईल टेबलावर फेकली आणि धाड्कन खुर्चीवर देह झोकून दिला. आणि म्हणाली,""आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई!" मिस रोज आमच्या हाफिसाची जणू मधुबालाच. म्हणजे तशी काही कमनीय वगैरे म्हणता आलं नसतं तिला. म्हणजे नसतंच खरं तर. ५६x५६x५६ म्हणजे फायर हायड्रंट सारखी बांधणी. चूक तिची नाय हो. कुणी रोज फाफडा, ढोकळा, उंधियु  खाऊन ३६x२४x३६ राहून दाखवावं. चॅलेंज आहे आपलं. पण बाई मधुबाला नसली तरी मधुबोला तरी होतीच. सर्वांशी गोड बोलून काम करून घ्यायची. त्यातून कामाला वाघ. सकाळी सात वाजता यायची ते रात्री दहाला जायची. दिवसातून बाथरूमलाही एकदा म्हणजे एकदाच. अगदी लिपस्टिकसुद्धा लावायला सुद्धा जायची नाही. नाही तर आमचा पेंडशा! दिवसातून दहा वेळा कानाला जानवं लावतो. वेंकी तर उघड उघड जरा व्हॉट्सऍपला जाऊन येतो म्हणतो. मिस रोज दोन वर्षांपूर्वीच आली पण कानामागून आली आणि तिखट झाली असा प्रकार. वेंकी, गडकरी वगैरे इतक्या वर्षांपासूनचे.  मिस्टर लालवाणी तर रिटायरमेंटला आलेले. त्यांची सिनिऑरिटी खरं तर. या सगळ्यांना डावलून सायबांनी मिस रोजला सगळे अधिकार दिलेले. लालवाणी लालबुंद होऊन गरजले होते,"या बाईला ठेवाल तर आम्हाला मुकाल." आता लालवाणींचा मुका कोण घेणार? तरीही सायबांनी बाईंना ठेवलं. वास्तविक बारकाईनं पाहिलं तर मिस रोजना बारीक दाढीमिशा पण होत्या. पण लालवाणींच्या मिशांपेक्षा त्या कमी टोचतील असा विचार सायबांनी केला असावा. पण लालवाणींनी काही धमकीप्रमाणे मुकाबिका घेतला नव्हता. मिस रोजनीही आल्या आल्या चांगला पदर बिदर ओढून डोळ्यात पाणी आणून लालवाणींना नमस्कार केला होता. लालवाणींनी गहिवरून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. मिस रोज चक्क लाजून जांभळ्या झाल्या होत्या. त्यांनी "इश्श, आत्ता कुठं आम्हाला साठावं लागतंय. आमचं लग्न सुद्धा नाही झालं अजून" असा साभिनय डायलॉग मारला होता. त्यावर लालवाणींनी,"वाह! आमचीही तीच अवस्था आहे. आत्ता कुठं सत्तरी ओलांडलीय. आमचं प्रोफाईल पहा बरं का. लोकाग्रहास्तव रजिस्टर करून टाकलं झालं. रिअल हनुमान मॅट्रिमोनी डॉट कॉम. लगेच कित्येक फोन आले. पण दुर्दैवाने फोन करणारेही पवनसुत हनुमान निघाले. सध्या  रिटायर्ड सिंगल्स डॉट कॉम वर पडीक आहे." मिस रोजने एक सहानुभूतीचा कटाक्ष टाकून त्यांची ट्रान्सफर स्वागत खात्यात करून टाकली होती. त्यानंतर मिस रोजने क्रांतिकारी निर्णय घ्यायला सुरवात केली होती. सर्वात प्रथम बाथरूम टाईमवर नियम काढले. तीन मिनिटाच्या वर जर कुणी "आत" राहिले तर आपोपाप फ्लश होऊन टॉयलेट पेपर भिंतीत गुप्त होत असे आणि त्या सिंहासनावर हताशपणे विराजमान झाल्याचा फोटोही निघत असे. शिवाय टॉयलेटमध्ये वायफायच काय फोन नेटवर्कही ब्लॉक करून टाकले. अपलोड वगैरे लाड विसरा, जे काय असेल ते झटपट डाऊनलोड करा आणि परत कामाला लागा असाच त्यातून संदेश दिला होता. प्रथम रांगा लागल्या, पण तीन मिनिटांत आवरतं घ्यायला लागत असल्याने लोकांना फार वेळ थांबायला लागत नव्हतं. मग पुढे पुढे लोकांनाही सवय झाली. भारताच्या इतिहासात असा कठोर संदेश पूर्वी फक्त इंदिरा गांधींनी "एकच जादू, झपाटून काम" या घोषणेतून दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भारताची लोकसंख्या पाच महिन्यांत दहा टक्क्यांनी वाढली होती. लोकांनी सरकारला साथ द्यायचं ठरवलं तर काय अशक्य आहे?

तीच मिस रोज "आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई. " असं फणकाऱ्याने जेव्हा म्हणू लागली आणि ऑफिसातील यच्चयावत क्रिया तत्क्षणी थांबल्या. पेंडशा एक्सेल शीटशी लढाई करत होता, सेल्सचा प्रधान नवी आरएफपी आली होती तिची चिंता करत बसला होता, गडकरी म्याडमचा नुकताच पहिला चहा झाला होता आणि त्या आत्ता कुठे फेसबुकवर आपलाच फोटो पाहून स्वतःशी खुद्कन हसत होत्या, दत्तू त्यांच्या मागे उभा राहून तो फोटो पाहून दात काढत उभा होता. नव्यानेच भरती झालेला खुजटमल गडकरी म्याडमवर खार खाऊन असायचा. कामाच्या दुसऱ्याच दिवशी बाई आठ तासातले सहा तास व्हाट्सऍप, फेसबुकवर पडीक असतात तरी त्यांना पगार मिळतो अशी त्याने एचआर कडे तक्रार केली होती. खुद्द एचआरचे हेडच गडकरी म्याडमचे मिष्टर निघाल्यावर तो फारच व्यथित झाला होता. त्यात मिस रोजनी पुरावे मागितल्यावर गळपटला. मग तो रोज काम करता करता नाकातून फूत्कार टाकत तो म्याडमकडे चष्म्याच्या वरून रोखून पाहू लागला होता. शेवटी गडकरी म्याडमनी रीतसर हॅरॅसमेंटची तक्रार केल्यावर त्याने रोखून बघणे थांबवले पण टोमणे सुरूच ठेवले. इथे मिस रोज आता लाडिकपणे पण पेटली होती,"आता आमाला बोलायला द्यायचंच नाई म्हंजे काय म्हणावं आता? चांगलं कंपनीच्या भल्यासाठी काही करायला जावं तर मेली आमालाच बोलणी. म्हणे तुमी आता बोलूच नका. बरं नाई तर नाई. आमी सरळ स्टाफशी बोलू." आम्ही म्हटलं , म्याडम तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बॉस. त्यातून कडक! तुम्ही चार्ज घेतल्यापासून ऑफिसमध्ये चहासुद्धा स्वतःच्या पैशाने प्यायला लागतो आहे. तुमची कोल्हापुरी चप्पल बाहेर कॉरिडॉरमध्ये करकरली की हा खुजटमलही सावरून बसतो. इथे खुजटमल मध्येच चिरक्या आवाजात म्हणाला,"काही नाही हं, घाबरत वगैरे काही नाही आपण. एकदा कधी तरी पाठ अवघडली म्हणून सरळ बसत होतो तर तेवढ्यात या आल्या." बूट, पैशाचं पाकीट,चड्डी बनियन शर्ट प्यांट इत्यादि ऐवज धरून पन्नास किलोसुद्धा वजन होणार नाही या खुजटमलचं, पण ऐट पैलवानाची करतो. चालणंही उगाच हात पैलवानासारखे ठेवून कंसात चालल्यासारखं. मिस रोजवर उगाच चिडून असतो. सगळ्या स्टाफला तिच्याबद्दल कायबाय सांगून भडकवत असतो. परंतु आम्हाला दाट संशय आहे मिस रोज या खुजटमलची गुप्त क्रश आहे. कधी तरी याच्या टेबलाची झडती घ्यायला हवी.

एरवी मिस रोज आम्हाला दिसतसुद्धा नाहीत. त्या केबिनमध्ये तर आम्ही आपले बाहेर एका हॉलमध्ये बसणारे. आज चक्क बाई आमच्यात बसून मनीची व्यथा सांगतात याचंच कवतिक घेऊन आमचं काळीज सुपाएवढं झालं. एरवी त्यांच्या मनीची बात आम्हाला जी आर मधूनच कळायची. मग आम्ही मिस रोजना विचारलं, पण तुम्हाला एवढं रुसायला झालं तरी काय? कोण तुम्हाला बोलू देत नाही? या ऑफिसात तुमची शिस्त आणि नियम चालतो. तुम्हाला कोण अडवणार? यावर मिस रोज स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे शून्यात लागले आणि त्या म्हणाल्या "आम्हाला ऑफिसात बोलायची परवानगी नाही." हे म्हणजे अतिच झाले. बाई जवळ जवळ मालकच होत्या. मालकही बाईंच्या जवळ जवळ होते. मग कोण कुणाला परवानगी देणार आणि नाकारणार? पेंडशानं धीर करून विचारलं,"का?" पेंडशानं हा "का" इतक्या तालात विचारला की इथे मला उगाचच "एक लाजरा न साजरा मुखडा" मधल्या अरुण सरनाईकच्या त्या "का?" ची आठवण झाली. मिस रोज आता लाजून "बगत्यात!" म्हणतात की काय असं एकदा वाटून गेलं. "मित्र हो!" बाई म्हणाल्या. इथे आम्ही सावध झालो. हे शब्द हल्ली कानावर पडले की त्या पाठोपाठ काही तरी मागणी येत असते हे अनुभवानं आम्ही शिकलो आहोत. पण तसं काही झालं नाही. मिस रोज पुढे म्हणाल्या "मित्र हो! आम्ही नियम करतो ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी, आपल्या कंपनीच्याच फायद्यासाठी. पण कुणी तरी आमच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यातल्या त्यात आमच्या "मर्यादित लघु-दीर्घशंका" नियमाविरुद्ध. मी सरळ कार्यक्षमतेत झालेल्या वाढीचे आकडे समोर ठेवले. साहेब अतिशय खूष झाले. आणि ज्याने तक्रार केली होती त्याच्यावरच ऍक्शन घ्या असा मला सल्ला दिला." बाई थांबल्या. आम्हाला काही कळले नाही. साहेब जर खूष झाले आहेत तर बाई फुरंगटून का बसल्या आहेत? पेंडशा बसल्या जागी चुळबूळ करीत म्हणाला,"असं? क क क्का म्हणे असं? म्हणजे मला म्हणायचं होतं, वा! वा! बरोबरच आहे. कैच्या कैच तक्रार आहे ही." बाई पुढे म्हणाल्या,"दुर्दैवी घटना पुढे घडली. तासाभराने मला साहेबांचाच फोन आला. मी उचलल्या उचलल्या पहिला शब्द आला,"च्या मायला!" "कसले नियम करता हो? तीन मिनिटं फक्त? न सांगता असे कसे निर्णय घेता तुम्ही?" मी शांतपणे विचारलं,"साहेब कुठं आहात तुम्ही?" त्यावर तर तिकडे स्फोटच झाला,"कुठं? तुमच्याच निर्णयाचा लाभ घेत बसलोय! म्हणजे कुठे असणार सांगा पाहू? या पुढे कुठलाही नियम करणार असाल तर प्रथम आम्हाला सांगा! बास! आम्ही यावर काही ऐकणार नाही तुमचं! आणि त्या दत्त्याला पाठवून द्या इकडे, तुम्ही जप्त केलेली रसद घेऊन ये म्हणावं! काय थंडी आहे इथे! ऑफिसापेक्षा इथे एसी जास्त! त्यात फोटोही निघालाय आमचा! तुमचे नियम होतात आणि आमचा पार्श्वभाग गोठतो. काय अवदसा आठवली आणि तुम्हाला एम.डी. केलं देव जाणे! ठेवा फोन आता!" "आता सांगा!" बाई आमच्याकडे पाहू लागल्या. खरं तर आम्हाला सायबांचा निघालेला तो सिंहासनावर अवघडासन करत बसलेला फोटू पाहायची दुर्दम्य इच्छा होत होती. तो त्यांच्या आधार कार्डावरील फोटोपेक्षा जास्त करमणूक करेल यात शंका नव्हती. "हा नियम का केला याचं कारण सांगायलाही आमाला बोलू दिलं नाई. सायबांकडे तक्रार कुणी केली असेल बरं?" असं म्हणून बाई आमच्याकडे पाहू लागल्या. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. का कुणास ठाऊक, पेंडशा कधी गुप्त झाला ते कळलंच नाही.

Sunday, December 4, 2016

वासरी अरविंदाची - भाग (कुणी लेकाच्यानं मोजलेत?)

सगळं कसं छान चाललं होतं. केंद्रात मोदी आणि दिल्लीत आम्ही. भल्या पहाटे नऊ वाजता उठावं, नाकधौती करावी, खाकरून खोकून घशाचा तंतू न तंतू जागा करावा, मग आसनं करावीत. पश्चिमोत्तानासन, श्वानासन, व्याघ्रासन. श्वानासन करताना अचानक पोट मोकळं झाल्याचं समाधान मिळावं आणि मुखावर ते दैवी सुख विलसावं. त्या आनंदात निर्विकल्प समाधी लागावी ते थेट एकदम स्वत:च्याच घोरण्याच्या आवाजाने जाग येईपर्यंत. मग उठावं, छानपैकी आळस द्यावा. कधी कधी वाटतं हे आळस देणं म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेलं वरदानच. तासभर आसनं करून जो आराम मिळत नाही तो तीस सेकंदांच्या आळोख्यापिळोख्यांनी मिळतो हे एक उघडे सत्य आहे. असो. यानंतर मोजून तीन बदाम, पाच मनुका आणि १०० मिली गाईचे दूध असा अल्प आहार घ्यावा. बंगळुरास निसर्गोपचार घेताना तुम्हाला एवढाच पचेल असे वैद्यांनी सांगितलेले. व्यक्ती तशी प्रकृती. असा अल्पोपाहार झाल्यानंतर ॐकार करावा. ठणाणा करण्यासाठी छाती आणि फुफ्फुसे उत्तम हवीत. ॐकाराने खूप फरक पडला आहे. पूर्वी आवाज चिरकत असे. आता सायंकाळपर्यंत टिकतो. हे म्हणजे आयफोनच्या ब्याटरीपेक्षा भारी झाले. मी बस्ती घेत असताना एका वात्रट कार्यकर्त्याने माझा फोटो घेतला होता. त्यात मीच चार्जिंगला लावलेल्या आयफोनसारखा दिसत होतो. त्या बस्तीनंतर मी फुल चार्ज होऊन जोमाने कामाला लागलो होतो. दोन दिवस मोदींची आठवणही झाली नव्हती. मग यथावकाश जुन्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यातून अपचन, वायुगोळा, आम्लपित्त हे सगळे परत आले ते सोडा. पंजाबच्या निवडणुका आल्या. परमेश्वर कृपेने दिल्लीच्या रूपात घबाड हाती लागले होते. निवडणुकीची सोय झाली होती. काही तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पैसे वाटून निवडणुका लढण्याला विरोध केला होता. येडझवे तेच्या मायला. मी म्हणालो, पाणी घातलं नाही तर झाडही वाढत नाही. हे पाणी घालणं आहे असं समजा. तर जाऊन भाजपला मिळाले. मरो! ट्वीट करून टाकलं, मोदींनी आमच्या पक्षात घरभेदी घुसवले होते. तर एकूण जय्यत तयारी होती. निवडणुका काय नुसत्या तत्वावर थोड्याच जिंकता येतात? गड्ड्या लागतातच. त्यांची तजवीज दिल्लीकरांनीच करून ठेवली होती. आता उडता पंजाब लवकरच उघडा पंजाब वाघडा पंजाब होणार होता. तेवढ्यात माशी शिंकली. 

कालच त्या गड्डीतून पाचशेच्या दोन नोटा आणि हजारच्या दोन अशा हळूच काढून घेतल्या होत्या. सोपं काम नव्हतं. मनीष लेकाचा खजिन्यावरच्या नागोबासारखा त्यावर बसून असतो. बरं काढून तर घेतल्या, आणि म्हटलं जरा आज जरा इडली डोसा पाणीपुरी वगैरे आम चैन करावी. मग निवांतपणे मोदीनामस्मरणाची वही बाहेर काढली. प्रतिदिनी किमान दश सहस्त्र वेळा नाम लिहिले किंवा उच्चारले पाहिजे हा आमचा शिरस्ता. तो बंगळुरात बस्ती घेत असतानाही चुकवला नाही आम्ही. एका बाजूने सर्व मळमळ तर दुसऱ्या बाजूने सर्वतोपरी जळजळ असा विलक्षण अनुभव होता तो. बस्ती देणाऱ्या कर्मचाऱ्याने स्तिमित होऊन "पुढील वेळेस बस्ती दोन्ही बाजूंनी देणे" असा शेरा आमच्या केसपेपरवर लिहिला. आमचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याने "काळजी नसावी, वेगळे पाईप वापरू" असा दिलासा दिला. त्या निसर्गोपचारानंतर खूप उल्हसित आणि हलके वाटले होते. असो. तर आज नामस्मरणाची वही काढली. मागील पानावरून पुढे जाण्यासाठी बोटाला थुंकी लावून पान पलटणार तोच चिरंजीव आत आले. "डेड! डेड! बाहर आईये!" आयला याला हिंदी शाळेत घालून पस्तावलो आहे. "ॲ" या उच्चारलिखाणाचं काय वावडं आहे या हिंदीला कुणास ठाऊक. "अरे कधी तरी डॅड म्हण की रे सोट्या!" त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत चिरंजीव उद्गारले,"डेड, जल्दी बाहर आईये! टीव्हीपर मोदीअंकल आये है!" च्यायला ते अंकल, आणि मी मात्र डेड! नालायक कार्टं! बाहेर आलो आणि पाहतो तर टीव्हीवर होतेच हे महाशय. तिळपापड झाला अंगाचा. त्यात आमचे कुटुंब अगदी टीव्हीसमोर गवारीच्या शेंगा मोडत अगदी टक लावून पाहत होते. हातातील गवारीचे पार दहा तुकडे झाले होते त्याचेही तिला भान नव्हते. जाम भडकलो. मफलर लावतो म्हणून काय झालं, मीही तेवढाच मर्दानी दिसतो. "हे काय?!! आजही गवारीची भाजी?" कैच्या कैच बोलून गेलो. बोलायचं दुसरंच होतं. आणि आवाज जरा चिरकल्याने व्हावा तेवढा त्वेषही व्यक्त झाला नाही. परिणाम एवढाच झाला की तिने चिलट वारावे तसा हात हलवला आणि रीमोट हातात घेऊन टीव्हीचा आवाज वाढवला. नमो सांगत होते की आज रात्री बारापासून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द! आॅं!! धप्प करून खुर्चीवर बसलो आणि पुढच्याच क्षणी एक दीर्घ किंकाळी माझ्या मुखातून बाहेर पडली आणि पुन्हा ताडदिशी उभा राहिलो. चिरंजीव घाबरून घराबाहेर पळाले, हिच्या हातून गवारीच्या दोन तीन शेंगा हवेत उडाल्या, मातोश्री कवळीचा डबा घेऊन येत होत्या त्यांच्या हातातून कवळीचा डबा खाली पडून कवळ्या फरशीवर विखुरल्या, पिताश्रींना ऐकू येत नसल्याने त्यांनी फक्त कान खाजवला आणि माझ्याकडे एक नापसंतीचा कटाक्ष टाकला. मातोश्री भडकून म्हणाल्या,"मेल्या, एवढं जीव गेल्यासारखं कशाला ओरडतोएस? मोदीनं नोटा बंद केल्या तर तुझं काय वाकडं झालं रे?" ही म्हणाली,"आचरटपणा काय करायचा तो तिकडे आॅफिसात करा. मेला टीव्हीही धड नाही पाहू देत!" मी भडकून म्हणालो,"माझा आचरटपणा? माझा? इथे खुर्चीवर तुझ्या विणकामाच्या सुया कोणी ठेवल्या?" "मोदी ग्ग!" मी कळवळून म्हणालो. हो, गेली काही वर्षे "आई ग्ग" च्या ऐवजी "मोदी ग्ग" असंच येतं तोंडात. ही माझ्याकडे डोळे बारीक करून पाहत होती. या वेदना नोटा रद्द झाल्याच्या की सुयांनी पार्श्वभागात सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या हे तिलाच काय मलाही समजलं नव्हतं. 

त्या वेदना ओसरायच्या आत फोन वाजला. च्या आयला, असं स्वत:शी चडफडत उचलला आणि "कोणाय?" असं खेकसलो. मनीष होता. तोही वेदनेने कळवळत होता. "काय रे! तुझ्याही बायकोने सोफ्यावर विणकामाच्या सुया ठेवल्या काय होत्या कायरे?" असा त्याही स्थितीत मी काव्यशास्त्रविनोद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने "#$&$@! मोदी के @$&%#$!" असे उत्तर दिले. मी चट्कन स्पीकर फोन बंद केला आणि फोन कानाला लावला. पण मातोश्रींनी भुवया उंचावल्या होत्याच. "सर जी हम वो हस हस के सह लेते, हमारा पिछवाडा लोहे का बनाया हुआ है. टीव्ही  ऑन किजीये और सुनिये, कहां क्या घुसा है. सर जी, आज पंजाब गुजरातके लिये गाडियां निकलनेवाली थी. मोदीने रिझर्वेशनही कॅन्सल कर दिया. वेटिंग लिस्टपर भी नही रख्खा. चलो अब दिल्ली मेट्रोही सही. विदाऊट टिकट जाया करेंगे पहले जैसे. %*$#$ में @$#%#$ इस मोदी के!" भावना अस्खलित होत्या. मीही म्हणालो "हां हां, अब दिल्ली का विकास. मैं पहुँचही रहा हूँ ऑफिसमें।" फोन ठेवला आणि नामस्मरणाची वही, फोन आणि जपमाळ हातात घेतली. दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. कपालभांति करत जपाला सुरुवात केली, मनात "मोदीच्या @#@$#% ला $$&%@!"म्हटले , वहीत नमो वशीकरण मंत्र लिहिला आणि ट्विटरवर ट्वीट केले "मोदीजी, कितनी हाय लोगे हम जैसे लोगोंकी? पचपन मौतें हुई है पचपन!". पुनः एकदा बंगळुरास जाऊन यावे अशी भावना होते आहे.

Monday, September 5, 2016

काळ - एक मोनो-लॉग

काळ म्हणजे काय? कधी एकटं असताना, कसलंही व्यवधान नसताना, कसलेही विचार नसताना स्वत:ला हा प्रश्न विचारून पहावा. खरंच, काळ म्हणजे नेमके काय प्रकरण आहे? आपण आपल्या वयाच्या गणनेशी काळाचा संबंध जोडतो. एखादी वस्तू एवढी एवढी जुनी आहे म्हणतो. म्हणजे नेमके काय? एखादी वस्तू २००० वर्षे जुनी आहे आहे असे म्हणणे म्हणजे खरोखर अनंत कालगणनेतील एक कालखंडात ती अस्तित्वात आहे असे म्हणणे.  काल ही संकल्पना आहे. ती संलग्न आहे का, ती सलग आहे का, ती मुळात आहे का हे सगळे प्रश्न तात्विक आणि म्हणून अनुत्तरित राहतात. कसलीच संकल्पना अस्तित्वात नसणे ही संकल्पना समजून घेणे जरा कठीणच. कृष्णविवरात काळ थांबला म्हणजे अस्तित्वात नसतो असे म्हणता येईल. पण बाहेर काळ वाहत असेल तरच सापेक्षतेने कृष्णविवरात काळ नाही असे म्हणावे लागेल. म्हणजे काळ सर्वत्र आहे, काही ठिकाणी तो थांबला आहे, मंदावला आहे तर अन्यत्र तो आपल्याला आकलन होईल अशा गतीने चालू आहे. पण "चालू" आहे असे म्हणणे हे तरी बरोबर आहे का? "चालू आहे" हा शब्दप्रयोग स-दिश (व्हेक्टर) प्रकृती दर्शवतो. स-दिश म्हटले की कशाच्या तरी संदर्भात दिशा दर्शवणे  आले. हा संदर्भ कशाचा देणार? मग काळ अ-दिश मानावा का?

सर्वसामान्यपणे आपण काळ आपल्या आयुष्याच्या तुलनेत मोजतो. ज्या वस्तू अस्तित्वात आहेत त्यांचा सतत क्षय होत असतो. क्षय याचा अर्थ बदल असाही घ्यायचा. परंतु आपण ही संकल्पना नाश पावणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात आणून ठेवली आहे. बदल अथवा क्षय हा केवळ पूर्वस्मृती असेल तरच समजू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूत घडलेला बदल हा त्या वस्तूची आधीची स्थिती ज्ञात असेल तरच कळणे शक्य आहे. तर्कबुद्धी ही अज्ञाताविषयी चिंतन करण्यात वापरता येते असे म्हटले तर तर्क करण्यासाठी मूल माहिती वापरून तिच्या आधारे व्याप्ती वाढवता येते. याचा अर्थ काल ही संकल्पना आपल्याला तर्कबुद्धी, पूर्वमाहितीचा वापर, पूर्वमाहिती तर्कबुद्धीबरोबर वापरून संशोधनक्षमता या गोष्टींमुळे अस्तित्वात आली असावी असे वाटते. मानवाखेरीज इतर प्राण्यांना ही क्षमता असते पण बरीच कमी असते. पूर्वमाहिती आणि अनुभव, तर बरेच वेळा अपघाताने असे प्राणी शिकले, उत्क्रांत पावले. पण तर्कबुद्धी वापरून अमूर्त संकल्पना समजण्याइतकी झेप फक्त मानवानेच घेतली. अर्थात ते मोठ्या मेंदूमुळे शक्य झाले हा भाग वेगळा. प्रस्तुत मुद्दा तो नाही. जे उमजतच नाही ते त्या प्राण्याच्या संदर्भात अस्तित्वातच नाही असे धरायचे का? ते बरोबर वाटत नाही. न्यूटनने शोध लावला नव्हता तरी गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होतेच.

काळ हा एकदिश वाटला तरी तो नसावा. तसेच तो सर्वत्र एकाच "वेळी" एकाच मात्रेत नसावा. अनेक ओढ्यानाल्यांचे जाळे असावे, काही प्रवाह सलग संथ, काही खळाळते, काही ठिकाणी भोवरे निर्माण होऊन एकाच ठिकाणी फिरत असावे, तर काही ठिकाणी डोह निर्माण होऊन पाणी एकदम स्तब्ध असावे. एका प्रवाहाकडून दुसऱ्या प्रवाहाकडे जाण्यासाठी छोटे मार्ग असावेत. असं काहीसं काळाचं स्वरूप असावं असं वाटतं. पण स्वरूप म्हणजे व्याख्या नव्हे. व्याख्येकडे जाण्यासाठी स्वरूप लक्षात यावं लागतं. विश्व अचल नाही. ग्रह त्यांच्या ताऱ्यांभेवती भ्रमणकक्षेत फिरतात. तारे त्यांच्या आकाशगंगांच्या केंद्रबिंदूशी असलेल्या कृष्णविवराभोवती फिरतात. आकाशगंगाही गतिमान आहेत. महास्फोटातून निर्माण झाल्यानंतर महास्फोटाच्या बिंदूपासून त्या लांब चालल्या आहेत. एकूण, स्थिर असे काहीच नाही. विश्वउत्पत्तीच्या मूलभूत संशोधनातून अशीही एक थियरी पुढे आली आहे की विश्वनिर्मिती आणि त्याचा नाश हे काही एकदा घडणाऱ्या गोष्टी नाहीत. विश्व प्रसारणालाही अंत आहे. प्रसारणानंतर आकुंचन पावणेही आले. अर्थात हे आकुंचन प्रसारणापेक्षा जलद असावे. आकुंचन पूर्ण झाले की ती पूर्वीची "काहीही नसण्याची" स्थिती प्राप्त होते. त्यावेळी मग त्रिमितीच काय, काळही अस्तित्वात नसेल. मग अचानक पुन्हा महास्फोट होऊन पुन्हा विश्व अस्तित्वात येईल. पण काही नसण्याच्या अवस्थेतून बाहेर आल्यावर पुन्हा काही नसण्याच्या अवस्थेत जाईपर्यंत "काळ" (याला काळ म्हणतो कारण आपल्यापाशी नसण्याच्या संकल्पनेला नाव नाही) अस्तित्वात असायला हवा. तो आदि संदर्भ बिंदू, शून्य काळ बिंदू म्हणजे महास्फोट. कालप्रवाह तिथे सुरू झाला. त्या संदर्भबिंदूच्या तुलनेत सगळे मोजले जाणे हा काळ. नश्वर अशा सर्व वस्तू त्या आदि कालबिंदूपासून काही अंतरावर अस्तित्वात येतात आणि काही अंतरावर विसर्जित होतात. बदल असेल तर काळ आहे. बदल नसेल तर काळ नाही. काहीच अस्तित्वात नसेल तेव्हा काळही नसेल. पण हे विचार अस्तित्वाच्या "आतून" झाले आहेत. आकुंचन-प्रसरणाची थिअरी मानली तर काहीच अस्तित्वात नसण्याच्या स्थितीपासून पुढचा महास्फोट होऊन पुन्हा अस्तित्वाची स्थिती येईपर्यंतच्या "शून्य प्रहरा"ला काय म्हणायचं? मग ही शून्य स्थिती किती काळ राहते असाच प्रश्न मनात येतो. याचा अर्थ मग कालगणना आणि स्वत: काल ही संकल्पना या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला काळाचे आकलन गणनेतूनच होत असल्यामुळे गणनेशिवाय काळ कसा समजायचा? ते तर्काला धरूनही होत नाही. मग आकुंचन पावून शून्यावस्थेत गेलेले विश्व आणि पुन्हा महाविस्फोट होऊन अस्तित्वात आलेले विश्व यामध्ये अजिबात "काळ" नसावा. शून्यावस्थेत जाणे आणि पुन्हा अस्तित्वात येणे यात काहीच काळ नसेल तर ते नष्ट होते हे म्हणणेही तर्काला धरून होणार नाही. कारण नष्ट होणे आणि पुन: निर्माण होणे हा बदल आहे. बदल म्हणजे कालगणनेने  तो मोजणे आले. यातून असा निष्कर्ष काढता येईल तो म्हणजे काल ही विश्वापासून एक वेगळी संकल्पना असून विश्व त्यात अंतर्भूत आहे. विश्व अस्तित्वात असो वा नसो, काल अस्तित्वात असेलच. प्रथम काल, मग त्याच्या चौकटीमध्ये विश्व - म्हणजे मूलभूत भौतिक पदार्थ, मूलभूत नियम इत्यादि तयार होत असावेत. काळाचे प्रयोजन तरी काय असावे? एखादी वस्तू असते म्हणजे ती "कशात" तरी अंतर्भूत असते. तिला कंटेनर असावा लागतो. अमर्याद विश्वासाठी त्याचे अमर्यादित्व धारण करू शकणारी, त्याला अंतर्भूत करू शकणारी संकल्पना हवी. ती विश्वाच्या प्रसारणापेक्षा जराशीच जास्त आणि वाढू शकणारी हवी. तिला मूर्त स्वरूपाचे बंधन नको कारण मूर्त स्वरूपाला मर्यादा आली. अमूर्त स्वरूपात परंतु अत्यंत मूलभूत अशा नियमाने ती व्याख्यित असायला हवी.

काळ जर सर्वसमावेशक असेल तर आपण काही संज्ञा फारच फुटकळपणे वापरत आहोत. त्यातील एक म्हणजे त्रिकालाबाधित हा शब्दप्रयोग. काळ हा एक असल्यामुळे त्रिकाल हे काय आहे हे समजत नाही. तसाच त्रिकालाबाधित सत्य हा शब्दप्रयोग. त्रिकालाबाधित केवळ काळच असू शकतो. इतर सर्व वस्तू, चल अचल संकल्पना या सगळ्या काळात समाविष्ट होत असल्यामुळे त्या त्रिकालाबाधित असू शकत नाहीत. अनंत काळ ही एक संकल्पना थोडी बरोबर वाटते. अनंत विश्व सामावून घेण्यासाठी अनंत काळ आवश्यकच असला पाहिजे. विश्वाच्या व्याप्तीप्रमाणे कालाचीही व्याप्ती बदलत असली पाहिजे. म्हणजेच विश्व अनंतपटींनी विस्तार पावल्यास काळ तेवढाच विस्तारला पाहिजे, तसेच विश्व अनंतपटींनी आकुंचन पावल्यास कालही तितक्याच मात्रेने आकुंचन पावत असला पाहिजे. काहीही अस्तित्वात नसलेली अवस्थाही धारण करण्यासाठी आणि त्याच शून्याचा महास्फोट होऊन पुन्हा विश्वनिर्मिती होण्यासाठी काळ आवश्यक असावा. मातेच्या उदरासारखा. जन्म घेण्यासाठी मातेचे उदर हवेच. काळाला आदिमाता म्हणण्यास काही हरकत नसावी.

Sunday, September 4, 2016

गूर आणि गुरू

गुरुजी हा शब्दच मुळी गुरू या धातूपासून झाला आहे असे आमचे नम्र संशोधन आहे. संशोधन नम्र आहे असे नमूद केले म्हणजे त्याचा पुरावा द्यावा लागत नाही. प्राचीन काळी ही गुरे आणि गुरुजी या दोन्ही प्रजाती अस्तित्वात नव्हत्या. गुरू प्रकारचा एक प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता, पुढे यथावकाश जनुकातील बदलामुळे केवळ योगायोगाने एक नवीन प्रजाती तयार झाली. मूळ गुरू प्राणि हंबरत असे, दुगाण्या झाडत असे, ढुशा देऊन प्रतिस्पर्ध्याला लोळवत असे. नवीन प्रजातिमध्ये दुगाण्या देणे, ढुशा देणे हे गुण तर संक्रमित झालेच, परंतु हंबरणे लुप्त पावून त्याची जागा खेकसण्याने घेतली. ही नवीन प्रजाति लवकरच मान्यताप्राप्त झाली. ही प्रजाति स्वाभिमानी होती. शाळेने दिलेल्या पगाराशिवाय कोणत्याही प्रकारे द्रव्यसंचय त्यांस मान्य नसायचा. स्वत:च्या घरी मुलांस बोलावून ज्ञानदान करीत. तसेच गायीगुरेही दूध देत, त्याचे द्रव्य करणे त्यांस मानवत नसे. कालानुरूप गुरुजी या प्रजातीत लक्षणीय बदल घडून आले. हे प्राणि शाळा सोडून सर्वत्र संचार करू लागले. गावातील समवयीन गाढवे उकिरडा फुंकत असत त्यावरून प्रेरणा घेऊन गुर्जी संघटना अस्तित्वात आल्या. त्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने लाथाळ्याचा सराव करण्यासाठी पूर्ण दिवस व्यतीत होऊ लागला. त्यातून वेळ मिळाला तर शिकवणे वगैरे छंद जोपासले जाऊ लागले. गुरुजी शाळा सोडून कुठेही आढळून येऊ लागले. असं असलं तरी चुकला गुरुजी संध्याकाळी सात नंतर गावातील एका ठराविक ठिकाणी न चुकता सापडू लागला. प्राणी साहचर्याने आपला जीवनक्रम बदलतात. तसेच गुरांचे झाले. या गुरुजींची अपूर्व दिनचर्या पाहून त्यांनीही त्यांचे अनुकरण करणे सुरू केले आहे. त्यामुळे हल्ली गुरे कुठेही चरतात. कोणताही पाला खातात. रस्त्यात काहीही कारण नसताना मठ्ठ चेहरा करून उभी राहतात. कुणीही हैक करा हलत नाहीत. खूपच त्रास दिला तर शिंगे उगारून अंगावर चालून येतात. अलीकडे तर कसाईखान्यापासून अभय मिळाल्यापासून खाटीक दिसल्यावर बिनदिक्कत शेपूट वर करून गोमूत्रदान करतात. त्यांच्या हम्माsss तून नमोssss असा नाद उत्पन्न झाल्यासारखे वाटते. या सर्वांतून मी खूप काही शिकलो आहे. गुरे हे माझे शिक्षक आहेत. हल्लीचे शिक्षक पाहिले की मला गावाकडील गुरे आठवतात. गावाकडे गेल्यावर माळावर निवांत रवंथ करणारी गुरे पाहिली की खुर्चीवर बसून तंगड्या टेबलावर ठेवून गालात माणिकचंद धरून डोळे बंद करून कान कोरत बसलेले मास्तर आठवतात. दोन्ही प्रजातितील फरक कमी कमी होत चालला असून काही काळातच मूळ गुरु प्राणी दिसू लागेल अशी चिन्हे आहेत. अशा अदभुत प्राण्याच्या सन्मानार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. तस्मै श्री गुरवे नम: ||

Saturday, June 18, 2016

प्रेमाला काहीच दिसत नाही

तर आज आॅफिसमधल्या काही लोकांबरोबर दाक्षिणात्य हाटेलात जाण्याचा प्रसंग आला होता. तिथे एक इसम आपल्या प्रियतमेला घेऊन आला होता. मायला, काय पण जागा प्रेम करायची! ती इडली सांबार तोडत असताना हा अतीव प्रेमाने ते दृश्य पाहात होता. मला हसू आवरेना. प्रसंगाला अनुरूप चेष्टा केली नाही तर मग काय आपण इतके दिवस काय केलं? तर त्या दोघांना अर्पित ही उस्फूर्त कविता.

चाल - मेंदीच्या पानावर (खरंच मनात म्हणून पहा)

केळीच्या पानावर  इडली सांबार सजले गं
हाताच्या कोपरां ओघळ येऊन सुकले गं [धृ]
 
गुरगुरतो सारखा तोच हा तो अण्णा गं
झुळझुळतो लुंगीचा कटीखाली वारा, त्याच्या गं [धृ]

अजून तुझे इडलीचे हात हात भरले गं
आणि तुझ्या दातांचे ते पिवळेपण उघडे गं
[धृ]

Wednesday, May 11, 2016

थर्ड डिग्री

डिग्रीमार्तंड केजरीवाल यांनी राजकारण क्षेत्र पादाक्रांत करून झाल्यावर आता संशोधन क्षेत्रात प्रवेश केला आहे. राजकारणातच काय तो भ्रष्ट्राचार होतो अशी आजवर लोकांची समजूत होती. ती मी खोडून काढणार आहे. अनेक नियम, प्रमेये आपल्याला नुसती सांगितली गेली आणि आपण ती मानली. प्रस्थापितांच्या या चलाखीला आता आपण बळी पडणार नाही असे ते म्हणाले. याची सुरुवात लहानपणापासून त्रास देत असलेल्या भूमितीपासून करणार आहोत असे त्यांनी सांगितले. सर्वात प्रथम चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ यांनी आपापल्या डिग्र्या सिद्ध करून दाखवाव्यात असे आव्हान त्यांनी दिले आहे. "सब मिले हुए है जी. किसी एक के पास जाओ, बोलेगा, भई हमारी डिग्री ३६०. ऐसे कैसे हो सकता है? सर्कल अपनी डिग्री प्रूव करें. सदियोंसे भ्रष्टाचार करते आ रहे है जी. अब जनता फैसला करेगी. तीनसो साठ या कुछ और." तुम्हांला स्वत:ला वर्तुळाला किती डिग्र्या असाव्यात असं वाटतं असं विचारल्यावर ते म्हणाले वर्तुळाला किती डिग्र्या असाव्यात यावर बंधन नको. फक्त त्या सिद्ध करता यायला हव्यात. आम्ही १० जनपथ या ठिकाणाभोवती आमच्या आजवर मिळवलेल्या सगळ्या डिग्र्या विसरून वर्तुळे काढत असतो. लालूंना कवळ घालत त्यांच्या कानावरील केसांत आमचे नाक घुसवत असताना लालूंच्या एकशे ऐंशी डिग्री धारण केलेल्या पोटाला आमचे खपाटीला गेलेले पोट भिडलेले असते. याउलट जंतरमंतरवर जमिनीवर आडवे पडून कंठशोष करत असताना आमचे वर्तुळ एकशे ऐंशी डिग्रीचे असते. पक्षबैठकीत आमचे पूर्वीचे समर्थक वर्तुळ आक्रसत आक्रसत आता केवळ एका डिग्रीवर येऊन पोचले आहे. त्यामुळे आमचे पक्षीय निर्णय हे अक्षरश: एक मताने पास होत असतात. तेव्हा डिग्री काय असावी, तिचा उपयोग कसा करावा यावर बोलण्याचा आमचा अधिकार मोठा आहे हे लक्षात घ्या.

दिल्ली पोलिसांकडे पण थर्ड डिग्री आहे असं लोक म्हणतात. तुम्ही त्यांना ती सिद्ध करायला सांगणार का असे विचारल्यावर त्यांनी चेहरा हुप्प केला आणि चष्म्याच्या काचांवरून रोखून वार्ताहराकडे पाहू लागले. "दिल्ली के ये ठुल्ले अपनी डिग्री अपने पास रखें. हम बिना मांग किये वो प्रूव्ह कर चुके हैं. अब आशुतोषकी बारी हैं, वोही जाके पूछे."

Wednesday, April 13, 2016

शनिदशा

द्वारका पीठाधीश शंकराचार्य स्वरूपानंद हे माझे आणि मोरूचे लहानपणापासूनचे दैवत आहे.  हे दैवत कडक आहे. कोपल्यास समोर येईल त्याच्या कानफटीत देणारे हे दैवत. हा गुणधर्म मी यापूर्वी केवळ गेंडा या प्राणिमात्रात पाहिला आहे. गेंड्यास मागून फटका दिल्यास तो तडक पळत सुटतो आणि जो प्राणी प्रथम नजरेस पडेल त्याला शिंगावर घेतो. बरेच वेळेला जंगलात मैलोनमैल कुणी दिसत नाही. पण हा नियम तो पाळतो. असो. आमची दोघांचीही (पक्षी: मोरू आणि माझी) भक्ती दैवताच्या कोपशक्तीच्या डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये असते. जितके दैवत कडक तितकी आमची भक्ती घट्ट. स्वरूपानंदच काय, पुण्यश्लोक साक्षीमहाराज, कोर्टधुरंधर आसारामबापूमहाराज, आणि अध्यात्मफटाकड्या म्हणता येतील अशा अनेक साध्व्या हे जणू हिंदू धर्माचे संरक्षक हेल्मेटच. यांच्या पुढे उभे राहता येत नाही, मागे तर नाहीच नाही. केवळ नम्रतेने मांडी घालून बसता येते. यांच्या आचारांनी आणि विचारांनी डोक्याला झिणझिण्या येतात, अनावर कंड उत्पन्न होते, पण डोके खाजवता येत नाही. आजही आम्ही स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी जातो तेव्हा हेल्मेट घालूनच त्यांच्या पाया पडतो. पूर्वी एकदा मोरूने अत्यंत आदरापोटी फोडणीच्या मिसळणाचा डबा अर्पण केला होता. महाराजांनी कौतुकाने तो उघडून पाहिला. आत मोऱ्याने हळद, तिखट, जिरे, मोहरी, हिंग असे सर्व सर्व व्यवस्थित घालून दिले होते. महाराजांनी "हे काय मोरोबा?" असे प्रेमाने विचारले. महाराज प्रेमाने जेव्हा विचारतात तेव्हा त्यांच्या कपाळावरील सहा आठ्यांतील दोन कमी होतात. त्यावर मोरूने "महाराज आपण आपल्या कपाळावर रोज पाव किलो हळद आणि तिखटाची फोडणी देता ना? त्यासाठी हा डबा. आणि त्याला चव यावी म्हणून थोडे हिंगजिरे आणि मोहरी बरोबर दिली आहे." शंकराचार्यांनी तो डबा मोरूच्या डोक्यावर रिता करून पुन्हा थाडदिशी त्याच्या डोक्यावर आदळला होता. मूर्च्छा येऊन मोरू जमिनीवर घरंगळला. मोरूस समाधिअवस्था प्राप्त झाली आहे असे महाराजांच्या अनुयायांनी मला दटावले. समाधी उतरण्यास साधारण पंधरा मिनिटे लागली होती. कृष्णाने भले आपली शक्ती वापरून विश्वरूप दर्शन घडवले असेल. इथे स्वरूपानंदांनी नुसता मिसळणाचा डबा वापरून सगळे तारे, ग्रह मोरूला दाखवले होते. महाराजांचा अनुग्रह म्हणून मोरूने पोचा आलेला तो डबा आता त्याच्या घरच्या देवघरात ठेवला आहे. पण तेव्हापासून आम्ही दर्शनाला जाताना हेल्मेट घालून जातो.

माझा स्वभाव मुळातूनच भाविक, श्रद्धाळू. स्वरूपानंद जे सांगतील ते करायचे, साक्षीमहाराज जी आज्ञा देतील ती पाळायची, आसारामबापू जी मुळी देतील ती खायची. पण पूर्वी हे ठीक होतं, हे लोक आपापल्या मठात स्वत:ची कुंडलिनी जागृत करण्यात गुंतलेले असायचे. हिंदुत्वाचा प्रसार करण्याची, रक्षण वगैरे करण्याची गरज भासत नव्हती. मी दर्शनाला जात होतो, थाळीत पाच रुपये टाकत होतो, प्रसाद हाणत होतो. हो, मोरू आणि मी ज्या पद्धतीने प्रसाद ग्रहण करतो त्याला हाणणे हाच शब्द योग्य असे आमच्या सोसायटीतील बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. आता मला प्रसादाचा शिरा आवडतो. काय करणार? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. शुद्ध तुपातील प्रसाद टिकावा म्हणून का होईना हिंदुधर्म टिकावा असे मला वाटते. असे मी एकदा आमच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये शून्य प्रहरात (म्हणजे कोरम भरण्याची वाट पाहण्यासाठी ठेवलेला काळ) म्हटले. तेव्हापासून सोसायटीच्या गणपतीत मला कधीही फूड कमिटीत प्रवेश मिळाला नाही. आमच्या सोसायटीची कमिटी इन मीन पंधरा जणांची. त्यातील बारा जण फूड कमिटीवर. एक अध्यक्ष, म्हणजे स्टेजवर मधल्या खुर्चीवर बसणारा. मला आणि मोरूला तेवढे प्रॉपर्टी म्यानेजमेंटवर टाकतात लेकाचे नेहमी. प्रसाद न बोलता गट्टम करावा हेच खरे. धर्माच्या गोष्टी करू नयेत. पण हे हल्ली काय झाले आहे आहे समजत नाही. बरं एक महाराज जे म्हणतात ते करायला गेलो की तोवर दुसरे त्याच्या विरुद्ध आज्ञा देतात. मोदींनी मेक इन इंडियाची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत साक्षीमहाराजांनी किमान चार पुत्र (प्रति कुटुंब, प्रति पत्नी नव्हे) प्रसवण्याची आज्ञा दिली. ती आम्ही शिरसावंद्य मानून रीतसर मधुचंद्राची योजना आखत होतो. सगळं बुकिंग झालं होतं. छान केदारनाथची सहल करायची म्हणत होतो. तेवढ्यात स्वरूपानंदमहाराज म्हणाले, मधुचंद्र पाप! त्यानेच निसर्गाचा कोप होतो आहे. हे सगळं पूर येणं, मुसळधार पाऊस कोसळणं हे सगळं या तुमच्या मधुचंद्राच्या पापामुळेच. तुला जायचंच असेल तर या मोरूला घेऊन जा, केदारनाथाचं दर्शन घे. मोरू निर्लज्जपणे हो म्हणाला. फुकटात असेल तर तो कुठेही यायला तयार असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी स्वरूपानंदांना नम्रपणे विचारले,"स्वामीजी, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, पाऊस नाही, त्याचे कारणही हेच असेल काय? कारण आताशा उन्हाळ्यात पूर्वी होत तितकी लग्ने होत नाहीत. तेवढे मधुचंद्रही कमी झाले असावेत." स्वामींनी माझ्याकडे रोखून पाहिले. कपाळावर सहा आठ्या होत्या त्या दोनने वाढल्या. बाजूला उभ्या असलेल्या शिष्याला त्यांनी खूण केली. त्याने पानाचा डबा उघडून पुढे करावा तसा एक डबा उघडून पुढे केला. स्वामींनी त्यातली बचकभर हळद घेतली आणि आपल्या कपाळावर थापली. दोनतीन मिनिटे दीर्घश्वसन करून ते म्हणाले,"तू नास्तिक आहेस. तुझ्यासारख्या लोकांमुळे जगात पाप वाढत आहे. तुझ्यासारख्या लोकांनी आजन्म ब्रम्हचर्य पाळलं पाहिजे. मी तर म्हणतो, सर्वांनीच कडक ब्रम्हचर्य पाळलं पाहिजे. आपल्या पुढील पिढीलाही ते संस्कार दिले पाहिजेत. मुलांना लहानपणापासून आजन्म ब्रह्मचर्याचे शिक्षण दिले पाहिजे. तरच राष्ट्राला काही भविष्य आहे. वैभवशाली भारतासाठी हे आवश्यक आहे."

"महाराष्ट्रात दुष्काळ आहे त्याचं कारण तुम्हीच लोक आहात. हिंदू धर्म भ्रष्ट झाला आहे. पूर्वीचे वैभव राहिले नाही. ते कडक सोवळे, कठोर नियमधर्म, क्लिष्ट कर्मकांडे होती म्हणून धर्म टिकला होता. आता काय, बायकाही शनिमहाराजांची पूजा करू लागल्या! केवळ विरोधाला विरोध म्हणून! कसा पडणार पाऊस!" हे मात्र खरं हो. आमची हीही गेली होती त्या चौथऱ्यावर तेल घालायला. एरवी कधीही देवळात जाऊ म्हटलं की तिची "अडचण" असते. उलट मी रोज शनिवारी पत्र्या मारुतीला जाऊन नारळ फोडतो याला ती विरोध करते. "नारळ काय स्वस्त नाहीत म्हटलं. मारुतीला काय दडपे पोहे करून खायचेत की काय, लागतो कशाला नारळ त्याला?" असले तिचे विचार आहेत. "हिंदू धर्म म्हणजे काय चेष्टा आहे?" इकडे स्वामी पेटले होते. "अशानं शनिदेव भडकणार आहेत हे मी आताच सांगून ठेवतो! आणि ते भडकले तर मग स्त्रियांनी सांभाळूनच राहावं. बलात्कार वाढणार, अत्याचार वाढणार."  चला, थोडक्यात म्हणजे मधुचंद्र क्यान्सल. मग स्वामींना मी कसल्या धर्मसंकटात पडलो आहे ते सांगितले. तिकडे साक्षीमहाराजांना किमान चारचं वचन देऊन बसलो आहे, आणि आता तुम्हाला ब्रह्मचर्याचं. त्यांचं वचन पाळायचं तर पूर येणार, तुम्हाला दिलेलं पाळायचं तर दुष्काळ पडणार. स्वामी म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस. या भारतवर्षातील ऋषीवृंद समर्थ आहे. आमचे बापू केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर गर्भाधान घडवून आणतात. आता कारावासात त्यांची इच्छाशक्ती जरा क्षीण झाली आहे एवढंच. आणि आमचे दुसरे एक बापू केवळ नजरेने वाईट वृत्तीच्या मनुष्यास क्षणार्धात क्लीब करून सोडतात. आम्ही मग उठून स्वामींचा निश्चिंत मनाने निरोप घेतला. स्वरूपानंदांनी एक गोष्ट मात्र सोळा आणे सत्य सांगितली. शनीची शांती करावी लागते, पूजा नाही.  हे सांगताना ते स्वत:च एखाद्या पूजेच्या नर्मदा गोट्याप्रमाणे दिसत होते. म्हणून त्या ज्या शनिदर्शनासाठी आसुसलेल्या अग्निशिखा कंपनीच्या बायका आहेत त्यांना आमचे एक सांगणे आहे. त्यांनी आमच्या या शनिच्या गोट्याचे दर्शन घेऊन त्यावर तेल ओतावे आणि शांती करावी. पण त्या बायकांचा तो उद्देश नाही. त्यामुळे, त्या तृप्तीची देसाई सांडो, तयां कच्छपि शनि लागो, एवढंच म्हणतो.

Tuesday, March 29, 2016

आमचीही निष्काम साहित्यसेवा

(म्हाळसाकांत पोंबुर्पेकराची क्षमा मागून)

तीन वाजायला आले होते. परेशभाईंनी (विश्वस्त, डॅलस फोर्टवर्थ हिंदू टेपल) आपल्या हातातील दानशूर टिकमसेठ दारूवाला यांनी दान केलेल्या कीचेनमधील पाच नंबरची किल्ली लावली आणि संस्कारभवन, हिंदू टेंपलचे पश्चिमेकडील सहा बाय दहा फुटाचे प्रशस्त दार उघडले. ओंकार पोटे आणि आदित्य जोशी या अर्लिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी देवळाने देऊ केलेली तीन बाय आठ फुटांची दणकट टेबले (नेट वजन पंधरा किलो चारशे ग्रॅम प्रत्येकी) आत आणली. तेवढ्यात मंदार वाडेकरांनी दरडोई $१० अशा माफक दराने मिळवून आणलेले फेटे घेऊन विशाल खापरे कमिटीच्या मस्तकावर बांधायला सज्ज झाले. त्यांच्या हातात रात्री उशिरा बसून लिहिलेली सूत्रसंचालन संहिता झळकत होती. खास कार्यक्रमासाठी मागवलेला $२०० चा रेबॅन त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त करीत होता. तेवढ्यात मंडळाचे अध्यक्ष अतुल चौधरी आपल्या पिवळ्याजर्द व्हेलोस्टर स्पोर्टस कारमधून आले. गाडीतून बाहेर पडताना त्यांनी सवयीने आपल्या मनगटावरील ६४ गिगाबाईट क्षमतेच्या सॅमसंग कंपनीच्या शहाण्या (पक्षी स्मार्ट) घड्याळाकडे ओझरती नजर टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर ओल्ड स्पाईस चोपडलेले आहे हे खजिनदार सुजित साठे यांनी आपला पाय मुरगळलेल्या स्थितीत असतानाही ताडले. त्याही परिस्थितीत त्यांनी चौधरींकडे मागील हिशोबाची मागणी केली. चौधरी रात्री उशिरापर्यंत अध्यक्षीय लिहीत बसल्यामुळे थकलेले वाटत होते. "अध्यक्षीय" मधील क्षी ऱ्हस्व की दीर्घ यावर त्यांनी पूर्ण एक तास खर्च केला होता. शेवटी त्यांनी प्रेसिडेंशिअल असा पूर्ण मराठी शब्द वापरायचे ठरवले होते. त्यांना पाहून अजित जगताप आपल्या धी न्यू टेक्सास ड्रायक्लीनर्स कडून कडक ड्रायक्लीन करून आणलेल्या सुरवारीत टुणकन उडी मारून उभे राहिले. आणि वाटेत सुशिल द्रवेकर यांनी भातुकलीतील बुडकुल्यांप्रमाणे ओळीने मांडून ठेवलेले चार शुरे एसएम ५८ आणि दोन सेनहाइजर ई८३५ असे सहा माईक्रोफोन स्टॅंड आणि त्याच्या एक्सएलआर केबल्स शिताफीने ओलांडत फेटा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या प्रसाद चंद्रात्रे यांच्यापाशी पोचले. वेळ खूप कमी असल्याने चौधरींना आवरण्यासाठी काय योजना आहे अशी त्यांनी विचारणा केली. उत्तरादाखल चंद्रात्रेंनी घरून आणलेले चहाचे स्टीलचे पिंप जगतापांकडे सोपवले. चौधरींचे बोलणे थांबवायचा एकच उपाय आहे असे ते म्हणाले. एका हातात नाबरांनी यशस्वीरीत्या स्वस्तात मिळवलेली मिसळीची प्लेट, दुसऱ्या हातात त्याच दरात बसवलेला चहाचा ग्लास आणि आश्चर्यकारकरीत्या पुन्हा त्याच किंमतीत बसवलेला बटाटेवडा तोंडात दिल्यास चौधरींना साधारणपणे पंधरा मिनिटे थोपवून धरता येईल असे ते म्हणाले.  हे असे होत असताना पूर्णिमा नाबर यांनी प्रचंड वैयक्तिक वेळ खर्च करून घासाघीस करून माणशी फक्त $क्ष (किंमत जाहीर करू नका अशी धमकीवजा सूचना आम्हांस मिळाली असल्याने हा अत्यंत धक्कादायक दर आम्हांस उघड करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व) अशा अत्यंत वाजवी दरात मिळवलेला तो अल्पोपाहार तिथे घेऊन आले खुद्द सह-खजिनदार अमित अर्काटकर. केटररने अर्काटकरांचे भारदस्त मर्दानी व्यक्तिमत्व पाहून सगळ्या पदार्थांसोबत आपणहून शिराही दिला होता हे पाहून खजिनदार साठे आपण जायबंदी आहोत हे विसरून बाहू पसरून पुढे धावले. ते पाहून अर्काटकरांनाही भरते येऊन त्यांनीही आलिंगनासाठी हात पसरले. परंतु साठे थेट शिऱ्याच्या ट्रेपाशी पोचले आणि त्या पूर्ण ट्रेलाच त्यांनी आलिंगन दिले. ती भरतभेट पाहून मंडळाच्या उपस्थित असलेल्या सर्व म्हणजे वट्ट १२ कमिटी मेंबरांच्या डोळ्यांत पाणी आले. वेळप्रसंगी आपला हा खजिनदार कामासाठी एका पायावर उभा राहू शकतो हे पाहून मावळ्यांची स्वराज्यासाठी दिलेले सर्वस्व पाहून महाराजांना कसे कृतकृत्य वाटत असेल त्याची छोटीशी का होईना अनुभूती प्रत्येकाला आली.

कार्यक्रमाची सुरुवात अतुलानंद चौधरी यांच्या दोन शब्दांनी झाली. चंद्रात्रेंनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळत राजश्री वाराणशीवार आणि शामली असनारे यांनी स्ट्रॅटेजिक लोकेशनवर अल्पोपाहाराचे पदार्थ मांडले. त्याकडे अधूनमधून नजर टाकत चौधरींनी बरोबर दोन मिनिटे आणि बारा सेकंदात भाषण संपवले. हे त्यांचे आजवरचे सर्वात कमी वेळेचे भाषण होते असे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मिलिंदकाका पंडित यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी सांगितले. मिलिंदकाका हे गेली तीस वर्षे मंडळाशी संबंधित असून अनेकांची भाषणे पचवून आजही ताठ उभे आहेत. अतुलानंद चौधरींच्या सहधर्मचारिणी वैदेही चौधरी आणि वैदेही यांची सखी राजश्री वाराणशीवार या दोघांनी त्याला दुजोरा दिला. त्या दोघींनी चौधरींचे भाषणच नव्हे तर त्यांचे गाणेही सहन केले आहे. आजही तशी कठीण वेळ आली की वाराणशीवार,  वैदेही चौधरी यांच्या सांत्वनास जातात आणि त्यांना धीर देतात. वाराणशीवारांना त्यांचे पती कोठे आहेत असे आम्ही विचारले. तर ते देवळात आले आहेत, आणि सवयीमुळे थेट देवळाच्या स्वयंपाकघरात गेले आहेत असे त्यांनी सांगितले. प्रसादाचा स्वयंपाक वगैरे करावयाचा नसला तरी ते तेथे जाऊन उगाच पळी पातेल्यांना हात लावून येतात असे कळले.  आपल्या यजमानांनाही गाण्याबजावण्याचा नाद असल्याचे वाराणशीवारांनी हळूच कबूल केले. ते गातात, मी नको म्हणून बजावते. म्हणून तर ते गाणंबजावणं. "पण काय करणार? आपलं माणूस जसं जसं असतं तसं तसं बदलावं लागतं." असेही त्या म्हणाल्या. शामली असनारे शून्यात नजर लावून अतिशय वाजवी दरात मिळवलेल्या त्या मिसळीचा रस्सा ढवळत होत्या. नाबरांनी ते पातेले उचलून दुसऱ्या टेबलावर ठेवले तरी त्याचे त्यांना भान नव्हते. त्या टेबलावरच डाव फिरवत राहिल्या. न राहवून आम्ही विचारले, "आज शिवबांची आठवण येते आहे ना?" त्यावर त्या म्हणाल्या,"होय हो. आमचे शिवबा लास व्हेगासला मोहिमेवर गेले आहेत. तो प्रांत दुर्गम, बेलाग अशा गडांनी भरलेला आहे. उगाच कुठे एखादा सर करायला जाऊ नका असे बजावले आहे. पण तिकडून आलबेलच्या तोफा झाल्याशिवाय चैन नाही हो पडायची." असे म्हणून त्यांनी किफायतशीर दरात मिळवलेल्या बटाटेवड्याच्या ट्रेमधील एका जास्त तळल्या गेलेल्या बटाटेवड्यावर मायेने हात फिरवला.

अचानक "परतापगडच्या पायथ्याशी खानsssss!" अशी आरोळी कानी पडली. दचकून पाहिले तर अमित अर्काटकरांनी टिपेचा सूर लावला होता. आपल्या गाडीतून अल्पोपाहार कार्यक्रमस्थळी आणताना गाडीत चहा सांडला होता, त्यामुळे त्यांची जी चरफड झाली होती, तिचा त्वेष त्या आवाजात भरला होता. पुढील रांगेत बसलेले काही जण बेसावध होते. ते प्रतिक्षिप्त क्रियेने बसल्याबसल्या फूटभर मागे सरले. नेहमी मेरूपर्वताप्रमाणे खंबीर आणि धीरगंभीर दिसणारे विनायक आगाशेसुद्धा थोडेसे दचकले. पण थोडेसेच. त्यांनी भुवया थोड्या उंचावल्या इतकेच. पोवाड्याच्या सुरुवातीला बिचकलेले लोक हळूहळू सावरले. अफझलखान शामियान्यात येईपर्यंत काहीजण स्फूर्तीने उभेही राहिले होते. जेव्हा वाघनखे खानाच्या पोटात शिरली तेव्हा तर एकदोघेजण खुर्चीवर उभे राहिले आणि घोषणा देऊ लागले होते. जेव्हा ते भानावर आले तेव्हा पोवाडा संपला होता आणि त्यांच्या धर्मपत्न्या त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या. त्यांच्या नजरेत "हाच आवेश घरची कामे करतानाही दाखवा!" असा भाव होता असे आम्हांस तरी वाटले.

पोवाडा संपतो न संपतो तोच बाहेर ढोलताशाचा कडकडाट झाला. पाहतो तर अमित जोशी आणि हरीश नेहाते हे भारतातून स्वखर्चाने घेऊन आलेले ढोल आणि ताशे घेऊन उभे होते. ढोल अगदी नवे कोरे होते. त्याच्या वादीवर रु. २५०००/- चे लेबल दिमाखात झळकत होते. दोघांनी मिळून स्टिक (रु.१०००/- मात्र प्रत्येकी) ढोलावर हाणून वातावरण दणाणून सोडले. मिरवणुकीसाठी (पुन्हा) पूर्णिमा नाबर यांनी आपल्या घरातून अत्यंत अशी तेजस्वी मुद्रा असलेला २ फूट बाय अडीच फूट अशा साईजचा शिवरायांचा भव्य फोटो आणला होता. त्या फोटोला मुजरा करून देवळाच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यातून मिरवणूक सुरू झाली ती दक्षिणेला साधारण ३०० फुटावर जाऊन पश्चिमेला वळली. तिथून साधारण ५०० फुटापर्यंत जाण्याचे ध्येय गाठायचेच असे मनात बाळगून जोषात मिरवणूक पुढे जाऊ लागली. देवळाच्या साधारण वायव्येला, ध्येयापासून केवळ २० फूट अंतरावर असताना काही तरी फाटल्याचा भीषण आवाज झाला. बहुतेक मावळे सुरवार परिधान करून असल्यामुळे साहजिकच घबराट पसरली. लांब अंगरखा असल्याने अनेकांनी नि:श्वास सोडून इथे तिथे चाचपून खात्री करून घेतली. सुरवारीत काही दगाफटका झाला नसल्याचे बहुतेकांच्या निदर्शनास आले. अधिक तपासाअंती अमित जोशी यांच्या ढोलातून हा आवाज आल्याचे कळले. पाहतो तर ढोलाचे कातडे फाटले होते. काही म्हणा, ढोल फाटला की वाजवणाऱ्याची हवा जाते. ढोल फाटला! ढोल फाटला! असा आरडाओरडा झाला! मावळ्यांची पांगापांग होऊ लागली. जरी तानाजी धारातीर्थी पडला तरी शेलारमामा धावून आला. तसेच झाले, इथे हरीश नेहाते धावून आले आणि म्हणाले,"थांबा! जाता कुठे! माझा हा ढोल अजून शाबूत आहे! फिरा मागे!" आणि जल्लोष झाला. गाड्यांपर्यंत पोचलेले मावळे माघारी आले. मिरवणूक ध्येयाप्रति पोचली. मग निखिल पोटभरे यांनी आपल्या आयफोन सिक्सच्या आलिशान भव्य पडद्यावर पाहून महाराजांचा विजयघोष गूगलला. व्हरायझनचे नेटवर्क असल्यामुळे त्यांना तो लगेच मिळाला. "गणपती… भूपती…. प्रजापती…. सुवर्णरत्न श्रीपती…. अष्टावधान जागृत…." अशी त्यांनी सुरुवात केली. दोन मिनिटे झाली तरी लोकांना "विजय असो!" ची आरोळी मारायची संधी दिसेना. अस्वस्थ होऊन कुणीतरी म्हणाले,"देऊळ बंद होईल हां सात वाजता." पण मग तोवर पोटभरे "श्री छत्रपति शिवाजी महाराजांचाssssss" वर आलेच होते. मग नोंदणीकृत अशा साधारण १३० प्रौढ (अधिकृत आकडा, चू. भू. दे. घे.)  आणि ८० बालकांनी "विजय असोsssss!" ची गगनभेदी आरोळी दिली आणि शिवजयंती संपन्न झाली.

Sunday, March 27, 2016

कान्होबा आणि नाटक मंडळी

आटपाट नगर होतं म्हणणार होतो. पण राज्य बिहारचं आणि धाक सीपीआयचा असल्यामुळे अटना सटना नगर होतं म्हणणं ठीक होईल. गावकरी आनंदी वृत्तीचे. सीपीआयच्या कृपेनं कसलाही उद्योगधंदा नसल्यामुळे मंडळी सुखात होती. सक्काळी उठावं, दारातल्या लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडांच्या तळाशी काटक्या पडलेल्या असत. कुठलीही एक उचलावी, आणि ती दातांत धरून, डोळ्यातील चिपाडं काढत शून्यात नजर लावून अनिवर्चनीय अशा आनंदात बसून राहावं, गाई गुरांनी भंवताल हंबरून, डुरकून सोडलेला असावा, एखाददुसऱ्या गुरानं आपल्या अंतरंगातील रंग भुईवर टाकले असावेत. ती रंगपंचमी चुकवत, त्यातून वाट काढत शेताकडे जावं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत शेताच्या बांधावर बसावं, उघड्या पार्श्वभागाला पहाटवारा लागून अंगावर शिरशिरी यावी, त्याबद्दल मनोमन शिवी हाणत कार्य नेटाने सिद्धीस न्यावं असं निरागस आयुष्य होतं ते. कान्ह्याचं आयुष्यही असंच होतं. असाच तो आज घरातून बाहेर आला. डोळे अर्धवट उघडे ठेवून चालताना तो कशाला तरी अडखळून धडपडला. "च्यायला! म्हातारं काल परत पिऊन आलं वाटतं…" असं पुटपुटत त्यानं लाथेनं पायात आलेली बाटली दूर ढकलली. मग काहीसा विचार मनात येऊन तो त्या बाटलीपाशी गेला. ती उचलून ती उलटी करून तोंडावर धरली. एखादा उरला सुरला थेंब मिळाला तर बरंच असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण कान्ह्याचा बाप एक थेंबसुद्धा सोडण्याची शक्यता नव्हती हे कान्ह्याला माहीत होते.  बाटलीच्याजवळ उभे असताना एक जबरदस्त दर्प त्याच्या नाकात घुसला आणि तळमळून तो तेथून दूर झाला. "शुद्ध थर्र्यापोटी धार फेसाळ मोठी" असे एक संतवचन त्याने तिथल्यातिथे प्रसवले. कान्होबाच्या या असल्या सृजनशीलतेचा त्याला पुढे मोठेपणी जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीत गेल्यावर खूप उपयोग होणार होता. अर्थात आत्ता वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी त्याला त्याची जाणीव नव्हती. पण बापाने आपल्यासाठी एकही थेंब ठेवू नये याचे त्याला वैषम्य वाटले. मागे एकदा त्याने बापाची नजर चुकवून बाटली तोंडाला लावल्यावर बापाने ती हिसकावून घेऊन दोन कानफटीत दिल्या होत्या. त्यावर कान्ह्याने एक दिवसाचे तात्कालिक उपोषण करून निषेध व्यक्त करायचा प्रयत्नही केला होता. परंतु उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी कुणीच फिरकले नव्हते. मग कान्ह्याने पिणे हा माझा व्यक्त होण्याचा मार्ग आहे आणि त्यावर चालण्याचे किंवा अडखळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला हवे असे बापाला सांगितले. त्यावर बापाने अजून दोन लगावून दुसरा कानही बधीर केला होता. मग शेतीत आपलेही श्रम आहेत त्याचा मोबदला म्हणून तरी द्या असा त्याने युक्तिवाद केला होता. वास्तविक कान्ह्याचे शेतीतील योगदान हे जे सकाळचे जे त्याचे बांधावरचे आन्हिक होते तेवढ्यापुरतेच होते. तसे त्याच्या बापाने त्याला ठणकावले होते. बाप वसुदेवच असा कंस निघेल असे वाटले नव्हते. सीपीएमवाले कंठरवाने सांगत गांवभर फिरतात ती पिळवणूक हीच असावी. कान्होबाच्या मनात अन्यायाविरुद्ध ठिणगी इथेच पडली. आपण एवढं कुंथून कुंथून शेताला सोनखत द्यायचं आणि त्याचं कुणाला काहीच कवतिक असू नये? विषण्ण मनाने कान्ह्याने बाटलीकडे पाहिले. तेवढ्यात बापाला धडा शिकवायचा एक नामी विचार त्याच्या डोक्यात आला. त्या चपट्या बाटलीत शिवांबू भरून हळूच बापाच्या सदऱ्याच्या खिशात ठेवून द्यावी. पण त्याचे संभाव्य परिणाम पाहता हा छोटासा बदला बराच महागात पडला असता असा विचार करून तो गप्प बसून राहिला. "ससुरा बहुतही ड्रामेबाझ है" हे त्याच्या बापाचे त्याच्याबद्दलचे मत चिंत्य होते.

त्याच्या कानावर जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीचे नाव कधीच पडले नव्हते. पण दहावीला इतिहासाच्या पेपरात त्याने इतिहास घडवला आणि जहरलालचे मास्तरच त्याला शोधत आले. भारत हा कधीच माझा देश नव्हता, त्याच्या इतिहासाच्या पेपरला मी का बसावे असे क्रांतिकारी उत्तर त्याने उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर लिहून बाकीच्या पानांवर सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, मुल्ला मुलायमसिंग, केजरीखान इत्यादि लोकांची रेखाचित्रे काढली होती. शाळेत असताना नाटक या विषयावर मात्र त्याचे विशेष प्रेम होते. आपल्या तीव्र स्मरणशक्तीच्या जोरावर तो पानेच्या पाने उतारे मुखोद्गत करीत असे. कृष्णाची भूमिका तो जबरदस्त ताकदीने करीत असे.   मग पुढे तो पीपल्स थीएटर असोसिएशन चा सदस्य झाला. या असोसिएशनमध्ये सर्व रंजलेली गांजलेली मंडळी येत. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे आणि नाट्यप्रकारातून आपण ते साध्य करणार आहोत असे ते मानत. कान्ह्याच्या मनात आपल्या बापाने केलेल्या शोषणामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला होता. काही तरी केले पाहिजे असे त्याला सारखे वाटत राही. पण बापाने आपल्यावर नेमका कसला अन्याय केला आहे याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होता. कधीतरी एकटे असताना त्याला अपराधी वाटे. बाप भल्या सकाळी उठून शेतावर जातो, राबतो हे दिसत असे. पण आपल्यावर अन्याय होऊन राहिला आहे असे वाटणे गोड वाटे, सेल्फ-पिटी सारखे मादक द्रव्य नाही. सगळ्यात सोयीचे म्हणजे हे करताना स्वत: काहीच करावे लागत नव्हते. पण अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हे बिरुद आपोआप मिळून जात होते. असोसिएशनवाले सगळेच असे होते. यांच्या नाटकात एक तरी पात्र कार्ल मार्क्ससारखे दाढी वाढवून दिसे. अगदी द्रौपदीवस्त्रहरणा सारख्या नाटकातूनसुद्धा साम्यवादाचा डोस मिळे. द्रौपदी आणि तिचे पाच नवरे हे साम्यवादाचे उत्तम उदाहरण आहे असे या मंडळींचे मत होते. या नाटकात कृष्ण कार्ल मार्क्ससारखी दाढी लावून येई आणि द्रौपदी नावाच्या कर्मचारी वर्गाचे  दु:शासनादि प्रस्थापित वृत्तीच्या प्रभृतींनी चालवलेले शोषण थांबवे. द्रौपदीला पाच नवरेरूपी जनतेच्या मालकीचे करताना कृष्ण अभिमानाने दाढी कुरवाळत "साम्यवादाची एकच व्याख्या, लक्षात घ्या. मालमत्ता ही सर्वांची, आनंदे वाटून घ्या!" हे वाक्य जेव्हा टाके तेव्हा कडाडून टाळी पडे.  या नाटकांना प्रामुख्याने पुरुषवर्गच हजर असे. नाटकानंतर द्रौपदीशी हस्तांदोलन करण्यासाठी मेकअप रूममध्ये झुंबड उडे.

कान्ह्याच्या नाटकाला प्रॉम्प्टरची गरज कधीच भासत नसे. स्टेजवरच तो इतर नटांना त्यांचा संवाद आला की "टचिंग" देत असे. पण पुढे पुढे त्याची ही खोड इतर नटांना त्रासाची होऊ लागली. कारण प्रेक्षकांना त्याचे "टचिंग"च जास्त ऐकू येऊ लागले होते. इतर नट हा आमची वाक्ये खातो अशी तक्रार करू लागले. मग एकदा "कृष्णलीला" नाटकाच्या प्रयोगाला ऐन वेळी राधा आणि तिच्या सख्यांनी असहकार पुकारला आणि आम्ही काम करणार नाही असे सांगितले. त्यावर कान्ह्याने शांतपणे सर्वांची कामे स्वत:च केली, स्वत:च सर्वांचे डायलॉग म्हटले. "गवळणींचे कपडे लांबवणे" प्रवेशात तर केवळ चड्डी बनियनवर त्या अदृश्य डोहाच्या पाण्यात आपली लज्जा रक्षणाचा प्रयत्न करतानाचा त्याचा अभिनय केवळ लाजवाब होता. एक हात छातीवर आडवा धरून दुसरा हात उंचावत "कन्हैयाssss! दे दो हमरी चुनरी हमे वापस! तुम्हे तुम्हारे राधा की कसम!" असं म्हणत जेव्हा या माफक मिशीवाल्या गवळणीने टाहो फोडला तेव्हा प्रेक्षकांत हुंदका फुटला. जहरलाल पेरूचे काही प्राध्यापक आणि प्राध्यापिका या प्रवेशाला हजर होते. हुंदके देणाऱ्यात या प्राध्यापिकाही होत्या. त्या एवढ्या प्रभावित झाल्या की काहींनी तिथल्या तिथे आपल्या ओढण्या कान्ह्याला देऊ केल्या असे ऐकिवात आहे. काहींच्या मते हे खरे नाही. ओढण्याच काय इतरही काही वस्त्रविशेष दान करण्याची त्यांची तयारी होती असेही बाजूच्याच खुर्च्यांवर बसलेल्या काहींनी ऐकले. खरे खोटे देव जाणे. श्रीकृष्णाने स्वत:च्या प्रतिमेने आणि प्रतिभेने स्त्रीवर्गास आपल्या प्रेमात पाडले होते, इथे तर या आमच्या कान्ह्याने स्वत:च्याच रूपात काय मिशीवाल्या गवळणीच्या रूपातही ते काम करून दाखवले. इथेच पेरू युनिव्हर्सिटीने कान्ह्याला केवळ प्रवेशच दिला नाही तर दत्तकसुद्धा घेतले. या होतकरू गुणी बाळाला जवळ घेऊन कुरवाळत अनेक प्राध्यापिकांनी "हा बालक पुढे उत्तम नट होईल. अगदी केजरीवालही याच्यापुढे पार ओम प्रकाश भासेल." असे भाकित वर्तवले. त्यांच्या मते राधेचं काम करणाऱ्या त्या प्रत्यक्ष नटीपेक्षा कान्ह्याची ही मिसरुड फुटलेली राधा भाव खाऊन गेली. कान्हा मग पुढे पुढे तो एकपात्री प्रयोगच करू लागला. त्याच्या प्रत्येक प्रयोगाला तुफान गर्दी होत असे. मध्यंतरात हजारो बटाटेवडे, चारचारशे लिटर चहा विकला जाऊ लागला. मध्यंतरात किती बटाटेवडे खपतात त्यावर नाटकाच्या यशाची मोजणी करण्याचे तंत्र तसे जुने आहे. इंद्रायणी, प्रगती, डेक्कन आणि पुण्याचे जोशी वडेवाले यांच्याकडे एकत्र मिळून जेवढे बटाटेवडे एका आठवड्यात खपत तेवढे कान्ह्याच्या एका शोला खपू लागले. यशाचे याहून अधिक उंच शिखर आम्हांस तरी माहीत नाही.

या धामधुमीत कान्हा जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीत येऊन दाखल झाला. दिल्ली हे नाटकाचे केवढे मोठे व्यासपीठ आहे याचा त्याला पहिल्या काही दिवसांतच प्रत्यय आला. केजरूकुमार हा आघाडीचा नट सध्या ते व्यासपीठ गाजवत होता. त्याची ती काळजीपूर्वक जोपासलेली दीनदुबळी, सर्वसामान्य माणसाची इमेज, ते खोकत शिंकत आपल्याला शारीरिक त्रास होत असतानाही केवळ जनतेसाठी आपण झिजत आहोत असे दाखवत चिरकलेल्या आवाजात दिलेली ती भाषणं, कॅमेरा ऑन व्हायच्या आधीची मग्रूर छबी तो ऑन होताच क्षणार्धात हीनदीन करण्याचे ते कसब हे सगळं पाहून कान्हा पार भारावून गेला. पेरू युनिव्हर्सिटीत आल्यावर त्याच्यापुढे साम्यवादाचेच नव्हे तर सौम्यराष्ट्रवादाचेही दालन खुले झाले. भारतातील जनता फारच संकुचित जिणे जगत आहे याची त्याला जाणीव झाली. संसदेवर साधा हल्ला करण्याचेही व्यक्तिस्वातंत्र्य भारतात नाही हे पाहून त्याच्या आधीच असंतोषी असलेल्या मनाचा भडका उडाला. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही तर त्याच लोकशाहीत लोकांनाच लोकांनी लोकांसाठी लोकांच्या पैशाने बांधलेली इमारत प्रतीकात्मक पद्धतीने उध्वस्त करता येऊ नये? अशा पद्धतीने व्यक्त होऊ पाहणाऱ्या लोकांना गुन्हेगार, दहशतवादी म्हणून जाहीर करायचं? आपला बापही याच व्यवस्थेचे प्रतीक आहे तर. या अवस्थेविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. हे विचार त्याने आपल्या प्राध्यापकापाशी मांडले आणि एक पथनाट्यनिर्मिती करून व्यक्त होण्याचा निर्धार व्यक्त केला. प्राध्यापकमहाशयांनीही "क्रांतिकारी! बहुत ही क्रांतिकारी!" असे म्हणून त्याची पाठ थोपटली. नंतर कान्ह्याने आपल्या भूमिकेचा बारकाईने अभ्यास केला. पूर्ण विचारांती या पथनाट्याचा हिरो कसा असावा हे ठरवले. शारीरिक बोली केजरीकुमार यांची असावी हे ओघानेच आले. ते त्याचे हिरो होतेच. त्याने अनेकवेळा आरशासमोर उभे राहून, डोक्याला मफलर गुंडाळून आपण कसे दिसतो ते पाहिलेही होते. बांधणी किरकोळ, चिरका आवाज, हट्टी रुसलेला चेहरा, येस्स! स्कोप नक्कीच होता. ड्राम्याची सोय झाली. आता बोलण्याची लकब. लहजा सुदैवाने मठ्ठ पण मुजोर बिहारी लालूसारखा होताच. तो प्रश्न मिटला. करमणूक म्हणून थोडा दिग्विजय सिंगांचा आचरटपणा पण घालावा काय यावर प्राध्यापकांचा सल्ला घेतला. गर्दी जमायला मदत होईल असा त्याचा होरा होता. त्यावर साम्यवादी विचारसरणीत हास्यप्रकार बसत नाही असे सांगून त्यात प्राध्यापकांनी मोडता घातला. केजरीकुमाराचे बेअरिंग आण, गर्दीचा प्रश्न मिटेल असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, पण एक गोष्ट अगदी कसोशीने पाळ. कृपा करून बालगोपाळांच्या रंजनासाठी त्या छोटा भीमाला आणू नकोस बुवा! त्यासाठी कॉंग्रेस पुरेशी आहे. त्यांच्या कुरणात आपल्याला चरायचं नाही. 

कान्ह्याने जान ओतून पथनाट्य सादर केले. त्याने पेरू युनिव्हर्सिटीच्या क्याम्पसपुरता का होईना इतिहास घडवला. त्याच्या अभिनयाने स्वत: केजरीकुमार प्रभावित होऊन त्यांनी आपल्या डोक्यावरचा मफलर काढून कान्ह्याच्या गळ्यात घातला. त्याची अलाबला घेत त्यांनी जवळजवळ त्याचा मुकाच घेतला. येचुरी तर बेभान होऊन नाचत होते. आपल्या धोतराचा कासोटा सुटल्याचेही भान त्यांना राहिले नव्हते. लालू आपल्या गोधनासमवेत अकरा मुले आणि एक बायको यांची तिकिटे काढून आले होते. राबडीदेवींनी वारंवार "इ का हो रहा है" असे विचारून त्यांना भंडावून सोडले होते. "ऐसन नौटंकी देखनेवास्ते हमका इहां इतनी दूर लाने की कौनव जरुरत नाही थी. इससेभी बढिया नौटंकी आप हर रोज करत हो." असे त्यांनी लालूंना स्पष्ट सांगितले. त्यावर लालूंनी त्यांना "इ लडका होनहार है. अपने गांव का है. इका प्रोत्साहन हम देंगे. हमका अकरा बच्चा तो है. उसमें तनिक ये बारहवां मिलाय लो." असे सांगितले. या सगळ्या गडबडीत एक भारदस्त देहबांधणीचा इसम खूप आनंदात नृत्य करताना दिसत होता. केजरीकुमारांना त्याचे कौतुक वाटून ते त्याच्यापाशी जाऊन "भाईसाहब, क्या बात है! हम भी नाचेंगे आपके साथ." असे म्हणून ते नाचू लागले. तेवढ्यात लालू त्यांना म्हणाले,"आप पहचाने नाही इन्हे? ये मायावतीजी है!" मग केजरीकुमार विंचू चावल्यासारखे तिथून दूर निघून गेले ते लालू मुका घेतील या भीतीने की मायावती कानफटीत देतील या भीतीने हे कळायला मार्ग नव्हता. पथनाट्यात काय नव्हते? सगळे होते. ज्या देशात राहतो त्या देशाचा विजय व्हावा असे वाटण्याचे बंधन नसावे, व्यक्तिस्वातंत्र्य एकतर्फी असावे. त्याला परिणामांची भीती नसावी. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अभिव्यक्तिला कोणतीही चौकट नसावी. देशद्रोही हा शब्दच हास्यास्पद आहे, असे काही नसते. राष्ट्रवाद ही अंधश्रद्धा आहे, असे काही असणे हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्वावर घाला घालण्यासारखे आहे. असे विचार कान्ह्याने पथनाट्यात मांडले. त्याचे असे हे कौतुक झालेले पाहून त्याला विजयनृत्य करावेसे वाटू लागले. त्याचे पेरूतले मित्र त्याच्याभोवती गोळा झाले. "पार्टी पायजे राव! फेमस झालास आता! आता काय, या च्यानेलवर, त्या च्यानेलवर. मुलाखती देत हिंडायचं. केजरी किंवा येचुरीकडे जॉब नक्की!" कान्ह्याने उत्साहाने सांगितले,"दोस्तहो, लगेच पार्टी! नुसती पार्टी नाही तर ओली पार्टी! चला लगेच!" सगळे उत्साहाने निघाले. तेवढ्यात कान्हा थबकला. म्हणाला,"आज तारीख किती?" एक जण म्हणाला,"काय फरक पडतो? पार्टीला काय तारीख लागते?" खिन्नपणे कान्हा म्हणाला,"अजून तरी लागते… सरकारी स्कॉलरशिपचे पैसे तीन तारखेशिवाय जमा होत नाहीत." कुणीतरी मग म्हणाले,"व्यक्तिस्वातंत्र्यात अजून तरी फुकट बिअर येत नाही. धिक्कार असो! निषेध असो!"

Saturday, March 5, 2016

भजनाची भैरवी

कोकणात भजनं ही गोष्ट अत्यावश्यक. सणासुदीला, कार्यक्रमांना, देवळातील उत्सवानिमित्त भजनं होत असतात. ती मनोभावे ऐकणारे लोकही असतात. पूर्वी सिनेमाच्या गाण्याची चाल देऊन भजनं म्हणणे वगैरे होत असे. त्यावर लोक हसतही असत. पण तरीही त्यात बीभत्स प्रकार नव्हते. वेडेवाकडे अंगविक्षेप, हिडीस गाण्यांची चाल हे प्रकार नव्हते. त्याच कोकणात आता हा नवा प्रकार बोकाळला आहे. आणि तो गंभीर आहे. शांताबाय, जपून दांडा धर या असल्या देहांतशासनाच्या लायकीच्या गाण्याच्या चालींवर भजनं? त्याबरोबर भजनीबुवा थेट रोंबाटात नाचल्यासारखे नाचतात काय, गॉगल लावून लुंगी नेसून सिनेमातील हिडीस नृत्ये काय करतात! सगळंच ओकारी आणणारं आहे.

संस्कृती अचानक मरत नाही. ती अशी कणाकणानं, हालहाल होऊन निजधामाला जाते. संस्कृती म्हणजे जीवनपद्धती, रिवाज, सणवार असं वरकरणी असलं तरी तिचं खरं स्वरूप "जे जे उत्तम उदात्त, जे करी आत्मा उन्नत" असं असायला हवं. पण कुठून तरी आपल्याला सस्त्यात मजा पाहिजे ही जी एक संस्कृती वाढीला लागली आहे त्याचा हा परिपाक आहे. आयोजकही मग "पब्लिककी डिमांड है बाॅस!" असं म्हणत किराणा मालाचं दुकान उघडून बसतात. (हो, अस्सल मराठी माणसाची हिंदी ही बोलीभाषा आहे.) डिमांडप्रमाणे विक्री हवीच. गंदा है पर धंदा है बाॅस! यातूनच शांताबाय, गढुळाचं पाणी, पोरी जरा जपून, यासारखी केवळ हिडीस विद्रूप गाणी जन्माला येतात. पण जोवर ती गाणी 'क्वाटर' लावून बेधुंद नाचणारे राजकीय गुंडांना, साॅरी, कार्यकर्ते किंवा पावसाळ्यातल्या अळंबीप्रमाणे उगवणाऱ्या गणेश मंडळांच्या अतिभाविक कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित होती तोवर ठीक होतं. पुराचं पाणी गावात शिरलं नव्हतं. जी काही राड, गदळ होतं ते गावाबाहेर नदीत फिरायचं आणि पूर सरला की पाणी निवळायचं. पण गावानं दुर्लक्ष करून वाटेल तशी बांधकामं केल्यावर जे होतं तेच झालं. पुराचं पाणी गावात शिरून घरं उध्वस्त करत चाललं. आपली भजनसंस्कृती हा एक अमूल्य ठेवा आहे. अध्यात्म हा एक क्लिष्ट विषय. जीवनाचा अर्थ सोप्या भाषेत गृहस्थ धर्म निमूटपणाने जगणाऱ्या सामान्य माणसाला समजावून सांगत धीर देण्याचं काम करणारी कीर्तनं, रूक्ष शब्दांनी कंटाळून जाऊ नये म्हणून त्यांत पदं, भजनं यांची योजना असायची. तीही रागदारीवर आधारित असायची. माझी आजी शिकलेली नव्हती पण रागदारीची उत्तम जाणकार होती. एखादं भजन अथवा पद कुठल्या रागात बसवलं आहे हे ती क्षणात सांगायची. कीर्तनाला अथवा भजनाला जाणं म्हणजे केवळ गवारीच्या शेंगा मोडायला किंवा वाती वळायला काढलेला मोकळा वेळ एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप नव्हतं. एवढी अध्यात्मगंगा डोक्यावरून पाणी घेऊन गेली तर डोकं थोडं तरी ओलं होईलच ना? बरं बुवा भजनातून करामती करायचे. श्लेष, उपमा, दृष्टांत यातून रसनिष्पत्ती करायचे. पण जे हृदयाला भिडायचं ते मात्र भजन असायचं. भक्तिमार्ग सोपा आहे असं सांगणारे ते सूर असायचे. हरिनामात तल्लीन व्हा, ते नाम जपणाऱ्या सुरांत चिंब व्हा, त्या परमेश्वराचं एक प्रेमळ रूप तुम्हाला अनुभवता येईल असा त्या भजनांचा हेतू असायचा. खरंतर सुरांना शब्दांची गरज नसते. पण त्यातून नामस्मरण व्हावं म्हणून शब्द यायचे. परवा असंच भीमसेन जोशींचं "भाग्यदा लक्ष्मी बरम्मा" ऐकत होतो. मला कानडी भाषा कळत नाही. कर्नाटकातील प्रत्येक घरात किमान एक तरी नानू नावाचा इसम असतो अशी माझी परवा परवापर्यंत समजूत होती. पण हे भजन ऐकताना समजण्यात काहीच अडचण आली नव्हती. डोळे मिटून डोलणे एवढेच करायचे होते. त्या भजनाने जे सांगायचे ते लीलया सांगितले. भजन संपल्यानंतर अभ्यंगस्नान केल्यासारखे शुचिर्भूत वाटले होते. परमेश्वराच्या असंख्य रूपांपैकी एकाचं पुसटसं का होईना तृप्त दर्शन तरी झाल्यासारखं वाटलं होतं. असाच अनुभव कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांनी दिला होता.

इथून पुढे भजनाची काय वाटचाल आहे माहीत नाही पण हा असाच जर सूर राहिला तर वैकुंठापर्यंत साथ करणाऱ्या या भजनप्रकाराचीच वैकुंठगमनाची तयारी सुरू झाली असं समजायला हरकत नाही. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा! जय जय रामकृष्ण हारी! यावे यो यो हनी सिंग, कीर्तनपीठ मोकळे आहे. समोर चार बोतल व्होडका घेऊन भक्त कीर्तनरंगी रंगण्या सज्ज आहेत.

Thursday, January 28, 2016

विश्रब्ध शारदा


कोणे एके काळी पत्र येणे म्हणजे आनंदोत्सव असे. दारी पोस्टमन येणे म्हणजे दिवाळीदसराच. बहुतांशी पत्रे बाबांसाठी असत. त्यांचं जग हे विचारवंत, लेखक, नाटककार, संघ स्वयंसेवक, समाजसेवक अशा लोकांनी भरलेलं असायचं. बाबा कॉलेजमधून घरी आले की आईला पहिला प्रश्न असायचा, आज काही टपाल आलंय का? जर असेल आलेलं तर ते व्यवस्थित टेबलावर दिसेल अशा पद्धतीनं ठेवलेलं असायचं, पण ते विचारणं काही सुटलं नाही. मग बाबा तो गठ्ठा पुढ्यात घेऊन बसायचे. मग तोंडानं रनिंग कॉमेंटरी करत  एकेक पत्र चाळलं जायचं. चाळलं अशा अर्थानं की प्रथम पत्रं कुणाकुणाची आहेत आणि साधारण कशा संदर्भात आहेत हे पाहण्याचा तो कार्यक्रम असे. पोस्टकार्डे, निळी अंतर्देशीय, लाखेने सीलबंद केलेले लिफाफे, रंगीत लिफाफे असा सगळा तो गठ्ठा असे. निळी अंतर्देशीय पत्रे ही बहुतांशी जवळच्या नातेवाईकांची, पोस्टकार्डे साहित्यिक वर्तुळातील लोकांची, सीलबंद लिफाफे शैक्षणिक कामासंबंधीचे तर रंगीत लिफाफे हे दिवाळी, दसरा, संक्रांत शुभचिंतनाची कार्डे असलेली अशी सरळ वर्गवारी होती. ते संक्रांत अभीष्टचिंतनाचे लिफाफे तेवढे आम्ही मुलं ताब्यात घ्यायला अधीर असू. कारण त्यात कार्डाबरोबर चक्क रंगीबेरंगी तिळगूळ असे. काही काही वेळा आतील कार्डालाच एक छोटासा लिफाफा चिकटवलेला असे. त्यात तिळगूळ असत. खूप गंमत वाटे.

पोस्टऑफिस हे एक महाकळकट पण गूढरम्य प्रकरण होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावरच ते होते. तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेली काही निवडक ठिकाणे गावात होती त्यातले हे एक तीर्थस्थान. या एकाच ठिकाणी निळसरपांढरी खळ, तिने छानपैकी बरबटलेली त्यातील लाकडी कांडी, काही वर्षांपूर्वीच शाई संपलेले पेन (काही वेळा बोरूही असायचा) ताडपत्रीच्या गोण्यातील टपाल, तिथले कर्मचारी किंवा ग्राहक यांना अजिबात प्रसन्न वाटू नये याची संपूर्ण काळजी घेऊन लावलेला तो भयाण काळपट हिरवा रंग, तुरुंगाचा आभास देणाऱ्या त्या जाळ्या आणि त्यामागचे ते कर्मचारी तर दुसऱ्या एका खोलीत ते कट्ट कडकट्ट करणारे तारयंत्र, अदभुत जादूचा वाटणारा तो काळा फोन असे सगळे नांदत असे. आशा, निराशा, आनंद, दु:ख, संस्थांचे "टू हूमसोएव्हर इट मे कन्सर्न" छापाचे रुक्ष अहवाल, बिलं, पावत्या, प्रेमपत्र, प्रेमळपत्र, मळमळपत्र, तळमळपत्र अशा सगळ्या भावना, अ-भावना त्या ताडपत्रीच्या गोणीत एकत्र पडलेल्या असत. खाकी कपडे घातलेले पोस्टमन ते सॉर्ट करताना आम्ही पाहत उभे असू. मग तो सॉर्ट केलेली ती शारदा खाकी रंगाच्याच ताडपत्रीच्या पिशवीत जायची. एरवी फोटोत शारदेला छान तंबोरा घेऊन, श्वेतवर्णी साडी परिधान केलेली पाहत असू पण इथे पोष्टात दयामाया नव्हती, मळखाऊ खाकी हाच एकमेव रंग. पोस्टमन लोकांना सायकली वगैरे चैन नव्हती. सगळा कारभार पायीच असे. गाव छोटे असल्यामुळे पोस्टमन लोकांना गावकऱ्यांचे चेहरेच काय चेहऱ्यामागील इतिहासही ठाऊक असायचा. कधी शाळेतून परत जात असताना पोस्टमन दिसला की "आमचं आहे का हो पत्र?" अशी चौकशी करायची. तोही बापडा असेल पत्र तर तंगडतोड वाचवायला आमच्याकडे पत्रं द्यायचा. आम्ही मुलं आमचीच काय एरियातल्या सगळ्यांचीच पत्रे मग ताब्यात घ्यायचो. आणि मग पोस्टमनच्या रुबाबात घराघरात पोचवायचो. एकूणच उत्कंठा, उत्सुकता, काहीशी भीती असं सगळं एकाच वेळी वाटायला लावणारी अशी ही पत्रपरंपरा.

तार येणं मात्र अजिबात नको. तार आणि वाईट बातमी हे जवळजवळ ठरलेलं अद्वैत होतं. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी साधारण अकरा बारा वर्षांचा असताना 'तारायण' घडलं. तेही अत्यंत महत्वाची आंतरगल्ली क्रिकेट मॅच चालू असताना. संकटं येतात तेव्हा एकटी येत नाहीत म्हणतात. माझी बॅटिंग आलेली. स्टंप माझे असल्याने मला दोन जीवदानं अलाउड होती. अजून एकही बाॅल खेळला नसल्याने दोन्ही जीवदानं शाबूत होती. अशात कधी नाही ती आमच्या आळीत रिक्षा आली. गावात रिक्षा दोन, त्यातील एक आमच्या आळीत पाहिल्यावर मनात पहिली पाल चुकचुकली. रिक्षेत आमच्या बाबांना पाहिल्यावर तर काहीतरी नक्की घडले आहे याची खात्री पटली. कारण बाबा आणि शारीरिक आरामाची कोणतीही साधने हे समीकरण जुळणारे नव्हते. रिक्षेत बसले तरी श्रीरामाच्या आदेशासरशी उड्डाणाच्या तयारीत बसलेल्या हनुमानासारखे बसत. सीटच्या अगदी टोकाशी. हातांनी पुढचे बार धरून. बाबांनी रिक्षेतूनच सांगितले, ताबडतोब घरी ये! बॅटिंग सोडून मी घरी आलो. बाबा आईला सांगत होते. तार आलीय, मामांची (आईचे वडील) तब्येत खराब आहे, आपल्याला जायला हवं. पण आईला कळून चुकलं होतं की तार आलीय म्हणजे काही खरं नाही. तार या प्रकाराची मी जरा धास्तीच घेतली होती. पण ती येण्याची धास्ती. तार करायची असेल तर मी उड्या मारत जात असे. कारण त्या त्यातला मजकूर माहीत असे. पुढे बाबा मला तार करायला पोस्टात पाठवत. त्या फक्त नंबरवाल्या तारा असत. २ नंबर, १० नंबर किंवा तत्सम. अभिनंदन, किंवा रीचड सेफली टायपातल्या.

पत्र स्वत:च्या पत्त्यावर स्वीकारणे वगैरे व्हायला कॉलेजचे दिवस उजाडायला लागले. कॉलेजजीवनातील पत्रे काही अभिमानाने सांगण्यासारखी नाहीत. कारण ती रोमॅंटिक वगैरे मुळीच नव्हती. बहुतेक पत्रे "आपल्या चिरंजीवांची प्रेझेंटी समाधानकारक नाही. आपण पाल्यास योग्य ती समज द्यावी. सुधारणा न झालेस कारवाई करणेत येईल." किंवा अप्पर सत्र न्यायालय "दिनांक १५ मार्च रोजी वाहतुकीचा नियम मोडल्याच्या आरोपाची सुनवाई आहे. तरी कोर्टात समक्ष हजर राहावे. अन्यथा आरोप मान्य आहे असे समजून खटला एकतर्फी निकालात काढला जाईल. " अशा आशयाची जास्त असत. का कुणास ठाऊक, त्या काळात वर्गात तासाला बसणे, लायसन काढणे, तांबडा दिवा लागला असल्यास वाहन थांबवावे लागणे या असल्या गोष्टी मला अंधश्रद्धा वाटत. या अंधश्रद्धांच्या विरोधाचे बिल या पत्रांच्या रूपात घरी येत असे. सुदैवाने आईबाबा कोकणात आणि आम्ही बंधुद्वय शिक्षणासाठी सांगलीस राहत होतो. कॉलेजमध्ये आणि इतर "संवेदनशील" संस्थांना मी सांगलीच्या घरचा पत्ता देत होतो. त्यामुळे अशा पत्रांची विल्हेवाट लावणे सोपे जात होते. यात आईवडिलांना त्रास होऊ नये हा एकमेव उदात्त हेतू मी बाळगला होता. पण पुढे हे उघडकीस आल्यावर माझा युक्तिवाद कोणीही मान्य केला नाही याबद्दल अजूनही खंत आहे. कोर्टाने मला तब्बल पंचेचाळीस रुपयांचा दंड केला होता. माझ्या महिना तीनशे रुपयांच्या बजेटला पंधरा टक्के नुकसान प्रचंड होते. हा दंड भरून काढण्यासाठी मी पुढील तीन महिने सायकल वापरत होतो. त्या दंडाच्या रकमेत माझा उदात्त हेतू केव्हाच दिसेनासा झाला होता.

याच काळात विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, आणि पत्र लिहिणे सुरू झाले. साध्या भेटून बोलण्याला ज्या संघटनेत "बैठक घेऊ, बसून विषय करू" म्हटले जाते तिथे पत्र लिहिणे असं साधं कसं म्हटलं जाईल. तो पत्रव्यवहार होता! पण संपर्क कसा करावा, फापटपसारा न लावता, नेमक्या शब्दांत संवाद कसा साधावा याचं सहजसुंदर शिक्षण विद्यार्थी परिषदेत मिळालं. तेही अत्यंत सुबक सुवाच्य अक्षरात. आजवर परिषदेतील किंवा संघातील स्वयंसेवकाचं गिचमीड अक्षरातील पत्र मी पाहिलं नाहीय. या बाबतील मी प्रमोद कुलकर्णीला गुरू मानलं होतं. प्रमोद अत्यंत सुरेख हस्ताक्षरात, सरळ ओळीत एकटाक लिहीत असे. आजवर अनेक सुरेख अक्षरं पाहिली. काही तर अगदी छापल्यासारखीही पाहिली. पण प्रमोदचं अक्षर वेगळंच. त्यात छापीलपणा अजिबात नसे, उलट ते थेट हृदयातून आल्यासारखं वाटे.  पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर तो दोन्ही बाजू पूर्ण वापरून लिही. प्रत्येक ओळीत ठराविक शब्द असत. "आदरणीय" ने सुरुवात करून शेवटी "कळावे, लोभ आहेच वृद्धी व्हावी" या वाक्यानं तो पत्र संपवत असे. दूरदूरवरून आलेले कार्यकर्ते त्याच्याशी तेवढ्याच लोभाने बोलत. आज इतक्या वर्षांनीसुद्धा मी जर पत्र लिहिलं तर आपोआप हाच मायना आणि शेवट लिहिला जातो. श्रेय प्रमोदला. लोक कृपाभिलाषी वगैरे लिहितात ते कसंसंच वाटतं. मला अभिलाषा हा शब्दच तसा लुब्रा, लोचट वाटत आला आहे.

पुढे शिक्षण संपलं. संपवलंच. गाव सोडून कुठेही जाणार नाही! सरकारी नोकरी तर अजिबात करणार नाही अशा घनघोर प्रतिज्ञा करून झाल्या होत्या. यातली पहिली प्रतिज्ञा साधारणपणे दोन दिवस टिकली. मुंबईच्या आत्याचे यजमान, श्री. माधवराव वझे हे माझं आदराचं स्थान होतं. तेही माझ्याच कॉलेजचे विद्यार्थी होते. अत्यंत हुषार, न चिडता तर्कनिष्ठ विचारांनी आपली बाजू मांडणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. लहानपणी आम्हां सगळ्या मुलांना ते गणिती, भौमितीय, पदार्थविज्ञानाची कोडी घालत आणि आमच्याबरोबर संवाद करत ते स्वत:ही सोडवत असत. म्हणजे कोडं घालून गंमत बघत बसणे असं ते करत नसत. त्यामुळे आम्हीही चेवाचेवाने ती कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत असू. आजही काम करताना क्लिष्ट असा एखादा प्रॉब्लेम असेल तर मी अगदी उत्साहाने तो सोडवायला घेतो. त्याचं मूळ कदाचित या कोड्यांत असेल. असो. मी प्रतिज्ञा करून शक्तिमानसारखा कमरेवर हात ठेवून छाती पुढे करून दोन दिवस फिरत होतो. तिसऱ्या दिवशी माधवरावांचा फोन आला. तुला मुंबईला यायचं आहे, ब्याग भर एवढंच ते म्हणाले. शक्तिमानाने कमरेवर हात होते ते खाली सोडले आणि हळू आवाजात हो असं सांगितलं.

मुंबईला गेल्यावर आयुष्य पार पालटून गेलं. या नंबरची बस, त्या वेळेची गाडी यापलीकडे मुंबईत आयुष्य नाही असं वाटायचं. उगाचच घरौंदामधल्या त्या अमोल पालेकरसारखा चेहरा करून फिरायचो. मित्र, भरपूर आत्तेमामेभाऊ, बहिणी, आज्जी आजोबा, मामा, काका असल्या अस्सल देशस्थी गराड्यात राहिलेला मी, मुंबईत अस्वस्थ झालो. फक्त आत्तेभाऊ, बहीण होते तेवढाच आधार. या अवस्थेतून आईबाबांना उद्देशून पत्रं लिहायला सुरुवात झाली. मला आठवतं ती पत्रं मी फार भावूकपणे लिहिली होती. जे जे मनात असेल ते कागदावर उमटवायचं एवढंच ते होतं. पुढे मी सिंगापूरला गेलो. एकटाच गेलो होतो पुढे. पहिले सहा महिने मनाने भारतात शरीराने तिथे असे काढले. कधी कधी होमसिकनेस एवढा व्हायचा की मी चक्क पुण्याचा नकाशा हाताने रेखाटत बसत असे. प्रत्येक रस्ता, खूण, त्या नकाशावर येत असे. जणू मी प्रत्यक्ष त्या रस्त्यांवरून फिरत होतो. मग सुरू झाली पत्रं. तीन तीन चार चार फुलस्केप पानं पाठपोट भरतील एवढं एकेक पत्र असायचं. ही पत्रंही आईबाबांनाच. कधी घरी गेलो की बाबा ती जुनी पत्रं दाखवतात, हसू येतं पण डोळ्यात पाणीही येतं. बाबांनीही अशीच पत्रं मला धाडली होती. त्यात उभारी देणारे शब्द असत, आईने दिलेल्या सूचना असत. ती मी कित्येक वर्षं जपून ठेवली होती. पण आयुष्याच्या वणवणीत इतक्या ठिकाणी भरकटत गेलो की सगळं संचित थोडं थोडं सांडत गेलं. वाऱ्यावर वाळू भुरभुरत पसरून दृष्टीआड व्हावी तसे हे आठवणींचे कागदावर उमटलेले क्षण निसटून गेले. स्वहस्ताक्षरात मनीचे गूज लिहावे आणि सुहृदांस ते भावावे यासारखे सुख नाही.

पत्र लिहिणं कधी थांबलं कळलंच नाही. तंत्रज्ञान विकसित झालं ते प्रथम संपर्कक्षेत्रात. सॅम पित्रोदानं पहिली क्रांती आणली. एसटीडी पीसीओ सुरू झाले, मनात आणलं की बोलणं होऊ लागलं. माझ्या मते इथेच स्वहस्ताक्षरातील पत्रलेखनाला उतरती कळा लागली. पत्रातील आठवड्यापूर्वीची जुनी खुशाली कोण वाचणार? आजच तर सकाळी फोनवर बोललो. पुढे ईमेल्स सुरू झाल्या. मग तर पत्र लिहिणं पूर्ण थांबलंच. नात्यातल्या नात्यात ईमेल लिहिताना प्रियचं डियर झालं, आदरणीयचं रिस्पेक्टेड सर झालं, तीर्थरूप शि.सा.न.वि.वि. तर गायब झालेल्या जानव्यासारखे लुप्त झाले. "आपला" किंवा "तुमचा" ची जवळीक युअर्स फेथफुलीत नाही. तंत्रज्ञानानं फायदे खूप आणले. जग जवळ आणलं, वादच नाही. अनेक दिवसात संपर्क होऊ शकायचा नाही, त्यामुळे जी घालमेल, काळजी वाटायची ती आता जवळजवळ नाहीच. पण कधी तरी कुठं तरी जाणवत राहतं, पत्रांतला तो जिव्हाळा आठवत राहतो. काळाच्या पडद्याआड गेलेले जिव्हाळ्याचे लोक त्या पत्रांतून दिसत राहतात. विश्रब्ध शारदेचा तो तंबोरा मनात सूर धरून राहतो.

पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने

मलबार ट्रोगॉन - संमेलनाच्या बोधचिन्हावर विराजमान
(छायाचित्र - पक्षीमित्र प्रा. धीरेंद्र जाधव-होळीकर,  सावंतवाडी)
(नुकतेच सावंतवाडी येथे पक्षीमित्र संमेलन पार पडले. संमेलनाच्या स्मरणिकेसाठी लिहिलेला लेख)

प्रथम एक विधान करतो. ते थोडंसं धक्कादायक आहे आणि कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. ते म्हणजे पक्षी आपले मित्र नाहीत, आणि आपणही पक्ष्यांचे मित्र नाही. तसे पाहायला गेले तर माणसाळलेले एक दोन प्राणी सोडले तर कुठलेही प्राणी आपले मित्र नाहीत. या माझ्या विधानाचा तुम्ही थोडासा विचार केलात तर अर्थ लक्षात येईल आणि मग पटेलही. प्राणीमात्रांत मित्रत्व तसे नसते, असलेच तर ते असते साहचर्य. साहचर्यासाठी लागते "घ्या आणि द्या" या प्रकारचे नाते. निसर्गात हे साहचर्य अनेक ठिकाणी दिसेल. मोठ्या माशांच्या अंगावर चिकटून असणारे पायलट फिश, एका झडपेत हाडांचा चुरा करणारा पाणघोड्याचा अथवा मगरीचा जबडा. तो उघडा असताना त्यात अडकलेले अन्नकण खाणारे पक्षी, गवा रेड्याच्या डोक्यावर बसून कानामागे, डोक्यावर असलेले किडे खाणारे पक्षी अशी अनेक साहचर्याची उदाहरणे देता येतील. प्राणी साहचर्यामुळे उत्क्रांत पावल्याचेही एक उदाहरण आहे. ते म्हणजे कुत्रा. आदिम काळात मनुष्य आणि इतर प्राणी एकमेकांपासून सारखाच धोका असलेले. जरी मानवाने थोडीफार शस्त्रे तयार करायला सुरूवात केली असली तरी त्याला सिंह, लांडगा, वाघ यांच्यापासून धोका फारसा कमी झालेला नव्हता. त्या काळात कधी तरी एखाद्याने जवळ गुरगुरणाऱ्या लांडग्याला एखादे हाडूक भिरकावले. ते हाडूक तो लांडगा चघळत बसला आणि त्याने हल्ला केला नाही. मग मानवाला लक्षात आले की असे हाडूक किंवा एखादा मांसाचा तुकडा टाकला तर लांडगे हल्ला करीत नाहीत, लांडगेही शिकले की हल्ला न करता खायला मिळू शकते, त्यासाठी शक्ती वाया घालवावी लागत नाही. अशा प्रकारे लांडगे आणि मनुष्य यांच्यात साहचर्य निर्माण झाले. त्यातून आज आपल्याला कुत्रा हा प्राणी मिळाला आहे. हा झाला साहचर्यातून उत्क्रांतीचा भाग. पण अशी उदाहरणे फारशी दिसत नाहीत. कदाचित शस्त्राच्या आणि इतर आधुनिक शोधामुळे, मेंदूच्या जबरदस्त प्रगतीमुळे मनुष्य प्राण्याला पुढे साहचर्याची गरज वाटली नसावी. शस्त्राच्या आणि अकलेच्या जोरावर जगण्याच्या स्पर्धेत आपण टिकलो, नुसते टिकलोच नाही तर पूर्ण सजीव सृष्टीत वर्चस्व प्राप्त करून बसलो.  

मग असं असताना, पक्षीमित्र किंवा प्राणिमित्र ही संकल्पना का आली? शस्त्र आणि अक्कल यांचा वापर करून वर्चस्व प्राप्त करण्यात काही हजार वर्षे गेली. पूर्ण वर्चस्व प्राप्त झाल्यानंतर, मग मानव थोडेसे डोळे उघडून इकडे तिकडे पाहायला लागला. केवळ सावज आणि शत्रू टिपण्यासाठी तयार झालेली नजर आणि मेंदू आता जरा वेगळ्या नजरेने पाहू लागले. कुतूहल वाढू लागले. आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा जास्त गोष्टी माहीत होत्या. एखादा प्राणी कसा वागतो, त्याच्या काय सवयी असतात, तो काय खातो इथपासून वनस्पती, झाडे त्यांचे औषधी उपयोग, किंवा विषारीपणा या सर्व गोष्टी ज्ञात असायच्या, पण त्यांचा वापर जगण्याच्या धडपडीत टिकून राहण्यासाठी व्हायचा. आता आतून ज्ञान व्हावं असं वाटू लागलं. या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात ज्ञात असलेली जीवसृष्टी ही केवळ आपल्याच ग्रहावर हे लक्षात आलं. आपण विशेष आहोत. इथलं जीवन हे विशेष आहे. त्याचा अभ्यास करावा असं वाटू लागलं. आता जे जीवन दिसतं आहे ते उत्क्रांत पावत, अनेक संहार, पुनरुज्जीवन यांच्या चक्रांतून इथवर आलं आहे हे दिसू लागलं. मग ते सगळं कसं झालं याबद्दल कुतूहल निर्माण झालं. मग लक्षात आलं की यांत सुसूत्रता आहे, एक प्रकारचा समतोल आहे. शिकार आणि शिकारी यांत अत्यंत नाजूक असा समतोल आहे. शिकार आवश्यक आहे तसेच शिकारीही आवश्यक आहेत. जे प्राणी अथवा पक्षी शिकारी नाहीत ते आजूबाजूच्या वातावरणावर, झाडाझुडपांवर अवलंबून आहेत. जर ते पर्यावरण नष्ट झाले तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तो प्राणी अथवा पक्षी स्थलांतरित होऊन नवीन वातावरणाशी जुळवून घेतो आणि टिकतो किंवा आहे तिथे राहून नामशेष होतो. हे सर्व निरीक्षण करणारा, टिपणारा, त्याबद्दल अभ्यास करणारा एक वर्ग तयार झाला. त्यातीलच एक शाखा म्हणजे पक्षी निरीक्षण करणारी. अनेक जातींचे पक्षी आहेत. प्रत्येकाच्या सवयी, खाणे, पर्यावरण, पुनरुत्पादनाच्या सवयी आणि नियम हा एक प्रचंड विषय आहे. जे पक्षी निरीक्षक आहेत त्यांना हा विषय काही वेगळा सांगायला नको आणि या लेखाचं ते प्रयोजनही नाही. जे पक्षी निरीक्षक म्हणून आपल्याला आत कुठं तरी काही तरी जाणवलेलं आहे, आपली नाळ ही निसर्गाशी जुळली आहे त्याचं भान आलं आहे, म्हणून आपण हे कार्य करता आहात. पण हे का करायचं, यातून पक्ष्यांची सूची निर्माण करणं, त्यांच्या सवयी लिहून ठेवणं, त्यांच्या पर्यावरणाची नोंद ठेवणं आणि फार फार तर संमेलन भरवून लोकांच्यात जागृती निर्माण करणं एवढ्यापुरतंच याचं स्वरूप आपण ठेवणार आहोत का? ते हेतू तर असायलाच हवेत पण याच्या थोडंसं पुढेही जायला हवं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हा लिहिण्याचा प्रपंच. मी काही कुणी आपल्यासारखा तज्ज्ञ नव्हे, त्यामुळे अधिक उणे लिहिले गेले असल्यास क्षमा असावी.

सर्वसामान्यांत निसर्गाविषयी एक समज आहे. तो म्हणजे, जे जे हिरवे दिसते तो निसर्ग. त्यात डोंगर दऱ्या, झाडे पाने वेली, झरे, नद्या इत्यादी आले. निसर्गात राहतात ते प्राणिमात्र. कुणालाही विचारलं,"पर्यावरण टिकवायचं म्हणजे काय करायचं रे भाऊ?" तर बहुतेक भाऊ उत्तर देतील,"झाडे लावा, झाडे जगवा." वरकरणी, आपण ज्या पर्यावरणात राहतो त्यापुरतं ते खरंही आहे. पण निसर्ग म्हणजे झाडे, पाने, वेली हे अल्पज्ञान झालं. इको सिस्टीम ही संकल्पना आपल्यासारखे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना माहीत आहे. इको सिस्टीम ही काही हिरव्यापुरती मर्यादित संकल्पना नाही. एका मर्यादित क्षेत्रापुरता असलेला पंचमहाभूतांचा त्यातील सजीव आणि निर्जीव वस्तूंसकट असलेला समतोल म्हणजे इको सिस्टीम. हा समतोल नाजूक असतो हे आपल्याला माहीतच आहे. मनुष्याच्या प्रगतीच्या संकल्पनेत दुर्दैवाने हा समतोल आजवर खिजगणतीत धरला गेलेला नाही हे सत्य आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट, त्यामुळे एकूणच वाढलेले तापमान, वाढलेल्या तापमानामुळे वितळलेले हिमनग, त्यातून वाढलेली समुद्राची पातळी, हे आजही लोक मान्य करायला तयार नाहीत. ऋतूंत झालेले बदल, वेळी अवेळी येणारा पाऊस, त्याचे प्रमाण, उन्हाळ्यात वाढलेले तापमान हे सगळे आपल्या डोळ्यासमोर आहे. हव्यासापोटी, नफेखोरीपोटी शहरांची झालेली अनधिकृत वाढ, त्यामुळे बंद झालेले पाण्याचे नैसर्गिक निचरा मार्ग, मग शहरात पूर्वी कधीही न आलेल्या ठिकाणी पुराचे पाणी येणे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे आपण पर्यावरण टिकवा म्हणून ओरडत असताना, या सर्व गोष्टी पर्यावरणात येतात हेही लक्षात घेतले पाहिजे. आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो तो म्हणजे पर्यावरण आणि त्यापासून रोजगार निर्माण करणे यांची सांगड घालणे. आपल्याकडे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी, कीटक आहेत. अशी ठिकाणे अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर स्थानिक लोकांना त्यापासून रोजगार मिळावा ही साहजिक अपेक्षा असते. तशी अपेक्षा असणे नैसर्गिक आहे. पण म्हणून ती योग्यच असेल असे नाही. उदाहरणार्थ, धरण बांधल्यानंतर गावे पाण्याखाली जातात. त्या गावातील लोकांचे पुनर्वसन दुसरीकडे केले जाते. मुद्दा कठोर असतो, पण आवश्यक असतो. तसेच अभयारण्याच्या बाबतीत व्हायला हवे. अभय त्या पर्यावरणाला आहे, त्यातील प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना आहे, याचे भान राहत नाही. कितीही योग्य पद्धतीने विकास करतो म्हटलं तरी आपण रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यात बदल करणार, समतोल बिघडवणार. आतापर्यंत आपण अशी ढवळाढवळ करीत आलो म्हणून तर आज पृथ्वी धोक्यात आहे हे आपण विसरतो. ही ढवळाढवळ कमीतकमी होण्यासाठी कशी जीवनशैली असावी हे आपण शोधून काढले पाहिजे. अर्थात हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नसून, स्थानिक अर्थसंबंध त्यात गुंतले असल्यामुळे हा विचार वादग्रस्त होईल यात शंका नाही. पण तो मांडणे आणि त्यावर विचार करणे हे आपल्या सारख्या संवेदनशील लोकांचे कर्तव्य आहे असे मी समजतो.

एक पक्षी निरीक्षक म्हणून आपण त्या दृष्टीने संवेदनशील आहात, आपल्याला याची जाणीव झाली आहे, म्हणून आपल्याला हे सांगण्याचा खटाटोप. पक्षी, प्राणी, एकूणच पृथ्वीवरील चराचर जीवन हे एकाच समान धाग्याने गुंफले गेले आहेत. त्यामुळे पक्षी आणि पर्यावरण हे काही वेगळे नाही. पक्ष्यांचा अभ्यास करणे, त्यांची सूची तयार करणे हे महत्वाचेच, पण तसेच त्याबरोबर आपली नजरही विस्तारू द्या. मनुष्य प्राणी म्हणून आपण चुकीच्या रस्त्याने खूप पुढे आलो आहोत.  पण आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहोत याची जाणीव होणे हेही कमी महत्वाचे नाही. तेव्हा समाजप्रबोधनाची धुरा तुमच्या खांद्यावर आली आहे असे समजा. पक्षी निरीक्षक म्हणून काम करूया, समग्र पृथ्वी ही एक इको सिस्टीम आहे, त्याचा अभ्यास करूया, त्यात समतोल कसा राखला जाईल याचा विचार करूया आणि त्याचा प्रचारही करूया. 

Sunday, January 17, 2016

आज हे काय बरं?

आज प.पू. नाथनंगे महाराज पुण्यतिथी. 
कौटुंबिक मतभेद होतील, समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल.
काॅम्प्युटरचे डोळ्यांवरील दुष्परिणाम - सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे आकुंचन पावणाऱ्या डोळ्यांच्या बाहुल्या..
नृत्यातून होणारे व्यायाम - बेडूकउड्या, डोळ्यांची बुब्बुळे वर-खाली, उजवीकडे डावीकडे , गोलाकार फिरवणे
डाळवांगे पाककृती - तेलाच्या फोडणीमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि नारळाचा खव घालून वांग्याच्या फोडी वाफवून घ्याव्या...
विवाहास उपयुक्त दिवस - दु. २० (१०:४५ नंतर केव्हाही) किंवा ३० (१७.०० पर्यंत) असा मौलिक सल्ला. त्याखालीच (बहुधा स्ट्रॅटेजिकली लोकेटेड ) शरीराच्या कुठल्याही भागावर सूज आली असल्यास आणि तिथे दुखत असेल तर कढीपत्ता , हळद आणि मीठ एकत्र करून त्याचा शेक द्यावा असा अजून महत्वाचा सल्ला.
कोरफड - एक काटेरी दवाखाना. 
भुसावळ - संकष्टी चतुर्थी चंद्रोदय २०.३८ वा.
शब्द हे शस्त्र आहे हे विसरू नका, भाऊबंदांकडून त्रास संभवतो. चैनीच्या खर्चाला कात्री लावावी लागेल.
अमीबा नावाचा जीव आपल्या पोटात केंद्रक बाळगतो आणि बाळंत होताना केंद्रकासकट स्वत:चे दोन भाग करून नवीन पिढी तयार करतो.
तैत्तिरीय हिरण्यकेशी श्रावणी. शुक्ल पक्ष. यजुर्वेदी श्रावणी. छायाकल्प चंद्रग्रहण आहे. (हे भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत. अमेरिकास्थित भारतीयांनी जरूर पाळावेत)
सूर्याचा पूर्वा नक्षत्र प्रवेश - वाहन गाढव. वाहनविषयक समस्या दूर होतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण असू द्या. 
श्री शालिवाहन शके १९३८, दुर्मुखनाम संवत्सर. 
दिल्ली सराई -रोहिल्ला गरीबनाथ एस्प्रेस दर मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी जाते. 
"हे माझ्या बाबतीत घडले असते तर?" या प्रश्नातून व्यक्तिमत्वात उंची खोली आणि उदार व्यापकता येते. सहानुभूती वा अनुकंपेचा जन्म होतो. 
फळांचा राजा आंबा असला तरी इतर प्यादीही महत्वाची. सर्व फळांचे गुणधर्म वेगळे असतात. फलाहाराने सुदृढ आयुष्य लाभते. 
१७ जून हा दिवस खूप महत्वाचा आहे. १७ जूनला गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी तर आहेच परंतु प्रदोष आणि वटसावित्री व्रतारंभही होतो आहे. तसेच याच दिवशी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची तारखेप्रमाणे तर धर्मवीर संभाजीराजे भोसले यांची जयंती तिथीप्रमाणे येते आहे. या दिवशी निद्रासेवन वर्ज्य. कारण दुसऱ्याच दिवशी १८ जूनला शिवराज्याभिषेक दिन येतो आहे!
अध्यात्माचा एक चौकट म्हणून विचार करणे योग्य नाही. विश्वातील प्रत्येक घटक, वस्तू, अणू, रेणू, परमाणु म्हणजे आधिभौतिक आविष्कार, आधिदैविक संघटना आणि आध्यात्मिक अधिष्ठान. अध्यात्म समजून घ्यायचे असेल तर आधी आधिभौतिक आधिदैविक सकट समजून घ्यावे लागेल. अष्टांग योगातील अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह हे यम आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रबिधान हे नियम खरे म्हटले तर मानसिक साधना आहेत.
… 
 … 
… . . 
… 
…. 
…. 
…. 
 … 
… 
… 
काही नाही, मी ठीक आहे. कालनिर्णय वाचतोय. कालच मिळालंय.

Thursday, January 14, 2016

संक्रांतीचं पसायदान

गुलाबी थंडी म्हणजे काय ते न कळणारं वय होतं ते. कोकणातली थंडी ही तशी नरम मुलायमच म्हणायची. काटा येतोय असं म्हणायचं पण तो हवीहवीशी शिरशिरी आणणारा काटा. बराचसा तिळगुळावर आलेल्या काट्यासारखा. मऊशार रजईतून बाहेर न येता तसंच त्या उबेत राहून कानोसा घेत रहायचं. खिडकीतून अगदी अंधुकसा उजेड आत झिरपत असे. फुलाच्या पाकळीवर कळत न कळत नाजूक दंव जमल्यासारखा तो उजेड अर्धमिटल्या पापण्यातून जाणवत राही. अजून पांखरांचीही चाहूल नसायची. तीही पिसांत माना खुपसून बसलेली असायची. डोंगरात धुकं संथपणे तरंगत असायचं. डोळे मिटलेले असले तरी ते धुकं मनात उतरायचं, दिसायचं. असं ते धुकं उतरलं की रजईत आणखी मुरून आत आत शिरायला व्हायचं. डोळे मिटून घेतले तरी आपण त्या निळ्याशार डोंगरात धुक्याच्या वर तरंगतो आहोत असा भास व्हायचा. अगदी माथ्यावर. खाली ढग. नाही, ढग नाही, धुकंच ते. म्हटलं तर तिथं आहे, या क्षणी आहे, पापणी लवते न लवते तो विरघळून वाफेसारखा दिसेनासं होतं आहे. स्वप्नासारखं. स्वप्नात आठवायचं स्वत:ला बजावूनही जाग आल्यावर काहीच आठवू नये तसा. डोळे मिटून स्वत:शी म्हणायचं, बघ, हे असं धुक्यासारखं आयुष्य हवं. हवंहवंसं वाटेपर्यंत विरघळून जाणारं. सुख, आनंद धुक्यासारखाच असतो नाही का? असं काहीबाही विचार करत पडून असावं. 

हळुवारपणे आईनं हलवून जागं करावं. "ऊठ, आज संक्रांत आहे." हूं म्हणून पाय पोटाशी घेऊन मग रजई डोक्यावरून. पण मग उठावं, पांघरूण बाजूला केल्यावर थंडी थाडदिशी अंगावर आदळायची. हाताची घट्ट घडी घालून थेट मागील दारी अंगणात यायचं. बंब पेटलेला असे त्याच्याभवताली डेरा टाकायचा. आईला बजावायचं, शाळेत तिळगूळ घेऊन जायचाय हं. त्या माऊलीनं आधीच तिळगुळाचे डबे तयार करून ठेवलेले असायचे. एक माझ्यासाठी, एक भावासाठी. मग डबे उघडून कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत ते पहायचं. पांढरे, गुलाबी, पिवळे, कधी निळेसुद्धा. त्या रंगांनी हरखून जायला व्हायचं. रंग मला नेहमीच वेडावत आलेत. हे तर गोड रंग. रंगीबेरंगी तिळगुळासारखी मोहक वस्तू नसेल. त्यावेळी मी माझ्या आवडत्या रंगाचे तिळगूळ मी वेगळे ठेवत असे. ते फक्त माझ्या आवडत्या व्यक्तींसाठी असायचे. न कळत्या वयात हे असलं आवडतं नावडतं बरंच असायचं. पण ज्यांच्याशी फार काही बरं नसायचं त्यांनाही खूप आनंदात तिळगूळ दिला जायचा. याएका दिवशी सगळे हेवेदावे, मत्सर, चीड काही काही नसायचं. रंगाला गोडपणा देत देत एकमेकांत गोडवा आणणारा हा सण. ऋतू संक्रमण हे निमित्त,एकमेकांना परिपक्वतेकडे नेणारं संक्रमण हे. सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होणार, दिवस जास्त वेळ प्रकाशमान होणार, आपणा सर्वांचं आयुष्यही असंच प्रकाशमान होवो, अंतरी तो ज्ञानदीप उजळो हेच मागणं.