मलबार ट्रोगॉन - संमेलनाच्या बोधचिन्हावर विराजमान (छायाचित्र - पक्षीमित्र प्रा. धीरेंद्र जाधव-होळीकर, सावंतवाडी) |
प्रथम एक विधान करतो. ते थोडंसं धक्कादायक आहे आणि कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. ते म्हणजे पक्षी आपले मित्र नाहीत, आणि आपणही पक्ष्यांचे मित्र नाही. तसे पाहायला गेले तर माणसाळलेले एक दोन प्राणी सोडले तर कुठलेही प्राणी आपले मित्र नाहीत. या माझ्या विधानाचा तुम्ही थोडासा विचार केलात तर अर्थ लक्षात येईल आणि मग पटेलही. प्राणीमात्रांत मित्रत्व तसे नसते, असलेच तर ते असते साहचर्य. साहचर्यासाठी लागते "घ्या आणि द्या" या प्रकारचे नाते. निसर्गात हे साहचर्य अनेक ठिकाणी दिसेल. मोठ्या माशांच्या अंगावर चिकटून असणारे पायलट फिश, एका झडपेत हाडांचा चुरा करणारा पाणघोड्याचा अथवा मगरीचा जबडा. तो उघडा असताना त्यात अडकलेले अन्नकण खाणारे पक्षी, गवा रेड्याच्या डोक्यावर बसून कानामागे, डोक्यावर असलेले किडे खाणारे पक्षी अशी अनेक साहचर्याची उदाहरणे देता येतील. प्राणी साहचर्यामुळे उत्क्रांत पावल्याचेही एक उदाहरण आहे. ते म्हणजे कुत्रा. आदिम काळात मनुष्य आणि इतर प्राणी एकमेकांपासून सारखाच धोका असलेले. जरी मानवाने थोडीफार शस्त्रे तयार करायला सुरूवात केली असली तरी त्याला सिंह, लांडगा, वाघ यांच्यापासून धोका फारसा कमी झालेला नव्हता. त्या काळात कधी तरी एखाद्याने जवळ गुरगुरणाऱ्या लांडग्याला एखादे हाडूक भिरकावले. ते हाडूक तो लांडगा चघळत बसला आणि त्याने हल्ला केला नाही. मग मानवाला लक्षात आले की असे हाडूक किंवा एखादा मांसाचा तुकडा टाकला तर लांडगे हल्ला करीत नाहीत, लांडगेही शिकले की हल्ला न करता खायला मिळू शकते, त्यासाठी शक्ती वाया घालवावी लागत नाही. अशा प्रकारे लांडगे आणि मनुष्य यांच्यात साहचर्य निर्माण झाले. त्यातून आज आपल्याला कुत्रा हा प्राणी मिळाला आहे. हा झाला साहचर्यातून उत्क्रांतीचा भाग. पण अशी उदाहरणे फारशी दिसत नाहीत. कदाचित शस्त्राच्या आणि इतर आधुनिक शोधामुळे, मेंदूच्या जबरदस्त प्रगतीमुळे मनुष्य प्राण्याला पुढे साहचर्याची गरज वाटली नसावी. शस्त्राच्या आणि अकलेच्या जोरावर जगण्याच्या स्पर्धेत आपण टिकलो, नुसते टिकलोच नाही तर पूर्ण सजीव सृष्टीत वर्चस्व प्राप्त करून बसलो.
सर्वसामान्यांत निसर्गाविषयी एक समज आहे. तो म्हणजे, जे जे हिरवे दिसते तो निसर्ग. त्यात डोंगर दऱ्या, झाडे पाने वेली, झरे, नद्या इत्यादी आले. निसर्गात राहतात ते प्राणिमात्र. कुणालाही विचारलं,"पर्यावरण टिकवायचं म्हणजे काय करायचं रे भाऊ?" तर बहुतेक भाऊ उत्तर देतील,"झाडे लावा, झाडे जगवा." वरकरणी, आपण ज्या पर्यावरणात राहतो त्यापुरतं ते खरंही आहे. पण निसर्ग म्हणजे झाडे, पाने, वेली हे अल्पज्ञान झालं. इको सिस्टीम ही संकल्पना आपल्यासारखे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना माहीत आहे. इको सिस्टीम ही काही हिरव्यापुरती मर्यादित संकल्पना नाही. एका मर्यादित क्षेत्रापुरता असलेला पंचमहाभूतांचा त्यातील सजीव आणि निर्जीव वस्तूंसकट असलेला समतोल म्हणजे इको सिस्टीम. हा समतोल नाजूक असतो हे आपल्याला माहीतच आहे. मनुष्याच्या प्रगतीच्या संकल्पनेत दुर्दैवाने हा समतोल आजवर खिजगणतीत धरला गेलेला नाही हे सत्य आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट, त्यामुळे एकूणच वाढलेले तापमान, वाढलेल्या तापमानामुळे वितळलेले हिमनग, त्यातून वाढलेली समुद्राची पातळी, हे आजही लोक मान्य करायला तयार नाहीत. ऋतूंत झालेले बदल, वेळी अवेळी येणारा पाऊस, त्याचे प्रमाण, उन्हाळ्यात वाढलेले तापमान हे सगळे आपल्या डोळ्यासमोर आहे. हव्यासापोटी, नफेखोरीपोटी शहरांची झालेली अनधिकृत वाढ, त्यामुळे बंद झालेले पाण्याचे नैसर्गिक निचरा मार्ग, मग शहरात पूर्वी कधीही न आलेल्या ठिकाणी पुराचे पाणी येणे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे आपण पर्यावरण टिकवा म्हणून ओरडत असताना, या सर्व गोष्टी पर्यावरणात येतात हेही लक्षात घेतले पाहिजे. आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो तो म्हणजे पर्यावरण आणि त्यापासून रोजगार निर्माण करणे यांची सांगड घालणे. आपल्याकडे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी, कीटक आहेत. अशी ठिकाणे अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर स्थानिक लोकांना त्यापासून रोजगार मिळावा ही साहजिक अपेक्षा असते. तशी अपेक्षा असणे नैसर्गिक आहे. पण म्हणून ती योग्यच असेल असे नाही. उदाहरणार्थ, धरण बांधल्यानंतर गावे पाण्याखाली जातात. त्या गावातील लोकांचे पुनर्वसन दुसरीकडे केले जाते. मुद्दा कठोर असतो, पण आवश्यक असतो. तसेच अभयारण्याच्या बाबतीत व्हायला हवे. अभय त्या पर्यावरणाला आहे, त्यातील प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना आहे, याचे भान राहत नाही. कितीही योग्य पद्धतीने विकास करतो म्हटलं तरी आपण रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यात बदल करणार, समतोल बिघडवणार. आतापर्यंत आपण अशी ढवळाढवळ करीत आलो म्हणून तर आज पृथ्वी धोक्यात आहे हे आपण विसरतो. ही ढवळाढवळ कमीतकमी होण्यासाठी कशी जीवनशैली असावी हे आपण शोधून काढले पाहिजे. अर्थात हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नसून, स्थानिक अर्थसंबंध त्यात गुंतले असल्यामुळे हा विचार वादग्रस्त होईल यात शंका नाही. पण तो मांडणे आणि त्यावर विचार करणे हे आपल्या सारख्या संवेदनशील लोकांचे कर्तव्य आहे असे मी समजतो.
एक पक्षी निरीक्षक म्हणून आपण त्या दृष्टीने संवेदनशील आहात, आपल्याला याची जाणीव झाली आहे, म्हणून आपल्याला हे सांगण्याचा खटाटोप. पक्षी, प्राणी, एकूणच पृथ्वीवरील चराचर जीवन हे एकाच समान धाग्याने गुंफले गेले आहेत. त्यामुळे पक्षी आणि पर्यावरण हे काही वेगळे नाही. पक्ष्यांचा अभ्यास करणे, त्यांची सूची तयार करणे हे महत्वाचेच, पण तसेच त्याबरोबर आपली नजरही विस्तारू द्या. मनुष्य प्राणी म्हणून आपण चुकीच्या रस्त्याने खूप पुढे आलो आहोत. पण आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहोत याची जाणीव होणे हेही कमी महत्वाचे नाही. तेव्हा समाजप्रबोधनाची धुरा तुमच्या खांद्यावर आली आहे असे समजा. पक्षी निरीक्षक म्हणून काम करूया, समग्र पृथ्वी ही एक इको सिस्टीम आहे, त्याचा अभ्यास करूया, त्यात समतोल कसा राखला जाईल याचा विचार करूया आणि त्याचा प्रचारही करूया.
No comments:
Post a Comment