सायबांच्या केबिनचं दार उघडलं आणि फणकाऱ्याने मिस रोज बाहेर आली आणि पाय आपटत आपल्या टेबलकडे गेली. तिने हातातली फाईल टेबलावर फेकली आणि धाड्कन खुर्चीवर देह झोकून दिला. आणि म्हणाली,""आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई!" मिस रोज आमच्या हाफिसाची जणू मधुबालाच. म्हणजे तशी काही कमनीय वगैरे म्हणता आलं नसतं तिला. म्हणजे नसतंच खरं तर. ५६x५६x५६ म्हणजे फायर हायड्रंट सारखी बांधणी. चूक तिची नाय हो. कुणी रोज फाफडा, ढोकळा, उंधियु खाऊन ३६x२४x३६ राहून दाखवावं. चॅलेंज आहे आपलं. पण बाई मधुबाला नसली तरी मधुबोला तरी होतीच. सर्वांशी गोड बोलून काम करून घ्यायची. त्यातून कामाला वाघ. सकाळी सात वाजता यायची ते रात्री दहाला जायची. दिवसातून बाथरूमलाही एकदा म्हणजे एकदाच. अगदी लिपस्टिकसुद्धा लावायला सुद्धा जायची नाही. नाही तर आमचा पेंडशा! दिवसातून दहा वेळा कानाला जानवं लावतो. वेंकी तर उघड उघड जरा व्हॉट्सऍपला जाऊन येतो म्हणतो. मिस रोज दोन वर्षांपूर्वीच आली पण कानामागून आली आणि तिखट झाली असा प्रकार. वेंकी, गडकरी वगैरे इतक्या वर्षांपासूनचे. मिस्टर लालवाणी तर रिटायरमेंटला आलेले. त्यांची सिनिऑरिटी खरं तर. या सगळ्यांना डावलून सायबांनी मिस रोजला सगळे अधिकार दिलेले. लालवाणी लालबुंद होऊन गरजले होते,"या बाईला ठेवाल तर आम्हाला मुकाल." आता लालवाणींचा मुका कोण घेणार? तरीही सायबांनी बाईंना ठेवलं. वास्तविक बारकाईनं पाहिलं तर मिस रोजना बारीक दाढीमिशा पण होत्या. पण लालवाणींच्या मिशांपेक्षा त्या कमी टोचतील असा विचार सायबांनी केला असावा. पण लालवाणींनी काही धमकीप्रमाणे मुकाबिका घेतला नव्हता. मिस रोजनीही आल्या आल्या चांगला पदर बिदर ओढून डोळ्यात पाणी आणून लालवाणींना नमस्कार केला होता. लालवाणींनी गहिवरून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. मिस रोज चक्क लाजून जांभळ्या झाल्या होत्या. त्यांनी "इश्श, आत्ता कुठं आम्हाला साठावं लागतंय. आमचं लग्न सुद्धा नाही झालं अजून" असा साभिनय डायलॉग मारला होता. त्यावर लालवाणींनी,"वाह! आमचीही तीच अवस्था आहे. आत्ता कुठं सत्तरी ओलांडलीय. आमचं प्रोफाईल पहा बरं का. लोकाग्रहास्तव रजिस्टर करून टाकलं झालं. रिअल हनुमान मॅट्रिमोनी डॉट कॉम. लगेच कित्येक फोन आले. पण दुर्दैवाने फोन करणारेही पवनसुत हनुमान निघाले. सध्या रिटायर्ड सिंगल्स डॉट कॉम वर पडीक आहे." मिस रोजने एक सहानुभूतीचा कटाक्ष टाकून त्यांची ट्रान्सफर स्वागत खात्यात करून टाकली होती. त्यानंतर मिस रोजने क्रांतिकारी निर्णय घ्यायला सुरवात केली होती. सर्वात प्रथम बाथरूम टाईमवर नियम काढले. तीन मिनिटाच्या वर जर कुणी "आत" राहिले तर आपोपाप फ्लश होऊन टॉयलेट पेपर भिंतीत गुप्त होत असे आणि त्या सिंहासनावर हताशपणे विराजमान झाल्याचा फोटोही निघत असे. शिवाय टॉयलेटमध्ये वायफायच काय फोन नेटवर्कही ब्लॉक करून टाकले. अपलोड वगैरे लाड विसरा, जे काय असेल ते झटपट डाऊनलोड करा आणि परत कामाला लागा असाच त्यातून संदेश दिला होता. प्रथम रांगा लागल्या, पण तीन मिनिटांत आवरतं घ्यायला लागत असल्याने लोकांना फार वेळ थांबायला लागत नव्हतं. मग पुढे पुढे लोकांनाही सवय झाली. भारताच्या इतिहासात असा कठोर संदेश पूर्वी फक्त इंदिरा गांधींनी "एकच जादू, झपाटून काम" या घोषणेतून दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भारताची लोकसंख्या पाच महिन्यांत दहा टक्क्यांनी वाढली होती. लोकांनी सरकारला साथ द्यायचं ठरवलं तर काय अशक्य आहे?
तीच मिस रोज "आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई. " असं फणकाऱ्याने जेव्हा म्हणू लागली आणि ऑफिसातील यच्चयावत क्रिया तत्क्षणी थांबल्या. पेंडशा एक्सेल शीटशी लढाई करत होता, सेल्सचा प्रधान नवी आरएफपी आली होती तिची चिंता करत बसला होता, गडकरी म्याडमचा नुकताच पहिला चहा झाला होता आणि त्या आत्ता कुठे फेसबुकवर आपलाच फोटो पाहून स्वतःशी खुद्कन हसत होत्या, दत्तू त्यांच्या मागे उभा राहून तो फोटो पाहून दात काढत उभा होता. नव्यानेच भरती झालेला खुजटमल गडकरी म्याडमवर खार खाऊन असायचा. कामाच्या दुसऱ्याच दिवशी बाई आठ तासातले सहा तास व्हाट्सऍप, फेसबुकवर पडीक असतात तरी त्यांना पगार मिळतो अशी त्याने एचआर कडे तक्रार केली होती. खुद्द एचआरचे हेडच गडकरी म्याडमचे मिष्टर निघाल्यावर तो फारच व्यथित झाला होता. त्यात मिस रोजनी पुरावे मागितल्यावर गळपटला. मग तो रोज काम करता करता नाकातून फूत्कार टाकत तो म्याडमकडे चष्म्याच्या वरून रोखून पाहू लागला होता. शेवटी गडकरी म्याडमनी रीतसर हॅरॅसमेंटची तक्रार केल्यावर त्याने रोखून बघणे थांबवले पण टोमणे सुरूच ठेवले. इथे मिस रोज आता लाडिकपणे पण पेटली होती,"आता आमाला बोलायला द्यायचंच नाई म्हंजे काय म्हणावं आता? चांगलं कंपनीच्या भल्यासाठी काही करायला जावं तर मेली आमालाच बोलणी. म्हणे तुमी आता बोलूच नका. बरं नाई तर नाई. आमी सरळ स्टाफशी बोलू." आम्ही म्हटलं , म्याडम तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बॉस. त्यातून कडक! तुम्ही चार्ज घेतल्यापासून ऑफिसमध्ये चहासुद्धा स्वतःच्या पैशाने प्यायला लागतो आहे. तुमची कोल्हापुरी चप्पल बाहेर कॉरिडॉरमध्ये करकरली की हा खुजटमलही सावरून बसतो. इथे खुजटमल मध्येच चिरक्या आवाजात म्हणाला,"काही नाही हं, घाबरत वगैरे काही नाही आपण. एकदा कधी तरी पाठ अवघडली म्हणून सरळ बसत होतो तर तेवढ्यात या आल्या." बूट, पैशाचं पाकीट,चड्डी बनियन शर्ट प्यांट इत्यादि ऐवज धरून पन्नास किलोसुद्धा वजन होणार नाही या खुजटमलचं, पण ऐट पैलवानाची करतो. चालणंही उगाच हात पैलवानासारखे ठेवून कंसात चालल्यासारखं. मिस रोजवर उगाच चिडून असतो. सगळ्या स्टाफला तिच्याबद्दल कायबाय सांगून भडकवत असतो. परंतु आम्हाला दाट संशय आहे मिस रोज या खुजटमलची गुप्त क्रश आहे. कधी तरी याच्या टेबलाची झडती घ्यायला हवी.
एरवी मिस रोज आम्हाला दिसतसुद्धा नाहीत. त्या केबिनमध्ये तर आम्ही आपले बाहेर एका हॉलमध्ये बसणारे. आज चक्क बाई आमच्यात बसून मनीची व्यथा सांगतात याचंच कवतिक घेऊन आमचं काळीज सुपाएवढं झालं. एरवी त्यांच्या मनीची बात आम्हाला जी आर मधूनच कळायची. मग आम्ही मिस रोजना विचारलं, पण तुम्हाला एवढं रुसायला झालं तरी काय? कोण तुम्हाला बोलू देत नाही? या ऑफिसात तुमची शिस्त आणि नियम चालतो. तुम्हाला कोण अडवणार? यावर मिस रोज स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे शून्यात लागले आणि त्या म्हणाल्या "आम्हाला ऑफिसात बोलायची परवानगी नाही." हे म्हणजे अतिच झाले. बाई जवळ जवळ मालकच होत्या. मालकही बाईंच्या जवळ जवळ होते. मग कोण कुणाला परवानगी देणार आणि नाकारणार? पेंडशानं धीर करून विचारलं,"का?" पेंडशानं हा "का" इतक्या तालात विचारला की इथे मला उगाचच "एक लाजरा न साजरा मुखडा" मधल्या अरुण सरनाईकच्या त्या "का?" ची आठवण झाली. मिस रोज आता लाजून "बगत्यात!" म्हणतात की काय असं एकदा वाटून गेलं. "मित्र हो!" बाई म्हणाल्या. इथे आम्ही सावध झालो. हे शब्द हल्ली कानावर पडले की त्या पाठोपाठ काही तरी मागणी येत असते हे अनुभवानं आम्ही शिकलो आहोत. पण तसं काही झालं नाही. मिस रोज पुढे म्हणाल्या "मित्र हो! आम्ही नियम करतो ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी, आपल्या कंपनीच्याच फायद्यासाठी. पण कुणी तरी आमच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यातल्या त्यात आमच्या "मर्यादित लघु-दीर्घशंका" नियमाविरुद्ध. मी सरळ कार्यक्षमतेत झालेल्या वाढीचे आकडे समोर ठेवले. साहेब अतिशय खूष झाले. आणि ज्याने तक्रार केली होती त्याच्यावरच ऍक्शन घ्या असा मला सल्ला दिला." बाई थांबल्या. आम्हाला काही कळले नाही. साहेब जर खूष झाले आहेत तर बाई फुरंगटून का बसल्या आहेत? पेंडशा बसल्या जागी चुळबूळ करीत म्हणाला,"असं? क क क्का म्हणे असं? म्हणजे मला म्हणायचं होतं, वा! वा! बरोबरच आहे. कैच्या कैच तक्रार आहे ही." बाई पुढे म्हणाल्या,"दुर्दैवी घटना पुढे घडली. तासाभराने मला साहेबांचाच फोन आला. मी उचलल्या उचलल्या पहिला शब्द आला,"च्या मायला!" "कसले नियम करता हो? तीन मिनिटं फक्त? न सांगता असे कसे निर्णय घेता तुम्ही?" मी शांतपणे विचारलं,"साहेब कुठं आहात तुम्ही?" त्यावर तर तिकडे स्फोटच झाला,"कुठं? तुमच्याच निर्णयाचा लाभ घेत बसलोय! म्हणजे कुठे असणार सांगा पाहू? या पुढे कुठलाही नियम करणार असाल तर प्रथम आम्हाला सांगा! बास! आम्ही यावर काही ऐकणार नाही तुमचं! आणि त्या दत्त्याला पाठवून द्या इकडे, तुम्ही जप्त केलेली रसद घेऊन ये म्हणावं! काय थंडी आहे इथे! ऑफिसापेक्षा इथे एसी जास्त! त्यात फोटोही निघालाय आमचा! तुमचे नियम होतात आणि आमचा पार्श्वभाग गोठतो. काय अवदसा आठवली आणि तुम्हाला एम.डी. केलं देव जाणे! ठेवा फोन आता!" "आता सांगा!" बाई आमच्याकडे पाहू लागल्या. खरं तर आम्हाला सायबांचा निघालेला तो सिंहासनावर अवघडासन करत बसलेला फोटू पाहायची दुर्दम्य इच्छा होत होती. तो त्यांच्या आधार कार्डावरील फोटोपेक्षा जास्त करमणूक करेल यात शंका नव्हती. "हा नियम का केला याचं कारण सांगायलाही आमाला बोलू दिलं नाई. सायबांकडे तक्रार कुणी केली असेल बरं?" असं म्हणून बाई आमच्याकडे पाहू लागल्या. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. का कुणास ठाऊक, पेंडशा कधी गुप्त झाला ते कळलंच नाही.

Khup chan ...bhari
ReplyDeleteराज, धन्यवाद!
Delete