अलीकडेच माझ्या एका मित्रानं एक विधान केलं होतं. दक्षिणेतील एका प्रसिद्ध मंदिरात त्याला लुंगी नेसल्याशिवाय प्रवेश देणार नाही असं बजावलं गेलं होतं. मित्राचं असं म्हणणं होतं की देवाच्या दारी जायला हा काच का? आता दक्षिणेत कर्मकांड अजून टिकून आहे हे खरं असलं तरी मला त्याचं म्हणणं बरोबर वाटतं. त्याच्या या विधानावर दुसऱ्या एकानं असं म्हटलं की तुम्ही जिथे नोकऱ्या करता तिथे वेषभूषेची एक किमान अपेक्षा किंवा अट असतेच की नाही? मग देवळाच्या पुजाऱ्यानी असे केले तर बिघडले कुठे? या विधानाने मी तरी बिघडलो. आज अनेक प्रसिद्ध मंदिरे एखाद्या धंद्याप्रमाणे चालवली जाताहेत हे खरं आहे. त्यामागे किती आध्यात्मिक भावनेने भारलेले लोक आहेत हे आपण जाणून आहोत, त्यामुळे ते तसे करणारच हे आपण मानून घेतले आहे. पण सर्वसामान्य माणूसही ते योग्यच आहे असे जेव्हा मानायला लागतो, तेव्हा कुठे तरी काही तरी चुकते आहे, मोडून पडते आहे असे वाटायला लागते.
ग्लोबलायझेशनमुळे जी बाजार संस्कृती आली तिने अशी मानसिकता निर्माण केली असेल का? पैसे असतील तर सर्व मिळेल, पैसे टाकले तर सर्व मिळालेच पाहिजे या पासून, अमुक अमुक पाहिजे असेल तर ते मागतील ती किंमत द्यायलाच हवी, त्यात वावगे ते काय अशा प्रकारची एक मानसिक प्रवृत्ती होऊ घातली आहे. मग अशा बाजार संस्कृतीचा राग धरणारे आपले संस्कृतीरक्षकही शक्य तिथे त्याचा विरोध करू पाहतात. तुम्ही कंपन्यांचे गुलाम आहात, त्या जे सांगतील ते तुम्ही बिनबोभाट करता, पाळता. मग, आमची एवढी पुरातन संस्कृती काही नियम जर राबवत असेल तर त्याला तुमचा विरोध का? मी संस्कृतीरक्षण ही गोष्ट समजू शकतो, पण या सर्व सव्यापसव्यात, संस्कृती कशासाठी निर्माण झाली याचे आपल्याला भान राहिले नाही असे वाटू लागते. आपण देवळात का जातो हे विसरून बसलो आहोत. सहासात तास रांगेत उभे राहून झाल्यावर एखादा बडवा तुमचे डोके धरून विठ्ठलाच्या पायावर बडवतो, ती कळ जिरायच्या आतच आपण गाभाऱ्याच्या बाहेर असतो, आपण घातलेला हार, चढवलेला नारळ मागील दाराने पुन्हा विक्रीस जातो. आपण काय करायचं हे तो बडवा (इथे 'भ' वापरायचा मोह महत्प्रयासाने टाळला आहे) ठरवतो. हे सर्व आपणच सुरु केलं आहे.
मी देव आणि दैव दोन्ही संकल्पना ठाऊक नसण्याच्या आणि असण्याच्यासुद्धा वयामध्ये कित्येक तास देवळात घालवले आहेत. कोकणात गूढरम्य देवळे भरपूर. छोटीशीच पण धीरगंभीर. समोर दीपमाळेचा स्तंभ. स्वच्छ, शेणाने सारवलेले अंगण. तांबड्या चिऱ्याच्या अथवा मातीच्या भिंती. प्रशस्त मंडप. भरपूर लाकडी खांब. त्यावर आडव्या लाकडी तुळया. थंडगार गुळगुळीत फरशी. उन्हाळ्यात छान पसरून द्यायला कसं छान वाटायचं. देवळाच्या आवारात चाफ्याचं झाड तर असायचंच. चाफ्याचा छान सडा पडलेला असायचा, त्याचा मंद सुवास. गाभारा अंधाराच असायचा. तो गूढ अंधार मग गंभीर करून जायचा. अनेक वेळा गाभाऱ्यात न जाता मी बाहेरच खांबाला टेकून बसायचो. मंडप शीतल असायचा. मधूनच वाजणारी घंटा, स्तोत्र म्हणत प्रदक्षिणा घालत देवाकडे काहीतरी गाऱ्हाणं घालणाऱ्या कुणा बापड्याच्या पावलांची चाहूल, दुरून तरंगत येणारे पुजाऱ्याचे खर्जातील मंत्रोच्चार, अभिषेक करताना होणारी घंटेची नाजूक किणकिण, प्राजक्ताच्या फुलांचा दरवळ, त्यात मिसळलेला चंदनाचा सुगंध, भस्माचा, कापराचा गंध. या व्यतिरिक्त कसलाही आवाज नसे, वास नसे. काळ जणू थांबल्यासारखा वाटे. वाकून गाभाऱ्यात पाहिलं तर मूर्तीचे ते लख्ख डोळे दिसायचे. हिंदू धर्मातील सर्वच देवदेवतांचे डोळे असेच. त्या दृष्टीमध्ये सुष्टाला धीर आणि दुष्टाला दम दोन्ही असायचा. तिथे काही शब्दांची देवाणघेवाण नसे. त्याची गरजच नसायची. एक विलक्षण मनाची शांतता लाभायची. देव आहे की नाही मला माहीत नाही, पण हे असे सगळे अनुभवणे, त्यातून उभारी मिळून नव्याने जगाला सामोरे जाण्याचे बळ देणे, हे सर्व देऊळ जरूर करते. देवळाचे नुसते असणेच पुरेसे असते. आपला सहिष्णु हिंदू धर्म सगळ्याची मुभा देतो. तो गाभाऱ्यात जा म्हणत नाही आणि नकोही म्हणत नाही. कुण्या बापड्याचा दीसु त्याने कसा गोड करावा हे ज्याने त्याने ठरवावे. तस्मात, लुंगी नेसून जावे अथवा धोतर, गाभाऱ्याशी संवाद व्हावा हीच सदिच्छा.

No comments:
Post a Comment