Sunday, March 23, 2014

जाणता राजा आणि अजाण प्रजा

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा. राजा जुना,जाणता, ज्येष्ठ, मुत्सद्दी आणि असंच बरंच काही. प्रजा जशी असायची तशीच. गांजलेली, रडवेली, टाचा घासत जगणारी. पण जगणारी. जगायलाच हवं. मुलांच्या तोंडात घास तर हवा, थंडीत अंगावर घालायला ठिगळे जोडलेलं का होईना, पांघरुण तर हवं. कारभारणीच्या अंगावर धडुतं तरी हवं. तर प्रजा अशी जगण्याच्या खटपटीत. नगरीला एक प्रधानसुद्धा. उतलेला मातलेला. अरबट चरबट विनोद करणारा. तोच दरबार भरवायचा. राजानं त्याच्या उमेदीच्या वयात भरपूर पराक्रम केलेले. थोरल्या महाराजांच्या पठडीत आपण तयार झालो असं हा राजा सगळयांना सांगायचा. पण वेळ आली तशी त्यांचा घात करून आपण गादीवर बसलो हे उघड गुपित कुणाला उच्चारायला द्यायचा नाही. राजाचं कसब असं की जनता ते त्याचं कर्तृत्व मानू लागली होती. राजकारण असंच करायचं असतं असंच प्रजेला वाटू लागलं होतं. जाणता राजा स्वतःला राजा म्हणवायचा नाही. मी साधा शेतकरी, या देशातील ७० टक्के प्रजा शेतकरी, त्यांचे भले केवळ मलाच कळणार असं त्याला वाटायचं. म्हणून त्यानं कृषी खातं पण आपल्याकडे ठेवलेलं. प्रधानानं एकदा राजाला विचारलं पण, महाराज आपण आता कष्ट का घेता? त्यावर राजा छद्मी हसून म्हणाला होता, ते कृषी खातं आहे, योग्य प्रकारेच खाल्लं पाहिजे, समजलं ना? राजा नेहमी छद्मीच हसायचा. खळखळून हसणे त्याच्या स्वभावात नव्हते, राज्यकारभाराला ते उचित नव्हते. शिवाय खूप जोरात हसले तर आपले बोळके तोंड प्रजेला दिसेल, आणि अमूल्य असे ते उरलेले दोन दात खिळखिळे होतील अशी काहीशी भीतीपण होती. गतवर्षी एका माथेफिरूने सणसणीत लगावली होती तेव्हापासून हे दोन दात राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत हे राजाला जाणवलं होतं. नवीन जिरेटोप मागवायला हवा.. राजाने मनात एक नोंद करून ठेवली. नकळत हात गालावर गेला होता. तो काढत राजा म्हणाला, प्रधानसाहेब, मी शेतकरी असल्याने मला समस्या आणि त्याचे निराकरण दोन्ही ज्ञात आहेत. इथे शरदाच्या शीतल चांदण्याप्रमाणे राजाचा चेहरा कनवाळू  झाला. जमीन, प्रधानजी, जमीन हीच त्यांची समस्या आहे. ती कसावी लागते, वरुणराजाच्या कृपेवर अवलंबून रहावे लागते. अवर्षण आले की मग हा बळिराजा कर्ज काढतो , ते फेडता येत नाही. मग तो आत्महत्त्या करतो. त्याची बायको मुले देशोधडीला लागतात. आपण राज्यकर्ते, कर्ज माफ कसे करणार? राज्य तर चालवायचे आहे. तेव्हा त्यांना जमिनीच्या जोखडातून मुक्त करणे हा या समस्येवरील उपाय आहे. घ्या, जमीन ताब्यात घ्या, सर्व समस्या दूर होतील. प्रधानाने राजाची प्रशंसा केली व म्हणाला प्रजा आपणास मुरब्बी म्हणते ते योग्यच. मी आजपासूनच कामाला लागतो.

राजा नुसताच मुरब्बी नव्हता तर धूर्त पण होता. दक्षिणपूर्व देशात राहणाऱ्या आपल्या राजकन्येला आणून आपल्या गादीवर कसे बसवायचे याचीही आखणी त्याने करून ठेवली होती. प्रधानाला पूर्ण मोकळीक मिळूनही शेवटी प्रधानच रहावं लागणार होतं. राजा आता थोरल्या महाराजांच्या आठवणीत गेला होता. थोरल्या महाराजांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी होती पण समस्येची उकल करता आली नव्हती. उगाच सहकार योजना वगैरे करत बसले होते. पुन्हा राजा छद्मी हसला, सहकार योजना! सहकाराचा उपयोग नक्की झाला, फक्त तो बळीराजाला नाही झाला. शेतकरीही कसले! ज्वारी, गहू कापूस करत बसले आणि भिकेला लागले. आपण चांगले सांगत होतो , ऊस लावा , मळीपासून दारू तयार करा, द्राक्षे लावा , त्यांची शांभवी तयार करा. ठीक आहे, झाले ते उत्तमच झाले. आपोआप जमिनी मिळतील. राजाच्या डोक्यात भव्य योजना होत्या, परिवर्तन घडवून आणायचे होते, उत्क्रांती घडवून आणायची होती. नवश्रीमन्त तयार करायचे होते, त्यांच्यासाठी तलावाकाठी भव्य नगरे, प्रासाद उभारायचे होते. नवश्रीमंत काही बैलगाड्यातून फिरणार नव्हते, त्यांच्यासाठी जलद राजमार्ग निर्माण करायचे होते. पर्यायाने शेतकऱ्यांचा उत्कर्षच होणार होता. भव्य प्रासादांच्या वस्तीपासून अनेक कोस दूर भव्य नसली तरी घरे असणार होती. तिथे नवश्रीमंत नसलेले राहणार होते, शेतकरी राहणार होते. त्यांची मुलेबाळे शिकूनसवरून मोठी होणार होती आणि नवश्रीमंतांच्या घरी कारकुनाची नोकरी करणार होती. जे शिकणार नव्हते ते श्रीमंत वस्तीत जाऊन धुणीभांडी करणार होते. राजा स्वत: राजकन्येसहित या सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवून राज्य करणार होता. ज्यांना हे पसंत नसेल त्यांची खबरबात प्रधान जातीने जाऊन आपल्या रांगड्या शैलीत आणि भाषेत घेणार होता. सर्वत्र आबादीआबाद होणार होते. राजाची दूरदृष्टीच तशी होती. त्याला ही कहाणी नुसती साठा उत्तरी सुफळ संप्रूण करायची नव्हती तर क्रमश:ही ठेवायची होती. त्याच्या स्वत:च्या पिढ्यानपिढ्यांसाठी.  

No comments:

Post a Comment