Thursday, March 20, 2014

जागतिक चिमणीदिनानिमित्त्य

 चिमणी या छोट्याशा पक्षानं माझं बालजीवन व्यापलं होतं. अवती भवती तर ती असायचीच पण मराठी भाषेतसुद्धा चट्कन येऊन जायची. मराठीतील बाळबोध वळण चिमणीसारखं असायचं, एव्हढसं तोंड झालं की ते चिमणीसारखं दिसायचं, तान्ह्या बाळांच्या भरवण्यातला घाससुद्धा पहिला चिऊताईला असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीच्या घराचे वेध लागायचे. तिथे जिवाभावाची भावंडे असायची. माझी आत्तेभावंडं हे प्रमुख आकर्षण असायचं. त्यातल्या त्यात हेमंता आणि मी यांचे एक विशेष सूत जमले होते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या मागे असणे, अगदीच काही नसेल तर नदीकाठी मनसोक्त उनाड भटकणे ही आमचे आवडते उद्योग असायचे. घरात येणाऱ्या चिमण्यांचे निरीक्षण हा त्यातलाच एक उद्योग असायचा. दुपारी आम्हाला कुठेही बाहेर जायची परवानगी नसायची. कडाक्याचे ऊन तापलेले असायचे. कुत्रीही जिभा बाहेर काढून लपालपा करत आडोशाला बसलेली असायची. चिमण्यासुद्धा वळचणीला चिडीचूप बसायच्या. जुने कडीपाटाचे घर. जुन्या पद्धतीचे लाकडी पट्टी सर्वत्र फिरवून केलेले इलेक्ट्रिक फिटिंग. चिमण्यांसाठी ती लाकडी पट्टी अगदी त्यांच्यासाठीच ठेवल्यासारखी वाटायची. आजोबांच्या खोलीत तर दरवर्षी एक चिमणी त्या लाकडी पट्टीवर कोपऱ्यात छान घरटे करायची. आजोबांच्या खोलीत कुणी घरट्याला धक्का लावणार नाही याची बहुधा तिला खात्री असावी. आजोबांची आम्हाला भीती नव्हती पण आदरयुक्त वचक जरूर वाटे. आम्ही रोज त्या चिमणीची लगबग पाहत असू. काड्या, कापूस असं काय काय ती चिमणी आणि तिचा चिमणा आणत. प्रथम खिडकीत बसत. डोके वाकडे करून खोलीची चाहूल घेत. आजोबा शांतपणे मृगाजिनावर बसून काहीतरी वाचन करीत असले म्हणजे त्यांना दिलासा मिळाल्यासारखे वाटत असावे. मग ती दोघं तडक आत येत आणि भिंतीवरील लाकडी पट्टीवर जात. थोड्याच दिवसात घरट्यातून बारीक चिवचिवाट ऐकू येई. चिमणा मग फारसा दिसत नसे. चिमणीमात्र संध्याकाळ झाली की येऊन बसे आणि पहाटे केव्हातरी जात असे.

चौसोपी वाडे, ते कडीपाट आता इतिहासजमा झाले. भवतालच्या  सिमेंटच्या जंगलात आमच्या चिऊताईचे घरटे हरवले. त्यांना दिलासा देणारे आजोबाही कुठे राहिले नाहीत. घरटे कुठे बांधणार नी कसे? काड्या जमवायला झाडे तर हवीत. काळ्या भोर जमिनीत गवत उगवायचे, त्यात राहणारे जीवजंतू, उगाच कुठे तरी साचून राहिलेले पाणी, किंवा अगदी गळक्या नळातून टपकणारे थेंब,  पडवीत अंगणात सूप पाखडताना पडलेले दाणे, हे सगळे चिमण्यांचे विश्व.  सगळी इकोसिस्टीमच गायब झालीय. चिमण्यांनी जायचे कुठे? डार्विन म्हणतो बदला अथवा काळाच्या उदरात लुप्त व्हा. हे चिमण्यांना कसे सांगणार? आपल्याला कळते तर आपण आपले मार्ग बदलून जगा आणि जगू द्या असे का नाही म्हणत? या चिमण्यांनो, परत फिरा असे आपण कधी म्हणणार?



 

No comments:

Post a Comment