Monday, March 31, 2014

सुखी माणसाचा कुर्ता

आपल्याला आपले मळखाऊ कपडेच बरे पडतात. गेली कित्येक वर्षे आम्ही खादी ग्रामोद्योग भांडारातून कपडे घेत आलो आहोत. त्यांना प्रावरण असे म्हणणे तर सोडाच, वस्त्रे म्हणणेसुद्धा मानाचे ठरेल. दर एकदोन वर्षांनी खादी भांडारात जाणे होते. पूर्वीची खादी टिकत असे. किमान दोन निवडणुका तरी जात. आता एकाच निवडणुकीत "संपला अनुबंध, विरले बाजूबंद, उरल्या दशा, शोभे वर्मावरती रंध्र" अशी परिस्थिती.  निवडणुका जवळ आल्या, खादी घ्यावी म्हणून भांडारात शिरलो. दुकानातील पांढऱ्या साडीतील ब्रह्मवादिन्यांनी दुर्लक्ष करून आमचे स्वागत केले. आम्हांस स्त्रीवर्गाकडून नेहेमीच असा आदर प्राप्त होतो. आमच्या लग्नाच्या आधी, हिला पाहायला घरच्यांसोबत गेलो होतो तेव्हा आमच्या भावी सासूबाई माझ्याकडे पाहत आईला म्हणाल्या होत्या, अरे वा, त्यांनापण येऊद्या हं आत. ड्रायव्हर असला म्हणून काय झालं, मेलं माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवावं. आमच्या घराचं वळणच आहे तसं. आईला कमी ऐकू येत होतं म्हणून बरं, नाही तर त्या वळणावरच अपघात निश्चित होता. पुढे कांदेपोह्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत मी माझी नजर जमिनीवरून काढली नाही. हिच्या आईने मुलगा अगदी नम्र आहे हो असे उद्गार काढले. हिच्या मैत्रिणी फिदीफिदी हसत होत्या ते माझ्या नजरेतून सुटले नव्हते. त्या हसोत, पण हिनेपण हसावे? नकारच देणार होतो, पण आई म्हणाली तू हा असा, तिनेच नकार दिला नाही हे भाग्य समज. गांधीजींचे स्मरण करून अपमान गिळला आणि होकार दिला. पुढे मी हिला विचारले पण, तू होकार कसा दिलास? तर मला म्हणाली, तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं. हे ऐकून स्फुरण पावलेली छाती पुढच्या वाक्याने नॉर्मल झाली. म्हणाली, कोणतीही परस्त्री नजर वर करून आपल्या नवऱ्याकडे पाहणार नाही, हे स्त्रीचे सौभाग्यच नाही का?

मी धीर करून त्या ब्रह्मवादिनींस विचारले "यंदाच्या इलेक्शन साठी काही स्पेशल?" त्यावर चेहऱ्यावर स्मित वगैरे न येण्याची काळजी घेत एकीने एका दिशेने बोट केले. तिथे फळ्यावर लिहिले होते "धोतर सोडल्यास सर्व काही मिळेल." मी नकळत दचकून माझे कटिवस्त्र घट्ट धरून ठेवले. त्यावर ब्रह्मवादिनीने मान हलवत खुलासा केला "धोतरं संपली आहेत, बाकी सर्व उपलब्ध आहे. आम्हाला कमीत कमी शब्दात संवाद साधण्याची सूचना आहे. नवीन माल म्हणाल तर राहुल छापाचे कुर्ते आले आहेत.". मग प्रथमच मला नीट न्याहाळत म्हणाली, "पण ते जरा फ्याशनेबल लोकांसाठी आहेत. घेणारच असाल तर काढते.". यावर दुसऱ्या वादिनीने स्मितहास्य केल्याचा भास झाला. पाहिले तर तिचे डोके अजून "सकाळ" मध्येच होते. त्यांना कमीत कमी हास्य करण्याचीही सूचना असावी असा मी अंदाज बांधला. "सध्या पॉप्युलर आहे हा नग."  वादिनी पुढे सांगू लागली. आणि जीभ चावत म्हणाली "म्हंजे हा कुर्ता हो!" तिने एक दोन नग, म्हणजे कुडते काढून माझ्यासमोर ठेवले. नक्कीच फ्याशनेबल होते. बारीक हाताच्या छापाचे डिझाईन तसे आकर्षक वाटत होते. पण गळा जरा छोटा वाटला. मी तसे वादिनीला म्हणालो तशी म्हणाली सगळ्यांचीच डोकी काही मोठी नसतात, सगळे राहुल छाप तसेच बनवले गेले आहेत. सुखी माणसाचा कुडता म्हणतात त्याला. आणि तुम्हाला बसेल. तिच्या टोमण्याकडे मी दुर्लक्ष केले. मी तो अंगाला लावून पाहत असताना दुसऱ्या वादिनीने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. अरे वा! बहुतेक या कुडत्यात मी थेट राजबिंडा राहुल गांधी दिसत असणार. तर म्हणाली,"कृपा करून घडी मोडू नका. खादीची घडी एकदा मोडली की परत पडत नाही. कुणी घेत नाही मग." डोके पुन्हा "सकाळ"मध्ये गेले. मुकाट्याने मी तो विकत घेतला आणि घरी आलो. म्हटलं जरा बायकोसमोर शायनिंग मारू. आत जाऊन कुडता घातला आणि बाहेर आलो. बायको टीव्हीमधील समांतर जगातील सुखदु:खात पार बुडून गेली होती. शेवटी मीच म्हणालो,"अहो, मी घरी आलोय." बायकोने निरुत्साहाने माझ्यावर नजर टाकली. मी म्हणालो,"काय आहे की नाही राहुल गांधी सारखा?" तिने मला क्षणभर न्याहाळले आणि म्हणाली,"राहुलजी, बरं झालं आलात. जरा तीन शिट्ट्या झाल्या की कुकरखालचा ग्यास बंद करा." असे म्हणून "बडे अच्छे लगते है" मधले अजीर्ण झाल्यासारखा दिसणारा राम कपूर आणि ती थोर तपस्विनी प्रिया यांचे नष्टचर्य पाहण्यात गढून गेली. हिच्या चेहऱ्यावर "जगी सर्व सूखी असा कोण आहे" याचे उत्तर होते.

मी तो कुडता मग आमच्या इस्त्रीवाल्या भैयाला देऊ केला. तशी तो म्हणाला,"नही साहब! फिर राहुलबाबा बोलेंगे हम यूपी, बिहारवाले पंजाब महाराष्ट्र में भीख लेते है. आपही रख लो. और वैसेभी हमारा सर इसमेसे नही जायेगा साहब." सध्या तो कुडता आमच्या गोदरेजच्या कपाटात डांबराच्या गोळ्यांत पडून आहे.

 

Sunday, March 30, 2014

उभारू गुढी मानव्याची

मी रचतो पाया गुढीचा, माझ्या तृप्त समृद्ध प्रासादात
आणि सौधातून पाहतो त्यांना जगण्याचा प्रयत्न करताना
दिसताहेत ते सर्व मला उघड्या आकाशाखाली
जीर्ण वस्त्रे, पोट खपाटी, नजरेत पराभव कोंडताना..

गुढी ल्याली आहे भरजरी वस्त्रे, सांगते संपन्नता तुडुंब
आत्ममग्न मी, डोळेही बंद, भोगतो सुखाचे तरंग
जरी डोळे बंद तरी येते आहे कानी एक आर्त
नाही कमरेला वस्त्रे, त्यांना लज्जारक्षणाचीही भ्रांत

माझ्या गुढीखाली तेवतो खरे दिवा शुभ्रवात
नाही ज्ञानाचा प्रकाश, ना कणवेची ऊब येथे उरात
पाळतो परंपरा रूढी, अभिमान त्यांचा सांगतो
पण असल्याच रुढींखाली त्यांचा सन्मानही गाडतो

उभारायचीच जर गुढी तर उभारू मानव्याची
एका माणसाने दुसऱ्याला माणूस म्हणून स्वीकारल्याची..



  

मनाचे(च) श्लोक

।।श्री ।।

मना सज्जना आधि ठरवून घ्यावे
साव बनावे की सावज व्हावे
साव बनल्यास नीती सोडोनी द्यावी
इतर सर्व येरूंनी काष्टी "आम"ची धरावी ।।१।।

ध्यान देऊनी ऐकावे सर्व जनांनी
बोल येथ बोलले खुद्द स्वामी अरविंद यांनी
मेळ येथ घातला सर्व आमजनांचा
करू समूळ नाश कमळ आणि हाताचा ।।२।।

स्वामी म्हणती प्रथम करावी योग्य वेषभूषा
घट्ट धोतराची कास आणि मस्तकी आमरेषा
स्वामींच्या मस्तकी मोरपीस,  भोवती वृद्ध गोपी
मेधा म्हणे मी पण, घालीन आम टोपी ।।३।।

पुढे म्हणती शिष्यहो, लक्ष्य आपुले दिल्ली
हसती दीक्षितकुलोत्पन्न शीला, उडविती खिल्ली
आम आदमी असे म्हणोन राहती खुशालचित्ती
प्रात:प्रात:काळी बातमी, गेली दिल्ली, राहिली आम्लपित्ती ।।४।।

उधाणला वारू स्वामी स्मितहास्य करिती
शिष्यजने आले बळ विकट हास्य दाविती
रामराज्य आलेच गा, उद्गारले स्वये अरविंद
नगरी नृत्य गायन, सकल जन धुंदधुंद ।।५।।

हर हर शिंकली माशि, जाहला दुग्धमक्षिकापात
अडविले लोकपाल दुष्ट कमळ आणि हात
भृकुटी ताठिल्या, स्वामींस जाहला अतिक्लेश
धरले धरणे, लोटले अंग धरणीवर, म्हणती सर्वनाश ।।६।।

उभा ठाकला समोरि नमोसुर होवोनीया दत्त
ग्रासिले कमलपुष्पही, संघराष्ट्रही बलहत
स्वामि म्हणे हडबडू नका गडबडू नका
करता आमस्मरण, होईल वाणी हा फुका ।।७।।

म्हणे अरविंद आता येकच डाव
जनेच करावा कमळहाताचा पाडाव
उडवा फेसबुकावर धुरळा, वा टीव्हीवर खुशाल बरळा
जनताच होईल वामनपाद, तुडवाया या हस्तकमळा ।।८।।

इतिश्री 'आम'दासकृतं संकटविरचनं श्रीअरविंद स्तोत्रं संपूर्णं ।।






 

Saturday, March 29, 2014

महिमा आमस्मरणाचा!

पर्वा श्रीसमर्थ केजरूस्वामी यांची निर्गुण निराकारी शाकाहारी सालस करुण मूर्ती टीव्हीवर पाहिली. प्रथम उठलो आणि टीव्हीला साष्टांग दंडवत घातला. यापूर्वी फक्त रामायण लागत असे तेव्हाच आम्ही असा दंडवत घालत असू. व्हिक्स आणि बाम यांचा दोहोंचा संमिश्र परिमळ आसमंतात दरवळला असा भास झाला. ही नक्कीच स्वामीची कृपा ! प्रसाद झाला आपल्याला! पुन:श्च पालथा पडलो. सौ म्हणाली अहो असं काय करता? साधा निरलस माणूस तो. मी म्हणालो, खामोश! प्रत्यक्ष आम आदमी आहेत ते, साधा काय म्हणतेस? मनात आणलं तर टीव्हीवरल्या सगळ्या दोनशे च्यानेलवर एकदम एकाच वेळी दिसतील! सौ गप्प बसली. हीसुद्धा स्वामींचीच करणी याची खात्री पटली. एरवी आमचे कलत्र असे चूप बसणे शक्य नाही. आणि आम्हालाही तिला असे खामोश म्हणणे शक्य नाही.

 पुण्यकोटी स्वामींवरची आमची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वामींच्या चर्येत  साम्य नसले तरी त्यांची दिनचर्या पाहून आम्हाला रामदास स्वामींची आठवण होते. स्वामींनीही सर्कारी नोकरीच्या बोहोल्यावर चढल्यावर "सावधान! आगे करप्शन हय" असे शब्द कानी पडल्यावर तडक पलायन केले आणि दिल्लीच्या तख्तावर पोचले. पुढील उणेपुरे एकोणपन्नास दिवस दिल्लीमध्ये पुरश्चरण केले आणि तिथूनही पलायन केले.  प्रन्तु या तपश्चर्येच्या जोरावर त्यांना प्रसिद्धीसिद्धी तर प्राप्त झालीच, वरती संचारसिद्धीही प्राप्त होऊन स्वामी दिल्लीत अंतर्धान पावून गुजरातमध्ये अवतीर्ण होऊ लागले. तिथून एकदम अमेठीत. संचारसिद्धीची ब्याटरी डाऊन झाल्यास अवकाशयानाची प्राप्ती होऊ लागली. पण स्वामी नाममहात्म्याचे महत्व मानतात. आजही स्वामी रात्रंदिन नमो नमो असा जप करत अस्तात.

सकल विद्याभूषित नटराज जेकि परफेक्शनिस्ट खान वल्द हुसेन खान, यांनी सध्या टीव्हीवरून निरलसपणे प्रचंड देशभक्ती कशी करावी याचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता हे सगळे कसे करावे हेही ते सांगतात. तेसुद्धा स्वत: अत्यंत कमी मोबदला घेऊन. दोन दोन लग्ने, वर्षातून दोन तीन सिनेमे, मधूनच भूमिगत होऊन भलतीकडे अवतीर्ण होणे असे चमत्कार स्वत: नटराजांनी करून दाखवले आहेत. तेव्हा हा नटराज "दिसतो कसा आननी" असे कुतूहल केजरुस्वामींस झाले, आणि स्वत: स्टुडिओत अवतीर्ण झाले. योगायोगाने तेथे पपू (पक्षी: परम पूज्य ) मठाचे अधिकारी प्रात:स्मरणीय कपिलकुमार आणि श्रीराम वानर सेनेचे अधिपती पुण्यश्लोक सुधांशुमहाराज यांचेही आगमन झाले होते. हा अमृतयोगच म्हणायला हवा. नटराजांनी या तिघांस थेट प्रश्न केले. प्रश्न विचारताना नटराजांच्या चेहऱ्यावर आम व्याकुळता होती, आम धाडस होते आणि आम संताप. प्रश्नांची उत्तरे ऐकताना ज्या काही कोलांट्या उड्या पाहायला मिळाल्या त्या आम्हास थेट आमच्या बालपणात घेऊन गेल्या. सर्कशीत काय तुफान उड्या मारायचे त्याकाळी. त्या उड्या आणि भुभु:कार पाहून वाटले, ज्या प्रमाणे वानराची शेपूट जाऊन त्याचा नर झाला, तसेच या कपिलमधील "ल" चा विलय होऊन कपि होईल. सुधांशुमहाराजांनी ध्यान लावले. आज आपले मौनव्रत आहे असे पाटीवर लिहिले. हा कपि जे म्हणेल तेच आमचे म्हणणे असेही लिहिले. सुधांशु महाराज प्रेमाने कपिलकुमारांस कपि असे संबोधतात असा खुलासाही केला. मग, पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, अशा सकल संपूर्ण रूपात, साक्षात श्रीसमर्थ केजरूस्वामी आम्हास दर्शन देत्साते झाले. आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. मग सुरु झाला श्रीसमर्थ केजरूस्वामींच्या वाणीचा प्रपात. धबाबा ओघ चालिला. स्वामींनी लोकांस बजावले, मी निमित्तमात्र, करते करविते तुम्ही. तुम्हीच जर नामस्मरण केले नाहीत तर हा स्वामीही काही करू शकणार नाही. मग हळूच वदले, नमोचे नको, "आम"चे करा. असे बोलून अत्यंत प्रेमाने कॅमेऱ्याकडे पाहू लागले. आम्ही स्वामींच्या त्या प्रेमकटाक्षाने सद्गदित झालो, पवित्र झालो. अष्टसात्विक भाव जागृत झाले. कुंडलिनी जागृत झाली. आमच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वामी! धन्य! तुम बिन कौन बतावे बाट! स्वामीशिवाय वाट कोण लावणार?

हल्ली व्हिक्स किंवा बाम, आम्ही घरात दोन्ही ठेवत नाही. स्वामींचा नटराजांसोबत (नटराजांच्या नकळत काढलेला, हो, त्यांचा रेट "आम" जनतेला कुठला परवडायला!) काढलेला आम फोटो भिंतीवर लावला आहे. देव्हाऱ्यात आम टोपी ठेवली आहे. त्याकडे नुसते पाहिले तरी डोकेदुखीबरोबर कळिकाळाचाही विसर पडतो. पण अभिषेकाच्या दृष्टीने अजून गजाननाची मूर्तीच बरी पडते. आम टोपीवर अभिषेक झाला तर ती आमच्या तळातून फाटलेल्या भाजीच्या पिशवीसारखी दिसते. तेव्हा, सतत आमस्मरण सुरु आहे. हिने चांगली चिंच गूळ घातलेली आमटी जरी केली तरी त्यात स्वामींची धूतवस्त्रयुत मफलरमंडित चतुराक्ष आम छबी दिसते. पण हल्ली ही तक्रार करू लागली आहे, झोपेत नेहमी आम आम असे करत आवंढे गिळत असता. मेलं  सोसत नाही तर खायचं कशाला म्हणते मी अरबट चरबट? मी खुदाई खिन्नतेने तिच्याकडे पाहतो. स्वामी, कधी हिला साक्षात्कार देणार?

 

Friday, March 28, 2014

नरेची केला नर किती हीन

डेन्मार्क या देशाची ओळख सभ्य, सुसंस्कृत अशी होती आजवर. परंतु सध्या अशा काही घटना या देशात घडल्या आहेत की या प्रतिमेला तडा जातो की काय असं वाटू लागलं आहे. अर्थात, एका मोजक्या समूहाच्या वर्तणूकीवरून सर्वांनाच धारेवर धरता येणार नसलं तरी देश म्हणून नैतिक जबाबदारी तरी नक्कीच येऊन पडते. तेव्हा, माणूस म्हणून सुसंस्कृतपणाचा उच्चतम स्तर जिथे गाठला गेला आहे असं म्हणतात अशा या देशातील एका प्राणिसंग्रहालयानं नुकत्याच काही सिंहाना कायमचं झोपवलं. आणि कारण काय म्हणे तर वांशिक शुद्धता टिकवण्यासाठी!

त्याचं असं झालं, या प्राणिसंग्रहालयात सिंहाचे एक चौकोनी कुटुंब होते. नर, मादी, आणि त्यांचे दोन बछडे. सर्व काही गुण्यागोविंदाने (माणसाच्या दृष्टीने, सिंहांच्या दृष्टीने ती कैदच) चालू होते. तितक्यात या संग्रहालयाच्या प्रशासनाने एक नवीन तरुण सिंह आणायचे ठरवले आणि तिथे सुरु झाली ही चित्तरकथा. या नरोत्तमांचा बुद्धिविहार सुरु झाला. तरुण सिंह बछड्यांवर डोळा ठेवतात आणि संधी मिळाली की त्यांना मारून टाकतात हा निरीक्षणात्मक अनुभव.  मग या नरपुंगवांचे विचारमंथन असे की, प्रौढ सिंहाचा आपल्याच संततीबरोबर संकर होऊ शकतो, आणि नवीन आलेला तरुण सिंह बछड्यांना मारून टाकू शकतो. यावर या थोर महाभागांनी थोर उपाय शोधून काढला तो म्हणजे प्रौढ सिंह, सिंहीण आणि त्यांच्या बछड्यांना मारून टाकणे आणि तरुण सिंहाचा राज्याभिषेक करणे! चक्क गोळ्या घालून मारून टाकले त्यांना! हिटलरने जे काही घृणास्पद कर्म केलं तेसुद्धा असल्याच वांशिक शुद्धीसाठी ना? त्यातून काहीच शिकलो नाही आपण.

प्राणिसंग्रहालय ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. कोट्यवधी वर्षांच्या इव्होल्यूशन प्रक्रियेत केवळ एक अपघात म्हणून आपण निर्माण झालो. नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताप्रमाणे धडपडत इथवर येऊन पोचलो. प्रजनन ज्याचे होते तो जीव अशी व्याख्या विज्ञानानं जीवनाची केली, पण ज्याला आत्मजाणीव आणि चराचराची अंशत: का होईना पण जाणीव तो मानव अशी आपली ओळख निर्माण झाली. हे विश्वाचे पडलेले प्रचंड कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारा प्राणी असे आपण. त्या कोड्याचा अंशात्मकही उलगडा आपल्याला अजून झालेला नाही. असे असताना माणूस देव (पक्षी: निसर्ग किंवा जी काही चराचर नियंत्रित करणारी प्रणाली म्हणा)  बनून या जीवसृष्टीच्या प्रक्रियेत ढवळाढवळ का करीत आहे? प्राणिसंग्रहालये ही ढवळाढवळ आहे. केवळ आपल्या करमणुकीसाठी अशी ढवळाढवळ करण्याचा आपल्याला हक्क नाही. किंबहुना आपण कशावरही हक्क सांगू शकत नाही. आपल्याला एक अतिशय दुर्मिळ अशी वस्तू मिळाली आहे ती म्हणजे आत्मजाणीव आणि कुतूहल. वैश्विक काळाच्या व्याप्तीशी तुलना करायची झाली तर आपले आयुष्य म्हणजे फुलपाखरासारखे. काही संवेदना नसलेल्या कोषातून बाहेर यायचे, तीन दिवस विस्फारलेल्या डोळ्यांनी या सुंदर विश्वात बागडायचे आणि शेवटी मातीत मिसळून जायचे. ज्या अणुरेणूनी शरीर बनले होते ते पुन्हा कधी एकत्र येऊन अशी आत्मजाणीव असलेला मी बनेन का? शक्यता अगदीच कमी किंवा नाहीच. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. शास्त्रीय दृष्ट्या ते शक्य नाही. जिथे जाणीव-नेणीव-आठवणींची सलगता नाही तिथे पुनर्जन्म असू शकत नाही. हा जन्म संपला की सगळे संपले. मग जोवर जाणीव आहे तोवर मी कुतूहलभरल्या अचंब्याने जग बघणार, त्याचा शोध घेणार, या सगळ्या पसाऱ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार की आत्ममग्न राहून जन्म वाया घालवणार?
 

Thursday, March 27, 2014

जैंतराव म्हंजे भारीच

सहकाराचं सगळं कामच आवगाड होऊन बसलंया. पूर्वी किमान बिना सहकार न्हई  उद्धार म्हनायचे. आता सहकाराला गेलं तर आदुगर उद्धार होतो आयमायवरनं, मग काय काम हाय इचारत्यात. आमचं जैन्तराव म्हंजे येकदम म्हंजे फुल सहकारी होतं पूर्वी. कदी पन सहकार म्हटलं तर हातात गिलास असला तरी खाली ठीऊन उभं होनार. व्हय, आजूनपन सक्काळी म्हस दारात पिळून काडलेल्या दुदाचा गिलास प्वाटात गेल्याबिगर दिस चालू होत न्हाय. सोता खरं येवढं इंजिनेर झालेलं पन, बापू म्हनले जैन्ता, एवढी सहकाराची गिरन हुबी झाल्या सांगली कोल्लापुरात, आपन फुडं नेली पायजेलाय. जैंता जरा हिरमुसलाच झालाव्हता. तेला इंजिनावर काम करायचं व्हतं म्हनून तर इंजिनेर झाला आसं सगळी म्हनायची. काई असो पैलेपासूनच तेला तंत्रध्याणाची लैच आवड. बापूंनी येवढा प्रचंढ सहकार करून साकर कारकाना हुबा क्येला आनि म्हनाले जैंता, आता तू फुडचा सहकार करायचा आनि सोता येकदम निजधामालाच ग्येले. मग कसलं तंत्रध्याण आनि काय. एकदम राजकारनातच पडलं आन डायरेक वित्तमंत्रीच झालं. दिसायला बी हिरो होतं. चांगलं उंच, छपरी मिशीबी ठेवल्याली. गॉगल घाटला की येकदम राजेशखण्णाच दिसायचं. मग मंत्री झाल्यावर मग कशाला सोता काय करायला मिळतंय काय. फोन बी शेक्रेटरी उचलनार, गाडी बी डायवर चालवनार. कुटंच वाव न्हाई ओ तंत्रध्याण वापरायचा. कायम सगळी टोपीकुमारं बसल्याली भोवती. तेंची तंत्रध्याणाची पोच म्हंजे ज्यास्तीतज्यास्त सातबाराचा उतारा काडायला लागनारं झेरॉक्ष मशीन. सादं फोनवर बोलतानासुद्दा शंबर वेळा हालो हालो करत बसनार आन नंतर म्हननार, च्या बायली,काय ऐकाया यीना झालंय, मशीनच खराब है. जैंतराव खिन्न होऊन बगायचं सगळ हे. पन ह्ये सगळं आसलं तरी सहकाराची कामं येकदम कडक होती. आमच्या कारबारनीच्या भावाचं, आमच्या दाजींचं काम घ्येऊन गेलतो. दाजींना कर्ज पायजेल होतं. ब्यांकेत जानार होते. मी म्हणलं, ह्या! आहो आपली पतसंस्था कशासाठी हाय मग? आन ब्यान्केचं कर्ज म्हंजे परत कराया लागतंय. तर सांगायचा मुदधा ह्यो की फोन न्हाय, ते कॉम्पुटरचं मशीन न्हाय काय न्हाय. पतसंस्थेच्या चेरमनला आपल्यासमोर सांगावा आला, काम करून टाका.

पन आता ह्ये मोबाईल आल्यात तेनी सगळी कामं थंडावल्यात. जैंतराव आता सारकं ते फेसबूक का काय आसतंय म्हनं थितं असत्यात. आजवर कद्दी खाली माण घाटल्यालं मी बघिटलं न्हवतं त्येस्नी, पन आता कायम डोकं खाली फेसबूकात आसतंय. च्याट करतोय म्हणत्यात. आमी हितं चाट. आमी सांगायलोय हितं, आहो येवडी कामं पडल्यात, आर्थसंकल्प मांडायचाय, विलेक्शण तोंडावर आलीया, सहकाराचा उद्धार करायचाय, पन एक नाय आन दोन नाय. म्हनले थांबा हो, हितं मोबाईल वर टाईप करायलोय दोघांशी, मायला ह्यो इमोटीकॉन कुटं सापडंना झालाय. मदीच फोन उंच धरुण सोताचा एकट्याचाच फोटो काडला, म्हनले अपलोड करतो. फुडच्या दोनच मिणटात चारशे लाइक्स आले म्हनून सांगत होते. काय लिवत्यात ते बगाव म्हनून वाकून पाह्यलं तर इंग्लिश होतं. "LOL, rily, ikr" आसलं कायबाय लिवलं होतं. म्हटलं आसतील कसली तरी गवरमेंटच्या डिपार्टमेंटांची नावं. तसंच थांबलो आन काय. तीनदा चा पन झाला. पन जैंतराव कामाला येकदम कडक, येकदा हातात घ्येटलं की पुरं करूनच सोडनार. म्हनून ते कवा हातात घ्येत्यात ते बगत बसलो. जरा येळानं म्हनाले चाट करता करता अर्थसंकल्प पन करून टाकला! आमी परत चाट! म्हनले अर्थसंकल्पाचं ते काय हो, ते हून जाईल. पन हितं दोन हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्यात त्या तशाच पडल्यात की हो, त्याचं काय करता? ते कम्प्लीट व्हायला पायजेलाय. आमी मान डोलावली आणि गुमान भायेर आलो. सहकाराचं आता खरंच आवगड हाय. 

Wednesday, March 26, 2014

गाभाऱ्यातील देव

अलीकडेच माझ्या एका मित्रानं एक विधान केलं होतं. दक्षिणेतील एका प्रसिद्ध मंदिरात त्याला लुंगी नेसल्याशिवाय प्रवेश देणार नाही असं बजावलं गेलं होतं. मित्राचं असं म्हणणं होतं की देवाच्या दारी जायला हा काच का? आता दक्षिणेत कर्मकांड अजून टिकून आहे हे खरं असलं तरी मला त्याचं म्हणणं बरोबर वाटतं. त्याच्या या विधानावर दुसऱ्या एकानं असं म्हटलं की तुम्ही जिथे नोकऱ्या करता तिथे वेषभूषेची एक किमान अपेक्षा किंवा अट असतेच की नाही? मग देवळाच्या पुजाऱ्यानी असे केले तर बिघडले कुठे? या विधानाने मी तरी बिघडलो. आज अनेक प्रसिद्ध मंदिरे एखाद्या धंद्याप्रमाणे चालवली जाताहेत हे खरं आहे. त्यामागे किती आध्यात्मिक भावनेने भारलेले लोक आहेत हे आपण जाणून आहोत, त्यामुळे ते तसे करणारच हे आपण मानून घेतले आहे. पण सर्वसामान्य माणूसही ते योग्यच आहे असे जेव्हा मानायला लागतो, तेव्हा कुठे तरी काही तरी चुकते आहे, मोडून पडते आहे असे वाटायला लागते.

ग्लोबलायझेशनमुळे जी बाजार संस्कृती आली तिने अशी मानसिकता निर्माण केली असेल का?  पैसे असतील तर सर्व मिळेल, पैसे टाकले तर सर्व मिळालेच पाहिजे या पासून, अमुक अमुक पाहिजे असेल तर ते मागतील ती किंमत द्यायलाच हवी, त्यात वावगे ते काय अशा प्रकारची एक मानसिक प्रवृत्ती होऊ घातली आहे. मग अशा बाजार संस्कृतीचा राग धरणारे आपले संस्कृतीरक्षकही शक्य तिथे त्याचा विरोध करू पाहतात. तुम्ही कंपन्यांचे गुलाम आहात, त्या जे सांगतील ते तुम्ही बिनबोभाट करता, पाळता. मग, आमची एवढी पुरातन संस्कृती काही नियम जर राबवत असेल तर त्याला तुमचा विरोध का? मी संस्कृतीरक्षण ही गोष्ट समजू शकतो, पण या सर्व सव्यापसव्यात, संस्कृती कशासाठी निर्माण झाली याचे आपल्याला भान राहिले नाही असे वाटू लागते. आपण देवळात का जातो हे विसरून बसलो आहोत. सहासात तास रांगेत उभे राहून झाल्यावर एखादा बडवा तुमचे डोके धरून विठ्ठलाच्या पायावर बडवतो, ती कळ जिरायच्या आतच आपण गाभाऱ्याच्या बाहेर असतो, आपण घातलेला हार, चढवलेला नारळ मागील दाराने पुन्हा विक्रीस जातो. आपण काय करायचं हे तो बडवा (इथे 'भ' वापरायचा मोह महत्प्रयासाने टाळला आहे) ठरवतो.  हे सर्व आपणच सुरु केलं आहे.

मी देव आणि दैव दोन्ही संकल्पना ठाऊक नसण्याच्या आणि असण्याच्यासुद्धा वयामध्ये कित्येक तास देवळात घालवले आहेत. कोकणात गूढरम्य देवळे भरपूर. छोटीशीच पण धीरगंभीर. समोर दीपमाळेचा स्तंभ. स्वच्छ, शेणाने सारवलेले अंगण. तांबड्या चिऱ्याच्या अथवा मातीच्या भिंती. प्रशस्त मंडप. भरपूर लाकडी खांब. त्यावर आडव्या लाकडी तुळया. थंडगार गुळगुळीत फरशी. उन्हाळ्यात छान पसरून द्यायला कसं छान वाटायचं. देवळाच्या आवारात चाफ्याचं झाड तर असायचंच. चाफ्याचा छान सडा पडलेला असायचा, त्याचा मंद सुवास. गाभारा अंधाराच असायचा. तो गूढ अंधार मग गंभीर करून जायचा. अनेक वेळा गाभाऱ्यात न जाता मी बाहेरच खांबाला टेकून बसायचो. मंडप शीतल असायचा. मधूनच वाजणारी घंटा, स्तोत्र म्हणत प्रदक्षिणा घालत देवाकडे काहीतरी गाऱ्हाणं  घालणाऱ्या कुणा बापड्याच्या पावलांची चाहूल, दुरून तरंगत येणारे पुजाऱ्याचे  खर्जातील मंत्रोच्चार, अभिषेक करताना होणारी घंटेची नाजूक किणकिण, प्राजक्ताच्या फुलांचा दरवळ, त्यात मिसळलेला चंदनाचा सुगंध, भस्माचा, कापराचा गंध. या व्यतिरिक्त कसलाही आवाज नसे, वास नसे. काळ जणू थांबल्यासारखा वाटे. वाकून गाभाऱ्यात पाहिलं तर मूर्तीचे ते लख्ख डोळे दिसायचे. हिंदू धर्मातील सर्वच देवदेवतांचे डोळे असेच. त्या दृष्टीमध्ये सुष्टाला धीर आणि दुष्टाला दम दोन्ही असायचा. तिथे काही शब्दांची देवाणघेवाण नसे. त्याची गरजच नसायची. एक विलक्षण मनाची शांतता लाभायची.  देव आहे की नाही मला माहीत नाही, पण हे असे सगळे अनुभवणे, त्यातून उभारी मिळून नव्याने जगाला सामोरे जाण्याचे बळ देणे, हे सर्व देऊळ जरूर करते. देवळाचे नुसते असणेच पुरेसे असते. आपला सहिष्णु हिंदू धर्म सगळ्याची मुभा देतो. तो गाभाऱ्यात जा म्हणत नाही आणि नकोही म्हणत नाही. कुण्या बापड्याचा दीसु त्याने कसा गोड करावा हे ज्याने त्याने ठरवावे. तस्मात, लुंगी नेसून जावे अथवा धोतर, गाभाऱ्याशी संवाद व्हावा हीच सदिच्छा.

Tuesday, March 25, 2014

साहेब लई बारामतीचा!

कालच्या संध्याकाळला अड्ड्यावर गेलो तर बबन बोलला, येशा,आपन आता खुल्लमखुल्ला नडनार कमळाला आनि हाताला. आपले साहेबच बोलून गेले ना राव कालच्या मिटिंगमदी, तुमी व्हा फुडं आनि ठोका शिक्का डबल. आमी म्हनलं मायला आपन तर पहिले छूट तेच करनार हुतो. इतके दिवस दादा सोडून द्यायचे आसलं काहीतरी आनि म्हनायचे कायपन करा आपलं घड्याळ तेव्हडं टिकटिकत ठ्येवा, साहयबांच मी बघतो. आता साहेबच मोकाट मग आपन तर लय झोकात. मी म्हनलो आरं पन गावाकडं मतदान कराया नगं का? तर बबन्या म्हनतो कसा  अरे येडा का खुळा रं तू! इत्की साल दादांचा निष्ठावंत का म्हनत्यात त्यो कार्यकर्ता हायस नव्हं तू? काय शिकलास रं ? नुसताच माथाडी राहिलास रं बाबा. अरे साहेब लय बारामतीचा हाय. साहेब जेव्हा येक म्हनतात तेव्हा आपन निष्ठावंतांनी डबल येक म्हनायचं आनि घुसायचं. आनि पोलिस रं? ती शिप्पुरडी काय करत्यात रं आम्हास्नी. आबा बघून घेत्याल त्येंचं ते. बाकी साहेब आलं की आबा तमाखूची गुळनी धरून बसत्यात म्हन, काय करत्याल ते करा. आरं सोडली नव्हं काय  तमाखू त्येनी? राजकारनी लोक कवा खुर्ची आणि घान सवयी सोड्त्यात काय रं? खुर्चीवर बसायचं आनि टेबलाच्या खनात पिचकारी हानायची, कोन बघतंय! खन नसला तर खात्याचा शेक्रेटरी असतोयचं की हुबा थितं.

अरं तिच्या मायला, आत्ता ट्यूब पेटली बघ. दोन तीन सालाखाली दादांनी सांगितलं व्हतं मुंबैतपन मतदार म्हनून रजिस्टर कराया. आपन म्हणलं आरं म्या अदुगरच गावाकडं नोंद करून आलोय. तर दादा म्हनले उगाच तुझं माथाडी डोकं चालवू नगस, इचार करायचं काम माजं, वज्याचं बैल व्हायचं काम तुजं. आपन मंग काय बोललो न्हाई, गुमान रजिस्टर करून आलो. दादा पन भैताडच बग. आता हे आसलं आडवळनी काम कशाला रं? दोन पाच सालाखाली आपन बिनइरोध जितलो हुतो त्ये काय मतदान करून व्हय रं? रातोरात उचलला व्हता त्या मारत्याला. म्हनं निवडनूक लडवतो. आन न्हेऊन टाकला अलिबागला बंगल्यात. पन दादा म्हणलं होतं शेवा करा त्याची, हवं नको बघा. २ खोका, येक डीसपीची कार्टन आनि डायरेक वर्सोव्यातनं आनलेला माल. येकदम जंक्शान तयारी हुती.  हा गडी घुश्श्यात व्हता. पन २ डीसपी आत गेल्यावर थंड झाला व्हता. शिन्मातली कसली कसली गानी म्हनत होता. आपली पोरं लई हासत हुती, मज्जा बगत हुती. वर्सोव्यातनं आनलेली आयटम तर याचाच आयटम डान्स बगून ग्येली. मारत्याला जाताना २ खोकी दिली तेवा पन गडी टाईटच हुता. डुलत डुलत सलाम क्येला दादान्ला आन म्हनतो कसा, सायेब! पुन्ना कवा गरज लागली तर सांगा, पुन्ना हुबा होतोय बगा. दादा म्हनले सद्द्या तरी दोन पायावर हुबा ऱ्हा, फुडच्या निवडनुकीचं फुडं बगू. आनी हो, येव्हढं प्यालायास, जाताना त्येवढं आमचं धरन भरून जा की रं, लई उपोषणं करायल्यात लोकं. दादा पन ना, कदी जोक मारतील काय सांगावं. त्ये मारत्या पन आसं भाद्दर, हो म्हनलं आनि दारातल्या मोगरीच्या झुडपाला हिरवंगार करून ग्येलं बग. आता आशी पारंपारिक का काय म्हणत्यात तशी अज्जात कानूनला धरून हासत हसवत निवडणूक लढायची त्ये सोडून ह्ये असलं डबल शिक्कावालं राजकारन का करायचं रं?

पन येशा, साहेबांनी असं ज्याहीर सांगाया नगं हुतं बग. आता ती कमळा आन त्यो अवलक्षणी हात ह्येच करतील बग, मंग परत त्योच हिशोब की रं. मरू दे, तू क्वार्टर काड आपली.

 

Monday, March 24, 2014

कथा विज्ञानकथेची

विज्ञानकथा कशासाठी? निखळ विज्ञानच का नाही? सर्वसाधारणपणे विज्ञानाचा तिटकारा होतो किंवा किमानपक्षी त्याकडे दुर्लक्ष तरी केले जाते. आपण विज्ञानकथा मात्र  आवडीने वाचतो. पण कथेतून तरी ज्ञान होते का? तसे पाहिले गेले तर विज्ञानाला कल्पनाविश्वाचे वावडे आहे. प्रत्येक गोष्ट ही निरीक्षणाच्या आणि सिद्धांताच्या चौकटीत बसली तरच ती विज्ञानात बसते.

या सर्व जगत मंडळाच्या वयाचा विचार केला तर मानव जातीचे वय नगण्य आहे. एवढ्या कमी वयात आपण बऱ्यापैकी प्रगती केली आहे असे म्हणावे लागेल. परंतु आपले ज्ञान हे अगदी तोकडे आहे. विश्व एवढे प्रचंड आहे, अंतरे मनातीत आहेत. आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला सुमारे चार वर्षे लागतात! आपल्या आकाशगंगेचा व्यास आहे 30,000 प्रकाशवर्षे! आपण इतक्या अवकाश प्रवासाचा अजून विचारसुद्धा करू शकत नाही. पण आपले कुतूहल आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. आपली जडणघडणच अशी आहे की आपण सतत "का?" असे विचारत असतो. एखादी गोष्ट गूढ असेल, आकलनापलीकडे असेल,  तर त्याची आपल्याला भीती वाटते, आणि मग जे काही तोकडे ज्ञान आपल्याला आहे त्यात आपण त्याचे उत्तर शोधू लागतो. संशोधक नेहेमी म्हणतात की विज्ञानाला पुरावे आवश्यक आहेत. निरीक्षणात्मक कसोटीवर घासून पुसून घेतल्याशिवाय विज्ञान कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही.  जिथे आपले ज्ञान तोकडे पडते, जिथे पुरेसा निरीक्षणात्मक डेटा उपलब्ध नाही तिथे मग कल्पनाशक्ती वापरावी लागेल. त्यातूनच विज्ञानकथेचा उगम झाला असावा.

मराठीमध्ये विज्ञानकथा हा विषय तसा नवा नाही. मला पूर्वीपासून विज्ञानकथा किंवा त्याहीपेक्षा गूढकथांचे आकर्षण होते, अजूनही आहे. नारायण धारपांपासून रत्नाकर मतकरींच्या कथेपर्यंत सर्व साहित्य मी वाचायचो. जयंत नारळीकर उत्तम विज्ञानकथा लिहायचे, लिहितात. पण तुलनाच जर करायची झाली तर पाश्चात्त्य संशोधक लेखकांनी ज्या पद्धतीच्या कथा लिहिल्या तशा मराठीमध्ये आढळल्या नाहीत. आर्थर क्लार्क, कार्ल सागान, स्टीफन बॅक्स्टर  किंवा आयझॅक अॅसिमोव्ह यांनी अप्रतिम विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिल्या. आर्थर क्लार्क यांनी लिहिलेल्या "रामा" कादंबरीमालिका वाचताना मी अक्षरश: थरारून गेलो होतो. या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यातून कुठून तरी आपल्या सौरमालिकेच्या दिशेने येणारे ते गूढ अवकाशयान, त्याचे नुसते असणेच संपूर्ण मानवजातीला "आपण एकटे नाही आहोत" याची जाणीव करून देते. मग तिथून सुरु होतो तो वाचकाचा अंतराळप्रवास, प्रत्यक्ष त्या अंतराळयानात आपण राहू लागतो. थोडीथोडकी नव्हे तब्बल १०० वर्षांचा काळ या कादंबरीत आला आहे. संपूर्ण कादंबरीत कुठेही ज्ञात विज्ञानाला सोडून क्लार्क भरकटलेला नाही. अर्थात काही ठिकाणी कल्पनाशक्तीचा वापर अपरिहार्य ठरतो. उदाहरणार्थ -  विश्वात कुठेतरी एखाद्या सौरमालिकेतील ग्रहावर जीवसृष्टी कशी असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो.  पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या मूलभूत तत्वांपासून निर्माण झाली, विश्वात दुसरीकडे कदाचित (किंवा नक्कीच) दुसऱ्या पदार्थांपासून निर्माण झालेली असू शकते. शिवाय पृथ्वीवर इव्होल्युशन ज्या प्रकारे झाली (नॅचरल सिलेक्शन), ती पद्धत विश्वात सगळीकडे असेल याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे अशा जीवसृष्टीचे वर्णन करताना कल्पनाशक्तीच वापरावी लागेल. अंतराळप्रवास पुढे कधी तरी सोपा नक्की होईल, पण आज तरी तो नाही. अशा वेळेस क्लार्कची ही कादंबरीमालिका मला अंतराळप्रवासाला घेऊन जाते. असा अनुभव मायमराठीतील एखादी विज्ञानकथा किंवा कादंबरी मला देईल का? बाकी कार्ल सागान वर एक वेगळा लेख लिहावा लागेल. ते पुन्हा कधीतरी. इत्यलम.
 

Sunday, March 23, 2014

जाणता राजा आणि अजाण प्रजा

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा. राजा जुना,जाणता, ज्येष्ठ, मुत्सद्दी आणि असंच बरंच काही. प्रजा जशी असायची तशीच. गांजलेली, रडवेली, टाचा घासत जगणारी. पण जगणारी. जगायलाच हवं. मुलांच्या तोंडात घास तर हवा, थंडीत अंगावर घालायला ठिगळे जोडलेलं का होईना, पांघरुण तर हवं. कारभारणीच्या अंगावर धडुतं तरी हवं. तर प्रजा अशी जगण्याच्या खटपटीत. नगरीला एक प्रधानसुद्धा. उतलेला मातलेला. अरबट चरबट विनोद करणारा. तोच दरबार भरवायचा. राजानं त्याच्या उमेदीच्या वयात भरपूर पराक्रम केलेले. थोरल्या महाराजांच्या पठडीत आपण तयार झालो असं हा राजा सगळयांना सांगायचा. पण वेळ आली तशी त्यांचा घात करून आपण गादीवर बसलो हे उघड गुपित कुणाला उच्चारायला द्यायचा नाही. राजाचं कसब असं की जनता ते त्याचं कर्तृत्व मानू लागली होती. राजकारण असंच करायचं असतं असंच प्रजेला वाटू लागलं होतं. जाणता राजा स्वतःला राजा म्हणवायचा नाही. मी साधा शेतकरी, या देशातील ७० टक्के प्रजा शेतकरी, त्यांचे भले केवळ मलाच कळणार असं त्याला वाटायचं. म्हणून त्यानं कृषी खातं पण आपल्याकडे ठेवलेलं. प्रधानानं एकदा राजाला विचारलं पण, महाराज आपण आता कष्ट का घेता? त्यावर राजा छद्मी हसून म्हणाला होता, ते कृषी खातं आहे, योग्य प्रकारेच खाल्लं पाहिजे, समजलं ना? राजा नेहमी छद्मीच हसायचा. खळखळून हसणे त्याच्या स्वभावात नव्हते, राज्यकारभाराला ते उचित नव्हते. शिवाय खूप जोरात हसले तर आपले बोळके तोंड प्रजेला दिसेल, आणि अमूल्य असे ते उरलेले दोन दात खिळखिळे होतील अशी काहीशी भीतीपण होती. गतवर्षी एका माथेफिरूने सणसणीत लगावली होती तेव्हापासून हे दोन दात राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत हे राजाला जाणवलं होतं. नवीन जिरेटोप मागवायला हवा.. राजाने मनात एक नोंद करून ठेवली. नकळत हात गालावर गेला होता. तो काढत राजा म्हणाला, प्रधानसाहेब, मी शेतकरी असल्याने मला समस्या आणि त्याचे निराकरण दोन्ही ज्ञात आहेत. इथे शरदाच्या शीतल चांदण्याप्रमाणे राजाचा चेहरा कनवाळू  झाला. जमीन, प्रधानजी, जमीन हीच त्यांची समस्या आहे. ती कसावी लागते, वरुणराजाच्या कृपेवर अवलंबून रहावे लागते. अवर्षण आले की मग हा बळिराजा कर्ज काढतो , ते फेडता येत नाही. मग तो आत्महत्त्या करतो. त्याची बायको मुले देशोधडीला लागतात. आपण राज्यकर्ते, कर्ज माफ कसे करणार? राज्य तर चालवायचे आहे. तेव्हा त्यांना जमिनीच्या जोखडातून मुक्त करणे हा या समस्येवरील उपाय आहे. घ्या, जमीन ताब्यात घ्या, सर्व समस्या दूर होतील. प्रधानाने राजाची प्रशंसा केली व म्हणाला प्रजा आपणास मुरब्बी म्हणते ते योग्यच. मी आजपासूनच कामाला लागतो.

राजा नुसताच मुरब्बी नव्हता तर धूर्त पण होता. दक्षिणपूर्व देशात राहणाऱ्या आपल्या राजकन्येला आणून आपल्या गादीवर कसे बसवायचे याचीही आखणी त्याने करून ठेवली होती. प्रधानाला पूर्ण मोकळीक मिळूनही शेवटी प्रधानच रहावं लागणार होतं. राजा आता थोरल्या महाराजांच्या आठवणीत गेला होता. थोरल्या महाराजांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी होती पण समस्येची उकल करता आली नव्हती. उगाच सहकार योजना वगैरे करत बसले होते. पुन्हा राजा छद्मी हसला, सहकार योजना! सहकाराचा उपयोग नक्की झाला, फक्त तो बळीराजाला नाही झाला. शेतकरीही कसले! ज्वारी, गहू कापूस करत बसले आणि भिकेला लागले. आपण चांगले सांगत होतो , ऊस लावा , मळीपासून दारू तयार करा, द्राक्षे लावा , त्यांची शांभवी तयार करा. ठीक आहे, झाले ते उत्तमच झाले. आपोआप जमिनी मिळतील. राजाच्या डोक्यात भव्य योजना होत्या, परिवर्तन घडवून आणायचे होते, उत्क्रांती घडवून आणायची होती. नवश्रीमन्त तयार करायचे होते, त्यांच्यासाठी तलावाकाठी भव्य नगरे, प्रासाद उभारायचे होते. नवश्रीमंत काही बैलगाड्यातून फिरणार नव्हते, त्यांच्यासाठी जलद राजमार्ग निर्माण करायचे होते. पर्यायाने शेतकऱ्यांचा उत्कर्षच होणार होता. भव्य प्रासादांच्या वस्तीपासून अनेक कोस दूर भव्य नसली तरी घरे असणार होती. तिथे नवश्रीमंत नसलेले राहणार होते, शेतकरी राहणार होते. त्यांची मुलेबाळे शिकूनसवरून मोठी होणार होती आणि नवश्रीमंतांच्या घरी कारकुनाची नोकरी करणार होती. जे शिकणार नव्हते ते श्रीमंत वस्तीत जाऊन धुणीभांडी करणार होते. राजा स्वत: राजकन्येसहित या सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवून राज्य करणार होता. ज्यांना हे पसंत नसेल त्यांची खबरबात प्रधान जातीने जाऊन आपल्या रांगड्या शैलीत आणि भाषेत घेणार होता. सर्वत्र आबादीआबाद होणार होते. राजाची दूरदृष्टीच तशी होती. त्याला ही कहाणी नुसती साठा उत्तरी सुफळ संप्रूण करायची नव्हती तर क्रमश:ही ठेवायची होती. त्याच्या स्वत:च्या पिढ्यानपिढ्यांसाठी.  

Friday, March 21, 2014

वाळूतील चित्रे

चिरंजीव माझ्यासमोर कागद फडफडवत उभे होते. बाबा, टॅक्स भरायचाय, मदत करा. मी पाहतच राहिलो. काय?? काही दिवसांपूर्वीच त्याचा तीन वर्षाचा असतानाचा काढलेला फोटो पाहिला होता. मन भूतकाळात गेले होते. कितीतरी प्रसंग दिवसभर आठवत होते. त्याने उच्चारलेला पहिला शब्द, टाकलेले पहिले पाऊल, शाळेतील पहिला दिवस,  काहीसा गंभीर झालेला आजार, उशाशी त्याच्या आईने आणि मी आलटून पालटून केलेली जागरणे, हट्ट, लाघव, खट्याळपणा, हूडपणा. अरेच्च्या, आणि हा आता हा एवढा धिप्पाड होऊन माझ्यासमोर उभा आहे. ४०० मीटर रिले रेस मध्ये आपले शंभर मीटर पूर्ण झालेल्या धावपटूसारखे वाटले. आपली खेळी संपली, पुढची रसरसती पिढी तयार झाली आहे. आता बॅटन पुढे नेणाऱ्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचे.

खरंच आपण आयुष्याच्या धावपळीत इतके बुडून गेलेलो असतो? इतका बदल आपल्या समोर होत असताना इतके कसे समजत नाही? बोबडी बोलणी, खेळणी, शाळा, परीक्षा, सुट्ट्या, वाढदिवस, परत शाळा, असे करत करत कधी, नवीन शूज, नवीन कार, मित्रमैत्रिणी, कॉलेज हे सुरु झाले हे कळलंच नाही. आणि वाटलं आपल्या करियरच्या धावपळीत ज्यांच्यासाठी करियर करायची ते थोडेसे बाजूलाच राहून गेले. ही जाणीवही अशा वेळी झालीय की मला भले  मुलांबरोबर संवाद साधायचा असेल, त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा असेल, पण आता तीच मुलं त्यांच्या त्यांच्या व्यापात गढून गेली. शेवटी आयुष्य म्हणजे वाळूतील चित्रं. काळ नावाच्या समुद्राच्या लाटेनिशी बदलत जाणारी. आपण फक्त कधी काळी ती काढली होती, स्मृतीच्या कप्प्यात ठेऊन द्यायची. कधीतरी मग तो कप्पा उघडायचा, आतून ती चित्रं भरजरी पैठणी काढल्यासारखी हळुवारपणे बाहेर काढायची. त्यांना मंद अत्तराचा सुवास असतो, रेशमी आठवणींचा सुखावणारा स्पर्श असतो. संतूरच्या तारांची नाजूक किणकिण असते. हे असं पिढ्यानपिढ्या चालू आलेलं. माझ्या पणजोबांना, आजोबांना असंच वाटलं असेल, माझ्या  बाबांनासुद्धा आणि पुढे आपल्या मुलांना. प्रत्येक पिढीची आव्हाने वेगळी असतील, जगण्याची पद्धत बदलली असेल, पण हा जगन्नाथाचा रथ असाच चालू राहील.








Thursday, March 20, 2014

जागतिक चिमणीदिनानिमित्त्य

 चिमणी या छोट्याशा पक्षानं माझं बालजीवन व्यापलं होतं. अवती भवती तर ती असायचीच पण मराठी भाषेतसुद्धा चट्कन येऊन जायची. मराठीतील बाळबोध वळण चिमणीसारखं असायचं, एव्हढसं तोंड झालं की ते चिमणीसारखं दिसायचं, तान्ह्या बाळांच्या भरवण्यातला घाससुद्धा पहिला चिऊताईला असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीच्या घराचे वेध लागायचे. तिथे जिवाभावाची भावंडे असायची. माझी आत्तेभावंडं हे प्रमुख आकर्षण असायचं. त्यातल्या त्यात हेमंता आणि मी यांचे एक विशेष सूत जमले होते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या मागे असणे, अगदीच काही नसेल तर नदीकाठी मनसोक्त उनाड भटकणे ही आमचे आवडते उद्योग असायचे. घरात येणाऱ्या चिमण्यांचे निरीक्षण हा त्यातलाच एक उद्योग असायचा. दुपारी आम्हाला कुठेही बाहेर जायची परवानगी नसायची. कडाक्याचे ऊन तापलेले असायचे. कुत्रीही जिभा बाहेर काढून लपालपा करत आडोशाला बसलेली असायची. चिमण्यासुद्धा वळचणीला चिडीचूप बसायच्या. जुने कडीपाटाचे घर. जुन्या पद्धतीचे लाकडी पट्टी सर्वत्र फिरवून केलेले इलेक्ट्रिक फिटिंग. चिमण्यांसाठी ती लाकडी पट्टी अगदी त्यांच्यासाठीच ठेवल्यासारखी वाटायची. आजोबांच्या खोलीत तर दरवर्षी एक चिमणी त्या लाकडी पट्टीवर कोपऱ्यात छान घरटे करायची. आजोबांच्या खोलीत कुणी घरट्याला धक्का लावणार नाही याची बहुधा तिला खात्री असावी. आजोबांची आम्हाला भीती नव्हती पण आदरयुक्त वचक जरूर वाटे. आम्ही रोज त्या चिमणीची लगबग पाहत असू. काड्या, कापूस असं काय काय ती चिमणी आणि तिचा चिमणा आणत. प्रथम खिडकीत बसत. डोके वाकडे करून खोलीची चाहूल घेत. आजोबा शांतपणे मृगाजिनावर बसून काहीतरी वाचन करीत असले म्हणजे त्यांना दिलासा मिळाल्यासारखे वाटत असावे. मग ती दोघं तडक आत येत आणि भिंतीवरील लाकडी पट्टीवर जात. थोड्याच दिवसात घरट्यातून बारीक चिवचिवाट ऐकू येई. चिमणा मग फारसा दिसत नसे. चिमणीमात्र संध्याकाळ झाली की येऊन बसे आणि पहाटे केव्हातरी जात असे.

चौसोपी वाडे, ते कडीपाट आता इतिहासजमा झाले. भवतालच्या  सिमेंटच्या जंगलात आमच्या चिऊताईचे घरटे हरवले. त्यांना दिलासा देणारे आजोबाही कुठे राहिले नाहीत. घरटे कुठे बांधणार नी कसे? काड्या जमवायला झाडे तर हवीत. काळ्या भोर जमिनीत गवत उगवायचे, त्यात राहणारे जीवजंतू, उगाच कुठे तरी साचून राहिलेले पाणी, किंवा अगदी गळक्या नळातून टपकणारे थेंब,  पडवीत अंगणात सूप पाखडताना पडलेले दाणे, हे सगळे चिमण्यांचे विश्व.  सगळी इकोसिस्टीमच गायब झालीय. चिमण्यांनी जायचे कुठे? डार्विन म्हणतो बदला अथवा काळाच्या उदरात लुप्त व्हा. हे चिमण्यांना कसे सांगणार? आपल्याला कळते तर आपण आपले मार्ग बदलून जगा आणि जगू द्या असे का नाही म्हणत? या चिमण्यांनो, परत फिरा असे आपण कधी म्हणणार?



 

Tuesday, March 18, 2014

कचकड्याचे खेळणे

मफलरधारी बांकेबिहारी राजमान्य राजश्री केजरूमल यांचा अश्वमेधाचा वारू चौखूर उधळतो आहे. परंतु रामराज्याच्या या पाईकाला हे समजत नाही की आपण ज्यावर वारू म्हणून ऐटीत स्वार झालो आहोत ते एक गर्दभराज असून, कॉंग्रेसने सत्तारूपी टमरेल त्याच्या पार्श्वभागी अडकवल्यामुले ते वाट फुटेल तसे उधळले आहे. कदाचित समजतही असेल, पण आपले गाढव भाजप आणि कॉंग्रेसच्या गाढवांपरीस सरस आहे, ते मुळीच भ्रष्टाचारी नाही, वेळप्रसंगी मालकासही सणसणीत लत्ताप्रहार करण्यास मागे पुढे पाहणार नाही याचा अभिमानही वाटत असेल. परंतु हेही खरे की या गाढवाच्या (केवळ  उपमा, केजरूमल यांना उद्देशून नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी) मागे उभे राहायला भलेभले लोक टाळू लागले आहेत. न जाणो केव्हा आणि कुठे लाथ बसेल!  असो. मुद्दा आहे तो हा की रा रा केजरूपंतांना दालढोकली खाल्ली की अपचन का होते? आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राजकारणात आलात, मग ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही कलंक नाही अशा मोदींना मध्यवर्ती मुद्दा करून लोकसभेत येण्याची स्वप्ने का पाहता? आणि आलात निवडून खरेच तर मग फारच पंचाईत. दिल्लीत निदान पळून जायचा मार्ग तरी होता. खरं तर तिथेही रडीचाच डाव खेळलात. फास्ट बॉलिंग नको, दोन टप्पी बॉल हवा, बॅट माझी आहे, मला दोन जीवदानं हवीत, असल्या अटी घालून तरीही आऊट झाल्यानं अंपायर चिकीखाऊ म्हणत बॅटसहित पसार झालात. ते जाऊद्या, दिलवाली दिल्ली म्हणून कदाचित माफही करेल. पण राष्ट्रीय मुद्द्यांचं काय? तिथं आपल्या आयआयटीनं काही शिक्षण दिलेलं दिसत नाही. असेल तर केजरूमुखातून काही बाहेर आलेलं नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा होता तर महाराष्ट्राच्या 'झंझावाती' दौऱ्यात कॉंग्रेस सरकारला 'आदर्श' प्रश्न का नाही विचारलेत? केजरूमल यांचा दिवस भ्रष्टाचाररोधक च्यवनप्राशाने सुरू होतो आणि भाजपनिरोधक त्रिफलाचूर्णाच्या सेवनाने मावळतो. दिवसभर मफ़लर गुंडाळून खोकण्यात जातो, पण या सर्व व्याधींचे मूळ जे की खांग्रेस ती तेवढी दिसत नाही. या मोदीज्वरावर उपाय काय?

भारतीय जनता त्रस्त आहे. तशी ती अनेक वर्षे आहे. आपले सामाजिक अथवा राजकीय मन स्वत: काही करण्यास फारसे प्रबळ नाही. ते का नाही याची कारण मीमांसा करण्याचे हे स्थळ नाही. तो प्रपंच पुन्हा कधीतरी. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला नेहेमी कुणी तरी 'वाली' हवा असतो, हिरो हवा असतो. त्याची जरा जरी चाहूल किंवा झलक दिसली की पुरे. वारस नसलेल्या राजाच्या निधनाने जसे राज्य अधांतरी होते, आणि हत्ती ज्याला हार घालील तो राजा अशी काहीशी अवस्था आपली आहे. इथे तर रा रा केजरुमल स्वयंघोषित भ्रष्टाचार-मुक्त राजे झाले आहेत.  मीच काय तो स्वच्छ, निरिच्छ बाकी सगळे खाओ खिलाओ गलिच्छ असा ते आव आणत असतात. ठीक आहे, ते स्वत: असतील स्वच्छ, परंतु लोकसभेत जे दोनशे अडुसष्ट उमेदवार जे उभे केले आहेत ते धुतल्या तांदळासारखे आहेत याची खात्री करून घेऊन उभे केले आहेत काय? शिवाय सत्तेत आल्यावर भले भले चळतात, हे चळणार नाहीत याची खात्री केजरुपंत देतील काय?

तेव्हा, आपण खरोखर स्वच्छ आहोत आणि राहणार आहोत असे मनापासून वाटत असेल तर रा रा केजरूमल यांनी मोदीविरोधाची कुबडी वापरून प्रकाशात राहणे सोडून, आपण कोणत्या राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत त्यावर बोलावे. किंवा आपण विरोधच उत्तम प्रकारे करू शकतो असे वाटत असल्यास विरोधकाची भूमिका करावी. आपले प्रशासकीय कौशल्य (आणि त्यातून बाहेर पडण्याचे चातुर्य) दिल्लीमध्ये दिसून आले आहेच, त्यावर न बोलणे उत्तम. अन्यथा भारतीय जनता कचकड्याचे खेळणे फार दिवस हातात ठेवणार नाही. एक दिवशी त्याला केराची टोपली दिसेलच.