Wednesday, July 9, 2014

उ.सं.डु.

अर्थात, उपाध्यक्षांच्या संसदीय डुलक्या!

मला दोन सेकंद डुलकी काय लागली आणि या मीडियावाल्यांना जणू काही लॉटरीच लागली. पेपरमध्ये काय, सोशल मीडियावर काय सगळीकडे माझे डुलकी काढतानाचे फोटो, कार्टून दिसत आहेत. ही:ही:ही:! ममा म्हणतेच नेहमी, झोपल्यावर मी कसा आणखीनच निरागस दिसतो. मला ते अज्जिबात आवडत नाही. मी काही लहान नाही आता. चांगला आठवीत गेलो आहे. ममा म्हणते एव्हाना तू ग्राज्वेट होऊन स्वत:च्या पायावर उभा राहायला हवा होतास. कैच्या कैच. उद्या म्हणेल आत्तापर्यंत तुझं लग्न होऊन माझ्या मांडीवर नातवंडं खेळवायला हवी होतीस. शिवाय तिला माझी स्वप्नंच कळत नाहीत. मागे एकदा माझ्या स्वप्नात छान उंदीर आला होता. टॉम आणि जेरीतल्या जेरी सारखा. खरं तर तो मीच होतो. मनमोहन अंकल झाले होते टॉम. ते मस्त झोपले होते तर मी हळूच जाऊन त्यांची शेपूट त्यांच्या मागील पायातून पुढे घेऊन पुढच्या पायाला बांधून टाकली. स्पाईक कोण झालं होतं माहितेय का? नमोअंकल. स्पाईक नाहीये असं बघून मी त्याची प्लेट पळवली आणि टॉमच्या शेजारी आणून ठेवली. ही:ही:ही:! आता स्पाईकने पाहिलं की टॉमची पळताभुई थोडी होईल. शेपूट पुढच्या पायाला बांधून त्याला पळताना पाहून अशी मज्जा येईल ना…ही:ही:ही:! ममाला स्वप्न सांगितलं तर तिला काहीच मज्जा वाटली नाही, उलट मलाच म्हणाली तुला कधी कळायला लागणार आहे रे बाबा! तिला काय हवं असतं कुणास ठाऊक. म्हणाली, माणसाने कशी मोठी स्वप्नं पहावीत. तू मोठी स्वप्नं पाहायला हवीस. स्वप्न मोठ्ठ कसं करायचं? ते काय आपल्या हातात असतं? कधी कधी भयानक स्वप्न पडतं, तेव्हा ते खूप दिवस चालू आहे असंच वाटतं. एकदा असंच माझी तोंडी परीक्षा चालू आहे असं स्वप्न पडलं होतं. कुठले सर परीक्षा घेत होते कुणास ठाऊक, मी कधी त्यांना आमच्या शाळेत पाहिलंसुद्धा नव्हतं. विषयही कसला तरी कठीण, ज्याचं ओ की ठो माहीत नाही असा. इकडे तिकडे पाहिलं, कुणी मदत करायला आहे का, तर कुणीच नाही. एका खुर्चीत मी आणि समोरच्या खुर्चीत ते खोकड सर. मला दरदरून घाम फुटलेला. उत्तर नीट नाही दिलं तर मी नववीत जाणार नाही असं सारखं सांगत होते. वर ही परीक्षा सगळ्यांना टीव्हीवर आत्ता दिसत आहे असा दम देत होते. नाईटमेअर नाईटमेअर म्हणतात हेच असणार. एक तासाची परीक्षा पण संपतच नव्हतं स्वप्न. मी सारखं एकच उत्तर देत होतो. शेवटी मला वाटतं त्या सरांनाच माझी दया आली, किंवा कंटाळा आला. तेच माझ्या स्वप्नातून निघून गेले. ममाला म्हटलं, बघ हे तरी मोठं स्वप्न होतं ना? तर न बोलता निघूनच गेली. आता हवीत तशी स्वप्नं पाडायची तरी कशी माणसानं?

पण काही म्हणा, दाढी काढल्यावर मी एकदम बालक दिसू लागलो आहे. ब तुकडीतल्या त्या लाजिया फिल्मीचा फोन आला होता. अय्या! कित्ती गोsssssड दिसतोस रे तू! असं किंचाळत होती. मी आता तुझ्या वर्गातच ट्रान्स्फर करून घेणारे म्हणाली. मी तिला सांगितलं आहे, तू असा फोन करत जाऊ नकोस, ममाला आवडत नाही ते. तुला प्ले-डेट हवी असली तर तुझ्या आईला ममाला फोन करायला सांग. आणि हो, आधीच सांगतो, ममा मला रेटेड आर गेम्स खेळायला देत नाही. मी फक्त क्यांडी क्रश, मारिओ खेळतो. लपाछपी खेळायची असेल तर मला दोनदा पकडलं तर एकदा आऊट. आणि पहिला डाव तुझ्यावर. माझ्यावर डाव आला तर मी फक्त दहापर्यंत आकडे मोजणार. तसे मला शंभरपर्यंत येतात पण दहानंतरचे आठवायला लागतात. तुलाच कंटाळा येईल. तर मला म्हणाली चालेल. आमच्या वर्गात बसून मला कंटाळा आला आहे. सगळे लेकाचे स्वत:ला हुशार समजतात. आमचा मॉनिटर, नुसता फुशारक्या मारतो आणि मोठ्ठे मोठ्ठे आकडे म्हणतो. पण प्रत्यक्षात त्याला चारपर्यंतच लिहिता येतात. मोठ्याने म्हणतो चारशे बत्तीस आणि फळ्यावर चार लिहून थांबतो. 'शे' आकड्यात कसे लिहायचे म्हणतो. काय करायचाय असला मॉंनिटर? त्यापेक्षा तूच कित्ती छान. दहापर्यंत आकडे येतात आणि लिहूपण शकतोस. हो ना? मी हो म्हटलं. लिहायला थोडंच लागणार आहे? ही:ही:ही:! मग ती उगाच काही अगम्य बोलत राहिली. मला बहुधा डुलकी लागली असावी. जाग आली तेव्हा फोनची ब्याटरी डाऊन होऊन बंद पडला होता. फोन कानावर ठेवून तसाच लवंडलो असणार. तोंडातून लाळ गळून स्क्रीनवर जमा झाली होती. शी! त्या दिग्गीअंकलसारखी लाळ गाळू नकोस असं मला ममा नेहमी सांगत असते. त्यांचा आणि ममाचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. मला तरी लाळ गाळण्यात अनैसर्गिक असं काही वाटत नाही. मला चिंच, आवळा, आमसूल बघून जबड्यातून कळ येते आणि लाळ सुटते. तसंच काहीसं त्यांना होत असावं. ही थिअरी तपासून बघावी म्हणून मी एकदा बैठकीत त्यांच्यासमोर चिंच चोखत बसलो होतो. पण त्यांना काहीच झालं नाही. मग तो नाद सोडून मी सगळ्या चिंचा बैठक संपेतोवर फस्त केल्या. बैठक संपल्यावर टीव्हीवाले आले. त्यातली एक टीव्हीवाली दिग्गीअंकलचा इंटरव्ह्यू घेत होती. इंटरव्ह्यू संपल्यावर पाहिलं तर अंकल रुमाल घेऊन लाळ पुसत होते. हात्तिच्या! म्हणजे चिंचांचा परिणाम झाला तर! फक्त जरा वेळ लागला. त्याचाच विचार करत बसलो आणि डुलकी लागली. स्वप्नात ती टीव्हीवाली चिंच झाली होती. उंच झाडावर लगडली होती. दिग्गीअंकल उड्या मारून ती हाताला लागतेय का बघत होते. त्या उड्या पाहून मी खिदळत होतो. त्यांना म्हणालो, अंकल, दगड मारा ना त्यापेक्षा. तर म्हणाले अरे ही चिंच अलगद काढावी लागते. आणि ते एकदम स्वत:च फांदीला त्या चिंचेच्या शेजारी जाऊन लगडले. पण ते आता पपई झाले होते. चष्म्यासकट. चिंचेला हात लावायला त्यांना हातच नव्हते. खी:खी:खी:! चिंचामृताचा योग. जाग आली तेव्हा गाडीत होतो. मला बूस्टरसीटवर बसायला अजिबात आवडत नाही. मला मुळात गाडीतच बसायला आवडत नाही. ममा नेहमी विंडोलॉक करते. आणि थांबल्यावर नेहमी कुणीतरी बाहेरून दरवाजा उघडल्याशिवाय मला उतरता येत नाही. आय हेट चाईल्ड लॉक! मी एकदा दरवाजाला बाहेरून आणि ममाच्या सीटच्या हेड रेस्टला च्युईन्ग गम लावून ठेवणार आहे. तिचा अंबाडा आईसक्रीमवर चेरी ठेवल्याप्रमाणे दिसेल.

ममा मला तिच्याबरोबर ऑफिसमध्ये घेऊन जाते ते मला खूप बोअर होतं. तिथे मोठ्ठी क्लासरूम आहे. वयाने खूप मोठी माणसं शिकायला येतात. समोर एक सर बसलेले असतात. पण ते काहीच करत नाहीत. विद्यार्थीच खूप बोलत असतात. खरं तर आरडाओरडच करत असतात. काही काही वेळा मज्जा येते. काही जण सरांसमोर जाऊन धिंगाणा घालतात, कागद वर फेकतात, कचरा करतात. आणि बाकीचे बेंच वाजवत त्यांना सपोर्ट करतात. अशा वेळी मी पण बाक वाजवतो. एकदा मी बाकावर उभं राहून शिट्टी पण वाजवली. एक लालूअंकल म्हणून आहेत. ते खूप विनोदी आहेत. ते मला खूप हसवतात. एकदा त्यांनी मला म्हशीचे वेगवेगळे आवाज काढून दाखवले. म्हैस माजावर आली की कशी ओरडते, भूक लागली की कशी ओरडते, चारा दिला नाही तर कसा धिंगाणा घालते. त्यांच्याकडे खूप म्हशी आहेत. त्याचं म्हशींवर खूप प्रेम आहे. म्हशींचंही त्यांच्यावर आहे. त्यांना पोलिसांनी तुरुंगात घातलं होतं तर त्यांचं घर म्हणे एका म्हशीनंच सांभाळलं होतं. मी त्यांना माजावर आलेली म्हैस म्हणजे काय असं विचारलं. तर त्यांनी क्लासमधल्याच एका बंगाली बाईकडे बोट दाखवलं. म्हणाले माजावर आलेली नाही, पण माजलेली नक्की आहे. माजावर आलेली दाखवेन कधीतरी, बिहारला ये कधी तरी, आमच्या गोठ्यात आहेत खूप. ते आणखी काही सांगणार होते. पण ममानं ओढून नेलं. असं काही तरी होत असलं की मग बोअर होत नाही. आता सध्या खूपच बोअर होतं. लालूकाका नसतात, कपिलकाका नसतात, दिग्गीकाका तर सध्या हनीमूनवर आहेत असं कळलं. त्यामुळे त्यांचीपण मज्जा नसते. मग डुलकी लागणार नाही का? लोकांना काय जातंय हसायला? एकदा इथं या क्लासमध्ये येऊन दिवस काढून दाखवा म्हणावं.

आज कुणीतरी फोन केला. म्हणे अमृत मासिकाच्या कार्यालयातून बोलतोय. आमचं एक पॉप्युलर सदर होतं, उ. सं. डु. ऐकलं होतं का कधी? मी म्हणालो मासिक म्हणजे पुस्तक ना? वाचायचं? आमच्या बाबांनी खूप जमवली होती पुस्तकं. तर ते म्हणाले,"असू द्या, असू द्या. सगळेच काही पुस्तकं वाचत नाहीत. तर सांगायचा मुद्दा, आमचं ते सदर फार चांगलं होतं. पण मासिक पुढे बंद पडलं. आज आपला फोटो पाहिला आणि एक कल्पना सुचली. तुम्ही हे सदर लिहा, आमचं मासिक पुन्हा चालू होईल. म्हणजे तुम्हाला तसं लिहावं लागणार नाही. तुम्ही जसे नेहमी वागता तसेच वागा. आमच्या सदराला खूप मटेरिअल मिळेल. सदराचं नाव असेल "उपाध्यक्षांच्या संसदीय डुलक्या". कसं वाटतं? मी म्हणालो, ठीक आहे, पण जोडाक्षरं फार होताहेत. तशी म्हणाले, मग "उप संसदीय डुलकी" हे कसे? तुम्हीच ठरवा म्हटलं, मला थोडंच वाचायचं आहे? पण त्यांना म्हणालो आहे, तुम्ही ममाला फोन करा. तिने परवानगी दिली तरच मी हे काम घेईन.

No comments:

Post a Comment