Tuesday, July 22, 2014

चार बोतल व्होडका

परवाच कुठेशीक सध्याच्या चित्रपटसंगीताबद्दल गळा काढून लिहिलेले वाचले. लहान मुले असलेल्या त्या बापाचा कळवळा लेखातून जाणवत होता. आईबापांनी मुलांना समाजविघातक गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा करावा, रोज संत ज्ञानेश्वर, तुकयाचे अभंग यांच्याशिवाय त्यांच्या कानावर काहीही पडू नये यासाठी जिवापाड धडपड करावी आणि एखाद्या सिनेमाच्या गाण्याने या मुलांना "चार बोतल व्होडका" ते  "छत्तीस चोवीस छत्तीसचा तडका" एकाच दिवसात शिकवावा असे काहीसे सध्या झाले आहे असा एकंदरीत त्या बिचाऱ्या बापाचा सूर होता. खरं आहे हो. लहानपणी आमचा व्यासंग भीमरूपी महारुद्रा, रामरक्षा, मनाचे श्लोक यांपलीकडे जात नव्हता. आमचे वडील आणि चित्रपट यांचा छत्तीसचा आकडा होता. एकदा कधी नव्हे ते (कदाचित आईने टुमणे लावले असेल) सिनेमाला न्यायला तयार झाले. त्यावेळी आमच्या गावात एकमेव चित्रपटगृह होते. कोकणातील गाव ते. मुंबईला दहा वेळा आपटून "तयार" झालेले चित्रपट आमच्या गावात सावकाशीने येत. कधी कधी गाजलेलेही येत. चारपाच वर्षांनी. थेटरवर मग पोष्टरे लागत. जो कोणी तगडा हीरो अथवा रूपगर्विता हिरवीण असेल त्यांचे चेहरे त्यावर झळकत. त्याकाळी थेटरमध्ये बाहेर काचेच्या कपाटात चित्रपटातील प्रसंगांचे रंगीत फोटो लावायची पद्धत होती. तो एक ट्रेलरचा प्रकार असावा. आम्ही मुले कुतूहल आणि उत्सुकतेने ते फोटो पाहत असू. तर आम्ही अत्यंत उत्साहाने सिनेमा पहायला निघालो खरे. कोणता चित्रपट आहे तेही माहीत नव्हते. थेटरवर पोहोचल्यावर पाहिले, चित्रपटाचे नाव होते "ज्यूली". तिकिटे काढून आम्ही आत जाणार तेवढ्यात वडिलांचे लक्ष लावलेल्या फोटोंकडे गेले. साधारणपणे १० सेकंद ते फोटो न्याहाळून ते म्हणाले, "चला मंडळी, घरी चला!" आमची वरात गेली होती तशी परत आली. ज्यूलीचे नेमके दु:ख काय होते ते समजले नाही. त्यानंतर तो चित्रपट पहायचा योग साधारण वीसेक वर्षांनी आला. तेव्हा लक्षात आले "अरेच्या, असं आहे होय?" बाबांची चूक नव्हती, ज्यूलीची समस्याच तशी ज्वलंत होती. फारच सामाजिक शिक्षण करणारा चित्रपट होता तो. लोकांच्या शिक्षणाचे जाऊद्या, या सिनेमातील एक गाणे - "माय हार्ट इज बीटींग" गाणाऱ्या प्रीती सागरवर मात्र दूरगामी परिणाम झाले. तिने तिचे पूर्ण आयुष्य नर्सरी ऱ्हाईम्स, लहान मुलांच्या गोष्टी वगैरे करण्यासाठी अर्पण केले. 'यंग बर्डस आर मेटिंग, व्हाईल आय एम वेटिंग" वगैरे शब्द गाऊन तिला संन्यस्त व्हावेसे वाटले असे म्हणतात. कारण पुढे पुढे तिने टीव्हीवर भजनेही गायलेली मी पाहिली होती. अर्थात आताच्या गाण्यांच्या तुलनेत "माय हार्ट इज बीटींग" हे गाणे सध्या भजनप्रकारात मोडते. (गरजूंनी यूट्यूबवर शोध घेऊन खातरजमा करावी. खूपच उत्साही लोकांनी दादरा-गरबा अथवा भजनी ठेक्यावर म्हणून पाहावे, छान जमते)

तर, ज्यूलीच्या धक्क्यातून सावरायला जरा वेळ लागला. त्याच सुमारास "संन्यासी" नावाचा चित्रपट आला. ज्यूलीवर उतारा म्हणून मुलांनी असा आध्यात्मिक सिनेमा पाहावा असे कोणत्याही सोज्वळ आईवडिलांस वाटणे साहजिक होते. या चित्रपटाची कथा केवळ असामान्य होती. सर्वात प्रथम नायकाच्या बापास दारुडा, स्त्रीलंपट असा दाखवून वडील या जमातीचा मुलांच्या मनावरील अनावश्यक आदरयुक्त पगडा दूर केला होता. मग अशा मुक्त मनाने मुलांना पुढे सिनेमाचा आस्वाद घेता येतो हे दिग्दर्शक-निर्मात्यांनी ओळखले होते. नायकाची आई सुलोचना, स्वयंपाकास सिद्ध व्हावे त्याप्रमाणे स्वत: पदर खोचून मुलाचे चरित्र घडवायला उभी राहिली होती. एकच ध्येय - मुलास बापाप्रमाणे होऊ न देणे. अशा आईचा गाजराचा हलवासुद्धा बिघडत नाही तर मुलगा कसा बिघडेल? शिवाय बिघडू नये याची पूर्ण खात्री म्हणून नायकाचे काम आपला राष्ट्रीय संत, महंत, देभप अभिनेता मनोजकुमार यांस दिले होते. हा मनुष्य जन्माला आला तेच डॉक्टर, नर्स, आईवडील यांना आशीर्वाद देत आणि वन्दे मातरम म्हणत. सुलोचनाने आपल्या या कुलदीपकास स्वच्छ चारित्र्याचे असे काही डोस दिले की त्याच्या गाडीने ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम ही स्टेशने घेतलीच नाहीत. गाडी तडक संन्यासाश्रम स्थानकावर जाऊन थांबली. आता स्टेशनवर गाडी थांबली की चायवाले, काकडी/पेरूवाले कुणी तरी काही तरी विकायला येणारच. त्याप्रमाणे आरती नावाची मेनका (हेमा मालिनी) या बाबाला "चल संन्यासी मंदिर में" असा लडिवाळ आग्रह करू लागली. आणि हे महाराजही "नको हो, मी नाही त्यातला, हे पाप आहे हो" वगैरे सलज्ज अभिनय करू लागले. वास्तविक महाराजांची गाडी या स्टेशनात ठरलेल्या वेळेच्या कितीतरी आधी येऊन थांबल्यामुळे सायडिंगला टाकण्यात आली होती. दोन घटका मंदिरात जाऊन येण्याइतका वेळ नक्कीच होता. "तेरा चिमटा मेरी चुडीयां, दोनो साथ बजायेंगे, साथ साथ खनकायेंगे" हे ऐकून तिला नक्की काय करायचे आहे असा प्रश्न आमच्या बालमनास तेव्हा पडला होता. हेमा मालिनी चिमटा आणि चुडीयां दोन्ही स्वत:च्याच हातात घेऊन नाचत होती, त्यामुळे आता या महाराजांचा चिमटा आणखी कुठला असा प्रश्न कुणाही बालकास पडेल. मी तसे आईला विचारले तर "मेल्या, नको त्या शंका कशा रे तुला!" असे डायरेक्शन आणि एक सणसणीत धपाटा मिळाला. पुढे तर "तेरा कमंडल, मेरी गगरीयां साथ साथ छलकायेंगे" असेही ती कवटाळीण (म्हणजे हेमा मालिनी) म्हणू लागली तेव्हा तर तिच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे याची आम्हांस खात्री पटली. गाण्याच्या शेवटी मनोजकुमारही "बोलो सियावर रामचंद्र की जय" असे म्हणून गंगेत उडी मारतो. पण तोपर्यंत हे गाणे आम्हा मुलांचे प्रबोधन करण्यात यशस्वी ठरले होते.

तात्पर्य, तेव्हाची सगळीच गाणी काही "देहाची तिजोरी" वाली नव्हती. सुरेश भटांनी जी काही गाणी लिहिली आहेत ती ऐकून "चार बोतल व्होडका" वगैरे गाणी हे यज्ञसमयी इंद्रदेवादिकांस केलेले तर्पण वाटते. यज्ञयागात सोमरसाचे अधिष्ठान पुरातन कालापासून आहे. असो. तेव्हा, चल संन्यासी मंदिर में, माय हार्ट इज बीटींग इत्यादिक प्राथमिक गाण्यांवर तयार झालेला पिंड जेव्हा सुरेश भटांची विरह गीते ऐकू लागला तेव्हा वाटले हा खरा पी.एच.डी. चा अभ्यासक्रम.

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसांत, लाभला निवांत संग
गार गार या हवेत घेऊनि मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग

उगाच शब्दच्छल नाही. विरहिणीने मोठ्या हळुवारपणे, रसिकतेने परंतु ठामपणे आपल्या सख्याने काय करायला हवे ते सांगितले आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी यातील एक एक शब्द घेऊन त्याचे रसग्रहण करावे आणि शोधनिबंध सादर करावा एवढे या शब्दांचे सामर्थ्य आहे. तसेच आणखी एक गीत. तरुण आहे रात्र अजुनि. यात प्रेमिका "तरुण आहे रात्र अजुनि, एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे " असा जाब आपल्या प्रियकराला विचारते. या गाण्यात जेवढा बोधप्रद संवाद आहे तेवढा कोणत्याच गाण्यात नाही. शिवाय तो एकतर्फी संवाद असल्याने सत्यतेच्या अधिक जवळ जाणाराही आहे. समस्त वैवाहिकांचे निशाजीवनसार अथवा निराशाजीवनसार या गाण्यात मांडले आहे. अलीकडील कुठल्याच कवीत ही प्रतिभा (आणि हिंमत) नाही. ही गाणी ऐकून पुढे आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे याची वास्तवकारी जाणीव मुलांना होते, ती त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होतात. अर्थात हे सर्व वाङमय उपलब्ध असूनही आमच्या व्यासंगात फारसा फरक पडला नाही. तसे नर्मदेतील धोंडेच राहिलो. मग आताच मुलांवर गाण्यांचा वा सिनेमांचा वाईट परिणाम होतो असे का वाटावे? पूर्वी मुलांना असली गाणी सहज उपलब्ध होत नव्हती असे म्हणावे तर उपर्निर्दिष्ट सर्व गाणी रेडिओवर सतत लागत. एवढेच नव्हे जी स्वत:ला रसिक समजत अशी मराठी मंडळी ही गाणी मोठ्याने गुणगुणत. "चल संन्यासी मंदिर में", "मोकळे करून टाक एकवार अंगअंग" हे तेवढे रसिक प्रतिभेचे लक्षण आणि "ओ मेरी रानी, तेरी जवानी, तेरे बदन पे फिसलता पानी" असे ह.भ.प. हनीसिंग यांनी म्हटले की मात्र ते निकृष्ट, हीन दर्जाचे, मुलांवर वाईट परिणाम करणारे गाणे कसे काय बुवा? जे न देखे रवि, ते देखे कवि, हे जर खरे असेल तर रा. रा. हनीसिंग "तेरे बदन पे फिसलता पानी" यावरच थांबले आहेत, फार खोलात शिरलेले नाहीत यावरून त्यांची सभ्यता सिद्ध होत नाही काय? तेव्हाच्या मुलांत आणि आताच्या मुलांत काय फरक आहे? मला वाटते प्रत्येक पिढी आधीच्या पिढीच्या दोन पावले पुढे असते. त्यांची आकलनशक्ती अधिक असते. अधिक धिटाई असते. नव्या वाटांवरून जाण्याची इच्छा असते. आधीच्या पिढीपेक्षा सारासार विचारशक्तीही जास्त असते. घरातील वातावरण जर सुसंस्कृत असेल तर बाहेरील वातावरणाचा परिणाम मुलांवर फारसा होत नाही. उलट चांगले काय वाईट काय हे चांगले समजू लागते. अर्थात नियमाला अपवाद असतोच. तेव्हा बाजारात व्होडका मिळणे थांबेल अशी अपेक्षा करून उपयोग नाही. व्होडका पिऊन काय होते हे मुलांपर्यंत नेले म्हणजे पुरे. हभप हनीसिंग, प्रात:स्मरणीय मिकासिंग यांचा भांगडा धुडगूस गल्लीत कितीही चालो, आपल्या मुलांनी गणपतीतील बेभान ढोलताशा ऐकला असेल आणि त्या भक्तीचा कल्लोळ पाहिला असेल तर गणपतीसमोर भगवे झेंडे उंचावून नाचणारी, उच्चरवाने आरती म्हणणारी मुलेही हीच असतील. तेवढी आपली संस्कृती नक्कीच प्रबळ आहे. ती संस्कृती मुलांसमोर नेणारे आपण ही आपलीच जबाबदारी आहे. इत्यलम. 

No comments:

Post a Comment