Saturday, July 19, 2014

काका! मला वाचवा!

स्थळ - शनिवारवाडा 
काळ - पावसाळी दुष्काळ
पात्रे - नारायणराव, वाघोबादादा, पृथ्वीसिंग गारदी, सरदार बारामतीकर आणि इतर नेहमीचेच यशस्वी

(सकाळचा प्रहर आहे. वाडयात अजून म्हणावी तशी लगबग सुरू झालेली नाही. नारायणराव लवकर उठले आहेत. त्यांचा आवाज अंत:पुरातून येतो आहे. विंगेतून एक कोंबडी जिवाच्या आकांताने धावत रंगमंचावर येते. कुठे जायचे हे न कळून ती नुसतीच सैरावैरा पळते आहे. तिच्या मागून नारायणराव धावत येतात आणि तिच्या मागे धावू लागतात.)

नारायणराव- आवशीक xx! खंय जातलंय आता? रंव थंयसरच! न्हानपणासून कोंबडये पकडतंय. हो नारोबा असो सोडूचो नाय तुका. सकाळचो व्यायाम आसा हो माजो.
आनंदीबाई - बाई बाई बाई! पुरे झालं हो नारायणराव कोंबड्या पकडणं! उच्छाद मांडला आहेत नुसता. सकाळपासून कोंबड्यांची पकपक आणि तुमची मालवणी शिव्यांची कलकल. अहो! ऐकलंत का? इकडून नुसतं 'सामना' तोंडापुढे धरून बसणं चाललं आहे. आज पुरश्चरण नाही वाटतं? सूर्य वर येऊन अर्धी घटका लोटली. कसलं बाई ते पुरश्चरण आणि? घटकाघटका सूर्याकडे टक लावून बसायचं ते? प्रकृतीत फारसा फरक कसा तो दिसत नाही, पण चष्मा मात्र लागला आहे.
वाघोबादादा (जरबेने)- काय लावलंय हो? आम्ही हा "सामना" वाचण्यासाठी म्हणून काही तोंडासमोर धरला नाही. या नारोबांच्या कोंबडी षौकाचा परिणाम आहे. या कोंबड्या वाड्यात येतात, सैरावैरा पळतात, मनास येईल तिथे 'प्रसाद' सोडतात. या सर्वाचा परिपाक म्हणून हा दरवळ वाड्यात पसरला आहे, त्याचे शक्यतो निवारण या 'सामना' ने करतो आहे. आमचे पुरश्चरण गेल्या महिन्यातच संपन्न झाले. सूर्याकडे टक लावून पाहणे निश्चितच आमच्या राजकीय मनसुब्यास उपयुक्त झाले आहे. माधवरावांस जरी पेशवाई प्राप्त झाली तरी या वाघो भरारीस मरहट्ट प्रांतिचा पंतप्रधान हा सन्मान प्राप्त होणारच.
नारायणराव - असा तुमका वाटतां. काय समाजल्यात? खरो माजो हक्क तो. हल्ली दुसरां काय करूक नाय म्हणान मी कोंबडये पकडतंय. तुमकां आमचो षौक तेवढो दिसता, तुमी नाटकशाळा ठेवून असत ता काय कोणी बोलूचा नाय, व्हय मां?
वाघोबादादा - खामोष! लहान तोंडी मोठा घास? तोही या वाघो भरारीसमोर? दिल्लीच्या तख्तापर्यंत, अटकेपर्यंत ज्याची तलवार गाजली त्याच्या समोर? तळपत्या सूर्याच्या डोळ्यास डोळा देण्याऱ्या या वाघासमोर?
नारायणराव - म्हायती आसा. बैलगाडीच्या खालसून कुत्रो चलता, तेका वाटता आपण चालतो म्हणान ही बैलगाडी चालतासा. खरां काय ता तुमका आमका म्हायती. माजो हक्क मी घेवन रवतंलंय. हो मी चललंय.
(नारायणराव पकडलेली कोंबडी काखेत पकडून घेऊन जातात)
वाघोबादादा - नमकहराम! या दौलतीशी बेईमानी? या वाघोभरारीशी टक्कर? (संतापाने येरझाऱ्या घालतात)
आनंदीबाई - मी म्हणते, इकडच्यांनी जरा संतापणं कमी करावं. आमच्यावर राग धरता, भावोजींवर चिडता, पुरश्चरण करताना सूर्य लवकर प्रसन्न होत नाही म्हणून त्याच्यावर भडकता. प्रसन्न झाला तर भीक टाकल्यासारखे फळ दिले म्हणून त्रागा केलात. परवा भावोजी दर्शनास आले तर डोक्यावरून उपरणं घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन पडून राहिलात. अशानं तबियत कशी चांगली राहणार? मी तर म्हणते आता आपण काही दिवस त्र्यंबकास जाऊन राहावं.
वाघोबादादा - बाईसाहेब, हा नारायणराव लाडावलेला आहे. जिथे जातो तिथे याला केवळ साखरभात, पंचपक्वाने हवी असतात. मिळाली नाहीत की हा थयथयाट करतो. साखरभात माझा हक्क आहे म्हणतो. जाऊदे त्याला. कुठे साखरभात मिळतो ते पाहूदे.

(पडदा उघडतो तेव्हा आनंदीबाई महालात सचिंत बसल्या आहेत. सेवक वर्दी घेऊन येतो)
सेवक - मुजरा सरकार. आपण सांगावा धाडल्याप्रमाणे पृथ्वीसिंग गारदी आला आहे.
आनंदीबाई - ठीक आहे. पाठवून दे.
(पृथ्वीसिंग गारदी इकडे तिकडे पाहत हळूच आत येतो)
पृथ्वीसिंग - मुजरा सरकार. हा गारदी सेवेस हाजिर आहे.
आनंदीबाई - पृथ्वीसिंग, खास कामगिरी आहे. नारायणराव तुला ज्ञात असतीलच.
पृथ्वीसिंग - होय सरकार. आत्ताच सदरेवर कोंबड्यांना दाणे टाकताना दिसले होते.
आनंदीबाई - कामगिरी गुप्त आहे. या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. समजलं?
पृथ्वीसिंग - आज्ञा व्हावी सरकार. मला स्वत:लाही दोन कान आहेत याचीसुद्धा मला खबर नाही.
आनंदीबाई - आम्ही लिहिलेला खलिता मिळाला?
पृथ्वीसिंग - होय सरकार. परंतु तो फोडलेला होता. सरकार, आपले बारामतीकर सरदार नेहमी आमची पत्रे चोरून वाचतात असा आम्हांस संशय आहे.
आनंदीबाई - आमच्या हुकुमाची तामिली व्हावी.
पृथ्वीसिंग - जशी आपली आज्ञा. (अदबीने झुकून, पाठ न दाखवता महालाबाहेर जातो)

(आनंदीबाई आणि वाघोबादादा महालात बसले आहेत. आनंदीबाई काहीतरी सांगत आहेत. तेव्हढ्यात बाहेर गलका, आरडाओरडा होतो. नारायणराव धावत महालात प्रवेश करतात. मागोमाग पृथ्वीसिंग गारदी येतो)
नारायणराव - घात! घात! काका! माका वाचवा! हो गारदी माझ्या जिवावर आयलो आसा! शिरां पडली या मुघल राज्यार! माका सरदार करतले म्हणून सांगल्यानी. सरदार नाय काय नाय, उलटो हो गारदी माका मारूक सोडलो माज्यार. काका, माका तुमच्या सैन्यांत परत येंवचा आसा. काय बोलून गेलंव तेची मापी करा.
वाघोबादादा - अरे चोरा! माफी करा काय? जाताना आम्हांस जो त्रास देऊन गेलास त्याचे काय? त्यावेळीस आमचे ग्रह ठीक नव्हते, तर सरदारकी मिळेल या आशेने आम्हांस सोडून गेलास. आता आम्ही या राज्याचे राजे होणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत तर लगेच आलास! ते काही नाही! तुला माफी नाही!
पृथ्वीसिंग - एल्गार! जिले-इलाहीसमोर आमच्याबद्दल नाही नाही ते सांगून हा नारायणराव आमचा कात्रज करीत होता. आता बरा सापडलास. वाघोबादादा, याला एकच शिक्षा - याला खरंच तुमच्या सैन्यांत प्रवेश द्या आणि एखाद्या अवजड खात्यावर बसवा.
नारायणराव (अत्यंत अजीजीने)- नको! नको! दादानू! मापी करा! ह्येचा काय्येक ऐकू नकात. माका एक सैनिक म्हणून येवंचा आसा. माजी काय्येक मागणी नाय आता. मागणी करान करान या अवस्थेत इलंय. एवडो एक चानस द्या माका!
(तेवढ्यात बारामतीकर सरदार प्रवेश करतात. )
वाघोबादादा - बारामतीकर! तुम्ही इथे काय करताय? कोण आहे रे तिकडे? यांना आत कोणी सोडलं?
बारामतीकर - वाघोबादादा, आम्ही तुमचे मित्र! आम्हांस अशी खबर मिळाली की नारायणरावांस काही दगाफटका होत आहे, त्याची आपणास पूर्वसूचना द्यावी यासाठी आलो होतो. आम्ही तसे कुणालाही भेटायला कुठेही जात असतो.
(आनंदीबाई आणि पृथ्वीसिंग एकमेकांकडे पाहतात)
नारायणराव - काका! ह्येंचा पण काय्येक ऐकू नकात. पूर्वसूचना खंयची? मी कसो मरतंय त्याची मजा बगूक आयलेसत हे.
वाघोबादादा - नारायणा! तुझी कर्में तूच फेड हो! मी काही मध्ये पडायचा नाही. तुला आश्रय तर मी मुळीच द्यायचा नाही.
नारायणराव (आकांताने)- काका! काका !
(पृथ्वीसिंग त्याला ओढत घेऊन जातो. विंगेतून दीर्घ किंकाळी, झटापट ऐकू येते. मग शांतता पसरते. वाघोबादादा, आनंदीबाई आणि बारामतीकर सरदार एकमेकांकडे पाहत असतात)
आनंदीबाई - चला! इकडचा आता मार्ग मोकळा झाला!
वाघोबादादा (दटावून) - बाईसाहेब! बारामतीकर, तुम्ही अजून इथे का? या आता आपण. तमाशा संपला.
(नारायणराव प्रवेश करतात. पैरणीच्या चिंध्या झाल्या आहेत, विजार नको तिथे फाटली आहे. केस अस्ताव्यस्त झाले आहेत. गालावर पाच बोटे उमटलेली स्पष्ट दिसत आहेत.)
नारायणराव - आवशीक xx! माका तुमचा सैन्य नको आणि ता मुघल सैन्य पण नको. मी चललंय कणकवल्येक. हो माजो राजीनामो. (पृथ्वीसिंगच्या हातात कागद देतो) आता मी काय तां कणकवल्येक जावन सांगतंय. (जातो)
आनंदीबाई - राजीनामा? पृथ्वीसिंग! काय चालवले आहे हे?
पृथ्वीसिंग - बाईसाहेबांच्या आज्ञेवरून त्यांची "मानधरणी" केली सरकार!
आनंदीबाई (आश्चर्याने)- मान धरणी? पृथ्वीसिंग, मान धरणी??
पृथ्वीसिंग - होय सरकार. मान पकडून छान धरणी केली तेव्हा कुठे वठणीवर आले नारायणराव.
आनंदीबाई (कपाळावर हात मारून) - कर्म! तुम्हाला वाचता येतं असं गृहीत धरलं होतं आम्ही. अहो, "मनधरणी" करा असं म्हटलं होतं आम्ही!
पृथ्वीसिंग (खिशातून कागद काढून त्यांच्या हातात देतो) - बाईसाहेब, आपणच वाचा. मानधरणी असं लिहिलं आहे.
आनंदीबाई - खरंच! अगो बाई, हे काय? कुणी तरी एक काना नंतर टाकलेला दिसतो आहे. हा "म" चा "मा" कुणी केला?
(पृथ्वीसिंग, वाघोबादादा आणि आनंदीबाई चमकून बारामतीकरांकडे पाहतात)
बारामतीकर (नजर टाळत) - अरेच्या, या सगळ्यात विसरलोच. आम्हाला दिल्लीस निघायला हवं. येतो आम्ही!
(गडबडीने निघून जातात. पृथ्वीसिंग, वाघोबादादा आणि आनंदीबाई एकमेकांकडे हताश होऊन पाहत असताना पडदा पडतो)

No comments:

Post a Comment