Tuesday, July 8, 2014

राळेगणसिद्धीची भाकणूक

आवंदाच्या शेतीचं  काय खरं नाही. लोकसभेत पार उखडून टाकलेली तणं मात्र परत माजायला आली. राष्ट्रवादी संतांची ही टोळी आता शेतकऱ्याचा कैवार घेत याला भेट त्याला भेट करत हिंडू लागली आहे. संतशिरोमणी मा. ना. खा. स्वत: पार पंतप्रधानाना भेटून आले. बोळक्या तोंडातून काय बोलले कुणास ठाऊक, ते कधीच सांगत नाहीत. पण भेटून आले खरे. यांनी बोळकं उघडमिट केलं, त्यांनी दाढी खाजवली आणि हे समाधानकारक चर्चा झाली असं सांगत तुंदिल हलवत परत आले. हे म्हणजे शेतात माजलेल्या किडीने शेतकऱ्याची भेट घेऊन शेतीच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यासारखं झालं. अर्थात बरोबर आहे म्हणा, शेत वाळलं तर कीड काय खाणार, कडबा?  तर संतशिरोमणी गेले दिल्लीला आणि ज्युनिअर संतमंडळींना पाठवले अण्णांच्या दर्शनाला. स्वत: शिरोमणी गेले असते. पण मागच्या त्या थप्पड प्रकरणात अण्णांचे एका थपडेने समाधान झाले नसल्याचे त्यांनी उघड बोलून दाखवले होते. न जाणो आपण जाऊ आणि अण्णा ती कसर भरून काढतील. या भीतीने मग शिरोमणींनी स्वत: जाणे टाळले असावे. शिवाय ते स्वत:ला राष्ट्रीय पातळीवरचे नेते समजत असल्याने चिल्लर स्थानिक नेत्यांना अथवा प्रतिष्ठितांना ते भेटत नाहीत. तडक पंतप्रधान किंवा किमान राष्ट्रपती तरी लागतो. शिवाय अण्णांकडे गेले की जमिनीवर बसावे लागते, खाली बसले की पोटाचा पसारा मांडी घालू देत नाही. पंतप्रधानांकडे गेले की बुडाला ऐसपैस अशी बैठक मिळते. पंतप्रधान होणे तर आता शक्य नाही, किमान त्यांच्या खुर्चीसमोर तरी बसता येईल असाही एक गोड आशावाद त्यामागे असावा. जो पक्ष इतकी वर्षे सत्तेत आहे, ज्या पक्षाचा महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचा मंत्री आहे, करोडो रुपये खर्च करून कालवे, धरणे बांधण्याचा नुसता फार्स केला आणि प्रत्यक्षात करंगळी दाखवून ते भरण्याची वेळ आणली त्या पक्षाच्या नेत्यांनी गळे काढत त्याबद्दल चर्चा करावी हे पाहून ऊर कसा भरून आला. लोकसभेच्या पराभवानंतर या लोकांनी जणू रुद्राक्षाच्या माळा घालून अंगभर भस्म चोपडून साधुत्वाचे सोंग घेतले आहे. हे संत नव्हेत, साधूच. संत लौकिकार्थाने सर्वसंगपरित्याग करतात, साधू लोक बहुतांशी संधीसाधू असतात. नदीच्या किनाऱ्यावर छान कुबडीवर हात ठेवून डोळे बंद करून परमेश्वराचे ध्यान करत असल्याचा आव आणतील. पण प्रत्यक्षात हळूच एक डोळा किलकिला करून लोकांच्या मौल्यवान वस्तूवर किंवा एखाद्या मुग्ध कन्यकेवर डोळा ठेवतील.

ज्युनिअर साधू यांनी अण्णांची भेट घेऊन विचारले तरी काय? दुष्काळी परिस्थितीवर चर्चा म्हणजे नेमके काय? आन्ना, आवंदा काय पावसपाण्याचं खरं दिसत न्हाय. दुष्काळ तसा हायेच, पन या येळेस डिलक्स दुष्काळ दिसतो हाये. काय करावं म्हन्ता? पक्षात चर्चा झाली तशी. पण तुमाला ठावंच हाय, येक जण गंभीरपणं बोलेल तर शपथ. इतके दिवस बरं होतं, दुष्काळ आसला तरी चर्चा करायला लागावी अशी परिस्थिती न्हवती. पन आता जर चर्चा न्हाई झाली तर विधानसभेत आमच्या मतांचा दुष्काळ व्हईल ह्ये नक्की. मग आसं लक्षात आलं की आमच्यात येक बी आसा न्हाई की ज्येनं दुष्काळ पाह्यला हाये. आन काय करायला हवं याचा पत्ता आसेल. दादा तर बैठकीत हासतच हुतं. काही विचारलं तरी करंगळी वर. आबांना इचारलं तर म्हनले आता नळाला पानी येत नसंल तर पलम्बरला बलवा. काय कुटं कचरा, झाडपाला अटकतोय पायपात, मग कशाला यील पानी? आमच्या येशा पलम्बरला सांगतो. बेणं लई हुशार हाय. कुटला पन नळ दाखवा, ठीक करनार म्हणजे करणारच. बरोबर पानी चालू करतोय बघा. आनी तिकडं ते आमचे हानुमान, मंत्रीपद काय घावलं आट महिन्याचं, बगतो, इचार करतो, शेक्रेटरींचा सल्ला घेतो आनि कारवाई करतो म्हणू लागले हायेत. ह्येच जर पूर्वीचं आसतं तर पयले पावसाच्या नावानं शिव्यांची बरसात झाली असती आन मग राडास्टाईल आंदोलन. यांचं आंदोलन म्हंजे जे आंदोलन करत्यात त्यांच्या विरोधात आंदोलन. तर आशी दिव्य प्रभावळ जमल्याली हाये पक्षात. तवा अन्ना, तुमीच सांगा उपाय. तुमी जलसंधारणा क्षेत्रात काम केल्यालं हाये. काय केलं म्हंजे पाऊस पडंल? जरा मार्घदर्शण करून सोडा. चंद्राबाबूंनी शपथ घेताना म्हुर्त पाळला न्हाई म्हणूनपण पावसानं बैदा केलीय आसं बी ऐकतो, तुमाला ते खरं वाटतया का? आता सद्याच्या राजकारणात कवा शपथ घ्यावी लागेल आन कवा मोडावी लागंल कुणी सांगावं? आमच्या हानुमानाला कदी शपथ घ्यावी लागेल आसं सपनात पन आलं नसंल. आनि आमाला हारल्याबद्दल बक्षीस म्हणून ही वसाडगावाची झागिरी भेटंल आसंपन वाटलं नव्हतं. आयला सायेब एशीमदे पंतप्रधानासमोर गुजराती बिअर घ्येऊन, आन आमी हितं राळेगनशिद्दीला शेणानं सारवलेल्या जमिनीवर, गाईचं दूध समोर घ्येऊन बसलो आहे. आसो, तर अन्ना, उपाय सांगा.

अण्णा म्हणाले,"उपाय सांगतो. जरा टोकाचा आहे. पण परिस्थितीही टोकाची आहे. तुमच्या आबांचा तो बेष्ट पलम्बर आहे ना, त्याला लावा कामाला. म्हणावं पयले दादांचा गळका नळ बंद करून टाक. उगाच जीमिनीची नासाडी चालवलीय. हा नळ गळायचा थांबला की जमिनीचा कस वाढेल, झाडं वाढतील. झाडं वाढली की जमिनीची धूप थांबेल. जमिनीची धूप थांबली की ग्राउंड वॉटर टेबल सुधारेल. हे खालून काही द्यायचं टेबल नाही. खालून घ्यायचं बंद करा, हे टेबल सुधारेल." ज्युनिअर थक्क झाले. त्यांनी अण्णांना साष्टांग नमस्कार घातला. "अन्ना, तुमी लैच थोर आहात. आपल्यासाठी कायतरी करायची इच्छा हाये. तुमी फक्त सांगा, हुकूम करा." अण्णा मागच्या लोडावर टेकले, काही वेळ विचार केला आणि म्हणाले,"आमच्यासाठी खरंच काही करणार असाल तर सांगतो. आयुष्यात कसलीही इच्छा ठेवली नाही. पण एकच इच्छा आहे, दुर्दम्य आहे, प्रबळ आहे. काही काही वेळा अनिवार इच्छा होते पण स्वत:ला आवरतो." एवढं बोलून अण्णा थांबले. ज्युनिअर सटपटले. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेला माणूस. काय मागत्यात काय की! सोपं काम न्हाई. कुठून बोलून गेलो असं त्यांना झालं. चुळबुळत ते अण्णांकडे पाहू लागले. अण्णा पुढे बोलू लागले,"दोन वर्षांपासून मनात आहे. तेव्हा हे कराच. त्यावेळेस मी मनापासून बोललो होतो,"क्या ? एकही मारा?" खरंच, किमान सहा तरी हव्या होत्या. तीन डावीकडे, तीन उजवीकडे. एकच बसली, पाच बाकी आहेत. कराल तेवढ्या पुऱ्या? एवढी एक विच्छा माजी पुरी करा." 

No comments:

Post a Comment