Thursday, July 24, 2014

एका पक्षियाने

हॅरी हा एक ग्रे हेरॉन. रोज दिसणारा. एखाद्या ऋषीसारखे अर्घ्य देत असल्याप्रमाणे पाण्यात उभा असायचा. स्तब्ध. ध्यान लावलेले असायचे. पण अत्यंत सावध असायचा. कुणाची चाहूल लागली की पंख पसरून संथपणे आकाशात झेप घ्यायचा. उडायची घाई नसायची. त्या उडून जाण्यामागे भीतीपेक्षा उद्वेग जास्त असावा असं मला वाटायचं. पाच सहा फुटांचा प्रचंड पंखपसारा. एखादे हेलिकॉप्टर जसे गोल वर्तुळ घेऊन उंची गाठते तसेच हा पण करायचा. प्रथम प्रथम मला तो पन्नास फुटांच्या आतसुद्धा येऊ देत नसे. पन्नास फुटांची ओळख तीस फुटांवर येण्यासाठी दोन वर्षे लागली. अजूनही त्या तीक्ष्ण घाऱ्या डोळ्यांनी तो माझ्यावर नजर ठेवत असतो. आदरयुक्त अंतर ठेवणे हा एक आमच्यातील करार आहे. हॅरी नेहमी एकटा दिसतो. त्याच्या बरोबर कुणी सखा सवंगडी नसतो. अगदी विणीच्या हंगामातही त्याच्याबरोबर कुणी सखी नसते. हा पक्षी एखाद्या शापित गंधर्वाप्रमाणे असा एकाकी का? असा कोणता प्रमाद त्याच्याकडून घडला असावा की त्याला ही एकांताची शिक्षा मिळाली असावी? संपूर्ण ग्रे हेरॉन जमात तशी एकाकीच जगणारी म्हणा. आमच्या सोसायटीच्या साधारण दोनचार चौरस मैलांच्या परिसरात नैसर्गिक झाडी, डबकी मुबलक. माणसेही तशी जगा आणि जगू द्या या तत्वावर विश्वास ठेवणारी. त्यामुळे हॅरीला तसा धोका काहीच नव्हता. त्याला हॅरी हे नावही कौतुकाने दिलेले. त्याचं तो जगायचा, माणसे आपापली जगायची. असे एकूण सहजीवन चालू होते. अकस्मात एकदा हॅरीच्या चोचीमध्ये प्लास्टिकचा एक तुकडा दिसला. प्रथम वाटले मासा पकडताना एखादा कपटा चोचीत आला असेल. पण हॅरी तो तुकडा काढण्यासाठी प्रयत्न करतो आहे असे वाटले. जरा जवळ जाऊन खरेच अडकला आहे का हे पाहावे म्हणून दोन चार पावले पुढे गेलो. वास्तविक आमच्या कराराचा भंग झाला म्हणून उडून जायला हवे होते. पण आज तसे झाले नाही. तो तुकडा काढण्याच्या नादात त्याचे लक्ष नव्हते. मग माझ्या लक्षात आले की तो तुकडा चोचीच्या वरच्या भागात चोच आरपार जाऊन अडकला होता. मी अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तो उडून गेला. सोसायटीतील काही कनवाळू मंडळींनीही ते पाहिले होते. काही जणांनी मग प्राणिनियंत्रण कक्षाशी संपर्क करून काय करता येईल ते विचारले. त्यांचे म्हणणे असे पडले की यात काही ढवळाढवळ करू नये. त्यातूनही तुम्हाला एवढे वाटत असेल तर तुम्ही त्याला घेऊन या. एका दृष्टीने त्यांचे म्हणणे बरोबरही होते. बदलत्या परिस्थितीशी प्राणिमात्रांचे अनुकूलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया. डार्विनच्या सिद्धांतानुसार जे बदलतील ते टिकतील. जे टिकणार नाहीत ते नाश पावतील. पण प्लास्टिक निर्मिती ही काही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मानवाने आपल्या सोयीसाठी जे जे काही केले आहे त्याची तुलना काचेच्या वस्तूंच्या दुकानात उन्मत्त बैल गेल्यावर जे होईल त्याच्याशीच करता येईल. ही पृथ्वी जणू आपल्याला आंदण मिळाली आहे असे आपले वर्तन असते. हॅरीच्या चोचीतील तो तुकडा पाहून अपराधी वाटू लागले होते. त्या बिचाऱ्याला ते काय आहे तेसुद्धा माहीत नव्हते. हॅरी तसा सहा सात वर्षांचा असावा. म्हणजे सर्वसाधारण वयाच्या दृष्टीने वयस्कर. जोवर तो तुकडा त्याच्या चोचीत आहे तोवर त्याला भक्ष्य मिळवता येणार नव्हते. मानसिकदृष्ट्या त्रास होईल तो वेगळाच. हॅरी उपासमारीने मरणार अशी भीती वाटू लागली होती. त्यातून तो पुढे चारपाच दिवस दिसलाच नाही. मग ती शंका बळावू लागली. वाट पाहणे एवढेच हातात होते. आणि आज तो पुन्हा दिसला! नुसताच दिसला नाही तर, त्याच्या चोचीतील तो प्लास्टिकचा तुकडाही गायब होता! अगदी एखाद्या आजारी माणसाने परगावी जाऊन शस्त्रक्रिया करून घेऊन आल्याप्रमाणे आला होता. मी समाधानाने त्याला पाहिले.

म्हणजे इतके दिवस हे सहजीवन आहे असे आम्हांस तरी वाटत होते. सहजीवनासाठी प्रयत्न लागतो. डोळसपणे इतरांच्या गरजा पाहण्याची संवेदनशीलता लागते. आपल्या नकळत आपल्या जीवनशैलीतून आपण अनेक न दिसणारे परिणाम घडवून आणत असतो. टाईम-लॅप्स फोटोग्राफीसारखे तंत्रज्ञान वापरून आपल्या जीवनशैलीचा पर्यावरणावर कसा परिणाम झाला आहे हे पाहता आले पाहिजे. आपले सुख, आपल्या गरजा, आपले राहणीमान यात आपण इतके बुडून गेलेलो आहोत की आपल्याला परिणामांची फिकीरच नाही. शहरातील जागा संपल्या, चला उपनगरे तयार करू. बिल्डर तर नफेखोरी घेऊन बसले आहेतच. नगर अधिकाऱ्यांना किती बिझनेसेस आले, किती उलाढाल झाली याची फिकीर. तत्काळ जमिनी बिगरशेती होऊन जातात. पर्यावरणाचे सर्टिफीकेट देणारा बसलेला असतो एखाद्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात. त्या परिसरातील जैववैविध्याचा अभ्यास नाही, किती प्राणी अथवा जाती बेघर होतील याची फिकीर नाही. त्यांच्या बेघर होण्याने पर्यावरणावर दूरगामी परिणाम किती होईल याचाही विचार नाही. प्राणी अथवा पक्षी दिसला तर त्याला त्रास न देणे अथवा जीव न घेणे म्हणजे आपण सहजीवन म्हणत असू तर त्या सहजीवनाला काही अर्थ नाही. परस्परपूरक राहणीमान हेच खरे सहजीवन. जोवर आपण आपल्या गरजांची पूर्तता इतर प्राणिमात्रांच्या जीवनाकडे न पाहता करत राहू, तोवर आपण आपले राहणीमान जरूर उंचावू, पण एक प्राणीजात म्हणून मानव या प्राण्याचे अध:पतनच करू. 

No comments:

Post a Comment