जेटली या नावातच वेग आहे. वेग अनेक प्रकारचे असतात नुसताच वेग, संवेग, आवेग, उद्वेग. मार्शल आर्टवाले चित्रपट मला आवडतात. त्यातील जेट ली हा एक आघाडीचा चायनीज नट. वेग, संवेग यावर पुरते नियंत्रण असलेला. अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, आपल्या मास्तरांच्या (पक्षी: गुरू) वधाचा बदला घेणारा, राष्ट्र बलवान होण्यासाठी पश्चिमेशी लढा देणारा. मास्तरांच्या वधाचा बदला घेणे ही एक अगम्य गोष्ट सोडली तर त्याचे चित्रपट पाहताना थक्क होऊन जायला व्हायचं. आम्ही शाळेत असताना मास्तर नुसते आजारी पडले तरी आनंदकल्लोळ व्हायचा, बदला वगैरे घेणं मनातसुध्धा आलं नसतं. त्यामुळे जेट लीबद्दल आदर वाटायचा. शिवाय आजपर्यंत दणकट आणि टिकाऊ असलेली ही एकच चायनीज वस्तू मला दिसलेली आहे. आमचे देशी नट-बोलट पाहताना दया यायची. हल्लीचे जरा व्यायाम करणारे असतात. पण पूर्वीचे आठवून पहा. संजीवकुमार, राजेशखन्ना, दे.भ.प. मनोजकुमार ही सर्व मंडळी व्यायाम म्हणून लोण्यात माखलेले पराठे खात असावीत असेच वाटायचे. राजकारण हा एक रंगमंचच. त्यात वावरणारे हे रंगकर्मी. अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. अर्धे पाऊल इकडचे तिकडे झाले की माणूस राजकारणात यायचा तो अभिनयक्षेत्रात जातो आणि ते वाकडे पडले की अभिनयक्षेत्रात असणारा माणूस राजकारणात. गरजूंनी आजूबाजूला उदाहरणे पहावीत. रितेश देशमुख यांचा सन्माननीय अपवाद वगळता अभिनयाचे पाणी शेवटी राजकारणाच्याच वळचणीला जाताना दिसते. असो. विषयांतर झाले. तात्पर्य, आपल्याकडे जेट ली सारखा हनुमंत का नाही असे सारखे वाटायचे. बऱ्याच काळाने का होईना ही विच्छासुद्धा पुरी होते आहे. आता चिनी लोकांना तुमच्यासारखा जेटली आमच्याकडेही आहे हो असे अभिमानाने आपल्याला सांगता येईल. ते हातवारे, तो अभिनिवेश, ती तडफ, जिभेवर लीलया नाचत असलेल्या आर्थिक संज्ञा, श्रीमंतांविषयीची कळ आणि गरीबांविषयी कळकळ ओसंडून वाहताना पाहिली आणि हाच आपला तारणहार याविषयी मनात शंका उरली नाही.
भारतीयांना प्रगती हवी आहे, देशाचा बेकारीत जगायचा अजिबात 'मूड' नाही, गरिबांना मध्यमवर्गात यायचे आहे अशी आश्चर्यकारक माहिती त्यांच्या भाषणातून कळली. म्हणजे तशी शंका होतीच, पण खुद्द जेटलींनी सांगितल्यामुळे विश्वास बसला. हे गरीब लोक नेहमीच असलं काही तरी मागत असतात. पूर्वी रेल्वेत चांगले फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास होते. गरीब लोक नेहमी थर्ड क्लासचं तिकीट काढून सेकंडमध्ये जाऊन बसायचे. रेल्वेने त्यांची ही इच्छा ओळखली आणि अत्यंत हृदयद्रावक कृती केली. थर्ड क्लास रद्द करून त्यालाच सेकंड करून टाकले. थर्डक्लासवाले आपोआप सेकंडला अपग्रेड झाले. जेटलींच्या करुणप्रेमळ मनात असेच काहीसे असणार. भारतातील बहुसंख्य जनता दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असताना त्यांच्या घशात बिसलेरीच्या पाण्याचा घोटसुद्धा जाणार नाही. आणि लोकांच्या मूडचा काही भरंवसा नसतो. आज म्हणतील बेकारी नको, उद्या म्हणतील नोकरी नको. त्यामुळे पूर्वीच्या सरकारचे वांधे झाले होते. जेटली यांनी ते बरोबर हेरले आणि आपण ते हेरल्याचे भाषणात सांगितले. उगाच कुणी म्हणायला नको, आम्ही लई मुडात आलो होतो, पण तुम्ही नाट लावलात. मूड असो वा नसो, आता विकास होणारच. पण आता आम्हाला आशेचे हिरवे कोंब उगवताना दिसताहेत असे त्यांनी म्हटल्यावर उगाचच आपण म्हसरू झालो आहोत आणि लुसलुशीत कोंब चरत आहोत असे दृश्य डोळ्यासमोर आले. पण त्यांच्या पुढच्या वाक्याने गुराख्याने दांडक्याचा एक तडाखा मागील पायावर ठेवून दिल्याप्रमाणे वाटले. माझ्या आधीच्या मास्तरांनी माजं काम लई आवघाड करून ठेवल्यालं आहे. या वर्षात वित्तीय तूट ४. १ टक्क्यावर आणायचं काम माझ्यासमोर आहे. पण हे आव्हान मी तुमच्या वतीनं स्वीकारतो. हे वाक्य उच्चारताना त्यांनी आपल्या चेहऱ्याचा बेस्ट अँगल टीव्ही कॅमेऱ्याला दिला. सभागृहात बाकीचे घामाने निथळत असताना जेटलींच्या माथ्यावरील काही स्वतंत्र बाण्याचे केस वाऱ्याने भुरूभुरू उडत होते, अगदी चित्रपटात दीपिका पदुकोणचे उडतात तसे. आपल्याला वित्तीय तूट, खर्चात कपात, ठोक देशी उत्पादन असले शब्द ऐकले की भीती वाटते. तूट, कपात, ठोक हे शब्द थेट भाई लोकांच्या शब्दकोषातून घेतल्याप्रमाणे वाटतात. त्यामुळे या अहिमहींना सामोरे जाणारे जेटली अधिकच शूर वाटू लागले. कमीत कमी सरकार ठेवून लोकांना जास्तीत जास्त शासन करून दाखवू हे ऐकल्यावर बरे वाटले. ज्यांना शासन घडले पाहिजे असे लोक आमच्या चाळीतच कितीतरी आहेत.
एक नाही दोन नाही तब्बल १०० कोटींची तरतूद असलेल्या योजना पाहून भान हरपते. आमच्या ऑफिसात आमच्यासाठी नवीन माठ आणि साहेबांच्या केबिनला एसी बसवला होता तेव्हा संपूर्ण स्टाफ हरखून गेला होता. केवळ माठाचे गार पाणी प्यायला मिळते म्हणून आम्ही सर्व कारकून उन्हाळ्याचे सर्व दिवस ओव्हरटाईम करत होतो. साहेबाशी उभा दावा असणारा आमचा रेग्या, केवळ एसीत उभे राहायला मिळते म्हणून काही तरी काम काढून साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या शिव्या खाऊन येत होता. तसाच काहीसा आनंद आताही झाला. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सादर करताना त्यांच्या डोळ्यात पित्याची ममता आणि करडी जरब दोन्ही दिसत होती. फिल्म इंडष्ट्रीतील सर्वात यशस्वी बाप झालेले (फक्त भूमिकेच्या अनुषंगाने) श्रीयुत आलोक नाथ उर्फ बाबूजी म्हणाले,"ये है संस्कारी पुरुष का लक्षण. मैने प्यार कियाच्या सेटवर भाग्यश्री पटवर्धनला मी मुलगी मानले. तिच्यावर खूप संस्कार केले. तर तिने त्या हिमालयासारख्या थंड अभिनयाच्या इसमाशी लग्न केले. आता काय बोलणार? तेव्हा, बेटी बचाओला माझा पूर्ण पाठिंबा आहे. " दुसरी योजना म्हणजे वनबंधू कल्याण. वनबंधू कल्याण हा खरोखर ज्वलंत प्रश्न आहे. पूर्वीच्या सरकारने ठाणे जिल्ह्यातील कातकऱ्यांचे भलं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यासाठी कॉम्प्युटर क्लासेस, गृहकर्जात गाडीकर्जात सवलत, सुलभ हप्त्यांवर वॉशिंग मशीन इत्यादि इत्यादि. पण वनबंधूंना विकासच नको असतो असे लक्षात आले. शेवटी ठाणे शहरात बिल्डर लोकांना काय वाट्टेल ते करा अशी परवानगी दिली. त्यांनी सगळी आजूबाजूची जंगले सफाचट करून शहराचा विकासच विकास करून टाकला. त्यामुळे ठाणे शहराच्या आसपासचे कातकरी कल्याण तालुक्यात गेले. कल्याण असेही करता येते. जेटली वनबंधूंच्याबद्दल बोलताना विशेष गंभीर आणि व्याकूळ झाले होते. एsssss भाsssssय, वाल्या दिलीपकुमारसारखे. त्याने तरी विकासाची गाडी वनबंधूसाठी थांबते का पाहू. उरलेला भारत तरी विकासासाठी आतुर झाला आहे.
शेवटी संकल्प हा सोडण्यासाठी असतो. आणि तो सोडायचा असतो तो देवदयेने पुरा होईल या आशेने. तसाच हा अर्थसंकल्प सोडला तर आहे, फक्त आता देवदयेची वाट पहायची आणि हे जम्बो जेटली आपल्याला सुखरूप कुठेतरी उतरवेल याचा नवस करायचा. काही असो चायनीज प्रॉडक्टला तोडीस तोड एक तरी भारतीय माल निघाला याने आमचा दीस गोडु झाला आहे.
No comments:
Post a Comment